साय-फाय किंवा विज्ञान काल्पनिका हा प्रांत मराठीला नवा नाही. गेल्या तीन-चार वर्षांत केवळ दिवाळी अंकांत प्रकाशित होणाऱ्या विज्ञानकथांची वाढती संख्या पहावी. डॉ. मेघश्री दळवी आणि स्मिता पोतनीस दरवर्षी ‘अक्षरनामा’मध्ये हा आढावा घेताहेत. विषय-आशय वैविध्य, नवनव्या लेखकांचं आगमन, लेखन गुणवत्ता आणि एकूणच वाचकांचा प्रतिसाद, या सर्वच बाबतीत मराठी विज्ञानकथा लोकप्रिय आहेत. पण आजचे चोखंदळ मराठी आस्वादक फक्त मराठी साहित्य-कलाकृतींवर समाधान न मानता जागतिक मंचावरील मनोरंजन सामग्रीही तितक्याच सहजतेनं अनुभवतात. विज्ञान-काल्पनिकासुद्धा याला अपवाद नाहीत...
केवळ एक विज्ञानकथा लेखक म्हणूनच नाही, पण एक हौशी अभ्यासक म्हणूनही अमराठी (देशी) आणि जागतिक विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. यांमध्ये सिनेमा आणि अलिकडे वेब-मालिकांचा हिस्सा तुलनेनं अधिक लोकप्रिय असतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो. अनेक सन्माननीय उदाहरणं - उदा. ‘थ्री बॉडी प्रॉब्लेम’, ‘डार्क मॅटर’ अशा वेब मालिका - यात नाहीत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
फ्रँक हर्बर्टच्या ‘ड्यून’ कादंबरीवर आधारित सिनेमालिका ड्यूनचा दुसरा भाग पहिल्या भागाच्या शेवटापासून सुरू होतो. यात कथानायक पॉलचा पाहुणा ते प्रेषित हा प्रवास सुंदर चितारलाय. ज्यांना ‘ड्यून’चं जग ठाऊक नाही, त्यांनी ते पहिल्या सिनेमाद्वारे (म्हणजे २०२१चा, १९८४चा डेव्हिड लिंचचा नव्हे) अनुभवायला हवं. खूप उत्कट आणि वेगळा अनुभव! दिग्दर्शक डनी व्हिलनव्ह प्रेक्षकांना ‘ग्रँड स्केल’च्या माध्यमातून ड्यूनच्या जगात फिरवून आणतो.
इथं प्रत्येक गोष्ट भव्य वाटते- काळ, अंतरं, इमारती, खोल्या, यंत्र, जनसमूह, आणि मुख्य म्हणजे महाकाय वालुकाकृमी! हान्स झिमरचं संगीत चित्रपटाचा प्रभाव द्विगुणित करतं. ड्यूनच्या जगातल्या मानवी व्यवहार आणि आचार-विचारावर मध्यपूर्वेच्या वाळवंटात फुललेल्या इस्लामचा मोठा प्रभाव जाणवतो. अनेक पंथ, त्यांच्यातल्या धार्मिक धारणा-श्रद्धा, बायकांची वेशभूषा, अगदी ड्यूनवरची भाषासुद्धा अरबीसारखी वाटते, पण मुख्य साधर्म्य म्हणजे पाणी. हे दोन्हीकडंही अतिशय पवित्र.
ड्यून कथेचा मूळ गाभा आपल्याला परिचित असतो- शोषक आणि शोषित अशी व्यवस्था. शोषितांकडे असलेलं एक महत्त्वाचं नैसर्गिक संसाधन ओरबाडून पैसा करण्यासाठी परके शोषक येतात. काही कारणानं शोषकांमधली एक व्यक्ती पाहुणी म्हणून शोषितांमध्ये येते, त्यांच्यासोबत मिसळून जाते, त्यांचा विश्वास कमावते, कालांतरानं त्यांच्यातलीच एक होते. हळूहळू शोषकांचा शोषितांवर अन्याय पाहून व्यथित होते, आणि शोषकांना उलथवून टाकायला गांजल्या-पिचल्या शोषितांची मदत करते. टिपिकल मसीहा स्टोरी! वानगीदाखल जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार’ घ्या.
ड्यूनवर ‘स्पाइस’ नावाचा मौल्यवान पदार्थ सापडतो, जो त्या कथाविश्वातल्या तंत्रज्ञानासाठी अत्यावश्यक आहे. आता जिथं दुर्मीळ मौल्यवान नैसर्गिक संसाधन आलं, तिथं बक्कळ पैसा आला. आणि जिथं पैसा, तिथं राजकारण! संस्थानिकांमधली चुरस, सम्राटाचा पक्षपात, पडद्यामागून सूत्रं हलवणारा यक्षिणींचा संप्रदाय, त्यांनी पेरलेल्या धार्मिक अंधश्रद्धा, आणि या सगळ्या खटपटींमागे असलेलं एकच वैश्विक ध्येय- मानवजातीला तारणाऱ्या परमेश्वर सम्राटाची प्रतिष्ठापना! भूत-भविष्य-वर्तमानाचा द्रष्टा, स्थल-कालाला जोडून विश्वात शांती आणि सुबत्ता स्थापित करेल, असा हा दीर्घप्रतीक्षित परमेश्वर सम्राट आपला कथानायक पॉलच तर नसेल?
कथेतलं विज्ञान बहुतांशी काल्पनिक असलं, तरी विश्वसनीय वाटतं, कारण फ्रँक हर्बर्टची मूळ कादंबरी ड्यूनच्या जगाच्या पर्यावरणीय तपशीलांतही अतिशय खोल जाते. ड्यूनवरचे मूलनिवासी कठोर निसर्गाशी जुळवून घेत कसे राहतात, वालुकाकृमींच्या जीवनचक्राचा तपशील अगदी मनःपूर्वक चितरलाय. ड्यूनभोवती फिरणाऱ्या दोन उपग्रहांचं सामयिक चुंबकीय क्षेत्र, त्याचा ग्रहाच्या दक्षिणोत्तर ध्रुवांवर होणारा परिणामसुद्धा विचारात घेतलाय. आणि हे सगळं दिग्दर्शकानं सिनेमात आणायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. पटकथा, स्टारकास्टचा अभिनय, संगीत, विज्ञान मानव परस्परसंबंध अशा सगळ्याच आघाड्यांवर ‘ड्यून २’ साय-फायपट म्हणून तृप्त करतो.
...........................................................................................................................................
‘कल्की’च्या जगात विज्ञान कमी आणि अतींद्रिय, जादुई शक्ती जास्त प्रभावी दिसतात. शक्तिशाली आयुधांच्या बाबतीत पाश्चात्त्य सिनेमात खूप प्रयोग होतात, उदा. ‘मॉर्टल इंजिन्स’ (२०१८)मधला कृष्णविवर बॉम्ब, ‘एंडर्स गेम’ (२०१३)मधला रेणू-भंजक किरण. लेझर गन तर सार्वत्रिक आहे. ही आयुधं कुठल्या ना कुठल्या वैज्ञानिक तत्त्वावर बेतलेली असतात. पण ‘कल्की’तली दोन आयुधं- अश्वत्थाम्याची काठी आणि सुप्रीम यास्किनचं गांडीव धनुष्य- वैज्ञानिक तत्त्वापासून प्रेरित असेल, असं दिसत नाही. विज्ञान सुधारण्याबरोबरच पटकथाही अजून बांधेसूद होऊ शकली असती, प्रभासचा अभिनय वगैरे इतरही तक्रारी आहेत...
...........................................................................................................................................
आता ‘कल्की २८९८ एडी’! यात हिंदू मिथककथांचं भविष्यवेधी प्रलयोत्तर काळातलं प्रक्षेपण आहे! दिग्दर्शक नाग अश्विनचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट भारतीय सायफाय सिनेविश्वातला एक महत्त्वाचा बिंदू ठरावा. त्याची तगडी स्टारकास्ट, कथानक, पात्र अभिनय वगैरे गोष्टी जरा बाजूला ठेवून, केवळ एका वातावरणनिर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहू. आधीचे यशस्वी भारतीय सायफाय सिनेमे जसे की, ‘क्रिश’ सिनेमालिका, ‘रोबॉट’ द्वयी, ‘रा-वन’ साधारण आजच्याच जगात घडतात (एक सन्माननीय अपवाद विक्रांत मॅसी अभिनित ‘कार्गो’चा, पण तो सिनेमा मी अजून पाहिला नाहीये). पण कल्की सुमारे हजार वर्षं भविष्यात घडतो, जे जग कसं उभं करायचं, याचं हिंदी सिनेसृष्टीत उदाहरण नाही. साहजिकच, दिग्दर्शकानं पाश्चात्त्य सिनेमांना आधार मानून कल्कीचं जग उभं केलंय.
चोखंदळ सिने आस्वादकांना ‘मॅड मॅक्स’, ‘अलीटा द बॅटल एंजल’, ‘वॉल ई’ यांची हमखास आठवण येईल (योगायोग म्हणजे ‘मॅड मॅक्स फ्यूरिओसा’ हा मॅड मॅक्स सिनेमालिकेतला पुढचा भागही २०२४मध्येच आलाय). भैरव-बुज्जी संवादांत टोनी स्टार्क जार्विस दिसतील. दोनशे वर्षं वयाच्या खलनायक सुप्रीम यास्किनमध्ये ड्यूनचा ‘व्लादीमीर हार्मोनेन’ किंवा ‘द मेट्रिक्स’चा एजंट स्मिथ दिसतील. ‘कॉम्प्लेक्स’मधला कृत्रिम गर्भरोपणाचा प्रयोग पाहून ‘द मेट्रिक्स’ आणि ‘द आयलंड’ आठवतात.
‘कल्की’मधली समाजरचना तीन भागांत दिसते. काशी शहर, जिथं सर्वसामान्य लोक हलाखीत गुजराण करतात, आपला नायक भैरवसुद्धा. काशी शहराच्या वर आकाशात उलट्या पिरॅमिडसारखा दिसणारा कॉम्प्लेक्स, जिथं उच्चभ्रू खलनायकाचं वास्तव्य आहे, जिथं जाण्याची स्वप्नं काशीचे लोक पाहतात. आता हा सेटप बन्यापैकी सरधोपट आहे, कुठल्याही कथाप्रकारात. पण ‘कल्की’मधलं तिसरं नगर- शांबाला- एक वेगळा पर्याय उपलब्ध करून देतं.
मला या सद्यजगातील व्यवस्थेचं प्रतिबिंब दिसतं. काशीत गरिबी, अभाव, अंधःकार आहे, कॉम्प्लेक्समध्ये अतिश्रीमंती, सुकाळ आणि चमचमाट आहे. दोन्ही पर्याय समाजव्यवस्थेला शाश्वत स्थैर्य देऊ शकत नाहीत. एकीकडं भुकेनं मरण, दुसरीकडे अतिसेवनानं. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गांमधला संघर्ष हा चुंबकांचे दोन विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होण्याइतका नैसर्गिक आणि अटळ आहे. पण शांबालामध्ये मला गांधी-विनोबांच्या स्वप्नातलं खेडं दिसतं. हे लोक काशीइतके गांजलेले नाहीत, आणि कॉम्प्लेक्सइतके चंगळवादीही नाहीत. ‘डीग्रोथ’ ही आजकाल जागतिक संभाषणांमध्ये थोडी थोडी डोकावू लागलेली संकल्पना कदाचित शांबालासारखी दिसेल.
पाश्चात्त्य साय-फाय सिनेसृष्टीच्या तुलनेत भारतीय सायफाय सिनेसृष्टी अजून बाल्यावस्थेतच आहे, हे दिग्दर्शकाचा नुसत्या वातावरणनिर्मितीवर असलेला भर पाहून समजतं. ‘कल्की’च्या जगात विज्ञान कमी आणि अतींद्रिय, जादुई शक्ती जास्त प्रभावी दिसतात. शक्तिशाली आयुधांच्या बाबतीत पाश्चात्त्य सिनेमात खूप प्रयोग होतात, उदा. ‘मॉर्टल इंजिन्स’ (२०१८)मधला कृष्णविवर बॉम्ब, ‘एंडर्स गेम’ (२०१३)मधला रेणू-भंजक किरण. लेझर गन तर सार्वत्रिक आहे. ही आयुधं कुठल्या ना कुठल्या वैज्ञानिक तत्त्वावर बेतलेली असतात. पण ‘कल्की’तली दोन आयुधं- अश्वत्थाम्याची काठी आणि सुप्रीम यास्किनचं गांडीव धनुष्य- वैज्ञानिक तत्त्वापासून प्रेरित असेल, असं दिसत नाही.
विज्ञान सुधारण्याबरोबरच पटकथाही अजून बांधेसूद होऊ शकली असती, प्रभासचा अभिनय वगैरे इतरही तक्रारी आहेत. तरीही एक वेगळा सायफाय प्रयत्न, तोही मुख्य धारेतल्या शेकडो कोटी खर्चाच्या मसालापट फॉर्म्युलामध्ये, तेही कोविडोत्तर ओटीटीप्रवण मनोरंजन क्षेत्रात, म्हणून ‘कल्की २८९८ एडी’चं माहात्म्य. तसंही हा सिनेमा गांभीर्यानं पाहण्यासाठी नाहीच बनलेला मुळी!
...........................................................................................................................................
कथेचं जग प्रलयोत्तर काळातलं असलं, तरी ते ‘कल्की’, ‘मॅड मॅक्स’च्या जगांपेक्षा खूप जास्त आशावादी (यूटोपियन) आहे. आजच्या सिनिकल जगात वडीलधाऱ्या व्यक्तीचा खांद्यावर ठेवलेला धीर देणारा हात असा हा अॅनिमेशनपट वाटतो. वाढत्या तंत्रज्ञानाचा मुलांवर होणारा परिणाम, बदलती कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था असे विषय आजकाल ॲनिमेशनपटांत सर्रास दिसतात. उपरोल्लेखित ‘मिचेल्स व्हर्सेस द मशीन्स’ आणि ‘रॉन’स् गॉन रॉन्ग’ हे अनुक्रमे रोबॉट - कौटुंबिक संबंध, आणि रोबॉट मैत्रीसंबंध यांच्याबद्दल आहेत. एकूणच, वर्षागणिक अॅनिमेशनपट साय-फाय अनुभवविश्वाला अधिकाधिक समृद्ध करतायत.
...........................................................................................................................................
भविष्यवेधी प्रलयोत्तर काळातच घडणारा, पण वरील दोन सिनेमांपेक्षा खूप वेगळा पुढचा सिनेमा म्हणजे ड्रीमवर्क्सचा ‘द वाइल्ड रोबॉट’ हा ॲनिमेशनपट. पीटर ब्राऊनच्या २०१६ प्रकाशित झालेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा होता. दिग्दर्शक क्रिस सँडर्स ड्रीमवर्क्सच्या ॲनिमेशन शैलीतल्या प्रयोगशीलतेला पुढं घेऊन जातो. ॲनिमेशनपटांना भौतिक वास्तवाची कुंपणं नसतात, त्यामुळे कुठल्याही कल्पनेला हुबेहूब दृश्यमान करण्याची ताकद त्यांच्यात असते. सकस कथाबीज आणि सुपीक कल्पनाशक्ती असेल, तर अॅनिमेशनइतकी अगणित सृजनाची पर्वणी दुसरीकडं मिळणं अवघड आहे.
यामुळेच आपल्याला एकीकडे ‘कोरालीन’ (२००९) आणि दुसरीकडे ‘स्पायडरमॅन अक्रॉस द स्पायडरव्हर्स’ (२०२३) सारखे सिनेमे अनुभवायला मिळतात. ड्रीमवर्क्सच्याही सिनेमालिका – ‘कुंग फू पँडा’ आणि ‘हाऊ टु ट्रेन योर ड्रॅगन’ तूफान प्रसिद्ध आहेत. ॲनिमेशन साय-फाय सिनेमांमध्ये अलिकडे ‘लाइटइअर’ (२०२२), ‘मिचेल्स व्हर्सेस द मशीन्स’ ( २०२१), ‘रॉन’स् गॉन रॉन्ग’ (२०२१) हे काही उल्लेखनीय गणता येतील.
‘द वाइल्ड रोबॉट’ची कथा रॉझ हा रोबॉट आणि ब्राइटबिल या बदकाभोवती फिरते. रॉझ हा एक बहुपयोगी रोबॉट आहे, आणि तो केवळ अद्ययावत शहरी वातावरणात माणसांसाठी काम करणं अपेक्षित आहे. अपघातानंच तो एका निर्जन बेटावर येतो, आणि एका बदकाच्या पिल्लाची आई बनतो. त्या पिल्लाला वाढवणं, त्याचं रक्षण करणं, त्याला उडायला शिकवणं, या सगळ्या प्रक्रियेत तो स्वतःही ‘वाइल्ड’ बनत जातो. त्याचं स्वतःचं ‘प्रोग्रॅमिंग’ बदलत जातं. रॉझचा हा पालकत्वाचा प्रवास त्याच्या, ब्राइटबिलच्या आणि बेटावरील संपूर्ण प्राणीसृष्टीच्याच बदलाचा प्रवास म्हणून उलगडतो.
रॉझला ‘हा’ किंवा ‘ही’ म्हणणं आणि खरं तर रोबॉटला मानवी लिंगभेदांमध्ये बंदिस्त करणं, हे त्या तंत्रज्ञानाचा आवाका संकुचित करणं होईल. रॉझचा आकार कुठल्याही लिंगापरत्वे नाही, ते ‘अलैंगिक’ आहे (सोय म्हणून या लेखापुरता पुल्लिंगी उल्लेख करतोय). रॉझ अद्ययावत तंत्रज्ञानानं युक्त आहे, पण एका निर्जन बेटावर हे तंत्रज्ञान काय कामाचं? सुरुवातीला त्याच्या अस्तित्वाला कुठलीही दिशा नाही. हे आधुनिक तंत्रज्ञानाचं चपखल रूपक म्हणता येईल.
रॉझच्या अस्तित्वाला दिशा द्यायचं काम ते निर्जन बेट करतं. आधी रॉझला त्याच्या क्षमता नवख्या जागी वापरायला शिकावं लागतं. मग त्यांचा उपयोग करून एका बदकाच्या पिल्लाचा पालक-शिक्षक, बेटावरील प्राण्यांचा मित्र, रक्षक आणि दिशादर्शक अशा अनेक भूमिका रॉझला पार पाडाव्या लागतात. गंमत म्हणजे यातली एकही भूमिका त्याच्या मूळ प्रोग्रॅमिंगचा भाग नसते!
‘द वाइल्ड रोबॉट’ पालकत्वाचा अंतर्बाह्य मूलभूत बदलाचा अनुभव, त्यातली आव्हानं, मूल वाढवताना असणारं आई, कुटुंब आणि समाज यांच्यातलं परस्परावलंबन, एका व्यक्तीची समाजाप्रती असलेली जबाबदारी, व्यक्तीची स्व-प्रतिमा आणि सामाजिक-प्रतिमा यांच्यातला संघर्ष, आजच्या विभक्त कुटुंबांच्या जमान्यात सहजीवनाची शक्यता, असे अतिशय प्रगल्भ विषय अगदी हळुवारपणे, सहजतेनं हाताळतो.
कथेचं जग प्रलयोत्तर काळातलं असलं, तरी ते ‘कल्की’, ‘मॅड मॅक्स’च्या जगांपेक्षा खूप जास्त आशावादी (यूटोपियन) आहे. आजच्या सिनिकल जगात वडीलधाऱ्या व्यक्तीचा खांद्यावर ठेवलेला धीर देणारा हात असा हा अॅनिमेशनपट वाटतो. वाढत्या तंत्रज्ञानाचा मुलांवर होणारा परिणाम, बदलती कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था असे विषय आजकाल ॲनिमेशनपटांत सर्रास दिसतात. उपरोल्लेखित ‘मिचेल्स व्हर्सेस द मशीन्स’ आणि ‘रॉन’स् गॉन रॉन्ग’ हे अनुक्रमे रोबॉट - कौटुंबिक संबंध, आणि रोबॉट मैत्रीसंबंध यांच्याबद्दल आहेत. एकूणच, वर्षागणिक अॅनिमेशनपट साय-फाय अनुभवविश्वाला अधिकाधिक समृद्ध करतायत.
...........................................................................................................................................
विज्ञान तुम्हाला नेहमी पर्याय देतं, निवडीचा अधिकार देतं, पण ‘रेड पिल’ की ‘ब्ल्यू पिल’ हा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. विज्ञान हे दिव्यातून बाहेर येऊन इच्छा पुऱ्या करणाऱ्या जिनसारखं नसून डब्ल्यू.डब्ल्यू. जेकब्जच्या सुप्रसिद्ध कथेतल्या माकडाच्या पंज्यासारखं आहे. ते एका इच्छेच्या पूर्तीच्या बदल्यात आपल्याकडून तेवढ्याच किंवा अधिक किमतीची दुसरी गोष्ट हिरावून घेतं. इंटरनेट आपल्याला मुक्तपणे ज्ञान देतं, पण वैयक्तिक माहिती आणि मानसिक शांतीच्या बदल्यात. चॅट जीपीटी आपल्याला सगळं लिहून, कोडून, चितारून देतं, पण आपल्या नवसृजनाच्या क्षमतेच्या बदल्यात. भांडवलशाहीच्या दावणीला बांधलेलं विज्ञान असंच वागणार.
...........................................................................................................................................
‘द सबस्टन्स’ हा साय-फाय सिनेमा थेटरमध्ये न येता थेट ‘मुबी’ या स्वतंत्र सिनेव्यासपीठावर प्रदर्शित झाला. हे ‘नेटफ्लिक्स’, ‘ॲमेझॉन प्राइम’सारखंच, पण प्रायोगिक सिनेप्रकारांना वाहिलेलं व्यासपीठ आहे. यावर प्रदर्शित झालेला ‘द सबस्टन्स’ हा साय-फाय सिनेमा कलात्मक धाडसाची पराकाष्ठा म्हणता येईल. हा सिनेमा त्यांनीच पहावा, ज्यांना ‘सॉ’ (करवत या अर्थी) ही कुप्रसिद्ध सिनेमालिका पाहता आलीये. हा सिनेमा ‘बॉडी हॉरर’ या प्रकारात मोडतो, आणि बाकी तीन सिनेमांच्या तुलनेत सगळ्यात कमी प्रेक्षक याला लाभतील ही खंत मला आहे. सिनेमा पाहताना बीभत्स, ओंगळ, किळसवाणे हे तीन शब्द मनात येतात. तरीही हा माझ्या ‘टॉप २० साय-फाय सिनेमां’च्या यादीत जाऊन बसलाय, याचं कारण म्हणजे त्याचा विषय आणि अतिशय सोपी सुटसुटीत रचना.
‘द सबस्टन्स’ एलिझाबेथ स्पार्कल नावाच्या एका काल्पनिक हॉलिवूड सिनेअभिनेत्रीचा प्रवास दाखवतो. वयाच्या पन्नासाव्या वर्षी तिला तिच्या शोमधून बळजबरीनं निवृत्ती स्वीकारावी लागते, आणि ती मानसिकदृष्ट्या खचते. अपघातानं तिला एका तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळते, जे तुमच्या एका नव्या रूपाची निर्मिती करू शकतं. हे रूप तुमच्या शरीरातूनच निर्माण होतं, तुमचाच भाग असतं, पण तुमच्यापेक्षा तरुण, सुंदर, आकर्षक असतं. मूळ म्हातारे तुम्ही आणि तुमचं तरुण प्रतिरूप यांनी दर आठवड्याला एकमेकांची जागा घेणं अपेक्षित आहे. याचा अर्थ, एक जागा असताना दुसरा सुप्तावस्थेत असणार आणि सात दिवसांनी उलट. असे आणखी काही सोपे नियम सिनेमात सुरुवातीलाच स्पष्ट केले जातात, पण सर्वांत महत्त्वाचा नियम म्हणजे ‘तुम्ही दोघेही एकाच आहात’!
या विलक्षण तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं एलिझाबेथपासून ‘स्यू’ जन्मते. तिच्या अलौकिक सौंदर्यामुळे ज्यातून एलिझाबेथची हकालपट्टी झालेली असते, स्यू त्याच शोमध्ये स्वीकारली जाते. सुरुवातीला दोघी एलिझाबेथ आणि स्यू सात दिवसांचा नियम नेटानं पाळत असतात. एलिझाबेथ निवृत्तीशी जुळवून घेऊ पाहत असते, स्यू तारुण्यसुलभ मौजमजा करत असते, पण हळूहळू दोघींमध्ये ठिणग्या पडू लागतात. मग काय, एकमेकांवर कुरघोडी, शारीरिक विद्रूपिकरण आणि जिवाची लढाई अशी चढत जाणारी अपकृत्यांची मालिका.
सिनेमा कुठलंही दृश्य दाखवायला कचरत नाही. कुठकुठले द्रव शरीरात कुठून कशा सुया खुपसून काढले जातात, याची गणतीच नाही. शेवटी एलिझाबेथ आणि स्यू यांचा एकत्र मिळून एक हिडीस, कुरूप दानव बनतो. त्याची अकल्पनीय बाह्यरचना… एकूणच ‘बॉडी हॉरर’चा पुरेपूर वापर केलाय. पण तरीही हा सिनेमा लक्षात राहतो तो डेमी मूर (एलिझाबेथ) आणि मार्गरेट क्वालि (स्यू) या दोघींच्या अफलातून अभिनयामुळे. या दोघींखेरीज सिनेमात इतर पात्रं निव्वळ सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.
‘द सबस्टन्स’ हा सिनेमा ‘जरा आणि मरण’ या माणसाच्या सर्वांत मूलभूत आणि नाजूक असुरक्षिततेला हात घालतो. हॉलिवूडची पार्श्वभूमी, तिथं महिलांना मिळणारी वागणूक, हे या असुरक्षिततेचे अगदी समर्पक वाहक आहेत. अतृप्तीच्या अक्षय इंधनावर चालणारी सामाजिक इंजिनं ही, एकीकडून नवसुंदरी घाला, त्यांना प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवा, त्या जुन्या- म्हाताऱ्या झाल्या की दुसऱ्या बाजूनं काढून फेकून द्या. जिथं तुमचं सौंदर्य आणि तारुण्य सर्वोपरी आहे, तिथं नवतारुण्य प्राप्त करण्यासाठी व्यक्ती कुठल्या थराला जातात, हे आपल्याला भोवताली सतत दिसतं, खासकरून आजच्या इन्स्टाग्रामच्या जगात. वास्तव आणि सामाजिक प्रतिमेतली तफावत, त्यातून उद्भवणारा व्यक्तिमत्त्वाचा दुभंग या सिनेमात अगदी उघडपणे दिसतो. ययाती-पुरूपासून चालत आलेला हा विषय आज मानवी आरोग्यातील वैज्ञानिक संशोधनाची मुख्य प्रेरणा आहे.
या सिनेमात नवतारुण्याचं तंत्रज्ञान हेही एक पात्र आहे. ते एलिझाबेथला अमुक एक गोष्ट करायला कधीही भाग पाडत नाही. अनेक वेळा तिला या ‘प्रयोगा’तून बाहेर पडण्याची, आणि तिचं मूळ आयुष्य परत मिळवण्याची संधी देतं. कितीही त्रास होत असला, स्यूच्या अतिशोषणामुळे शरीर खंगत असलं तरीही एलिझाबेथ थांबू शकत नाही. नवतारुण्याचं जणू तिला व्यसनच जडलंय. अनेकदा लोक सिगरेट काही महिन्यांसाठी सोडतात, पण पुनःपुन्हा दाटून येणारी तल्लफ अनावर होते. एका नाजूक क्षणी त्यांचा निग्रह तुटतो आणि ते परत दुप्पट जोरानं स्मोकिंग सुरू करतात. नवतारुण्याच्या बाबतीतही असंच होत असेल का?
एलिझाबेथ आणि स्यू व्यक्ती म्हणून एकच, म्हणजे त्यांच्या स्मृती आपापसांत मिसळून गेल्यात. पण एकीकडे तारुण्याची बंडखोर मस्ती, आणि दुसरीकडे म्हातारपणीच्या अतृप्ततेवर बुरशीसारखे उगवणारे असंतोष असूया, हे दोन ‘स्व’ स्यू आणि एलिझाबेथच्या रूपात प्रकट होतात. जुन्या मानसशास्त्रात प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन ‘स्व’ असल्याची मान्यता होती- ‘इगो’ आणि ‘अल्टर इगो’. तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे दोन ‘स्व’ विभक्त झाले, तर काय होईल, याची चुणूक ‘द सबस्टन्स’मध्ये दिसते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या चारही साय-फाय सिनेमांमध्ये दिसलेला एक समान धागा म्हणजे ‘विज्ञान हे केवळ साधन आहे’ या उक्तीचा पुनर्घोष. जे तंत्रज्ञान वापरून ड्यूनवरून स्पाइस गोळा करता येतो, त्याच तंत्रज्ञानानं वालुकाकृमींशी जुळवून घेत शांततेत राहता येतं. कल्कीच्या कॉम्प्लेक्सवरचं आणि शांबालाच्या लोकांचं तंत्रज्ञान एकच आहे. रॉझचं तंत्रज्ञान वन्य जिवांसाठीही तितकंच उपकारक ठरू शकतं, जितकं ते माणसांसाठी ठरतं. जर सात दिवसांचा नियम पाळला, तर एलिझाबेथ आणि स्यू दोघीही आपापल्या आयुष्यात आनंद घेऊ शकतात.
विज्ञान तुम्हाला नेहमी पर्याय देतं, निवडीचा अधिकार देतं, पण ‘रेड पिल’ की ‘ब्ल्यू पिल’ हा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. विज्ञान हे दिव्यातून बाहेर येऊन इच्छा पुऱ्या करणाऱ्या जिनसारखं नसून डब्ल्यू.डब्ल्यू. जेकब्जच्या सुप्रसिद्ध कथेतल्या माकडाच्या पंज्यासारखं आहे. ते एका इच्छेच्या पूर्तीच्या बदल्यात आपल्याकडून तेवढ्याच किंवा अधिक किमतीची दुसरी गोष्ट हिरावून घेतं. इंटरनेट आपल्याला मुक्तपणे ज्ञान देतं, पण वैयक्तिक माहिती आणि मानसिक शांतीच्या बदल्यात. चॅट जीपीटी आपल्याला सगळं लिहून, कोडून, चितारून देतं, पण आपल्या नवसृजनाच्या क्षमतेच्या बदल्यात. भांडवलशाहीच्या दावणीला बांधलेलं विज्ञान असंच वागणार.
इतरही काही निरीक्षणं आहेत. दृश्य माध्यमाची वर्षागणिक वाढती ताकद आणि लोकप्रियता साय-फाय सिनेमांच्या पथ्यावर पडेल. विज्ञान आणि मिथकं यांचा संगम जो ‘ड्यून २’ आणि ‘कल्की’मध्ये पहायला मिळाला, त्याचा ट्रेंड भारतात तरी आणखी काही वर्षं चालेल असं दिसतंय. गेली काही वर्षं यंत्र आणि रोबॉट्सच्या माध्यमातून आपण आपली माणुसकी नव्यानं शोधतोय असंही दिसतंय, जे छानच आहे. जोपर्यंत झालेल्या चुका सुधारायच्या संधी विज्ञान उपलब्ध करून देतंय, तोपर्यंत त्या घ्यायला हव्यात. पण त्या चुकाही विज्ञानाच्याच अपव्ययातून झाल्या आहेत, हे विसरता कामा नये. बाकी साय-फाय तर नेहमीप्रमाणे २०२५मध्येसुद्धा आपली जागल्याची भूमिका निभावत राहीलच!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment