१४ फेब्रुवारी हा ‘प्रेमदिन’ जगभर साजरा केला जातो. सध्या सगळ्याच दिवसांना“इव्हेंट’चे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे प्रेमाविषयीचा हा लेख जाणीवपूर्वकच १६ फेब्रुवारीला, म्हणजे प्रेमदिनाचा ‘इव्हेंट’ संपल्यानंतर करत आहोत. जागतिक वाङ्मयातील काही श्रेष्ठ लेखक-विचारवंतांच्या आयुष्यात, लेखनात ‘प्रेम’ या संकल्पनेचा आविष्कार कसकसा दिसतो, पाहायला मिळतो, त्याचा हा एक शोध...
.................................................................................................................................................................
(पूर्वार्ध)
१.
कॉलेजात असताना मी पहिल्यांदा प्रेमात पडलो, तेव्हा सगळे जग जिवंत झाले. ती म्हणजे या जगामधले सगळे सौंदर्य, ती म्हणजे या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री! ती म्हणजे जीवन, ती म्हणजे कला, ती म्हणजे चांदणे, ती म्हणजे कविता! ती म्हणजे सगळे!! ती नसेल तर मृत्यू! जीवन नसेल, तर मृत्यूच बाकी उरतो!
ती नाही म्हणून मला मरायचे होते. सिंहगडावरच्या तानाजी कड्याजवळच्या बुरुजावर गेलो. तिथले वाळलेले शेवाळे बघत विचार करत बसलो! प्रेम आणि मरण या विरुद्ध वाटल्या, तरी एकमेकांच्या फार जवळच्या गोष्टी!
गोविंदाग्रजांची ‘प्रेम आणि मरण’ ही कविता! पहिल्या प्रेमाइतकीच जिवंत आणि जीवनाने सळसळणारी कविता! विजेच्या प्रेमात पडलेला वृक्ष! वीजेची भेट न झाल्यामुळे हैराण झालेला वृक्ष. त्याला कळ्या येत नाहीत, त्याला पालवी फुटत नाही. वैराण जिणे! एके दिवशी त्याच्यावर वीज पडते. तो कोसळतो. कोसळता कोसळता फुलांनी बहरून येतो. ती फुले फुललेलीच राहतात कायमची.
त्या दुपारी त्या एकाकी बुरुजावर प्रेमाचा आणि मरणाचा विचार करत असताना एक वेगळाच विचार एकदम माझ्या मनात आला. मी उरलो नाही, तर माझ्या आईचे काय होईल? तेसुद्धा एक प्रेमच!
आईचा विचार आल्यावर विजेचा झटका बसल्यासारखा मी पटकन बुरुजावरून उठलो! माझ्या नकळत माझी पावले परतीची वाट चालू लागली. प्रेम म्हणजे काय या शोधाचा प्रवास माझ्या नकळत त्या क्षणी सुरू झाला होता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गडकरी एक ग्रेट कविता लिहून गेले होते. झाड विजेच्याच प्रेमात का पडले? आजुबाजूच्या वेली त्याच्यावर प्रेम करत होत्या, त्याला समजून घ्यायला तयार होत्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून झाड अप्राप्य विजेच्या प्रेमात का पडले?
मी मोठा होत गेलो, तशी ही कविता मला ‘मेलोड्रॅमॅटिक’ वाटू लागली. पण मग पुढे अनेक वर्षांनी प्रेम ही एक अलौकिक आणि दैवी भावना आहे, तिला अलौकिक आणि दैवी गोष्टींचे आकर्षण असते, हे लक्षात आले. ‘प्रेम आणि मरण’ ही कविता माझ्यासाठी एका नव्या अर्थाने झळाळून गेली, अजूनही ती मनात सळसळत राहिली आहे. कोवळ्या वयातल्या जिवंत भावना त्या कवितेशी एकरूप होऊन राहिल्या आहेत.
पुढे मी एकटा झालो. विद्यापीठात आलो. त्यानंतर मला एक-दोन मुली आवडल्या, एक-दोन मुलींनाही मी आवडलो! ज्यांना मी आवडलो, त्यांचेही मला आकर्षण वाटले. पण त्या भावनांमध्ये ‘विजे’सारखे असे काही नव्हते. मी वैराण होऊन गेलो होतो गडकऱ्यांच्या झाडासारखा!
“इष्काचा जहरी प्याला।
नशिबाला ज्याच्या आला । हा असा।।
टोकाविण चालू मरणे।
ते त्याचे होते जगणे।। सारखे ।।
हृदयाला फसवुन हसणे।
जीवाला नकळत जगणे।। वरिवरी।।
पटत ना जे जगपणा। त्याचिया मना।।
भाव त्या टाकी । देवातुनि दगडची बाकी।। राहतो।।”
मरण्यासारखे जगणे, हृदयाला फसवून आपण आनंदी आहोत असं जगाला दाखवणे, आपल्या जिवाच्या नकळत वरवर जगणे, जगाचे जगपण न पटणे; थोडक्यात मूर्तीमधले देवपण निघून जाणे आणि दगड बाकी राहणे. याला सोप्या भाषेत ‘डिप्रेशन’ म्हणतात.
मी कविता करायच्या सोडून दिल्या, कारण सगळ्या कविता तिच्या होत्या. ती नसेल तर कशाला करायच्या कविता? जी बाडे लिहिली होती, ती मी जाळून टाकली.
काही दिवसांनंतर मला माझी कृती अतिरेकाची वाटू लागली. ही भावना खूप वर्षे राहिली. पुढे मग चित्रकार सुभाष अवचट यांच्याशी मैत्री झाली. अवचटांनी इतकी चित्र केली, पोर्ट्रेटस् केली, पण त्यांनी एकाही स्त्रीचे पोर्ट्रेट केलेले नाही. अपवाद म्हणूनसुद्धा नाही. त्यांच्या ‘स्टुडिओ’ या पुस्तकात त्यांनी याचे कारण लिहिले आहे. त्यांची एक मैत्रीण होती, त्यांच्यावर प्रेम करणारी. ती अचानक गेली. मग त्यांनी पुन्हा कधी स्त्रीच्या पोर्ट्रेटसाठी ब्रश उचलला नाही. आज पन्नास वर्षे झाली असतील या गोष्टीला!
अवचटांकडे हा विषय काढला तर ते म्हणाले, “ती असती तर ती आज माझ्याबरोबर असती”. आपल्या आवाजातली खिन्नता अवचट लपवू शकले नाहीत. मला वाटले गडकऱ्यांच्या त्या झाडासारखा वैराणपणा ती गेल्यावर अवचटांच्याही मनात आला असणार. त्यांनी त्याचा एक पॅच तिची आठवण म्हणून जपून ठेवला असणार. त्या दिवसापासून कविता न लिहिल्याचा माझा गिल्ट गेला.
विद्यापीठामध्ये मग विचारांना शिंगं फुटली! एके दिवशी मनात विचार आला - हा सगळा आपल्याच मनाचा खेळ आहे का? ती महत्त्वाची आहे का? आपण अमेरिकेत असतो, तर आपण तिकडच्या कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात इतक्याच इन्टेन्सिटेने पडलो असतो. नक्कीच हा सगळा आपल्याच मनाचा खेळ आहे, हा आपलाच शोध आहे. त्यात तिचे काहीच नाही. ती फक्त एक ऑब्जेक्ट आहे. ती एक वीज आहे. आपण मातीत रुजलेले झाड आहोत.
काय आहे प्रेम म्हणजे? इतकी इन्टेन्सिटी? इतक्या प्रचंड लाटा? मी विचार करत राहिलो, पण तसे बघायला गेले, तर त्या वयात मला काय कळणार होते? मग विचार आला की, आपले प्रेम खरे आहे का? का तो फक्त सेक्सचा शोध होता? का आपल्या दारुण मानसिक अवस्थेत आपल्याला एक आधार हवा होता? एक अँकर हवा होता? खरे प्रेम म्हणजे काय?
एम.ए. करताना ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ वाचायला मिळाले. त्यात कळले प्रेमाची व्याख्या करणे शेक्सपिअरलासुद्धा आपल्या क्षमतेबाहेरचे वाटले होते- ‘‘Love is heavy and light, bright and dark, hot and cold, sick and healthy, asleep and awake- its everything except what it is!”
(प्रेम असते वजनदार आणि हलकेफुलके, प्रेम असते प्रकाशमान आणि तमोमय, प्रेम असते तप्त आणि शीतलतम, प्रेम म्हणजे एक रोग, प्रेम म्हणजे निखळ आरोग्य, प्रेम म्हणजे निद्रा आणि प्रेम म्हणजे शुभ्र जागृती - प्रेम जे असते त्याशिवाय ते सगळे सगळे असते.)
...........................................................................................................................................
प्रेमात काही प्रॉब्लेम नसतो, पण प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये आणि ती माणसे ज्या परिस्थितीमधून जात असतात, तिच्यात प्रॉब्लेम असतो. मी डोक्यावर हात मारून घेतला. प्रॉब्लेम काहीही आणि कुठलाही असला, तरी प्रेम म्हणजे काय तर एकूण बोंबाबोंबच! सार्त्र आणि काम्यूमुळे मी इम्प्रेस झालेलो होतो, तरी मला हे सारे पटत नव्हते. काम्यूचा ‘मेरसॉ’ आपली प्रेयसी मारीबरोबर कोरडेपणाने सेक्स करत होता. तिने लग्नाचे विचारल्यावर, इतर लोक ‘नकार’ द्यायचा असेल, तर ज्या तटस्थपणे नकार देतात, त्या तटस्थपणे तो तिला ‘होकार’ देतो. या संकल्पना मला आवडल्या, तरी यात काहीतरी चुकते आहे, असे मला वाटू लागले! गडकरी चूक, शेक्सपिअर चूक, माझ्या स्वतःच्या हृदयामधली धडधड चूक आणि हे लोक बरोबर! असे कसे असेल? मग सार्त्र आणि सिमोन द ब्यूव्हाँच्या नात्याबद्दल वाचनात आले.
...........................................................................................................................................
मी विचार करत राहिलो - हो, माझे प्रेम फार वजनदार होते, जेन्युइन होते. त्याने मला परत कविता करू दिली नाही. ते फुलपाखरासारखे फार हलके-फुलके होते. ते होते तेव्हा क्षणोक्षणी मनात कविता राहत होती. त्या प्रेमात प्रकाश होता सौंदर्य, काव्य, समजूत, उत्स्फूर्तता या दैवी गोष्टींचा! त्यात अंधःकार होता आत्मक्लेशाचा, दाटून आलेल्या निराशेचा, सेल्फ-पिटीचा आणि वैराणपणाचा! ते निद्रिस्त होते तिच्या आशा-आकांक्षांच्या बाबतीत आणि ते जागृतही होते तिच्याबद्दल. कारण त्याला कळत-नकळत का होईना तिच्या आणि या जगातल्या सौंदर्याची दैवी पार्श्वभूमी माहीत होती!
मला शेक्सपिअरला असलेल्या प्रेमाच्या जाणीवेचे आश्चर्य वाटत राहिले, पण त्यालाही प्रेमाची व्याख्या सांगणे शक्य झाले नाही. शेक्सपिअरनेच हात टेकल्यावर बाकीचे जग चक्रावून जाणे स्वाभाविकच होते. खूप उशीरा कळले की, त्याला प्रेमाचे पाऱ्यासारखे हाती न लागणारे अस्तित्व जाणवत होते. प्रेम म्हणजे मैत्री आहे का, प्रेम म्हणजे पूजा आहे का, प्रेम म्हणजे द्वेष आहे का, प्रेम म्हणजे विस्तारत जाणे आहे का, प्रेम म्हणजे पझेसिव्ह होत जाऊन आकुंचित होत जाणे आहे का? कितीतरी गोष्टी, कितीतरी विरोधाभास! सगळे एकत्र, पण यातली कुठलीही एक गोष्ट म्हणजे प्रेम नाही, यातल्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या, तरी प्रेम हाती लागत नाही.
हळूहळू मोठ्या मोठ्या लेखकांच्या संपर्कात येत गेलो. हळूहळू प्रेम नावाच्या गोष्टीचा एक एक तिढा, एक एक पैलू माझ्या समोर उलगडत गेला. सार्त्र आणि काम्यू आम्हाला अभ्यासाला होते. त्यांची प्रेमाची संकल्पना मला आवडली. माझ्यामधल्या वैराणपणाशी ती रेझोनेट होत होती, अनुकंपन पावत होती.
काम्यू म्हणत होता - प्रेम म्हणजे एक विरोधाभासाने भरलेले प्रकरण! विरोधाभासी असले तरी मानवी आयुष्यात अपरिहार्यपणे आवश्यक असलेले प्रकरण! प्रेम म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून मानवी आयुष्यामधल्या अर्थहीनतेवरचा एक उतारा! प्रेम म्हणजे एक उद्रेक! या जगात देहाने, परिस्थितीने आणि अर्थहीनतेने त्रासलेल्या मानवी अस्तित्वाविरुद्धचा उद्रेक! प्रेम म्हणजे अर्थहीनतेच्या उन्हात माणसाने आपल्यावर धरलेली एक सावली. प्रेम म्हणजे एक न टिकणारे प्रकरण!
सार्त्र तर अजून निर्घृण! म्हणे, प्रेम म्हणजे सततचा कलह, सततचे युद्ध! प्रेम म्हणजे एकमेकांच्या स्वातंत्र्यावर केलेले आक्रमण. प्रेम म्हणजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचा प्रयत्न! प्रेम म्हणजे परपीडन आणि आत्मपीडन या लक्षणांनी युक्त असलेला कलह! प्रेम म्हणजे शेवटी अपयश हाती देणारा प्रकार!
मी खुश झालो. मी मित्रांना सांगायला सुरुवात केली की, प्रेम म्हणजे निसर्गाने आपल्यावर टाकलेली एक ‘गेम’ आहे. निसर्गाला मानव जात वाढलेली हवी असते, म्हणून तो आपल्याला प्रेमात पाडतो. प्रेमाचा अर्थ आपल्याला कळत नाही, कारण प्रेमाला कसलाही अर्थ नसतो! इतर प्राण्यांमध्ये प्रेमाशिवाय प्रजनन होते, हे तेव्हा माझ्या लक्षात आले नव्हते. प्रजननासाठी प्रेरणा पुरेशा असतात, हे तेव्हा माझ्या लक्षात आले नव्हते.
फ्रान्झ काफ्कासुद्धा आम्हाला अभ्यासाला होता. राजीव पत्के म्हणून ऑक्सफर्डचे स्कॉलर आम्हाला शिकवायला होते. ते एकदा काफ्काचे प्रेमाबद्दलचे मत बोलून गेले. “प्रेम तुम्हाला मोठे करते, तुम्हाला विस्तारत नेते, तुमचे अस्तित्व ‘एनरिच’ करत नेते. प्रेम हे कारसारखे स्वतःचे कसलेही प्रॉब्लेम नसलेले असते. कारचे खरे प्रॉब्लेम ड्रायव्हर, कारमध्ये बसलेले आणि रस्ते हे असतात”.
प्रेमात काही प्रॉब्लेम नसतो, पण प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये आणि ती माणसे ज्या परिस्थितीमधून जात असतात, तिच्यात प्रॉब्लेम असतो. मी डोक्यावर हात मारून घेतला. प्रॉब्लेम काहीही आणि कुठलाही असला, तरी प्रेम म्हणजे काय तर एकूण बोंबाबोंबच!
सार्त्र आणि काम्यूमुळे मी इम्प्रेस झालेलो होतो, तरी मला हे सारे पटत नव्हते. काम्यूचा ‘मेरसॉ’ आपली प्रेयसी मारीबरोबर कोरडेपणाने सेक्स करत होता. तिने लग्नाचे विचारल्यावर, इतर लोक ‘नकार’ द्यायचा असेल, तर ज्या तटस्थपणे नकार देतात, त्या तटस्थपणे तो तिला ‘होकार’ देतो.
या संकल्पना मला आवडल्या, तरी यात काहीतरी चुकते आहे, असे मला वाटू लागले! गडकरी चूक, शेक्सपिअर चूक, माझ्या स्वतःच्या हृदयामधली धडधड चूक आणि हे लोक बरोबर! असे कसे असेल?
मग सार्त्र आणि सिमोन द ब्यूव्हाँच्या नात्याबद्दल वाचनात आले. काम्यूचे आणि मारिया कासारेसचे अफेअर वाचनात आले. एका प्रेमपत्रात काम्यू मारिया कासारेसला सांगतो - “तू अगदी अचानक माझ्या आयुष्यात आलीस. मी ज्याच्यावर फार खुश नव्हतो, अशा माझ्या आयुष्यात. तू आल्या दिवसापासून काहीतरी बदलायला लागले. मी मोकळेपणाने श्वास घ्यायला लागलो. मी द्वेषाच्या आहारी थोडा कमी जायला लागलो. ज्या गोष्टींचे कौतुक करायला पाहिजे त्या गोष्टींचे मोकळेपणाने कौतुक करायला लागलो.”
...........................................................................................................................................
मी जॉर्ज बर्नार्ड शॉचे पहिल्या प्रेमाबद्दलचे मत ऐकले. “पहिले प्रेम म्हणजे थोडा मूर्खपणा आणि खूप सारे कुतूहल!” मी वैतागलो! त्यात फ्रेंच सिनिक फ्रान्स्वा द ला रॉशफुकोचे वाक्य मनावर आघात करून गेले. “खरे प्रेम भुतासारखे असते. सगळे लोक त्याबद्दल बोलत असतात, पण बघितलेले कोणीच नसते.” वैताग! म्हणजे ‘प्रेम आणि मरण’ ही कविता खोटी, माझे प्रेम खोटे! त्यात ऑस्कर वाईल्डने तेल ओतले - “माणूस जोपर्यंत प्रेम करत नाही, तोपर्यंत तो कुणाही स्त्रीबरोबर अत्यंत आनंदाने राहू शकतो”. काय करायचे या वाक्याचे? एक सिनिकल विनोद म्हणून घ्यायचे की, एक अमर सत्य म्हणून घ्यायचे? प्रेम म्हटले की, इन्व्व्हॉल्व्हमेन्ट आली, अपेक्षा आल्या, त्या अपेक्षांचे पूर्ण न होणे आले, तिचे आपल्यावर प्रेम आहे की नाही, हा संशय आला, ती कोणाबरोबर बोलली तर मत्सर आला. शंभर लफडी! त्यापेक्षा साधे राहा. प्रेम न करता राहा. सुखाने राहा. प्रेम ही अशी गोष्ट आहे की, सफल झाली, तर वादळी अस्वस्थता, आणि असफल झाली, तर मग काही बोलायलाच नको. मला वाटून गेले की, ऑस्कर वाईल्ड फारसे चुकीचे बोलत नाहिये!
...........................................................................................................................................
प्रेमामध्ये जग कसे सुंदर दिसू लागते, हे शेक्सपिअरने ‘रोमिओ अँड ज्युलिएट’मध्ये किती सुंदर सांगितले होते! रोमिओचा मित्र मर्क्यूटो रोमिओला सांगतो - “तू प्रेमात पडला आहेस. प्रेम देवतेचे पंख तुला उधार मिळाले आहेत, तू आता विहार करत राहा सामान्य आयुष्याच्या सामान्य प्रतलापासून खूप वर, खूप उंचीवर!”
मला सार्त्र आणि काम्यू यांचा राग आला. यांच्यावर प्रेमाचा परिणाम इतर लोकांसारखाच होणार. मग प्रेमचा जन्म मदनाच्या बाणात झाला काय आणि मानव प्राण्याच्या आयुष्याच्या अर्थहीनतेमध्ये झाला काय, चर्चा कशाला करायची?
त्या वयात मला वाटू लागले की, एकंदर पाहता, प्रेम आणि ‘वूमनायजिंग’ यातल्या सीमारेषा या दोघांच्या बाबतीत पुसट होत जातात. प्रेमाविषयी इतक्या कोरड्या तत्त्वज्ञानाचा अजून दुसरा परिणाम काय होणार, असे मी मित्रांना सांगू लागलो.
हे लोक स्वतः अत्यंत ‘सुपर इंटेलिजन्ट’ होते. आणि ते ‘सुपर इंटेलिजन्ट’ आणि ‘सुपरइन्टेन्स स्त्रियां’वर प्रेम करत आयुष्य जगले. अनेक वर्षे जगले. काम्यू आणि मारिया कासारेस यांचे अफेअर तेरा-चौदा वर्षे चालले. काम्यूच्या मृत्यूपर्यंत चालले. आणि, या माणसांकडून प्रेम अस्थिर आहे, हे आम्ही ऐकायचे! माझ्यावर पडलेले सार्त्र आणि काम्यूच्या विचारांचे ‘इम्प्रेशन’ कमी होऊ लागले.
त्यातच काफ्काचे एक वाक्य वाचनात आले! “आपल्या अनुभवात पाणी घालू नका! आपला आत्मा दुसऱ्यांच्या विचाराप्रमाणे एडिट करू नका! आपले जे ऑब्सेशन असेल त्याचे ऐका.” सोप्या भाषेत सांगायचे तर दुसऱ्यांच्या डोक्याचे न ऐकता, आपले हृदय कितीही वेडेबागडे असले तरी त्याचेच ऐका.
या नंतरच्या काळात मी जॉर्ज बर्नार्ड शॉचे पहिल्या प्रेमाबद्दलचे मत ऐकले. “पहिले प्रेम म्हणजे थोडा मूर्खपणा आणि खूप सारे कुतूहल!” मी वैतागलो! त्यात फ्रेंच सिनिक फ्रान्स्वा द ला रॉशफुकोचे वाक्य मनावर आघात करून गेले. “खरे प्रेम भुतासारखे असते. सगळे लोक त्याबद्दल बोलत असतात, पण बघितलेले कोणीच नसते.” वैताग! म्हणजे ‘प्रेम आणि मरण’ ही कविता खोटी, माझे प्रेम खोटे!
त्यात ऑस्कर वाईल्डने तेल ओतले - “माणूस जोपर्यंत प्रेम करत नाही, तोपर्यंत तो कुणाही स्त्रीबरोबर अत्यंत आनंदाने राहू शकतो”. काय करायचे या वाक्याचे? एक सिनिकल विनोद म्हणून घ्यायचे की, एक अमर सत्य म्हणून घ्यायचे?
प्रेम म्हटले की, इन्व्व्हॉल्व्हमेन्ट आली, अपेक्षा आल्या, त्या अपेक्षांचे पूर्ण न होणे आले, तिचे आपल्यावर प्रेम आहे की नाही, हा संशय आला, ती कोणाबरोबर बोलली तर मत्सर आला. शंभर लफडी! त्यापेक्षा साधे राहा. प्रेम न करता राहा. सुखाने राहा. प्रेम ही अशी गोष्ट आहे की, सफल झाली, तर वादळी अस्वस्थता, आणि असफल झाली, तर मग काही बोलायलाच नको. मला वाटून गेले की, ऑस्कर वाईल्ड फारसे चुकीचे बोलत नाहिये!
...........................................................................................................................................
एक उभरता विचारवंत आणि ह्यूमरिस्ट म्हणून शॉची ओळख त्या काळात आकार घेऊ लागली होती. बाई त्याच्या ब्रिलियन्सवर, वैचारिक क्षमतांवर खुश झाल्या. त्यांनी त्याला आपल्या बरोबर राहायचे आमंत्रण दिले, परंतु प्रकरण टिकले नाही. मायकेल हॉलरॉइड लिहितो की, या प्रेमाच्या अपयशाने बेझंटबाई वैतागल्या, निराश झाल्या. अचानक भारतात निघून गेल्या. अध्यात्माकडे वळल्या. बेझंटबाईंचे इतर चरित्रकार लिहितात की, बाईंबरोबर काम करत असलेले इतर पुरुष शॉला सहन झाले नाहीत. त्या काळात शॉ एखाद्या इम्यॅच्युअर प्रेमिकासारखा पझेसिव्ह होता. बेझंटबाईंचे टॉवरिंग व्यक्तिमत्त्व तो झेलू शकला नाही. जे काही असेल ते असो. त्या वियोगाचा शोध शॉ घेत राहिला. त्याने आपल्या ‘आर्म्स अँड मॅन’ या नाटकात रायना पेटकॉफ हे पात्र बेझंटबाईंवरून आणि स्वतःवरून कॅप्टन ब्लंटशली, ही दोन पात्रं उभी केली. रायना ‘आदर्शवादी रोमँटिक’ आणि ब्लंटशली ‘प्रॅक्टिकल रोमँटिक’.
...........................................................................................................................................
२.
शॉ, रॉशफुको आणि वाईल्ड हे फार वेगळे लोक. यांचे इतर साहित्य वाचल्यावर माझ्या लक्षात आले की, हे लोक मुळात फार रोमँटिक आहेत. प्रेमाची वेदना नको म्हणून यांनी आपल्या हृदयामधल्या कोमल भावनांच्या भोवती सिनिकल विनोदाचे कवच उभे केले आहे. हे लोक काहीही बोलले, तरी हे लोक मूळचे रोमँटिकच!
वाईल्ड लिहितो - “आपल्या हृदयात प्रेम सतत जिवंत ठेवा. प्रेमाशिवाय आयुष्य म्हणजे सूर्यप्रकाश नसलेली बाग, सगळी फुलं मृत झालेली बाग! आपण कुणावर तरी प्रेम करतो आहोत आणि आपल्यावर कुणीतरी प्रेम करते आहे, ही जाणीव आपल्या आयुष्यात जी उबदार श्रीमंती आणते, तशी उबदार श्रीमंती दुसरी कुठलीही गोष्ट आणू शकत नाही”. शॉ आणि वाईल्ड यांचा सिनिसिझम त्यांच्या अशा लिखाणाच्या प्रकाशात बघायचा असतो, हे मला कळले.
या काळात मी शॉ खूप वाचला. त्याच ओघात मायकेल हॉलरॉइडने लिहिलेले त्याचे चरित्र वाचले. शॉची जडण-घडण, त्याचे विचार, त्याचे तत्त्वज्ञान, त्याचा विनोद आणि मुख्य म्हणजे त्याची प्रेमप्रकरणे! या त्रिखंडी चरित्राच्या पहिल्या खंडाचे नावच ‘इन सर्च ऑफ लव्ह’ असे आहे. या खंडात अत्यंत बुद्धिमान आणि कर्तृत्ववान स्त्रियांची आणि शॉची प्रेमप्रकरणे दिली आहेत. त्याच्या तत्त्वज्ञानामुळे त्याची प्रेमप्रकरणे कशी घडत गेली आणि ती प्रेमप्रकरणे त्याचे साहित्य कसे घडवत गेली, याचे रसभरित वर्णन या खंडात आहे.
अॅनी बेझंट आणि शॉ असे प्रेमप्रकरण होते, हे वाचून मी गार झालो. दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वे. एकमेकांच्या प्रेमात! शॉपेक्षा बाई नऊ वर्षांनी मोठ्या. बाई म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील इंग्लंडमधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. त्या काळात कुटुंबनियोजन वगैरेवर बोलणाऱ्या, एकच एक धर्म संकल्पना नाकारून आध्यात्मिक सत्य शोधणाऱ्या! त्या परंपरेने बद्ध अशा व्हिक्टोरियन कालखंडात एक वादळ बनून राहिल्या होत्या.
एक उभरता विचारवंत आणि ह्यूमरिस्ट म्हणून शॉची ओळख त्या काळात आकार घेऊ लागली होती. बाई त्याच्या ब्रिलियन्सवर, वैचारिक क्षमतांवर खुश झाल्या. त्यांनी त्याला आपल्या बरोबर राहायचे आमंत्रण दिले, परंतु प्रकरण टिकले नाही. मायकेल हॉलरॉइड लिहितो की, या प्रेमाच्या अपयशाने बेझंटबाई वैतागल्या, निराश झाल्या. अचानक भारतात निघून गेल्या. अध्यात्माकडे वळल्या. बेझंटबाईंचे इतर चरित्रकार लिहितात की, बाईंबरोबर काम करत असलेले इतर पुरुष शॉला सहन झाले नाहीत. त्या काळात शॉ एखाद्या इम्यॅच्युअर प्रेमिकासारखा पझेसिव्ह होता. बेझंटबाईंचे टॉवरिंग व्यक्तिमत्त्व तो झेलू शकला नाही.
जे काही असेल ते असो. त्या वियोगाचा शोध शॉ घेत राहिला. त्याने आपल्या ‘आर्म्स अँड द मॅन’ या नाटकात रायना पेटकॉफ हे पात्र बेझंटबाईंवरून आणि स्वतःवरून कॅप्टन ब्लंटशली, ही दोन पात्रं उभी केली. रायना ‘आदर्शवादी रोमँटिक’ आणि ब्लंटशली ‘प्रॅक्टिकल रोमँटिक’. आमच्यामधील या फरकामुळे आमचे टिकले नाही असे शॉचे म्हणणे! बाई त्यावर काही बोलल्या नाहीत. भारतात ‘थिऑसॉफिकल सोयायटी’, ‘होमरूल’, ‘भगवद्गीता वगैरे कामं करत राहिल्या!
एकमेकांच्या तत्त्वज्ञानात्मक धारणांमधून प्रेमाचा जन्म आणि एकमेकांच्या तत्त्वज्ञानात्मक धारणांमुळे फाटाफूट, असे एकूण चित्र माझ्या मनात तयार झाले. प्रेम हा भावनांचा प्रांत आहे, असे माझे मत होते. संलग्न तत्त्वज्ञाने आणि त्यांच्या विविध छटा माणसाच्या मनात प्रेम तयार करू शकतात तर!
पुढे शॉची अनेक प्रेमप्रकरणे झाली. एकमेकांचे होऊन जाणे हे प्रेमाचे पुरातन मॉडेल. शॉने आपले आपण आपल्यात राहून प्रेम करण्याचे मॉडेल मांडले. हा विचार शॉने ‘कँडिडा’ या नाटकात मांडला! यूजीन मार्चबँक हा कवी कँडिडा या विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडतो. तसे तो तिला आणि तिच्या नवऱ्यालाही सांगतो.
कँडिडा म्हणजे सौंदर्य, कँडिडा म्हणजे कला, कँडिडा म्हणजे स्फूर्ती! मार्चबँकच्या प्रेमाला नैतिकतेशी कसलेही घेणेदेणे नाही. प्रेयसीचे लग्न झालेले आहे वगैरे गोष्टी आम्हाला नका सांगू, अशी त्याची भूमिका! कँडिडाचा नवरा मॉरेल हा प्रीस्ट असतो. तो मार्चबँकचा कँडिडावर प्रेम करण्याचा अधिकार मान्य करतो, पण तो धार्मिक असल्याने त्याला नैतिकतेमध्ये मानवाचे कल्याण आहे, असे वाटत असते.
शेवटी मॉरेल आणि मार्चबँक कँडिडाला ‘कन्फ्रंट’ करतात. तुझे नक्की कुणावर प्रेम आहे? कँडिडा वैतागते. म्हणते - “म्हणजे मला तुमच्यापैकी कुणाची तरी एकाची होऊन राहायला लागणार तर!” तिचा नवरा म्हणतो - “हो नक्कीच!” कँडिडाच्या प्रियकराच्या लक्षात तिचा मुद्दा येतो. प्रेम आहे म्हणून कुणाच्या तरी एकाच्या मालकीचे होऊन जाण्याला कँडिडाचा विरोध असतो. तिला आपल्या स्वतःवरची मालकी अबाधित ठेवून प्रेम करायचे आहे. प्रेम का करायचे, करायचे असेल तर कुणावर करायचे, हे तिला स्वतःला ठरवायचे होते.
तिची भूमिका अशी की, तुझे लग्न झाले आहे म्हणून तू प्रेम करायचे नाही, असे मला कुणी सांगायचे नाही आणि मार्चबँकचे प्रेम काव्यमय आहे, म्हणून ते मी स्वीकारायलाच पाहिजे, असेही मला कुणी सांगायचे नाही. मी माझा विचार करून ठरवणार!
...........................................................................................................................................
शॉ प्रेयसी स्टेला-बिअट्रिस कॅम्पबेलला ‘तू मला किती हवी आहेस’ हे सांगताना लिहितो - “मला माझ्यासारखीच हरामखोर असलेली तू हवी आहेस, मला माझी यौवनदात्री देवता असलेली तू हवी आहेस, मला माझ्यामध्ये सौंदर्य, सन्मान, हास्य, संगीत, प्रेम, जीवन आणि अमरत्व हे सात दीप प्रज्वलित करणारी तू हवी हवी आहेस… मला माझी स्फूर्ती हवी आहे, मला माझा मूर्खपणा हवा आहे, माझा आनंद हवा आहे, माझे देवत्व हवे आहे, माझे वेड हवे आहे, माझा स्वार्थ हवा आहे, माझा अंतिम विवेक हवा आहे, माझे पावित्र्य हवे आहे, मला माझे दिव्य रूपांतरण हवे आहे, मला माझी शुद्धता हवी आहे, समुद्राच्या पलीकडून चमकणारा माझा प्रकाश हवा आहे, वाळवंटामधला माझा वृक्ष मला हवा आहे, माझी फुललेली बाग मला हवी आहे, माझे स्वप्न मला हवे आहे, माझी डार्लिंग मला हवी आहे, माझी तारका मला हवी आहे.”
...........................................................................................................................................
माझ्या मनात विचार आला की, हा असला व्यक्तित्ववाद शॉ आणि बेझंटबाई यांच्या फाटाफुटीचे कारण होते का? माणसाने रोमँटिक प्रेमाला इतकी किंमत द्यावी का?
शॉने अनेक प्रेमप्रकरणे केली. तो कुणा एकीच्या मालकीचा होऊन राहिला नाही. सार्त्रसुद्धा तसाच. त्यांनी कुणा एका स्त्रीला आपली मालकी सुपूर्द केली नाही. काम्यूसुद्धा तसाच. शॉची बायको शार्लट टाउन्सेंड. काम्यूची फ्रान्सीन फोर. सार्त्रने सिमोन द ब्यूव्हॉशी लग्न केले नाही, तरी त्याच्या आयुष्यात तिचे स्थान खूप मोठे होते. हे तिघे त्यांच्या मालकीचे होऊन राहिले नाहीत. मात्र या तिघांनी इतर प्रेमप्रकरणे करत असताना या तिघींना फसवलेसुद्धा नाही.
सगळेच मोठे लोक. शॉ, सार्त्र, काम्यू आणि सिमोन द ब्यूव्हाँ हे चौघेही साहित्याचे नोबेल विजेते, शॉची पत्नी शार्लट एक उमराव कन्या, काम्यूची पत्नी फ्रान्सीन पियानोवादक आणि मॅथेमॅटिशन. काम्यूची प्रेयसी मारिया कासारेस एका अतिश्रीमंत पित्याची कन्या आणि फ्रान्समधली प्रसिद्ध नाट्य आणि सिने कलाकार!
या लोकांच्या प्रेमाच्या संकल्पना पाहून माझे डोके आऊट झाले. इन्टेन्सली व्यक्तिवादी प्रेम! स्वतःला न विसरता प्रेम केले, तर ते प्रेम असते का, हा प्रश्न मला छळत राहिला.
शॉने शार्लटवर प्रेम केले, तिची काळजी घेतली, तिनेही शॉची काळजी घेतली. पंचेचाळीस वर्षांचा संसार झाला. शॉला पूर्णवेळ लिहिता यावे म्हणून तिने त्याला आर्थिक स्थैर्य दिले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला आर्थिक सपोर्ट केला. पण या प्रेमात शारीरिक प्रेमाला स्थान नव्हते. शॉ आणि शार्लट यांच्यात शरीरसंबंध नव्हते.
मला हा प्रकारच सुरुवातीला झेपला नाही. हे खोटे असावे असे वाटत राहिले, पण हे सगळे विचार ‘कँडिडा’मध्ये बीजरूपाने शॉने १८९४ सालीच लिहून ठेवले होते. शार्लट आणि शॉने १८९८ साली लग्न केले.
‘फॅमिलियल प्रेम’ वेगळे आणि ‘रोमँटिक प्रेम’ वेगळे हे शॉने ओळखले होते. दोन्ही प्रेमे तेवढीच जिवंत असतात, असे शॉचे म्हणणे. गृहदेवता वेगळी आणि स्फूर्तीदेवता वेगळी. यात एक रिफ्रेशिंग गोष्ट अशी की, शार्लटने कुणावर रोमँटिक प्रेम केले असते, तरी शॉने तिच्या गृहदेवतेच्या स्थानाला धक्का लावला नसता. त्याला शार्लटचे प्रियकर बघून मत्सर झाला असता, पण त्याचे प्रेम कमी झाले नसते.
शॉचे शार्लटवरचे प्रेम जेवढे प्रगाढ होते, तेवढीच त्याची रोमँटिक प्रेमप्रकरणे वादळी होती. गडकऱ्यांच्या वृक्षाच्या प्रेमासारखी. या दृष्टीने शॉचे एक पत्र वाचण्यासारखे आहे.
शॉ प्रेयसी स्टेला-बिअट्रिस कॅम्पबेलला ‘तू मला किती हवी आहेस’ हे सांगताना लिहितो - “मला माझ्यासारखीच हरामखोर असलेली तू हवी आहेस, मला माझी यौवनदात्री देवता असलेली तू हवी आहेस, मला माझ्यामध्ये सौंदर्य, सन्मान, हास्य, संगीत, प्रेम, जीवन आणि अमरत्व हे सात दीप प्रज्वलित करणारी तू हवी हवी आहेस… मला माझी स्फूर्ती हवी आहे, मला माझा मूर्खपणा हवा आहे, माझा आनंद हवा आहे, माझे देवत्व हवे आहे, माझे वेड हवे आहे, माझा स्वार्थ हवा आहे, माझा अंतिम विवेक हवा आहे, माझे पावित्र्य हवे आहे, मला माझे दिव्य रूपांतरण हवे आहे, मला माझी शुद्धता हवी आहे, समुद्राच्या पलीकडून चमकणारा माझा प्रकाश हवा आहे, वाळवंटामधला माझा वृक्ष मला हवा आहे, माझी फुललेली बाग मला हवी आहे, माझे स्वप्न मला हवे आहे, माझी डार्लिंग मला हवी आहे, माझी तारका मला हवी आहे.”
प्रेयसीच्या प्रेमामागचा दैवी स्पर्श गडकऱ्यांच्या वृक्षासारखा शॉलासुद्धा जाणवत होता तर! तो स्पर्श त्याला बेभान करत होता तर! मला, स्वतःला ‘प्रॅक्टिकल रोमँटिक’ म्हणवून घेणारा शॉ असे लिहू शकेल असे वाटले नव्हते.
हे शॉचे एकच प्रकरण नव्हते. अशी चार-पाच प्रकरणे. हे पत्र वाचल्यावर, या बेभान, सौंदर्यपूजक, ‘हरामखोर’ शॉला सांभाळणारी शार्लट फार मोठी वाटू लागली. सिमोन द ब्यूव्हाँने सात्रला असेच सांभाळून घेतले, फ्रान्सीन फोरने काम्यूवर असेच छत्र धरले. मारिया कासारेस प्रकरणामुळे फ्रान्सीन डिप्रेशनमध्ये गेली, तरीही तिने काम्यूला सांभाळून घेतले.
‘कँडिडा’ या नाटकामध्ये, कँडिडा मार्चबँकचे प्रेम स्वीकारण्यापेक्षा ज्या नवऱ्याविषयी रोमँटिक प्रेम फारसे उरलेले नाही, अशा मॉरेलची गृहदेवता बनून राहायचे ठरवते, परंतु शॉला येथे मॉरेलने नक्की काय करायला हवे होते, हे शार्लटला माहीत होते. मॉरेलच्या जागी शार्लट असती, तर तिने कँडिडाला दोन्ही प्रेमे मिळतील, अशी व्यवस्था केली असती. नाहीतरी कँडिडा मार्चबँकच्या प्रेमाने मोहरून गेलीच होती!
...........................................................................................................................................
प्रेमाचे सखोल अर्थ समजणारी आना. प्रेम म्हणजे माझ्यासाठी काय आहे, हे तुला समजणार नाही म्हणून प्रेम नको असे म्हणणारी आना! प्रेमाची गरज असूनही, प्रेमाचा शोध असूनही उथळ प्रेमाला घाबरणारी आना! आणि प्रेमाविषयी फारसा विचार न करता उत्फूर्तपणे प्रगाढ प्रेम करत राहाणारी किटी! किटीचे व्र्हॉन्स्कीवर प्रेम असते, पण व्र्हॉन्स्की आनाबरोबर पळून जातो. किटी हळूहळू स्वतःला सावरते. व्र्हॉन्स्कीला विसरून स्वतःला लेव्हिनच्या प्रेमात आणि प्रपंचात झोकून देते. आना प्रेमासाठी स्वतःच्या पतीला आणि दहा वर्षांच्या मुलाला सोडून देते. प्रेमाच्या शोधात स्वतःला बेभानपणे झोकून देते.
...........................................................................................................................................
३.
हे सगळे सुरू असताना प्रज्ञा माझ्या आयुष्यात आली. सुंदर, साधीसुधी, शांत, सुस्वभावी! तिलाला बघताच माझ्या लक्षात आले की, I have struck gold! माझ्या मित्रांना मी सांगितले, ‘आंधळ्याच्या गाई देव राखतो’ ही म्हण खरी आहे.
प्रज्ञाशी लग्न झाल्यावर माझे सुंदर आयुष्य सुरू झाले. तिने लवकरच माझा ताबा घेतला. कुणीतरी भरून टाकावी, अशी खूप मोठी पोकळी माझ्या आयुष्यात होती. खूप भीषण वैराणपणा होता. काफ्काच्या भाषेत सांगायचे तर, ‘I was a cage waiting for a bird!’ एखादे प्लेन कापड विविधरंगी भरतकामाने भरून टाकावे, तसे माझे आयुष्य प्रज्ञाने भरून टाकले. माझ्या आयुष्याची सगळी पार्श्वभूमीसुद्धा तीच झाली. सगळे व्यापून ती चार अंगुळे वर उरून राहिली! आणि हे सगळे फारसा आवाज न करता!
मी टेम्पेस्च्युअस होतो. माझ्या भावनांचे स्फोट ही नित्याची बाब होती. प्रज्ञाने समुद्रासारखे सगळे पोटात घेतले. कधीकधी ती वैतागायची, पण तिने मला एकदासुद्धा एकटे वाटू दिले नाही.
त्या काळात टॉलस्टॉय आणि डोस्टोव्हस्की माझ्या आयुष्यात आले. ‘आना कॅरेनीना’ या कादंबरीत टॉलस्टॉयने किटी शरबाटस्की हे पात्र रंगवले आहे. पत्नी सोनियावरून त्याने किटी रंगवली आहे. कुठल्याही परिस्थितीत शांत कसे राहायचे, हे माहीत असलेली किटी! प्रेग्नन्सी, बाळांतपणे, आजारपणे अशा सगळ्या गोंधळात शांत राहणारी, शांत प्रेमाने तेवत राहणारी आणि आपल्या नवऱ्याचे आयुष्य सोन्याचे करून टाकणारी! मी मित्रांना सांगितले- मला किटी शर्बाटस्की मिळाली आहे!
किटीच्या विरुद्धचे पात्र म्हणजे आना कॅरेनीना! स्वतःच्या प्रतिष्ठित पतीमधला सगळा इंटरेस्ट संपलेली, सगळे अस्तित्व भरून जाईल, असे प्रेम हवे असलेली! तरुण व्र्हॉन्स्की जेव्हा आपले तिच्याविषयीचे प्रेम व्यक्त करतो, तेव्हा आना म्हणते - “‘प्रेम!’ मला हा शब्द आवडेनासा झाला आहे. कारण इट मीन्स टू मच टू मी, फार मोअर दॅन यू कॅन अंडरस्टॅन्ड!”
प्रेमाचे सखोल अर्थ समजणारी आना. प्रेम म्हणजे माझ्यासाठी काय आहे, हे तुला समजणार नाही म्हणून प्रेम नको असे म्हणणारी आना! प्रेमाची गरज असूनही, प्रेमाचा शोध असूनही उथळ प्रेमाला घाबरणारी आना! आणि प्रेमाविषयी फारसा विचार न करता उत्फूर्तपणे प्रगाढ प्रेम करत राहाणारी किटी!
किटीचे व्र्हॉन्स्कीवर प्रेम असते, पण व्र्हॉन्स्की आनाबरोबर पळून जातो. किटी हळूहळू स्वतःला सावरते. व्र्हॉन्स्कीला विसरून स्वतःला लेव्हिनच्या प्रेमात आणि प्रपंचात झोकून देते. आना प्रेमासाठी स्वतःच्या पतीला आणि दहा वर्षांच्या मुलाला सोडून देते. प्रेमाच्या शोधात स्वतःला बेभानपणे झोकून देते.
मला किटी शरबाटस्की कळायला लागली. ती टॉलस्टॉयचे लाडके पात्र का आहे, हे कळायला लागले. कारण किटी माझ्याबरोबरच राहत होती. संसारात, मुलींमध्ये आणि माझ्यामध्ये बुडून गेलेली प्रज्ञा! माझ्या अस्तित्वाचा आधार बनून गेलेली माझी किटी!!
कादंबरी वाचून खाली ठेवल्यावर माझ्या मनातून आना हलेना! प्रज्ञाची माझ्यावरची आणि मुलींवरची निष्ठा बघून मी माझ्यामधल्या प्रेमाच्या शोधाला घाबरायला लागलो. या नादात प्रज्ञा दुखावली गेली तर? मी माझ्यामधल्या आनाला घाबरायला लागलो. मला वाटून गेले की, प्रेमाच्या शोधाला आत्मनाशाचे पंख नसतील, तर तो प्रेमाचा शोधच नाही! सगळे उधळून द्यायची क्षमता नसेल, तर प्रेमाचा शोध घेऊ नये. मीसुद्धा असाच कधीतरी कड्यावर जाऊन उभा राहिलो होतो!
किटी जशी टॉलस्टॉयची पत्नी सोनियावरून तयार झाली, तसे तिच्या नवऱ्याचे, लेव्हिनचे पात्र, टॉलस्टॉयने स्वतःवरून तयार केले आहे. किटीपूजक लेव्हिन आनाला भेटतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की, आना नुसतीच बुद्धिमान, आकर्षक आणि सुंदर स्त्री नाहिये, तर तिला काहीतरी सत्य स्पर्शून गेलेले आहे. आना लेव्हिनला हलवून जाते. किटी एक ध्रुव आणि आना दुसरा! एकीला या मातीमधले सत्य स्पर्शून गेलेले आणि एकीला निळ्या आकाशाच्या पलीकडचे सत्य स्पर्शून गेलेले! माणसाने कुणाच्या प्रेमात पडावे? दोघींच्याही प्रेमात माणूस पडला, तर ती एक मोठी चूक ठरेल का?
आना माझ्यासमोर येऊन उभी राहिली, तर मी तिच्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला आवरू शकेन का? प्रेमासाठी मी रेल्वेच्या समोर उभा राहू शकेन का? तेवढा पीळ माझ्या शोधात आहे का?
...........................................................................................................................................
शरीराच्या पलीकडे केवढे मोठे नाट्य स्त्री-पुरुष प्रेमात असते! सिल्व्हिया प्लाथ लिहिते - “घट्ट् मिठी मारून राहण्यासाठी आपल्याला एखाद्या आत्म्याची किती गरज असते! आपल्याला एक व्यक्तिमत्त्व हवे असते मिठी मारण्यासाठी आणि प्रेमाची ऊब मिळत राहावी म्हणून. एक व्यक्ती हवी असते आपल्याला आराम करण्यासाठी, विश्वास ठेवण्यासाठी, आपला आत्मा विश्वासाने सुपुर्द करण्यासाठी. मला हवे असते असे हे सगळे. मला कोणीतरी हवे असते मला स्वतःला त्याच्यात ओतून देण्यासाठी, झोकून टाकण्यासाठी.” प्लाथ आपला पती कवी टेड ह्यूजला उद्देशून लिहिते - “Kiss me and you will know how important I am!”
...........................................................................................................................................
मला वाटत राहिले की, प्रज्ञा असताना मी हे विचार का करतो आहे? स्त्रीरूपाच्या दोन ध्रुवांमधला एक ध्रुव माझा आधारस्तंभ बनून राहिलेला असताना दुसऱ्या ध्रुवाचे आकर्षण मला का वाटते आहे? लेव्हिन आनापासून पळून गेला, तसे मला पळता येणार आहे का?
डोक्यात हे असले विचार येत होते, पण मी एकंदरीत खुश होतो. मुख्य म्हणजे प्रज्ञाने वैराणपण हटवले. मी तरसलो होतो, पण उशीरा का होईना फार कुणाला मिळत नाही, असे स्वर्गीय प्रेम मला मिळाले होते. सगळे आयुष्य सुंदर होऊन गेले होते. असे सगळे चालू असताना एक मोठा ट्विस्ट प्रेमच्या शोधाला मिळाला!
सिल्व्हिया प्लाथची कविता आयुष्यात आली! त्या मागोमाग तिचे जर्नल आयुष्यात आले. त्यामध्ये ती लिहिते - “हो, तुला पाहून माझ्या शरीरात उर्मी उठतात. एवढ्या तीव्र उर्मी माझ्यामध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही तयार केलेल्या नाहीत. पण तरीही मी तुझ्यापासून दूर जाते, कारण मी प्रेमाचा एक क्षणिक आभास आहे, हे मला सहन होत नाही. तुला माझे शरीर देण्याआधी मला माझे विचार तुला द्यायचे असतात, माझे मन तुला द्यायचे असते आणि माझी स्वप्ने तुला द्यायची असतात. आणि या क्षणी तुझ्याकडे यातले काहीही नाहिये.”
स्त्रीला सगळे शेअर करायचे असते. स्त्रिया छोट्या छोट्या गोष्टी का सांगत राहतात, त्यांना हातात हात घालून का बोलत बसायचे असते, हे मला कळले! त्यांना जगलेला प्रत्येक क्षण शेअर करायचा असतो. त्यांच्यासाठी शरीर हा त्या ‘शेअरिंग’चा एक छोटा भाग असतो. प्लाथ वाचल्यावर मला स्त्री-पुरुष प्रेमात शरीर फारसे महत्त्वाचे वाटेना! मला शारीरिक प्रेमाच्या ऑब्सेशनमधून बाहेर काढण्याचे श्रेय सिल्व्हिया प्लाथला आहे.
शरीराच्या पलीकडे केवढे मोठे नाट्य स्त्री-पुरुष प्रेमात असते! सिल्व्हिया प्लाथ लिहिते - “घट्ट् मिठी मारून राहण्यासाठी आपल्याला एखाद्या आत्म्याची किती गरज असते! आपल्याला एक व्यक्तिमत्त्व हवे असते मिठी मारण्यासाठी आणि प्रेमाची ऊब मिळत राहावी म्हणून. एक व्यक्ती हवी असते आपल्याला आराम करण्यासाठी, विश्वास ठेवण्यासाठी, आपला आत्मा विश्वासाने सुपुर्द करण्यासाठी. मला हवे असते असे हे सगळे. मला कोणीतरी हवे असते मला स्वतःला त्याच्यात ओतून देण्यासाठी, झोकून टाकण्यासाठी.”
प्लाथ आपला पती कवी टेड ह्यूजला उद्देशून लिहिते - “Kiss me and you will know how important I am!”
मला हा धक्का होता! शारिरीक प्रेम स्वतःला काहीतरी मिळावे म्हणून मला हवे असायचे. प्लाथलाबरोबर याच्या उलटे हवे होते. ती आपल्या प्रियकराला सांगत होती की, सगळे लक्ष स्वतःच्या संवेदनांकडे केंद्रित न करता माझ्याकडे केंद्रित कर आणि मग मला किस कर! मला समजून घेण्यासाठी मला किस कर!
शरीराचे स्पर्श करायचे, पण ते मनाची आणि हृदयाची देवाण-घेवाण करण्यासाठी! शारीर इच्छांच्या मर्यादा कळणे, हे माझ्यासाठी फार मोठे ‘ग्रॅज्युएशन’ होते!
...........................................................................................................................................
प्रेम करण्यासाठी सौंदर्य आवश्यक असते का? सीमोनचे उदाहरण बघून वाटू लागले, सौंदर्य आवश्यक नसावे, पण ते उत्तर पटेना! या बाबतीत कुठेतरी सार्त्र पटून गेला. शेवटी शेक्सपिअरने हा प्रश्न सोडवला. त्याने लिहिले आहे, “प्रेम डोळ्यांनी बघत नाही. प्रेम मनाच्या दृष्टीमधून बघते”. मी याचा अर्थ असा घेतला की, तनाने असो की मनाने की भावनेने, कुठेतरी सौंदर्य असायलाच हवे. आणि असे कुठले ना कुठले सौंदर्य या जगात प्रत्येकाला दिले गेलेलेच असते.
...........................................................................................................................................
४.
शेली फार लहान वयात गेला. शेली तेव्हा इटलीमध्ये आपली पत्नी मेरीबरोबर प्रवास करत होता. एके संध्याकाळी त्याने आपल्या एका मित्राबरोबर वादळी समुद्रात नाव घातली आणि ते दोघे परत किनाऱ्यावर सुखरूप येऊ शकले नाहीत. एवढा मोठा कवी केवळ २९व्या वर्षी अमर काव्य करून काळाच्या पडद्याआड गेला. दोन मित्रांची पार्थिवे कुजलेल्या अवस्थेत चार दिवसांनी सापडली. त्या काळात बुडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे दफन करता यायचे नाही, दहन करायला लागायचे. शेलीच्या चितेला अग्नी दिला गेला. ज्वाला हळूहळू मोठ्या व्हायला लागल्या.
मेरी अचानक एका मित्राला म्हणाली - “मला त्याचे हृदय हवे आहे”. मित्राने त्वरा केली आणि ज्वालांनी पार्थिव पूर्णपणे घेरण्याआधी शेलीचे हृदय काढून मेरीला दिले. मेरीने ते हृदय फ्लोरेन्सला नेले. तिथे तिने ते कीट्सच्या थडग्याच्या शेजारी दफन केले आणि वर एक शिला उभारून त्यावर लॅटिनमध्ये कोरले - ‘कॉर कॉर्डियम’! हृदयाचे हृदय!
शेली तिच्या हृदयाचे हृदय होता. ते हृदय तिला ज्वालांमध्ये नष्ट होऊ द्यायचे नव्हते. तिने बिचारीने ते दफन करून ‘जपले’!
पुढे मग सार्त्र आणि सिमोन द ब्यूव्हाँ यांच्या पत्रव्यवहाराबद्दल वाचले आणि शारिरिक प्रेम हा स्त्री-पुरुष प्रेमामधला एक फार छोटा भाग आहे, यावर मी शिक्कामोर्तब केले.
या दोघांनी लग्न नाही केले. जन्मभर हे दोघे वेगवेगळी अफेअर्स करत जगले. त्यांचा एकच नियम होता एकमेकांना सगळे सांगायचे. आपापली अफेअर्स आणि आपापल्या रात्री यांच्याबद्दल सगळे सांगायचे! त्यांनी अशी खूप पत्रे एकमेकांना लिहिली आहेत. सीमोनने आपली लेस्बियन अफेअर्ससुद्धा सार्त्रला सांगितली.
सीमोनला सुरुवातीला सार्त्रच्या प्रेयसी बघून वाईट वाटे, मत्सर वाटे. प्रेम आहे म्हणून लोक एकमेकांच्या स्वातंत्र्यावर गदा का आणतात, असे सार्त्रचे म्हणणे! त्याचे म्हणणे असे की, दोन प्रकारचे प्रेम असते- ‘Essential love’ आणि ‘Contingent love’. मूलभूत प्रेम आणि तात्कालिक प्रेम! सीमोन हे सार्त्रचे मूलभूत प्रेम होते, पण त्यासाठी सार्त्र आपल्या तात्कालिक प्रेमांचा गळा घोटायला तयार नव्हता. सीमोननेसुद्धा आपल्या तात्कालिक प्रेमांचा गळा घोटू नये, असे त्याचे मत होते.
अनेक अफेअर्स करूनसुद्धा सार्त्र आणि सीमोनचे प्रेम अबाधित राहिले. दोघे १९२९मध्ये प्रेमात पडले. सार्त्रच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८३पर्यंत सीमोनने त्याला साथ दिली. ५४ वर्षांचे प्रेम! सीमोनने लिहिले आहे, “सार्त्रशी माझे नाते ही माझ्या जीवनातली सर्वांत मोठी अचीव्हमेन्ट आहे”.
शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले!
शरीराचे प्रेम हा स्त्री-पुरुष प्रेमामधला अविभाज्य भाग नाही, असे मला वाटू लागले. काम्यूची पत्नी फ्रान्सीन मात्र त्याचे अफेअर बघून डिप्रेशनमध्ये गेली. तिला फार त्रास झाला. शेवटी तिने सांभाळून घेतले, ही वेगळी गोष्ट.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
सार्त्र आणि सीमोन या प्रेमाने माझ्या समोर सौंदर्याचासुद्धा प्रश्न तयार केला. सार्त्र दिसायला अजिबात चांगला नव्हता. त्याचा एक डोळा लहानपणी निकामी झाला होता. तो जेमतेम पाच फूट उंचीचा होता. थोडा जाडसर, गबाळे कपडे घालणारा. आपण कसे दिसतो, याची फिकीर न करणारा! कुणालाही पहिल्या नजरेत आवडू न शकणारा. याउलट सीमोन अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्वाची. सार्त्रच्या बुद्धीच्या दीप्तीने सीमोन भारावून गेली. सार्त्रच्या दिसण्यापलीकडे ती प्रयत्नपूर्वक गेली आणि त्याच्यावर प्रेम करू लागली. सार्त्र स्वतः मात्र दिसायला चांगल्या नसलेल्या स्त्रियांवर कधीही प्रेम करू शकला नाही. सीमोनने त्याला उतारवयात विचारले की, ‘तू सुंदर नसलेल्या स्त्रीवर प्रेम करू शकलास का कधी?’ सार्त्र म्हणाला- ‘नाही’!
प्रेम करण्यासाठी सौंदर्य आवश्यक असते का? सीमोनचे उदाहरण बघून वाटू लागले, सौंदर्य आवश्यक नसावे, पण ते उत्तर पटेना! या बाबतीत कुठेतरी सार्त्र पटून गेला. शेवटी शेक्सपिअरने हा प्रश्न सोडवला. त्याने लिहिले आहे, “प्रेम डोळ्यांनी बघत नाही. प्रेम मनाच्या दृष्टीमधून बघते”. मी याचा अर्थ असा घेतला की, तनाने असो की मनाने की भावनेने, कुठेतरी सौंदर्य असायलाच हवे. आणि असे कुठले ना कुठले सौंदर्य या जगात प्रत्येकाला दिले गेलेलेच असते.
किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले.
ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते. मग तुम्ही स्त्री असा की पुरुष! असे होऊ लागले तिथून लेव्हिन पळून गेला तसे आपण पळून जावे. उगीच स्वतःची परीक्षा घेत तिथे बसून राहू नये, असे माझे त्या वेळी मत झाले. आपले प्रेम कितीही खरे असले, तरी आपण स्खलनशील असतो, हे समजून घ्यावे आणि पळून जावे. स्वतःशी आणि जगाशी खोटे बोलत बसू नये!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment