पुरुष अंतराळयात्रींइतक्याच महिला अंतराळयात्रींदेखील अंतराळात जाण्यास पात्र आणि सक्षम होत्या, परंतु त्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागला...
अर्धेजग - कळीचे प्रश्न
सुकल्प कारंजेकर
  • व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा, कॅथरिन कोलमन सॅली राइड, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स
  • Sun , 23 March 2025
  • अर्धेजग कळीचे प्रश्न व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा Valentina Tereshkova कॅथरिन कोलमन Catherine Coleman सॅली राइड Sally Ride कल्पना चावला Kalpana Chawla सुनीता विल्यम्स Sunita Williams

ठरलेल्या वेळेपेक्षा आठ महिन्यांहून अधिक काळ ‘आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रा’त अडकून पडलेल्या बुच विल्मोरसह सुनीता विल्यम्स १९ मार्च २०२५ रोजी पृथ्वीवर परतल्या. तशी घोषणा फेब्रुवारीच्या मध्यावर नासा आणि स्पेस एक्स यांनी केली होती. अवकाशविज्ञानात रुची असलेल्यांसाठी ही मोठी घटना आहेच, पण इतरांसाठीही तितकीच रोमहर्षक आणि थरारक आहे. अंतराळयानापर्यंत पोहण्याचा महिलांचा प्रवास काही सहजासहजी झाला नाही. त्यांना त्यासाठीही बराच संघर्ष करावा लागला. नुकतीच ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’ला ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने महिला अंतराळयात्रींबद्दलचा हा लेख…

.................................................................................................................................................................

“पक्षी फक्त एका पंखाच्या आधारे उडू शकत नाहीत. त्यांना उंच भरारी घेण्यासाठी दोन्ही पंखांची गरज असते. त्याचप्रमाणे मानवप्रजातीची अवकाशयुगातील भरारीदेखील महिलांच्या सहभागाशिवाय शक्य होणार नाही.”

- व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा (पहिल्या महिला अंतराळयात्री)

कॅथरिन कोलमन या नासाच्या निवृत्त अंतराळयात्री आहेत. २०११मध्ये त्या १५९ दिवस ‘आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रा’वर वास्तव्याला होत्या. त्यांच्या अंतराळ मोहिमेच्या काही काळानंतर त्यांची आणि त्यांचे सहकारी अंतराळयात्री माइक फॉसम यांची मुलाखत घेतली गेली. ही मुलाखत घेतली गेली वॉशिंग्टन डीसीमधील ‘स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम’मध्ये. या संग्रहालयाचं वैशिष्ट्य असं की, इथे माणसाच्या आकाशात उड्डाणाच्या समग्र इतिहासाचा परिचय करून घेता येतो. ऑर्विल आणि विल्बर राइट या बंधूंनी १९०३ साली जे पहिलं विमान उडवलं, ते या संग्रहालयात ठेवलेलं आहे. आणि १९६९मध्ये निल आर्मस्ट्रॉंग, बझ आल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स हे ज्या अपोलो अंतराळयानात बसून चंद्रावर गेले होते, ते अंतराळयानदेखील इथे ठेवलं आहे. १९०३ सालचं माणसाचं पहिलं विमान उड्डाण हे फक्त अंदाजे १२० फुटांचं होतं. तिथून सुरुवात करत सात दशकांच्या आत माणूस तीन लाख ऐंशी हजार किलोमीटर्सचं अंतर पार करून थेट चंद्रावर पोचला. हा इतिहास विलक्षण आहे.

तिचे अर्धे अवकाश

मुलाखतीच्या दरम्यान माइक फॉसम म्हणाले की, या संग्रहालयात त्यांची मुलाखत होत असल्याचा त्यांना विशेष आनंद आहे. कारण लहानपणी ते या संग्रहालयात यायचे आणि अंतराळ मोहिमांच्या इतिहासाची गोष्ट समजून घ्यायचे. यातूनच त्यांना मोठेपणी अंतराळयात्री बनण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर बोलताना कॅथरिन म्हणाल्या की, लहानपणी त्यादेखील या संग्रहालयात यायच्या आणि त्यांनादेखील या इतिहासाबद्दल अप्रूप वाटायचं. पण आपण अंतराळयात्री बनावं किंवा असं आपण होऊ शकतो, असं लहानपणी त्यांच्या मनात यायचं नाही. कारण त्या काळात अंतराळयात्री म्हणजे फक्त पुरुषच असतात, असं समीकरण नकळतपणे त्यांच्या मनात ठसलं होतं. आणि तरीही त्या अंतराळयात्री का बनल्या, याचं स्पष्टीकरण त्यांनी दुसऱ्या एका मुलाखतीत दिलं आहे.

कॅथरिन सांगतात की, त्या महाविद्यालयात रसायनशास्त्र शिकत होत्या. त्या वेळी त्यांच्या महाविद्यालयात मोठमोठ्या लोकांची व्याख्याने ठेवली जायची. एकदा तिथे सॅली राइड यांचं व्याख्यान ठेवण्यात आलं होतं. सॅली राइड या १९८३ साली अमेरिकेकडून अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री होत्या. त्यांच्या व्याख्यानाचा कॅथरिन यांच्यावर खूप प्रभाव पडला. महिला देखील अंतराळयात्री असू शकतात, त्या अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकतात, हे कॅथरिन यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी या दिशेने वाटचाल सुरू केली.

माझ्या लहानपणी या संग्रहालयात मला महिलांचं अस्तित्व जाणवायचं नाही. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. महिला अंतराळयात्रींच्या गोष्टीदेखील संग्रहालयात आहेत, हे बघून मला आनंद वाटतो, असं कॅथरीन मुलाखतीत म्हणाल्या.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पुरुषसत्ताक अवकाशाशी चार हात

परिस्थिती बदलली आहे हे खरं, पण हा बदल सहजासहजी घडलेला नाही. कॅथरिन कोलमन यांचा जन्म १९६० सालचा आहे. ज्या काळात त्यांचा जन्म झाला, तेव्हा अमेरिका आणि (सोव्हियत) रशिया यांच्यात ‘स्पेस रेस’ सुरू होती. दोन महासत्ता अंतराळात एकमेकांवर कुरघोडी प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होत्या. रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह (स्पुटनिक १) आणि पहिला माणूस (युरी गागारीन) अवकाशात पाठवून सुरुवातीला बाजी मारली होती. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही स्वतःचा कृत्रिम उपग्रह (एक्सप्लोरर १) अवकाशात सोडला होता आणि अमेरिकन अंतराळयात्री (अ‍ॅलन शेफर्ड) अवकाशात पाठवला होता.

अमेरिकेने सुरुवातीला ७ अंतराळयात्रींची निवड केली होती, तर दुसऱ्या बाजूला रशियाने २० अंतराळयात्रींची निवड केली होती. अमेरिका आणि रशिया या दोन्ही बाजूंनी निवडलेल्या अंतराळयात्रींमध्ये एक समान दुवा होता. तो म्हणजे, दोन्ही बाजूंचे सगळे अंतराळयात्री हे पुरुष आणि लष्करी वैमानिक होते. इतर कोणाचा विचार केला गेला नव्हता. अंतराळयात्री म्हणून महिलांचा विचार करण्याचं काही कारण नव्हतं. त्या काळात अगदी अमेरिकेतही महिला मुख्यत्वे गृहिणी म्हणून काम करायच्या. घर चालवणं, मुलं जन्माला घालणं, कुटुंब चालवणं इतकीच अपेक्षा त्यांच्याकडून केली जायची.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा पार्श्वभूमीवरदेखील अमेरिकेत काही महिलांना अंतराळयात्री म्हणून प्रशिक्षण देण्यात आलं होतं. याला कारणीभूत होते डॉ. विलियम लव्हलेज. त्यांच्याकडे अंतराळयात्रींची शारीरिक क्षमता बघून निवड करण्याची जबाबदारी होती. जितक्या कठोर आणि कणखर चाचण्यांमधून पुरुष अंतराळयात्री निवडले जातात, त्या चाचण्यांना महिला सामोरे जाऊ शकतील का, असा प्रश्न डॉ. लव्हलेज यांना पडला होता. त्यानुसार त्यांनी निवडक महिलांची शारीरिक क्षमता पडताळून बघितली. अनेक कठोर चाचण्यांमधून १२ महिलांची निवड केली गेली. या महिला अत्यंत कणखर, हुशार, आणि कार्यक्षम होत्या. पुरुष अंतराळयात्रींइतक्याच त्यादेखील अंतराळात जाण्यास पात्र आणि सक्षम होत्या, परंतु त्यांना अंतराळात पाठवण्यात आलं नाही.

डॉ. लव्हलेज यांनी महिलांना प्रशिक्षण देण्याचं का ठरवलं होतं? त्यांचा नेमका हेतू काय होता? असे प्रश्न पडतात. एक दिवस महिलादेखील अंतराळात जातील, असा डॉ. लव्हलेज यांचा कयास होता. वरवर हा विचार प्रगतिशील आणि काळाच्या पुढचा वाटतो, पण या उदात्त भासणाऱ्या कृतीमागे संकुचित विचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या काळात अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्याच्या कल्पना केल्या जात होत्या. अशा स्पेस स्टेशनमध्ये साफसफाई करण्यासाठी पुरुष अंतराळयात्रींच्या मदतनीस म्हणून महिलांना पाठवण्याचा विचार यामागे असू शकतो.

डॉ. लव्हलेज यांचा मूळ हेतू प्रगतिशील होता की संकुचित होता, याबद्दल स्पष्टता नाही. प्रशिक्षण दिलेल्या महिला मात्र कुठल्याच बाबतीत पुरुष अंतराळयात्रींच्या तुलनेत मागे नव्हत्या. नासाने मात्र या महिलांना पूर्ण प्रशिक्षण झाल्यानंतरही अंतराळात न पाठवण्याची भूमिका घेतली. हा या महिलांवर अन्याय होता.

याविरुद्ध महिलांनी आवाज उठवण्याचं ठरवलं. त्यापैकी जेरी कॉब यांनी नासा महिलांच्या बाबतीत भेदभाव करते आहे, अशी जाहीर वाच्यता केली. त्यांनी वॉशिग्टनमधील काही उच्चपदस्थ लोकांपर्यंत हा विषय पोहोचवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे १९६२ साली या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी सरकारने एक विशेष समिती नेमली. नासाचे उच्चपदस्थ लोक आणि काही (पुरुष) अंतराळयात्री या समितीत होते. एकही महिला या समितीचा भाग नव्हती.

आपल्या देशाच्या अंतराळ मोहिमांमध्ये भेदभाव न केला जाता महिलांना संधी देण्यात यावी, अशी भूमिका जेरी कॉब यांनी समितीपुढे मांडली. समितीतील पुरुषांचे विचार मात्र याला अनुकूल नव्हते, सध्या अमेरिका आणि सोव्हियत रशिया यांच्यात अंतराळ जिंकण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महिलांना अंतराळात पाठवण्याचा प्रयोग करायची ही योग्य वेळ नाही, असं नासाचे मुख्य प्रतिनिधी जेम्स वेब म्हणाले.

युद्धात आणि अंतराळात जाण्यासाठी वापरली जाणारी विमाने, अंतराळयाने व इतर यंत्रणा या सगळ्या पुरुषांनी बनवलेल्या आहेत. युद्धात आणि धाडसी मोहिमांमध्ये पुरुषच पुढे असतात. हे आपल्या प्रचलित समाजव्यवस्थेनुसारच आहे, असं अंतराळयात्री जॉन ग्लेन म्हणाले. या समितीने महिलांच्या बाजूने कौल दिला नाही.

रशियाची कुरघोडीत आघाडी

याच सुमारास रशियामध्ये मात्र महिला अंतराळयात्रींचं प्रशिक्षण जोरात सुरू होतं. अमेरिका अंतराळात पाठवण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देतं आहे, अशी बातमी रशियात पोचली होती. जेव्हा ही बातमी रशियाच्या उच्चपदस्थ लोकांच्या कानी पडली, तेव्हा ते विचारात पडले. कम्युनिस्ट रशियात महिलांचं स्थान गुंतागुंतीचं होतं. कम्युनिझमच्या अधिकृत भूमिकेनुसार महिलांना पुरुषांच्या समान स्थान होतं. रशियामध्ये त्या काळात अनेक महिला कारखान्यांमध्ये कार्यरत होत्या, परंतु त्यांच्याकडून घर आणि मुलं सांभाळण्याची अपेक्षादेखील केली जात होती. रशियन प्रचारतंत्रानुसार आदर्श महिला ही एकाच वेळी मेहनती कामगार आणि आदर्श संस्कार घडवणारी मातादेखील होती.

प्रचारतंत्राच्या दृष्टीने जर रशियाच्या आधी अमेरिकेने पहिली महिला अंतराळयात्री अवकाशात पाठवली असती, तर रशियाचा महिलांच्या उन्नतीचा दावा पोकळ ठरला असता. यानुसार रशियाने निवडक महिलांना प्रशिक्षण देणं सुरू केलं. या महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर होत्या. त्यांनीदेखील खूप मेहनतीनं प्रशिक्षण पूर्ण केलं. या प्रशिक्षणात २६ वर्षांच्या व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा या अव्वल ठरल्या.

व्हॅलेन्टिनाची अवकाशझेप

व्हॅलेन्टिना या सर्वसामान्य कुटुंबातून वर आल्या होत्या. त्या फक्त दोन वर्षांच्या असताना त्यांचे वडील लढाईत मारले गेले होते. व्हॅलेन्टिना यांच्या आईने कॉटन मीलमध्ये मेहनत करून त्यांना आणि त्यांच्या दोन बहिणींना सांभाळलं, त्यांना शिक्षण दिलं. व्हॅलेन्टिना सतरा वर्षांच्या असताना त्यांना आर्थिक अडचणीमुळे शाळा सोडावी लागली. शाळा सोडल्यानंतर त्यांनी आधी टायरच्या कारखान्यात आणि त्यानंतर कपड्यांच्या गिरणीत काम केलं. परंतु हे काम करत असताना त्यांनी पत्रद्वारा शिक्षण सुरू ठेवलं. अशी धडपड करून त्यांनी तंत्रशिक्षण पूर्ण केलं. इतकंच नव्हे तर त्या आवड म्हणून स्काय डायव्हिंगदेखील शिकल्या.

त्या स्वभावाने हुशार, निर्भीड आणि कणखर होत्या. साहजिकपणे त्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आणि रशियाने जेव्हा अंतराळात जाण्यासाठी महिलांची निवड केली, तेव्हा त्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यांच्याबद्दल सगळ्यांना खूप आदर आणि कौतुक वाटायचं. त्यांच्या धडाडीच्या स्वभावगुणामुळे रशियन अंतराळमोहिमेचे उच्चपदस्थ लोक त्यांना प्रेमाने ‘स्कर्ट घातलेली गागारीन’ असं म्हणायचे. अशा प्रकारे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १६ जून १९६३ साली त्या व्होस्टोक-६ या अंतराळयानात बसून अवकाशात गेल्या. जेव्हा त्यांचं अंतराळयान अवकाशात उड्डाण घेणार होतं, तेव्हा त्या आत्मविश्वासाने म्हणाल्या होत्या – ‘Hey sky, take off your hat, I'm on my way!’

व्हॅलेन्टिना यांनी अंतराळयानातून पृथ्वीला ४८ प्रदक्षिणा मारल्या. त्यांनी अवकाशात घालवलेला वेळ हा तोपर्यंत सर्व अमेरिकन पुरुष अंतराळयात्रींनी अवकाशात घालवलेल्या एकत्र वेळापेक्षाही अधिक होता. महिला कुठल्याही बाबतीत कमी नाहीत, हे त्यांनी सिद्ध केलं. महिलांच्या धाडसाचं त्या प्रतीक बनल्या. त्या परत आल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी मुलाखतींसाठी, भाषणांसाठी बोलावल्या जाऊ लागलं.

अमेरिकेने त्यांच्या महिला अंतराळयात्रींवर केलेल्या अन्यायाबाबत व्हॅलेन्टिना यांना कल्पना होती. त्यावर टीका करत त्या म्हणाल्या की, अमेरिकेच्या राजकारण्यांना त्यांच्याकडे उदात्त लोकशाही आहे असं सांगायला खूप आवडतं, परंतु त्यांच्या देशाचा नागरिक असलेल्या महिलांना मात्र अवकाशात पाठवण्यास ते तयार नाहीत.

दुसरीकडे व्हॅलेन्टिना यांना अवकाशात पाठवणं, हे रशियासाठी प्रचारतंत्रापुरतं सीमित होतं. त्यानंतर पुढील १९ वर्षे रशियाने परत कुठल्या महिलेला अवकाशात पाठवलं नाही.

झाले अवकाश मोकळे...

अंतराळप्रवासाच्या बाबतीत परिस्थितीमधील सुधार खऱ्या अर्थाने १९८०च्या दशकात झाला. अंतराळयात्रींच्या निवडीचा संकुचितपणा थांबवण्यात आला. निवड फक्त गौरवर्णीय सैनिकी पार्श्वभूमीच्या पुरुषांइतकी सीमित न ठेवता इतरांना संधी देण्यात आली. त्यानुसार १९८३ साली सॅली राइड यांना अंतराळात जाण्याची संधी मिळाली. महिलांना आणि भिन्न पार्श्वभूमीच्या व्यक्तींना अवकाशात प्रवेश शक्य झाला. हळूहळू महिला अंतराळयात्रींची संख्या वाढू लागली, पण अजूनही महिला आणि पुरुषांमध्ये मोठी तफावत आहे.

नासाच्या संकेतस्थळी दिलेल्या माहितीनुसार नासाने आतापर्यंत ३६० अंतराळयात्रींची निवड केली, त्यातील महिलांची संख्या ६१ इतकी आहे. टक्केवारीच्या दृष्टीने ही संख्या खूप कमी आहे. समाधानाची गोष्ट अशी की, नासाने नव्या आर्टेमिस मोहिमेसाठी ज्या १८ अंतराळयात्रींची निवड केली आहे, त्यात ९ महिला आहेत. इतकंच नाही, तर आर्टेमिस ३ मोहिमेअंतर्गत चंद्रावर जाण्यासाठी ज्या ४ अंतराळयात्रींची निवड केली आहे, त्यात एका महिलेचा (क्रिस्टिना कोच) समावेश आहे.

१९६९मध्ये निल आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवून इतिहास रचला. ‘हे माणसाचं छोटंसं पाऊल मानवप्रजातीसाठी उत्तुंग उडीसमान आहे’, असं आर्मस्ट्राँग म्हणाले होते. अपोलो मोहिमाअंतर्गत १२ अंतराळयात्रींना चंद्रावर जाण्याची संधी मिळाली. हे सर्व अंतराळयात्री पुरुष होते, पण आर्टेमिस मोहिमेअंतर्गत जेव्हा मनुष्यप्रजात चंद्रावर परत जाईल, तेव्हा पहिलं पाऊल कदाचित महिलेचं असू शकतं. असं घडलं तर ते पाऊल स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने उत्तुंग उडी ठरेल, यात शंका नाही. भविष्यात मंगळावर जाण्याच्या मोहिमादेखील आखल्या जात आहेत. या मोहिमांमध्ये महिलांचं समान योगदान अपेक्षित आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

१९९७ साली अंतराळात जाणाऱ्या कल्पना चावला या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या. ज्या वर्षी जेरी कॉब आणि इतर महिला अंतराळयात्री अंतराळात जाण्याची संधी मिळावी म्हणून संघर्ष करत होत्या, त्याच वर्षी म्हणजे १९६२ साली कल्पना चावला यांचा जन्म झाला. कल्पना चावला यांना दोनदा अवकाशात जाण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने त्यांचा मृत्यूदेखील अवकाशात झाला.

वडिलांच्या बाजूकडून भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स या सध्या ‘आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रा’वर आहेत. तांत्रिक अडचणींमुळे त्यांना अजून किमान मार्च महिन्यापर्यंत तिथंच राहावं लागेल, असं दिसतंय. (ता. क. : सुनीता विलियम्स त्या १९ मार्च २०२५ रोजी पृथ्वीवर परतल्या आहेत.)

कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स यांच्याबद्दल भारतीयांना आपलेपण वाटणं साहजिक आहे, परंतु यांना अवकाशात पाठवण्याचं श्रेय भारताच्या नावावर नाही. भारत सद्यकाळात स्वतंत्र अवकाश मोहिमा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

गेल्या वर्षी (फेब्रुवारी २०२४मध्ये) भारताने ‘गगनयान’ मोहीम घोषित केली होती. यानुसार भारतीय अंतराळयानाच्या आधारे अंतराळात जाण्यासाठी चार अंतराळयात्रींची निवड केली गेली. हे चारही अंतराळयात्री पुरुष आणि लष्करी वैमानिक आहेत. ही भारतीय मोहिमांची सुरुवात असली, तरी भविष्यात समानतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महिलांना संधी देणं आवश्यक आहे. त्या दिशेने योग्य पाऊल उचलले जाईल अशी आशा.

आजही जगात खऱ्या अर्थाने महिलांना समान संधी मिळालेली नाही. विविध क्षेत्रांमध्ये उच्चपदावरील महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे. भारतात तर अजूनही स्त्री भ्रूणहत्येची समस्या आहे, महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार घडत आहेत. दुसरीकडे महिला चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होत आहेत. चंद्रावरील महिलेचं पहिलं पाऊल हे समानतेच्या भवितव्याचं चिन्ह ठरेल, अशी आशा!

‘समतावादी मुक्त संवाद’ मासिकाच्या मार्च २०२५च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

लेखक सुकल्प कारंजेकर समाज, अवकाश विज्ञान, साहित्य या विषयांत रस घेणारे अभ्यासक आहेत. त्यांचे ‘आपलं विश्व आणि त्याची नवलकथा’ हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे.

writetosukalp@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......