अजूनकाही
‘जनरेशन झी’ आणि ‘मिलेनियल्स’ अशी व्याख्या ज्या पिढीची केली जाते, तिला शंभर वर्षांपूर्वी भारतात काय घडले आणि ते कोणी घडवले, हे सांगायची जबाबदारी मोठ्यांनी जवळपास टाकून दिली आहे. पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम आणि जयंती-पुण्यतिथी यांच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांत अवतरणारे धावते आढावे एवढीच काय ती उगवत्या अन् उमलत्या पिढीला मागचे काही सांगायची व्यवस्था शिल्लक आहे. मात्र या पिढीसह जन्मलेल्या अन् झर्रकन वाढून बसलेल्या डिजिटली माध्यमांनी इतिहासाची अशी काही विकृत अन् विपर्यस्त विषारी शिकवणी सुरू केली की, खाजगी क्लासेसमुळे शाळा-महाविद्यालयांची जशी निराधार, केविलवाणी अवस्था झालीय, तशीच प्रस्थापित माध्यमांची झालीय. धडे, पुस्तके, माहिती यांतही विपर्यास व विक्षेप सुरू झाले.
हे असे विकृतीकरण विकोपाला नेणारी उजवी, धर्मवादी, जात्यंध विचारधारा देशात शंभर वर्षांपासून जिवंत होतीच. मात्र ती देशाच्या मध्यधारेत कधी येऊ शकली नव्हती. २०१४पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता अखंड चालू लागली, तशी हिंदुत्ववादी मांडणी इतिहास, संस्कृती, राजकारण, समाजकारण, शिक्षण यांत घुसवणे सुरू झाले.
ही ‘हिंदूराष्ट्रा’ची विचारधारासुद्धा ‘जनरेशन झी’, ‘मिलेनियल्स’ आणि सामाजिक म्हटली जाणारी समुदायकेंद्री माध्यमे यांसोबतच वाढली. त्यामुळे तिची बौद्धिक, वैचारिक पातळी या विशीतल्या पिढीएवढीच असली, तरी तिचा इतिहास व वारसा मात्र शंभर वर्षांचा आहे. हा वारसा कमालीचा कुटील, कृतघ्न व कुशल आहे. तोच या साऱ्या विकृतीकरणामागे असतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्यामुळेच गेली दहा वर्षं म.गांधी, पंडित नेहरू, सुभाषबाबू, सरदार पटेल यांना एकाच वेळी बदनामी, अपहरण आणि विस्थापन सोसावे लागत आहे. त्यातल्या त्यात म.गांधींना अधिक. किशोरवयीन असोत की, तरुण मुले-मुली, त्यांना म.गांधी हा माणूस चीड आणणारा वाटतो, कारण त्यांच्याविषयी खोटी माहिती त्यांच्या मनात चहूबाजूंनी पेरली गेली आहे.
अशा वेळी म.गांधींचे जीवन जसे देशाने पाहिले आणि इतिहासाने ते नोंदवले, तसे सुहास कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. हा वाचकही सामान्य नाही. तो साधारणपणे सोळा-चौदा वर्षांच्या आतला त्यांनी ठरवला आहे. या वयातल्या वाचकाला त्याच्या नकळत्या वयापासून गांधीद्वेष शिकवला गेला आहे. तो काढून टाकायला हे पुस्तक उपयोगी पडेल.
‘असे होते गांधीजी’ या शीर्षकाचे हे पुस्तक नेहमीच्या आकाराचे नाही. बालवाङ्मय साधारणपणे ज्या आकारात छापायची प्रथा आहे, तो आकार या पुस्तकाचा आहे. काळ्या-पांढऱ्या रंगातली गांधींच्या जीवनातल्या प्रसंगांची छायाचित्रे या पुस्तकात आहेत. ज्यांना म.गांधींची आत्मकथा माहीत आहे, तेही या पुस्तकातून आनंद आणि नवी माहिती मिळवू शकतील. लेखक एका गांधीवादी कुटूंबातले आहेत. वर्धा हे त्यांचे मूळ गाव. म.गांधी त्यांच्या जीवनातला मोठा आदर्श आणि प्रेरणा.
म.गांधींचे जीवन नाट्यपूर्ण आहे, मात्र त्यांचे लेखन व भाषण तसे अजिबात नव्हते. अत्यंत साधी, अनलंकृत आणि थेट भाषा गांधींची असे. तशाच शैलीत कुलकर्णी यांनी म.गांधींच्या आयुष्यातल्या जवळपास सर्व ठळक घडामोडी छोट्या वाचकांसाठी निवडून त्या सरळ मांडल्या आहेत. किंबहुना ज्या ज्या घटनांचा वा निर्णयांचा विपर्यास हिंदुत्ववादी करतात, त्यांची साधार आणि स्पष्ट मांडणी कुलकर्णी करतात.
म.गांधींचे दक्षिण आफ्रिकेतले संघर्ष वेडेवाकडे करणे कोणाला जमले नाही. म्हणून १९३०नंतरची त्यांची सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक भूमिका हिंदुत्ववाद्यांनी आजवर मोडतोड करून अनेकांवर लादली. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व म.गांधींकडे आपोआप आले. आफ्रिका सोडून भारतात आपले कार्य आरंभणारे गांधी कसकसे बदलत गेले आणि त्यांच्या नेतेपणाला कोण कोण कारणीभूत ठरले, ते तीन-चार पृष्ठांत लिहिणे अवघड. तरीही कुलकर्णी यांनी गांधींचे वेश, आंदोलने, चरखा, राजकीय मतभिन्नता, विरोधक यांची थोडक्यात पण नेमकी नोंद केलेली आहे.
पंडित नेहरू, सरदार पटेल, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस या म.गांधींच्या समकालीन थोरांवर कुलकर्णी यांनी स्वतंत्र प्रकरणे लिहून आज संघवाले जो भ्रम पसरवतात, त्याचे सुस्पष्ट निराकरण केले आहे. यातला कोणीही कोणाचा ना प्रतिस्पर्धी होता, ना विरोधक. मात्र संघवाले कायम त्यांचे मतभेद व कार्यप्रणाली यांवर भर देत काँग्रेस पक्ष कसा दहातोंडी होता, याचा अपप्रचार करतात.
महत्त्वाचे म्हणजे मुसोलिनी व हिटलर यांच्याबद्दलची म.गांधींची मते लेखकाने एका स्वतंत्र प्रकरणात मांडली आहेत. ब्रिटिश साम्राज्य व वसाहतवाद यांचा तो एक विरोधक असल्याने मुसोलिनीने म.गांधींना वश करू पाहिले, पण त्यांनी त्याला धुडकावले. हिटलरला त्यांनी पत्रे लिहिली. शिवाय वेळोवेळी मुलाखती व आपली वृत्तपत्रे यांतून गांधी हिटलरच्या विरोधात मते मांडत होतेच. महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववाद्यांना मात्र हिटलरचे प्रचंड आकर्षण होते. ते गोळवलकर यांच्यापासून कानिटकरांपर्यंत ओसंडून वाहिले.
म.गांधींनी भगतसिंग व सहकारी फासावर जाऊ नयेत यासाठी काही केले नव्हते, हा हिंदुत्ववाद्यांचा खोटारडा प्रचार पुसून टाकताना कुलकर्णी साधार एक प्रकरण लिहून काढतात. ते त्यात शेवटी म्हणतात – “…सैन्याच्या पाशवी शक्तीचा मुकाबला सशस्त्र संघर्षाने न करता अहिंसेच्या, शांततेच्या, हृदयपरिवर्तनाच्या मार्गानेच होऊ शकतो, याची जाणीव त्यांना तेव्हा झाली होती. त्याप्रमाणे ते आयुष्यभर चालले आणि इतरांनाही सांगत राहिले. सगळ्यांनी त्यांचं ऐकलं असं नव्हे, पण त्यांचा मार्ग अमान्य असूनही गांधीजी त्यांच्या मदतीला धावून जात राहिले.”
भारताच्या राज्यघटनेवर म.गांधींचा ठसा मुळीच नाही. याचा अर्थ घटनाकार गांधीविरोधक होते, असा नाही. म.गांधींच्या काही प्रिय कल्पना अव्यवहार्य असल्याचे त्यांना कळवण्यात आले. खुद्द गांधींना आपण स्वमताचा आग्रह धरू नये असे पटले आणि आज आपण पाहतो ती राज्यघटना आकारास आली. त्याविषयी कुलकर्णी यांनी लिहिलेले प्रकरण म.गांधींचा अप्रत्यक्ष विचार आणि नेतृत्व कसे या सर्व उपक्रमाकडे होते, ते स्पष्ट करते. राज्यघटना लिहितेवेळीच गांधींचा खून झाला. तरीही घटनाकारांनी भावना बाजूला ठेवून हे महत्कार्य पार पाडले, हाही गांधीजींच्याच आचरणाचा ठसा.
गांधी तत्त्वज्ञ अथवा सिद्धान्तकार नव्हते. ते असे सांगत की, माझे जीवनच माझा संदेश. लोकशाही, समाजवाद वा प्रजासत्ताक अशा एकाही महत्त्वाच्या राजकीय मूल्यावर त्यांनी तत्त्वज्ञांसारखी मांडणी कधी केली नाही. तरीही कुलकर्णी यांचा लोकशाही बीजपेरणी या प्रकरणातून म.गांधींची अप्रत्यक्ष प्रेरणा देशाला कसकशी मिळत गेली, याची नेमकी उदबोधक कथा सांगण्टा प्रयत्न चांगला आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा गांधी आणि धर्म हा. म.गांधींच्या प्रार्थना, ‘रामराज्या’ची कल्पना, अंतरात्म्याचा आवाज आणि ईश्वराचे स्वरूप यांनी डाव्यांच्या आणि निधर्मी कार्यकर्त्यांच्या मनात दीर्घकाळ अस्वस्थता निर्माण केली. म.गांधींचे ‘भगवतगीते’वरचे प्रेमही कित्येकांना अनाकलनीय वाटते. या गोष्टी भारतीयांपासून आणि त्यांच्या समजुतींपासून आपल्याला दूर ठेवणार नाहीत, अशा बेताने म.गांधी व्यक्त करत. मात्र परंपरा, कर्मकांडे, पठणपुरावे यांपासून गांधी कटाक्षाने दूर राहिले. मूर्तीपूजक तर ते नव्हतेच. सणांचा त्यांचा काही संबंध नव्हता. तरीही आज मोदी त्यांचे नाव सदासर्वदा घेतात, ते केवळ उपचार म्हणून. किंबहुना संघ जसा औरंगजेबाच्या कबरीबाबत दुटप्पी असतो, तसा तो राजघाटाबाबतही नक्कीच असणार. कुलकर्णी यांनी ‘गांधी यांचा धर्मविचार’ असेही एक प्रकरण लिहून थोडक्यात या विषयावर सुस्पष्ट लेखन केले आहे.
बाकी, गांधी हा ‘महात्मा’ जगाला कसा भावतो, याचीही नोंद कुलकर्णी यांनी पुतळे, टपालतिकिटे यांचा छायाचित्रे देऊन व्यवस्थित केली आहे. म.गांधींचे स्मरण लढाया, दंगली, वंशसंहार, हिंसाचार अशा मनुष्यहानीवेळी नेहमी केले जाते. भारतापेक्षा भयंकर रक्तपात आणि कत्तली अनेक देशांनी अनुभवल्यामुळे त्यांना अहिंसा व सहिष्णुता यांचे महत्त्व खूप असणार. २०१४पासूनचा भारत मात्र म.गांधींच्या पुतळ्याखाली बेलाशक हिंसाचार करण्याइतपत बेफाम व बेगुमान झाला आहे. त्यामागे अर्थातच हिंदुत्वाची बलोपासना आणि द्वेषाचे राजकारण आहे. नव्या भारतातल्या नव्या पिढीला म.गांधींचा खराखुरा अन् सर्वांगीण परिचय करवून देण्याचा प्रयत्न यासाठी फार आवश्यक होता. सुहास कुलकर्णी यांचे त्याबद्दल आभार.
‘असे होते गांधीजी’ – सुहास कुलकर्णी
समकालीन प्रकाशन, पुणे | पाने – १२२ (मोठा आकार) | मूल्य – २०० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment