भालचंद्र कांगो नावाचं ‘झाड’!
पडघम - सांस्कृतिक
प्रवीण बर्दापूरकर
  • कॉ. भालचंद्र कांगो
  • Mon , 17 February 2025
  • पडघम सांस्कृतिक भालचंद्र कांगो Bhalchandra Kango

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा पदमविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी भालचंद्र कांगो यांच्या परिचयपर केलेलं हे भाषण...

.................................................................................................................................................................

मित्राबद्दल बोलायचं म्हणजे काहीसं आत्मपर बोलावं लागतं. भालचंद्रला मी १९७२-७३पासून ओळखतो. तो मला केव्हापासून ओळखतो ते ठाऊक नाही. मला आता कुणी तरी सांगत होतं की, भालचंद्र आता पंचाहत्तरी गाठत आहे म्हणून. लोक अफवा पसरवतात, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि सध्याच्या परिस्थितीत तर तो फारच ठाम झाला आहे. कारण अफवा पसरवणारे सध्या राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये आहेत. एक स्पष्ट सांगतो, भालचंद्र म्हातारा होऊ शकतो, याच्यावर माझा विश्वास नाही. तो मनाने कायम तरुण राहणार आहे.

भालचंद्र आणि मराठवाड्यातील तेव्हाच्या युवक नेत्यांनी जेव्हा औरंगाबादला मराठवाड्याच्या विकासासाठी आंदोलन सुरू केलं, तेव्हा मी कन्नड नावाच्या तालुक्याच्या गावी कॉलेजला प्री-डिग्रीला शिकत होतो. दैनिक ‘मराठवाडा’त ज्या काही बातम्या येत असत, त्या बातम्या वाचून आम्ही कन्नडमध्ये बंद करणं, मोर्चे काढणं अशी आंदोलनं करत असू. त्या वेळी कन्नडच्या नगराध्यक्षांचा राजीनामा घेतला म्हणून लक्ष्मण काळे आणि मी जरा प्रकाशात आलो होतो.

आमची ती कन्नडची समिती पण मजेशीर होती. लक्ष्मण काळे आता मुंबईत सीए आहे. तो अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी अशी स्वयंघोषित समिती होती. काहीही कागदपत्रं नव्हती. तोपर्यंत माझा आणि भालचंद्रचा काही परिचय नव्हता. कृती समितीची काहीतरी मीटिंग एकदा औरंगाबादला होती म्हणून मी आलो होतो. तिथं भालचंद्र कांगोची ओळख झाली. मग त्याच्या सभा ऐकता आल्या.

भालचंद्र तेव्हा ‘हिरो’ होता. बहुतेक त्याच्या त्या ‘हिरोइजम’लाच सुजाता बळी पडली असावी, असा माझा दाट संशय आहे, पण मी त्याबद्दल काही बोलणार नाही.

भालचंद्र मूळचा औरंगाबादचा नाही. माझ्या माहितीप्रमाणे मूळचा मराठवाड्यातलाही नाही. लहानपणी मला कीर्तन आणि प्रवचन ऐकण्याचा छंद आईनं लावला होता. त्यामुळे तुझी भाषा सुधारेल आणि प्रतिपादनं कशी करता येतात, हे लक्षात येईल, असा त्यामागचा तिचा हेतू होता. तेव्हा एक प्रवचनकार खूप छान दृष्टान्त द्यायचे. ते लग्न ‘दोन कुटुंबात जुळले’ असं कधी म्हणायचे नाही, तर ‘अमुक गावी सोयरीक जुळली’ असं म्हणायचे. एक दिवस मी त्यांना विचारलं की, असं का म्हणता तुम्ही? तर ते म्हणाले, ‘मुलगी उठून या घरातून त्या घरात जात नाही. उठून या गावातून त्या गावात जाते. जसं माणूस नोकरी करण्यासाठी दुसऱ्या गावात जातो. दुसऱ्या गावात गेल्यावर त्यानं झाड व्हायचं असतं. माणसानं दुसऱ्या गावात जाऊन रुजायचं असतं, तिथेच अंकुरायचं असतं, फुलायचं असतं आणि फळायचं असतं. इतकं त्या वातावरणाशी एकरूप व्हायचं असतं.’

भालचंद्रकडे बघताना त्या प्रवचनकारानं म्हटलेलं झाड सातत्यानं मला आठवतं. तो जरी मूळचा मराठवाड्यातला नसला, तरी तो मराठवाड्यात पूर्णपणाने रुळून, विरघळून गेला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तो नुसता राजकारणी राहिला असता, चळवळ्या राहिला असता, तर फारसं काही बिघडलं नसतं. तेव्हाचं ते मध्यमवर्गीय वातावरण होतं, पण तो बहुपेडी होत गेला. तो तेव्हा वैद्यकशास्त्रात शिक्षण घेत होता. डॉ. प्रदीप मुळे आणि डॉ. मिलिंद देशपांडे यांच्यासोबत मला बघितल्यामुळे; विशेषत: डॉ. प्रदीप मुळेसोबत बघितल्यावर त्याचं माझ्याविषयी बरं मत झालं असावं. कारण तेव्हा मी जास्त आक्रमक होतो. तेव्हाही अंबाजोगाई वगैरे ठिकाणी मी त्याच्याशी वादही घातलेले होते. भालचंद्रची जडणघडण मी फार लांबूनही नाही आणि फार जवळूनही नाही, अशा एका विशिष्ट अंतरावरून बघितली आहे. मी त्याचा कौटुंबिकही मित्र नाही, पण दूरचाही मित्र नाही.

१९७७ साली मी पत्रकारिता करण्यासाठी औरंगाबाद सोडल्यानंतर मुंबई, नागपूर, दिल्ली असं भ्रमण केलं. तेव्हा मराठवाड्यातले जो कोणी माझ्या नियमित संपर्कात होते, त्यात भालचंद्र एक होता. या सत्काराच्या निमित्ताने जेव्हा बोलण्याचं मला सांगण्यात आलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, तेव्हाच्या भालचंद्रचं एक विशाल झाड झालंय. तो वक्ता तर उत्कृष्ट आहेच. तेव्हाच त्याच्या सभेला दोन-दोन, चार-चार हजार लोक आलेले मी पाहिलेले आहेत. आताची जी ‘स्टार’शिप आली आहे, ती तेव्हा तो आणि विजय गव्हाणे यांच्या वाट्याला होती.

भालचंद्र संपादक आहे, राजकारणी आहे, समाजकारणी आहे, डॉक्टर आहे, कामगार नेता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं सगळं कॉम्बिनेशन असलेला एक ‘सुसंस्कृत माणूस’ आहे. मी कधी भालचंद्रसाठी लिहिलं, कधी पत्रकार म्हणून त्याच्या पत्रकार परिषदेसाठीसाठी गेलो. मी राजकीय वृत्तसंकलनात होतो. डावी चळवळ कधी हा माझा कव्हरेजचा विषय नव्हता, पण आमच्या ओझरत्या का असेना भेटी होत होत्या.

भालचंद्रविषयी मला मुळत: अ‍ॅफेक्शन होतं, जवळीक होती. त्याच्याशी आपण खूप रिलेक्ट होऊ शकतो, असं सातत्यानं वाटायचं. याचं एक कारण कदाचित तो समाजवादी असण्यामध्ये होतं. तेव्हा तो समाजवादी विचारांचा होता, ‘युक्रांद’मध्ये होता. तेव्हा कुमार सप्तर्षी, अरुण लिमये ही सगळी मंडळी महाराष्ट्राची ‘स्टार’ तरुण मंडळी होती; त्यांच्यात भालचंद्र होता. त्यानं मराठवाड्यात अनेक आंदोलनं उभारली.

बाय द वे, त्यानं समाजवाद का सोडला मला माहीत नाही. सुजाताकडे बघून सोडला की, चंद्रगुप्त चौधरींच्या विचाराने प्रभावित होऊन सोडला, त्याचं काही मी संशोधन केलेलं नाही किंवा करण्याचं कारणही नाही. कारण तो डाव्या चळवळीत गेला आणि तिथे खूप छान स्थिरावला. त्याचं राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय होणं, हे सगळं बघता आलं.

पण भालचंद्रने समाजवादीपण सोडलं, हे फार छान केलं. समाजवाद्यांची साथ जर सोडली नसती, तर त्याची अवस्था फार वाईट असती. आमचे काही समाजवादी लालकृष्ण अडवाणींसोबत गेले, काही समाजवादी अटलबिहारी वाजपेयींसोबत गेले. या दोघांनी ज्यांना प्रभावित केलं नाही, त्यापैकी काही जण स्वत:हून हिंदुत्ववाद्यांसोबत गेले. (आमच्यासारखे) जे आता शिल्लक आहेत, ते फार क्षीण शक्तीचे आहेत. कुठंतरी वृत्तपत्रात काही तरी लिहितात, नाही तर समाजमाध्यमांवर पोस्टस लिहितात आणि उमाळे टाकत बसतात!

त्यात ‘तीन समाजवाद्यांचे चार पक्ष’ ही जी परंपरा आमच्या नेत्यांनी निर्माण केली, त्यामुळे राजकीय क्षेत्रात समाजवाद्यांचं जास्त नुकसान झालं. त्यामुळे भालचंद्र डावीकडे गेला हे चांगलंच झालं. नुसताच डावीकडे गेला नाही, तर चार-साडेचार दशकं एकनिष्ठ राहिला. त्यानं त्या निष्ठांशी कुठे प्रतारणा केली नाही, व्यभिचारी वृत्ती कधी दाखवली नाही.

खरं तर याच काळात डावी चळवळदेखील क्षीण होत चाललेली होती, पण त्याच्याशी त्याने कधी तडजोड केली नाही. तरुणपणामध्ये भालचंद्रनं ज्या काही चळवळी मराठवाड्यामध्ये उभ्या केल्या. विकासाचं आंदोलन, विद्यापीठाचं आंदोलन उभं केलं. वैद्यकीय महाविद्यायात जातीय समीकरण, वातावरण होतं, ते मोडून काढणारा, ‘मार्ड’चा सरचिटणीस म्हणून ‘अँटी रॅगिंग समिती’ स्थापन करणारा भालचंद्र बहुतेक भारतातला पहिला असावा.

रानडे वक्तृत्व स्पर्धेत कन्नड कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून त्याच्यासोबत जाण्याचं मी धाडस केलं होतं. मी नुकताच गावखेड्यातून आलेला होतो. नुकतीच सुरुवात होती. त्यात इंग्रजी. अर्थात भालचंद्रसमोर माझा निभाव लागणं शक्यच नव्हतं. कारण त्याचं वाचन भरपूर होतं. त्याची इंग्रजीची उधळण इतकी अप्रतिम असायची. मूलत: त्याचं मराठी अतिशय चांगलं होतं. तो सतत वाचत असायचा. त्याची वृत्ती अभ्यासू होती. त्यामुळे त्याला समाजामध्ये काय चाललंय, याचं मोठं भान होतं.

या सगळ्यातून भालचंद्र घडत गेला. ‘युक्रांद’मधून म्हणजे समाजवादी विचार सोडून तो डाव्यांच्या कळपात सामील झाला. (मी ‘कळप’ हा शब्द चांगल्या अर्थानं वापरतोय आणि तिथे तो रुळला.), पण तो तसा साधाच राहिला. कामगार नेता म्हणून त्याने सुरुवातीच्या काळात नाव कमावलं. तेव्हा आम्ही कामगार नेता म्हणून दत्ता सामंतकडे बघायचो. ‘आग ओकणे’ ज्याला म्हणतो, अशा पद्धतीचं ते नेतृत्व होतं. नंतरच्या काळात कामगार नेत्यांमध्ये खूप घोषित/अघोषित तडजोडी आल्या. विशेषत: जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचं वारं वाहू लागल्याच्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या काळामध्ये. पण या सगळ्याचा भालचंद्रला कुठे स्पर्शही झाला नाही. त्याने कामगाराचं हित बघितलं आणि उद्योगाचही हित बघितलं, अतिशय विवेकनिष्ठ अशा भूमिका घेऊन.

भालचंद्रच्या भूमिकेमुळे एखाद्या तरी कामगारावर कुठे कपातीची संक्रात कोसळली, असं कधी झाल्याचं मला आठवत नाही. कामगार नेत्यांमध्ये तेव्हा प्रामुख्याने भांडकुदळ, आक्रस्ताळी वृत्ती असायची. तेव्हा ‘ही काय संस्कृती?’ असे आम्ही म्हणायचो. आता राजकारणाची ती संस्कृती झाली आहे, पण तिचा भालचंद्रला स्पर्श झालेला नाही. मला वाटतं डाव्या चळवळीत कॉ. ए.बी. बर्धन यांच्यासोबत राहिल्यामुळे कदाचित भालचंद्रमध्ये ही सुसंस्कृतता आली आणि ती अभेद्य राहिली.

दिल्लीतील माझे मित्र सांगतात की, दिल्लीमध्ये कम्युनिस्ट पक्षामध्ये बर्धनसाहेबांची जागा घेऊ शकेल, अशा पद्धतीचं त्याचं अतिशय शांत असं वर्तन आहे. योगायोगाचा भाग असा आहे की, बर्धन आणि भालचंद्र या गुरू-शिष्याच्या जोडीसोबत पत्रकारिता करण्याचं, त्यांच्याशी मैत्री करण्याचं भाग्य मला मिळालं.

भालचंद्रचा राजकीय प्रवास मला एक पत्रकार म्हणून, एक मित्र म्हणून जवळून बघायला मिळाला आहे. त्याचा आज ‘गोविंदभाई श्रॉफ सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला. मी ‘सन्मान’ म्हणतो, ‘पुरस्कार’ नाही. आपण काय त्याला ‘पुरस्कृत’ करणार? भालचंद्रचं काम मोठं आहे, पण त्याला स्वत:चे ढोल वाजवण्याची सवय नसल्यामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून त्या कामाचा ‘सन्मान’ म्हणतो. 

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

भालचंद्रनं निवडणुकाही लढवल्या. आपण समाज म्हणून फार दरिद्री, कर्मद्ररिद्री आहोत. अलीकडच्या ३० -४० वर्षांत आपल्याला चांगल्या लोकांची कदरच निवडणुकांत राहिलेली नाहीये. त्यामुळे भालचंद्र निवडणुकीत यशस्वी झाला नाही. बाकी सर्वार्थानी तो राजकारणी आणि कामगार नेता म्हणून यशस्वी झाला. कौटुंबिक पातळीवर कर्तापुरुष म्हणून यशस्वी झाला का नाही, ते सुजाता आणि मयूरी सांगतील. त्याच्याबद्दल आपल्याला सांगण्याचा काही अधिकार नाहीये, पण एवढ्या वर्षांत त्या दोघींपैकी कोणाची काही तक्रार नाहीये, म्हणजे त्याही पातळीवर तो चांगला असावा, असं आपण गृहीत धरूयात! 

आजच्या गढुळलेल्या वातावरणामध्ये भालचंद्रसारखे लोकप्रतिनिधी खालच्या आणि वरच्या सभागृहात, राज्य आणि केंद्र दोन्ही पातळीवर नाहीत, याची फार खंत मला वाटते. मी १९८० साली विधिमंडळाच्या रिपोर्टिंगला सुरुवात केली. पुढे सलग २३ वर्षे मी विधिमंडळ रिपोर्टिंगमध्ये होतो. तेव्हाचं विधिमंडळाचं सभागृह आणि आताचं सभागृह यात महद‌्अंतर आहे.

भालचंद्र ज्या विचाराचं प्रतिनिधित्व करतो, त्या विचाराचे ५५, ५७, ६०, एकदा तर ६३ सदस्य लोकसभेमध्ये होते. तो अतिशय मोठा आवाज होता. तो आता क्षीण झालाय. सर्वसामान्य माणसाचे, सर्वसामान्य जनतेचे, गोरगरिबांचे, आदिवासींचे, वंचितांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे लोकप्रतिनिधी आता संसदीय सभागृहामध्ये दिसत नाहीत, ही माझी खंत आहे.

अशा परिस्थितीमध्ये भालचंद्रसारखे लोक जर आपण सभागृहामध्ये निवडून दिले असते आणि अशा लोकांची संख्या जर मोठी राहिली असती, तर आज जी काहीराजकारणाची अधोगती झाली आहे, अगदी स्पष्टच शब्दात सांगायचं झालं तर जे अध:पतन झालं आहे, ते आपल्याला पाहायला मिळालं नसतं, याची मला खात्री आहे. अध:पतन ही मूलभूत प्रक्रिया आहे, हेही मला मान्य आहे, पण ते जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात होतं, तेव्हा मन भयकंपित होतं. अशा परिस्थितीमध्ये भालचंद्रकडे मी एक शांतपणे तेवणारी ज्योत म्हणून बघतो. आमची ही आशेची ज्योत आहे. अशा या ज्योतीचा आज जो सन्मान करण्यात आला, त्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे.

(शब्दांकन- अर्चना जोशी)

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......