प्रेम हा या जगातील एकमेव धर्म आहे की नाही, माहीत नाही. पण ते एक विराट आणि जिवंत असे ‘नाट्य’ नक्कीच आहे... (उत्तरार्ध)
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • टॉलस्टॉय, आना कॅरेनीना, डोस्टोव्हस्की, सिल्व्हिया प्लाथ, जर्नल, शेली-मेरी, प्लेटो, एलिझाबेथ आणि रॉबर्ट ब्राऊनिंग डब्ल्यू बी येट्स-मॉड गन
  • Sun , 16 February 2025
  • पडघम साहित्यिक टॉलस्टॉय Tolstoy आना कॅरेनीना Anna Karenina डोस्टोव्हस्की Dostoevsky सिल्व्हिया प्लाथ Sylvia Plath जर्नल Jounal शेली Shelley मेरी शेली Mary Shelley प्लेटो Plato एलिझाबेथ ब्राऊनिंग Elizabeth Browning रॉबर्ट ब्राऊनिंग Robert Browning डब्ल्यू बी येट्स W. B. Yeats मॉड गन Maud Gonne

(उत्तरार्ध)

५.

सिल्व्हिया प्लाथमुळे शारीर प्रेमाची मात्रा खूप कमी झाली, सीमोन द ब्यूव्हाँमुळे सौंदर्याची दृष्टी विशाल झाली. हे घडल्यावर स्त्रियांच्या मैत्रीचे खूप मोठे दालन माझ्यासाठी उघडले गेले. मैत्री हा एक मोठा प्रांत आहे, असे माझ्या लक्षात आले. स्त्रीची मैत्री ही एक भारी गोष्ट आहे, असे मला जाणवले. नाहीतरी लॉर्ड बायरन म्हणालेलाच आहे - “Friendship is love without wings.”

या नंतर मला चांगल्या चांगल्या मैत्रिणी मिळत गेल्या. मी एक गोष्ट पाळली. मैत्रीला थोडे पंख फुटायला लागले आहेत, असे वाटू लागले की, लेव्हिनने पळ काढला तसा पळ काढायचा! अशी दहा पंधरा वर्षं गेली. ‘मिडलाईफ क्रायसिस’ तयार होऊ लागला. प्रज्ञाचे दोष खटकायला लागले. मी तिच्यावर जास्त जास्त टँट्रम्स फेकायला लागलो. आपण तिच्यासमोर कुणीही नाही आहोत, हे कळत होते, पण वळत नव्हते.

प्रेम ही अस्थिर गोष्ट आहे असे म्हणतात, ते खरे आहे की काय असे मला वाटू लागले. रॉय किणीकरांच्या ओळी माझ्या भोवती नाचू लागल्या.

“ही प्रीती नाही, दगडावरची रेघ

ती आहे, चंचल पाण्यावरची आग

प्रीतीचा नसतो, अक्षत अन्तरपाट

का वेड्या असते, ती जन्माची गाठ ।।”

प्रज्ञा अस्वस्थ झाली. एके दिवशी मला म्हणाली, माझे या घरात काहीच उरले नाही. मी फार अस्वस्थ झालो. म्हटले, हे घर तुझेच आहे, हे घर म्हणजे तूच आहेस. तिला पटले नाही. खरं तर सगळे पैशाचे व्यवहार तिच्याच हातात होते. खूपसे पैसे तिच्या खात्यावर होते. मी माझ्या खात्यावरचे सगळेच्या सगळे पैसे तिच्या खात्यावर टाकून दिले. मी तिला म्हटले, “आता माझ्या खात्यावर फक्त दहा हजार उरले आहेत. मिनिमम बॅलन्स म्हणून ठेवले आहेत, तू घरातून मला हाकलून दिलंस, तर आता माझ्या नावावर काहीही नाही”. ती काही बोलली नाही. बँकेत जाऊन त्या खात्यावर माझे नाव टाकून आली.

मी इतके केले, तरी तिची अस्वस्थता गेली नाही. ‘इसेन्शियल प्रेम’ वगैरे गोष्टींमध्ये तिला इंटरेस्ट नव्हता. प्रेम म्हणजे प्रेम! जास्त भंकस करायची नाही.

मला वाईट वाटू लागले. मी काही भारी नवरा नव्हतो. तिने खूप म्हणजे खूप सहन केले होते, पण मलासुद्धा अशा परिस्थितीत काय करायचे ते कळत नव्हते. ते वयच तसे होते. माझे बहुतेक मित्र याच फेजमध्ये होते. सगळ्या मैत्रिणीसुद्धा याच फेजमध्ये होत्या. सोशल मीडियामुळे सगळे जण मन बोलू लागले होते. खूप मैत्रिणी माझ्याशी बोलायला लागल्या. कसा कुणास ठाऊक, पण त्यांचा विश्वास माझ्याकडून कमावला गेला होता. शाळा-कॉलेजमधल्या नाटकांमुळे झालेल्या अशा सगळ्या मैत्रिणी बोलत होत्या! मेनोपॉजमुळे आलेली अस्वस्थता, इनसिक्युरिटी, नवरे दुर्लक्ष करू लागल्यामुळे झालेला अपमान असे सर्व एकत्र! ‘फॅमिलियल’ प्रेम, रोमँटिक प्रेम यांच्या वादळात सापडलेल्या! सगळ्या शॉच्या ‘कँडिडा’!

मी माझ्या सायकॉलॉजिस्ट मैत्रिणीला याचे कारण विचारले. ती म्हणाली, “काही नाही, तू श्रोता म्हणून मिळाला आहेस, त्यामुळे ‘व्हेंटिलेशन’ चालू आहे. होतील लवकरच सेटल!

भावनांचे व्हेंटिलेशन! म्हटले भारी फ्रेज आहे!

सर्वदूर दारुण अवस्था होती. प्रेमविवाह केलेले, अरेंज्ड मॅरेज केलेले, पळून जाऊन गांधर्व विवाह केलेले, मुलीला पळवून नेऊन राक्षस विवाह केलेले आणि नुसते ‘लिव्ह-इन’मध्ये राहणारे कुण्णी कुण्णी म्हणून यातून सुटले नव्हते. प्रेम संपलेले! राग-राग, धुसफूस, अस्वस्थता, निराशा किती किती गोष्टी! सर्वदूर फ्रस्ट्रेशन!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सार्त्र, काम्यू आणि शॉ हे तिघे प्रेम अस्थिर आहे म्हणत होते, त्याचा अर्थ आता मला कळायला लागला. प्रेमापुढे आपले स्वातंत्र्य सरेंडर करायला ते का तयार नव्हते, ते मला कळायला लागले. स्फूर्तीदेवता नसताना कलाकार म्हणून कसे राहायचे? सेक्स मला वाटत होता, त्यापेक्षा खूप महत्त्वाचा भाग होता तर!

या काळात प्लेटो माझ्या आयुष्यात आला. त्याचे ‘सिम्पोझियम’ हे पुस्तक म्हणजे प्रेम या विषयावरची सर्वंकष चर्चा आहे. प्लेटोचे म्हणणे असे की, प्रेम हा पूर्णतेचा शोध आहे. माणूस अपूर्ण असतो, तो पूर्णत्व शोधत असतो. हे सांगताना प्लेटो दंतकथेचा आधार घेतो.

प्लेटो लिहितो की, निर्मिती झाली, तेव्हा स्त्री-पुरुष एक होते. त्यांच्या त्या एकतेमधील सामर्थ्य आणि आनंद बघून झिऊस हा सर्वोच्च देव घाबरला. त्याने त्यांना वेगळे केले. तेव्हापासून ते दोघेही आपल्या हरवलेल्या अर्ध्या भागाच्या शोधात, आपल्या परिपूर्णतेच्या शोधात फिरत राहिले आहेत. जेव्हा आपला हरवलेला अर्धा भाग स्त्री-पुरुषांना सापडतो, ते एकमेकांमध्ये मिसळून जातात, तेव्हा ते पूर्णत्वाच्या आनंदात हरवून जातात. त्यांना एकमेकाला एक क्षणसुद्धा सोडवत नाही.

स्त्री-पुरुषांचे प्रेम म्हणजे पूर्णत्वाचा शोध! प्लेटोने लिहिले होते “स्त्री आणि पुरुष एक होऊन पूर्णत्व शोधतात. आपल्या मानवी अस्तित्वाची जखम भरू पाहतात”. स्त्री आणि पुरुष मिळून एक पूर्णत्व! त्यांना वेगवेगळे जन्मायला लागणे, ही मानवी अस्तित्वाची जखम! किती खरा मुद्दा! प्रेमाशिवाय किती अपूर्ण वाटतं आपल्याला!

शारीरिक प्रेमाचे एक भन्नाट इंटरप्रिटेशन!

माझे सगळे मित्र-मैत्रिणी हा आनंद उपभोगत होते, तोपर्यंत सगळे चांगले सुरू होते. शरीराचा आनंद संपत चालला आहे, हे जाणवल्यावर गोंधळ सुरू झाला. मानवी अस्तित्वाची जखम परत उघडी झाली. परत एकदा पूर्णतेची तहान त्रास देऊ लागली. सगळ्यांच्या कळत-नकळत सगळ्यांचाच एक नवा शोध सुरू झाला होता. परंतु आता सगळेच कुटुंबात अडकले होते. नुसताच त्रागा, नुसताच त्रास, नुसतीच चिडचिड! सगळेच पार्टनरला दोष देत होते.

असे सगळे चालू असताना एके दिवशी अचानक प्रज्ञाला कॅन्सर झाल्याचे कळले. माझे सगळे जग उदध्वस्त झाले. प्रज्ञा माझ्यासाठी कोण आहे, हे या तिच्या आजारपणात कळले!

मी कुणाच्या जिवावर बिनधास्त जगत होतो, लिहीत-वाचत होतो, सिगरेट पिण्याची रिस्क घेत होतो, पोरींना वाढवण्याविषयीचे क्रेडिट घेत होतो, हे कळले! माझे प्रेम माझ्या समोर येऊन उभे राहिले होते. प्रेम किती आणि कसे असते, हे मला कळले होते.

खड्ड्यात गेला तो सार्त्र, तो काम्यू आणि तो शॉ आणि आपापल्या पार्टनर्सविषयी निराश झालेले ते मित्र आणि त्या मैत्रिणी! प्रज्ञा नाही, ही आयडियाच मी सहन करू शकत नव्हतो. मी तिला आणि तिच्या प्रेमाला फार गृहित धरून चाललो होतो. प्रज्ञा पहिल्या धक्क्यातून लगेच सावरली. तिच्या कीमो सुरू झाल्या. तिचे केस जाऊ लागले. तरीही ती घरामधली कामे थोडी थोडी का होईना, पण आवर्जून करत होती. मी आणि मुली यांचे काहीही अडणार नाही, याची काळजी घेत होती. मला प्रज्ञा फार सुंदर दिसू लागली. एवढ्यात मला हार्ट अटॅक आला. बायपास करावी लागली. कीमो, रेडीएशन थेरपी, हार्ट अटॅक, बायपास सगळे एकत्र. पाच-सहा महिने भयंकर गेले.

हळूहळू सगळे स्थिरस्थावर झाले. ती कॅन्सरमधून बाहेर आली. शेवटची कीमो आणि रेडिएशन झाल्यावर तिने लगेच परत घराचा सगळा ताबा घेतला. मीसुद्धा सावरलो. बायपासनंतर तीन-चार महिन्यांत परत सिंहगड चढायला लागलो. कुणी म्हणाले- श्रीला अटॅक सिगरेट्समुळे आला. प्रज्ञाचा एक भाऊ म्हणाला- श्रीचे प्रज्ञावर प्रेम आहे म्हणून त्याला अटॅक आला. खरेखोटे ते अटॅक आलेले हृदय जाणे!

...........................................................................................................................................

काही लोक प्रगत असतात. त्यांना उपजतच हा स्तर आणि हे प्रेम माहीत असते. मार्क ट्वेन आणि ऑलिव्हिया ट्वेन हे जोडपे असे. एकमेकांचा हात हातात धरल्यानंतर कधीही कुठलाही मतभेद नाही, बेबनाव नाही, बदसूर नाही. मार्क ट्वेनने ऑलिव्हियावर कधीही आवाज चढवला नाही, ऑलिव्हिया त्याच्यावर कधी ओरडली नाही. ऑलिव्हिया अत्यंत धार्मिक होती. मार्क ट्वेन एक नंबरचा बंडखोर, पण तो रोज तिला ‘बायबल’ वाचून दाखवायचा. आपल्या लिखाणातला काही भाग तिला आवडला नाही, तर तो लिखाणातून काढून टाकायचा! माझे लिखाण, माझे व्यक्तिमत्त्व, माझे अभिव्यक्ती स्वतंत्र्य, अशी कुठलीही बडबड नाही.

...........................................................................................................................................

प्रज्ञामुळे मला कळले की, प्रेम म्हणजे कमिटमेंट! प्रेम म्हणजे बांधीलकी, जबाबदारी आणि वचनबद्धता! प्रेम म्हणजे डेडिकेशन! प्रेम म्हणजे समर्पण आणि निष्ठा! प्रेम असेल, तर तुम्ही स्वतःचा विचार करत नाही, तुम्ही तक्रार करत नाही. तुम्ही स्वतःला मानत नाही. प्रेम असेल, तर तुम्ही स्वतःचे अस्तित्व विसरून जाता!

मला वाटू लागले की, सार्त्र, काम्यू आणि शॉ यांनी जे लिहिले आहे, ते मनापासून, हृदयापासून लिहिले आहे. हे लोक खोटारडे नाहीत! पण एके दिवशी मला वाटून गेले की, या लोकांनी ते हृदयाच्या हृदयापासून लिहिलेले नाही!

हृदयाच्या स्तरापर्यंत तुम्ही विचार करता, संशयग्रस्त असता, विविध द्वंद्वांमध्ये असता! हृदयाच्या हृदयाच्या स्तरावर तुम्हाला खरे प्रेम म्हणजे काय ते कळते. पण मला वाटते, हा स्तर मृत्यूला सामोरे गेल्याशिवाय आपली प्रभा आपल्याला दाखवत नाही. मृत्यूची पार्श्वभूमी डोळ्यासमोर उभी राहिली की, एका वेगळ्या प्रकाशात प्रेम दिसू लागते.

काही लोक प्रगत असतात. त्यांना उपजतच हा स्तर आणि हे प्रेम माहीत असते. मार्क ट्वेन आणि ऑलिव्हिया ट्वेन हे जोडपे असे. एकमेकांचा हात हातात धरल्यानंतर कधीही कुठलाही मतभेद नाही, बेबनाव नाही, बदसूर नाही. मार्क ट्वेनने ऑलिव्हियावर कधीही आवाज चढवला नाही, ऑलिव्हिया त्याच्यावर कधी ओरडली नाही. ऑलिव्हिया अत्यंत धार्मिक होती. मार्क ट्वेन एक नंबरचा बंडखोर, पण तो रोज तिला ‘बायबल’ वाचून दाखवायचा. आपल्या लिखाणातला काही भाग तिला आवडला नाही, तर तो लिखाणातून काढून टाकायचा! माझे लिखाण, माझे व्यक्तिमत्त्व, माझे अभिव्यक्ती स्वतंत्र्य, अशी कुठलीही बडबड नाही.

ऑलिव्हिया महत्त्वाची की लिखाण महत्त्वाचे? ऑलिव्हिया महत्त्वाची की स्वातंत्र्य महत्त्वाचे? सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच - ऑलिव्हिया! ऑलिव्हियाला आवडली नाहीत म्हणून मार्क ट्वेनने लिहिलेली १५०० पाने प्रकाशित केली नाहीत. ट्वेन आयुष्याच्या दुसऱ्या भागात ‘बँकरप्ट’ झाला, तेव्हा ऑलिव्हिया त्याला एक शब्दसुद्धा बोलली नाही.

एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग आणि रॉबर्ट ब्राऊनिंग यांचे प्रेम असेच! एलिझाबेथ लिहिते -

“Earth's crammed with heaven,

And every common bush afire with God,

But only he who sees takes off his shoes;

The rest sit round and pluck blackberries.”

(पृथ्वीवर स्वर्ग खचाखच भरून राहिलेला आहे. अगदी एखादे छोटेसे झुडुपसुद्धा परमेश्वराच्या प्रकाशाने चमकत असते. जे शोध घेतात त्यांना हे सर्व दिसत राहाते. बाकीचे लोक छोट्या गोष्टींमध्ये रमून जगतात!)

मला वाटते प्रेमाचेसुद्धा असेच आहे. ज्यांना प्रेमभावनेमधले दिव्यत्व कळते, ते स्वतःमधून बाहेर पडून प्रेम करतात. बाकीचे आत्ममग्न लोक चर्चा करत बसतात किंवा या जगावर आणि एकमेकांवर धुसफुसत राहतात.

...........................................................................................................................................

आपण कितीही विचार केला, तरी प्रेम या गोष्टीचा ठाव लागत नाही. आपण विचार करत जाऊ, तसे तसे ही संकल्पना अजून अजून विस्तृत होत जाते. माझा शोध आता थांबला असला, तरी मला संध्यारंग पाहात बसावे, तशी खरी प्रेमकविता वाचत बसायला आवडते. जिवंत प्रेमभावनेमागची व्यक्तिमत्त्वे समजून घ्यायला आवडते. पाब्लो नेरुदा, डब्ल्यू बी येट्स, एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग आणि एमिली डिकिन्सन यांच्यावर जास्त जास्त खोलवर जाऊन विचार व्हायला हवा.

...........................................................................................................................................

६.

तुम्ही स्वतःमध्ये रमलेले असाल, तर तुम्हाला तुमच्या घरामधले खरेखुरे प्रेम दिसत नाही. मला हळूहळू प्रज्ञाचे प्रेम किती ग्रेट आहे, हे दिसू लागले. मला खूप गिल्टी वाटू लागले.

आमच्या लग्नाच्या एका वाढदिवशी मी प्रज्ञाला एक पत्र लिहिले. हे पत्र मी फेसबुकवर आणि व्हॉटस्अॅपवर पोस्ट केले. पत्राचा मायना होता ‘माझ्या गॉडेस ऑफ पीसविषयी थोडेसे’. जे जे उत्स्फूर्तपणे सुचत गेले, ते मी लिहीत गेलो-

“प्रिय प्रज्ञा,

खूप वर्षांपूर्वी, या दिवशी तू लग्न करून आलीस, तेव्हा तुला संसारातले काहीसुद्धा येत नव्हते.

वरण तुरीच्या डाळीचे करतात हे माहीत नसल्यामुळे तू मला हरबऱ्याच्या डाळीचे वरण सलग तीन दिवस करून खाऊ घातले होतेस. मीसुद्धा खात राहिलो होतो ते हरभऱ्याचे वरण, तुझ्या अज्ञानाच्या आदरापोटी… चौथ्या दिवशी शेजारच्या रामनकाकूंनी तुला सांगितले की, वरण हरभऱ्याचे नसते, तुरीचे असते, तेव्हा कुठे घरात वरणासाठी तूर शिजू लागली…

आपण तेव्हा कोइम्बतूरला राहात होतो. त्यानंतर अनेक महिने मी कोइम्बतूरला कोइम्बहरभरा म्हणत होतो... पण लवकरच, एक दोन महिन्यांतच, तुला सगळा संसार कळून चुकला.

तू माहेरी निघालीस पुण्याला कोइम्बतूरवरून तेव्हा तू मला दारे कशी लावायची, दूध कसे तापवायचे वगैरे त्रेशष्ट सूचना दिल्या होत्यास…एखाद्या विषयात दोन महिन्यांत पीएच.डी. पूर्ण केल्याचा हा एकच प्रकार मला आयुष्यात पाहायला मिळाला तुझ्यामुळे… वेलींना आपोआप फुले येतात, तसा स्त्रीला संसार आपोआप येतो, असे मी त्या वेळी माझ्या उल्लू मित्रांना सांगितल्याचे मला स्मरते आहे...

तुझी गंमत म्हणजे, तू जिथे जातेस पटकन तिथली होऊन जातेस. तीन वर्षं दक्षिणेत राहून पुण्यात आल्यावर ‘रूपाली’मध्ये इडली खाताना म्हणालीस - ‘आपल्या साऊथसारख्या इडल्या जमत नाहीत नाही ना या इथल्या लोकांना…’

लग्न झाल्यावर लवकरच माझ्या लक्षात आले की, दोन विरोधी गोष्टी तुझ्यात एकत्र आल्या आहेत. पराकोटीचा उत्साह आणि पराकोटीची शांतता. झऱ्याचा उत्साह आणि सरोवराची शांतता सगळे एकत्र! 

मग मुली झाल्या...तू त्यांची होऊन गेलीस.तू इतकी त्यांची होऊन गेलीस की, तुझ्या सगळ्याच्या सगळ्या स्वभावाचे प्रतिबिंब त्यांच्याही मनात जसेच्या तसे उमटले... त्याही तुझ्याच सारख्या होऊन गेल्या... शांत, हसऱ्या, प्रसन्न... कधीही आवाज न वाढवणाऱ्या….

मला हवे तसे जगू दिलेस तू…

मला मित्रांचा नाद म्हणून तू तुझ्या वाट्याच्या मला तू मित्रांत वाटून टाकलेस…

मला लिहावेसे वाटले, तेव्हा तू मला लेखनाला देऊन टाकलेस…

मला एकटे राहावेसे वाटले, तेव्हा तेव्हा माझ्या एकांताच्या ज्योतीभोवती तुझ्या काळजीचे हात धरलेस…

माझ्या व्यसनाच्या वादळातून मी सुरक्षित पार होइपर्यंत तू घर आणि नाते तुझ्या सहनशीलतेच्या छत्रीखाली सुरक्षित ठेवलेस…

मला दिलेल्या स्वातंत्र्यातही माझ्या नकळत माझ्याबरोबर राहिलीस तू….

मला आज कळते आहे,

मी लोकांतात रमलो, तेव्हा त्या रमण्यामागची ऊर्जा तुझी होती...

मला आज कळते आहे, मी आज एकांतात रमतो तेव्हा त्या एकांतातली शांतता तुझी असते…

माझ्या रस्त्यावरच्या मारामाऱ्यासुद्धा तू शांतपणे हाताळल्यास. प्रत्येक मारामारीनंतर तू शांत राहायचीस…

तुझे डोळे म्हणायचे - काही लोक मार खायच्या लायकीचे असतात हे खरे आहे, पण म्हणून आपण मार देण्याच्या लायकीचे व्हायचे का?

मला मोठ्या नौकरीचा राजीनामा द्यावा वाटला तेव्हा तेव्हा अगदी सहज म्हणालीस - ‘चल देऊन टाक…’

अस्थैर्याच्या समुद्रात आयुष्याची नौका घालताना घाबरली नाहीस तू... श्रीमंती आणि गरीबी एकच असते असे तुझे म्हणणे... देव ह्या जगातील सगळ्यांचेच थोडे थोडे बघत असतो असे तुझे म्हणणे…

पैशात तू कधी सिक्युरिटी बघितलीच नाहीस. सिक्युरिटी नेहमी तू तुझ्या श्रद्धेत बघितलीस...

तुला कॅन्सर झाला, तेव्हा फारशी घाबरली नाहीस तू.

तुझे ऑपरेशन झाले, तुला बाहेर रूममध्ये आणले. तेव्हा त्या भुलेतही तू एखाद्या ताज्या गुलाबासारखी दिसत होतीस… बाजूला उभी असलेली एक नर्स म्हणाली - ‘इतका फ्रेश पेशंट बघितलाच नाही कधी...’

तुझ्या कीमो सुरू झाल्या आणि मला हार्टचा त्रास झाला... माझी बायपास झाली… एक दिवस असा आला की, तुझी कीमो आणि हार्टचा प्रॉब्लेम झालेला मी हॉस्पिटलच्या एकाच रूममध्ये पडलेलो होतो… शेजार शेजारच्या कॉटस् वर.

तू स्वतःचा कॅन्सर बाजूला ठेवलास आणि माझी रिकव्हरी बघितलीस… एकटीने जाऊन रेडिएशन घेतलीस शांतपणे, आणि येताना रस्त्यात मार्झोरिनचे दुकान लागते म्हणून मुलींना आणि मला मार्झोरिनची सँडविचेस आणायला विसरली नाहीस…

मला आठवते आहेस तू त्या वेळची. लिम्फिक फ्लुइडने हात सुजलेला, कीमोने केस गेलेले... त्या सुजलेल्या हाताने, केस नसलेली तू - मला गरम पोळ्या मिळाव्यात म्हणून आपल्यातल्या शांत हट्टाने पोळ्या लाटत होतीस…

इतर पेशंटशी गप्पा मारता येतात म्हणून तू जनरल वॉर्डमध्ये अॅडमिट व्हायचीस. तिथल्या पेशंट बायकांशी इतक्या गप्पा मारायचीस की, तुला डिस्चार्ज मिळायच्या वेळेला सगळा वॉर्ड थोडासा उदास व्हायचा…

संसार करत करत, इतर कॅन्सर पेशंटना आधार देत देत, दैवाने टाकलेला फासा तू उलटवून टाकलास…

खरं तर तुला भीत्या नाहीत असे नाही…

भाजी किंवा माझ्यासाठी केलेला कुठलाही पदार्थ मला आवडेल का, ही भीती तुला रोज छळते. पण त्यावरचा उपायसुद्धा तुला माहीत असतो. तू देवाला छोटे छोटे नवस बोलतेस - भाजी त्याला आवडू दे, मी तीनदा ‘शुभंकरोती’ म्हणेन; थालीपीठ त्याला आवडू देत, मी तुला चिमुटभर साखर ठेवेन…

नवसांबद्दल तू अगदी पर्टिक्युलर आहेस. मला थालीपीठ अवडलं नाही तर तू देवाला नाही म्हणजे नाही साखर ठेवत…

टॉलस्टॉय, शेक्सपिअर, डोस्टोव्हस्की आणि अशा इतर थोरा मोठ्यांवर मी बोलतो लिहितो. त्या नुसत्या गप्पा आहेत, हे तुला माहीत आहे… मला, त्या तिघांना आणि बाकीच्या मोठ्या लेखकांना संसारातले काही येत नाही, हे तुला नक्की माहिती आहे. साहित्यिक गप्पा कितीही मोठ्या असल्या, तरी त्यांना संसाराचे वजन येत नाही, हे तुला माहिती आहे.

म्हणूनच माझ्या मोठ्या मोठ्या गप्पांनी इम्प्रेस न होता तू माझ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवून असतेस... मी चष्मा घालायाचे विसरलो नाहिये ना, खरेदीला जाताना पैशाचे पाकीट विसरलो नाहिये ना... अशा सगळ्या छोट्या पण वजनदार गोष्टी तू बघत असतेस... मला काही आणायला पाठवले, तर अधूनमधून फोन करून माझ्या धांदरट बाजारहाटीच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतेस…

तुझा एकच वीकनेस आहे. नाटकातल्या मुली आणि बायका माझ्या आजूबाजूला असल्या की, तुझे डोके फिरते… ‘त्या मला पळवून नेतील, असे तुला वाटते का?’ असे विचारल्यावर तू चिडून म्हणतेस ‘त्या कशाला पळवून नेतील, तूच पळून जाशील... तू काही साधा माणूस नाहियेस…’ तुझ्या माझ्याबद्दलच्या ह्या अज्ञानावर मी बेहद्द खुश आहे…

आपल्यातही स्त्रियांना आवडणारे काही तरी आहे, असे इतर स्त्रियांना नाही तरी आपल्या बायकोला वाटते आहे, हा विचार मला खूप सुखावतो. आपल्याला आपली अगदीच लायकी नसताना ही बायको मिळाली, या विचारांची धग जरा कमी होते…

माझी एक बहीण मला आज विचारत होती - ‘काय दिलंस आज तिला?’ तिला काय सांगायचे हा प्रश्न पडला मला! समाधानाला आणि शांततेला काही देता येत नाही, हे बहिणीला कसे समजावून सांगावे या विचारात मी दुपारभर आहे.

त्या विचारातूनच थोडे शब्द सुचले. गप्पांनाही संसाराएवढे नसले तरी थोडे वजन असतेच की!”

***

हे पत्र प्रज्ञाला खूप आवडले. दोन-तीन दिवसांनी ती मला म्हणाली - ‘मी हे पत्र सारखे सारखे वाचत बसते!’ मी म्हणालो, ठीक आहे. तू आयुष्यभर कणकण झिजून केलेले प्रेम आणि माझे एक पत्र - हिशोब बरोबर होत असेल तर ठीक आहे!

तिने लक्ष दिले नाही. ती पत्रातच रमली होती.

हळूहळू सगळे व्यवस्थित होत गेले. आम्ही परत पूर्वीसारखे जगू लागलो. यालाही आता खूप वर्षे झाली. परंतु आना कॅरेनीनाचे प्रारूप मनातून काही गेले नाही. माझ्या मनाच्या अवकाशात आना एखाद्या झाडावर अडकलेल्या पतंगासारखी फडफडत राहिली. आना विजेसारखी, किटी पावसासारखी! आना दीपवून टाकणारी आणि किटी समृद्ध करणारी!

...........................................................................................................................................

हे मानवी जीवनच असे आहे. इथे जीवन, मृत्यू, मीलन, वियोग, अस्वस्थता आणि कृतार्थता असे सगळे विरोधाभास एकत्र असतात. प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे की, ते हे सगळे विरोधाभास सांधून टाकते. तू माझे जीवन कसे आहेस, हे फॅनी ब्राऊनला सांगताना कीट्स मरण्याची भाषा करतो. तो लिहितो - मी माझ्या धर्मासाठी मरायलासुद्धा तयार आहे. प्रेम हा माझा एकच धर्म आहे आणि या धर्माचा एकेमव सिद्धान्त म्हणजे तू आहेस स्त्री-पुरुष प्रेमाचे केवढे विराट नाट्य!

...........................................................................................................................................

७.

मी विचार करत राहिलो. माझ्या मनात आना का तरळते आहे? मी समाधानी का नाही? माझे प्रज्ञावरचे प्रेम खोटे आहे का? मी मुळातच अतृप्त माणूस आहे का? अतृप्तीत जन्मलेला आणि अतृप्तीत मरणारा?

परत प्लेटो मदतीला आला. तो म्हणतो - “आपण प्रेमांचे विभाग करतो, त्यांना वेगवेगळी नावे देतो. हे प्रेम वेगळे, ते प्रेम वेगळे असं म्हणतो. खरं तर हे सगळे प्रकार एका विराट प्रेमाचे छोटे छोटे भाग असतात.”

किटीचे प्रेम, आनाचे प्रेम! एका विराट प्रेमाची दोन एक्सप्रेशन्स! एका विराट प्रेमाच्या दोन अभिव्यक्ती! मला वाटत राहिले की, प्रेम हे प्रकाशासारखे आहे. कशावर तरी पडल्याशिवाय प्रकाश दिसत नाही. ज्यावर पडेल त्याचा काहीतरी गुणधर्म प्रकाश घेतो. आनाच्या व्यक्तित्वावरून परावर्तित होताना प्रेम तिच्या व्यक्तित्वाचा रंग घेते. किटीवरून परावर्तित होताना प्रेम तिचा रंग घेते. प्रत्येक व्यक्तीचे प्रेम करणे वेगळे. प्रत्येक व्यक्तीचे प्रेमाच्या तहानेने व्याकूळ होणे वेगळे. आपण प्रेमाच्या जातीमध्ये रमण्यापेक्षा प्रेमामध्ये रमून जावे. प्रकाशाच्या रंगाच्या प्रेमात पडण्यापेक्षा प्रकाशाच्या प्रेमात पडावे.

आपण प्रेमाचे भाग करतो, आणि भागामध्ये पूर्णत्व शोधतो किंवा सार्त्र, काम्यू आणि शॉ यांच्याप्रमाणे अनेक भाग वेगवेगळे करून समाधान करून घ्यायचा प्रयत्न करतो. पण एका वेळी अनेक भाग एन्जॉय करायची शक्यता असते का? शॉची शार्लट काही बोलली नाही, म्हणजे ती दुखावली गेली नाही, असे होते का? फ्रान्सीन डिप्रेशनमध्ये गेली, तर काम्यूचे मारियाबद्दलचे प्रेम तेवढेच ‘एन्जॉएबल’ राहाते का? म्हणजे प्रेमाचे सगळे भाग एन्जॉय करायला जावे, तर ते सगळे भाग थोडे थोडे कमी होत जातात!

मार्क ट्वेन आणि ऑलिव्हिया किंवा एलिझाबेथ आणि रॉबर्ट ब्राऊनिंग ही जोडपी प्रेमामध्ये स्वतःला विसरून जातात. हे लोक समग्र प्रेम शोधण्यापेक्षा आपल्या स्वतःला समग्र बनवू पाहतात.

एलिझाबेथ बॅरेट ब्राऊनिंग लिहिते - “माझ्या आयुष्यातल्या सगळ्या श्वासांमधून, सगळ्या हास्यांमधून आणि सगळ्या अश्रूंमधून मी तुझ्यावर प्रेम करते. आणि देवाने कृपा केली, तर माझ्या मृत्यूनंतर मी तुझ्यावर अजून परिपूर्ण प्रेम करायचा प्रयत्न करेन.”

रॉबर्ट ब्राऊनिंगवर प्रेम करण्यासाठी तिने तिचा जन्म तर दिलाच होता, पण मृत्यूनंतरसुद्धा त्याच्यावर अजून चांगले प्रेम करू शकण्यासाठी तिला परिपूर्ण होत जायचे होते. प्रेम आपल्याला उन्नत करत नेते, परिपूर्ण करत नेते असे अनेक लोक म्हणतात त्याचा अर्थ हा असावा! 

आपण कितीही विचार केला, तरी प्रेम या गोष्टीचा ठाव लागत नाही. आपण विचार करत जाऊ, तसे तसे ही संकल्पना अजून अजून विस्तृत होत जाते. माझा शोध आता थांबला असला, तरी मला संध्यारंग पाहात बसावे, तशी खरी प्रेमकविता वाचत बसायला आवडते. जिवंत प्रेमभावनेमागची व्यक्तिमत्त्वे समजून घ्यायला आवडते. पाब्लो नेरुदा, डब्ल्यू बी येट्स, एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग आणि एमिली डिकिन्सन यांच्यावर जास्त जास्त खोलवर जाऊन विचार व्हायला हवा, असे मला वाटत राहिले आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

डब्ल्यू बी येट्स तर मला उमगलेलाच नाही. त्याने त्याची प्रेयसी मॉड गनला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. साहित्याचे नोबेल मिळालेल्या या कवीने त्याच्या पावणे चारशे कवितांपैकी अडीचशेच्या वर कविता मॉड गनवर लिहिल्या!

ती त्याची स्फूर्तीदेवता होती. तसे पाहायला गेले, तर त्याचे प्रेम असफलच म्हणावे लागेल. त्याला मॉड गनकडून नक्की काय मिळाले म्हणून तो तिच्या मृत्यूनंतरसुद्धा तिच्या ‘पिलग्रिम सोल’वर म्हणजे जन्मोजन्मीचा यात्री असलेल्या आत्म्यावर प्रेम करत राहण्याची भाषा करतो?

एलिझाबेथ ब्राऊनिंगवर रॉबर्ट ब्राऊनिंगने निरतिशय प्रेम केले. तिला मृत्यूनंतर त्याच्यावर प्रेम करत राहावे असे वाटले, तर आपण समजू शकतो. पण डब्ल्यू बी येट्सला त्यामानाने फारसे काही मिळाले नाही. का त्याला जे मिळाले ते अपूर्व आणि अलौकिक होते?

डब्ल्यू बी येट्सला लिहिलेल्या पत्रात मॉड गन लिहिते - “Our children were your poems of which I was the father sowing the unrest & storm which made them possible & you the mother who brought them forth in suffering & in the highest beauty.”

(तुझ्या कविता म्हणजे आपल्या दोघांची मुलेच आहेत. मी तुझ्या कवितांची पिता आहे. कारण मी तुझ्यात अस्वस्थता आणि वादळे पेरली! ही अस्वस्थता आणि ही वादळे कारण झाली तुझ्या कवितांची! तू त्यांची आई झालास. तू खूप दुःख भोगून आणि सर्वोच्च सौंदर्याचे वरदान देऊन त्यांना तू या जगात आणलेस!)

मॉड गन त्याची ‘बर्निंग क्लाउड’ होती. तिच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाने आणि तिच्या सौंदर्याने त्याचे सगळे आयुष्य आणि त्याची सगळी कविता झळाळून गेली होती. तिचेही येट्सच्या कवितांवर प्रेम होते. दोघेही आयर्लंडचे. ती आयरिश स्वातंत्र्यसैनिक होती. सुरुवातीला ती त्याला नाही म्हणाली, कारण त्याचा ओढा कलेकडे होता, स्वातंत्र्यलढ्याकडे नव्हता. पुढे त्याची कविता बघून आपण याच्यासाठी कोण आहोत, हे तिला कळून चुकले. आपण लग्न केले, तर त्याच्या प्रेमाची अस्वस्थ ज्वाला विझून जाईल आणि मग त्याची कविताही विझून जाईल, असे तिला वाटले.

१९०८ साली ते शरीरानेही एक झाले, पण तिने लग्न नाही केले. १९३९ साली येट्स गेला, तेव्हा त्याचे पार्थिव मायदेशी दफन करण्यासाठी ते ती आयर्लंडला घेऊन आली. त्याने तिला आणि तिच्या सौंदर्याला अमर केले होते. त्याच्या पार्थिवावर मूठभर माती टाकताना तिला काय वाटले असेल?

मॉड गनचा पुनर्जन्मावर विश्वास होता. ती येट्सला सांगत असे की, पूर्वजन्माचे काहीतरी नाते असल्याशिवाय माणूस प्रेमात पडत नाही. येट्सच्या पार्थिवावर मूठभर माती टाकताना तिने त्याला काही वचन दिले असेल का? मला मॉड गनचे पटले- काही पूर्वीचे नाते नसेल, तर उगीच कोण कुणाच्या प्रेमात पडेल!

हे मानवी जीवनच असे आहे. इथे जीवन, मृत्यू, मीलन, वियोग, अस्वस्थता आणि कृतार्थता असे सगळे विरोधाभास एकत्र असतात. प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे की, ते हे सगळे विरोधाभास सांधून टाकते. तू माझे जीवन कसे आहेस, हे फॅनी ब्राऊनला सांगताना कीट्स मरण्याची भाषा करतो. तो लिहितो - मी माझ्या धर्मासाठी मरायलासुद्धा तयार आहे. प्रेम हा माझा एकच धर्म आहे आणि या धर्माचा एकेमव सिद्धान्त म्हणजे तू आहेस!

स्त्री-पुरुष प्रेमाचे केवढे विराट नाट्य! स्त्री-पुरुषांचे जिवंत प्रेम हा या जगातील एकमेव धर्म आहे की नाही, माहीत नाही. पण ते एक विराट आणि जिवंत असे ‘नाट्य’ नक्कीच आहे. प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या धमन्यांमधून वाहणार नसतील, तर या मानवी रक्ताच्या वाहण्याला तसं बघायला गेलं, तर काय अर्थ राहतो!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......