अजूनकाही
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या आंदोलनाचे फलित म्हणजे अरविंद केजरीवालांचा ‘आप -आम आदमी पक्ष’. या आंदोलनाचा मुखवटा महाराष्ट्रातले ‘तोतया गांधी’ अण्णा हजारे असले आणि केजरीवाल या चतुर गृहस्थाला केंद्रस्थानी ठेवले असले, तरी या आंदोलनाचे कथानक आणि नेपथ्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते, ही गोष्ट तेव्हाही दिसत होती आणि आता तर सर्वविदित आहे.
असे असतानाही या आंदोलनात डाव्या विचारांची ‘सेक्युलर’ मंडळी का सामील झाली होती, हा आजही संशोधनाचा विषय आहे. ज्या पद्धतीने तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे बेसुमार आरोप केले गेले, केंद्र सरकारवर दररोज जी जहरी टीका केली गेली आणि साऱ्याला प्रसारमाध्यमांतून जी अमाप प्रसिद्धी दिली गेली होती, ते पाहता हे आंदोलन मनमोहनसिंग यांचे सरकार पाडण्याचा संघ व कॉर्पोरेट जगताचा कट होता, ही गोष्ट तेव्हाही स्पष्ट होती आणि आता तर अगदी सुस्पष्टच झालेली आहे.
असे जरी असले तरी या आंदोलनातून निर्माण केलेल्या ‘आप’ने एक वैकल्पिक राजकारण करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेने साऱ्याच वर्गांना विशेषतः मध्यमवर्गाला मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या राजकारणात रुची निर्माण झाली होती. राजकारण्यांनी जनतेला उत्तरदायी असलेच पाहिजे, ही जी जाणीव मध्यमवर्गीयांमध्ये आली होती, राजकारण्यांना जाब विचारण्याची जी उर्मी मध्यमवर्गात आली होती, ती ‘आप’च्या दिल्लीतल्या पराभवाने क्षीण झाली आहे. म्हणूनच आपच्या पराभवात समाधान मानताना उपरोक्त खंत अनेक लोकशाहीप्रेमी नागरिकांत आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
एककल्ली, स्वार्थी राजकारणाचा परिपाक
दिल्ली निवडणुकीतील ‘आप’च्या पराभवाची जबाबदारी केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला आणि पंजाबातही पराभवच होणार आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनात केजरीवाल यांनी तत्त्वनिष्ठेचा आणि सत्यनिष्ठेचा मोठा आव आणला होता. मात्र, ही तत्त्वनिष्ठा आणि सत्यनिष्ठा आम आदमी पक्षाच्या स्थापनेच्या वेळीच लयाला गेली होती.
सर्वप्रथम लक्षात घ्यायचा मुद्दा हा की, हे आंदोलन कोणत्याही प्रकारे राजकीय नाही, आम्ही सारे राजकारणापासून दूर आहोत, असा गजर आंदोलनातील सारे सज्जन नेते उच्चरवाने करत होते. या गजरात आपणही कुठे कमी पडता कामा नये, यासाठी केजरीवालांनी आपल्या मुलांची शपथ घेऊन मी कधी राजकारणात उतरणार नाही, अशी प्रतिज्ञा जाहीरपणे केली होती. पण सारी पटकथा संघाने अगोदरच लिहिली होती.
त्या पटकथेचा पुढील भाग म्हणजे रामलीला मैदानावरचे केजरीवालांचे उपोषण. आपल्या नेतृत्वाचा खुंटा हलवून बळकट करून मग पक्ष स्थापन करण्यासाठी केजरीवाल उपोषणाला बसले. आपण ध्येयनिष्ठ त्यागमूर्ती आहोत, ही गोष्ट केजरीवालांना जनतेच्या मनात रुजवायची होती.
उपोषण यथेच्छ चालवल्यावर ज्या आंदोलनाने केजरीवालांना प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी दिली, ज्या आंदोलनात समाजातील सर्व स्तरातील लोक मोठ्या उमेदीने सामील झाले, त्या आंदोलनाने काहीच साधले जाणार नाही, म्हणून आंदोलनाचा मार्ग सोडून सत्तेच्या मार्गाने आम्ही परिवर्तन घडवणार, राजकीय सत्ता मिळवणार आणि त्यासाठी पक्षाची स्थापना करणार असे जाहीर करून केजरीवालांनी उपोषण सोडले.
मुलांच्या नावे केजरीवालांनी राजकारणात न उतरण्याची घेतलेली शपथ लोकांच्या विस्मरणात गेली. आंदोलनाने काही साध्य होणार नाही, म्हणून आंदोलन सोडून पक्ष स्थापन करणाऱ्या केजरीवालांनी मुख्यमंत्री झाल्यावरही किती वेळा आंदोलन केले ते सर्वविदित आहे.
दिल्ली विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत ‘आप’ला बहुमत मिळालं नाही, पण २८ जागा मिळवून प्रशंसनीय यश मिळवलं. केजरीवालांनी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला. भाजपला ३२ तर काँग्रेसला केवळ ८ जागा मिळाल्या. आपची स्वच्छ प्रतिमा, भ्रष्टाचारहिन कारभाराची हमी, पाणी वीज मोफत, महिलांना बस प्रवास मोफत, त्याचबरोबर आम्ही सामान्य जनतेप्रमाणे राहणार, संरक्षण घेणार नाही, सरकारी निवासस्थान आणि गाडी वापरणार नाही, रिक्षाने मंत्रालयात जाऊ, इत्यादी आश्वासने देत केलेल्या झंजावाती प्रचाराचे हे फळ होते. बहुमताला आठ जागा कमी होत्या. त्या काँग्रेसकडे होत्या.
काँग्रेसने भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी नाइलाजाने ‘आप’ला पाठिंबा दिला. केजरीवाल मुख्यमंत्री झाले. त्याआधी त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीत निवडणूक लढवली होती. त्या वेळी केजरीवाल म्हणत होते, मी सहजपणे दिल्लीतून खासदार बनू शकलो असतो. मी मोदींना हरवायला वाराणशीत आलोय, कारण मोदींपासून धर्मनिरपेक्षतेला धोका आहे. दिल्लीतील अल्पसंख्य समुदायाची मते, जी परंपरेने काँग्रेसकडे जात होती, ती आपल्याकडे वळवण्यासाठी केजरीवालांची ही चाल होती. काँग्रेसच्या पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री बनल्या बनल्या महिलांना मोफत बस सेवा, शंभर युनिटपर्यंत वीजबिलात माफी, मोफत पाणी, मोहल्ला क्लिनिक इत्यादी घोषणा प्रत्यक्षात आणल्याने केजरीवालांची लोकप्रियता शिगेला पोहोचली.
मग त्यांनी अचानक सरकारचा राजीनामा दिला. २०१५ झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ने ६७ जागा जिंकून विक्रम प्रस्थापित केला. भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या. तर काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. या निवडणुकीत ‘आप’ने सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिलेल्या काँग्रेसशी युती केली नव्हती. एकट्याच्या जोरावर हे अपूर्व यश खेचून आणलं होतं. मग यथावकाश केजरीवालांनी पंजाबमध्ये काँग्रेसला धोबीपछाड दिली.
दहा वर्षांच्या आत आणखी एका राज्यात आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं. ‘मोहल्ला क्लिनिक’, आदर्श शाळा, याचबरोबर दिल्लीसारख्या अन्य सवलती देण्याची आश्वासने ‘आप’च्या विजयाला जितकी कामी आली, तितक्याच प्रमाणात काँग्रेसमधील लाथाळ्याही आपला यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरल्या.
केजरीवाल अत्यंत धूर्त राजकारणी आहेत. पक्षात आपल्याला विरोध करतील, असे कुणी असताच कामा नये, शिवाय त्यांना स्वतःला व आपला ‘वामपंथी’ म्हणवून घ्यायचं नसल्याने त्यांनी प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यासारख्या समाजवाद्यांना पद्धतशीरपणे पक्षातून दूर जायला भाग पाडलं. त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या बाबतीत त्यांची भूमिका बऱ्याचदा ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ अशी राहिली. सीएए, एनआरसी या कायद्यांना त्यांनी विरोध केला नाही. जाहीर सभेतून ‘हनुमान चालीसा’चा पाठ म्हणून दाखवून आपणच खरे रामभक्त आहोत, भाजपपेक्षा जास्त हिंदुत्ववादी आहोत, हे ठसवण्याचा प्रयत्न केला.
एकाच वेळी हिंदू आणि अल्पसंख्याकांची मते आपल्याकडे खेचण्याची कसरत केजरीवाल करत होते आणि त्यांना यशही मिळाले. यशाने त्यांच्या वाढल्या आणि त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली.
तळपत्या ‘आप’ची काँग्रेसला झळ
यात एक गोष्ट केजरीवालांनी केली. प्रायः प्रादेशिक पक्षांविरुद्ध निवडणूक लढवायची नाही. त्यांच्याशी संबंध नेहमीच चांगले ठेवायचे. पण ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांची थेट लढत आहे, त्या ठिकाणी केजरीवाल निवडणुका लढवू लागले. गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश, हरियाणासारख्या राज्यांमध्ये त्यांनी निवडणुका लढवल्या. गुजरातेत त्यांना चांगली मते मिळाली. या साऱ्या राज्यांमध्ये ‘आप’ने भाजपच्या नव्हे तर काँग्रेसच्या मतांना कात्री लावून काँग्रेसच्या पराभवाला हातभार लावला. कारण काँग्रेसला कमजोर केल्याशिवाय आपली पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाही, हे केजरीवाल ओळखून होते. त्याची झळ काँग्रेसला बसत होती.
‘आप’ नेहमीच मतलबीपणे वागत राहिला. ‘इंडिया आघाडी’तही आप आणि काँग्रेस यांचे संबंध नरम-गरमच होते. त्यातूनच दिल्लीत आघाडी आणि पंजाबात लढाई अशी कसरत ‘इंडिया आघाडी’ टिकवण्यासाठी काँग्रेसला करावी लागली. इतकं करूनही आपले हरियाणात विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करून काँग्रेसला पराभवाच्या गर्तेत जाण्यास ‘आप’ने भाग पाडले.
इथूनच काँग्रेसने ‘आप’बाबत वेगळा विचार करायला सुरुवात केली. अर्थात, एवढे घडूनही राहुल गांधी दिल्लीत ‘आप’शी युती करायला तयार होते असे म्हणतात. पण ‘आप’ने सर्व सत्तर जागी उमेदवार जाहीर करून काँग्रेसला स्वबळावर लढायला भाग पाडले. दिल्लीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचाही स्वबळावर लढण्याचा आग्रह होता.
दिल्लीत लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या होत्या. या वेळी काँग्रेसने शून्याची हॅटट्रिक केली. काँग्रेसच्या मतांमध्ये नाममात्र दोन टक्के वाढ होऊन काँग्रेसला जेमतेम सव्वासहा टक्के मतदान झाले. स्वबळावर लढणाऱ्या ‘आप’च्या ४० जागा कमी होऊन त्याचे संख्याबळ २२वर आले. केवळ दोन टक्के अधिक मते मिळवून भाजपने ४८ जागा मिळवल्या आणि सरकार स्थापन केले. स्वतः केजरीवालही पराभूत झाले.
‘आप’चे पायही मातीचे निघाले...
चारित्र्यपूर्ण वैकल्पिक राजकारणाची हमी देऊन सत्तेवर आलेल्या केजरीवालांच्या पक्षाने निवडणुका जिंकण्यासाठी अन्य पक्षांप्रमाणे साऱ्याच भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब केला. एखाद्या भ्रष्ट व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसाला उमेदवारी देताना अन्य पक्ष जसा ‘इलेक्टोरल मेरिट’चा बहाणा बनवतात, तीच गोष्ट केजरीवालांनी तिकिटाचे वाटप करताना केली. इतकेच नव्हे तर ज्यांच्यावर स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांनाही (भाजपप्रमाणे) केजरीवालांनी निवडणुकीत ‘आप’ची उमेदवारी दिली. साध्या घरात राहण्याची प्रतिज्ञा केलेले केजरीवाल दोन बंगले जोडून वापरू लागले.
इतकेच नव्हे तर केजरीवालांनी आपल्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणावर आणि ऐशआरामासाठी, दिल्लीतील कोविड रुग्ण ऑक्सिजन अभावी प्राण सोडत असताना, कोट्यवधी रुपये खर्च केले. केजरीवालांचा हाच ‘शीशमहल’ भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला.
केजरीवाल स्वतःला अत्यंत पवित्र, सत्यवचनी वगैरे समजतात. राजा हरिश्चंद्रानंतरचा सत्यवचनी कोण असेल तर तो मीच, अशा आविर्भावात केजरीवाल वावरतात. ते जेव्हा इतरांवर कोणत्याही पुराव्याविना भ्रष्टाचाराचे आरोप करतात, तेव्हा त्यांनी त्वरित राजीनामा द्यायचा असतो; मात्र जेव्हा स्वतःची पाळी येते, तीही दारू परवान्याच्या वाटपामध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाने, तेव्हा ही राजा हरिश्चंद्राची तात्त्विक सात्त्विकता लोप पावते आणि अगदी तुरुंगात गेले, तरी राजा केजरीवाल मुख्यमंत्रीपदाला चिकटून राहतात.
विना संरक्षणात फिरण्याची प्रतिज्ञा धुळीत टाकून केजरीवाल संरक्षणात फिरतात आणि त्यांना केवळ दिल्ली पोलिसांचे संरक्षण पुरत नाही. पंजाब पोलिसांच्या संरक्षणाचे दुहेरी कवच घेतात आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा रुबाब दाखवतात. अधूनमधून गांधींच्या समाधीवर डोकं ठेवणारा हा तथाकथित ‘साधा मनुष्य’ मंत्रालयातली गांधीजींची तसबीर बाजूला काढण्याचा शहाणपणा करतो. आंबेडकर आणि भगतसिंगांचा अनुयायी असल्याचा बहाणा बनवतो, पण अंतर्यामी अत्यंत लबाड आणि भ्रष्ट असतो.
अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.
दिल्लीतल्या भाजपच्या विजयाने केजरीवालांइतकंच खोटं बोलणाऱ्या, तत्त्वशून्य आणि अहंमन्य असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी बळ मिळालं आहे. सोशल मीडियावर जाहीरपणे अश्लील शब्दांत विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या नवनिर्वाचित आमदार, मात्र संघ-भाजपचे बाळकडू घेतलेल्या रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात नेगी, परवेश वर्मा, कपिल मिश्रा अशांसारखे सामाजिक दुही माजवण्यात माहीर असलेले एकाहून एक रत्न सामील झाले आहेत.
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या पराभवाचे खापर ‘आप’चे प्रवक्ते काँग्रेसवर फोडताना दिसले. परंतु या निमित्ताने ‘आप’नेही काँग्रेसच्या पराभवाला किती राज्यांत किती वेळा हातभार लावून भाजपची ‘बी’ टीम म्हणून भूमिका निर्विवादपणे निभावली, याचाही विचार करायला हवा. अर्थात ‘आप’चा पराभव झाला असला, तरी भाजप आणि ‘आप’च्या मतांच्या टक्केवारीत केवळ दोन टक्क्यांचे अंतर आहे. तसेच त्यांना विधानसभेत २२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आप संपला, असे समजणे चुकीचे होईल.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
केजरीवाल महत्त्वाकांक्षी तर आहेतच, पण त्याचबरोबर ते अत्यंत लक्ष्यकेंद्री, चतुर आणि मेहनती आहेत. येत्या काही दिवसांत ते आपल्याला नव्या रूपात नवा प्रचार करताना पाहायला मिळतील. लोकांचे स्मरण अल्प असले, तरी तुम्ही लोकांना सदा सर्वकाळ भूल देऊ शकत नाहीत, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलीच असेल. अहंमन्यताही फार काळ टिकत नाही, ही गोष्ट त्यांना माहीत झाली आहे.तेव्हा येत्या काही काळात केजरीवाल आपल्याला नव्या रूपात पहावयास मिळतील आणि तत्त्वशून्यता, अहंमन्यता आणि खोटारडेपणा सोडून ते पुन्हा नव्या रूपाने राजकारण करतील अशी आशा आपण बाळगू या.
एकीकडे काँग्रेसला सतत तिसऱ्यांदा दिल्लीत भोपळाही फोडता आला नाही. म्हणूनच केजरीवाल हरल्याच्या आनंदात फार काळ न राहता काँग्रेसचे स्थानिक नेते जितक्या लवकर भानावर येतील, तितक्या लवकर काँग्रेसचं आणि या नेत्यांचं भलं होईल. राहुल आणि प्रियांका यांच्या लोकप्रियतेवर निवडणूक लढता येते, पण जिंकण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी लागते, याचं भान काँग्रेसच्या स्थानीय नेतृत्वाला येण्याची गरज आहे.
केंद्रीय नेतृत्वानेदेखील एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, काँग्रेसच्या नेत्यांकडे कार्यकर्ते आहेत, पण ते काँग्रेस पक्षापेक्षा त्या नेत्यांचे जास्त आहेत. त्यामुळे त्यांचे वैचारिक प्रबोधन झालेले असण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच जेव्हा त्यांचा नेता त्याच्या हितासाठी पक्ष बदलतो, तेव्हा त्याचे कार्यकर्ते काँग्रेसबरोबर न राहता त्या नेत्याबरोबर नेता ज्या पक्षात जातो, त्या पक्षात जातात. काँग्रेसला आता पक्षाच्या विचारसरणीशी बांधीलकी असलेले कार्यकर्ते निर्माण करायला हवेत, अन्यथा निवडणुकीत पराभवाची परंपरा खंडित होणे कठीण आहे.
‘समतावादी मुक्त संवाद’ मासिकाच्या मार्च २०२५च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. विवेक कोरडे यांची ‘जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ’, ‘गांधींची दुसरी हत्या’, ‘शहीद भगतसिंग’, ‘वैचारिक बंदुकांचे शेत’, ‘गांधीहत्येचे राजकारण’, ‘आरएसएस आणि नथुराम गोडसे’, ‘भगतसिंग, गांधी आणि सावरकर : अपप्रचारामागचे वास्तव’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
drvivekkorde@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment