प्रवाही भाषा, अर्थपूर्ण निवेदन, यामुळे ‌‘पटयारा‌’ थेट काळजाला भिडतं… आणि वाट्याला येणाऱ्या जगण्याकडं कसं बघावं, याची दिशाही दाखवतं….
ग्रंथनामा - झलक
विलास पाटील
  • ‘पटयारा‌’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 12 April 2025
  • ग्रंथनामा झलक पटयारा‌ Patyara संतोष नागो शिंदे Santosh Nago Shinde

परिस्थितीशी जुळवून घेत प्रतिकूलतेवर मात करण्याचा प्रयत्न करणारी माणसं स्वत:ची नवी वाट निर्माण करत जगणं अर्थपूर्ण बनवतात. त्याचं प्रतिबिंब म्हणजे ‘पटयारा' हे आत्मकथन. ‘पटयारा’ नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालंय. त्याला पत्रकार विलास पाटील यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

जे वय खेळण्या-बागडण्याचं असतं ते वय लहान मुलांना घराची, आई-वडिलांची, आपल्या भविष्याची चिंता करायला भाग पाडत असेल, तर त्याच्या भोवतालच्या पर्यावरणात काही बिघाड आहे असं समजलं पाहिजे. अर्थात हे ज्यांना समजायला हवं, ते पालकच ते समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसतील किंवा अविवेकाने वागत असतील, तर त्यांच्या लहान मुलांना अकाली प्रौढत्व आल्याशिवाय राहत नाही. हा परिस्थितीच्या रेट्याचा परिणाम असतो. हा परिस्थितीचा रेटा एवढा तीव्र असतो की, अकाली प्रौढत्व आलेली अनेक मुलं त्याखाली दबून जातात. म्हणजे परिस्थितीला शरण जात मिळालेलं आयुष्य रडत-खडत जगत राहण्यापलीकडे किंवा कुणाला तरी दोषी ठरवत वाट्याला आलेलं दु:ख कवटाळत बसण्यापलीकडे ती काही करू शकत नाहीत. परिणामी आयुष्याची परवड ठरलेली असते.

अर्थात काही वेळेला असं अकाली आलेलं प्रौढत्व मुलांना सुजाण, सजग बनवतं. त्यातून अशा मुलांमध्ये परिस्थितीशी तडजोड न करता तिला वाकवण्याचा मनोनिग्रह येतो, आत्मबळ वाढते. त्याच जोरावर ही मुलं मग अडथळ्यांची शर्यत पार करत परिस्थितीशी संयतपणे झगडतात आणि आत्मसन्मान, स्वाभिमान, माणुसकी यासह कौटुंबिक जीवनाला संपन्न, सुखी बनवतात.

‌‘पटयारा’ हे आत्मकथन वाचताना संतोष शिंदे यांच्या वाट्याला आलेला अत्यंत खडतर असा प्रवास त्यांनी निग्रहाने आणि तितक्याच संयमाने पार केलेला दिसतो. या त्यांच्या प्रवासात अनेक ठिकाणी धोक्याची वळणे होती, पाय घसरण्याच्या निसरड्या जागा होत्या आणि तोल सुटण्याची शक्यता वाढवणारेही अनेक प्रसंग त्यांच्या वाट्याला आले. पण दरदिवशी अस्थिरता, अनिश्चितता वाढवणारी ही कठीण वाट ते निर्धाराने पण शांत चित्ताने, सारासार विवेकबुद्धीचा वापर करून चालले आणि स्थैर्य, आत्मसन्मान देणाऱ्या एका टप्प्यावर पोचले. हे सुजाणपणा आणि सजगता याशिवाय घडलं नसतं. अकाली आलेल्या प्रौढत्वाने संतोष शिंदे यांना सुजाण, सजग बनवलं होतं. मुख्य म्हणजे हे सुजाणपण त्यांच्यात वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच आलेलं दिसतं. ते बहुदा त्यांच्या आईकडून आलेलं असावं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

व्यसनी नवऱ्यामुळे संसाराचा गाडा एकटीला ओढावा लागत असल्याने परिस्थिती अत्यंत हलाखेची होती. हाताखाली येऊ घातलेल्या थोरल्या मुलाने हॉटेलात, दुकानात किंवा कुठंही काम बघावं आणि आईला दोन पैशाची मदत करावी, अशी अपेक्षा ओळखीतले, नात्यातले लोक बोलून दाखवायचे. त्याकडे दुर्लक्ष करत आई आपल्या मुलाचं नाव शाळेत घालण्यासाठी धडपडत असते. आपली मुलं शिकली पाहिजेत, ही जी तिची भावना आहे, ही एका शहाणपणातून, सुजाणपणातून आलेली आहे, हेही अगदी स्पष्टपणे हे पुस्तक वाचताना आपल्या समोर येतं.

आईची ती धडपड पाहून लहानग्या संतोषच्या मनात, ‌‘तिच्याकडे माझ्या जन्माचा दाखला नाही, पैसे नाहीत आणि शाळेत नाव घालण्याची काही माहितीही नाही. मग मला शाळेत घालण्याचं काम आई कसं तडीस नेणार कोण जाणे!‌’, हा विचार येतो. हे शहाणपणाचंच लक्षण आहे.

हा सुजाणपणा पुढे आणखी प्रगल्भ होत जातो. म्हणजे आईला आपल्या मदतीची गरज आहे आणि शाळा करता करता आपण काही केलं पाहिजे असं त्याला तीव्रतेनं वाटू लागतं आणि तो सकाळी सकाळी पेपर टाकण्याचं काम करून खारीचा वाटा म्हणून स्वकमाईचे दोन पैसे आईच्या हाती देऊ लागतो. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतल्यापासून सुरू झालेला हा त्याचा संघर्ष कॉलेजचं शिक्षण पूर्ण करेपर्यंत सुरू राहतो. विशेष म्हणजे तो ही लढाई अत्यंत निर्धाराने लढतो.

आयुष्यात वाट्याला आलेल्या या संघर्षाचं, तो कमी व्हावा म्हणून कराव्या लागणाऱ्या धडपडीचं जे काही कथन लेखकाने केलं आहे, ते अत्यंत ओघवतं आणि मनाला भिडणारं आहे. किंबहुना त्यांनी जपलेलं शुद्ध, निर्मळ, नितळ असं पटयारापण आपणही अंगीकारायला हवं, असं वाचकालाही वाटायला लागतं. हे या आत्मकथनाचं वैशिष्ट्य आहे, नव्हे ते या कहाणीचं शक्तिस्थान आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

अर्थात आपल्याला अपेक्षित असलेली गोष्ट नीतीने मिळवण्यासाठी स्वाभिमान बाजूला ठेवत, अपमान सहन करत जो निगरगट्टपणा, कोडगेपणा अंगी बाळगावा लागतो, त्यासाठी खूप मोठं धैर्य आणि तितकाच संयम अंगी असावा लागतो. तो मात्र संतोष शिंदे यांनी उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या आव्हानांतून आणि त्याला जोड दिलेल्या ग्रंथवाचनातून मिळवला आहे, याचा प्रत्यय आपल्याला हे आत्मकथन वाचताना जागोजागी येत राहतो. इतकंच नाही, तर जीवनात येणाऱ्या बऱ्या-वाईट अनुभवांचं संचित योग्य प्रकारे उपयोगात आणलं आणि वाचनातून वाढणारी वैचारिक भूक भागवण्यासाठी ‌‘भूत-भविष्य‌’ अशा खुळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत ग्रंथालयांना आपलंसं केलं, तर माणूस अनेक अंगाने समृद्ध होत जातो, याचंही भान हे आत्मकथन वाचकांना देऊन जातं.

अभागी बालपणापासून सुरू होणारी ही कथा उत्तरोत्तर एका सजग, समृद्ध होत जाणाऱ्या युवकाची होत जाते. त्याचं कारण नवं ज्ञान आत्मसात करण्याची तळमळ आणि त्या तळमळीतून होणारं अफाट वाचन हे आहे. संतोषला जसं वाचायला येऊ लागलं तसं तो काही ना काही वाचत गेला. मग वाचनाची भूक वाढत गेली. त्यावर तोडगा म्हणून ग्रंथालयाची वर्गणी त्याने स्वकमाईतून भरली. शाळा आणि कामाच्या वेळा सांभाळत उरलेला बहुतांश वेळ तो ग्रंथालयात घालवू लागला. मित्रांच्या आग्रहाखातर ‘संघशाखा’ आणि ‘स्वाध्याय परिवार’ अशा दोन ठिकाणी तो गेला, पण त्यातला फोलपणा लक्षात येताच पुन्हा तो ग्रंथालयाकडे वळाला. अनेकदा शाळेला सुटी असायची. हातात कुठलं काम नसायचं.

अशा काळात तो संपूर्ण वेळ ग्रंथालयात घालवी. दुपारच्या वेळी ग्रंथालय बंद असायचं. त्या वेळी कुठल्यातरी मंदिरात, पारावर बसून हा गडी वाचलेल्या पुस्तकांवर चिंतन करत बसायचा. या चिंतनाने त्याला परिस्थितीचं अधिक चांगलं आकलन होत गेलं. म्हणूनच असेल कदाचित त्याने या संपूर्ण आत्मकथनात हतबलता आणि अगतिकता वाढवणाऱ्या परिस्थितीसाठी कोणाला दोषी ठरवलं नाही. उलट समोर आलेल्या प्रसंगाशी, परिस्थितीशी सामना करत त्यातून चांगला मार्ग काढण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यातूनच संतोष शिंदे यांच्यातला तरुण सजग, समृद्ध बनत गेलेला दिसतो.

आपले वडील दारूच्या आहारी गेले आहेत. पगार हाती पडला की, तो संपेपर्यंत ते घराकडे फिरत नाहीत. घराकडे, कुटुंबाकडे होणारं त्यांचं दुर्लक्ष आईचा ताण वाढवतं. घरी ते पिऊन आले, तर तमाशा करतात, आईला मारझोड करतात. असे अनेक प्रसंग डोळ्यासमोर घडत असतानाही संतोष कुठलीच टोकाची प्रतिक्रिया देत नाही. कारण नशेत नसतात, तेव्हा ते एक चांगला नवरा, चांगला बाप आणि एक चांगला माणूस असतात, हेही त्याने पाहिलेलं आहे. त्यांना मनापासून दारू सोडायची असते. ते त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही करतात. अनेकदा दोन-दोन, तीन-तीन महिने दारूला स्पर्शही केलेला नसतो. या काळात आर्थिक परिस्थिती तशी हलाखीची असूनही कुटुंब आनंदात असतं, पण हाच आनंद काहींना सहन होत नाही. भोवतालच्या काही लोकांना ते बघवत नाही आणि मग पुन्हा पहिल पाढे पंचावन्न सुरू होतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

हा जो काही भोवताल आहे, त्याचंही एक वेगळं चित्रण या आत्मकथनातून येतं. त्यामुळे ही कहाणी एका कुटुंबाबरोबरच त्याच्या भोवतालाचीही आहे, हेही स्पष्टपणे आपल्यासमोर येतं. आणि त्याच बरोबरीने आपल्याला आणखी एका नाजूक धाग्याची जाणीव होते. तो म्हणजे परिस्थितीच्या जोखडाखाली कोणीही अडकलेला असो, समाज त्याची वेळी-अवेळी अडवणूक करतोच करतो. त्यासाठी दलित, पददलित, वंचित, उपेक्षित असण्याची गरज नसते. परिस्थिती अनुकूल नसणाऱ्या सवर्णांच्या वाट्यालाही ते दु:ख येतं. तुलनेनं त्याची तीव्रता कमी असेल, पण समाज नडलेल्यांना संधी मिळेल तेव्हा अधिक नडवतो, उघडा पाडतो, रस्त्यावर आणतो. हे एक समाजसूत्र या कथनातून ठळकपणे पुढे येतं.

ते सावकारीच्या विळख्यातून जसं पुढे येतं तसंच ते कामगारांचे हक्क, ते नाकारून केला जाणारा अन्याय आणि मग त्याविरुद्ध पुकारलेला लढा यातूनही पुढे येतं. या सगळ्यातून बाहेर पडताना कायदा, नैतिकता पाळत संयमानं मार्ग काढताना मार्गदर्शक म्हणून संतोष शिंदे यांनी वाचलेले गांधीजी वेळोवेळी पुढे येतात. म्हणजे ‌‘या परिस्थितीत गांधीजींनी काय केलं असतं?’ असा प्रश्न ते स्वत:लाच विचारतात आणि गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावरून निर्धास्तपणे चालत राहतात.

अशा वेळी त्यांना त्यांच्या आईचंही एक वाक्य सतत आठवत राहतं. ते म्हणजे, ‌‘हे पाय संतोष, आता उखळात डोकं टाकलंच हे ना तर व्हऊ दे जे व्हईन ते. बाकीचा इचार नको करू. मनापासून कर जे भी करशीन ते. बाकी नेतीवर सोड सगळं.‌’ या वाक्यानं त्यांना अनेक प्रसंगात वेळोवेळी बळ देण्याचं काम केलं आहे. त्याच बळावर त्यांनी पटयारापण जपत हा प्रवास केला आहे. तो मुळातून वाचला पाहिजे.

सातत्यपूर्ण असणारी हतबलता आणि अगतिकता यातून वाट्याला येणारं दु:ख प्रचंड मोठं असतं. पण त्याचं कुठेही उदात्तीकरण नाही ना कुठला अभिनिवेश बाळगलेला आहे. तरीही जगण्याच्या उत्कटतेतून आलेली प्रवाही भाषा, सच्चेपणातून आलेलं अर्थपूर्ण निवेदन, यामुळे संतोष शिंदे यांचं ‌‘पटयारा‌’पण थेट काळजाला भिडतं आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या जगण्याकडं कसं बघायला हवं, याची एक दिशाही दाखवतं.

‘पटयारा’ - संतोष नागो शिंदे

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - २८८ | मूल्य - ४३० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......