अजूनकाही
नमस्कार! भारत माता की जय!! मेरे प्रिय एक सो चालीस करोड भारतवासीयों… काय कसे आहात? बरे आहात ना? असणारच. माझ्या राज्यात बरे नसून कसे चालेल बरे? उगाच वाटेत भेटल्यावर औपचारिक विचारतात तसे विचारत नाही हां मी. मनापासून विचारून राहिलो आहे मी. बघा! नागपुरात आल्याबरोबर नागपुरी भाषा शिरली पोटात. आता मी जे बोलून राहिलो ना, ते फक्त तुमच्यासोबतच बरे का. दुसऱ्या कोणालाही सांगू नका. असे मी पहिल्यांदाच सांगतो आहे. आपले बोलणे खूप लोक ऐकत आहेत हे बोलता बोलता बघणे ही फार सुखाची गोष्ट असते. गेली चार दशके मी हे सुख भोगत आहे. तुम्ही म्हणाल की, ‘पॉलिटिकल सीन’वर तर तुमचे आगमन होऊन पंचवीस वर्षेच झाली आहेत, मग चाळीस कशी? पुन्हा तुमची थापेबाजी सुरू झाली वाटते! अहो, नाही. तसे काही नाही. थापा मारायला मी काय येडाबिडा लागून राहिलो काय… मला समजते कधी काय बोलायचे ते…
तर हां, मी हे सांगायला तुम्हाला बोलावले की, ‘आलय’ म्हणजे काय तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही जे उत्तर द्याल ते मलाही माहीत आहे, पण खात्री करवून घेऊ म्हणून तुम्हाला विचारले. मला सांगा, ‘आलय’ म्हणजे घर ना? ‘देवालय’ म्हणजे देवाचे घर. ‘हिमालय’ म्हणजे जिथे हिम असते ते हिमाचे आलय. झालेच तर ‘वाचनालय’, ‘पुस्तकालय’, ‘ग्रंथालय’ या शब्दांचा अर्थ म्हणजे ज्या जागी पुस्तके राहतात ते ‘ग्रंथालय’. जिथे बसून वाचन करतात ते ‘ग्रंथालय’. आणखी उदाहरण द्यायचे तर ‘सचिवालय’, ‘न्यायालय’, ‘विद्यालय’, ‘रुग्णालय’, ‘औषधालय’ या चांगल्या गोष्टींची घरे जशी असतात, तसे जिथे मद्य मिळते, ते ‘मद्यालय’. म्हणजे वाईट गोष्टींनासुद्धा घर आहे आपल्या भाषेत.
मग याच लयीने नेत्रांचे घर ते ‘नेत्रालय’ असे म्हटले, तर माझे चुकणार नाही, असे मला वाटते. थोडक्यात, डोळ्यांचे घर म्हणजे ‘नेत्रालय’ असे मला समजले. मग दातांच्या दवाखान्याला दंतालय म्हणायचे काय? हृदयविकार झालेल्यांना ‘हृदयालया’त जावे लागते का? किंवा ज्या माणसांना पोटाचे रोग झाले आहेत, त्यांनी ‘उदरालया’त जावे आणि ज्यांना त्वचेचे विकार झाले त्यांनी त्वचालयात जावे असे ठरवायचे का? नेत्रालयाच्या धरतीवर ‘कर्णालय’सुद्धा शोभेल ना?
माफ करा, मी विनोद करीत नाही. तुम्ही जाणताच मी किती कडक, कठोर, शिस्तीचा अन कामाचा माणूस आहे ते. चांगले १८ तास काम करतो मी. म्हणजे कोणी उगाच लुडबुडले तर मी सांगायला सांगतो की, साहेब कामात आहेत आणि असतात. देशी सेवा म्हणजे घड्याळ लावून करता येत नसते ती. मला वाटले हे नागपूरकर, मराठी चांगली जाणत असतील, नेत्रालयाचा अर्थ म्हणजे जिथे नेत्र असतील तेच ना? किंवा नेत्र बघायला मिळतील अथवा संग्रहालयासारखा नेत्रांचा साठा तिथे राहील, असे त्याचे अर्थ होतील ना?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हे महाराष्ट्र सरकारचे लोकही चक्रमच दिसतात. जिथे मंत्री बसतात त्या जागेला मंत्रालय म्हणून त्यांनी जाहीर करून टाकले. अहो, मंत्र जिथे वास्तव्य करतात ते मंत्रालय असा सहजसोपा अर्थ होईल ना त्याचा? सरकारी लोक हा जो बदल करीत होते, तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हयात होते. त्यांनी ही चूक लक्षात आणून देत सुचवले की, व्याकरणानुसार मंत्र्यालय असे रूप होईल. पण नाही. सरकारी बाबूच ते. त्यांनी तर्कतीर्थ टोपलीत टाकून दिले, तिथे त्यांच्या सूचनांचे काय?
काय सांगू तुम्हाला? हे सारे मी मोहनरावांशी बोललो.
ते म्हणाले, ‘‘नरुभाऊ, एवढे सगळे उभे केलेले काम पाहून आता त्यामध्ये एवढीशी खोट शोधून काढणे ठीक नाही. नेत्रालय तर नेत्रालय! डोळ्यांवर उपचार करवून घ्यायला आलेल्या लोकांना नावाशी काय मतलब? जिथे कमी पैसे लागतात, तिथे लोक जात असतात. आपण नाही का पक्षात घेतो ते लोक कोठून आले, का आले, तेवढेच बघत? आपण इतक्या फालतू लोकांना घेतले की, आपलेच लोक विचारत होते, काय डोळ्यांवर पट्टी बांधून पक्षात प्रवेश देता की काय या चोरांना? म्हणजे आपल्यालाच नेत्रालयाची गरज आहे असे सुचवतात आपले लोक. बाय द वे, हे नेत्रालयाबद्दल काय म्हणत होता तुम्ही?’’
या प्रश्नावर मी नेहमीप्रमाणे स्पष्ट बोलणे टाळले. उगाच पुन्हा संबंध बिघडले, तर मला परवडणार नाही ते. गमतीगमतीत मग मी म्हटले, नेत्रालय म्हणजे दिव्यदृष्टीचे संग्रहालय होणार असे दिसते…
बहुधा माझ्या बोलण्यातली खोच मोहनरावांच्या लक्षात आली. ते म्हणू लागले, “काही माणसांना काँग्रेसवर सारे दोष ढकलून द्यायची सवय लागली आहे तसेच हे. तुम्ही म्हणजे आपण सारेच शौच करायला जातो. त्याला आपणच ना ठेवले आहे ‘शौचालय’. याचा अर्थ तिथे ते असते म्हणून आपण जातो का? नाही ना? तिथे आपण जातो ते विल्हेवाट लावायला. तुम्हाला आता सवय नाही. पंचवीस वर्षांपासून तुम्ही प्रतीक्षालयात पाऊलही ठेवले नसेल. परंतु आम्हाला तिथे जावे लागते. तिथे प्रतीक्षा असते का? नाही. तिथे जाऊन बसले की, प्रतीक्षा नीट करता येते! जसे तुमचे ‘अच्छे दिन’ अजून यायचे आहेत, असे काही लोक येऊन सांगतात आम्हाला. एवढेच नाही, तर तुमच्या काळात कोणत्याही कार्यालयात जे होत नाही, त्याला तुम्ही काय म्हणणार? तुम्ही सत्तेतले लोक कार्यालय म्हणत राहता. पण त्यात कामे होतात कोणाची आणि कधी याचा पत्ता आहे का तुम्हाला?”
मोहनराव का संतापले त्याचा मला अंदाज येईना. मी त्यांच्या मराठीचे दोष काढले म्हणून की, मला नवी मराठी समजत नाही म्हणून. मला काही कळेना. मराठी ब्राह्मणांना त्यांच्या चुका काढून दाखवल्या की, त्यांची कशी चीडचीड होते, ते ठाऊक आहे मला. माझे गुरू मराठी ब्राह्मणच होते. नेत्रालय असे डोळ्यांच्या इस्पितळाला नाव देणे अगदी चूक असल्याचे आमच्यातल्याच एका मराठी माणसाने मला पूर्वसूचित केले होते. पण सांगायचे कसे? सारे पूर्वनियोजित झाले होते.
थोडा वेळ असा शांततेत गेल्यावर मोहनरावांनी आपले तोंड उघडले. खरोखर उघडले. आता बोट दाखवत ते विचारू लागले, ‘हिला काय म्हणतात?’ प्रश्न सोपा होता. मी उत्तरलो ‘जीभ’. ‘तिथे काय असते?’, असे त्यांनी परत विचारले. इथे मात्र मी गडबडलो. जिभेवर खूप काही असते. आमच्या लोकांच्या जिभांवर साखर असते, हे काय मोहनरावांना मी सांगायला हवे? माझ्या जिभेवर तर माझा ताबाच उरलेला नाही. साक्षात देवीसरस्वतीने तो घेऊन टाकला आहे. माझे आता सारे काही देवाधीन, परमेश्वराधीन झालेले आहे. तसे मी मागे एकदा म्हटलेदेखील होते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मी असा विचारात पडलेलो पाहून मोहनराव विजयी मुद्रेने मला सांगू लागले, ‘‘अहो, या जिभेवरती स्वातंत्र्य खेळते. विद्या, सरस्वती, ज्ञान किंवा प्रज्ञा यांचे ते ‘प्ले-ग्राउंड’ असते, आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच ‘वर्ड प्ले’ आपल्या लोकांना त्यावर करता येतो, ज्यांनी ज्यांनी आपले संघटन वाढवले, ते कशाच्या बळावर? केवळ जिव्हालालित्यावर. बरे का नरभाऊ, माणसाला एक वेळ डोके नसेल तरी चालते, परंतु जिव्हा असलीच पाहिजे! जिभेशिवाय जीवन नाही. तुम्ही जिभेशिवाय जेवण नाही, असे चुकीचे ऐकून घेतले असणार याची कल्पना आहे आम्हाला. पण लक्षात ठेवा, जिव्हा असते म्हणून जग असते आणि जगात जगायला जीभ लागते. मृत्यू जिभल्या चाटत वाटत पाहत असतो आपल्यासारख्या नरांची अन् मानवांची. मृत्यूला जीभ नसते. तो न बोलता येतो अन् आपण बोलत असताना आपल्याला कायमचे चूप करून टाकतो.”
मी वैतागलो. मोहनरावांचे हे ‘जीभपुराण’ का सुरू झाले त्याचा थांग मला लागेना. ते कोणत्याही विषयावर किती वेळ तरी बोलू शकतात हे आम्हा अनेकांना ठाऊक होते. मी इतका रागावलो या निरर्थक, बिनकामाच्या बडबडीने की, मला न राहून मी बोलून गेलो, “तसे असेल तर मोहनराव, का नाही तुम्ही एखादे ‘जिव्हालय’ उघडून टाकत? त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जिभा ठेवून लोकांना बदलायला बोलावू आपण! आपल्या संघटनेने केवढ्या तरी लोकप्रिय वक्त्यांना जन्म दिला असल्याने आपण त्यांची भाषणे आजही साठवून साठवून ऐकतो. अशांच्या जिभा त्यांनी फार तर आपल्या मार्गदर्शक मंडळींकडून जिव्हादान जाहीर करून…”
माझे वाक्य पूर्ण होऊ न देता मोहनराव एकदम बोलत सुटले. त्यांचा तोल गेल्यासारखे दिसू लागले. त्यांच्या डोळ्यांमधून माझ्याविषयी किंवा माझ्या सूचनेविषयी प्रचंड संताप बाहेर पडू लागला. त्यांच्या मिशा थरथरू लागल्या. मोठ्या क्रुद्ध आवाजात ते बोलू लागले,
“आम्ही तुम्हाला मागेच बजावले होते नरुभाऊ, तुमचा कल्पनाविलास फार वाढत चाललाय. रोज नवे काहीतरी सुरू करायचे सांगता. ते काही दिवसांत गुंडाळले जाते. आम्ही तोंडघशी पडतो, खुलासे करता करता. तुम्हाला आम्ही दिलेले स्वातंत्र्य तुम्ही बेछूटपणे वापरीत आहात. तुमचा कारभार नको तेवढे स्वातंत्र्य घेतोय पाहून आम्ही ठरवले आहे की, तुमच्याच नावे आपण एक स्वातंत्र्यालय उघडू आणि त्यात सगळी स्वातंत्र्य जमा करून ठेवू. लोक बघायला येतील हे संग्रहालय कसे आहे ते. तुमचाही उदा उदो होऊन राहील, काय? कशी वाटली आयडिया?”
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment