आपली शैक्षणिक धोरणे नेमकी कोणाच्या फायद्याची असतात? त्यांचा विद्यार्थ्यांवर, त्यांच्या भवितव्यावर आणि एकूण कौशल्य आधारित मनुष्यबळावर काय परिणाम होऊ शकतो?
पडघम - राज्यकारण
उज्ज्वला देशपांडे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 01 February 2025
  • पडघम राज्यकारण शिक्षण Education NEP 2020 एनईपी २०२०

‘ना-नापास’ धोरण रद्द, कॉपीमुक्त परीक्षा, वह्यांची पाने पुस्तकाला जोडण्याचा निर्णय रद्द, हे सरकारने गेल्या काही दिवसांत शैक्षणिक निर्णय घेतले आहेत. तुम्ही हा लेख वाचेपर्यंत कदाचित अजून काही निर्णय घेतले जातील!

प्रश्न असा आहे की, मुळात ही धोरणे कुठल्या आधारावर आणि हेतूने बनवली जातात? शिक्षणमंत्री शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून, त्यांची मते आजमावून हे निर्णय घेतले जातात का?

ही शैक्षणिक धोरणे आखताना आपल्या देशातील भौगोलिक / आर्थिक / सामाजिक विभिन्नता, विविधता यांचा कितपत विचार केला जातो? आपल्या देशात जवळपास प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या ‘दऱ्या’ आहेत. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. सरकार धोरण आखताना त्याचा विचार करते का? या धोरणातून या दऱ्या कमी होतात का? तसा काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हेतू असतो का?

उदाहरणार्थ, ‘ना-नापास’ हे धोरण बनवताना नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती, मानसिक दडपण, अपयशाचे दुष्परिणाम इत्यादींचा विचार करताना या धोरणातही काही उणिवा असू शकतात, याची पडताळणी झाली होती का?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपल्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात शिक्षण आणि नोकऱ्या यांचा कितपत ताळमेळ घातला जातो? शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवाराला खात्रीने नोकरी मिळतेच असे नाहीच. मध्यंतरी पुण्यातल्या एका आयटी कंपनीत १०० जागांसाठी ४००० उमेदवार मुलाखतीला आले होते. एवढी किंवा याहूनही जास्त स्पर्धा असलेल्या समाजात ‘ना-नापास’ हे धोरण कसे असू शकते? अपयशाशी निगडित परिणाम हाताळण्यासाठी वेगळेही उपाय करता आले असते. बोट दुखायला लागल्यावर आपण हातच तोडून टाकत नाही.

ज्या मधल्या पिढ्या पाचवी आणि आठवी सरसकट पास होऊन दहावीपर्यंत गेल्या आहेत, त्यांना दहावीसारखी आपल्याकडची ‘प्रतिष्ठेची परीक्षा’ उत्तीर्ण होणे किती कठीण गेले असणार! किंवा जे पाचवी सरसकट उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना आठवीत उत्तीर्ण व्हावेच लागणार, त्यांचे प्रश्नही वेगळे असणार.

हे पाचवी आणि आठवीचे उत्तीर्ण होणे फक्त विद्यार्थीच नाही, तर शाळेसाठी, शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबासाठीही खूप आव्हानात्मक असणार आहे. शाळेला १०० टक्के उत्तीर्ण निकाल दाखवायचा, शिक्षकांना स्वतःची कार्यक्षमता प्रश्नांकित होईल ही भीती आणि आई-बापाची वेगळी समस्या. सर्वच पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसते. त्यांचा अभ्यास घेण्यासाठीची शैक्षणिक पार्श्वभूमी नसते. एवढेच नव्हे तर आपला पाल्य नापास झाल्यावर त्याची शैक्षणिक फी व इतर खर्चासाठी पैसे नसतात; त्या मुलांनी काय करायचे?

मुले नापास का होतात, या प्रश्नाचे उत्तरे विद्यार्थीगणिक वेगळे असू शकते किंवा असते. शाळेला, शिक्षकांना आणि पालकांना मिळून ते शोधून काढावे लागेल आणि एकमेकांची ‘सपोर्ट सिस्टीम’ व्हावे लागेल.

शिक्षण क्षेत्रातल्या काहींना ‘कॉपीमुक्त परीक्षा’ ठरवल्याने हे ‘ना-नापास’ धोरण जास्तच आव्हानात्मक वाटेल. त्यात कॉपी का करावीशी वाटते, याला अनेक घटक कारणीभूत असतात.

मी महाविद्यालयात शिकवत असताना ‘ओरिएंटेशन कोर्स’मधले विविध महाविद्यालयीन शिक्षकही त्या कोर्सच्या परीक्षेत कॉपी करताना, उत्तरे एकमेकांना विचारताना बघितले आहे. सगळेच असे नसतात, परंतु जे असतात तेही आता ‘कॉपीमुक्त’ काम करतील आणि मुलांनाविद्यार्थ्यांनाही ‘कॉपी करू नका’ असे सांगतील!

‘सुपरवायझर’ नसेल, तर आपल्याकडे कोणतीही गोष्ट नीट केलीच जात नाही. ट्रॅफिक पोलीस असेल, तरच ट्रॅफिकचे नियम पाळायचे; दंड होणार म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा इत्यादी इत्यादी. परीक्षेत सुपरवायझर असूनही कॉपी होते, त्यामागे दोन कारणे असू शकतात – एक तर कॉपी चालू आहे हे सुपरवायझरला कळत नाही किंवा तो अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतो.

मी महाविद्यालयात एका जोगिणीला कॉपी करताना पकडले, तेव्हा तिच्याबरोबरच्या इतर जोगिणी रडत म्हणाल्या की, हिने देवाच्या दारात बेईमानी केली, आणि मी दुर्लक्ष का केलं नाही म्हणून माझ्या वरिष्ठ माझ्यावर चिडल्या.

कॉपी प्रकरण स्पर्धा, नोकरी, इत्यादींशी जोडलेले आहे. मोठ्यांच्या समाजात ‘कष्ट न करता’ चैन करणारे, नाव कमवणारे, प्रतिष्ठा असलेले लोक या मुलांना ‘अभ्यास न करता पुढे जाता येते’ याची एक प्रकारे शिकवणूकच देत असतात.

फक्त मुलांना ‘कॉपी करणे चुकीचे आहे’ हे सांगणे उपयोगाचे नाही. त्यांना त्यांच्या आजूबाजूला नैतिक-भौतिक भ्रष्टाचार करून आनंदात जगणारा समाज दिसत असतो.

पाठ्यपुस्तकामध्येच वह्यांची कोरी पाने जोडणे हाही असाच एक निर्णय. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांचे निर्णय विविध शिक्षक संघटना / शिक्षक मंच यांना पटत नसतील, तर त्यांनी एकत्र येऊन आपापले दबाव गट निर्माण करणे गरजेचे आहे. सरकारला त्याच्या धोरणांतील आणि निर्णयातील कमतरता दाखवून देऊन विरोध करायला हवा.

आधी सरकार निर्णय घेणार, मग काही कालावधीने तो रद्द करणार, त्यानंतर ‘सुरुवातीपासून आमचा विरोधच होता’ या म्हणण्याला काही अर्थ नाही. या सर्व प्रक्रियेत प्रचंड पैसा खर्च होतो आणि वेळेचा अपव्ययही होतो. या संघटनांना दबाव गट तयार करणे अवघड नाही. जे वित्त आयोगासाठी / पगार वाढीसाठी संप करू शकतात, ते विद्यार्थ्यांचे कल्याण ओळखून त्यासाठीदेखील संप करूच शकतात.

‘NEP 2020’ म्हणजे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ची मला प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे भारताच्या महान शिक्षण परंपरेचा त्यात करण्यात आलेला आग्रह. ही परंपरा ८०-१०० वर्षांपूर्वीची नाही, तर हजारो वर्षांपूर्वीची आहे. (NEP2020ची प्रस्तावना पहा)

आपण १९व्या शतकातील शिक्षणतज्ज्ञांकडे लक्ष दिलेले नसताना, २०२४चे धोरण तयार करताना आपण हजारो वर्षे मागे का गेलो?

या धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत सुधारणांच्या केंद्रस्थानी शिक्षक असला पाहिजे. पण खरं तर त्याच्या केंद्रस्थानी विद्यार्थी असला पाहिजे. आणि शिक्षक, विद्यापीठे, शाळा मंडळे यांनी त्या सुधारणा शक्य करण्यासाठी, मजबूत आधार प्रणाली म्हणून परिघावर असले पाहिजे.

या धोरणाच्या ‘तत्त्वे’ या विभागात, मूलभूत तत्त्वांमध्ये पाठांतर आणि सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर देण्यावर भर दिला आहे. हे एक उत्कृष्ट तत्त्व आहे खरेस परंतु विविध बोर्ड परीक्षा, प्रवेश परीक्षांना उच्चतम महत्त्व दिले जात असताना आपण ते कसे साध्य करू शकतो? कोचिंग क्लासेसची समांतर शिक्षण व्यवस्था असताना हा बदल कसा होईल - ते कदाचित संकल्पनात्मक आकलनावर, सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर देत असतील परंतु विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करणाऱ्या त्यांच्या ‘रणनीती’बद्दल काय?

‘कोचिंगक्लास संस्कृती’ का अस्तित्वात आली आणि अलीकडच्या काळात ती का भरभराटीला आली आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत या संस्कृतीची कारणे समजावून घेतली जाणार नाहीत (कारण आपल्याला ती माहीत आहेत), तोपर्यंत ती कमी करता येणार नाहीत.

आपली शैक्षणिक धोरणे नेमकी कोणाच्या फायद्याची असतात? त्यांचा विद्यार्थ्यांवर, त्यांच्या भवितव्यावर आणि एकूण कौशल्य आधारित मनुष्यबळावर काय परिणाम होऊ शकतो? अशा मुद्द्यांवर सारासार विचार होणे गरजेचे असते.

परीक्षा का घ्यायच्या? कशा घ्यायच्या? किती घ्यायच्या? त्यातून विद्यार्थ्यांनी काय मिळवणे गरजेचे आहे? याची स्पष्टता असणे शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज अशा सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे.

शाळांमध्ये उपलब्ध शिक्षक संख्या, कायमस्वरूपी शिक्षक, शिक्षकांचे शिकवण्याप्रती असलेले उत्तरदायित्व, या सर्वांचाच विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होण्यावर परिणाम होत असतो.  जास्तीत जास्त विद्यार्थी किंवा सर्वच विद्यार्थी (१०० टक्के निकाल) उत्तीर्ण व्हावेत म्हणून ज्या काही प्रथा सुरू झाल्या आहेत, त्यावरही उपाययोजना कराव्या लागतील. शाळेत अनुत्तीर्णांची संख्या तर दिसली नाही पाहिजे, पण पुढच्या वर्गातही ढकलायचं नाही म्हटल्यावर प्रश्नपत्रिका फुटण्याचं किंवा वर्गातच परीक्षेतले प्रश्न सांगण्याचे प्रमाण वाढेल. विद्यार्थी फक्त परीक्षार्थीच होतील.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

उत्तीर्ण न होऊ शकणारे विद्यार्थी शिक्षण किंवा शाळेकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघायला लागतील? त्यांच्या मानसिकतेकडे कोण लक्ष देणार? कुप्रथेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शालेय जीवनात काय शिकून बाहेर पडतील? कष्ट न करता यश मिळवण्याचे शंभर उपाय! असे विद्यार्थी पुढे आयुष्यात, समाजात काय काम करतील?

शिक्षण का घ्यायचे? अभ्यास का करायचा? परीक्षा का असतात? त्यात अभ्यास करून यश मिळवल्याने काय होतं? हे विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना जसे माहीत असणे जरुरी आहे, त्याचप्रमाणे शिक्षणमंत्रीसुद्धा त्याविषयी सुज्ञ असणे महत्त्वाचे आहे; म्हणजे धोरण राबवताना वेडेवाकडे मापदंड लावले जाणार नाहीत.

सर्वांना आपली जीवनमूल्ये समजून-उमजून घेण्यासाठी शिक्षणाचे खूप मोठे योगदान असते. त्यामुळे शैक्षणिक धोरणे बनवताना अल्पकालीन विचार न करता, त्यातून विद्यार्थ्यांचे जीवन घडणार आहे, हे लक्षात घेणे अगत्याचे ठरते.

ताजा कलम

‘असर’ या संस्थेने नुकताच शिक्षणाबद्दलचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात महाराष्ट्रात भागाकार येणारे पाचवीचे विद्यार्थी फक्त २६.१ टक्के, तर भागाकार येणारे आठवीचे विद्यार्थी फक्त ३४.५ टक्के आहेत. उरलेल्या विद्यार्थ्यांना ते शिकून पुढील इयत्तेत जायचे आहे, तेही कॉपी न करता.

.................................................................................................................................................................

संदर्भ 

https://www.loksatta.com/sampadkiya/columns/loksatta-anvyarth-quality-of-school-students-has-deteriorated-clear-from-the-asar-survey-amy-95-4857891/

https://marathi.indiatimes.com/editorial/aser-report-2024-special-explainer-maharashtra-times/articleshow/117725110.cms

https://www.education.gov.in/nep/nep-languages-2020

https://www.education.gov.in/sites/upload_files/mhrd/files/nep/2020/MARATHI.pdf

https://kartavyasadhana.in/view-article/ujjwala-deshpande-new-education-policy-part-one

https://kartavyasadhana.in/view-article/ujjwala-deshpande-new-education-policy-part-two

.................................................................................................................................................................

लेखिका उज्ज्वला देशपांडे समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत.

ujjwala.de@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 12 February 2025

नमस्कार उज्ज्वला देशपांडे!
तुमच्या विनंतीस मान देऊन मी देखील चर्चा थांबवतो. चर्चेबद्दल आभार! :-)
आपला नम्र,
-गामा पैलवान


Ujjwala Deshpande

Wed , 12 February 2025

नालंदा, तक्षशिला येथे दिले जाणारे शिक्षण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात उपयोगाचे नाही. आत्ताच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविताना आत्ताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, तंत्रज्ञान, इ. घटकांचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. ('पारंपरिक शिक्षणपद्धतीत उच्च जातीय म्हणवले जाणारे पुरूषच होते' वगैरे काही आढळून येत नाही.....) हे समजण्यासाठी चौफेर वाचन मदतीस येईल. फुले, आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, इ. मान्यवरांच्या वाचनाने संपूर्ण समाजात काय शैक्षणिक अवस्था (/अनावस्था) होती ते समजेल. मी ही चर्चा इथेच थांबवित आहे. धन्यवाद आणि आपल्या पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा.


Gamma Pailvan

Wed , 12 February 2025

नमस्कार उज्ज्वला देशपांडे!
इंग्रजांनी भारत काबीज करण्याच्या वेळच्या शिक्षणपद्धतीविषयी गांधींचे शिष्य श्री. धरमपाल यांनी THE BEAUTIFUL TREE नामे एक इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. सदर पुस्तक पीडीएफ स्वरूपात येथे मिळेल : https://www.arvindguptatoys.com/arvindgupta/beautifultree.pdf
मी पुस्तक वाचलं नाहीये. वरवर चाळता दिसून येतं की पान क्रमांक ८९ ( पीडीएफ पान क्रमांक १०६ ) वर थाॅमस मनरो याने भारतीयांना त्यांची शौक्षणिक पद्धती स्वत:च सांभाळून द्यावी असं सुचवलं आहे. यावरून भारतात व्यवस्थित रीतीने शिक्षणपद्धती विकसित झाली होती असा निष्कर्ष निघतो. ती इंग्रजांनी बंद पाडली. तीच पुनरुज्जीवित करायला हवीये. बाकी, तुम्ही म्हणता ते 'पारंपरिक शिक्षणपद्धतीत उच्च जातीय म्हणवले जाणारे पुरूषच होते' वगैरे काही आढळून येत नाही.
आपला नम्र,
-गामा पैलवान


Ujjwala Deshpande

Tue , 11 February 2025

भारतीय शिक्षणपद्धती इंग्रजांनी कायद्याने बंद पाडली. * इंग्रजांच्या आधीची भारतीय शिक्षणपद्धती म्हणजे कोणती शिक्षणपद्धती? तिच्या जागी लिपिक बनवणारी मेकॉलेची प्रणाली आणली. तिला शह द्यायला म्हणून टिळक, फुले इत्यादिंना प्रयत्न करावे लागले. * फुले, कर्वे मेकॉलेच्या प्रणालीला शह नव्हते देत, ते इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला शह देत होते...उच्च जातीय म्हणवल्या जाणाऱ्या पुरूषांकरिता जी व्यवस्था होती तिला शह देत होते. शिक्षण म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे. त्यापेक्षा काहीतरी अधिक आहे. हे जे जास्तीचं काहीतरी आहे ते मिळवण्यासाठी पारंपरिक शिक्षणपद्धतीत अनायसे मिळंत असे. * मग त्या पारंपरिक शिक्षणपद्धतीत उच्च जातीय म्हणवले जाणारे पुरूषच का होते? जुनं ते सगळं टाकाऊ नसतं. * अगदी बरोबर पण जुनं ते सगळं उपयोगी पण नसतं. असो.


Gamma Pailvan

Mon , 10 February 2025

नमस्कार उज्ज्वला देशपांडे!
भारतीय शिक्षणपद्धती इंग्रजांनी कायद्याने बंद पाडली. तिच्या जागी लिपिक बनवणारी मेकॉलेची प्रणाली आणली. तिला शह द्यायला म्हणून टिळक, फुले इत्यादिंना प्रयत्न करावे लागले. नवीन इंग्रजी कायदे न मोडता शिक्षण देण्यासाठी हे प्रयत्न होते.
आज शिक्षण संपल्यावर माणूस पोटापाण्याच्या उद्योगाला लागतो. हे कितीही खरं असलं तरी शिक्षण म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे. त्यापेक्षा काहीतरी अधिक आहे. हे जे जास्तीचं काहीतरी आहे ते मिळवण्यासाठी पारंपरिक शिक्षणपद्धतीत अनायसे मिळंत असे. जुनं ते सगळं टाकाऊ नसतं.
आपला नम्र,
-गामा पैलवान


Ujjwala Deshpande

Thu , 06 February 2025

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. तुम्ही म्हणताय तसे जर: 1. 'भारतातून शिक्षणपद्धती दुसर्‍या देशांमध्ये गेली असती' आणि 2. 'हजारो वर्षांपासून चालंत आलेल्या भारतीय शिक्षणपद्धतीत सामान्यजणांना शिक्षण घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत्या' तर न्यायमूर्ती रानडे, गोखले, टिळक, आगरकर, कर्वे ह्यांना आणि फुले, आंबेडकर, शाहू ह्यांना शिक्षण सुधारणा करण्यात आयुष्य नसते वेचावे लागले. भारतात सगळ्या राज्यांत अनेक समाज सुधारकांनी शिक्षण क्षेत्रात काम केलय. अजूनही करीत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या समोर जी आव्हाने ठेवित आहे त्यांना तोंड देण्यास नवीन विचार, नवीन धोरणे गरजेची आहेत. जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका सडत न एक्या ठायी ठाका सावध!ऐका पुढल्या हाका तुतारी - केशवसुत


Gamma Pailvan

Wed , 05 February 2025

नमस्कार उज्ज्वला देशपांडे!
लेखाशी सहमत आहे. फक्त तुम्ही विचारलेला एक प्रश्न खटकला. तो हा:

आपण १९व्या शतकातील शिक्षणतज्ज्ञांकडे लक्ष दिलेले नसताना, २०२४चे धोरण तयार करताना आपण हजारो वर्षे मागे का गेलो?
माझं मत सांगतो. त्याचं काय आहे की भारतात १९ व्या शतकात जी देशी शिक्षणपद्धती होती तीच मुळी हजारो वर्षांपासून चालंत आली होती. अधिक माहितीसाठी कृपया मद्रास सिस्टीम ऑफ एज्युकेशन पहा. विकीवर इथे आहे : https://en.wikipedia.org/wiki/Madras_School
ही पद्धती भारतातून इंग्लंड मध्ये गेली. त्यानंतरच इंग्लंडमध्ये सर्वसामान्य लोकांना शिक्षणाची द्वारं खुली झाली. हजारो वर्षांपासून चालंत आलेल्या भारतीय शिक्षणपद्धतीत सामान्यजणांना शिक्षण घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत्या. आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......