लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (पूर्वार्ध)
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सायली दशरथ थारळी
  • ‘स्टुडिओ जिब्ली’च्या दहा सर्वोत्तम चलाभासांची पोस्टर्स
  • Sun , 13 April 2025
  • कला-संस्कृती चलत्-चित्र स्टुडिओ जिब्ली Studio Ghibli

१९९०च्या आसपास जन्माला आलेली मुलं कार्टून पाहतच मोठी झालीत, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ही मुलं वाया गेलीत असंही काही जण म्हणतील, कारण कार्टून पाहणं म्हणजे एक वेडच होतं. बहुधा सर्वांनाच त्या वेळी हे वेड होतं. (आजच्या मुलांतही आहे.) कोणीतरी क्वचितच असं सापडायचं की, ज्याने / जिने कार्टून पाहिलं नसेल वा पाहत नसेल. कोणी असं आमच्यासमोर (म्हणजे कार्टून पाहणाऱ्यांसमोर) म्हणालं की, आमचे डोळे विस्फारत. त्या कार्टून न पाहणाऱ्या ‘गुणी बाळा’ला आपण काहीतरी चांगलंच काम करत आहोत, अशीच जाणीव स्वाभाविकतः होत असणार, कारण मोठ्यांच्या म्हणण्याला बळी पडलेलं, कार्टून न पाहणारं, संस्कारी बाळच ते!

आणि आम्ही म्हणजे त्यांच्या मते बिघडलेली, कार्टून पाहणारी, ‘कार्टून’ पोरंच. पण अशी मुलं कोणत्या विश्वापासून अनभिज्ञ आहेत, हे आम्हाला चांगलं माहीत होतं, कारण आम्ही त्याच विश्वात जगणारे होतो.

आपल्या नेहमीच्या जगापासून बरंचसं वेगळं, आणि या वेगळेपणामुळेच कदाचित खूप जवळचं वाटणारं असं हे विश्व. अद्भुततेने भरलेलं. म्हणजे लहान मुलांच्या भाषेत सांगायचं, तर ती जादूची दुनियाच खरी. आणि जादू कसली? तर आपण एरवी खरी वाटणारही नाही अशी. म्हणजे मांजरी ‘म्याव म्याव’ न करता माणसांसारखं बोलतायत, उंदीर लाल रंगाची चड्डी घालून फिरतोय, वगैरे वगैरे. यादी मोठ्ठीच आहे. म्हणजे इसापच्या कथांमध्येही प्राणी बोलतातच की! अगदी आपल्या चिऊ-काऊच्या गोष्टीतसुद्धा. वास्तवात ते शक्य नाही हे आपल्याला माहीत असतं, लहान असताना नसतंही कळत तितकं, कारण आपण त्या गोष्टींच्या धाग्यात गुरफटलेले असतो. मग आपण मनातच काहीतरी चित्रही उभं करू की, चिमणीताई खरंच तिच्या बाळाला आंघोळ घालतेय आणि पावडर लावतेय. पण डोळ्यांसमोर (किंवा कार्टूनमध्ये दाखवतात तसं डोक्यावर तरंगणाऱ्या विचारांच्या ढगात) आपल्याला नेहमीचीच करडी-तपकिरी चिमणी दिसेल. पण कार्टूनात चिमणीताई ‘भारी चिवचिव’ न करता माणसांसारखंच बोलतात नाही का आपल्याशी? इतर वेळी उंदीर दिसला की, भीतीनं गाळण उडणारी पोरं मिकीमाऊस दिसला किंवा स्टुअर्ट लिटल् दिसला की, आनंदानं टीव्हीला चिकटूनच राहतात.

या झाल्या सांगोवांगीच्या कथांमधून आलेल्या कल्पना. कार्टून मालिकांनी-चलाभासपटांनी या कल्पनांना चालतं-बोलतं केलं. त्यांना आवाज दिला. प्राण्या-पक्ष्यांना आपल्या भाषेत बोलायला लावलं,  अगदी निर्जीव वस्तूंमध्येही जीव ओतला.    

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कार्टून म्हणजे नक्की काय असतं? कार्टून्स म्हणजे सात-आठ मिनिटं एवढ्या थोडक्या वेळेची, हलके-फुलके विषय असलेली मालिका. यांत हातानं काढलेली चित्रं असतात. एका अर्थी चलाभासाचाच (ॲनिमेशनचाच) प्रकार, पण त्यांची निर्मिती ही विशेषतः लहान मुलांसाठी केलेली असते. चलाभासपट (ॲनिमेशनपट) हा हलत्या चित्रांचाच पट, पण यात हातानं काढलेल्या चित्रांबरोबरच मातीनं तयार केलेल्या (क्लेमेशन) किंवा त्रिमितीय आकारातल्या (थ्रीडी) प्रतिकृतींना यांत्रिक किंवा संगणकीय माध्यम वापरून त्यांच्यात हालचालीचं म्हणजेच चलाभासाचं तंत्र तयार करतात आणि या पटांचे अनेक आशय-विषय असू शकतात. अगदी पाश्चात्त्य परीकथांपासून अद्भुतरम्य कथा-कादंबऱ्यांचीदेखील ही चलाभासीय रूपांतरणं असतात.      

मिकी माऊस, डोनाल्ड डक, टॉम अँड जेरी, पॉपाय, टिनटिन, मोगली यांचे आम्ही निस्सीम भक्त. कधी ते टीव्हीच्या पडद्यावर आपल्याला दर्शन देतील, याचीच आम्ही वाट पाहत असायचो. दिवसातून एकदा ठरलेल्या वेळी ते लागायचे आणि आम्ही पाहण्यात गुंग होऊन जायचो. काही काळानंतर (बहुतेक २००० सालानंतरच) पूर्णवेळ कार्टून्स दाखवणाऱ्या डिज्नी, कार्टून नेटवर्क, पोगो अशा वाहिन्या आल्या. त्यांवर तर एकानंतर एक अशी नवनवीन कार्टून्स लागायची.

याव्यतिरिक्त, म्हणजे कार्टून्सव्यतिरिक्त क्वचित काळीच घडणारी मेजवानी असायची ती चलाभासपटांची. कधी टीव्हीवर लागायचे किंवा कधीतरी डीव्हीडी मिळवून पाहायचे. डम्बो, बाम्बी, जंगलबुक, पीटरपॅन, लायन किंग तर कधी सिंड्रेला, स्नोव्हाईट, अरेबियन नाईट्स. त्यांतल्या पऱ्या, राजकन्या, बोलणारे पशू-पक्षी, उडणारे गालिचे, विचित्र बुटकी माणसं, दिव्यातून बाहेर पडणारा जिनी सगळेच अगदी खरे वाटणारे. 

ॲनिमेशन आणि आमच्या घराचा संबंध अगदी थेटच. बाबा राममोहन बायोग्राफिक्समध्ये काम करत होते. ‘राममोहन बायोग्राफिक्स’ हा भारतातला ॲनिमेशन स्टुडिओ. तिथे भारतीय कथाविषय असलेले चलाभासपट, कार्टून्स तसंच सिनेमांचे शीर्षकपट, जाहिराती यांची निर्मिती होत असते. त्यामुळे त्यांविषयी सतत काही ना काही माहिती मिळायचीच. त्या विषयावरची काही पुस्तकंदेखील घरी होतीच. शिवाय बाबांच्या या कार्यालयाला एक-दोन वेळा भेटदेखील दिली होती. त्यामुळे चलाभासाची प्रक्रिया कशी चालते, हे अगदी जवळून पाहिलं होतं. आपण पडद्यावर जे पाहतो त्यामागे कितीतरी जणांची केवढी मेहनत असते, ते कळलं. चलाभासाविषयी आकर्षण त्यामुळे आणखीच वाढलं.

आजही ही आवड कायम आहे. लहानपणी पाहायचे तेवढ्याच, कदाचित त्याहून जास्त आवडीनं चलाभासपट व कार्टून्स पाहतेच. आता त्यात काही गोष्टी नव्यानं कळल्याने त्या दृष्टीकोनातून पाहताना मजाच येते. टु-डी ॲनिमेशनसोबत सध्याचं थ्री-डी ॲनिमेशनदेखील आवडू लागलं. ॲनिमेशनच्या जगातली ही स्थित्यंतरं पाहिल्याचा आनंद वाटतो.

त्या वेळी विविध प्रकारचे चलाभासपट पाहिले असले, तरी ते सगळे डिज्नीचेच आहेत, अशी धारणा असायची. मुळात तशी धारणा असणं काही चुकीचं नव्हतं; कारण डिज्नीने अर्थातच जगाला खजिनाच उघडून दिला आहे. त्यामुळे कार्टून्स म्हटलं की, लगोलग डिज्नी असं एकच नाव आठवतं. लाडक्या मिकी माऊसमुळे ते डोक्यात आणखीच फिट्ट बसलेलं असतं. पण ॲनिमेशनचं हे जग केवळ डिज्नीपुरतं मर्यादित नाही, हे कालान्तरानं हळूहळू कळू लागलं. डिज्नीव्यतिरिक्त अनेक अशा कंपन्या वा स्टुडिओज् आहेत. त्यांची यादीही बरीच मोठी आहे. पिक्सार, ड्रीमवर्क्स, वॉर्नर ब्रदर्स, इत्यादी इत्यादी.

ॲनिमेशनच्या क्षेत्रात डिज्नी ही आघाडीची आणि प्रभावशाली निर्मितिसंस्था (स्टुडिओ) नक्कीच आहे. तिच्या सोबत ‘ड्रिम वर्क्स’ आणि ‘पिक्सार’ मिळून तीन निर्मितिसंस्था चलाभास-जगतात राज्य करत असल्या, तरी अनेक लहान-मोठ्या निर्मितिसंस्था विविध देशांत आपल्याला आढळतात. लहान मुलांपासून पौगंडावस्थेतील मुलांसाठी आणि तरुणांसाठीही या निर्मितिसंस्था विविध विषयांवर चलाभासपटांची वा मालिकांची निर्मिती करत आहेत.

सध्या चलाभास-निर्मितिसंस्था तंत्रज्ञानाच्या पंखांनी भरारी घेत आहेत. विषयाबरोबरच तंत्रज्ञानातही वैविध्य आलं आहे. प्रत्येक निर्मितिसंस्था या सर्वांतून आपलं वेगळेपण सिद्ध करत आहे. अमेरिकेपाठोपाठ जपानदेखील चलाभासाच्या जगात बरोबरीचं स्थान मिळवलं आहे. जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’ने लहानांपासून मोठ्यांना आपल्या किमयेची भुरळ पाडली आहे. जपान, जापानी संस्कृती आणि अर्थातच जपानी भाषा यांचं एक नैसर्गिक वाटेल, असं लाघवी चित्रण करून ‘स्टुडिओ जिब्ली’ने आपलं वेगळं स्थान अधिक ठळक केलं आहे. त्या स्टुडिओ जिब्लीविषयी आपण पुढे तपशीलवार जाणून घेणार आहोत.

स्टुडिओ जिब्लीची ओळख : टोटोरो!

काही वर्षांपूर्वी बाबा जिथे कामाला होते त्या कंपनीकडून काही जपानी कार्टून्सची खेळणी देण्यात आली होती. त्यांत मांजरासारख्या दिसणाऱ्या लहानशा रबराच्या बाहुल्या होत्या. करड्या-निळ्या रंगाच्या. त्या वेळी त्या नेमक्या कोणत्या कार्टूनमधल्या आहेत, हे माहीत नव्हतं. ‘टॉय स्टोरी’ या चलाभासपटाच्या एका भागात यातल्याच करड्या रंगाची हुबेहूब बाहुली पाहिल्याचं आठवतं.‌ त्यामुळे कोणत्या तरी कार्टूनमधलं पात्र इतकीच त्यांची ओळख होती. परदेशी बाहुल्या म्हणून त्या जपून ठेवलेल्या. अगदी गेल्या वर्षांपर्यंत त्या कोण आहेत, याची किंचित माहितीसुद्धा नव्हती.

काही वर्षांपूर्वी ‘रेड टर्टल’ हा चलाभासपट पाहण्यात आला. त्याच्या सुरुवातीला जपानी अक्षरांबरोबर ‘Studio Ghibli’ असं लॅटिन अक्षरांत लिहिलेलं दिसलं आणि सोबत या अगदी मांजरीसारखीच आकृती दिसली. कदाचित याच चित्रपटात ही पात्रं असतील असं तेव्हा वाटलं. पण चित्रपटभर त्या कुठेच उगवल्या नाहीत. त्यानंतर एकदा इंटरनेटवर चलाभासपटांची यादी शोधत असताना एका चित्रफितीत पुन्हा ही करडी मांजर येऊन धडकली.

स्टुडिओ जिब्लीच्या चलाभासपटांची माहिती देणारी ती एक चित्रफीत होती. त्यात जिब्लीच्या दहा सर्वोत्तम पटांची यादी होती. त्यातच या करड्या मांजरीची ओळख झाली. ही करडी मांजर म्हणजे स्टुडिओ जिब्लीच्या ‘माय नेबर टोटोरो’ या चलाभासपटातील टोटोरो. महत्त्वाचं म्हणजे टोटोरो ही मांजर नाही. मांजरसदृश, प्रचंड आकाराचा एक काल्पनिक प्राणी आहे. या पटाच्या कथेत नोंदवल्याप्रमाणे तो एक ‘फॉरेस्ट स्पिरीट’ आहे. या चलाभासपटात जपानमध्ये तो फार लोकप्रिय आहे. लहान मुलांचा तो लाडका झाला ते या चित्रपटामुळेच. अशा प्रकारे टोटोराचा शोध घेता घेता स्टुडिओ जिब्लीची ओळख झाली आणि त्याचबरोबर चलाभासाच्या आणखी एका वेगळ्याच विश्वात प्रवेशसुद्धा; कारण टोटोरोतून जे काही पाहायला मिळालं ते काहीतरी अपूर्व असंच होतं.

एक प्रसंग मुद्दाम इथं सांगावासा वाटतो.

पाऊस कोसळतोय. बाबा छत्री घरीच विसरून गेलेत. त्यामुळे मेई आणि सात्सुकी बाबांची वाट पाहत बसथांब्यावर उभ्या आहेत. एक बस येऊन जाते पण तिच्यात त्यांचे बाबा नाहीत. बराच वेळ होऊन गेला. चांगलंच अंधारून आलंय आणि पाऊसही अजून पडतोच आहे. रस्ताही एव्हाना निर्जनही झाला आहे. वाट पाहून पाहून मेई दमली आहे आणि डुलक्या काढते आहे. म्हणून सात्सुकी तिला पाठीवर घेते आणि मेई झोपी जाते. तिला पाठीवर घेऊन कशीबशी मानेवर छत्री तोलून सात्सुकी बिचारी पावसात तशीच वाकून उभी आहे. तितक्यात कोणाच्या तरी पावलांचा आवाज येतो. बाजूला कोणीतरी येऊन उभं राहिलंय. कशाबशा धरलेल्या छत्रीतून फक्त मोठ्ठी नखं असलेली मोठी पावलं दिसताहेत. तिने छत्री थोडी बाजूला करून वर पाहिलं, तर एक भला मोठा मांजरीसारखा दिसणारा प्राणी शेजारी शांत उभा आहे. सात्सुकी घाबरत नाही. मेईने पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे हा टोटोरोच आहे अशी तिची खात्री पटते व त्याला ती त्याला तसं विचारतेही. तोही आपले डोळे मोठे करून होकार देतो. तो पावसात भिजू नये म्हणून सात्सुकी त्याला बाबांसाठी आणलेली छत्री देते. झाडावरून पावसाचं पाणी ओघळून त्याच्या छत्रीवर टपटप पडतं तेव्हा त्याला मजा वाटते. तो एक मोठी उडी मारतो आणि त्यामुळे सगळं हादरतं आणि पाण्याचे मोठाले थेंब पडू लागतात. आणि तो मोठ्याने हसू लागतो. त्याच्या त्या हसण्याने मेई जागी होते. इतक्यात दुरून गाडीचे दिवे दिसू लागतात. बाबा निदान या बसमध्ये तरी असू देत असं सात्सुकीला वाटतं; पण तसं काही नसतं.

दिवे जवळ आल्यावर कळतं की, ती गाडी नसून मांजरीच्या आकाराची एक बस आहे. (इंग्रजी उपशीर्षकांत तिला ‘कॅटबस’ असं म्हटलं आहे.) ती येऊन या तिघांच्या समोर थांबते. तो दुरून दिसणारा प्रकाश त्या मांजरीच्या डोळ्यांतून येत असतो आणि ती बस खोटी नसून बारा पायांची खरीखुरी मांजरच असते. मान वेळावून, दात विचकून ती यांच्याकडे बघतेही. दोघीही डोळे विस्फारून तिच्याकडे पाहत असतात, तितक्यात त्या बसची एक खिडकी रूंदावून तिचं दार होतं आणि मेईच्या हातात एक छोटं पानांचं पुडकं ठेवून टोटोरो त्या दारातून आत बसमध्ये जातो. टोटोरो आत जाऊन बसल्यावर त्या दारापासून पूर्ववत खिडकी तयार होते. आणि मेई आणि सात्सुकीला तिथेच आश्चर्यचकित सोडून ती मांजर-बस टोटोरोला घेऊन वेगाने पळू लागते!

… एक मिनिटभर आपण समोरच्या पडद्यावर काय पाहतोय यावर विश्वास बसत नाही. ती मांजर-बस म्हणजे नक्की काय प्रकार होता, हे पाहण्यासाठी आपण पुन्हा मागे जाऊन पाहतो. आवाज करणारी — पण अक्राळविक्राळ, डोळ्यांमध्ये हेडलाईट्स असलेली — छप्परांसारख्या पाठीवर उंदरांचे दिवे असलेली. सगळं काही कल्पनेच्या पलीकडचंच!  

स्टुडिओ जिब्ली

तर अशा चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्वाला लोकांसमोर आणणाऱ्या स्टुडिओ जिब्लीची ही करामत. स्टुडिओ जिब्ली (Studio Ghibli) हा एक जपानी ॲनिमेशन फिल्म-स्टुडिओ. तो टोकियोतल्या कोगानेई भागात आहे. या निर्मितिसंस्थेअंतर्गत आतापर्यंत अनेक चलाभासपट, काही लघुपट, दूरचित्रवाणीवर जाहिराती आणि एक दूरचित्रवाणीपट अशी निरनिराळी निर्मिती झाली आहे. जपानी चलाभास-शैलीची परंपरा राखत या निर्मितिसंस्थेने चलाभास-विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जगभरातील चलाभास-निर्मितिसंस्थांच्या यादीत तिचं नाव पहिल्या पाचांत गणलं जातं. ऐंशीच्या दशकात उदयाला आलेल्या या निर्मितीसंस्थेने आतापर्यंत अनेकानेक उत्तमोत्तम चलाभासपटांची निर्मिती केली आहे. असा हा स्टुडिओ जिब्ली ‘जपानचा डिज्नी’ म्हणूनही ओळखला जातो. आधी सांगितल्याप्रमाणे जिब्लीच्या बोधचिन्हात टोटोरोचा समावेश आहे. जसा डिज्नीसाठी मिकी माऊस, तसाच स्टुडिओ जिब्लीसाठी टोटोरो.

‘स्टुडिओ जिब्ली’चा जन्म

हायाओ मियाझाकी (Hayao Miyazaki) हे या स्टुडिओचे सहसंस्थापक आणि संचालक आहेत. १९८५ साली मियाझाकी यांनी निर्माता तोशिओ सुझुकी (Toshio Suzuki) आणि दिग्दर्शक इसाओ ताकाहाता (Isao Takahata) यांच्यासह स्टुडिओ जिब्लीची निर्मिती केली. १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नाअसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड’ (Nausicaa of the valley of the wind) या मियाझाकींच्या चित्रपटाच्या यशानंतर या स्टुडिओची निर्मिती करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि या स्टुडिओचा जन्म झाला. तेव्हापासून म्हणजे १९८५पासून आतापर्यंत अनेक चलाभासपटांची देणगी या स्टुडिओने जगाला दिली आहे.

स्टुडिओ जिब्ली : नावात काय आहे?

स्टुडिओ जिब्ली (Studio Ghibli) या नावाची जन्मकथा गमतीची आहे. लॅटिन लिपीत लिहिल्यानुसार त्याचा लोक त्या शब्दाचा उच्चार ‘गिब्ली’ अथवा ‘घिब्ली’ असा करतात. इतकंच नव्हे तर तो ज्या भाषेतून घेतला आहे, त्या इटालियन भाषेतही त्याचा उच्चार ‘गिब्ली’ असाच आहे. हा इटालियन शब्द योजण्याचं नेमकं प्रयोजन काय? तर त्याचं उत्तर ‘द बर्थ ऑफ स्टुडियो जिब्ली’ या जिब्लीविषयीच्या एका माहितीपटात सापडतं. 

गिब्ली हा सहारा वाळवंटातील उष्ण वाऱ्यासाठी वापरला जाणारा इटालियन भाषेतील, पण मूळ लिबियायी-अरबी शब्द आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इटालियन हवाईदलाच्या गस्ती-पथकातल्या विमानाला गिब्ली (Caproni Ca.309 Ghibli) असं नाव देण्यात आलं होतं. मियाझाकींना विमानाविषयी फार आकर्षण होतं. ‘Ghibli’ हा विमानाचा एक प्रकार आहे अशी त्यांची प्रथम समजूत होती. नंतर त्यांना कळलं की, त्याचा अर्थ ‘उष्ण वारे’ असा होतो. आपल्या नव्या स्टुडिओचं नामकरण करायचं होतं, तेव्हा त्यांना या नावाची आठवण झाली. त्या नावातून त्यांना ॲनिमेशन-जगात आपल्या स्टुडिओचा प्रभाव दर्शवायचा होता. ‘ॲनिमेशन-जगात या स्टुडिओमुळे नवे वारे वाहतील’ अशी त्यांची धारणा होती. म्हणून त्यांनी हेच नाव देण्याचं ठरवलं. मात्र लिपी आणि उच्चारातल्या भेदामुळे इटालियन ‘गिब्ली’ जपानीत ‘जिब्ली’ झाला. खरं पाहता याचं जपानी भाषेनुसार नाव ‘काबुशिकी गेईशा सुताज्यो जिबुरी’ (Kabushiki gaisha Sutajio Jiburi) असं आहे.

ॲनिमे आणि जिब्ली

खास जपानमध्ये निर्माण होणारा, हाताने रेखलेला किंवा संगणकीय चलाभासाचा प्रकार म्हणजे ‘ॲनिमे’.‌ यात सर्व प्रकारच्या चलाभास-माध्यमांचा समावेश आहे. जगभरात ॲनिमे म्हणजे जपानी ॲनिमेशन अशीच समजूत आहे. निरनिराळ्या रंगांची चित्रं, उठावदार पात्रं आणि अद्भुत कल्पना यांचा अंतर्भाव या ॲनिमेशनमध्ये होतो. ही विशिष्ट पद्धतीची ॲनिमेशन-शैली जपानमध्ये १९६० साली ओसाम तेझुका यांच्या माध्यमातून विकसित झाली. जगभरात तिचा प्रसार विसाव्या शतकाच्या अखेरीस झाला. चित्रपटगृह, दूरचित्रवाणी आणि महाजालाच्या माध्यमातून ॲनिमे आपल्यापर्यंत पोहचतं.

ॲनिमेच्या निर्मितीत कमीत कमी हालचाल आणि पॅनिंग, झूमिंग व अँगल शॉट्स अशा कॅमेरा-इफेक्ट्सवर जास्त भर असतो. यात विविध शैलींचा वापर केला जातो. विशेषतः पात्रांच्या आकारात, शरीररचनेत फार वैविध्य असतं. मोठ्या डोळ्यांची पात्रं हे ॲनिमेचे अधिक प्रसिद्ध असं विशिष्ट लक्षण आहे.

ॲनिमे या माध्यमात काम करणाऱ्या तब्बल ४३० निर्मितिसंस्था आहेत. त्यात स्टुडिओ जिब्ली, गाइनॅक्स आणि टोई ॲनिमेशन या प्रमुख निर्मितिसंस्था आहेत. त्यांच्या चलाभासपटांचं आणि कार्टून मालिकांचं इंग्रजी वा इतर भाषांमध्ये पुनर्ध्वनिमुद्रण (डबिंग) केलं जातं आणि त्यांना जगभरात बरीच मागणी आहे. २०१६च्या सर्वेक्षणानुसार, जगातील एकूण ॲनिमेटेड दूरचित्रवाणी-मालिकांपैकी ६० टक्के मालिका या जपानी ॲनिमेच्या आहेत.

ॲनिमेचं जागतिकीकरण

पाश्चिमात्य देशात ‘ॲस्ट्रो बॉय’ (Astro Boy) आणि ‘स्पीड रेसर’ (Speed Racer) यांसारख्या ॲनिमेच्या रूपांतरणांना फार व्यावसायिक यश मिळालं. ॲनिमेची ही उत्पादनं फारच स्वस्त होती. शिवाय त्यांच्यातून नफाही फार होत असे. यामुळे  इटली, फ्रान्स आणि स्पेन सारख्या देशांना जपानच्या या निर्मितीत रस वाटू लागला. जपाननंतर इटली हा असा देश आहे, जिथं ॲनिमे उत्पादनांचा जास्त खप होतो. हल्ली त्याचं प्रमाण सर्वत्र वाढलेलंही दिसून येतं.

१९८०च्या सुरुवातीला अमेरिकन संस्कृतीत ॲनिमे सीरिजचा शिरकाव झाला. १९९० साली ॲनिमेनं खूप प्रसिद्धी मिळवली. ‘विझ’ (Viz) आणि ‘मिक्स’ (Mixx) यांसारख्या कंपन्यांनी अमेरिकन बाजारपेठेत ॲनिमेचं प्रकाशन आणि वितरण करण्यास सुरुवात केली. १९९०च्या अखेरीस सुरू झालेल्या ॲनिमेच्याच ‘पोकेमॉन’ (Pokemon) आणि ‘ड्रॅगन बॉल झी’ (Dragon Ball Z) आणि गेलाबाजार  यांसारख्या कार्टून-मालिकांनी प्रसिद्धीचा उच्चांक गाठला. महाजालाच्या माध्यमातून ॲनिमे अधिक लोकांपर्यंत पोहोचला.

चलाभासपट माध्यमातून ॲनिमेची लोकप्रियता वाढवली ती स्टुडिओ जिब्लीच्या चलाभासपटांनी. आता त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊ.

जिब्लीचा संसार :

१) जिब्लीचे चलाभासपट - स्टुडिओ जिब्लीची निर्मिती मियाझाकी, सुझुकी आणि ताकाहाता या त्रयींनी ‘नाअसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड’ या चलाभासपटाच्या यशानंतर केली, हे आपण आधी पाहिलंच. अनेकदा हा चलाभासपटच या स्टुडिओची पहिली निर्मिती आहे असं मानलं जातं. हा चलाभासपट जरी मियाझाकींनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला असला, तरी तो स्टुडिओची निर्मिती होण्याच्या एका वर्षापूर्वीच प्रकाशित झाला होता. मियाझाकींनी ‘नाअसिका’ या टॉपक्राफ्ट नावानं ओळखल्या जाणाऱ्या संस्थेसाठी दिग्दर्शित केला होता आणि त्याचं वितरण ‘टोई’ (Toi) कंपनीने केलं होतं. हा चलाभासपट मुळात ‘ॲनिमाज’ या जपानी मासिकासाठी मियाझाकींनी तयार केलेली दोन खंडाची मांगा मालिका होती. याच पटाच्या निर्मितीत सुझुकींचाही समावेश होता आणि स्टुडिओची निर्मिती करायची ठरवल्यावर त्यांनीच ताकाहाता यांनादेखील समाविष्ट करून घेतलं.             

स्टुडिओची निर्मिती झाल्यावर प्रदर्शित झालेला पहिला चलाभासपट म्हणजे १९८६ सालचा ‘कॅसल इन द स्काय’ (Castle in the Sky). या चलाभासपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मियाझाकींनी केलं असून ताकाहाता यांनी त्याची निर्मिती केली आहे. स्टुडिओची निर्मिती असलेल्या सर्व चलाभासपटांची सविस्तर यादी या लेखाच्या शेवटी दिली आहे.   

जिब्लीचे बरेच चलाभासपट हे मियाझाकींनीच दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्याखेरीज ताकाहाता हे मुख्य दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही चलाभासपट दिग्दर्शित केले आहेत, त्यांतील ‘ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज्’ (Grave of the Fireflies) हा चलाभासपट विशेष लक्षणीय असून त्यांनी जिब्लीसाठी दिग्दर्शित केलेला हा पहिला चलाभासपट आहे. 

यांच्या व्यतिरिक्त योशिफुमी कॉन्दो, हिरोयुकी मोरिता आणि हिरोमासा योनेबायाशी यांनीही जिब्लीसाठी दिग्दर्शन केलं आहे. गोरो मियाझाकी यांनी आपल्या वडिलांचा दिग्दर्शनाचा वारसा पुढे नेला आहे. 

जिब्लीचे चलाभासपट हे मूळ जपानी भाषेत आहेत. तरी काही चलाभासपटांचं जागतिक पातळीवर प्रकाशन हे मुख्यत्वे डिज्नीद्वारे होतं. यात जिब्लीपटांचं इंग्रजीत पुनर्ध्वनिमुद्रण केलं जातं. याशिवाय जी-किड्स (GKIDS) (उत्तर अमेरिका), स्टुडिओ कनाल (StudioCanal) (युनायटेड किंगडम आणि आयर्लंड) आणि मॅडमॅन एन्टरटेनमेन्ट हे स्टुडिओ जिब्लीचे आंतरराष्ट्रीय वितरण-भागीदार आहेत. यामुळे जिब्लीला आंतरराष्ट्रीय प्रेक्षक लाभले. डिज्नीने केलेली इंग्रजी पुनर्ध्वनिमुद्रणं ही चित्रपटगृहांतील प्रकाशनाच्या उद्देशाने झाली आहेत, तर काही डीव्हीडी माध्यमातील प्रकाशनाच्या उद्देशानं झाली आहेत.

२) दूरचित्रवाणीपट - स्टुडिओ जिब्ली आणि ‘ॲनिमाज’ मासिकाचे संबंध वर्षानुवर्षं टिकून आहेत. ॲनिमाज मासिकात स्टुडिओ जिब्लीविषयी ‘जिब्ली नोट्स’ या सदरात विशेष लेख प्रसिद्ध होतात. जिब्लीच्या चलाभासपटातील चित्रं या मासिकांच्या मुखपृष्ठावर सतत झळकत असतात. सेईका हिमारो यांची ‘ऊमि गा किकोरू’ ही कादंबरी ॲनिमाजमध्ये क्रमशः प्रकाशित करण्यात आली होती. त्याचंच रूपांतर म्हणून १९९३ साली स्टुडिओ जिब्लीनं दूरचित्रवाणीसाठी ‘ओशन वेव्ज’ (Ocean Waves) हा चलाभासपट निर्माण केला. जिब्लीने निर्माण केलेला हा एकमेव दूरचित्रवाणीपट आहे. त्याचं दिग्दर्शन तोमोमी मोशिझुकी यांनी केलं होतं.   

३) दूरचित्रवाणी-मालिका - २०१४ साली जिब्ली आणि पॉलिगॉन पिक्चर्स यांच्या सहयोगानं निर्मिलेली ‘रोन्जा, द रॉबर्स डॉटर’ (Ronja, the Robber's Daughter) एक चलाभासी मालिका आहे. ही मालिका एस्ट्रिड लिन्ज्रेन यांच्या ‘रोनिआ, द रॉबर्स डॉटर’ या कादंबरीवर आधारलेली असून तिचं दिग्दर्शन गोरो मियाझाकी यांनी केलं आहे. एकूण सव्वीस भागांची ही मालिका असून तिला २०१५ सालचा ‘बेस्ट टु-डी ॲनिमेटेड प्रोग्राम’ म्हणून ‘एशियन टेलिव्हिजन पुरस्कार’, तसेच २०१६ साली ‘किड्स ॲनिमेशन’ प्रकारात इंटरनॅशनल एमी पुरस्कार मिळाला आहे.   

४) लघुपट - जिब्लीने जिब्ली संग्रहालय, दूरचित्रवाणी आणि चित्रपटगृहांसाठी काही लघुपटांची निर्मिती केली आहे. मुख्यत्वे जिब्लीच्या संग्रहालयात या लघुपटांचं प्रदर्शन केलं जातं.     

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

जिब्लीची वाटचाल :

१) स्टुडिओची निर्मिती झाल्यानंतर चार वर्षांनी प्रदर्शित झालेला ‘किकीज् डिलीव्हरी सर्व्हिस’ (kiki’s Delivery Service) (१९८९) हा बॉक्स ऑफिसवर गाजलेला जिब्लीचा पहिला चलाभासपट आहे. 

२) ‘पोर्को रोसो’ (Porco Rosso) (१९९२) हा जिब्लीचा सर्वांत जास्त कमाई करणारा पहिला चलाभासपट आहे.

३) ‘पॉम पोको’ (Pom Poco) (१९९४) हा ‘कम्प्युटर ग्राफिक्स’चा वापर केलेला पहिला चलाभासपट आहे.

४) ‘व्हिस्पर ऑफ द हार्ट’ (Whisper of the Heart) हा १९९५ साली जपानमध्ये सर्वांत जास्त कमाई केलेला चलाभासपट आहे. तसेच ‘डॉल्बी डिजिटल तंत्रज्ञान’ वापरलेला तो पहिला जपानी चलाभासपटही आहे.

५) मियाझाकींनी ‘कम्प्युटर ग्राफिक्स’चा वापर करून निर्माण केलेला आणि ‘डिजिटल कलरिंग तंत्राचा’ वापर केलेला पहिला चलाभासपट म्हणजे ‘प्रिन्सेस मोनोनोके’ (Princes Mononoke) (१९९७). जपानमध्ये सर्वप्रथम १० अब्ज येन कमाई करणारा पहिला चलाभासपट तर आहेच, शिवाय त्या वर्षी सर्वोत्तम चित्रपटासाठी ‘नॅशनल अकॅडमी पुरस्कार’ मिळवणारा पहिला चलाभासपट आहे. 

६) पूर्णपणे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केलेला चलाभासपट म्हणजे ‘माय नेबर्स यमाडाज्’ (My Neighbour the Yamadas) (१९९९)

७) ‘स्पिरिटेड अवे’ (Spirited Away) (२००१) हा जगभर ३७.४४ कोटी डॉलर इतकी कमाई केलेला जिब्लीचा पहिला चलाभासपट आहे. या पटाला २००२ साली ‘गोल्डन बेअर’, २००३ साली ‘बेस्ट ॲनिमेटेड फिचर फिल्म’ म्हणून ‘अकॅडमी पुरस्कार’ असे पुरस्कारही मिळाले आहेत.

८) ‘द बॉय अँड द हेरॉन (The Boy and The Heron) (२०२३) या चलाभासपटाला २०२३ सालातील अकॅडमीचा ‘बेस्ट ॲनिमेटेड फिचर फिल्म’ आणि २०२४ सालातील ‘गोल्डन ग्लोबचा ‘बेस्ट ॲनिमेटेड फिचर फिल्म’ आणि बाफ्टाचा ‘बेस्ट ॲनिमेटेड फिल्म’ हे पुरस्कारही मिळाले आहेत.

.................................................................................................................................................................

लेखिका सायली दशरथ थारळी सध्या आयआयटी, मुंबई येथील ‘आयसी स्कूल ऑफ डिझाईन’मध्ये पीएच॰डी॰ करत आहेत.

sayalidasharath30@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध)

जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते.......

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......