लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध)
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सायली दशरथ थारळी
  • ‘स्टुडिओ जिब्ली’च्या दहा सर्वोत्तम चलाभासांची पोस्टर्स
  • Sun , 13 April 2025
  • कला-संस्कृती चलत्-चित्र स्टुडिओ जिब्ली Studio Ghibli

स्टुडिओ जिब्लीची धोरणं :

१) जिब्लीचं ‘नो एडिट’ धोरण - ‘नाअसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड’ हा चलाभासपट अमेरिकेत प्रदर्शित होण्यापूर्वी त्यात मोठ्या प्रमाणावर बदल केले होते. त्याचं नावदेखील बदलून ‘वॉरियर्स ऑफ द विंड’ ठेवण्यात आलं होतं. याला प्रतिसाद म्हणून जिब्लीने ‘नो एडिट’ धोरणाचा अवलंब केला. विशेषतः ‘प्रिन्सेस मोनोनोके’पासून या धोरणाची अंमलबजावणी करायला जिब्लीने प्रारंभ केला. कारण मिरामॅक्स कंपनीचे उपाध्यक्ष हार्वे वेईनस्टाईन यांनी या पटात अधिक बाजारमूल्य आणण्यासाठी सुधारणा सुचवल्या होत्या. त्याला विरोध म्हणून जिब्लीने आपल्या धोरणाचा पाठपुरावा केला. (याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते, ती अशी — वेईनस्टाईनच्या या मागणीला विरोध म्हणून कटाना म्हणजेच जपानी तलवार ‘no cuts’ हा संदेश लिहून पाठवली होती!)

२) स्वामित्वहक्काबाबत जिब्लीचं धोरण - जिब्लीचे चलाभासपट आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाले आहेत, मात्र हक्कांच्या बाबतीतील नियमांविषयी ते फार आग्रही आहेत. त्यांच्या चलाभासपटांचा प्रसार मर्यादित आहे यालाही हेच कारण असावं. चित्रपटगृहांतील प्रदर्शनांच्या काही काळानंतर सहसा चित्रपटांचा प्रसार वाहिन्यांवरून होत असतो. स्टुडिओ जिब्लीच्या बाबतीत असं आढळत नाही. इतकंच नव्हे, तर युट्यूब वा तत्सम समाजमाध्यमांवरूनही त्यांच्या चलाभासपटांविषयीच्या चित्रफितींच्या प्रदर्शनावर व छायाचित्रांच्या वापरांवरही बंधनं आहेत.) या लेखातही छायाचित्रांचा थेट अंतर्भाव न करण्यामागे हेच कारण आहे. स्वामित्वहक्काच्या अडचणीमुळे छायाचित्रं देता येत नाहीत. त्यासाठी जिब्लीचं अधिकृत संकेतस्थळ पाहावं.) दृश्यांचा आधार न घेता केवळ माहितीच सांगणं इथं शक्य आहे. मात्र काही ठिकाणी या चलाभासपटांविषयी चांगली माहिती दृश्यरूपाच्या स्वरूपातही उपलब्ध आहे. त्याचेही संदर्भ पाहता येतील. काही युट्यूब वाहिन्यांवर जिब्लीच्या चलाभासपटांविषयी माहिती दिली आहे. त्यांत त्या पटांतील काही प्रसंगही दिले आहेत.

हे चलाभासपट केवळ डीव्हीडी वा ब्ल्यू-रे डिस्क माध्यमात किंवा चित्रपटगृहांतच उपलब्ध असतात. पॉलिगॉन या कार्टूनविषयक संकेतस्थळासाठी जी-किड्सने दिलेल्या एका माहितीनुसार, “स्टुडिओ जिब्ली आपली उत्पादनं जगभरात कुठेही संगणकीय-प्रतींत उपलब्ध करू देत नाहीत. प्रेक्षकांनी त्यांच्या चलाभासपटांचा अनुभव केवळ चित्रपटगृहांतच एकत्रितपणे घ्यावा असं त्यांचं मत आहे.”  त्यांची ही कल्पना चांगली असली आणि ते चलाभासपटही त्याच वातावरणात पाहण्यासारखे असले, तरी त्यांच्या या धोरणामुळे त्यांचे चलाभासपट लोकांपर्यंत पोहचत नाहीत, अशीच काहीशी परिस्थिती आतापर्यंत होती. पण अलीकडेच स्टुडिओ जिब्लीने ‘नेटफ्लिक्स’ व ‘एचबीओ मॅक्स’सारख्या ऑनलाईन माध्यमांतून आपल्या चलाभासपटांच प्रदर्शन करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमांच्या मार्फत हे चलाभासपट आतापर्यंत अनभिज्ञ असलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचतील आणि अधिकाधिक लोकप्रिय होतील, अशी आशा आहे.           

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जिब्लीपटांचे विशेष :

१) कथा : विषय / आशय - प्रत्येक चित्रपटाच्या केंद्रस्थानी एक कथा असते. चलाभासपट म्हटला की, तो सहसा पाश्चात्त्य प्रभावातून आलेल्या चलाभासपटांमुळे ते कोणत्यातरी परीकथा, गूढकथा वा तत्सम अद्भुतरम्य आशयाच्या असणार, हे आपल्याला नक्की माहीत असतं. क्वचित काही कादंबऱ्यांच्या प्रभावातून आलेल्या असतात. जिब्लीच्या पटकथांमध्येही अद्भुत प्रसंग असतात. पण या चलाभासपटात विशेषतः जपानी मिथकं, लोककथा आणि जपानचा इतिहास यांचा समावेश असतो.

असं असलं तरी जिब्लीपट त्या कथांवर जसेच्या तसे बेतलेले आहेत, असं कुठे अधोरेखित करता येत नाही. या कथारूपांची सरमिसळ दैनंदिन जीवनाशी फार सहजतेने केलेली असते. त्यांची रूपकं असतात, क्वचित प्रसंगी त्या कथांमधील पात्रंदेखील अवतरतं, पण तेदेखील नव्यानं उभ्या केलेल्या कथेला अनुसरून. पाश्चात्त्य चलाभासपटांचं उदाहरण घेऊन हे अधिक स्पष्टपणे सांगता येईल. सिंड्रेला, स्लिपिंग ब्युटी अशासारखे जादू, अद्भुत घटना, राजा-राणी यांची प्रेमकथा अशा आशयावर, म्हणजे परीकथेवर अगदी जसेच्या तसे आधारलेले चलाभासपट आपण पाहतो.

जिब्लीचा आशय यांहून थोडा वेगळा आहे; कारण उदाहरणादाखल, ‘माय नेबर टोटोरो’ या चलाभासपटातील टोटोरो पहा. हा टोटोरो जपानी लोककलांमध्ये आढळणाऱ्या फॉरेस्ट स्पिरीट्स  पैकी एक आहे. पण इथं तो पटकथेच्या केंद्रस्थानी नाही. तो जसाच्या तसा सोबत गूढ वलय घेऊन अवतरला असला, तरी इथं तो कथेचा एक भाग आहे, नायक म्हणून नाही. या कथेचा काळही जुना नाही. अगदी विसाव्या शतकातला जपान आहे, दोन लहान मुली आणि त्यांचं भावविश्व या कथेच्या केंद्रस्थानी आहे.

जिब्लीच्या कथा या विविध आशयांच्या असतात‌. जपानी समाज हा मुख्य आधार आहे. वर सांगितल्याप्रमाणे दोन भिन्न प्रकारचे आशय असतात, पण ते खूपच सहजतेनं एकमेकांत गुंफलेले असतात. त्यामुळेच त्या इतरांपेक्षा वेगळ्या वाटतात. त्यांत आधुनिकता असली तरी तितकीच पारंपरिकताही आहे. तंत्रज्ञान आहे, तितकाच निसर्ग आहे. लोककथा, मिथकांचे संदर्भ असले, तरी सामान्य माणसाची कथाही आहे. भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, पण त्याहून महत्त्व जास्त वर्तमानाला आहे. वास्तवाचं चित्रण असलं तरी स्वप्नमय जगही आहे.

२) जिब्लीची सृष्टी - परिणामकारक कथा सांगण्यासाठी तिला अनुरूप कथाविश्व उभारणं महत्त्वाचं असतं. यातून एक वेगळं जग निर्माण होत असतं. चलाभासपटात विशेषतेनं असं वेगळं जग निर्माण करणं शक्य असतं. जे चलाभासकाराच्या कल्पनेत आलं आहे, त्याचा तो आविष्कार चलाभासपटात करत असतो. हे जग, ही सृष्टी नव्यानं निर्माण केलेली असली, काल्पनिक असली, तरी त्याची अनुभूती घेता येणंदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. जिब्लीपटांतील सृष्टी ही अनुभूती घेता येईल, इतकी वास्तव असते. वर सांगितल्याप्रमाणेच काल्पनिक गोष्टींची सांगड दैनंदिन जीवनाशी घातल्यामुळे ते आपल्याला वेगळं भासत नाही.

स्वतः मियाझाकी आपल्या ‘स्टार्टिंग पॉईंट’ या पुस्तकात म्हणतात, “ॲनिमेतून काल्पनिक विश्व दाखवलं जातं, पण त्याच्या केंद्रस्थानी नक्कीच विशिष्ट वास्तवता असते असं मला वाटतं. दाखवण्यात आलेलं विश्व हे आभासी असलं, तरी ते शक्य तितकं वास्तव बनवायचं असतं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास चलाभासकाराने आभासी विश्वाची अशी रचना केली पाहिजे की, ती पाहताना प्रेक्षकालाही वाटावं की, असं जग खरोखरीच कुठे तरी अस्तित्वात असेल.”

जिब्लीपटांत सर्वत्र ही भूमिका सांभाळलेली दिसते. इथं काही नियमबद्धता आढळत नाही. वैचित्र्य राखलं आहे, पण ते केवळ तेवढ्यापुरतं येत नाही. त्यालाही काही ना काही संदर्भ असतात. त्या वैचित्र्यात बारकावेही जपलेले असतात. मग तो ‘हावल्स मुव्हिंग कॅसल’ (Howl’s Moving Castle)मधील चालता महाल असो वा ‘स्पिरिटेड अवे’ (Spirited Away)मधील पाण्यातून चालणारी ट्रेन. हे वैचित्र्य नक्कीच आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. आधी टोटोरोच्या प्रसंगात सांगितली तशा जिवंत मांजर-बसची कल्पनाही अपूर्व वाटते.

जिब्लीपटांतील देखाव्यांमध्येही अद्भुतता जपलेली दिसते. पार्श्वभूमीत येणारा परिसर यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. कोणताही परिसर असो, आकाश असो वा उघडं माळरान, किंवा समुद्राखालचं जग. प्रत्येक गोष्टींतले बारकावे टिपलेले आहेत. हा परिसर कधी ओळखीचा असतो किंवा पूर्णपणे चलाभासकाराच्या कल्पनेतून अवतरलेला. या परिसरातही बरंच वैचित्र्य आपल्याला जिब्लीपटांतून पाहायला मिळतं. रंग, आकार आणि वस्तू यांच्या वैचित्र्याचा इतका सुंदर मिलाफ केलेला असतो की, थक्क होऊन पाहत राहणं इतकंच आपल्या हातात असतं. उदाहरणादाखल जिब्लीच्या ‘व्हिस्पर ऑफ द हार्ट’ या चलाभासपटातला हा प्रसंग -

“चित्रपटाची नायिका शिझुकु एका जमिनीच्या तुकड्यावर उभी आहे आणि तो तुकडा आकाशात अधांतरी तरंगत आहे. ती एकटी नाही. तिच्याबरोबर सूट-बूट आणि हॅट घातलेला एक बोकाही आहे; बॅरन त्याचं नाव. खाली शहर पसरलं आहे. या उंचीवरून ते फारच लहान दिसतं आहे. वर आणखीही काही असेच जमिनीचे तुकडे उडत आहेत. काहींवर घरं आहेत. आजूबाजूने गच्च भरलेले ढग वाहताहेत. वरून-खालूनसुद्धा. उंचीचा काही पत्ताच लागत नाही. वारा सोसाट्याचा वाहतो आहे. जमिनीवरचं गवत वाऱ्यावर डोलतं आहे. समोर काही विचित्र इमारतींसारख्या आकृत्या दिसत आहेत. अगदी निरखून पाहिलं तर त्यांवर कोंब फुटावे अशी वेडीवाकडी घरं फुटली आहेत. कशीही. लांबच्या इमारती मोठ्या दिसतात, आणि जवळच्या लहानशा! आजूबाजूला ओबडधोबड उल्कांसारखे रंगीबेरंगी खडक उडत आहेत. त्यांवरही तसेच. मिळेल त्या दिशेनं घरं उगवली आहेत. इतक्यात शिझुकु उभी असलेल्या त्या जमिनीच्या तुकड्यापाशी एक उल्का येते आणि त्या टकरीतून वाचण्यासाठी बॅरन शिझुकुचा हात धरून खालच्या दिशेला झेप घेतो…”

हा प्रसंग शब्दांत पकडणंही मला जमलं नाही. केवळ शब्दांच्या वर्णनानं जितकी त्याची कल्पना करणं अशक्य आहे, तितकीच, कदाचित तिच्याहून अधिक पाहिलेला प्रसंग शब्दांत मांडणं अशक्य आहे. खरं पाहता या जिब्लीपटांतील कल्पना आपल्याला इतक्या भिन्न वाटत असतात, कारण संदर्भच इतके निराळे असतात की, आपल्या बुद्धीला त्यांची जोडणी करणंही कधीकधी अशक्यप्राय वाटतं. पण जेव्हा त्यातील संदर्भांची उकल होते आणि आपल्याला त्या त्या गोष्टी तिथं असण्याचं प्रयोजन कळतं तेव्हा आपल्यालाही त्या कल्पनेशी तादात्म्य पावल्याचा आनंद होतो. 

३) परिसर-चित्रण - जिब्लीपटांत आधुनिक शहरं असतात किंवा ॲनिमेच्या प्रभावातून आलेली भविष्यकालीन शहरंही असतात. त्यांची पात्रं ही टेकाडांवरील गावात, जुन्या पद्धतींच्या शहरात किंवा लाकडी, कौलारू घरात राहताना आढळतात. तिथल्या पायवाटांच्या दुतर्फा झाडंझुडुपं असतात. निसर्गाचं सान्निध्य असतं. मियाझाकींच्या चित्रपटांत मध्ययुगीन जपान, एकोणिसाव्या शतकातील युरोप आणि ज्यूल वर्न आणि एच. जी. वेल्स यांच्या कादंबरीतील काळ आढळला, तरी मियाझाकींनी आपल्या काही चित्रपटांतून वर्तमानाकडेही लक्ष वेधलं आहे. वर्तमानाकालीन समस्याही मांडल्या आहेत.

पर्यावरण हाही जिब्लीच्या चलाभासपटातील मुख्य आशय आहे. त्यांच्या बऱ्याच चलाभासपटांत निसर्ग आणि मानव शांततामय जगत असताना दिसतात. गाव असो वा शहर. ‘माय नेबर टोटोरो’मध्ये तर स्वतः निसर्ग त्या लहान मुलींची काळजी घेत असताना दिसतो. जसं त्यांनी निसर्गाचं प्रेम वा निसर्गाच्या विविध रूपांचं दर्शन घडवलं, तसंच निसर्गाच्या रौद्राबाबतचं दर्शनही घडवलं आहे. उदा. ‘हावल्स मुव्हिंग कॅसल’, ‘प्रिन्सेस मोनोनोके’ आणि ‘द विंड्स राईजेस्’.

४) पात्रं - मियाझाकींनी उभं केलेलं हे विश्व अद्भुत जीवांनी बनलेलं आहे. हे जीव अक्राळविक्राळ असलं, ओबडधोबड असलं, तरी त्यांच्यात भावना आहेत आणि ते सर्वच ‘सदाचारी’ आहेत. त्यातले काही फॉरेस्ट स्पिरीट्स (माय नेबर टोटोरो, स्पिरिटेड अवे) आहेत, तर काही बोलक्या मांजरी आहेत (व्हिस्पर ऑफ द हार्ट, द कॅट रिटर्न्स), काही डुक्कर (स्पिरिटेड अवे, पोर्को रोसो) आहेत. काहीच भाव न दाखवणारी बिनचेहऱ्याची काही पात्रंही आहेत, उदा. बुजगावणं (हावल्स मुव्हिंग कॅसल) आणि नो-फेस (स्पिरिटेड अवे). ‘स्पिरिटेड अवे’मध्ये तर अनेक चित्रविचित्र प्राणी आणि आत्म्यांचा संचार आहे.

मियाझाकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेली काही पात्रं ही लोककथा, अद्भुतकथा किंवा इतर कार्टून्स यांच्या प्रभावातून आलेली आहेत. पण बरीच पात्रं ही मियाझाकींच्या कल्पनाशक्तीतून अवतरलेली आहेत.

५) स्त्री-पात्रं - जिब्लीच्या बहुतांशी सर्वच चलाभासपटांच्या केंद्रस्थानी स्त्री-पात्रं आहेत. त्यांच्या चित्रपटांतील स्त्रिया या हिमगौरीसारख्या राजकन्या वा राण्या नाहीत. त्या सामान्य कुटुंबात वाढलेल्या मुली आहेत. निश्चयी, खंबीर मनोवृत्तीच्या आणि धैर्यशील आहेत. विचारी, कष्टाळू, धीराने वागणाऱ्या आहेत. त्या सर्व अडचणींवर मात करत स्वतःचं अस्तित्व पटवून देणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, ‘व्हिस्पर ऑफ द हार्ट’ चित्रपटातील नायिका शिझुकुची स्वतःला सिद्ध करण्यासाठी चाललेली धडपड असो वा ‘स्पिरिटेड अवे’मध्ये चिहिरोचे तिच्या आईवडिलांना त्यांच्या पूर्वरूपात आणण्यासाठी चाललेले प्रयत्न असोत.

चलाभासपटांचं मुख्य पात्र स्त्री-व्यक्तिरेखाच दाखवण्याचं कारण म्हणजे मियाझाकींचा स्त्रीवादी दृष्टीकोन आहे. एका मुलाखतीत आपला हा दृष्टीकोन स्पष्ट करताना ते म्हणतात, “They will need a friend or a supporter, but never a saviour.” म्हणूनच चिहिरोला तिच्या प्रयत्नांवर ठाम राहायला हाकू प्रोत्साहन देतो (स्पिरिटेड अवे), तर हारूला मांजरींच्या तावडीतून सोडवायला बॅरन मदत करतो (कॅट रिटर्न्स). अगदी त्याप्रमाणेच मेईला शोधताना सात्सुकीला टोटोरो आणि मांजर-बसने मदत केली होती (माय नेबर टोटोरो), शिझुकुचा आत्मविश्वास सेजीने वाढवला (व्हिस्पर ऑफ द हार्ट) अशीच बरीच उदाहरणं आपल्याला जवळपास सर्वच जिब्लीपटांतून सापडतात.

६) आकाश-दृश्यं - मियाझाकींच्या विमानांविषयीच्या प्रेमाचं दर्शन जवळपास सर्व चित्रपटांतून आपल्याला दिसतं. काही ना काही प्रसंग हे उड्डाणांचे असतातच. कारण आकाश आणि अद्भुतता यांचा संबंध त्यांना दर्शवायचा असतो. शिवाय चित्रपटातून घडणारं ‘विहंगावलोकन’ हे डोळे दिपवणारंच असतं. विमानांचे किंवा विमान-निर्मितींचे प्रसंग आपल्याला विशेषतेनं ‘हावल्स मुव्हिंग कॅसल’, ‘पोर्को रोसो’ आणि विशेषत्वानं ‘द विंड राईजेस्’ यांसारख्या चित्रपटातून घडतं. यातून त्यांनी विमानांचं सौंदर्य तर अधोरेखित केलंच आहे, पण त्यांची भीषणताही अधोरेखित केली आहे. ती युद्धकाळात मानवजातीचा संहार कसा करतात, याचं चित्रण आलं आहे.

दुसरीकडे अगदी पात्रांच्या ‘गगनभरारी’चं दर्शन ‘किकीज् डिलीव्हरी सर्व्हिस’मध्येही दिसतं, जिथे किकी आपल्या उडत्या झाडूवर फिरत असते आणि ‘माय नेबर टोटोरो’मध्ये टोटोरो सात्सुकी आणि मेईला घेऊन उडतो, तेव्हाही घडतं. ‘स्पिरिटेड अवे’मध्ये हाकू नावाचा मुलगा उडणाऱ्या ड्रॅगनमध्ये रूपांतरित होतो आणि चिहिरोला सोबत घेऊन उडतो.

त्याचबरोबर आकाशातून दिसणाऱ्या शहराचं चित्रणही फार सुंदररीत्या केलेलं आहे. उंचीवरून खालची सृष्टी कशी दिसते, याचं कुतूहल सर्वांनाच असतं. त्या विशिष्ट उंचीवरून आपल्याला आपलं जग एका वेगळ्या दृष्टीकोनातून दिसतं. हा काहीसा साहसी अशा पद्धतीचा अनुभव असतो!

७) चलाभासातले तपशील - ‘ॲनिमेशन’ या इंग्रजी शब्दात ‘ॲनिमेट’ हे क्रियापद आहे. त्याचा अर्थ ‘चैतन्य आणणं’ असा होतो. चलाभासाच्या तंत्रामध्ये मुख्यत्वे हालचालींवर जास्त भर दिला असतो, तशी आभासाची निर्मिती केली जाते. स्थिर वस्तूंना हालचालींतून जिवंत केल्याचा आभास निर्माण केला जातो वा मानवादी सजीवांना म्हणजेच पशू-पक्षी-वनस्पती यांना मानवासारखी हालचाल दिली जाते. त्यासाठी सर्व प्रकारच्या तपशिलांकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं.

मियाझाकींच्या मते चलाभासकाराने आपण रेखत असलेल्या पात्राच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत असं समजून ॲनिमेशन करायला हवं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास, “Their emotions will become yours. And, as is often said, you will become both an animator and an actor.” (त्यांच्या भावना आता तुमच्या जागी आहेत, आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे, तुम्ही अभिनय करणारे आणि चलाभासकार असे दोन्हीही असता.)

चित्रांच्या माध्यमातून पात्रांना बोलकं करणं हे खूप जिकिरीचं काम असतं. त्यांच्या सर्व हालचाली बारकाईनं लक्ष देऊन कराव्या लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव यथायोग्य दाखवणंही महत्त्वाचं असतं. चौकटीबाहेरचं जग दाखवायचं असतं, पण तेही एक जग आहे याचं भान सोडायचं नसतं. वैचित्र्यातही बारकावे सांभाळणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते वैचित्र्य असूनही लक्षात राहतं.

प्रत्येक चलाभास-निर्मितिसंस्थेची आपली अशी एक पद्धती असते. ती शैली वा पद्धती यांवरून त्या निर्मितिसंस्थेची ओळख निर्माण होते. उदा. डिज्नीच्या शैलीत पशू-पक्ष्यांचं मानवीकरण ही मुख्य शैली मानली जाते. असंच काहीसं मानवीकरण जिब्लीपटांमध्येही दिसतं, पण त्यातल्या वैचित्र्याचा विस्तार हा केवळ पशूपक्ष्यांपुरता मर्यादित राहत नाही. परिसर चित्रणात आणि एकंदर जगच वैचित्र्यानं व्यापलेलं असतं. ते कसं हे आपण वरच्या मुद्द्यांमध्येच पाहिलं आहे. आता या वैचित्र्यात राखलेले बारकावे कसे सापडतात ते पाहू.

परिसराचं चित्रण करतानाही बारकावे जपले आहेत. ‘स्पिरिटेड अवे’मध्ये चिहिरो तिच्या पालकांसोबत जेव्हा त्या जुन्या मनोरंजन-उद्यानात येते, तेव्हा त्याचा जुनाटपणाही आपल्याला जाणवतो. किंवा मेई आणि सात्सुकी जेव्हा गावातल्या त्या घरात येतात, तेव्हा तिथला मोडकळीला आलेला खांब, स्वयंपाकघरात किंवा माळ्यावर साचून राहिलेले धूळकिडे या सगळ्यातले अगदी सूक्ष्म सूक्ष्म बारकावे दाखवल्यामुळे आपण नकळत पडद्यावरील एका एका कोपऱ्याकडे लक्ष ठेवून राहतो.

इतकंच नाही तर ‘एरियाटी’मध्ये (The Secret World of Arrietty) पिटुकल्या एरियाटीच्या छोट्याशा जगातील बारीक सारीक गोष्टींनाही महत्त्व दिलं आहे. तिची पानाफुलांनी भरलेली खोली असो वा शॉनने तिच्या कुटुंबासाठी दिलेलं बाहुलीघर. वेड्यावाकड्या लाटांवरून धावत जाणारी पोन्यो (Ponyo) असो किंवा ‘व्हिस्पर ऑफ द हार्ट’मधल्या बॅरनचे लकाकणारे डोळे असोत, यापेक्षाही एकाहून एक सुंदर गोष्टी प्रत्येक जिब्लीपटात सापडतात.  

८) मूल्यांचं दर्शन - जिब्लीपटांमध्ये नेहमी सकारात्मक पद्धतीच्या माणुसकीचं दर्शन घडतं. त्यांतील पात्रं ही विशेषतः तरुण वयाची आहेत. यात कोणी अतिमानवी शक्ती असलेले नाहीत. मुख्य पात्रांचे काही आदर्श आहेत. ते त्या आदर्शांनुसार आपलं काम करत असतात. सुरुवातीला जरी ही पात्रं अननुभवी असली तरी येणाऱ्या प्रसंगांना ती सामोरी जातात, त्या अडचणींवर मात करत करत शिकतात. आपलं कर्तव्य पार पाडतात, जबाबदारी सांभाळतात. अशा प्रकारे केवळ पौगंडावस्थेतील प्रेक्षकांचं केवळ मनोरंजनच करण्याचा नाही, तर त्यांना तत्त्वांचीही ओळख करून देण्याचा जिब्लीपटांचा प्रयत्न असतो.   

जिब्लीचे चित्रपट हे आशावादी आहेत. अद्भुतकथा असल्यामुळे त्यांचा शेवट सुखदच होतो असं नाही. जवळपास इतर सर्व चित्रपटांत असतो त्याप्रमाणे सुष्ट-दुष्ट असा भेद त्यांच्यात आढळत नाही. ही वृत्ती त्यांच्या चित्रपटांत वर्ज्यच मानली आहे. मियाझाकी म्हणतात, “राक्षसी वृत्ती दाखवणं व नंतर ती नष्ट करणं हे कितीही मुख्य प्रवाहातलं असलं तरी माझ्या मते ती एक नासकी संकल्पना आहे.” 

त्यांच्या मते मानवी स्वभाव हा सहज स्पष्ट करण्याइतका किंवा कोणतंही मूल्यमापन करण्याइतका सोपा नसतो. इथं सतत शरीर बदलणारे जादूगार आहेत, अनेक रूपं बदलणारे प्राणी आहेत आणि बरंच काही. ही सगळी जादू वाटत असली, मिथ्या वाटत असली तरी ती मियाझाकींनी आपल्या कामातून, कलेतून घडवून आणलेली आहे. आणि आपल्या याच कलेतून, चलाभासाच्या माध्यमातून त्यांनी या सर्व जगाला फक्त हालतं-चालतंच केलं नाही तर सजीवही केलं आहे असं म्हणता येईल.

‘हावल्स मुव्हिंग कॅसल’मध्ये राजपुत्रात रूपांतरित झालेला ‘टर्निप हेड’ (बुजगावणं) चित्रपटाच्या शेवटी म्हणतो, “One thing you can always count on is that hearts change.” जिब्लींच्या चित्रपटात असंच आहे. मन, शरीर, नद्या, जंगले, देश सगळेच बदल पावत असतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं; इतके ते सुंदर आहेत. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते.

जिब्लीचे चित्रपट कोरोनाच्या काळातच पाहता आले, पण लहान पडद्यावर. मात्र, २०२३ साली प्रदर्शित झालेला त्यांचा नवाकोरा ‘द बॉय अँड द हेरॉन’ (The Boy and the Heron) हा चलाभासपट चित्रपटगृहात पाहता आला, तेव्हा जिब्लीची ‘भव्यता’ विशेष लक्षात आली. या चलाभासपटाला २०२३ सालातील अकॅडमीचा ‘बेस्ट ॲनिमेटेड फिचर फिल्म’ आणि २०२४ साली गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

हा चलाभासपट मियाझाकींच्या आयुष्यावर आधारलेला आहे, असं म्हटलं जातं. ‘मियाझाकीज् टच’ म्हणता येईल, अशा मियाझाकींच्या आधीच्या चलाभासपटांच्या खुणा जागोजागी या चलाभासपटातून ओळखता येतात. मियाझाकींविषयी पुन्हा कधीतरी सविस्तरच लिहावं लागेल.

चलाभासपटांविषयी लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ. जिब्लीविषयी काही लिहिता येईल असं वाटलं नव्हतं. कारण जिब्लीच्या अशक्य गोष्टी शब्दांत पकडणं हीच मुळात अशक्य गोष्ट आहे. कारण ती पूर्णपणे आपल्या डोळ्यांनी अनुभवावी अशीच गोष्ट आहे. आपण आपल्याला आवडलेल्या गोष्टी नेहमीच इतरांना सुचवत असतो. जिब्लीपट हे काही सर्वत्र उपलब्ध असणारे चलाभासपट नाहीत आणि काही कारणास्तव इतर चलाभासपटांप्रमाणे त्यांच्याविषयी फार ऐकायलाही मिळत नाही. पण आता ते ‘नेटफ्लिक्स’सारख्या माध्यमांतून उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तमाम चलाभासपटांच्या रसिकांनी ही  जिब्लीच्या जगात हरवून जाण्याची संधी चुकवू नये, असं वाटतं.

.................................................................................................................................................................

सारणी १ — जिब्लीचे चलाभासपट 

(वर्ष, चलाभासपट, मूळ जपानी नाव व त्याचा अर्थ, दिग्दर्शक / लेखक या क्रमाने)

१९८६ : कॅसल इन द स्काय (Castle in the Sky), तेन्कु नो शिरो राप्युता (Tenkū no Shiro Rapyuta), हायाओ मियाझाकी (लेखन आणि दिग्दर्शन)

१९८८ : ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज् (Grave of the Fireflies), होटारू नो हाइका (Hotaru no Haka), इसाओ ताकाहाता (लेखन आणि दिग्दर्शन)

१९८८ : माय नेबर टोटोरो (My Neighbor Totoro), तोनारी नो टोटोरो (Tonari no Totoro), हायाओ मियाझाकी (लेखन आणि दिग्दर्शन)

१९८९ : किकीज् डिलीव्हरी सर्व्हिस (Kiki's Delivery Service), माहो नो टोक्युबिन (Majo no Takkyūbin) (Witch’s Delivery Service), हायाओ मियाझाकी (लेखन आणि दिग्दर्शन)

१९९१ : ओन्ली येस्टरडे (Only Yesterday), ऑमोईड पॉरो पॉरो (Omoide Poro Poro) (Memories Come Tumbling Down), इसाओ ताकाहाता (लेखन आणि दिग्दर्शन)

१९९२ : पॉर्को रोसो (Porco Rosso), कुरानाई नो बुटा Kurenai no Buta (Crimson Pig), हायाओ मियाझाकी (लेखन आणि दिग्दर्शन)

१९९४ : पॉम पोको (Pom Poko), हाईसे तनुकी गाईसन पोन्पॉको (Heisei Tanuki Gassen Ponpoko) (Heisei-era Raccoon Dog War Ponpoko), इसाओ ताकाहाता. (लेखन आणि दिग्दर्शन)

१९९५ : व्हिस्पर ऑफ द हार्ट (Whisper of the Heart), मिमि ओ सुमसेबा (Mimi o Sumaseba) (If you listen closely), योशिफुमी कॉन्दो (दिग्द॰), हायाओ मियाझाकी (ले॰)

१९९७ : प्रिन्सेस मोनोनोके (Princess Mononoke), मॉनोनोक हाईम (Mononoke-hime) (Spirit/Monster Princess), हायाओ मियाझाकी (लेखन आणि दिग्दर्शन)

१९९९ : माय नेबर यमाडाज् (My Neighbors the Yamadas) होहोकीक्यो तोनारी नो यामाडा कुन (Hōhokekyo Tonari no Yamada-kun) इसाओ ताकाहाता. (लेखन आणि दिग्दर्शन)

२००१ : स्पिरिटेड अवे (Spirited Away), सेन टू चिरो ना कामाकुशि (Sen to Chihiro no Kamikakushi) (Sen and Chihiro's Spiriting Away), हायाओ मियाझाकी (लेखन आणि दिग्दर्शन)

२००२ : द कॅट रिटर्न्स (The Cat Returns), नेकु नो ऑन्गाईशि (Neko no Ongaeshi) (The Cat's Repayment), हिरोयुकी मोरिता (दिग्द॰), रेको योशिदा (ले॰).

२००४ : हावल्स मुव्हिंग कॅसल (Howl's Moving Castle), हाऊरु नो उगो कु शिरो (Hauru no Ugoku Shiro), हायाओ मियाझाकी.

२००६ : टेल्स फ्रॉम अर्थसी (Tales from Earthsea), गेडो सेन्की (Gedo Senki) (Ged's War Chronicles), गोरो मियाझाकी (दिग्द॰), गोरो मियाझाकी आणि केईको निवा (ले॰).

२००८ : पॉन्यो (Ponyo), गॅके नो यू नो पोन्यो (Gake no Ue no Ponyo) (Ponyo on the Cliff), हायाओ मियाझाकी.

२०१० : ॲरियाटी (Arrietty), कॅरी-गुराशि नो एरियेती (Kari-gurashi no Arietti), हिरोमासा योनेबायाशी (दिग्द॰), हायाओ मियाझाकी  आणि केको निवा (ले॰).

२०११ : फ्रॉम अप द पॉपी हील (From Up on Poppy Hill), कोकरिको-झाका कारा (Kokuriko-zaka Kara) (From Coquelicot Hill), गोरो मियाझाकी (दिग्द॰), हायाओ मियाझाकी आणि केको निवा (ले॰).

२०१३ : द विंड रायजेस् (The Wind Rises), केज् ताचिनु (Kaze Tachinu), हायाओ मियाझाकी.

२०१३ : द टेल ऑफ प्रिन्सेस कागुया (The Tale of the Princess Kaguya), कागूयो हाईम नो मोनोगातेरी (Kaguya-hime no Monogatari), इसाओ ताकाहाता (दिग्द॰), इसाओ ताकाहाता आणि रिको सा का गुची (ले॰)

२०१४ : व्हेन मार्नि वॉज हिअर् (When Marnie Was There), ओमोईद नो मानि (Omoide no Mānī) (Marnie of [My] Memories), हिरोमासा योने बायासी (दिग्द॰), हिरोमासा योने बायासी, केको निवा आणि मासासी आंदो (ले॰).

२०२० : इअरविग अँड द विच (Earwig and the Witch), आया तो माजो (Āya to Majo) (Āya and the Witch), गोरो मियाझाकी (दिग्द॰), केइको निवा आणि एमी गुन्जी (ले॰).

२०२३ : द बॉय अँड द हेरॉन (The Boy and the Heron), किमीताची वा डो इकुरू का (Kimitachi wa Dō Ikiru ka) (How Do You Live?), हायाओ मियाझाकी (लेखन आणि दिग्दर्शन)

.................................................................................................................................................................

सारणी दोन — जिब्लीचे लघुपट

(वर्ष, लघुपट, दिग्दर्शक / निर्माता, प्रदर्शन या क्रमाने)

२००० : जिब्लीज् (Ghiblies) | योशियुकी मोमोजे आणि हिरोयुकी वातानाबे | दूरचित्रवाणीसाठी लघुपट

२००१ : कुजिरातोरी (द व्हेल हंट) Kujiratori (The Whale Hunt) | हायाओ मियाझाकी | जिब्ली संग्रहालय

२००१ ते  २००९ : फिल्म गुरु गुरु Film Guru Guru | हिरोमासा योनेबायाशी | जिब्ली संग्रहालय

२००२ : जिब्लीज् (भाग २) Ghiblies Episode 2 | योशियुकी मोमोजे | कॅट रिटर्न्स चलाभासपटाच्या प्रकाशनापूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित 

२००२ : कोरोज् बिग डे आऊट Koro's Big Day Out | हायाओ मियाझाकी | जिब्ली संग्रहालय

२००२ : इमॅजनरी फ्लाईंग मशीन्स Imaginary Flying Machines | तोशिओ सुझुकी (नि.) हायाओ मियाझाकी |  जिब्ली संग्रहालय

२००२ : मेई अँड द किटनबस Mei And The Kittenbus | हायाओ मियाझाकी | जिब्ली संग्रहालय

२००५ : लूकिंग फॉर अ होम Looking For A Home | हायाओ मियाझाकी | जिब्ली संग्रहालय

२००६ : होशो ओ काटा ही (द डे आय रेज्ड / हार्वेस्टेड अ प्लेनेट) Hoshi o Katta Hi  (The Day I Raised/Harvested a Planet) | हायाओ मियाझाकी | जिब्ली संग्रहालय

२००६ : वॉटर स्पाईडर मॉनमॉन Water Spider Monmon | हायाओ मियाझाकी | जिब्ली संग्रहालय

२०१० : चू झुमो Chu Zumo | हायाओ मियाझाकी | जिब्ली संग्रहालय

२०१० : मि॰ डो अँड द एग प्रिन्सेस Mr. Dough and the Egg Princess | हायाओ मियाझाकी | जिब्ली संग्रहालय

२०११ : ट्रेजर हंटिंग Treasure Hunting | रेईको नाकागावा | जिब्ली संग्रहालय

२०१२ : जायन्ट गॉड वॉरियर अप्पिअर्स इन टोक्यो Giant God Warrior Appears in Tokyo | शिन्जी हिगुची | कंटेम्पररी आर्ट टोक्यो संग्रहालय

२०१८ : बोरो द कॅटरपिलर Boro the Caterpillar | हायाओ मियाझाकी | जिब्ली संग्रहालयात २१ मार्च २०१८ रोजी प्रदर्शित झाला.

.................................................................................................................................................................

सारणी ३ — जिब्लीचे दूरचित्रवाणीपट

१९८७ : The Story of Yanagawa's Canals | लेखन आणि दिग्दर्शन- इसाओ ताकाहाता | निर्माता- सुसुमु कुबो

२०१४ : Ronja, the Robber's Daughter | दिग्दर्शन- गोरो मियाझाकी, लेखन- हिरोयुकी कावासाकी | निर्माता- नोबुओ कावाकामी

२०२२ : Zen – Grogu and Dust Bunnies[152] | लेखन आणि दिग्दर्शन- कात्सुया कोन्डो | निर्माता- तोमोहिको इशी

.................................................................................................................................................................

लेखिका सायली दशरथ थारळी सध्या आयआयटी, मुंबई येथील ‘आयसी स्कूल ऑफ डिझाईन’मध्ये पीएच॰डी॰ करत आहेत.

sayalidasharath30@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......