अजूनकाही
‘‘जहाँपनाह’’ मध्यरात्रीनंतर निर्मनुष्य झालेल्या खुलदाबादच्या शेख झैनुद्दिन दर्ग्यामधील एका कोपऱ्यात स्थित बादशाह औरंगजेबच्या साध्याशा कबरीजवळ एक आवाज घुमला.
‘‘कौन?’’ काही क्षणांच्या शांततेनंतर त्या आवाजाला कबरीतून प्रत्युत्तर मिळाले.
‘‘मी आपला सेवक मिर्झा मुहम्मद काझीम.’’
“काझीम, तीनशे वर्षांनंतर तुला माझी आठवण का आली?”
“जहाँपनाह, दिल्लीत मी माझ्या कबरीत कयामतच्या दिवसाची वाट पाहत चिरनिद्रेत होतो. दिल्लीत कोलाहल फार. आपण या दक्खनमध्ये दफन झालात, हे बरेच झाले. तर तीनशे वर्षे चाललेल्या कोलाहलामुळेदेखील माझी चिरनिद्रा कधी भंग पावली नाही. पण काही दिवसांपूर्वी अचानक चारही दिशांनी आपल्या नावाचा गजर सुरू झाला आणि माझी चिरनिद्रा भंग पावली. आवाज कुठून येत आहे, याचा कानोसा घेऊ लागलो. तेवढ्यात बनारसमधून आपल्या नावाचा उल्लेख कर्कश्श आवाजात करण्यात आला. लक्ष देऊन ऐकले, तर तो हिंदुस्तानच्या प्रधान सेवकांचा आवाज होता. राहवले नाही म्हणून थेट येथे येऊन पोहोचलो.”
“प्रधानसेवक?”
“नरेंद्र मोदी.’’
“नाही काझीम. त्यांचा रुबाब पाहिलास? मला ते प्रधानसेवक नव्हे, तर आपल्या मध्ययुगातले शहेनशाह वाटतात. काय म्हणाले ते?”
“त्यांनी आपली आक्रमणकारी म्हणून हेटाळणी केली आणि म्हणाले की, या देशाच्या मातीचा गुण असा आहे की, जेव्हा एक औरंगजेब येतो तेव्हा येथे एका शिवाजीचा देखील उदय होतो,” काझीम बिचकत म्हणाले.
“आमच्या वीस पिढ्या या मातीत खपल्या. माझा जन्म तर गुजरातमधील दाहोड येथे झाला. माझ्या जन्मगावावर माझे फार प्रेम होते. मरण्यापूर्वी मी शाहजादा मुहम्मद आझमला पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की, तेथील गावकऱ्यांची दयाळूपणे काळजी घे. प्रधानसेवक मोदींचे जन्मगाव तेथून फक्त साठ मैल दूर आहे. मग मी या मातीतला नाही का? १८५७च्या उठावात तर आमच्या घराण्याने जे होते नव्हते, ते सर्व या मातीला समर्पित केले आणि आम्ही नामशेष झालो. आमच्या वंशाच्या शेवटच्या पादशाहला ब्रिटिशांनी ब्रह्मदेशात रंगूनमध्ये कैद करून ठेवले. तो बेचारा तेथेच दफन झाला. असे असताना मी आक्रमणकारी कसा?” औरंगजेब हसत हसत म्हणाले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
“जहाँपनाह, उत्तर सुभ्याचे सुभेदार योगी आदित्यनाथ तर उठसूठ त्यांच्या विरोधकांची तुलना आपल्याशी करत असतात.”
“लेकिन हे योगी म्हणजे संन्यासी. ते सुभेदार कसे झाले?”
“जहाँपनाह जम्हूरियत म्हणजे लोकशाहीत सर्व शक्य आहे.”
“हुं. आले लक्षात. मलादेखील लोक जिंदा पीर म्हणायचे. प्रधानसेवक मोदीदेखील स्वतःला ‘फकीर’ म्हणतात, असे ऐकले, ते खरे आहे काय?”
“हो, जहाँपनाह. ते अधूनमधून तसे म्हणतात. २०१९च्या निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी केदारनाथ जवळ एका गुहेत एक दिवस तपश्चर्या केली होती. गौडबंगाल सुभ्याचा सुभेदार निवडण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी दाढी अर्धा हात लांब वाढवली होती. तेव्हा ते खरोखर फकीर असल्याचा भास व्हायचा. गौडबंगालात अपयश आल्यानंतर त्यांनी ती पुन्हा कमी करत लोकसभा निवडणुकीपर्यंत पूर्वपदावर आणली. अलीकडे त्यांनी आपण ‘नॉन-बायोलॉजिकल’ असल्याचा दावादेखील केला आहे. परंतु त्यांच्या जीवनशैलीवरून ते फकीर असल्याचे वाटत नाही. आपण मात्र खरोखर जिंदा पीर वाटायचे.”
“लोकांना मी जिंदा पीर वाटावा, हे माझ्या फायद्याचे होते. किंबहुना त्यांना तसे वाटावे, असा प्रयत्न मीदेखील करायचो. या मुल्कात संन्यासी फकिरांना राजापेक्षा अधिक सन्मान दिला जातो. त्यांच्या समोर लोक आपली अक्ल गुंडाळून ठेवतात. प्रधान सेवक मोदी जे करत आहेत ते मी समजू शकतो.”
“जहाँपनाह, आपण अगदी योग्य बोललात.”
“काझीम तू एक इतिहासकार आहेस. तू माझ्या बादशाहीच्या पहिल्या दहा वर्षांचा इतिहास माझ्या आज्ञेने लिहिलास. त्यानंतर मी स्वतःच माझा इतिहास लिहिण्यावर बंदी घातली. परंतु मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, आजचा हिंदुस्थान माझ्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो. आज इतिहासामधे माझे काय स्थान आहे?”
“जहाँपनाह, आज इतिहासलेखनाचा एक नवीन दौर चालू आहे. पुराणकथांना इतिहासाचा दर्जा दिला जातो. ऐतिहासिक तथ्यांना वाकवून खोटा इतिहास लिहिला जातो आहे.”
हसत हसत औरंगझेब म्हणाले, “अरे, हे तर इतिहास विषयाचा जन्म झाल्यापासून चालू आहे. मी नाही का मला हवा तसा माझा इतिहास तुझ्याकडून लिहून घेतला.”
“होय जहाँपनाह. परंतु तुम्ही जे केले त्याला एक मर्यादा होती. आता इतिहासकार इतिहास लिहिण्यास घाबरतात. चित्रपटांचे पटकथाकार इतिहास लिहितात. व्हाट्सअप मदरस्यात आणि पाठशाळेत इतिहास लिहिला जातो.”
“पण काझीम हा आधुनिक काळ आहे ना?”
“नाही जहाँपनाह. हा आधुनिकोत्तर काळ आहे.”
“मग अजूनही लोक मध्ययुगात असल्यासारखे का वागतात?”
“कारण त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडता येते.”
“हूँ”
“तर मी म्हणत होतो की, नंतर तुम्ही इतिहासलेखन थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. उदाहरणच द्यायचे तर, दिल्लीमध्ये औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोड, असे ठेवण्यात आले आहे. हे एक इतिहासकार म्हणून माझ्यासाठी अधिक वेदनादायी आहे.”
“हूँ. पण काझीम, तू अजून माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले. आजच्या इतिहासात माझे काय स्थान आहे?”
त्यावर काझीमने कोणताही प्रतिसाद दिला नाही, तेव्हा औरंगजेब म्हणाले, “काझीम आपण दोघे आता अशा स्थितीत आहोत जेथे कोणी बादशाह नसतो आणि कोणी सेवक नसतो. त्यामुळे निश्चिंत होऊन मोकळेपणाने बोल.”
“जहाँपनाह, इतिहासाचे काही प्रामाणिक अभ्यासक आपल्याला तथ्यांच्या आधारावर समजून घेतात. परंतु सर्वसामान्य जनता आपल्याला अत्यंत क्रूर आणि धर्मवेडा समजते.”
“ते मला क्रूर का समजतात?”
“कारण आपण आपल्या बंधूंना मारून टाकले आणि आपल्या अब्बाजानला तुरुंगात ठेवले.”
“काझीम, सियासत भावनाशून्य असते. मी माझ्या भावांना मारले नसते तर त्यांनी मला मारून टाकले असते. मी ऐकले आहे की, प्राचीन काळात मगधमध्ये अजातशत्रू नावाच्या राजकुमाराने आपला पिता सम्राट बिंबिसाराची हत्त्या करून सिंहासन काबीज केले. सिंहासनाकडे जाणारा मार्ग असा रक्ताने माखलेला असतो. मी तर मरहूम अब्बाजानला केवळ आग्र्याच्या किल्ल्यात स्थानबद्ध केलं. प्रधानसेवक मोदींनी देखील पितृसमान अडवाणींना राजकीय विजनवासात पाठवले ना? अच्छा, लोक मला धर्मवेडा का समजतात?”
“कारण आपण मंदिरांचा विध्वंस केला.”
“मी जितक्या मंदिरांचा विध्वंस केला, त्यापेक्षा कितीतरी अधिक मंदिरे, मठ, धर्मशाळा, ब्राह्मण आणि गोसाव्यांना इनाम जमिनी दिल्यात. सुभेदार योगी आदित्यनाथच्या नाथ संप्रदायालादेखील मी इनाम दिले होते. मी मंदिरे तोडली. आता मस्जिदी तोडल्या जात आहेत. मंदिरे तोडली गेली आणि त्यावर मस्जिदी उभारल्या गेल्या त्यामागे सियासत होती. आता मस्जिद तोडून त्यावर मंदिर उभारले जात आहे त्यामागे देखील सियासत आहे.”
“जहाँपनाह, आपण हिंदूंवर पुन्हा जिझिया लादला...”
“माझ्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात सर्वत्र बंडाळी माजली होती. काही ठिकाणी मुसलमानांनीदेखील मुघल साम्राज्यविरोधात बंडाळी केली. आजकाल शहेनशाह मोदी नाही का, वैविध्यपूर्ण हिंदू समाजाच्या एकगठ्ठा मतांसाठी अनेक क्लृप्त्या लढवितात. मीदेखील माझ्या नेतृत्वाखाली मुसलमानांची एकजूट करण्यासाठी क्लृप्त्या लढवत होतो. मुसलमानांमध्येदेखील वैविध्य होते ना. अरब, अफगाण, इराणी, तुर्क, उझबेग आणि मंगोल. त्यात आम्ही मुघल म्हणजे सर्वांची सरमिसळ. तर हिंदूंवर जिझिया लादून मला हिंदू मुसलमान द्वैत निर्माण करता येईल आणि त्यामुळे निदान मुसलमान तरी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विचार मी केला होता. अरे, मी धर्मवेडा असतो तर १६५८ साली बादशाह झालो, तेव्हाच जिझिया लादला असता. तो लादण्याचा निर्णय मी एकवीस वर्षांनंतर १६७९ साली का घेतला? अच्छा मला सांग प्रधानसेवक मोदी निदान माझ्या मरहूम पणजोबा बादशाह अकबरबद्दल तरी चांगले बोलतात की नाही?”
“नाही जहाँपनाह, ते बादशाह अकबरचे नावसुद्धा घेत नाहीत. कारण त्यांचा उल्लेख केल्यास गोची होते. याला आजकाल ‘अनुल्लेखानं मारणं’ असंसे म्हणतात.”
“जहाँपनाह, आपल्या धार्मिक वेडापायी हिंदूंच्या विद्रोहांमुळे मुघल साम्राज्याचे पतन झाले, असे प्रधानसेवक मोदींचे पक्षवाले म्हणतात.”
“ते हिंदूंचे नव्हे, तर शेतकऱ्यांचे विद्रोह होते. विद्रोह करणारे जाट, सतनामी हे शेतकरी होते. आमचे जागीरदार शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करायचे.”
“जहाँपनाह, शेतकऱ्यांची स्थिती तर आजदेखील फार वाईट आहे. हजारो शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतात. मागे दिल्लीजवळ शेतकऱ्यांनी शहेनशाह मोदींच्या कृषी कायद्यांविरुद्ध मोठे आंदोलन उभे केले. त्यात हिंदू, शीख आणि मुसलमान शेतकरीदेखील सामील झाले होते. शेतकऱ्यांच्या एका गटाने तर काही काळ लाल किल्ला ताब्यात घेतला. असे पूर्वी कधीच झाले नव्हते. प्रधानसेवक मोदींना देशाची माफी मागून ते कायदे मागे घ्यावे लागले.”
“आजकाल हिंदुस्तानची आर्थिक स्थिती कशी आहे?”
“जहाँपनाह, मला तर आपल्या आणि आताच्या काळातील आर्थिक स्थितीत काही जास्त फरक वाटत नाही. एक टक्का लोकांकडे देशाची तेहतीस टक्के संपत्ती आहे, तर पन्नास टक्के लोकसंख्येकडे सहा टक्के संपत्ती आहे. हिंदुस्थान जगातल्या सर्वांत जास्त आर्थिक विषमता असलेल्या मुलकांपैकी एक समजला जातो. आपल्या काळात शांतीदास झव्हेरी, वीरजी वोहरा आणि माणिकचंद जगत सेठसारखे मोठमोठे धनवान होते. त्यांच्या आर्थिक ताकदीचा आपल्यासारख्या शक्तिशाली बादशाहवरदेखील वचक होता. आता अंबानी आणि अदानी हे दोन मोठे जगत सेठ आहेत. त्यांचादेखील फार दरारा आहे, असे मला समजले. कधी कधी प्रधानसेवक मोदी मनाला वाटेल तसे विचित्र निर्णय घेतात. काही वर्षांपूर्वी रात्री अचानक त्यांनी जाहीर केले की, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा या केवळ ‘कागज का तुकडा’ आहेत.”
‘‘काय नोटा अचानक रद्द केल्या? प्रधानसेवक मोदींनी काळजी घेतली पाहिजे. मुघल साम्राज्याचा डोलारा कोसळला, त्यामागे आमची आर्थिक दिवाळखोरी हे एक मोठे कारण होते.”
“जहाँपनाह, आपण तर जाणताच की, प्रत्येक मोठ्या सुलतान आणि बादशहांनी सहा शहरे वसवली आणि त्यांना सामावून आजची दिल्ली उभी राहिली. नंतर ब्रिटिशांचे राज्य आले. त्यांनी नवी दिल्ली वसवली. आता प्रधान सेवक मोदींनी दिल्लीत ‘सेंट्रल विस्टा’ नावाचे एक नवीन शहर वसवले आहे. आपण मात्र या बाबतीत फार उदासीन होता. आपण मागे कोणतीही सुंदर वास्तू सोडून गेला नाहीत.”
“काझीम पैशाचे सोंग आणता येत नाही. आमच्या मरहूम अब्बाजानने सुंदर आणि भव्यदिव्य वास्तू बांधण्यात तिजोरी खाली करून टाकली. मी वास्तू बांधल्या असत्या, तर त्यासाठी प्रजेकडून आणखी कर वसूल करावा लागला असता. त्यामुळे मी तो नाद सोडला. तू पाहतोच आहे की, माझ्या या कबरीवर छतदेखील नाही. वरती केवळ मोकळे आकाश आहे.”
‘‘होय जहाँपनाह, आजकाल हिंदुस्तानात महागाई फार वाढली आहे. ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ अशी स्थिती आहे.”
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
“काझीम, मी असे ऐकले आहे की, प्रधानसेवक मोदी आमच्यासारखेच फार मेहनती आहेत.”
“होय जहाँपनाह, ते दिवस-रात्र मेहनत करतात. सरकारचे सर्व निर्णय तेच घेतात आणि त्यांचे मंत्री केवळ अंमलबजावणी करतात. कोणत्याही सुभ्यात इंतिखाब असो, ते स्वतः तेथे मुक्काम ठोकतात आणि फतेह हासील करण्यासाठी जीवाचे रान करतात. त्यांच्या नावानेच इंतिखाब लढवली जाते. सर्व सुभेदार आणि मंत्री त्यांच्या समोर मान खाली घालून उभे राहतात. ते सांगतील तेच करतात.”
“लेकिन हे योग्य नाही. मीदेखील ही गलती केली होती. यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या राज्यकर्त्याने कटू सत्य सांगणारी माणसे नेहमी जवळ ठेवायला हवी. मी मात्र खुशमस्कऱ्यांनी वेढलो होतो. आम्हाला कोणावरही भरवसा नव्हता. मीदेखील एकटेच सर्व निर्णय घ्यायचो. प्रांतीय सुभेदारांच्या प्रत्येक कामात नाक खुपसायचो. त्यामुळे माझ्या मंत्री आणि सुभेदारांची पुढाकार घेण्याची क्षमता नष्ट झाली. मी भविष्यकाळासाठी कल्पक, काबील मंत्री आणि सुभेदारांची पिढी निर्माण करू शकलो नाही. याउलट शिवाजीने माणसे घडवली. शिवाजीच्या मृत्यूनंतर मी सत्तावीस वर्षे मराठ्यांशी लढलो. संभाजीला मारले. राजारामाला जिंजीमध्ये आठ वर्षे अडकवून ठेवले, पण शिवाजीची माणसे पुढे येऊन राजाच्या मार्गदर्शनाशिवाय माझ्याशी लढली. माझ्यानंतर मात्र मुघल साम्राज्य कोसळले. ते वाचवू शकतील अशी माणसे मी घडवू शकलो नाही. मेहनत करणे आणि मुत्सद्देगिरी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला प्रश्न पडतो की, प्रधानसेवक मोदीनंतर त्यांच्या पक्षाचे काय होईल?”
“जहाँपनाह, मी मगापासून पाहतो आहे की, आपण प्रधानसेवक मोदींबद्दल फारच सहानुभूतीने बोलत आहात. आपल्याला त्यांचा राग येत नाही का?”
“राग कसला काझीम? मी आणि ते, आम्ही दोघेही सियासतदान माणसं आहोत. मी जे केले, तेच ते करत आहेत. फक्त काळाचा संदर्भ बदलला आहे. पण आयुष्याच्या अंतिम क्षणी मला पश्चाताप करण्याची वेळ आली होती. मी राजपुत्र आझमला लिहिले होते की, हे अमूल्य आयुष्य मी वाया घालवले. मी प्रजेचे, शेतकऱ्यांचे कल्याण करू शकलो नाही. मी या जगात एकटा आलो, एकटा जात आहे आणि भविष्याबद्दल आता काही आशा नाही. प्रधानसेवक मोदींवर ती वेळ येऊ नये, एवढेच मला वाटते.”
पहाट होणार होती. औरंगजेबाच्या कबरीभोवती शांतता पसरली.
(कमलेश्वर यांच्या ‘कितने पाकिस्तान’पासून प्रेरित.)
.................................................................................................................................................................
लेखक श्याम पाखरे इतिहासाचे अभ्यासक आहेत.
shyam.pakhare111@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment