अजूनकाही
ज्येष्ठ कथा-कादंबरीकार अविनाश कोल्हे यांची ‘कन्या झाली हो...’ ही चौथी कादंबरी लवकरच संधिकाल प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या कादंबरीला कोल्हे यांनी लिहिलेली ही वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका...
.................................................................................................................................................................
एके काळी ‘अफाट खपाचं डार्लिंग विकली’ असलेल्या ‘साप्ताहिक मनोहर’ला कृतज्ञतापूर्वक अर्पण.....
मी जरी १९७३ साली पुणेकर झालो, तरी त्याआधीपासून मला वाचनाची गोडी लागली होती. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावला शिकत असताना ‘महाराष्ट्र टाईम्स’ची रविवार पुरवणी (साहित्य, कला, राजकारण) म्हणजे माझ्यासाठी मुंबई-पुण्यातल्या साहित्यिक-सांस्कृतिक घटनांकडे बघण्याची खिडकी! पुण्यात आल्यावर या खिडकीचं दार मोठं झालं. पुण्यातली वसंत व्याख्यानमाला, पुण्यातल्या ‘मॅजेस्टिक’ गप्पा, फर्ग्युसनची वाडिया लायब्ररी, त्याच्या शेजारी असलेलं ब्रिटिश कौन्सिलचं ग्रंथालय वगैरे मला उपलब्ध झाले.
खास उल्लेख करण्याजोगी बाब म्हणजे माझा मोठा भाऊ अशोक ‘साप्ताहिक मनोहर’चा वर्गणीदार होता. मी ते मन लावून वाचत असे. या साप्ताहिकाने माझं पुण्यातलं वास्तव्य आणि महाविद्यालयीन जीवन फार सुकर केलं. विदर्भातल्या खामगावहून थेट फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झालेला मी. तेव्हा अखिल पुण्यात माझा एकही मित्र नव्हता. ज्याची पहिली पिढी कॉलेजात दाखल होत आहे, अशा माझ्यासारख्या ब्राह्मणेतर मुलाच्या मनात ‘मनोहर’च्या वाचनामुळे कधीही न्यूनगंड निर्माण झाला नाही.
दत्ता सराफ ‘मनोहर’चे कार्यकारी संपादक होते. तेव्हा या साप्ताहिकाची टॅगलाईन होती- ‘अफाट खपाचं डार्लिंग विकली’. संपादकांनी कोठेही जरी असं म्हटलं नसलं, तरी ते पुण्या-मुंबईच्या तरुणाईचं साप्ताहिक होतं. त्याच्या नियमित वाचनामुळे मी पुण्यात फार लवकर रूळलो आणि रमलो.
मला साहित्य, नाटक, सिनेमांची फार आवड. ‘मनोहर’मध्ये मराठी नाटकांची समीक्षा करणारं ‘तिसरी घंटा’ हे सदर येई. त्याच्या १ एप्रिल १९७३च्या अंकात ‘सावल्या नसलेली माणसे’ या नाटकाच्या परीक्षणात उपशीर्षकातील वाक्य आहे- ‘समर्थ नाटके कुठे आहेत?’ (हा प्रश्न २०२५मध्येसुद्धा विचारता येतो). नाटकाबद्दल खास उल्लेख करावा असा मजकूर म्हणजे ‘प्रिय श्री. दत्ता सराफ’ म्हणत माधव वझेंचं ‘घाशीराम कोतवाल’बद्दल लिहिलेलं अनावृत दीर्घ पत्र.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘मनोहर’च्या मुखपृष्ठकथा हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. या मुखपृष्ठकथांतून माझ्यासमोर पुण्यातल्या तरुणाईचं जग उलगडत गेलं. मात्र एका मुखपृष्ठकथेनं मला जबरदस्त धक्का दिला होता. ‘धुंद आणि बेभान रात्रींची अति-स्नेह-यात्रा’ ही जानेवारी १९७३च्या अंकाची मुखपृष्ठकथा, उदय गोखलेने लिहिलेली. लोणावळाजवळच्या मळवलीला मुंबई-पुण्यातले तरुण-तरुणी कसे दोन-तीन दिवस-रात्र एकत्र आले, त्यांनी बिहार-सिगरेटी-गांजा ओढला, मुक्त संभोग केला वगैरे माहिती या मुखपृष्ठकथेत होती.
मळवलीच्या या यात्रेमागे तेव्हा पुणेनिवासी असलेल्या आचार्य रजनीशांची प्रेरणा होती. ही स्नेहयात्रा आयोजित करण्यामागे मुंबईचा क्लॉड अल्वारिस नावाचा तरुण होता वगैरे माहिती मिळाली. (नंतर १९८५च्या आसपास याच अल्वारिसने प्रीतिश नंदीच्या ‘इलस्ट्रेटेड विकली’मध्ये ‘ऑपरेशन व्हाईट लाय’ अशी मुखपृष्ठकथा लिहून ‘अमूल’ दुधाच्या कारभारावर टीका केली होती).
‘मळवलीची स्नेहयात्रा’ ही मुखपृष्ठकथा वाचून मी नखशिखान्त हादरलो. तेव्हा मी अवघा सतरा वर्षांचा होतो. तेव्हाच्या पुण्याच्या भाषेत सांगायचं तर ‘ओठ पिळले, तर चारमिनारचा धूर बाहेर येईल’ इतका कोवळा!
याच अंकात ‘कुतूहल’ या सदरात ‘सल्लागार’ने ‘समलिंगाकर्षण ही मानसिक विकृती, वैद्यकीय सल्ला मोकळेपणाने घ्या!’ असं आवाहन केलं होतं. तेव्हा समलिंगी आकर्षण वगैरेबद्दल काहीही माहिती नव्हतं. २०२५ साली हे वाचताना गंमत वाटते. ‘समलिंगी आकर्षण ही विकृती नाही’ असं आजचं वैद्यकीयशास्त्र सांगतं.
‘मनोहर’च्या काही मुखपृष्ठकथांची शीर्षकं आजही आठवतात ‘तरुणींना हवासा वाटणारा पण न ‘सापडणारा’ बॉयफ्रेंड’, ‘मारुतीची शेपटी ते पदमा खन्ना = होस्टेल’ ही मुलांच्या होस्टेलबद्दलची कव्हर स्टोरी, ‘आधुनिक तरुणी : परंपरागत व्रतवैकल्ये’ (ही शिकलेल्या मुलींची द्विधा अवस्था टिपणारी मुखपृष्ठकथा), ‘रोडसाईड रोमिओ’, ‘शैक्षणिक क्रांतीची वाटचाल : अयशस्वी प्राध्यापक हटाव!’, ‘पिकनिक : एक सुहाना सफर’, ‘पोरींनी लाजणे पोरांना धमाल आवडते!’, ‘कुढणाऱ्या मुली, बागडणाऱ्या मुली, उंडारणाऱ्या मुली... गर्ल्स होस्टेल’.... अशा अनेक मुखपृष्ठकथांमुळे मला पुणं सापडत गेलं… आणि मी लवकर पुणेकर झालो.
या साप्ताहिकातलं सुभाष भेंडेंचं ‘सूप आणि शँपेन’ हे साहित्यविश्वातील घटनांवर खुसखुशीत टिपण्णी करणारं सदर तर माझ्या खास आवडीचं. पुढे भेंडेंनी ‘ललित’मधून ‘अलाणे-फलाणे’ हे सदर लिहिलं. मात्र मला माझ्या साहित्यविश्वाच्या तेव्हाच्या अज्ञानापायी भेंडेंच्या सदरातील अनेक टोमणे समजत नसत. त्यांनी एकदा ‘आम्ही खर्डेघाशे… सारस्वत हरी’ असा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी नाडकर्णी, दळवी, तेंडुलकर, पिंगे, वरेरकर वगैरे सारस्वतांनी कशा साहित्यक्षेत्रातल्या जागा आणि सन्मान अडवून ठेवले आहेत, त्यामुळे शरदच्चंद्र चिरमुले, विद्याधर पुंडलिक वगैरे लेखक कसे नाराज असतात, यावर मस्त कोपरखळ्या मारल्या होत्या. तोपर्यंत मला ‘देशस्थ’ आणि ‘कोकणस्थ’ या ब्राह्मणांच्या दोनच पोटजाती माहिती होत्या. जीएसबी, कऱ्हाडे ब्राह्मण, देवरुखे ब्राह्मण वगैरे पोटजाती, त्यांच्यातल्या स्पर्धा, रागलोभ, हेवेदावे वगैरेंबद्दल मला काहीही माहीत नव्हतं.
माझ्यासाठी ‘मनोहर’चं खास आकर्षण म्हणजे देवयानी चौबळचं ‘चंदेरी चुईंगम’ हे सदर. तोपर्यंत मी सिनेमांबद्दल ‘मटा’ची रविवार पुरवणी, ‘रसरंग’ वगैरेमध्ये वाचायचो. ते लिखाण आणि देवयानी करत असलेलं लेखन, हे दोन ध्रुव होते. ऐन टॉपवर असलेल्या राजेश खन्नाला तिने ‘काला मांजा’ असं टोपणनाव दिलं होतं! ती करत असलेल्या सिनेमातल्या लोकांच्या पार्ट्यांची वर्णनं तर केवळ अप्रतिम! तिच्या लिखाणासोबत इतर कोठेही सहसा बघायला मिळणार नाहीत, अशी छायाचित्रं. एका छायाचित्रात उत्तान कपडे घातलेली रेखा एका मित्राच्या मांडीवर बिनधास्त बसलेली होती. झीनत अमानच्या छायाचित्राखाली ‘झीनत अमान याने के एक्सप्रेसो कॉफी’ असं छापलं होतं. (तेव्हा मला एक्सप्रेसो कॉफी ऐकूनसुद्धा माहिती नव्हती!).
एप्रिल १९७३च्या अंकात ‘चेतना’ या तेव्हा वादग्रस्त ठरलेल्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची दणदणीत मुलाखत होती. या मुलाखतीचं स्वरूप अफलातून होतं- ‘प्रश्न वाचकांचे.. उत्तरे बी. आर. इशारांची’. यात वाचकांनी अनेक प्रश्न विचारले होते. ‘हिंदी चित्रपटांवर बंदी घातली, तर तरुणांच्या वर्तनात सुधारणा होतील का?’ या प्रश्नावर ‘अजिबात नाही. दारूबंदी होती, तेव्हासुद्धा लोक दारू पित होते.’ असं उत्तर दिलं. ‘तुम्ही ‘न्यू वेव्ह’चे दिग्दर्शक आहात की ‘न्यूड वेव्ह’चे?, ‘ ‘चेतना’चं दिग्दर्शन करताना रेहानाच्या फाकलेल्या तंगड्यातून तुम्हाला नेमके काय दाखवायचे होते?’, ‘त्या दृश्याचे किती रिटेक घेतले?’ वगैरे इरसाल प्रश्नांना इशारांनी तशीच इरसाल आणि बेधडक उत्तरं दिली.
या सदरांच्या जोडीला अशोकबाबूचं ‘चित्रचक्कर’ हे सिनेपरीक्षणांचं सदर, ‘ये है बम्बई मेरी जान’ हे ओ नीलचं सदर वगैरे अतिशय वाचनीय मजकूर असायचा. काही अंकांत तर इंग्रजी सिनेमांबद्दल लेख असायचे. मला अजून आठवतं ते ‘लास्ट टॅगो इन पॅरिस’ या मार्लन ब्रॅडोच्या चित्रपटाचं परीक्षण. तेव्हा मला नुकतीच पाश्चात्य चित्रपटांची आवड लागली होती. त्या संदर्भात अशी परीक्षणं फार गरजेची होती.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
‘मनोहर’च्या जवळपास सर्व अंकांच्या शेवटच्या पानावरचं ‘दोस्त हो’ हे एक प्रकारचं संपादकीय असायचं. ‘दोस्त हो’ नेहमी ठसठशीत पुरोगामी भूमिका घेत असे. याचे माझ्यावर संस्कार होत होते. ‘मंदिरांचे बांधकाम’ हा विषय आताप्रमाणेच तेव्हासुद्धा चर्चेत होता. ‘दोस्त हो’मध्ये ‘बांधकाम : मंदिराचे आणि मनाचे!’ या संपादकीयात यशवंतराव चव्हाण यांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार मूहुर्तप्रसंगी केलेल्या भाषणाचा सणसणीत समाचार घेतला होता. तसेच ‘झिंदाबाद! मुर्दाबाद!’ या ‘तरुण तुर्क’च्या सदरात ‘चातुर्वण्याच्या पुरस्काराचा धिक्कार असो!’ अशी खणखणीत पुरोगामी भूमिका घेतली होती. अशा वाचनामुळे माझी पुरोगामी भूमिका आकार घेत होती.
‘मनोहर’चा उल्लेखनीय भाग म्हणजे ‘संपादक महाशय’ हा वाचकांचा पत्रव्यवहार. फार पुढे वृत्तपत्र / नियतकालिकांतील वाचकांचा पत्रव्यवहार म्हणजे ‘A Nation talking to itself’ असं म्हणतात, हे समजलं. ‘संपादक महाशय’मध्ये व्यक्त होणारी तरुण-तरुणींची मतं मला वेगळ्या आणि आता माझं होत असलेल्या जगाचं दर्शन घडवत होते. ‘तरुणींना हवासा वाटणारा, पण न मिळणारा बॉयफ्रेंड’ या मुखपृष्ठकथेवरच्या पत्रव्यवहाराने मला समकालीन तरुणींच्या भावविश्वाचं वेगळं दर्शन घडवलं.
‘मनोहर’ने दिलेली ही जबरदस्त सामग्री घेऊन मी पुण्यामध्ये वावरत होतो. त्यामुळे मला फार लवकर माझा आवाज तर सापडलाच, पण तितक्याच लवकर चढायलासुद्धा लागला. पुण्यातल्या सुरुवातीच्या काळात मला जवळचे मित्र नव्हते. ‘साप्ताहिक मनोहर’ माझा मित्र झाला. जीवाभावाचा मित्र. वयाने मोठा असलेला मित्र, ज्याचं बोट पकडून मी पुण्यात सेटल झालो… अनेक अर्थानं.
‘कन्या झाली हो’ - अविनाश कोल्हे
संधिकाल प्रकाशन, मुंबई | पाने - २८० | मूल्य - ३२५ रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment