अजूनकाही
‘गुटेनबर्गच्या सावल्या’ या पुस्तकात प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार भारतातील आणि मुख्यतः महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा घेतलेला आहे. या पुस्तकाला मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. वंदना महाजन यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
‘गुटेनबर्गच्या सावल्या’ या पुस्तकात प्रवीण घोडेस्वार यांनी भारतातील आणि मुख्यतः महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा घेतलेला आहे. हा आढावा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की, ज्ञानप्रसाराचे एक माध्यम म्हणून स्त्रिया जेव्हा प्रकाशन व्यवसायाचा विचार करू लागल्या, तेव्हा त्यांना आपल्या दुय्यमत्त्वाची जाणीव होती आणि या जाणिवेतून जगाला समतेचा विचार देण्यासाठी आणि मुख्यतः स्त्रियांच्या हक्काची, अधिकाराची मांडणी करण्यासाठी या व्यवसायात त्या उतरल्या.
यातील काही स्त्रियांचे प्रयत्न या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वृत्तपत्रात चालवलेल्या पाक्षिक सदराचे रूपांतर या पुस्तकात झाले आहे. त्यातून प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या विचारविश्वाचा परिचय करून देण्याचा आणि त्यांची ऐतिहासिक कामगिरी मांडण्याचा प्रयत्न प्रवीण घोडस्वार यांनी केलेला आहे. या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व निर्विवादपणे मान्य करावे लागेल. उर्वशी बुटालिया, रितू मेनन, चिकी सरकार, मिली ऐश्वर्या, नीता गुप्ता कार्तिकी व्हीके, नाझिया खान यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. या सर्व स्त्रिया महिलांच्या अधिकारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीवादी सिद्धांतनाची मांडणी करणाऱ्या आहेत.
उर्वशी बुटालिया आणि रितू मेनन यांनी ‘काली फॉर विमेन’ या प्रकाशनसंस्थेची स्थापना १९८४ मध्ये केली. स्त्रीवाद तसेच डाव्याविचारसरणी सहप्रागतिक विचारधारांना डोळ्यासमोर ठेवून प्रकाशन व्यवसाय सुरू करणाऱ्या या दोन्ही स्त्रियांनी लिंगभेद, धर्मांधता, सांप्रदायिकता, हिंसाचार यांची चिकित्सा करणाऱ्या समतावादी विचारांना डोळ्यासमोर ठेवून प्रकाशन व्यवसाय निष्ठेने चालवला.
उर्वशी बुटालिया यांनी २००३मध्ये ‘जुबान’ या स्वतंत्र प्रकाशन संस्थेची स्थापना करून इंग्रजी, हिंदी ग्रंथांबरोबरच वेगवेगळया प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय भाषांमधील भाषांतरित साहित्याचे दालन समृद्ध केले. रितू मेनन यांनी ‘काली फॉर विमेन’पासून वेगळे झाल्यावर ‘विमेन अनलिमिटेड’ या प्रकाशन संस्थेचीची सुरुवात करून अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन केले.
या दोन स्त्रीवादी प्रकाशकांचा यथार्थ परिचय या पुस्तकात घोडेस्वार यांनी करून दिला आहे. याचबरोबर चिकी सरकार यांनी प्रकाशन व्यवसायाला दिलेल्या आधुनिकतेची जोड तसेच बदलत्या काळात या व्यवसायात अनुरूप बदल करण्याच्या आवश्यकतेची नोंद घेतली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मिली ऐश्वर्या यांची प्रकाशन व्यवसायातील कारकीर्द ‘रूपा बुक्स’ने सुरू झाली. सध्या त्या ‘पेंग्विन रँडम हाऊस, इंडिया’मध्ये कार्यरत आहेत. नीता गुप्ता, कार्तिका व्हीके, नाझिया खान या सर्व प्रकाशात स्त्रिया आपल्या प्रकाशन व्यवसायातून प्रागतिक विचारधारा डोळ्यासमोर ठेवून पुस्तकांची निर्मिती करताना दिसतात. घोडेस्वार यांनी या सर्व स्त्रियांच्या प्रकाशन व्यवसायातील योगदानाची नोंद घेतली आहे.
आधुनिक काळातील भारतीय स्त्रियांच्या लिखाणाची सुरुवात कशा पद्धतीने झाली, पुढे त्याचा विकास कसा झाला, त्यातील स्थित्यंतराचे टप्पे कोणकोणते आहेत, यावर प्रकाश टाकून स्त्रियांच्या दडपलेपणाचा इतिहास शोधणे जसे आवश्यक आहे; तसेच या सर्व मुद्द्यांचे महत्व लक्षात घेऊन हा सगळा दस्तऐवज प्रकाशित करणाऱ्या स्त्रीवादी प्रकाशन संस्थांची गरज या सर्व स्त्रीवादी स्त्रियांनी पूर्ण केली, त्याची नोंद घेणेही आवश्यकच आहे.
जागतिक ज्ञानव्यवहार आणि प्रामुख्याने स्त्रियांच्या ज्ञान व्यवहाराची गरज पूर्ण करण्यासाठी या सर्व स्त्रिया पुरुषांचे वर्चस्व असलेल्या प्रकाशन व्यवसायात उतरल्या आणि त्यांनी आपला वेगळा वैशिष्ट्यपूर्ण ठसा या व्यवसायावर उमटवला. यामुळे स्त्रीवादी सिद्धांतनात मूलभूत भर पडली. स्त्रीकेंद्री इतिहास लेखनाची दृष्टी विकसित झाली. लिंगभावाची चर्चा आणि त्यातील समतादर्शी वाड्मयनिर्मितीच्या परंपरा या स्त्रीवादी प्रकाशन संस्थांनी नेटाने पुढे चालवल्या.
घोडेस्वार यांनी या सर्व स्त्री प्रकाशनाचा या ज्ञानव्यवहारातील हस्तक्षेप प्रकाशन व्यवसायाच्या आधारे त्यांनी कसा पूर्ण केला याचा आलेख मांडला आहे. जगभरातील स्त्रीवादी सिद्धांतने, इतिहास लेखनदृष्टी, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, विस्थापित समुदायांशी नाते जोडत या प्रकाशक स्त्रियांनी आपली प्रागतिक समताप्रवण प्रकाशकीय परंपरा निर्माण केली. या प्रकाशक स्त्रियांचा या पुस्तकातील आलेख प्रकाशन व्यवसायातील स्त्रीवादी प्रकाशन संस्थांमधील स्त्रियांच्या कामगिरीच्या इतिहास लेखनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.
या पुस्तकात उर्वरित पंधरा स्त्रिया या महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रिया आहेत. त्यातील सुमती लांडे यांनी २२ एप्रिल १९८४मध्ये ‘शब्दालय प्रकाशन’ची सुरुवात केली. सुमती लांडे या स्वतः एक संवेदनशील कवयित्री आहेत. मराठी प्रकाशन व्यवसायावर सुमतीबाईंनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. साहित्याची प्रगल्भ जाण असणाऱ्या सुमतीबाईंनी विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन मराठी प्रकाशन व्यवसाय समृद्ध केला.
‘शब्दालय’ दिवाळी अंकातून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषय हाताळले. त्यातून स्त्रीवाद आणि लिंगभावाच्या सिद्धांतनाला पाठबळ दिले. सर्जनशील आणि सैद्धांतिक साहित्य निर्मितीतील शब्दालयचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. वितरणासाठी पुस्तकांची गाडी घेऊन महाराष्ट्रात सर्वत्र फिरणाऱ्या सुमतीबाई यांनी अत्यंत धडाडीने प्रकाशनाबरोबरच वितरणव्यवस्था सांभाळली. ‘पुस्तक वितरण करणारी स्त्री’ बघण्याची सवय त्यांनी महाराष्ट्राला लावली. महाराष्ट्रातील प्रकाशन आणि वितरण व्यवसायातील पुरुषी वर्चस्वाला त्यांनी आव्हान दिले. त्यांचा कित्ता गिरवत आज अनेक स्त्रिया प्रकाशन आणि वितरण या दुहेरी व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहेत. याचे श्रेय सुमतीबाईंना द्यावेच लागेल.
डॉ. स्नेहल तावरे या मुळात मराठीच्या व्यासंगी प्राध्यापक आहेत. ‘स्नेहवर्धन प्रकाशन’चा भार त्यांनी अलगद पेलला आहे. १९९०मध्ये सुरू झालेल्या स्नेहवर्धन प्रकाशनाने नव्या, जुन्या लेखकांमध्ये पूल साधण्याचे काम केले आहे. अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ, समीक्षाग्रंथ आणि सर्जनशील कलाकृतींची निर्मिती स्नेहवर्धन प्रकाशकाने केली आहे. प्रकाशक म्हणून तावरे यांची कार्यपद्धती वैशिष्ट्यपूर्ण आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा अवलंब त्या सर्वच क्षेत्रात करतात, मग तो प्रकाशन व्यवसाय असो, प्राध्यापकी असो किंवा चर्चासत्र आणि विविध उपक्रमांचे आयोजन असो, डॉ. स्नेहल तावरे शांतपणे अगदी सहजतेने सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात .त्यांच्या याच सर्वांगीण कार्याचा परिचय घोडेस्वार यांनी करून दिला आहे.
अरुणा सबाणे या मुळात स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्याचबरोबर लेखिका, कादंबरीकार आहेत. त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेला पूरक अशा ‘आकांक्षा’ प्रकाशनाची सुरुवात २००३-४मध्ये केली. त्याआधी त्यांनी ‘आकांक्षा’ मासिकाची सुरुवात केली. मराठी साहित्यात आकांक्षा प्रकाशनाने अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन करून मराठी साहित्यात भर घातली आहे. ‘माहेर’ संस्थेची स्थापना करून स्त्रियांचे प्रश्न सोडवणाऱ्या अरुणाताईंनी विदर्भातून प्रकाशन व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे.
सुनिताराजे पवार यांनी २०२०मध्ये ‘संस्कृती प्रकाशन’ची स्थापना केली. अल्पावधीतच त्यांनी या व्यवसायात आपला जम बसवला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक मान्यवर लेखक तसेच नवोदित लेखकांची ५००च्या आसपास पुस्तके छापली आहेत. त्यांना मिळालेले यश उल्लेखनीय आहे असे नमूद करून घोडेस्वार यांनी एका खेड्यातील मुलगी ते यशस्वी प्रकाशक असा त्यांचा प्रवास चित्रित केला आहे.
मोहिनी कारंडे या देखील एक सुस्पष्ट वैचारिक भूमिका घेऊन प्रकाशन व्यवसायात उतरल्या आहेत. गुणवान पण दुर्लक्षित लेखकांचे साहित्य प्रकाशित करणे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे घोडेस्वार यांनी नमूद केले आहे. अनुवादाच्या क्षेत्रात मोहिनी यांनी विशेष लक्ष देऊन इतर भाषांमधल्या महत्त्वाच्या कलाकृती मराठीत आणल्या आहेत. ‘पृथा’ हा वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक त्या संपादित करतात.
सारिका उबाळे या मराठीतील महत्त्वाच्या कवयित्री आहेत. लिंगभाव आणि स्त्रीप्रश्नांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या प्रकाशन व्यवसायात उतरल्या आहेत. ‘मुक्ता’ या प्रकाशन संस्थेद्वारे त्यांनी जात, वर्ण, वर्ग, लिंगभेदाच्या जाणिवा जागृतीसाठी पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे.
याचबरोबर ज्योती कपिले, चंद्रलेखा दिंडे, लता गुठे या वेगवेगळ्या कारणांनी प्रकाशन व्यवसायात आलेल्या स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाची दखल या पुस्तकात घेतली आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या सर्व प्रकाशक स्त्रियांच्या कार्याचा यथोचित गौरव घोडेस्वार यांनी केला आहे. पुरुषी वर्चस्व असलेल्या प्रकाशन व्यवसायात या स्त्रिया आपला विशिष्ट वैचारिक हस्तक्षेप नोंदवत आहेत, या दृष्टीने या पुस्तकातील नोंदी महत्त्वाच्या आहेत.
मुळात प्रकाशन व्यवसायात कुटुंबातील सदस्य असल्यामुळे या व्यवसायात येणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या योगदानाची सार्थ दखल घोडेस्वार यांनी घेतली आहे. नीलिमा कुलकर्णी, भाग्यश्री कासोटे, अमृता कुलकर्णी, मीना कर्णिक, नम्रता मुळे, मधुमिता बर्वे इत्यादी प्रकाशन व्यवसायात कार्यरत स्त्रियांच्या कार्याची दखलही या पुस्तकात घेतली आहे .
प्रकाशन व्यवहार हा ज्ञानाच्या कक्षा विस्तारित करणारा व्यवहार आहे. या व्यवहारात व्यवसायिक मूल्यांपेक्षा ज्ञानाधिष्ठीत मूल्यांचा स्वीकार करणे आणि त्याची जपणूक करणे आवश्यक ठरते. या पुस्तकात आपापल्या वैचारिक परिप्रेक्ष्यानुसार या व्यवसायात मूल्यांची जपणूक करणाऱ्या स्त्री प्रकाशकांच्या कार्याचा परिचय प्रवीण घोडेस्वार यांनी करून दिला आहे.
‘गुटेनबर्गच्या सावल्या’ - प्रवीण घोडेस्वार
भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर | पाने : ११४ | मूल्य : २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment