वाल्मीक धनंजय ही अपप्रवृत्ती कशी आकाराला आली आणि कशी मोठी झाली, हे कळले की, अनेक ठिकाणच्या अशा अपप्रवृत्तींचे रहस्य उलगडणे सोपे जाईल
पडघम - राज्यकारण
विनोद शिरसाठ
  • धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड
  • Sat , 01 February 2025
  • पडघम राज्यकारण बीड Beed धनंजय मुंडे Dhananjay Munde वाल्मीक कराड Walmik Karad

बीड जिल्ह्यातील, केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली. खंडणी प्रकरणाला विरोध केला म्हणून त्यांचे अपहरण करून, क्रूर पद्धतीने छळ करून झालेली ती हत्या आहे.

त्या प्रकरणात परळी येथील वाल्मीक कराड व त्यांचे सहकारी गुंड यांना अटक करण्यात आली आहे. वाल्मीक व त्यांच्या टोळ्यांतील गुंड हे राज्याचे अन्य व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची खास माणसे आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे, परंतु त्यांनी तो दिलेला नाही किंवा त्यांची गच्छंती झालेली नाही.

वस्तुतः अभूतपूर्व बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या दोन महिन्यांत, हाच विषय सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तरीही महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांचा आवाज बसलेला आहे. हत्या झाल्यानंतरच्या दोन आठवड्यांत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सर्व तऱ्हेने झाला. मात्र, त्यानंतरच्या महिनाभरात हे प्रकरण अधिकाधिक पेटत गेले.

विधानसभेच्या अधिवेशनात हे प्रकरण भाजपचे बीड जिल्ह्यातील, आष्टी तालुक्यातील आमदार सुरेश धस यांनी लावून धरले. त्या व्यतिरिक्त अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी प्रचंड दबाव निर्माण केला आहे. सोशल मीडिया व दूरचित्रवाहिन्या यांनी तर त्या निमित्ताने वाल्मीक व धनंजय आणि त्यांच्या सहकाऱ्यांची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

वाल्मीक व त्यांच्या अनेक टोळ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांत कसा धुडगूस घातला आहे, याच्या नव्या कहाण्या रोज पुढे येत आहेत. खंडणी, मारहाण, लुटालूट, धमक्या, जमिनी बळकावणे, सरकारी योजनांचा पैसा हडप करणे, विविध लाभाच्या योजना बोगस नावावर वळवणे, असे सारे ओरबाडण्याचे प्रकार अतोनात झाले आहेत. पोलीस व सरकारी यंत्रणा यांचा साम-दाम-दंड-भेद या कूट नीतीमार्फत प्रचंड दुरुपयोग केल्याशिवाय हे शक्य नव्हते.

हे सर्व इतके अतिरेकी पद्धतीने झाले आहे की, अशा सर्व प्रकारांसाठी देशात बदनाम झालेल्या बिहारपेक्षा वाईट स्थिती बीड जिल्ह्याची झाली आहे, असे सर्रास बोलले- लिहिले जात आहे. अर्थातच, अशा लोकांमुळे पूर्ण जिल्ह्याला बदनाम करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे मराठा व वंजारी या दोन प्रमुख जातींमधील तेढही रंगवली जात आहे, पण अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांचा संबंध विशिष्ट जातीशी जोडणे हे केव्हाही चूकच आहे.

अशा पार्श्वभूमीवर वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या कर्तबगारीकडे व कुकर्माकडे पाहावे लागेल. कारण ‘वाल्मीकशिवाय धनंजयचे पानही हलत नाही’, अशी प्रशस्ती पंकजा मुंडे यांनी त्या दोघांच्या उपस्थितीत अलीकडेच दिली होती. अर्थातच, ते दोघे एका अपप्रवृत्तीचे प्रतीक आहेत, ही अपप्रवृत्ती राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये लहान-मोठ्या स्वरूपात कार्यरत आहे. त्यामुळे वाल्मीक धनंजय ही अपप्रवृत्ती कशी आकाराला आली आणि कशी मोठी झाली, हे कळले की, अनेक ठिकाणच्या अशा अपप्रवृत्तींचे रहस्य उलगडणे सोपे जाईल.

तर वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांचा उगम व विस्तार झाला तो भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळात. भाजपने १९८५नंतरच्या काळात ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील आणि ओबीसींमधील विविध जाती-जमातींमधील नेतृत्व पुढे आणायला सुरुवात केली. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांचे नाव महाराष्ट्रात आघाडीवर राहिले.

१९८५नंतरची तीन दशके ते राज्याच्या राजकारणात चढत्या क्रमाने बलशाली होत गेले. इतके की, महाराष्ट्रातील भाजपचे सर्वांत मोठे नेते म्हणून वावरले, त्यांना त्यांचे मेव्हणे प्रमोद महाजन यांनी केंद्रातून भक्कम साथ दिली.

शिवाय त्या काळात सेना--भाजप युती होती आणि भाजप हा महाराष्ट्रात लहान भाऊ, तर शिवसेना मोठा भाऊ होता. त्यामुळे भाजपने स्वतःची प्रतिमा बदलण्यासाठी गोपीनाथ यांना राज्यातील सर्व सूत्रे सोपवल्यासारखे होते. बीड जिल्हा तर त्यांना आंदण दिल्यासारखाच होता. १९८५तर पाच वर्षे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, नंतरचे पाच वर्षे शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व गृहमंत्री, त्यानंतरची दहा वर्षे राज्यात विरोधी पक्ष नेते आणि २००९नंतरची पाच वर्षे लोकसभेतील भाजपचे उपनेते असा गोपीनाथ यांचा काळ होता.

तरुण, तडफदार लोकनेता अशी त्यांची सुरुवातीच्या काळातील प्रतिमा होती. त्या काळात राज्यातील सर्वांत बलाढ्य नेते शरद पवार यांच्याशी टक्कर घ्यायला भले भले घाबरत होते, मात्र गोपीनाथ यांनी तशी टक्कर दिली. त्यामुळे ते अनेक लहान-थोरांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांचा दबदबा प्रचंड वाढला. अर्थातच सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रमाणे त्यांच्याकडून काही चांगली कामे झाली. पण त्यांची कारकिर्द अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, गुंडगिरी, जातीच्या खऱ्या-खोट्या अस्मिता यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणारी होती, बळ पुरवणारी होती. बहुजनवादाला खतपाणी घालणारी होती. त्याला बीड जिल्ह्यातील व ओबीसी समाजातील जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत गेला.

तेव्हा गोपीनाथ हे राज्यामध्ये भाजपचे नेते, ओबीसीचे नेते, मराठवाड्याचे नेते आणि बीड जिल्ह्याचे नेते अशा चार स्तरांवर वावरत होते. मात्र, बीड, अहमदनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांत ‘वंजारी समाजाचे नेते’ ही त्यांची ओळख ते लपवत नव्हते. वंजारी समाजामध्ये ‘भगवान बाबा’ व ‘वामनभाऊ’ हे दोन संत मानले जातात. राजकीय आघाडीवर बबनराव ढाकणे हे नेतृत्व काही काळ होते. मात्र गोपीनाथ यांना त्या समाजातून मिळालेला पाठिंबा कमालीचा जास्त होता.

अशा नेत्याच्या सभोवताली वावरणारे लहान-थोर लोक सत्तेचा दुरुपयोग करणार हे उघड होते. आणि अशा गुंडागर्दी करणाऱ्यांचा दुरुपयोग स्वतःची सत्ता राबवण्यासाठी गोपीनाथ यांच्याकडून होणे साहजिकच होते. त्यामुळे जातीच्या वृथा अभिमानाचे, खोट्या अस्मितेमध्ये व दुराग्रही अहंकारामध्ये रूपांतर कधी झाले, हे कोणाला कळले नाही.

त्या दोन संतांनंतर हा एक तिसरा ‘संत महात्मा’ असे स्थान त्या समाजाने त्यांना दिले. सर्वसामान्य भोळ्या-भाबड्या जनतेने आणि त्या समाजातील सुशिक्षित वर्गानेही गोपीनाथ यांचा कैफ वाढत राहील असे वर्तन केले.

अर्थातच, असा प्रकार सर्वच काळात व सर्वच जातींच्या संदर्भात, सर्व जिल्ह्यांतील लहान-थोर नेत्यांबाबत घडत आला आहे. त्यामुळे इथे काही जगावेगळे घडले असे नाही, पण गोपीनाथ यांनी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक गैरप्रकारांकडे सातत्याने दुर्लक्ष केले. परिणामी त्यांच्या नावाखाली त्यांचे अनेक कार्यकर्ते मोठमोठ्या बढाया मारण्यात, राजरोस अफरातफरी करण्यात व गुंडगिरी करण्यात माहीर होऊ लागले.

या सर्वांना दडपण्याचे तर राहिले दूर, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे गोपीनाथ यांनी सातत्याने चालू ठेवले. या सर्व प्रक्रियेतच त्यांचे डावे-उजवे हात म्हणून धनंजय आणि वाल्मीक आकाराला आले.

पुतण्या धनंजय आणि घरकाम करणारा वाल्मीक या दोघांवरील गोपीनाथ यांचे अवलंबित्व वाढत गेले आणि त्यांनी चालवलेला अतिरेक लक्षात आला, तेव्हा फार उशीर झाला होता. तेव्हा गोपीनाथ यांनी आपली कन्या पंकजा यांना राजकारणात उतरवले, परंतु धनंजय आणि वाल्मीक हे इतके शिरजोर झाले होते की, त्यांनी गोपीनाथ यांना जिल्ह्यात आव्हान दिले.

धनंजय यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन गप्प करण्याचा प्रयत्न गोपीनाथ यांनी अखेरच्या काळात करून पाहिला, परंतु धनंजय यांच्या महत्त्वाकांक्षा इतक्या वाढल्या होत्या की, गोपीनाथ यांचे कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी धनंजय यांनी संधान बांधले. त्यामुळे गोपीनाथ यांच्या हयातीतच धनंजय यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर दोनेक वर्षांनीच मे २०१४मध्ये गोपीनाथ यांचे अकाली निधन झाले आणि मग धनंजय व वाल्मीक यांना बीड जिल्ह्याचे रान अक्षरशः मोकळे झाले. त्यांच्या अरेरावीचे भरणपोषण गोपीनाथ यांनीच करून दिले होते, त्यामुळे गोपीनाथ यांच्या मृत्यूनंतर परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा यांच्याकडून धनंजय यांचा पराभव झाला तरी, धनंजय व वाल्मीक यांचा दरारा कमी झाला नाही. त्याला आणखी खतपाणी घातले, ते शरद पवार व अजित पवार या काका-पुतण्याने.

२०१४मध्ये धनंजय यांना पराभूत करून निवडून आल्यावर पंकजा मंत्री झाल्या, पण त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय यांना थेट विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते केले. केवळ दोन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या धनंजय यांची कोणती कर्तबगारी पाहून दोन्ही पवारांनी ते पद त्यांना दिले? ती पाच वर्षे संपल्यावर महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात धनंजय यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद आले.

आणि अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला, तेव्हा धनंजय यांच्याकडे कृषी मंत्रिपद आले. म्हणजे, २०१४नंतरच्या पूर्ण दहा वर्षांत धनंजय यांना प्रचंड ताकद देण्यात शरद पवार व अजित पवार यांचा सर्वांत मोठा वाटा आहे. त्यामुळे धनंजय व त्यांच्या नावाखाली वाल्मीक यांनी चाललेल्या कुकर्माचा बराच दोष जातो तो शरद पवार व अजित पवार यांच्याकडे. शरद पवारांनी ते इच्छेने केले असेल, अनिच्छेने केले असेल वा नाइलाजाने, पण तसे घडले आहे हे खरे !

२०१४नंतरच्या दशकात धनंजय यांना ताकद देण्याचे आणखी मोठे काम केले ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र व धनंजय हे भाजपमध्ये समकालीन राहिलेले तरुण नेते. बीड जिल्ह्यात गोपीनाथ यांच्याशी मतभेद होऊन धनंजय राष्ट्रवादीमध्ये गेले, तेव्हा विरोधी पक्षात आपला माणूस आहे हा आनंद देवेंद्र यांना कायम राहिला. त्यामुळे देवेंद्र यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विधान परिषदेत धनंजय यांना बसवून शरद पवार व अजित पवार यांनी स्वतःची व स्वपक्षाची सोयच पाहिली असणार, पंकजा मुंडेंना शह व बीड जिल्ह्यातील तरुण नेता हा विचार त्यामागे अगदीच क्षीण असावा.

त्यात भर पडली ती पंकजा यांनी गोपीनाथ यांच्या मृत्यूनंतर बीड जिल्हा व वंजारी समाज ही आपल्या बापाकडून आलेली जहागिरी आहे, असा भ्रम जोपासण्यात. त्यांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत गेली, राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे दिवास्वप्न त्या पाहू लागल्या आणि नाटकी भाषणे करत, स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही तुच्छ वागणूक देऊ लागल्या. त्यामुळे २०१९मध्ये त्यांचा पराभव धनंजय यांच्याकडून होणे साहजिक होते. अर्थातच, तेव्हा पंकजा यांना पराभूत करण्यासाठी फडणवीस यांची छुपी मदत धनंजय यांना झाली. पंकजाला पराभूत केल्यानंतर अजित पवार व देवेंद्र यांच्यातील दुवा बनण्याची संधी धनंजय यांना मिळाली.

अजित पवारांनी २०१९मध्ये अयशस्वी बंड केल्याने चार दिवसांचे मंत्रीमंडळ बनले तेव्हा आणि नंतर मे २०२३मध्ये यशस्वी बंड केले तेव्हाही, त्यांच्यात व देवेंद्र यांच्यात दुवा बनण्याचे काम धनंजय यांच्याकडेच होते. अजित यांना काकांच्या विरोधात लढण्यासाठीही धनंजय यांनी मोठे बळ पुरवले.

त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “धनंजय यांच्याविषयी मी यापुढे बोलणार नाही. त्यांना कोणत्या कोणत्या प्रकरणांतून कशा पद्धतीने बाहेर काढले हे माझे मला माहीत.” वस्तुतः तसे म्हणून धनंजय मुंडे यांच्या कुकर्मांचा पुरावा शरद पवार यांनी सादर केला होता, एवढेच नाही तर ती कुकर्मे घडवण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मी मदत केली, अशी कबुलीही मोठ्या पवारांनी दिली होती.

हा मागील दोनेक दशकांचा चित्रपट पाहिला तर, मागील दीड महिन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभर रान पेटले असताना धनंजय यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची हिंमत अजित पवार व देवेंद्र यांनी दाखवली नाही, हे सहज समजू शकते.

दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूग गिळून गप्प आहेत, त्यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याकडून निघणारा आवाज क्षीण आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

त्यातल्या त्यात आशेचा किरण एवढाच की, सुरेश धस हे भाजपचे आमदार असूनही ज्या पद्धतीने रोज धनंजय व वाल्मीक यांची पोलखोल करताहेत, ते अफलातून आहे. ते पाहता, मुख्यमंत्री फडणवीस यांचा सुरेश धस यांना छुपा पाठिंबा असावा. कदाचित पुरते बदनाम करून धनंजयला बाहेर पडण्यासाठी किंवा काढण्यासाठीची पूर्वतयारी अशा पद्धतीने ते पाहत असतील. त्यातून राज्याचे किती नुकसान होते आहे, अर्थातच याची त्यांनी फिकीर करण्याचे कारण नाही.

परंतु, एवढे सर्व चित्र पाहता, धनंजय व वाल्मीक कसे तयार झाले? त्याचा सर्वाधिक दोष गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जातो, त्यांच्या पाठोपाठ अजित पवार व शरद पवार यांच्याकडे जातो आणि त्या पाठोपाठ अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो. या सर्वांचा भरघोस पाठिंबा नसता, तर बीड जिल्ह्यामध्ये इतके सगळे गैरप्रकार करण्याची हिंमत धनंजय व त्यांच्या नावाखाली वाल्मीक करूच शकले नसते. म्हणजे बीडची स्थिती बिहारपेक्षा वाईट झाली नसती.

आता दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित करता येणार नाही. मात्र, वाल्मीक यांच्याकडून घडलेल्या पापाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा मागायचा असेल, तर केवळ धनंजय यांचा नको; शरद पवार, अजित पवार व देवेंद्र फडणवीस या तिघांचेही राजीनामे यायला हवेत. पण तशी जबाबदारी स्वीकारायची असेल, तर नैतिकतेशी नाते असावे लागते. तसे नाते वरील चौघांचे आहे असे म्हणण्याची हिंमत त्यांचे चाहते तरी करतील काय?

पुराणातील ‘वाल्या’च्या पापात सहभागी होण्यास त्याच्या कुटुंबाने नकार दिला होता. मग बीड जिल्ह्यातील या वाल्मीकच्या पापात वाटेकरी होण्यास वरील चौघे होकार देणे कसे शक्य आहे?

.................................................................................................................................................................

‘साधना’ साप्ताहिकाच्या १ फेब्रुवारी २०२५च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 05 February 2025

विनोद शिरसाठ,
फडणविसांचा राजीनामा वगळता बाकी सर्व लेखाशी सहमत आहे. कधी तुमच्याशी सहमत व्हायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. पण फडणवीस है तो मुमकिन है. त्यांनी दादा पवारांना भाजपकडे वळवल्यामुळे धनंजय मुंडे भाजपवासी झाले. असो. प्रत्येकाच्या पापांचा घडा केव्हा ना केव्हा भरतोच. पण त्यापायी संतोष देशमुखांचा जीव गेला याची खंत आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......