यात्रा युरोपची : छ. राजाराम महाराज द्वितीय यांच्या जीवनावर व स्वभावावर प्रकाश टाकणारी रोजनिशी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
रणधीर शिंदे
  • ‘यात्रा युरोपची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 20 April 2025
  • ग्रंथनामा शिफारस यात्रा युरोपची yatra Yuropchi राजाराम महाराज Rajaram Maharaj

छत्रपती राजाराम महाराज द्वितीय (१८५०-१८७०) यांना कोल्हापूर संस्थानचे छत्रपती म्हणून केवळ चार वर्षाचा कालावधी लाभला. अशा या राजाराम महाराजांचे युरोप दौर्‍यात इटली येथील फ्लोरेन्स येथे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आजाराने दुःखद निधन झाले. छत्रपती राजाराम महाराज हे आधुनिक दृष्टीने राजे होते. संस्थानच्या प्रगतीविषयी त्यांना विलक्षण आस्था होती.

 

१८७०मध्ये तरुण वयातील छत्रपती राजाराम महाराजांनी युरोपचा दौरा केला. हिंदुस्थानातील संस्थानी राजवटीतील परदेशा दौरा करणारे ते पहिले राजे मानले जातात. राजाराम महाराजांनी या प्रवास दौर्‍याचा वृत्तांत रोजनिशीरूपाने लिहून ठेवला होता. तो ‘डायरी ऑफ द लेट राजा ऑफ कोल्हापूर ड्युरिंग हिज व्हिजिट टू युरोप इन १८७०’ या नावाने १८७२ साली प्रसिद्ध झाला. तब्बल १५३ वर्षांनी ही रोजनिशी शिवाजी विद्यापीठाकडून ‘यात्रा युरोपची यात्रा : छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांची रोजनिशी’ या नावाने प्रकाशित होत आहे.

राजाराम महाराजांच्या या रोजनिशीत जून १८७० ते नोव्हेंबर १८७० या काळातील प्रवासवृत्तांत आहे. राजाराम महाराजांनी इग्लंड, फान्स व इटली या युरोपियन देशात प्रवास केला. युरोपातील सामाजिक जीवन, भौतिक प्रगती व सांस्कृतिक जीवन पाहिले, अशी त्यांची या दौऱ्यामागे धारणा होती. युरोपातील समाज, प्रदेश, गावे, टेकड्या, पॅलेस, संग‘हालये, संस्था, प्रदर्शने, खेळमैदाने पाहिले ते कुतूहल दृष्टीने.

 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

 

या रोजनिशीतून राजाराम महाराजांच्या संपन्‍न अशा प्रागतिक दृष्टीच्या व्यक्‍तिमत्त्वाचा व त्यांच्या अंतरंगाचा, जीवनदृष्टीचा भरगच्च आविष्कार झाला आहे. राजाराम महाराजांच्या मनात युरोपीय राष्ट्रांविषयी कुतूहल व जिज्ञासा होती. नवे जग जाणून घेण्याची इच्छा होती. आधुनिक दृष्टीचे हे जग जाणून घ्यावे व ते समजून घ्यावे, अशी दृष्टी यामागे आहे. या दृष्टीने ते युरोपातील आधुनिक जग व त्याची प्रक्रिया ते जाणून घेत आहेत. त्यांनी तेथील विविध आधुनिक संस्थांना व प्रदर्शनांना भेटी दिल्या.

या प्रवासात त्यांनी कालव्याशी निगडित जादुई प्रकाशचित्रे पाहिली. वैज्ञानिक उपकरणे व विविध प्रदर्शने पाहिली. मेणबत्ती व साबण तयार करण्याची प्रक्रिया असो की, कापड गिरण्या, कारखाने पाहिले.  टॉकिंग मशीन (बोलण्याचे मशीन), अग्निशमन यंत्र, वुलनची वस्त्रनिर्मिती करणारी कारखाने पाहिले. त्याचबरोबर युरोपातील राज्यकारभार, प्रशासन व न्यायपद्धती त्यांनी जाणीवपूर्वक न्याहळली. युरोपातील नवे जग व तेथील बदलाची प्रक्रिया ते समजून घेत होते, हे या रोजनिशीवरून लक्षात येते. या आधुनिक प्रगतीचा आपणही अंगिकार करावा अशी त्यांची धारणा या जिज्ञासा सफरीमागे होती.

या जिज्ञासा आवडीपोटी त्यांनी ऑक्सफर्डमधील कुलगुरूंचे भाषण व प्राध्यापकांची व्याख्याने ऐकली. एके ठिकाणी त्यांनी कापसावर शोधनिबंध वाचल्याची नोंद केली आहे. अनेक विद्वानाची भाषणे ते समरसून ऐकत. या भाषणांवरील ठिकठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. राजाराम महाराजांच्या आधुनिक दृष्टीचे द्योतक म्हणजे त्यांनी तेथील महाविद्यालयाचे ग्रंथालयाचे त्यांनी घेतलेले दर्शन. तेथील महाविद्यालयांची शिक्षण स्थिती व विद्यार्थी जीवन त्यांनी जवळून पाहिले.

तसेच त्यांच्या या आधुनिक दृष्टीचे द्योतक म्हणजे विविध क्रीडा प्रकारांविषयी त्यांना असलेली आस्था. युरोपात अनेक आधुनिक वळणाचे खेळ ते पाहतात. आणि स्वतःही त्यात सहभागी झाले. परदेशातील समाज आणि परिसराची सुंदर वर्णने यात आहेत. अनेक झाडाफुलांची वर्णने, फुलांचे वाफे, सरोवरे, सरोवरातील बदके, पाम हाऊस, हरितगृहे, धबधबे व गुलाब प्रदर्शनांची वर्णने आहेत.

विविध लोकांच्या भेटी घेणे यात त्यांना आनंद वाटे हा त्यांच्या संपन्‍न व्यक्‍तिमत्त्वाचा भाग होता. युरोपातील सार्वजनिक जीवनातील सभ्यतेने ते भारावून गेले आहेत. माणसांमाणसांमधील अगत्यशीलता, शालीन स्नेहशीलता व प्रेममयतेचे त्यांना अप्रुप आहे. या रोजनिशीत राजाराम महाराजांच्या सुसंस्कृत, उमद्या, शालीन, सुजनशील व्यक्‍तिमत्त्वाच्या आविष्कार आहे.

या रोजनिशीत राजाराम महाराजांच्या भारतीयत्वाचा खास असा आविष्कार आहे. या परदेश प्रवासात ते भारतभूमीच्या खुणा शोधताना दिसतात. या भारतखुणांविषयी त्यांना अप्रुप आहे. या प्रवासात भारतीय माणसांना भेटतात. ‘इंडिया ऑफिस’ला वारंवार भेटी दिल्या आहेत. पोस्टात भारतीय पत्रांसाठी असलेला स्वतंत्र विभाग ते आवर्जून पाहतात. इंडिया ऑफिसमध्ये ठेवलेले भारतीय धान्य, भारतीय वस्त्रप्रकार, दागिने, खजिने, हत्ती दंतचित्रे तसेच रणजितसिंह यांचे सोन्याचे सिंहासन पाहून त्यांना आश्यर्च वाटते. प्रवासात त्यांची दादाभाई नौरोजींशी भेट झाली होती.

एके ठिकाणी त्यांनी पंजाबी व शीख शस्त्रे पाहिल्याची नोंद केली आहे. ‘भारतीय अर्थव्यवस्था’ व ‘भारतीय बंदरे आणि खाड्या’ या विषयावरील विद्वानांची भाषणे ते आवर्जून ऐकतात. यात राजाराम महाराजांचे ‘भारतप्रेम’ जसे लक्षात येते तसेच त्यांची आधुनिक दृष्टीही. या त्यांच्या भारतभूमी ओढीच्या खुणा या रोजनिशीत आहेत.

राजाराम महाराजांचे मन अतिशय हळुवार संवेदनशील व कलासंपन्‍न होते. त्यांच्या या कलासंपन्‍नतेच्या असंख्य खुणा या रोजनिशीत पसरलेल्या आहेत. किंबहुना युरोपातील कलाजीवनाचे विस्तृत वर्णने या रोजनिशीत आहेत. युरोपातील अनेक कलासंग्रहालये, नाट्यगृहे त्यांनी पाहिली. चित्र शिल्प दालने, संगीत नृत्य उत्सव, नाटके त्यांनी माहिती. या पाहणीच्या हर्षनोंदी रोजनिशीत आहेत. अनेक ऑपेरा, बॅले व कलावंताच्या नोंदी आहेत. एका नाटकाचा ‘शेवट पाहून आम्ही खूप भावविवश झाल्याची नोंद त्यांनी एके ठिकाणी केली आहे. एके ठिकाणी एका ऑपेरात एका अभिनेत्रीच्या सुंदर आवाजाची नोंद केली आहे.

एका उमद्या संवेदनशील कलाप्रेमी रसिक राजाच्या या कलासक्‍त नोंदी आहेत. राजाराम महाराजांच्या कलाप्रेमाची साक्ष देणार्‍या या आनंदनोंदी आहेत. राजाराम महाराजांच्या अंतरंगाचा व त्यांच्या जीवनदृष्टीचा खास असा आविष्कार या रोजनिशीत आहे. प्रदेश, स्थळे, माणसे, निसर्ग, खानपानाकडे पाहण्याची खास अशी दृष्टी आहे. मानवी संबंधांतील आनंदमयतेबरोबरच मनमोहक अशा निसर्गदृश्याच्या नोंदी या रोजनिशीत आहेत. सौहार्द,नम्रतेबरोबरच त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा आविष्कार या रोजनिशीत आहे. मँचेस्टर शहर सुंदर आहे, परंतु तेथील कारखान्यांमुळे या शहराच्या सुंदरपणात  बाधा आल्याचे त्यांना वाटते.

या रोजनिशीचा एक विशिष्ट रचनाबंध आहे. प्रत्येक नोंदीत पूर्वाधात युरोपातील समाज व प्रदेशाच्या नोंदी आहेत व उत्तरार्धात कलाजीवनाच्या. रोजनिशी आत्मपर वाङ्मयप्रकार असल्यामुळे या रोजनिशीत महाराजांच्या अंतरंगाचा व जीवनदृष्टीचा आविष्कार झाला आहे. ‘थकून गेलो’, ‘आनंद वाटला’, ‘फेरफटका मारला’, ‘आमच्याशी त्यांनी प्रेमाने संवाद साधला’ अशा शब्दप्रयोगांचा ठिकठिकाणी वापर आहे. राजाराम महाराजांच्या सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार या रोजनिशीत आहे.

या रोजनिशीला शोकांत अनुभवाची गडद अशी किनार आहे. या प्रवासात नोव्हेंबर १३ ते १६ या काळात महाराज आजारी पडले. अल्पशा आजाराने राजाराम महाराजांचे दुखद निधन झाले. १ डिसेंबर १८७० रोजी फ्लोरेन्स शहरातील अर्नो नदीकाठी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. या अंत्यसंस्काराचा विस्तृत वृत्तांत परिशिष्टात दिला आहे.

ही रोजनिशी इंग्रजीत प्रकाशित करण्याचे श्रेय राजाराम महाराजांचे गार्डियन (पालक-सहचर) कॅ. एडवर्ड वेस्ट यांचे. ते महाराजांच्या समवेत या प्रवासात सोबतीला होते. महाराजांवरील अकृत्रिम प्रेमापोटी त्यांनी ही रोजनिशी प्रकाशित केली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

कॅ. वेस्ट यांनी परिशिष्टात दिलेली त्या काळाविषयी माहिती उपयुक्‍त आहे. तसेच राजाराम महाराजांच्या निधनाचा व त्यांच्या पार्थिव अंत्यसंस्काराची दिलेला विस्तृत वृत्तांत अतिशय महत्त्वाचा आहे. या रोजनिशीचा अनुवाद इंग्रजी-मराठी साहित्याचे व्यासंगी प्राध्यापक आणि अभ्यासक  डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी केला आहे. तो मराठी वळणाचा आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या इंग्रजी भाषेतील रोजनिशीचे भाषांतराचे काम जिकिरीचे होते. डॉ. कडाकणे यांनी भाषांतररसाठी घेतलेले कष्ट रोजनिशीच्या पानोपानी दिसतात. इतक्या सुलभ आणि प्रगल्भ सहजभाषेत हा अनुवाद झाला आहे.

कडाकणे यांचा हा अनुवाद खास मराठी वळणाचा आहे. इंग्रजी शब्दांना खास असे मराठी शब्दांची निवड त्यांनी केली आहे. ‘सुखद आणि संस्मरणीय’, ‘आनंद वाटला’, ‘फेरफरका मारला’, ‘कमॅमोरेन्शन सेरेमनीसाठी’, ‘स्मरण सोहळा’, ‘समुद्र अगदी शांत होता’, ‘निसर्गरम्यता पाहून डोळे सुखावले असे मराठीकरण ठिकठिकाणी आहे.’ कॅ. एडवर्ड वेस्ट यांच्याविषयीचे माहितीपूर्ण टिपण प्रा. अवनीश पाटील यांनी लिहिले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या आजवरच्या प्रकाशन वाटचालीतील हा महत्त्वाचा दस्तऐवज या रोजनिशी रूपाने प्रकाशित होतो आहे. या रोजनिशीचे महत्त्व एका कारणासाठी आहे ते म्हणजे शाहूपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातील घडामोडींचे चित्र यामध्ये आहे. इतिहास तसेच सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांना नवी दृष्टी देणारी ही रोजनिशी आहे. शाहूपूर्व कालखंडाकडे पाहण्याची पुनर्दृष्टी यात आहे, तसेच ती राजाराम महाराजांच्या जीवनावर व स्वभावावर प्रकाश टाकते.

.................................................................................................................................................................

लेखक रणधीर शिंदे मराठी समीक्षक आहेत.

randhirshinde76@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......