ही आपलीच माणसं आहेत, हे शहर आपल्याइतकेच त्यांचेही आहे, हे समजून घेण्यासाठी ‘तिचं शहर होणं’ हा सिनेमा जरूर पाहावा...
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अंजली प्रविण
  • ‘तिचं शहर होणं’ या सिेनेमाची पोस्टर्स
  • Sun , 09 March 2025
  • कला-संस्कृती मराठी सिनेमा तिचं शहर होणं Ticha Shahar Hona

पुण्यातील २३व्या ‘लोकशाही उत्सवा’च्या निमित्ताने ‘तिचं शहर होणं’ या सिनेमाचा एक खेळ नॅशनल फिल्म अर्काइव्हमध्ये करण्यात आला. मागील वर्षी एप्रिलमध्ये काही सिनेमागृहांत या सिनेमाचे प्रदर्शन करण्यात आले होते, पण खूपच मोजके दिवस. आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र टोरंटो, एल ए, वॅक्युअर, स्वीडन, इस्तंबूल, फ्लोरेन्स, कान्स अशा अनेक महोत्सवांत हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला पुरस्कारही मिळाले आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या मराठी सिनेमाला महाराष्ट्रात मात्र ना सिनेमागृहे मिळतात, ना मराठी प्रेक्षक.

मुंबई शहरात उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय घरांत सफाई आणि जेवण करण्यासाठी वस्तीतून येणाऱ्या स्त्रीला ‘बाई’ म्हटले जाते. ‘कामासाठी बाई पाहिजे’, ‘बाई कामावर आली’, ‘बाईचे नखरेच जास्त असतात’ अशा चर्चा या वर्गात सुरू असतात. पण खरं तर प्रत्येकच स्त्री बाई असते. घरकामात मदत करते ती ‘मदतनीस’ असते.

‘आज बाई कामावर आली नाही’ या प्रसंगाने हा सिनेमा सुरू होतो. वेगवेगळ्या वर्गातल्या आणि जातीतल्या दोन स्त्रियांमधील साम्यभेदाच्या काही रेषा धूसर, तर काही ठळक दिसतात. या दोघींची एकमेकीशी होणारी ओळख हा सिनेमाचा गाभा आहे.

या सिनेमातील प्रमुख स्त्री पात्रांच्या आयुष्यातून समाजातील वर्गीय, जातीय, आर्थिक आणि सामाजिक साम्यभेद अतिशय संवेदनशील पद्धतीने मांडले आहेत. एकीकडे एका क्षुल्लक समारंभासाठी लाखो-करोडो रुपये खर्च करणारा समाज, तर दुसरीकडे वस्तीत मूलभूत सुविधा नसल्याने किड्या-मुंगीसारखा राहणारा समाज, हे महानगरी वास्तव आहे.

शहरातील उच्चभ्रू घरे स्वच्छ आणि चकचकीत ठेवणारे लाखो-करोडो लोक अस्वच्छ आणि गलिच्छ वस्तीत राहतात. तिथे स्वच्छ पाणी, हवा, वीज, रस्ता अशा गोष्टी नसतात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्यांना आवाजहीन करण्याचे शस्त्र म्हणून या वस्तीत घडणाऱ्या अपघातांना वापरले जाते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आधुनिक, सुशिक्षित, विवाहित माता आणि आयटीत नोकरी करणाऱ्या नायिकेची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. ती सवर्ण जातीतली असून उच्च मध्यमवर्गीय घरात राहणारी आहे. ती जरी सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या खंबीर असली, तरी ‘स्व’साठी मात्र खंबीर मत मांडू शकत नाही. ती घर, नवरा, नोकरी आणि मुलगी या सर्व गोष्टी ‘सुपर वुमन’ असल्याप्रमाणे सांभाळते, पण स्वतःला सांभाळताना मात्र कुठेतरी कमी पडत असते, हे दर्शवते.  

प्रसाद ओक यांनी नायिकेच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. तोही सवर्ण समाजातील सुशिक्षित व्यक्ती आहे. तो आधुनिक आहे, पण त्याच्या पुरुषी अहंकारातून लिंगभाव, वर्गीय आणि जातीय भेद प्रतिबिंबित होतो. छाया कदम यांनी वस्तीत राहणाऱ्या दलित स्त्रीचे पात्र साकारले आहे. ती शिक्षित नसली, तरी शिक्षणाचे महत्त्व जाणून आहे. घरकाम करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेली आणि वस्ती व स्वतःसाठी निर्णय घेणारी ही खंबीर स्त्री आहे. 

ओमकार गोवर्धन यांनी सामाजिक समस्यांची जाणीव असणाऱ्या आणि सामाजिक बदलांसाठी वस्ती पातळीवर काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणाची भूमिका साकारली आहे. हेमांगी कवी यांनी खंबीरपणे रिक्षा चालवणाऱ्या आणि वस्तीतीतील मूलभूत हक्कासाठी काम करणाऱ्या एकल स्त्रीचे पात्र साकारले आहे. सागर आणि मुग्धा या मित्र-मैत्रिणींच्या भूमिका छोट्या असल्या तरी उत्तम आहेत.

या सिनेमात भारताचे संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांची छायाचित्रं आणि पुस्तकं यांचा प्रतीकात्मक वापर केला आहे. एकीकडे उच्चभ्रू लोकांच्या घरी बुद्धाचे मोठे पेंटिंग्स लावलेले दिसते, पण तिथेच राग-मोह-लोभात अडकलेले घरही दिसत राहते. ‘जय भीम’ या शब्दांचा खूपदा परखडपणे उल्लेख केलेला आहे. त्या प्रत्येक ‘जय भीम’वर समोरील व्यक्तीचा न मिळणारा प्रतिसादही तितकाच बोलका असतो. चळवळीतील गाणी आणि मोर्चे यांची ताकद अतिशय सुरेख आणि संवेदनशील पद्धतीने दाखवली आहे.

वस्तीतल्या सामाजिक समस्यांवर कामे करणारे सामाजिक कार्यकर्ते शकील शेख यांनी दाखल केलेल्या २०१८च्या आरटीआय चौकशी अहवालानुसार मुंबईतल्या वस्त्यांत मागील १० वर्षांत ४८,४३४ वेळा आग लागण्याच्या घटना घडलेल्या असतात. त्यात ६००हून अधिक लोकांचे मृत्यू झालेले असतात. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ऑक्टोबर २०२४मधील बातमीनुसार २०२४मधील सात महिन्यांत मुंबईत ३१९७ आगीच्या घटना घडलेल्या होत्या. हे भयानक आकडे मन आणि मेंदू सुन्न करणारे आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मराठी भाषेत असलेला हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘City Personified’ या नावाने ओळखला जातो. याचे लेखन आणि दिग्दर्शन रसिका आगाशे यांनी केले आहे. यात ‘मेट्रोपॉलिटन’ मुंबई शहरातल्या सांस्कृतिक, वर्गीय, जातीय आणि लिंगभाव दर्शवणाऱ्या छटा मांडण्याच्या अप्रतिम प्रयत्न केला आहे. यासोबतच शीतल साठे यांची अर्थपूर्ण आणि बोधात्मक गाणी संवेदनशील आहेत. कलाकारांनी साकारलेल्या भूमिका, त्यांचा अभिनय, संवाद, गाणी आणि दृक्-छायाचित्रण यामुळे हा सिनेमा एक अद्भुत कलाकृती झाला आहे.

वाढती महागाई, बेरोजगार, शिक्षण-शेतीमुळे आलेला कजर्बाजारीपणा यांमुळे दरवर्षी लाखो लोक मुंबई-पुण्यात येतात. महागडी घरं परवडत नाहीत, म्हणून कोंदट, अस्वच्छ आणि मूलभूत सुविधा नसलेल्या वस्त्यांमध्ये राहू लागतात. या वस्त्याकडे शहरांतील उच्चभ्रू लोक ‘शहराला लागलेली वाळवी किंवा कचराकुंडी’ म्हणूनच पाहतात. या वस्त्यांमधील माणसं त्यांना सफाई - घरकाम अशा कामांसाठी हवी असतात, पण या वस्त्या मात्र नकोश्या असतात. 

‘तिचं शहर होणं’ या नावामुळे हा सिनेमा स्त्री या प्रमुख पात्राच्या अनुषंगाने आहे असे वाटते, पण तो फक्त एकट्या ‘ती’चा नक्कीच नाही. हा सिनेमा सामान्य लोकांचा आवाज आहे. हा समाज शहरांतील वस्तीत राहतोय, आपले हक्क आणि मूलभूत सोयींसाठी लढतोय. ही आपलीच माणसं आहेत, हे शहर आपल्याइतकेच त्यांचेही आहे, हे समजून घेण्यासाठी हा सिनेमा जरूर पाहावा.

.................................................................................................................................................................

लेखिका अंजली प्रवीण नेशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली इथं ‘फेअर ट्रायल फेलोशिप प्रोग्रॅम’मध्ये ‘डेटा विश्लेषक’ म्हणून कार्यरत आहेत. तसंच ‘क्रिमिनल जस्टीस सिस्टीम’च्या अभ्यासक आहेत.

amkar.anju@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......