‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ : ललितलेखन करणाऱ्या लेखकांसाठी हा मौल्यवान संदर्भग्रंथ आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शिल्पा द. गंजी
  • ‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 12 April 2025
  • ग्रंथनामा शिफारस ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास इब्राहीम अफगाण Ibrahim Afghan

ज्यात भावनांना आणि भावनेच्या आविष्काराला महत्त्व दिलेले आहे असे लेखन म्हणजे ललितलेखन. त्या अनुषंगाने ‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ हा लेखक इब्राहीम अफगाण यांचा ललितलेखनाची संरचना स्पष्ट करणारा मराठी भाषेतील मौलिक संदर्भग्रंथ आहे. या पुस्तकात केवळ ललित साहित्यच नव्हे, तर सादरीकरण कला उदा., नाटक, चित्रपट इत्यादी लेखन कला शिकण्याचे तंत्र व ललितलेखन कलेची सामग्री यांचाही ऊहापोह केला आहे.

कथा, कादंबरीसारख्या ‘सांगण्याच्या’ प्रकारातील आणि चित्रपट, नाटक या ‘दाखवण्याच्या’ प्रकारातील साहित्यकृती आणि कलाकृती निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे ललितलेखन कलेतील ‘मूळ घटक’ आणि ‘आकृतिबंध म्हणजेच घाट’ यांचा संच तयार करून, केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेकविध दंतकथा, पुराणकथा, परीकथा, बोधकथा, निसर्गकथा यांची असंख्य उदाहरणे व दाखले देत, त्यांचा मूळ स्वरूपात कसा अभ्यास करता येईल, हे या पुस्तकाद्वारे अफगाण यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ललितलेखन कला शिकण्यासाठी केवळ लेखकच नव्हे, तर पटकथाकार, नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक यांच्यासाठी इंग्रजी भाषेतील पुस्तकांची रेलचेल बाजारात दिसून येते, पण या सर्वांसाठी मराठी भाषेतील असा सर्वसमावेशक अभ्यास अंतर्भूत असलेले हे पहिलेच पुस्तक आहे हे विशेष.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या पुस्तकाचे लेखक इब्राहीम अफगाण हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, चित्रपट समीक्षक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘सकाळ’, ‘साम टीव्ही’मधून पत्रकारिता केली आहे. ‘कृषीवल’ या दैनिकाचे संपादक म्हणूनही काम पहिले आहे. त्यांच्या ‘मृत्यानुभव’, ‘मोजकी उन्हे’ अशा काही कादंबऱ्या प्रकाशित आहेत. सध्या ते ‘राईटमाईंड अकॅडमी’ या संस्थेद्वारे विविध लेखन कार्यशाळा, वैयक्तिक मार्गदर्शन कार्यक्रम घेत असतात.

या पुस्तकाची मांडणी एकूण नऊ भागात केलेली असून प्रत्येक भागाची विभागणी अनेक प्रकरणांत केलेली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाला एक स्वतंत्र नाव देऊन त्यावर सविस्तर विवेचन केलेले आहे.

पहिल्या भागात विस्तृत प्रस्तावना दिली आहे. ती खरोखरच विलक्षण वाचनीय आहे. ती प्रस्तावना पुस्तकविषयाच्या गुहेत प्रवेश करण्याआधीची उत्सुकता वाढवते आणि पुस्तकाच्या आकाराचे दडपणही कमी करते.

विश्वातील कथनाच्या उगमापासून पुढे कथा रचण्यापर्यंत, कथेच्या आशयापासून ते तिचे घाट, पात्र, कथनाचा प्रवास, ललितलेखनामागील वैश्विक घटक इत्यादींबाबत थोडक्यात चर्चा पहिल्या दोन प्रकरणांत होते. कथेच्या वैश्विक गुणांचे विवेचन करताना पहिल्या प्रकरणात रशियन परीकथातज्ज्ञ व्लादीमीर प्रॉप यांनी ‘मॉर्फोलॉजी ऑफ फॉकटेल्स’ या ग्रंथात केलेले ‘परीकथांचे विश्लेषण अर्थात ३१ टप्पे’ दिले आहेत. ते परीकथेसारखेच अद्भुत आहेत. ॲरिस्टॉटलने दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी ‘काव्यशास्त्र’ (पोएटिक्स) या ग्रंथात सादर केलेले सिद्धान्त आणि १९४९ सालात जोसेफ कॅम्बल यांनी लिहिलेला ‘द हिरो विद अ थाउजंड फेसेस’ हा ग्रंथ, तसेच जॉर्ज पोल्टी यांचा ‘द थर्टी सिक्स ड्रॅमॅटिक सिच्युएशन्स’ हा ग्रंथ, विलियम कुक यांचा ‘प्लोटो : अ न्यू मेथड ऑफ प्लॉट सजेशन फॉर रायटर्स ऑफ क्रिएटिव्ह फिक्शन’ हा ग्रंथ यांची धावती ओळख इथे करून दिली आहे.

पुढील काही प्रकरणांत कथेची संकल्पना, ॲरिस्टॉटलची तीन तत्त्वे व आलेख, सामूहिक तत्त्व म्हणजेच कथाविषय किंवा थीम, कथेचे घाट, मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्ताव युंग यांची आदिबंध (मानवी प्रवृत्तीची मूळरूपे - प्रतीके  व प्रतिमा) ही संकल्पना व हे आदिबंध सामूहिक अचेतनाचाच भाग आहेत, या आदिबंधांचे अवतरण आदिप्रतिमांच्या रूपात प्राक्कथांमधून होते. तसेच ते मानवी कलांमधूनही होते. युंगने या संदर्भात साहित्याचा केलेला विचार याबद्दल विवेचन आहे.

‘सामूहिक तत्त्व’ या प्रकरणात लेखक लाजोस एगरी यांच्या ‘द आर्ट ऑफ ड्रॅमॅटिक रायटिंग’ या पुस्तकातील महान फ्रेंच चित्रकार रॉडीन याच्या बाल्झाकच्या पुतळ्याचे एक उदाहरण कथेच्या रूपात त्यांनी दिले आहे. ते अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याचा मतितार्थ इतकाच आहे की, कोणताही एक भाग एकंदर कलाकृतीपेक्षा अधिक महत्त्वाचा नसतो.

त्यांनतर आजच्या संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात कथेला एक ‘प्रॉडक्ट’ म्हणून जे बाजारमूल्य आलेले आहे, त्यामुळे कथेच्या क्षमतेचे विश्लेषण करणारे संशोधनपर कार्य जगभरात अनेक जण करत आहेत. त्यातून वैश्विक पॅटर्न शोधण्यात येत आहेत, याची सविस्तर माहिती देऊन, या प्रकरणात कृत्रिम बुद्धिमत्तेची आलोचना व त्याच्या उपयोगितेबद्दल भय निर्माण न करता उत्कृष्ट कामगिरीसाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेशी स्वतःला जोडून घेण्याचा सल्ला दिला आहे. 

‘भावनांचे जग’ या प्रकरणात भावनांच्या जगाचा धांडोळा घेताना भारतीय रससिद्धान्त आणि प्लुचिक्स फ्लॉवर या शास्त्रोक्त माहितीचा कलात्मक उपयोग कसा करावा, याची मीमांसा केली आहे.

‘कथांचे विज्ञान’ या प्रकरणात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कथांचे विज्ञान शोधण्याचा होत असलेला प्रयत्न व त्याच्या निष्कर्षांच्या रूपात निघालेले पॅटर्न यांची चर्चा केलेली आहे. या चर्चेद्वारे एकंदर कथेचे दोन ते छत्तीस घाट यांचा धावता आढावा घेतला आहे. त्यात फॉस्टर-हॅरिस, ख्रिस्तोफर बुकर, रोनाल्ड टोबीयास, जॉर्ज पोल्टी यांनी मांडलेल्या विविध घाटांचा आढावा घेतला आहे. पुन्हा एकदा ॲरिस्टॉटलचे तीन टप्पे आणि त्याने अनुकृतीच्या सिद्धान्तानुसार केलेले साहित्याचे वर्गीकरण अधोरेखित केले आहे.

सिग्मंड फ्रॉइड यांनी सुप्त मनाची संकल्पना मांडली व त्याआधारे मनोव्यापाराचे विश्लेषण केले. त्यांच्या मते साहित्यात आढळणारी प्रतीके ही मानवाच्या शारीर व्यापाराची असतात व त्या शारीरिक प्रतिकांत लैंगिक प्रतीके उत्कटत्वाने आढळतात. या पद्धतीचा आधार घेऊन, उदाहरणे देत ‘अभ्यासाच्या दिशा’ या प्रकरणात पात्रांचे अंतरंग, मानसशास्त्र किती महत्त्वाचे आहे हे सांगितले आहे.

या पाश्चात्य दृष्टिकोनाबरोबरच भारतीय लेखक देवदत्त पट्टनायक यांचे फ्रॉइडच्या ‘ओडीपल कॉम्प्लेक्स’बद्दलचे भारतीय संदर्भातील विचारही मांडले आहेत. एकूणच ललितकला प्रकार हाताळताना हे दोन्ही दृष्टीकोन एक लेखक म्हणून ज्ञात असणे महत्त्वाचे आहे, असे इब्राहीम अफगाण लिहितात.

‘नायक म्हणजे काय?’ आणि ‘मिथकाची अद्भुत शक्ती’ ही दोन प्रकरणे अत्यंत रोचक आहेत. या दोन्ही प्रकरणांत जोसेफ कॅम्बल यांच्या ‘द हिरो विद अ थाउजंड फेसेस’ या पुस्तकाचा आधार घेऊन विवेचन केले आहे. येथे गटेच्या ‘फाउस्ट’ या शोकांतिकेचा आधार घेऊन स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग व अमेरिकन लेखक, साहित्याचे प्राध्यापक, अभ्यासक जोसेफ कॅम्बल यांनी आपले वैश्विक सांस्कृतिक भवताल स्थापित केले, असे अफगाण लिहितात.

‘मिथकाची अद्भुत शक्ती’ या प्रकरणात सगळ्या कथांची जननी ‘प्राक्कथा’ असून कथाकथनच्या उत्क्रांतीचा विचार मांडला आहे. कथा सांगण्याचा कित्येक हजार वर्षांपूर्वीपासून सुरु झालेला हा प्रवास आजही अविरत सुरूच आहे याबद्दल मार्मिक विवेचन यात आले आहे.

‘नायक म्हणजे काय’ या प्रकरणात लेखक लाजोस एगरी यांच्या ‘द आर्ट ऑफ ड्रॅमॅटिक रायटिंग’ या पुस्तकातील एक उदाहरण - अमर होण्यासाठी, कथेच्या रूपात त्यांनी दिले आहे ते अत्यंत विलक्षण आहे.

एकूणच, या पहिल्या भागातील प्रत्येक प्रकरणात विवेचन करताना इब्राहिम अफगाण अनेक उदाहरणे कथेच्या रूपात देतात. ती पुस्तकविषय समजून घेण्यासाठी मदत करतात.

दुसऱ्या भागात पुस्तकविषयाला प्रत्यक्ष हात घालताना ललितलेखनाच्या ‘मूळप्रकारा’चे विवेचन केले आहे. यात पात्रांच्या आठ प्रकारांबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. तत्पूर्वी पहिले प्रकरण आर्किटाइप्स/मूळरूपे तथा आदिबंध म्हणजे काय? यावर प्रकाश टाकते. कार्ल युंग म्हणतात त्याप्रमाणे आदिबंध हे प्रतिमा-प्रतीकाद्वारा आपल्या जाणीवेचा भाग होतात. पण म्हणून ही प्रतीक-प्रतिमा म्हणजे आदिबंध नव्हेत, तर त्यांना निर्माण करणारी प्रवृत्ती म्हणजे आदिबंध होय. अफगाण यांनी आदिबंधालाच ‘मूळरूपे’ म्हटले आहे. तसेच अभिजात मूळ प्रकारांकडे बघण्याचा एक सोपा मार्गही सुचवला आहे. अभ्यासासाठी रशियन परीकथातज्ज्ञ व्लादीमीर प्रॉप यांनी ‘मॉर्फोलॉजी ऑफ फॉकटेल्स’ या ग्रंथात कथांमधील पात्रे आणि आवर्ती नमुने यांचे केलेले विश्लेषण व त्यातून लेखक-पटकथाकार ख्रिस्तोफर वोग्लर यांनी काढलेले निष्कर्ष यांची माहिती दिली आहे. ती ‘मूळरूप’ विषय सुस्पष्ट करणारी आहे.

पात्राचा पहिला प्रकार म्हणजे ‘नायक’ हे प्रकरण असून त्यात मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विवेचन आलेले आहे. यात नायक या पात्राच्या विविध प्रकारांचीही चर्चा केलेली आहे. पुढील सात प्रकरणेदेखील याच धर्तीवर चर्चिली गेली आहेत. ती अशी आहेत : मेंटॉर/मार्गदर्शक, द्वारपाल, अग्रदूत (हेराल्ड), चालबाज (शेफशिफ्टर), सावली (शॅडो), सहयोगी आणि बहुरूपी (ट्रिकस्टर). सगळ्याच प्रकरणात मानसशास्त्रीय भूमिकेतून विवेचन आलेले आहे आणि प्रत्येक प्रकार हा विविध उपशीर्षक ठळकपणे मांडून सविस्तर चर्चिला आहे. त्यामुळे मूळरूप समजणे अधिक सोपे जाते.

‘पात्रनिर्मिती’ या शेवटच्या प्रकरणात कथा किंवा पटकथा लिहिताना पात्रनिर्मितीसाठी पात्राच्या भावावस्थेशी एकरूप होण्याचा सल्ला देत इब्राहीम अफगाण एकूणच पात्र निर्मितीबद्दल चर्चा करतात.

तिसरा भाग हा या पुस्तकातील सगळ्यात विस्तृत आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यातील सुरुवातीच्या सोळा प्रकरणांत वीरनायकाच्या धाडसी प्रवासाचे टप्पे सविस्तर चर्चिले गेले आहेत. जोसेफ कॅम्बल यांनी ‘हिरोज जर्नी’ या प्रकरणांत ज्याप्रकारे चर्चिली आहे, त्यावरून एक चांगली कथा किंवा पटकथा लिहिण्यासाठीचे हे खात्रीशीर प्रारूप आहे हे पटते. इथे छोट्या-छोट्या ठळक उपशीर्षकातून बरीच मौल्यवान माहिती दिलेली आहे. या भागाचा गोषवारा इतकाच आहे की, ‘हिरो मिथ’ ही ‘मोनो मिथ’ म्हटली जाते आणि ‘हिरो मिथ’चे प्रारूप कोणतीही साहित्यकृती व कलाकृती निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

‘अमृतासह परत’ या प्रकरणाचा उल्लेख स्वतंत्रपणे करणे गरजेचे आहे, कारण या प्रकरणात कथेतील नायकाच्या प्रवासाची क्लिष्टता आणि गरज ही येशू, श्रीकृष्ण, कमर-अल-जमान आणि तालिसीन यांच्या मिथक कथांचा आधार घेऊन स्पष्ट केली आहे. तसेच कथेच्या या प्रवासाचा शेवट होतो, तेव्हा एक वर्तुळ पूर्ण होते. या शेवटाचे  विविध प्रकार चर्चिले आहेत.

तिसऱ्या भागातील ‘मिथकातील उपसंहार’ आणि ‘मिथक, दंतकथा आणि स्वप्न’ या शेवटच्या दोन प्रकरणात हिंदू, जैन, बौद्ध तथा ख्रिश्चन दर्शन विचारातील विविध लोककथांची उदाहरणे देऊन मार्मिक चर्चा केली आहे; ती आकलनीय आणि पटणारी आहे.

तिसऱ्या भागाच्या शेवटी अफगाण लिहितात, “प्रायोगिक शास्त्राचे हस्तांतरण (उदा. सतराव्या शतकातील खगोलशास्त्रीय ते एकोणीसाव्या शतकातील जीवशास्त्रीय) अखेरीस मनुष्यावर (विसाव्या शतकातील मानववंशशास्त्र आणि मानसशास्त्र) एकाग्र झाले. हा एक विलक्षण ज्ञानयुक्त चिन्हांकित मार्ग असून ज्यायोगे मानव त्याच्या कुतूहलाचा केंद्रबिंदू बनला.” हेच या भागाचे सार आहे आणि पुढील काळातील कथाकथनाचा प्रवास आहे.

चौथा भाग (घाट भाग एक) हा रोनाल्ड टोबीयास यांच्या वीस घाटांचा सारांश आहे. या वीस घाटांवर वीस स्वतंत्र प्रकरणे आहेत. ‘घाट भाग एक’मध्ये प्रत्येक घाटाची कथेच्या स्वरूपात विविध उदाहरणे देत, त्यांची सविस्तर आणि रोचक चर्चा केलेली आहे. या भागातील काही प्रकरणांच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध उतारे/वाक्ये दिली आहेत, ती चोख व विषय सुस्पष्ट करणारी आहेत.

तर ‘पाचवा भाग’ (घाट भाग दोन) हा जॉर्ज पोल्टी यांच्या मूळ छत्तीस घाटांचा अभ्यास आहे. या छत्तीस घाटांवर छत्तीस स्वतंत्र प्रकरणे यात आहेत. यामध्ये प्रत्येक घाटाचे शीर्षक व त्याखाली त्यातील घटक ठळकपणे नमूद केले आहेत. प्रत्येक घटकासाठी अनेक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे एकूण घाट व त्याचा प्रत्यक्ष वापर हा विषय स्पष्ट होतो.

भाग चार आणि पाच हे प्रत्यक्ष लेखनाचे तंत्र सांगणारे आहेत, असे म्हणता येईल.

सहाव्या भागात काही उदाहरणे देऊन आतापर्यंत चर्चिले गेलेले ललितलेखनातील मूळ घटक आणि घाट अधिक योग्य रीतीने समजावून  सांगितले आहेत. यात उदाहरणादाखल एक कादंबरी, बारा चित्रपट व एक अॅनिमेशनपट घेतला आहे. सुरुवातीलाच उजळणीसाठी ‘हिरोज जर्नी’चे वर्तुळाकार चक्र काढले आहे. पुढे काही कलाकृतीतील नायकाच्या प्रवासाचे टप्पे नमूद करत वर्तुळाकार नकाशा काढून ‘हिरोज जर्नी’चे चक्र सविस्तर स्पष्ट केले आहे.  काही कलाकृतीतील हा नायकाचा प्रवास शब्दात पद्धतशीरपणे वर्णन केला आहे, तर काही कलाकृती या दोन्ही प्रकारे चर्चिल्या गेल्या आहेत. उदाहरणादाखल घेतलेला प्रत्येक चित्रपट हा वेगवेगळ्या जॉनरचा आहे. काही चित्रपट कादंबरीवर आधारित तर काही सत्य घटनेवर आधारित आहेत. एकूण उदाहरणांमध्ये फक्त ‘कोसला’ या एकाच कादंबरीचा दाखला दिला आहे. चित्रपटांप्रमाणे अजूनही काही कादंबऱ्यांचे दाखले दिल्यास वाचकांना ते नक्कीच आवडले असते.

भाग सात पूर्णपणे पटकथा लेखनासंबंधीचा आहे. यात पहिल्या प्रकरणात ‘हॉलिवुड फॉर्मुला वर्कशीट’ नमुना वापरून पटकथा कशी लिहावी, हे मुद्देसूदपणे सांगितले आहे. सोबतच रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. त्यामुळे हा नमुना कसा वापरायचा याचे प्रात्यक्षिक स्वतःच घेता येईल. हे या पुस्तकाचे वेगळेपण म्हणता येईल. केवळ माहिती पुरवून, संदर्भ देऊन, चर्चा करून, ग्रंथनिर्मिती न करता हे पुस्तक वाचन करत असलेल्या वाचकाला पटकथा लेखनासाठी उद्युक्त करणे आणि या नमुनारूपाने पटकथेत सुस्पष्टता कशी येते, हे दाखवून देण्याचा अफगाण यांचा प्रयत्न सफल होताना दिसतो.

सातव्या भागातील पुढील प्रकरणांत पटकथा लेखनाचे विविध स्तर, पात्रनिर्मिती प्रश्नावली, घाटांच्या मांडणीसाठी तपाससूची, पात्रांचे जीवनस्थितीचित्रण, व्यावसायिक चित्रपट लेखकांसाठी पाच आवश्यक तत्त्वे, पटकथेची तपाससूची अशी उपयुक्त तांत्रिक जंत्री दिलेली आहे.

या भागातील शेवटच्या प्रकरणात इब्राहीम अफगाण यांनी लाभ घेतलेल्या स्टीव्हन डिसोझा ह्या हॉलिवूडमधील अत्यंत यशस्वी पटकथाकाराच्या मास्टर क्लासमधील महत्त्वाच्या नोंदी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इतर पटकथा लेखनासंबंधीचे अनेक मुद्दे मांडले आहेत. थोडक्यात हे प्रकरण पटकथालेखकांसाठी लेखन तंत्र विकसित करण्यासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आहे.

‘भाग आठ’मधील उपसंहार आणि ‘भाग नऊ’मधील संदर्भसूची म्हणजे ‘चेरी ऑन द केक’ आहे.

‘भाग आठ’मधील उपसंहारात कार्ल युंगचा स्वप्नसिद्धांत, जगभरातील मिथक कथा, संस्कृती यांचा ऊहापोह आहे. इब्राहीम अफगाण यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर “आतापर्यंत चर्चिलेल्या नायकाच्या प्रवासाचे, त्याच्याभोवती जमणाऱ्या आणि त्याला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पात्रांचे, विविध घाटांचे, त्यातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अंकांच्या वैशिष्ट्यांचे, या तंत्राच्या वापराचे विश्लेषण केल्यावरही काही अखेरचे मुद्दे मांडावेसे वाटतात.” तेच या आठव्या भागात दिले आहेत.

अफगाण यांनी जोसेफ कॅम्बलची ‘हिरोज जर्नी’, रॉबर्ट मॅकी म्हणतो तसे कथा ही सिद्धान्ताविषयी आहे तो नियम नाही, जॉर्ज पोल्टीचे छत्तीस घाट, पात्रांची मूळरूपे, नायकाच्या प्रवासातील टप्पे यांचे जे विश्लेषण या पुस्तकात दिलेले आहे. त्यात आपण लेखक म्हणून अजून भर टाकायची आहे, असे सुचवले आहे. इथे मूळरूपाशी तादात्म्य पावलेली कथा वैश्विक होऊ शकते हे दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते संयुक्तिक वाटते.

या उपसंहारात अफगाण यांनी काही कवी आणि शायर यांच्या ओळींचे अवतरण दिले आहे. ते वाचताना बुद्धीला झळाळी आणि मनाला आनंद मिळतो ते विरळाच!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

सरतेशेवटी नवव्या भागात एक संदर्भ सूची दिलेली आहे. ती वाचताना लक्षात येते की, या अनेक संदर्भग्रंथांच्या बारा वर्षांच्या अभ्यासाचे फलित म्हणजे हे पुस्तक आहे. ललितलेखन करणाऱ्या नव्या-जुन्या सर्वच लेखकांसाठी ही सूची एका कल्पवृक्षासारखी आहे.

या पुस्तकातील एक ते नऊ भागातील मजकुराची थोडक्यात रूपरेषा दिल्यानंतर सारांशरूपाने म्हणता येईल की, मिथ्स या पूर्वापार चालत आलेल्या कथा किंवा कथानके आहेत. हजारो वर्षांपासून कथाकथनाचा प्रवास अविरत सुरू आहे. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पहिले तर या कथा आणि मानवी मन यांचा संबंध अतूट आहे. या मिथककथा मानवी जीवनाला आकार देतात. सिग्मंड फ्रॉईडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, इंद, अहं आणि अतिअहं हा त्रिस्तरीय सिद्धान्त, स्वप्नमीमांसा, कार्ल युंगचा आदिबंधाचा सिद्धान्त, स्वप्नस्पष्टीकरण सिद्धान्त, मिथ्स, आदिप्रतिमा यांचे सैद्धांतिक विवेचन, साहित्य-संस्कृतीमध्ये पुन्हा-पुन्हा अवतरणारे मुखवटा, छाया, अॅनिमस, अनिमा हे आदिबंध या सगळ्यांचा अभ्यास केल्यास कलात्मक आविष्कार आणि साक्षात्कारी अनुभव यांची प्रक्रिया लक्षात येते. एकमेकांपासून भौगोलिक अंतराने लांब असणाऱ्या, ऐतिहासिकदृष्टया ज्यांचा विकास वेगवेगळा आहे, अशा संस्कृतीतील साम्य मानववंशशास्त्र दृष्टिकोनातून समजून घेण्यास मदत होते. थोडक्यात लोकवाङ्मयाकडून उसनवारी घेऊन नाट्यवाङ्मय, कथावाङ्मय दृढ झाले आहे, हे निश्चित. तसेच कोणतीही कलाकृती ही अनुभव घेण्याची कृती असते. या अनुभवांची काही वैशिष्ट्ये असतात. त्यातील एक म्हणजे सेंद्रीय एकात्मता. या सेंद्रीयत्वाची संकल्पना सर्वप्रथम ॲरिस्टॉटलने वापरली. कलाकृतीच्या निर्मितीतील प्रत्येक घटक कलाकृतीच्या उत्तम बांधणीसाठी महत्त्वाचा ठरतो, तेव्हाच ती कलाकृती पूर्ण होते आणि या पूर्णाचा एकात्म संस्कार वाचकावर, आस्वादकावर किंवा प्रेक्षकांवर होत असतो, हे ध्यानात ठेवले असता कथेतील प्रत्येक घटकाची उत्तम बांधणी किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते.

तसेच या सर्व घटकांना एकत्रित बांधणारी तत्वे म्हणजेच कलाकृतीचा घाट किंवा आकृतिबंध यांना अन्यन्यसाधारण महत्त्व असते. आकृतिबंध म्हणजे कथेचा असा एक मूलघटक जो स्वतः स्वतंत्रपणे स्थिर राहू शकतो. अशा रीतीने स्थिर राहण्यासाठी त्यांच्यात कोणते तरी असाधारण तत्त्व असते. कथेच्या सर्वच घटकांना हे आकृतिबंध व्यापून असतात. कथाविशेषांमध्ये भिन्नता शक्य असते परंतु आकृतिबंधात एकात्मता असते. या आकृतिबंधांचा अनुक्रम किंवा सूची तयार करून त्याच्या मूळ स्वरूपात अभ्यास करता येतो. तसेच कलाकृतीतील कथेचा प्रवासही चढत्या भाजणीचा व उत्कंठावर्धक असणे गरजेचे असते.

जाता जाता इब्राहिम अफगाण यांनी दिलेले काही महत्त्वाचे सल्ले अधोरेखित करणे आवश्यक वाटते. ते सल्ले किंवा सूचना म्हणजेच; उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्तमानकाळातील कृत्रिम बुद्धिमत्तेशी स्वतःला जोडून घेणे, कोणताही एक भाग एकंदर कलाकृतीपेक्षा अधिक महत्त्वाचा नसतो हे ध्यानात ठेवणे, कथा किंवा पटकथा लिहिताना पात्र निर्मितीसाठी पात्राच्या भावावस्थेशी एकरूप होणे, जोसेफ कॅम्बल यांची ‘हिरोज जर्नी’ हे एक चांगली कथा किंवा पटकथा लिहिण्यासाठीचे खात्रीशीर प्रारूप आहे आणि मूळरूपाशी तादात्म्य पावलेली कथाच वैश्विक होऊ शकते हे होय.

शेवटी मीमांसक क्रोचे म्हणतो त्याप्रमाणे कलाकृती मानसिक असतात आणि प्रत्येक कलाकृतीचा घाट अनन्यसाधारण असतो हेच खरे!

या पुस्तकाची एक मर्यादाही आहे. ती म्हणजे या पुस्तकात ललितलेखनाचा रूपवादी, समाजशास्त्रीय, मार्क्सवादी इत्यादी भूमिकेतून पुरेसा (ओझरताही) अभ्यास झालेला दिसून येत नाही.

मराठी भाषेतून साहित्य आणि चित्रपट निर्मितीचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल यात शंका नाही. या ग्रंथाचा अभ्यासक्रमातही समावेश झाला पाहिजे. कादंबरी, चित्रपट, नाटक इत्यादी कथात्मक आणि नाट्यात्मक लेखनप्रकारात कथा लेखनाची ॲरिस्टॉटलच्या काळापासून पासून ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळापर्यंत मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून जी मार्गदर्शक तत्त्वे, सिद्धांत यात मांडली आहेत ती ललितलेखन कला शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी आहे.

ललितलेखन करणाऱ्या लेखकांसाठी हा मौल्यवान संदर्भग्रंथ आहे.

‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ - इब्राहीम अफगाण

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई | पाने – ६३३ | मूल्य – ३१४ रुपये.

.................................................................................................................................................................

शिल्पा द. गंजी

shilpagg72@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......