अजूनकाही
‘लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा लपेल का...’
कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांची ही रचना माहीत नाही किंवा ऐकली नाही, असा गेल्या पिढीतील मराठी माणूस सापडणे अवघडच. पण या दोन ओळींमध्ये त्यांनी एक महत्त्वाचे सत्य सांगितले आहे. कितीही प्रयत्न केला, तरी हिरव्या चाफ्याचा वास कुणालाच अडवता येत नाही. भले हिरव्या चाफ्याचं फूल लपवून ठेवले तरी!
हीच गोष्ट सत्यालाही लागू पडते. सत्य दडवून ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते कधी ना कधी उघड होतेच. तुम्ही लाख प्रयत्न कराल, पण सत्य पूर्णपणे दडवण्यात यशस्वी होता येणार नाही. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की, कोंबडं झाकून ठेवलं तरीही सूर्य उगवतोच, तसेच सत्याचेही असते.
असे असले, तरी सध्या आपल्या देशात सत्तारूढ पक्षाकडून वारंवार असे प्रयत्न केले जात आहेत. आणि अनेक वेळा तर त्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी वास्तव जनतेला ठाऊक होतेच आहे. पण म्हणून त्या पक्षाने अद्याप ही सवय सोडलेली नाही. बऱ्याच वेळा सत्य काय ते उघड होण्यास काही वेळ लागतो, तोवर लोक सारेकाही विसरून जातील, असे त्यांना वाटत असावे. पण लोक पुरते कधीच विसरत नाहीत, हे त्यांना माहीत असायला हवे.
जसे की, लोकसभा निवडणुकीआधी त्यांचा एक नेता म्हणाला होता की, आम्हाला ४०० जागा हव्या आहेत. कारण तशा त्या मिळाल्या तरच आम्हाला आपले संविधान बदलता येईल. यावर बरीच टीका झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या मोठ्या नेत्यांनीदेखील आम्हाला तसे काही करायचे नाहीय असे वारंवार सांगितले. तरीही लोकांचा विश्वास त्यावर नव्हता. (कारण त्यांना अनुभव होता की, हे लोक सांगतात त्यानुसार कधीच वागत नाहीत.) त्यांचा आपला कुटील हेतू झाकून ठेवण्याचा प्ररत्न आपल्याच एका नेत्यामुळे फसला, हे त्यांना जाणवले. खरे काय ते अगोदरच बाहेर आले होते. त्यामुळेच त्या संविधान बदलण्याची भाषा लोक विसरले नाहीत आणि त्यांनी सत्तारूढ पक्षाला बऱ्यापैकी हादरा दिला, परिणामी त्यांच्यावर थोड्या प्रमाणात का होइना मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार, हे स्पष्ट झाले होते.
इतके होऊनही त्यांनी यापासून काही बोध घेतलेला नाही, हे त्यांच्या नेत्यांच्या भाषणांवरून स्पष्ट दिसते. कारण अशीच वादग्रस्त ठरणारी विधाने ते अजूनही करतच आहेत, बहुधा लोकांचा कल काय आहे, हे पाहण्यासाठीही हे केले जात असावे. शिवाय चटकन माफी मागून दिलगिरी व्यक्त केली की, लोकांना पटते, अशा समजुतीत ते असतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
तर मूळ विषय होता सत्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या सवयीचा. अर्थात लोक हे बऱ्याच काळापासून अनुभवत आहेत. त्यामुळे आता ते जास्त सतर्क राहतात. दशकापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने भरमसाठ आश्वासने दिली होती. त्यानंतर ती पुरी करण्यात आल्याचे सांगितले जात होते. आपल्या अपयशावर पांघरूण घालण्याची ही चलाखी. पण लोकांना हळूहळू ही चलाखी, पर्यायाने त्यांचे अपयश जाणवू लागले होते. दाऊदला आजवरही भारतात आणता आलेले नाही, भ्रष्टाचार नष्ट करण्यात यश आले, असे सांगून अपयश लपवण्याचा प्रयत्न केला, तरी जनसामान्यांना तो पदोपदी अनुभवाला. १५ लाखांच्या आश्वासनाची पूर्ती झाली नसल्याचे लोक बोलल्यानंतर पुन्हा तो जुमला होता, असे शहाजोगपणे सांगितले, तरी त्यांच्या फसवेगिरीवर प्रकाश पडलाच.
नोटाबंदीनंतर झालेल्या प्रचंड गोंधळात बँकांबाहेरील रांगांमध्ये दीर्घकाळ उन्हात उभे राहिल्यानं किती जणांचे बळी गेले, किती लहान उद्योजकांना रोजीरोटीला मुकावे लागले आणि उपजीविकेच साधनच न राहिल्याने किती कुटंबांना मोठ्या शहरांतून पुन्हा त्यांच्या गावाकडे वळावे लागले, याचे आकडेही कधी सांगितले गेले नाहीत, तरी ते वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या पाहण्यांमुळे उघडकीला आलेच.
मुख्य म्हणजे अर्थतज्ज्ञांनी हा मार्ग योग्य नाही, त्याचा उपयोग होणार नाही, असे सांगितले असतानाही नोटाबंदी केली, या इलाजामुळे सगळा काळा पैसा बाहेर आला असे सांगितले गेले, तरी त्यांच्याच रिझर्व्ह बँकेने दिलेल्या, किती जुन्या नोटा जमा झाल्या या आकडेवारीवरून हे सिद्ध झाले, की काळा पैसा बाहेर आलेलाच नाही. तरीही तोच डिंडिम पिटण्यात येत होता, पण रिझर्व्ह बँनेच्या आकडेवारीने काळा पैसा नष्ट करण्याचा मूळ उद्देश फसल्याचे स्पष्ट झाले. कुणी असेही म्हणतात की, तो निवडणुकीसाठी सत्तारूढ पक्षानेच वापरला.
लोकसभेच्या २०१९मध्ये होणाऱ्या निवडणुकीआधी पुलवामा घडवण्यात आले. घडवण्यात आले, असे म्हणण्याचे कारण असे की, त्याबाबत आजवर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले नाही. मुळात अतिरेक्यांना /दहशतवाद्यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची वाहने जाण्याचा रस्ता कसा कळला, आपल्या गुप्तचर विभागाला याची माहिती का मिळाली नाही, ते त्यांचे अपयश लपवण्यात आले. ही जवानांची वाहतूक विमानाने का केली गेली नाही, पंतप्रधानांना या घोर प्रकाराची माहिती देण्यात आली तेव्हा ते अभयारण्यात गेले होते आणि त्यांनी ‘सायंकाळपर्यंत हे जाहीर करू नका’, असे का सांगितले, ते लगेच तेथे का गेले नाहीत, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत आणि त्यांना उत्तर देण्याचे टाळून सत्य झाकून ठेवण्यासाठीच ते केले गेले.
तीच बाब ‘घर में घुसके’ मारा या वल्गनेबाबतची. त्यासंबंधीही अनेक प्रश्न विचारले गेले. मारा करण्यासाठी गेलेल्या विमानांची संख्या, तेथे दहशतवाद्यांचे-अतिरेक्यांचे कितीजण मारले गेले, त्याबाबत जी छायाचित्रं प्रसृत केली गेली, त्यांच्या खरेपणाबाबतही शंका व्यक्त केल्या गेल्या. त्यांना दुजोरा मिळाला, कारण लष्कराच्याच एका अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले की, कॅमेरा असलेल्या विमानाचे उड्डाणही काही बिघाडामुळे झालेच नव्हते. तिकडे शत्रूनेही जाहीर केले की नष्ट करण्यात आलेल्या इमारतींत कुणीच नव्हते. पण हे सगळे निवडणुकीसाठी लोकाच्या देशप्रेमाला आवाहन करण्यासाठीच केले गेले असावे. कारण या प्रसंगांपूर्वी विरोधकांची बाजू बळकट होत असल्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे सत्य लपवल्याने सत्तारूढ पक्षाचाच लाभ झाला. कारण सत्य बाहेर आले, तेव्हा उशीर झाला होता.
त्यानंतर देशात कोविडची लाट आली. त्यावर आम्ही लगेच उपाययोजना केल्याने फारशी हानी झाली नाही. कारण आम्ही सर्वांना मदत केली, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले. मग अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तसेच औषधांचा तुटवडा का पडला, गुजताथमधून काश्मीरला पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सच्या पार्सलमध्ये सारेच निरुपयोगी कसे निघाले, मुळात ते बनवण्याचे काम त्याबाबतचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला का दिले गेले, हे सारे दडवण्याचेच प्रयत्न झाले होते.
‘टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे घालवा आणि काळोखातच प्रर्थना करा, दिवे लावा’ या उपायांनी कोविडवर मात करता येईल, हे सांगण्यास कसला शास्त्रीय आधार होता का, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर इत्यादींवर पुष्पवृष्टी केल्याने काय साधले, त्यांचा रुग्णसेवेचा वेळ वाया गेला नाही का, आणि हेलिकॉप्टरवर खर्च करण्याऐवजी तो हॉस्पिटलांना दिला असता, तर त्याचा अधिक उपयोग झाला नसता काय, या प्रश्नांची उत्तरे कधीच दिली गेली नाहीत, तीही सत्य उघडकीस येईल म्हणूनच.
याहून भयानक प्रकार म्हणजे साथ आल्यानंतर काहीही पूर्वसूचना आणि लोकांना तयारीसाठी जेमतेम चार तासांचाच वेळ न देता अचानक टाळेबंदी केल्याने अनेकांचे हाल झाले, कित्येकांवर आपल्या गावांकडे परतण्याची वेळ आली, पण वाहनांची सोय नसल्याने बिचारे पायीच शेकडो मैलांचे अंतर चालत जात होते. त्यात काहीजण रेल्वे रुळांवर झोपल्याने मरण पावले तर कित्येकजण अतिश्रमांमुळे. पण या मृतांचा आकडाही लपवण्यात आला. गाजावाजा मात्र आपण किती मदत केली याचा.
तीच बाब कोविडमुळे मरण पावलेल्यांची. त्यांची संख्याही जाहीर केली गेली नाही, आणि काही काळानंतर, इतर राष्ट्रांनी त्यांच्याकडील मृतांची संख्या जाहीर केल्यानंतर जाहीर करण्यात आली खरी, पण तेव्हांही खरा मोठा आकडा लपवण्याचा प्रयत्न झाला, इतर देशांपेक्षा आम्ही किती चांगली उपाययोजना केली, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. खरे प्रयत्न करणार्या राज्यांनाही मदत करण्यात. योग्य सामग्री आणि औषधांचा पुरवठा न करता, अडथळे आणले गेले, दडवले गेलेले सत्य जगाला कळले, ते गंगेत वाहणाऱ्या असंख्य प्रेतांमुळे आणि काठावरील असंख्य चितांमुळे.
यामुळेच ‘शववाहिनी गंगा’ ही कविता लिहिली गेली. तीही गुजरातमधील एका कवयित्रीकडून. कोविडविरोधासाठी खर्या तज्ञांचे मार्गदशर्न का घेतले नाही आणि ज्यांनी तज्ज्ञांबरोबर चर्चा करून काही उपाय सुचवले, तर सुरुवातीला त्यांची टिंगल केली, नंतर मात्र आपणच चांगले इलाज केल्याचे सांगितले, पण ते तर तज्ज्ञांबरोबर विरोधी पक्षनेत्याने केलेल्या चर्चेत आधीच सुचवले गेले होते. मग ही लपवाछपवी का केली असाही प्रश्न पडतो.
कोविडविरोधात आपणच लस तयार केली आणि जगाला पुरवली, अशी शेखी मिरवताना मुळात ते ज्ञान इंग्लंडच्या कंपनीकडून घेतले गेले होते आणि सुरुवातीला लस त्यांनाच पुरवण्यात आली होती, हे का लपवले गेले, याला उत्तर नाही. पण तेही उघडकीस येण्याचे राहिले नाही.
शाहीन बागेतील निदशर्कांसमोर, यांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे सांगणार्या त्यांच्या नेत्याला शिक्षा का देण्यात आली नाही, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या, आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही येथून हलणार नाही, असे सांगणाऱ्या शेतकऱ्यांना मोटरखाली चिरडणारा त्यांच्या नेत्याचाच मुलगा होता, पण त्याच्यावर काय कारवाई का करण्यात आली नाही, हे दडवण्यातच आले. देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कुस्तीगीर महिलांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्याही संसद भवनापासून थोड्याच अंतरावर निदशर्ने करत होत्या, पण त्यांची दखल न घेता उलट पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून फरफटत का नेले याचे उत्तरही गुलदस्त्यातच. ज्याच्या चौकशीची मागणी त्या करत होत्या, तो सत्ताधारी पक्षाचाच खासदार आणि त्याच्यामुळे काही जागा निवडणुकीत मिळणार होत्या म्हणूनच कुस्तिगीर महिलांच्या मागणीके दुर्लक्ष केले गेले का, याबाबतही चकार शब्द काढण्यात आला नाही. ‘अळीमिळी गुपचिळी’चाच हा प्रकार, किंवा आम्ही पाहिले नाही, आम्ही ऐकले नाही आणि आम्ही बोलणारही नाही, अशीच भूमिका घेतली की काय अशी शंका यावी.
आणि आता कुंभमेळा. तो बुधवारी महाशिवरात्रीला संपला. अनेक दिवस त्याची मोठी जाहिरात करण्यात आली, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. आपण पंतप्रधानांचे वारस हे दाखवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हे केले. तेथे जाऊन वारंवार स्नान केले, त्यामुळे पंतप्रधानांनीही आपले महत्त्व टिकावे म्हणून तसेच केले. विक्रमी लोक येणार त्यांची झकास व्यवस्था केली जाईल, असेही सांगण्यात आले होते.
प्रत्यक्षात मात्र केवळ व्हीआयपी लोकांचीच पंचतारांकित सोय करण्यात आली. बाकीच्यांनी स्वतःची सोय बघावी, असेच धोरण होते का याबाबतही मौन. मौनी अमावास्येला पहाटे अचानक गर्दीमुळे झालेल्या गोंधळात अनेकांना जीव गमवावा लागला. पहाटेच्या त्या कोलाहलात झोपण्यासाठी जागा न मिळाल्याने उघड्यावरच झोपलेले अनेकजण पायदळी तुडवले गेले, तर काही जण पळता पळता पडल्याने लोक त्यांना तुडवून गेले, पण तेथेही पोलीस नव्हते. ते तर बड्यांच्या त्सेवेत गर्क होते.
तेथेही मृतांचा आकडा लपवण्याचाच प्रयत्न झाला. कोट्यवधी लोक स्नानासाठी आले, एका दिवसात कोटींनी स्नान केले वगैरे बातम्या मात्र आल्या. तेथे संगमावर एवढे लोक कसे सामावले गेले हे कुणीच सांगत नाही. मुळात येणाऱ्यांची संख्या फुगतच होती, शिवरात्रीला येणाऱ्यांची संख्या ६४ कोटींपेक्षाही अधिक होईल अशा जाहिरातीही करण्यात येत होत्या. पण प्रयागराजमध्ये एवढे लोक कसे सामावले गेले, या महाप्रश्नाबाबत काहीच बोलले गेले नाही. महाकुंभाची महाजाहिरात करून लोकांची दिशाभूल केली ती त्यांची मते डाळ्यासमांर ठेवूनच का असा अनुत्तरित प्रश्न.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
याच काळात महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवर अलोट गर्दी झाली होती. त्यांना एवढी तिकिटे कशी दिली गेली, गाड्या कोणत्या फलाटावर येणार हे ठरलेले असताना त्यांत अचानक बदल झाल्याची घोषण करण्यात आली आणि त्यामुळे दुसर्या फलाटावर जाण्याच्या धांदलीत कुणीतरी जिन्यावरून पडले आणि त्यामुळे लोकांच्या योग्य फलाटावर जाण्यासाठी घाई करणार्या मोठ्या लोंढ्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली. तीमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. पण रेल्वेमंत्र्यांनी सुरुवातीला असे काही घडलेच नाहीय, या केवळ अफवाच आहेत असे सांगून कातडी बचावण्याचा प्रयत्न केला.
पण नंतर सोशल मीडियावर या घटनेची छायाचित्रं प्रसारित झाली. खुद्द पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात आपण सहगभागी असल्याचे सांगितल्यानंतर मात्र रेल्वे मंत्र्यांनी काही जण चेंगराचेंगरीत मरण पावल्याचे सांगितले आणि मृतांचा आकडा केवळ १८च सांगितला. पण त्याबाबत शंका व्यक्त होत होत्या. आणि मृतांच्या आप्तांना मदत देण्याचे जाहीर करून ती लगेचच रोखीने देण्याची तत्परता दाखवली गेली. या प्रकारे रोखीने मदत देता येते का, एवढ्या रात्री रेल्वेकडे एवढे पैसे कसे आले याबाबत पुन्हा लपवाछपवीच.
अर्थात एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे या प्रसंगी एवढी तत्परता दाखवणाऱ्या या मंत्र्याने गेल्या काही वर्षांच्या त्याच्या काळात काही मोठे अपघात झाले, त्यात अनेजण दगावले, तरी राजीनामा देण्याची तत्परता का दाखवली नाही, हा प्रश्नही अवघडच. पण त्याचे उत्तर मिळण्याची शक्यता नाहीच.
तसे पाहिले तर अनेक जणांबाबतही हेच धोरण. ‘गोली मारो सालोंको’ म्हणणारा मोकाट सुटला, एका मुस्लीम खासदाराला संसदेतच अर्वाच्च भाषेमध्ये सुनावणाऱ्यावरही काही कारवाई केली गेल्याचे एकिवात नाही, असे का? आणि आता अमेरिकेने आयातीवर कर लादले, आम्हीही जशास तसे वागणार असे डोनाल्ड ट्रंप यांनी प्रत्यक्ष भेटीत पंतप्रधानांना सांगितले, तर यावरही मौन आणि युक्रेनमधील युद्ध थांबवायला हवे या युनोच्या ठरावाच्या वेळी आपल्या प्रितनिधीची गैरहजेरी का हेही गुपितच. त्यांचे जल्पक तर जणू अदृश्यच झालेत. त्यांनाही गप्प राहण्याचा आदेश दिला आहे का, हे कळायलाही मागं नाही. ही कसली लपवालपवी?
पण असे प्रश्न विचारणाऱ्यालाही ‘देशद्रोही’ ठरवले जाईल. तर सत्ताधारी पक्षाचे सांगणे आहे, पाहू नका आणि बोलू नका, ऐकायचे ते फक्त आम्ही सांगतो, ते आणि तेवढेच, हे ध्यानात ठेवा!
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment