नानासाहेब नावाचा ‘परिस’ स्पर्श होताना...
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • एका निवांत क्षणी नानासाहेबांसोबत गप्पांची रंगलेली मैफल. बाजूला ‘संडे क्लब’नं आयोजित केलेल्या ‘लेखणीच्या अग्रावर’ या पुस्तकाच्या कार्यक्रमात ज्येष्ठतम समीक्षक सुधीर रसाळ यांच्यासोबत श्रोत्यात बसलेले नानासाहेब. छाया - रेखा शेळके
  • Sat , 12 April 2025
  • संकीर्ण श्रद्धांजली नरेंद्र चपळगावकर Narendra Chapalgaonkar सुधीर रसाळ Sudheer Rasal

अग्नी दिला गेला.

ज्वाला भडकू लागल्या.

धुराचे लोट सुरू झाले; लाकूड आणि पार्थिव अग्नीच्या स्वाधीन होतानाचा वास सर्वत्र पसरू लागला...

सूर्य पश्चिमेला कलला होता.

मावळतीची तांबूस मलूल किरणं वातावरणात पसरलेल्या उदासीत आणखीच भर घालत होती.

नानासाहेबांचं पार्थिव अनंतात विलीन होण्यास सुरुवात झाली होती...

......................................................................................

श्रद्धांजली सभा झाली आणि जडशीळ पाऊलं उचलत लोकांनी परतीचा प्रवास सुरू केला. नानासाहेबांचा वैपुल्यानं असलेला लोकसंपर्क त्या गर्दीत दिसत होता. विद्यमान आणि निवृत्त न्यायमूर्तीपासून ते तरुण वकील, विविध क्षेत्रातील अबालवृद्ध त्यात होते. एरवी अंत्यसंस्कारच्या वेळी महिला फारच तुरळक दिसतात, पण गर्दीत सर्ववयीन महिलांची उपस्थिती नजरेत भरणारी होती. त्याआधी अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी अक्षरक्ष: रीघ लागलेली होती. त्या गर्दीला जात नव्हती, धर्म नव्हता, होता तो केवळ नानासाहेब मृत्यूच्या अधीन झाल्याबद्दलचा शोक...   

“आपल्याविषयी स्नेह किंवा आपुलकी असलेल्या माणसाचा मृत्यू हे एका दृष्टीने आपल्याच आयुष्याचा लचका तोडल्यासारखे असते.” हे नानासाहेबांच्या ‘हरवलेले स्नेहबंध’ या पुस्तकातील वाक्य आठवलं... नंतर किती तरी वेळ आठवतच राहिलं...

पंधरा-सोळा वर्षांपूर्वी हे कोणाच्या तरी मृत्यूच्या संदर्भात लिहिलेलं हे विधान अगदी तंतोतंत आपल्यालाच लागू होणार आहे, हे कधी नानासाहेबांना जाणवलं असेल का, असा प्रश्न मनात आला.

......................................................................................

नानासाहेब अंथरुणाला खिळल्यापासून त्यांच्या घरी १५-२० दिवसातून एक तरी चक्कर होत असे. चक्कर लांबली, तर नानासाहेबांचा फोन येत असे आणि तेच माझ्या तब्येतीची चौकशी करत, कारण बेगम वारल्यापासून मी आता एकटाच राहतो आणि वयानंही सत्तरी गाठलेली आहे. माझी बेगम रुग्णशय्येला खिळली, त्या अडीच-पावणेतीन वर्षांच्या काळातही (तेव्हा नानासाहेबांनी वयाची ऐंशी पार केलेली होती.) दोन जिने चढून नानासाहेब आमच्या घरी नियमित येत असत. मंगलाशी बोलत. तिला धीर देत. अन्य सगळी चौकशी करत. कामवाल्या वेळेवर येतात की नाही, सगळी औषधं उपलब्ध होताहेत नं, पैशाची वगैरे टंचाई नाही नं, असे बारीक-सारिक मुद्दे त्या चौकशीत असत.

अनेकदा त्यांच्यासोबत नंदिनीवहिनी सोबत असत. मंगलाला आवडतं म्हणून काही तरी खाऊ त्या न विसरता आणत. नोंदवायचा मोह आवरत नाही म्हणून सांगतो, माझ्या बेगमनं अखेरचा श्वास घेतला, त्या वेळीही योगायोगानं नानासाहेब आणि नंदिनीवहिनी आमच्या घरात नुकतेच पोहोचलेले होते. सांत्वनाचा पाठीवर पडलेला पहिला हात नानासाहेबांचा होता... धीर देणारं ज्येष्ठपणाचं ममत्व त्यांनी कायमच केवळ आमच्याशीच नाही अनेकांशी जोडलेलं होतं. महत्त्वाचं म्हणजे हे असं जिव्हाळ्यानं जोडलं जात असताना समोरच्याकडून त्यांची कोणतीही अपेक्षा नसायची. डोहखोल जिव्हाळ्यानं लोकांशी जोडला गेलेला असा माणूस विरळाच.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नानासाहेब आजारी झाल्यावर मध्यंतरी, नेमकं सांगायचं तर २७ जुलैला सकाळी नानासाहेबांना भेटायला गेलो. (सोबतचं छायाचित्र त्याचवेळी टिपलेलं आहे.) मृत्यूची चाहूल लागलेल्या स्थितीत वयाच्या ८७व्या वर्षी नानासाहेबांच्यात असलेली लेखन-वाचनाची ऊर्जा, जगण्याची रसिली असोशी अचंबित करणारी होती आणि ती अनुभवून बाहेर पडताना मी नेहमीप्रमाणं मनोमन स्तंभित झालेलो होतो.

आमच्या संबोधनातले नानासाहेब आणि जनमाणसांचे नरेंद्र चपळगावकर म्हणजे- लेखक, गोखले आणि आगरकर यांच्या विचारांच्या वाटेवर चालणारे विचारवंत, मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, वर्ध्याला झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, लोकशाहीचे संवेदनक्षम चिंतक, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर निष्ठा असणारे राजकीय आणि सामाजिक भाष्यकार, चिकित्सक वाचक आणि महत्त्वाचं म्हणजे अंगी स्नेहशीलता ओतप्रोत असलेला एक माणूस.

मी त्यांच्या फार निकटस्थ होतो, असा माझा दावा नाही, पण फार लांब होतो असाही त्याचा अर्थ नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत अनेकदा राहता आलं, त्यांच्याशी भरपूर संवाद साधता आला. न्यायमूर्ती आणि लेखक म्हणून जनमाणसातील नानासाहेबांची प्रतिमा खूपच लखलखीत होती. महत्त्वाचं म्हणजे ही प्रतिमा धवल चारित्र्याच्या कोंदणात विराजमान होती. गेली साडेचार  दशकं पत्रकारिता करत असताना प्रतिमा लखलखीत असणारे राजकारण आणि साहित्याच्या क्षेत्रातले नागपूर, मुंबई, दिल्लीत असंख्य भेटले; त्यापैकी बहुसंख्य त्याच प्रतिमेच्या कोशात गुरफटून गेलेले पाहण्यात आले. मात्र नानासाहेबांच्या असणाऱ्या त्या प्रतिमेची सावली कधी आम्हा कुणावर (खरं तर कुणावरच) कधीच पडली नाही; कायमच आमची काळजी करणारा घरातला कुणी कर्तापुरुष असावा, तसे नानासाहेब आमच्यासाठी राहिले, आमच्यासोबत वावरले.

आमच्या त्या भेटीच्या काहीच दिवस आधी बऱ्याच क्लिष्ट वैद्यकीय चाचण्या आटोपून नानासाहेब नुकतेच मुंबईहून औरंगाबाद-छत्रपती संभाजीनगरला परतले होते; त्या चाचण्यांमुळे नानासाहेब थकलेले असतील, कदाचित त्यांच्या तोंडून निराशेचा एखादा का होईना स्वर उमटेल, असं वाटणं मनाला स्पर्शून गेलेलं होतं, पण प्रत्यक्षात मीच चार्ज होऊन बाहेर पडलो. वर्धा साहित्य संमेलनाच्या काही दिवस आधीच व्याधीचं निदान झालेलं होतं, पण त्यांची वाच्यता नव्हती, त्यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त बाहेरच्या फार कमी लोकांना ते ठाऊक होत. संमेलन झाल्यावरच उर्वरित वैद्यकीय चांचण्या आणि शस्त्रक्रियेला नानासाहेब सामोरे गेले. जे काही आजारपण वाट्याला आलेलं होतं, ते त्यांनी मनोमन स्वीकारलेलं होतं.

नानासाहेब चपळगांवकर यांच्याशी माझी असलेली नाळ जुनी आहे. दूरवरून आम्ही नात्यात आहोत, असं आमच्या भावकीत म्हटलं जातं; ते कधी नानासाहेबांनीही नाकारलं नाही, हे त्यांच्यातलं उमदेपण असावं. बीड हा आमच्यातला समान दुवा आहे. नानासाहेबांच्या अफाट परिवारातल्या अनेक जणांशी माझाही निकटचा संपर्क आलेला आहे. त्यात राजकारणी जसे आहेत तसेच पत्रकार, संपादक, नामवंत लेखक, विचारवंत, गायक, संगीतकार, सामाजिक कार्यकर्ते होते. सहवासात आलेल्यांशी कोणताही पंक्तीप्रपंच ना करता सगळ्यांशी नानासाहेब नेहमीच अकृत्रिम सलगीनं वागत.

......................................................................................

आमच्यातली आणखी एक नाळ ‘लोकसत्ता’ आहे. नानासाहेब एकेकाळी ‘लोकसत्ता’चे बीडचे वार्ताहर होते आणि पत्रकारिततेली माझी सुमारे तीन दशकांची कारकीर्द याच वृत्तपत्रातली आहे. आता सांगूनच टाकतो. संपादकीय लेखन सुरू केल्यावर सुरुवातीच्या काळात मला नानासाहेबांचं सक्रिय सहकार्य मिळालेलं आहे. ‘लोकसत्ता’तील माझा पहिला ‘वृत्तवेध’ नानासाहेबांनी ‘डिक्टेट’ केलेला आहे! सहवासात आलेल्या गरजूला सर्वतोपरी मदत करण्याची आणि त्याबद्दल कोणतीही वाच्यता न करण्याची जन्मजात वृत्ती नानासाहेबांमध्ये होती.

स्मरणशक्ती ठणठणीत शाबूत असल्यानं नानासाहेब चपळगांवकर यांच्याशी गप्पा मारणं हा एक नेहेमीच आनंददायी आणि आपल्या आकलनाच्या कक्षा उजळवणारा अनुभव असायचा. त्यांच्या बोलण्यातून असंख्य आठवणी आणि हकीकती, किस्से एका पाठोपाठ अलगद उलगडत जात. त्यात न्यायव्यवस्था, साहित्य, संगीत, चित्रपट राजकारण, समाजकारण आणि त्या क्षेत्रात वावरणारे नामवंत असत. त्या कथनाच्या उजळलेल्या लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात आपण चिंब होत असूत. नानासाहेबांचं, वाचन आणि अनुभव विश्व किती ऐश्वर्यशाली आहे, हे अनुभवून स्तिमित होणं एवढंच आपल्या हातात उरलेलं असायचं .

नानांसाहेबांचा व्यासंग आपल्या आकलनाच्या कवेत येणारा नाही. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू असा त्यांचा भाषक संचार होता. तस्साच त्यांचा बहुपेडी संपर्कही होता. गाठीशी इतकी विद्वत्ता असूनही त्यांच्यात ‘ज्ञानताठा’ जराही नव्हता, हे तर समकालात दुर्मीळच म्हणायला हवं. त्यामुळे ते आपले कुणी वडीलधारे  आहेत, ही जाणीव सुखावणारी असे. पुन्हा पुन्हा सांगायला हवंच की, मोहरीएवढ्या ज्ञानाचा आभाळभर अहंकार असणारे/मिरवणारे पायलीला पन्नास भेटले; ताठा नसणारे नानासाहेबांसारखे ज्ञानी फारच दुर्मीळ असतात.

......................................................................................

नानासाहेबांना एकदा विचारलं, ‘हा प्लॉट केव्हा घेतला होता,’ तर त्यांनी घडाघडा सर्व माहिती दिली. गतकाळातले शक्यतो तारीखवार आणि वाचनातले संदर्भ सहज उजळवणं हे नानासाहेबांचं आणखी एक स्वभाव वैशिष्ट्य होतं. त्यांनी सांगितलं, ‘१९७६ साली. १३ रुपये फूट दरानं घेतला हा प्लॉट. घर बांधायला सात लाख रुपये खर्च आला. त्यापैकी दोन लाख रुपये सारस्वत बँकेनं कर्ज दिलं. उरलेले इकडून तिकडून उभे केले’, अशी स्मरणशक्ती लख्ख. या घराबद्दल माझं एक निरीक्षण असंही आहे- या घरात दर आठ-दहा महिन्यानंतर काही ना काही ‘डागडुजी’ सुरू असते आणि ती नानासाहेबांच्या कल्पनेतून साकारत असायची!

नीटनेटकेपणाच्या बाबतीत नानासाहेब एकदम अचूक. कोणत्याही कार्यक्रमात; अगदी आमच्या संडे-क्लबच्या अनौपचारिक कार्यक्रमातही चुरगाळल्या मुरगाळल्या कपड्यात नानासाहेब कधी सहभागी झाले नाहीत. कोणत्याही कार्यक्रमात व्यासपीठावर असो की प्रेक्षकांत, पॅन्टमध्ये शर्ट नीट  ईन केलेला, कपड्यांची रंगसंगती सौम्य तरीही आकर्षक, साध्याशा चपला, पण व्यवस्थित पॉलिश केलेल्या असायच्या. पुस्तकबद्दलही असंच. पुस्तक कोणत्या कपाटाच्या कोणत्या कप्प्यात आणि बहुदा डावी किंवा उजवीकडून कितव्या स्थानी आहे, हे नानासाहेब नेमकं सांगत. एखाद्या वस्तूबद्दलही नेमकेपणा हा असाच असायचा.

......................................................................................

मृत्यूच्या छाया गडद झालेल्या असतानाही नानासाहेब लिहिते होते. बहुसंख्य काळ वकिलीत गेल्यानं ते ‘डिक्टेशन’ देत. एखाद्या आस्तिकानं दररोज श्रद्धेनं पूजा बांधावी तितक्या श्रद्धेनं हे नानासाहेबांचं  ‘डिक्टेशन’ चालायचं. नानासाहेब सांगत आणि सुरेश पाटील संगणकावर ‘टायपत’. टाइप केलेला मजकूर स्पष्ट दिसावा म्हणून मुख्य संगणकाशेजारी नानासाहेबांसाठी एक मोठा स्क्रीन ठेवलेला असायचा. त्यावर वाचून नानासाहेब मुद्रणदोष सांगत. डिक्टेशन संपलं की, दुसऱ्या दिवशीच्या मजकुराची तयारी करण्यात नानासाहेब स्वत:ला गुंतवून ठेवत.

एकदा सहज विचारलं, ‘काय लिहिताय सध्या?’ या माझ्या विचारण्याला उत्तर देताना नानासाहेब म्हणाले, ‘लोकशाही आणि हुकुमशाही’ हे पुस्तक नुकतंच पूर्ण झालंय. छपाईला गेलंय. येईल आता दोन-तीन महिन्यात हाती. राजहंस प्रकाशन प्रकाशित करत आहे, हे पुस्तक.’ इतकं बोलून त्यांनी पुस्तकांची मुद्रणासाठी तयार केलेली प्रतच हाती ठेवली. नानासाहेब मृत्यूच्या अधीन होण्याच्या काहीच दिवस आधी या पुस्तकाच्या प्रती आल्या. रुग्णालयातच त्या पुस्तकांचं प्रकाशन ज्येष्ठतम समीक्षक सुधीर रसाळ आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते झालं. म्हणजे मृत्यूच्या स्वाधीन होईपर्यंत त्यांचा लेखन ध्यास प्रज्वलितच होता.

अखेरच्या काही दिवसांत झालेल्या भेटीत ‘वाचन सुरू आहे का?’ हे विचारल्यावर नानासाहेबांनी पलंगाच्या उशाशी असलेल्या टेबल लॅम्पकडे बोट केलं आणि म्हणाले, ‘अशातच सुधीर रसाळ यांची दोन-तीन पुस्तकं पुन्हा वाचली. तुमचं (म्हणजे साक्षात अस्मादिकांचं!) पत्रकारितेच्या अनुभवावरचं पुस्तक ‘लेखणीच्या अग्रावर’ पुन्हा वाचलं. (इकडे अस्मादिकांची कॉलर मनातल्या मनात ताठ झाली नसती, तर तो दांभिकपणा होता.) वाचायचा काहीच त्रास नाही. वाचत असतो. वाचनाशिवाय दुसरं करणार तरी काय?’

‘टीव्ही नाही बघत?’ विचारल्यावर नानासाहेबांनी पटकन प्रतिप्रश्न केला, ‘काय बघणार?’

‘बातम्याही नाही वाचत किंवा बघत?’

नानासाहेब म्हणाले होते, ‘बातम्या म्हणजे नुसत्या उखाळ्या पाखाळ्याच असतात. भाषाही वाईट. म्हणून वाचत नाही आणि बघतही नाही. ‘राजकारणही तसंच...’ आणि एक पॉज घेऊन म्हणाले, ‘फारच कंटाळा आला तर इंग्रजी चित्रपट बघतो अधूनमधून.’

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

काळजी आणि प्रेमापोटी ‘गुरगुरणा’ऱ्या लेकी हा नानासाहेब, नंदिनीवहिनी आणि माझ्यातला जिव्हाळ्याचा विषय. त्यात, त्यांच्या आणि आमच्याही एका लेकीचं नाव समान आहे. शिस्त आणि बोलण्याच्या बाबतीत त्या दोघीही ‘हुकूमशहा’ आहेत, हे आम्हा तिघांचं मत समान आणि तिच लाडकी तक्रार चर्चेत असायची.

शेवटच्या आमच्या भेटीत गप्पा बराच वेळ रंगल्या. महेश एलकुंचवार, सुधीर रसाळ, कुमार केतकर अशा अनेकांच्या आठवणींच्या सरी बरसल्या. नानासाहेब थकले वगैरे नाहीत, जगण्याची त्यांची उर्मी कायम आहे हे उगाच  वाटत होतं. त्यांना ‘संडे क्लब’ला यायचं होतं. ‘संडे क्लब’ला घेऊन जाईन असं सांगून तिथून निघालो, तेव्हा मनात विचार आला, नानासाहेबांसारखी परीस माणसं जगण्यात आली म्हणून आपणही उजळून निघालो. ही ज्ञानी, निगर्वी, पारदर्शी माणसं भेटली नसती, तर आपण कुठे तरी चाचपडत विरुन गेलो असतो...

(‘ललित’ मासिकावरून)

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......