‘वढू आरोग्य प्रकल्पा’नं मोठी भरारी घेतली. त्याला भरघोस आर्थिक मदत मिळत गेल्याने तिथं ग्रामीण रुग्णालय उभारलं गेलं….
ग्रंथनामा - झलक
अतुल देऊळगावकर
  • ‘शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 20 April 2025
  • ग्रंथनामा झलक शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची शशिकांत अहंकारीShashikant Ahankari हॅलो फाउंडेशन Hello Foundation

प्रसिद्ध लेखक अतुल देऊळगावकर यांनी ‘हॅलो फाउंडेशन’चे संस्थापक शशिकांत अहंकारी यांच्या कामाविषयी लिहिलेल्या ‘शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची’ या पुस्तकाचे प्रकाशन साधना प्रकाशनातर्फे आज संध्याकाळी पुण्यात झाले. या पुस्तकातला हा एक संपादित अंश...

.................................................................................................................................................................

वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर १९७८ साली शशिकांतचे वर्गमित्र त्यांना योग्य वाटणाऱ्या शहरात डॉक्टरकीचा व्यवसाय करण्यास निघाले. त्यापैकी काही पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रयत्न करू लागले. शशिकांत वढू बुद्रुक गावी पोचले.

गावच्या दवाखान्यात पंधरा-वीस किलोमीटर अंतरावरून बाया-बापडे यायचे. खरं तर हातावर पोट असलेल्या गरिबांना आजार आणि आराम परवडतच नाही. ते आजारपण मनावर न घेता ‘हुईल की बरं’ म्हणत आजार अंगावरच काढतात. औषध आणि उपचारासाठी पैशांची मारामार असते. पैसे कसेबसे गोळा केले, तर औषध मिळत नाही. दुसऱ्या गावाला जायचं, तर वाहन सापडणं मुश्कील, अशा असंख्य अडचणीतून मार्ग काढत सर्दी-खोकला, ताप, उलट्या आणि जुलाब अशा साध्या आणि नेहमीच्या आजारांसाठी लोकांना वढूला येणं भाग होतं.

‘जनस्वास्थ्यरक्षक पथदर्शक प्रकल्पा’नुसार बारीकसारीक आजारांवर गावातच उपचार करता यावेत, यासाठी गावातील एक पुरुष आणि एक स्त्री कार्यकर्ती यांना आरोग्यविषयक प्रशिक्षण दिले जात असे. त्यानंतर ते ‘जनस्वास्थ्यरक्षक’ होत असत. त्या तीन आठवड्यांच्या प्रशिक्षणात रोग कसे होतात, त्याबद्दल कोणता प्रतिबंध आणि उपचार करावेत अशी माहिती, तसंच, दवाखान्यात प्रात्यक्षिकं आणि अनुभव दिला जायचा. जनस्वास्थ्यरक्षकांची निवड करताना विधवा, परित्यक्ता वा एकल महिलांना प्राधान्य दिलं जायचं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

वढू येथील प्रकल्प १९७७मध्ये सुरू झाला होता, पण शहरी डॉक्टर्स खेडेगावात पाय ठेवायला तयार नव्हते. त्यातूनही कोणी आलं, तर त्यांचं गावकऱ्यांशी पटत नव्हतं. शशिकांत यांना गावात राहण्याचा अनुभव होता. आरोग्यसेवा गावागावांत पोचवण्याच्या विचारामुळे त्यांनी कार्यक्षेत्रासाठी शहर नाकारून स्वतःहून गावाची निवड केली होती. त्यांना गावातल्या समस्यांची आणि गावकऱ्यांच्या मानसिकतेची जाणीव होती. त्यांची राहणी साधी होती. भाषा अगदी खेड्यातली वाटावी अशी होती. त्यामुळे त्यांचं बोलणं गावकऱ्यांना ओळखीचं परिचयाचं वाटे. त्या बोलण्यात ओतप्रोत ओलावा आणि आपुलकी होती.

कोणतंही काम हलक्या दर्जाचं आहे, असं ते मानत नव्हते. ते कोणत्याही कामासाठी कष्ट करायला पुढे असत. त्यांचं ते वागणं आणि बोलचाल पाहून पांढरा डगला न वापरणारा तो डॉक्टर गावकऱ्यांना आपला वाटू लागला. सहसा बाहेरगावच्या आणि शिकल्या सवरलेल्या माणसांवर विश्वास न ठेवणाऱ्या गावकऱ्यांचा शिकल्यासवरलेल्या विश्वास शशिकांत यांनी सहज संपादन केला. 

शशिकांत जनस्वास्थ्यरक्षकांना सोबत घेऊन, वढू- बुद्रुकमधील घराघरात जाऊ लागले. त्यांना गावांची आणि कुटुंबांची खडानखडा माहिती मिळाली. त्यांनी जनस्वास्थ्यरक्षकांसाठी आठवडाभराचं प्रबोधन शिबिर घ्यायचं ठरवलं. शशिकांत यांनी 'बकोरी' गावाची निवड केली. डोंगरात वसलेलं चकोरी गाव पुण्यापासून केवळ वीस किलोमीटर अंतरावर. तरीही तिथंपर्यंत जायला रस्ताच नव्हता. गावात कोणत्याही सोयी नव्हत्या.

शिबिरासाठी के.ई.एम. हॉस्पिटलचे अनेक नामवंत डॉक्टर, शासकीय अधिकारी आणि अनेक पुढारी बकोरीला आले. कधीही आणि कोणीही न फिरकणाऱ्या त्या गावात आलेला गाड्यांचा ताफा पाहून गावकरी आनंदून गेले. गावासाठी तो उत्सवच होता. आठवडाभर समस्त गावकरी शिबिरात पूर्ण वेळ उपस्थित होते. प्रत्यक्ष शासकीय अधिकारीच गावात आल्यामुळे गावासाठी सहा किलोमीटर लांबीचा रस्ता, पाण्यासाठी सार्वजनिक विहीर, वीज आणि रोजगार हमीची कामं जागेवरच मंजूर झाली आणि सुरूही झाली. शशिकांत यांनी केवळ एका शिबिरातून अनेक गोष्टी साध्य केल्या.

वढू प्रकल्पाच्या बातम्या हळूहळू पुण्यातील वर्तमानपत्रांत येऊ लागल्या. अनवाणी डॉक्टरांची कार्यपद्धती पाहायला शासकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी गावात येऊ लागले. काही काळानंतर इतर राज्यांतील आणि परदेशांतील पाहुणे वढूला येऊ लागले. जनस्वास्थ्यरक्षकही त्यांच्या प्रश्नांना सराईतपणे उत्तरे देऊन त्यांना चकित करू लागले, मग हे जनस्वास्थ्यरक्षक पाहुण्यांना आरोग्याचे प्रश्न विचारू लागले, “साहेब, तुमचं गावं कोणतं? तुमच्या गावात दवाखाना आहे का? तिथं मुलांना सर्व लशी दिल्या जातात का? गरोदर बायका घरी बाळंत होतात की दवाखान्यात? गावात पिण्याचं शुद्ध पाणी मिळतं का? गावात शौचालयं आहेत का? गावात शोषखड्डे आहेत का?”

प्रशिक्षण आणि अनुभव मिळाल्यामुळे वढू गावातील अशिक्षित लोक जनतेच्या स्वास्थ्याच्या रक्षणाचा विचार करू लागले होते. ते पाहून तिथं येणारे वैद्यकीय विद्यार्थी आणि प्राध्यापकसुद्धा अंतर्मुख होऊ लागले. 

एकदा, केंद्रीय सरकारचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीहून त्यांच्या मोठ्या ताफ्यासह प्रकल्पाची पाहणी करायला वढू गावात आले. तीस-चाळीस गाड्यांचा मोठा ताफा गावात दाखल झाला. प्रकल्पातील जनस्वास्थ्यरक्षकांपासून ते गावकऱ्यांपर्यंत सात्यांचं भरभरून कौतुक झालं. मग सुपर क्लासवन अधिकारी गावकऱ्यांशी थेट संवाद साधू लागले. गांधी टोपी, पांढरा शर्ट आणि साधा पायजमा घातलेल्या एका जनस्वास्थरक्षकाने प्रमुख पाहुण्यांना विचारलं, “साहेब, तुम्ही दिल्लीहून हे सारं बघायला विमानानं खास इथं आलात. तासाभरात विमानानं परत दिल्लीला जाणार. या एक दिवसाचा तुम्हाला सरकारी भत्ता किती मिळतो?”

शशिकांत यांनी तो प्रश्न इंग्रजीतून त्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोचवला आणि साऱ्या मेळाव्याचं रूपच बदललं. तो प्रश्न त्या अधिकाऱ्याला जिव्हारी लागला. ते संतापून उत्तर सोडून काहीबाही बोलायला लागले. शशिकांत यांनी संयम कायम ठेवत पुन्हा त्या साहेबास म्हटलं, “साहेब, तुमचा भत्ता हजार रुपये वा दहा हजार असेल, पण तो सांगायला काय हरकत आहे?” पण साहेब काहीही उत्तर न देता तिरीमिरीत निघून गेले. शशिकांतनं उत्सुकतेपोटी त्या जनस्वास्थ्यरक्षकाला विचारलं, “तुम्हाला हा प्रश्न का विचारावसा वाटला?’’

 तो माणूस म्हणाला, “आम्हाला महिन्याला पन्नास रुपये मिळतात. रोजगार हमीवाल्यांना मोठ्या लोकांच्या हातापाया पडून आणि कोणाच्या तरी घशात कमिशन घातल्यावर अशीच काही फुटकळ रक्कम मिळते. तर मला वाटलं, एवढ्या गाड्या मागेपुढे घेऊन विमानानं काही तासांकरता आलेल्याला भत्ता तर किती मिळत असेल!”

एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला आपल्या मनात आलेला प्रश्न विचारण्याचं धैर्य, खेड्यात राहणाऱ्या, साध्या गरीब वढूवासियांकडे आलं होतं. कोणालाही कोणताही प्रश्न विचारण्यात कचरायचं नाही, हे ‘निर्भय बनो’चं सूत्र वढूत रुळू लागलं होतं. असे रोकडे आणि थेट प्रश्न अंगावर घेण्याची सवय नसणारे उच्चपदस्थ अधिकारी त्या टोकदार प्रश्नाने अस्वस्थ झाले होते. ती ग्रामीण ताकद पाहून शशिकांत बेहद्द खुश झाले.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

शशिकांत यांच्या चौफेर कामाचा धडाका सुरूच राहिला. त्यांनी गावातील तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला. काही जनस्वास्थ्यरक्षकांना बारामतीला दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालनाच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं. अनेकांना व्यवसायासाठी बँकेचं कर्ज मिळवून दिलं.

गावकऱ्यांना सतत नवीन ऐकायला मिळावं, यासाठी शशिकांत प्रयत्नशील होते. ते राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील अनेक मोठमोठ्या व्यक्तींना वढूला घेऊन येत. तिथे त्यांची भाषणं, चर्चा होत. त्यातून गावकऱ्यांना योग्य परंपरा आणि आधुनिक विचारांची मूल्ये समजत जायची. यातूनच लोकांमध्ये मिसळून ग्रामीण आरोग्य भक्कम करणारे जनस्वास्थ्यरक्षक घडत गेले. वढू परिसरामध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये आरोग्य जाणिवा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या.

वढूच्या बायडाबाई आणि नारायण खुळे या जनस्वास्थ्यरक्षकांवर वर्तमानपत्रांतून अनेक लेख लिहिले गेले. प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागाचे प्राध्यापक आणि डॉक्टर, बायडाबाई आणि नारायण खुळे यांचा उल्लेख करू लागले. पुढच्या वर्षी नारायण खुळे सरपंच पदी बिनविरोध निवडून आले. अनेक ग्रामपंचायतीमध्ये जनस्वास्थ्यरक्षकांची पंच म्हणून निवड झाली. खुळे दांपत्य आणि इतर जनस्वास्थ्यरक्षक याचं श्रेय देताना म्हणत, “शशिकांत यांच्या बहुविध कार्यक्रमांतून आम्हाला समाजदर्शन (एक्स्पोजर) झालं. त्यामुळेच आम्हाला जग समजत गेलं.”

तर, शशिकांत यांना त्या जनस्वास्थ्यरक्षकांच्या साथीमुळे अनेक उपक्रम राबवता आले, असं वाटत होतं.

‘वढू आरोग्य प्रकल्पा’नं मोठी भरारी घेतली. देशामध्ये वढू गाव नावाजलं गेलं. त्या प्रकल्पाला भरघोस आर्थिक मदत मिळत गेल्याने वढू येथे ग्रामीण रुग्णालय उभारलं गेलं. 

 ‘शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची’ - अतुल देऊळगावकर 

साधना प्रकाशन, पुणे | मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......