अजूनकाही
खरे तर सारखेसारखे ह्या मुद्द्यावर बोलावे लागणे खेदकारक आहे. शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती केली. नंतर बराच विरोध आणि जनक्षोभ वाढण्याची वाट पाहून ती तात्पुरती थांबवली. आता ह्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, याचा अर्थ मूळ निर्णय रद्द केला आहे, असे नाही. स्थगिती हे ‘लबाडाघरचे आवतण’ आहे. हा गोंधळ गेली आठ-दहा दिवस चालू होता.
मुळात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवायची काडीचीही गरज नाही. खरे तर पाचवीपासून पुढेही हिंदी शिकवायची गरज नाही. हिंदीशिक्षणाचे हे संकट जेवढे पुढे ढकलता येईल तितके ढकलावे. हिंदी आठवीनंतर किंवा खरे तर महाविद्यालयीन पातळीवर फार तर शिकण्यासाठी उपलब्ध ठेवावी.
हिंदीसक्तीचा हा खेळ म्हणजे हिमनगाचे केवळ एक वरचे टोक आहे. त्या खाली अनेक गुंतागुंतीची षड्यंत्रे दडली आहेत. ‘हिंदाडी विस्तारवादा’चा आज उद्दंड झालेला दशानन हा ह्या सगळ्या पाताळयंत्री आंतरप्रक्रियांचे एक रूप/उत्पाद (ऑफशूट) आहे.
हिंदीसक्तीचा घेतलेला आणि मागे घेतलेला निर्णय हा मूळ रोग नसून, रोगाचे एक लक्षण आहे. हिंदी ‘राष्ट्रभाषा’ असल्याचा धूळफेक करणारा निराधार प्रचार आणि भ्रम अगदी परवापरवापर्यंत बेमालूमपणे पसरवला जात होता (अजूनही काही मंडळी त्यातून बाहेर आलेली नाहीत)! याला त्रिभाषासूत्राचे धोरण कारणीभूत आहे. बर्याच दशकांपासून त्रिभाषासूत्राचा विचार आपल्याकडे गोंजारला गेला. जोवर सामाजिक आणि भाषिक सौदार्हाचे वातावरण देशभर, महाराष्ट्रात होते, तोवर त्रिभाषासूत्राचा विचार तितका खुपला नाही, जाचक वाटला नाही. पण आता सत्तेच्या अरेरावीचा जो स्तर, दर्जा आपल्याला दिसतो, त्या खुनशी वातावरणात हा त्रिभाषासूत्राचा विचार प्रचंड अनैतिक, अत्यंत त्याज्य आणि रद्दणीय झालेला आहे. मराठी भाषेच्या मुळावर उठलेला हा हिंदीधार्जिणा विचार अगदी खडबडून जागे होऊन तातडीने झटकून टाकला पाहिजे. माकडाच्या हाती कोलीत मिळाल्यासारखे ‘त्रिभाषासूत्र’ झालेले आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हिंदी पहिलीपासून शिकवली तर काय होईल? माझ्यासारखे जे कवी आहेत, भाषाभ्यासक आहेत किंवा आम्हीच असे नाही, तर वर्षानुवर्षे भाषाभ्यासाच्या विविध प्रांतात काम करणारे भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आहेत, त्यांना हे मनोमन माहीत आहे की, हिंदी-मराठीत असलेल्या साम्यस्थळांमुळे ह्या एकाच कुळातल्या, एकसारखा तोंडावळा असलेल्या भिन्न भाषा शिकताना मुलाचा प्रचंड संभ्रम होणार आहे.
मराठी-हिंदीचे साम्य मराठीला मारक आहे. लिपीमध्ये असलेली सामायिकता, शब्दलेखनातली, वाक्यरचनेतली समानता, शब्दसाठा (व्होक्यॅबलरी) आणि व्याकरणात असलेली साम्यभेदस्थळे अशा सगळ्या गोष्टींमुळे दोन्ही भाषांमध्ये अनेक अंधुक सीमारेषा आणि निसरडी स्पर्शस्थाने आहेत. ती सगळी गोंधळ निर्माण करणारी, संभ्रमात टाकणारी, चुकवणारी आणि चकवणारी आहेत. मुलांच्या भाषाकलनाची गती मंदावणारी आहेत.
दोन्ही भाषांमध्ये सहोदरसाम्य असल्याने ऱ्हस्वदीर्घ आणि अन्य व्याकरणिक वैशिष्ट्यांबाबत गोंधळ निर्माण करणारी आहेत. ‘व्यक्ती आणि व्यक्ति’, ‘कवि आणि कवी’ असे लिंग, ऱ्हस्वदीर्घातले बारकावे, किंवा ‘शिक्षा, यातायात’ असे समानध्वनि किंवा समानलेखी शब्द (Falls cognates, Homographs) यांसारख्या बारकाव्यांनिशी स्पष्ट करता येतील, अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे कोणताही जाणकार आणि ज्ञानक्षेत्राशी बांधीलकी असलेला भाषातज्ज्ञ वा भाषाभ्यासक मराठी-हिंदी एकत्र शिकवायची शिफारस करणार नाही. कोणताही सुबुद्ध शिक्षणतज्ज्ञ भाषाशिक्षणाच्या नाजूक आणि प्राथमिक टप्प्यावर मराठी-हिंदीच्या एकत्रित शिक्षणाची शिफारस करणार नाही.
मुळात मराठीसुद्धा नीट शिकवू न शकणारे किंवा स्वतःलाही नीट मराठी न येणारे किंवा मराठीची समजच पुरेशी नसलेले अनेक अध्यापक आपण बालवाडीपासून ते पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. स्तरापर्यंत बघतो. स्वतःच्या मातृभाषेविषयीची अतिशय जुजबी भाषिक समज असणारी ही सारी दिव्य यंत्रणा हिंदी शिकवायला मैदानात उतरल्यास एकंदर भाषाशिक्षणाचीच दाणादाण उडणार आहे! भाषा ही गंभीरपणे घ्यायची गोष्ट आहे, हेच ह्या (मराठीविरोधक) लोकांना माहिती नाही.
भाषा हे मानवाचे आद्य ‘प्रोग्रॅमिंग’ असते. जगाच्या आकलनाचे ‘अल्गोरिदम’ मेंदू भाषेत लिहितो. विचार करण्याची विद्या, जगातल्या घडामोडींचा अर्थ लावण्याची विद्या माणूस भाषेच्या आधारे विकसित करतो. जर भाषिक भरणपोषण खुरटे असेल, तर ती पिढी स्वत:चा विचार स्वत: करू शकणार नाही. सतत दुसर्यावर अवलंबून राहील. त्यातून पुढे फक्त आरोळ्या देणारे, बौद्धिक नसबंदी झालेले अर्धवटराव आणि च्छू म्हटले की, ट्रोलिंग करणारे बिनबुडाचे विचारशून्य ‘झोंबी’ तयार होतील; भाषासमृद्ध नागरिक तयार होणार नाहीत.
समृद्ध भाषिक जाणिवा वनस्पतीतल्या हरितद्रव्यासारखे काम करतात. त्या ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत व्यक्तीला स्वयंपूर्ण बनवतात, तिचे भावनिक, बौद्धिक, सामाजिक पोषण करतात. समृद्ध भाषिक जाणिवांमुळे माणसे माणसे राहतात, त्यांचे माणूसपण शाबूत राहते. समृद्ध भाषिक जाणिवांशिवायची माणसे म्हणजे माणसांच्या रूपातली बुजगावणी किंवा बांडगुळे!
भाषेचा आणि भाषिकवैविध्याचा दृष्टीकोन हा जैववैविध्याचा दृष्टीकोन आहे. हाच लोकशाहीचाही दृष्टीकोन आहे. प्रत्येक जीवाला जगण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे, तसा प्रत्येक भाषेला जिवंत राहायचा अधिकार आहे. मराठीचा तो अधिकार हिरावून घेतला जातो आहे, ते गैर आहे. इतका उन्माद तुम्हाला कुठून येतो? प्रत्येक विषय सत्तेच्या राजकारणाशी येऊन ठेपणे आणि प्रत्येक विषय सत्तेच्या राजकारणातून उगम पावणे, हाच आता ज्ञानक्षेत्रातला शिरस्ता असणार आहे का?
खरे तर कोणत्याही राजकारण्यांनी भाषा-संस्कृती-कला-विज्ञान या ज्ञानक्षेत्रातल्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करू नये. तुम्हाला यातले काय कळते? कशाला यात नको इतका सोस करताय? तुम्ही तुमची कामे नीट केली, किमान शांतता आणि सुव्यवस्था राखलीत, साध्या रस्ते-पाणी-वीज-वाहतूक अशा साध्या आणि मूलभूत नागरी सुविधा नीट पुरवल्या, तरी डोंगराएवढे काम होईल! बाकीचे विषय त्यातल्या (निःपक्षपाती आणि इमानदार) तज्ज्ञांवर सोपवावेत.
खरे तर आदर्शवत आणि कल्याणकारी राज्यव्यवस्थेत, लोकशाही राज्यव्यवस्थेत लोकनियुक्त सरकारने लहरी संस्थानिकांसारखे, सरंजामदारांसारखे न वागता देशातल्या भाषिक विविधतेचा आदर करून, त्या सर्व भाषांचा संवर्धन-समतोल राखायला हवा.
हिंदीच्या अतिक्रमणामुळे किंवा हिंदीला अशा प्रकारे अतिक्रमण करू दिल्याने मराठी भाषा वापरबाह्य होईल, आक्रसत जाऊन नष्ट होईल आणि पाली-संस्कृत अशा भाषांसारखी ती एक मृत भाषा म्हणून उरेल, हे सांगायला काही फार मोठ्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. ‘हिंदाडी वसाहतवादा’मुळे ती ‘काचेच्या कपाटातला सिंह’ बनेल! कॉमन-सेन्स असलेल्या कोणत्याही माणसाला हे कळू शकते.
पर्यावरणात जसे म्हणतात की, एखादी वनस्पती, पक्षी, प्राणी किंवा प्रजाती उत्क्रांत होऊन स्थिरावण्यासाठी शतकानुशतके लागलेली असतात, पण नष्ट व्हायला पाचपन्नास वर्षेही पुरतात. तसेच भाषेचे आहे. मराठी भाषा निर्माण होऊन वहिवाटीत येऊन ती आविष्कारक्षमतेच्या पातळीवर स्थिरावण्यासाठी शतकानुशतके लागली आहेत, पण कोणीतरी चार गणंग, अडाणी लोक उठतात आणि त्या विषयातले तीळमात्र ज्ञान नसताना वाट्टेल ती धोरणे आखतात, वाट्टेल ते आग्रह धरतात आणि सरकारही त्यांचे ऐकून ती धोरणे पुढे रेटते, हे भयंकर आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मराठी भाषा काही तुम्हीआम्ही किंवा कुठल्या खाजगी कंपनीने किंवा कोणत्या संघटनेने जन्माला घातलेली नाही. ती परंपरेतून आणि भाषेतिहासाच्या उत्क्रांतीतून सिद्ध झालेली-निर्माण झालेली गोष्ट आहे. ती आणि तिचे सातत्य नष्ट करायचा आपल्याला काय अधिकार आहे? एकदा भाषा संपवल्यावर ती पुन्हा निर्माण करता येणार आहे का? हे एक प्रकारचे ‘लिंग्विस्टिक जेनोसाईड’ किंवा ‘भाषेचा वंशसंहार’ आहे. तो कोणीही करू नये. कोणी करत असेल, तर त्यात सहभागी होऊ नये, त्याला प्रोत्साहन देऊ नये. ‘मराठीच्या मारेकऱ्यां’ना पूरक ठरेल, अशी बांडगुळमुळीत भूमिका घेऊ नये. तसे करणे पाप आहे. मराठीचा संहार थांबवावा.
भाषाहत्या हे सर्वांत मोठे पाप आहे. ते माथी मारून घेऊ नये, अशी सगळ्या संबंधितांना आणि मराठीद्वेष्ट्यांना नम्र विनंती. ‘जित’ आणि ‘जेते’ असे स्वरूप हिंदी-मराठी नात्याला आणू नये. महाराष्ट्रात शालेय शिक्षणाची भाषा मराठीच असावी. मराठी भाषाच प्राथम्याने शिकावी. त्यानंतर इंग्रजी शिकावी. त्यानंतर हौसेने स्वबळावर जगातली कोणतीही भाषा शिका. विनोबांना बावीस भाषा यायच्या म्हणतात, तुम्ही एकशेबावीस शिका, कोणी अडवलेय? शुभेच्छा आहेत!! पण आधी मराठीच्या मारेकऱ्यांपासून मराठीला वाचवा.
उत्तरीकरणाच्या दबावाला बळी पडून महाराष्टाला ‘हिंदीत्ववाद्यां’ची वसाहत बनू देऊ नका. महाराष्ट्राच्या मातीत प्रादुर्भाव झालेले हे हिंदी-अतिक्रमणाचे तण मूळ पिकाच्या म्हणजे मराठीच्या मुळावर उठले आहे. ते जागरूकपणे शोधशोधून खुरपून काढणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या शालेय शिक्षणातून, अभ्यासक्रमातून हिंदी पूर्णपणे, निःसंकोचपणे, न-भिता हद्दपार करा.
सारखे सारखे ह्या विषयावर बोलायची वेळ आणून महाराष्ट्र अस्थिर, धगधगता ठेवत महाराष्ट्राची ‘गाझापट्टी’ करू नका. ही ऊर्जा आम्हाला चांगल्या आणि सर्जक कामासाठी वापरू द्या, एवढीच कोपरापासून हात जोडून विनंती.
.................................................................................................................................................................
लेखक मराठीतील एक कवी आणि भाषा अभ्यासक आहेत.
saleelwagh@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment