‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – स्वीकार, नकार का सहकार?’ हे नीलांबरी जोशी यांचं नवं पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात नेमकं काय आहे, हे सांगणाऱ्या लेखिकेच्या मनोगताचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
माणूस आपला मेंदू वापरून जे काम करतो, ते यंत्रानं करून माणसासारखंच आऊटपूट निर्माण करावं, अशा उद्देशानं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स-एआय वापरून यंत्र तयार करण्याचे प्रयत्न गेली साठ वर्षं सुरू आहेत. माणसाचा मेंदू कशा प्रक्रिया करतो, यावर संशोधन करणं आणि तशा प्रक्रिया यंत्रांकडून करून घेणं हा या प्रयत्नांचा पहिला टप्पा होता. मात्र या प्रक्रिया समजावून घेण्याबाबत सुरुवातीच्या टप्प्यात तरी माणूस अपयशी ठरला.
या सर्व प्रयत्नांच्या दरम्यान यंत्रांचा विकास करताना इंजिनिअरिंगच्या अंगानं जाणारी यंत्रं मात्र विकसित झाली. त्या अर्थानं एआयच्या दिशेनं माणसाला मोजकं यश मिळवायला काही दशकं जावी लागली. यापुढच्या टप्प्यात म्हणजे, सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मेंदूच्या प्रक्रिया जाणून घेणं याबाबत माणसाला थोडंफार यश मिळालं. साधारण दहा वर्षांपूर्वी ज्याला आज ‘न्यूरल नेटवर्क्स’ म्हणलं जातं, ती विकसित झाली. त्यानंतर एआयचं जग नाट्यमय रितीनं बदलत गेलं. वाक्यरचना करताना माणसाला अपेक्षित असणारे पुढचे शब्द ‘गाळलेल्या जागा भरा’ या पद्धतीत भरणाऱ्या मॉडेल्सचा उदय झाला. त्यानंतर हे क्षेत्र भराभर पुढे गेलं.
आज ‘एआय सगळं करू शकतं’ इथपासून ‘एआय दुबळं आहे, त्याचा जास्त गवगवा केला आहे’ अशी अनेक परस्परविरोधी मतं ऐकू येतात. एकीकडे हजारो इंजिनिअर्स, संशोधक आणि त्यावर काम करणारे लोक, प्रोग्रॅमिंग करणारे इंजिनिअर्स एआय हे कसं दु:स्वप्न ठरेल हे रोज सांगत आहेत. विचारी, समजशक्ती असलेले, ज्ञानसंपन्न लोकही एआय आपल्यावर वरचढ ठरेल का, या धास्तीत दिसतात. दुसरीकडे एआयमुळे जगभर सुराज्य निर्माण होईल, अशा अर्थाचे भ्रम निर्माण केले जातात. एआयनं जगाचं कल्याणच कल्याण होईल, असा आशावाद निर्माण केला जातो. यातलं कोणतं चित्रं खरं समजायचं?
त्यासाठी एआय सध्या बाल्यावस्थेत आहे, हे मान्य करायला हवं. “विचार करून करण्याच्या गोष्टी एआय आता करायला लागलं आहे, पण माणूस विचार न करता ज्या गोष्टी सहज प्रतिक्षिप्तपणे करतो, त्या गोष्टी एआय करू शकत नाही... त्या गोष्टीच करायला अवघड आहेत” असं डोनाल्ड नुथ हा कम्प्युटर संशोधक म्हणतो. त्याच अवस्थेत एआय आत्ता आहे.
एआय चुका करतं का? याचं उत्तर अर्थातच ‘हो’ असं आहे. पण ते झपाट्यानं चुका सुधारत चाललं आहे. जीपीटी-२ला कायद्याची परीक्षादेखील कळत नव्हती. जीपीटी-३नं ही परीक्षा देऊन शेवटच्या दहांमध्ये स्थान मिळवलं. एका वर्षानंतर आलेल्या जीपीटी-४नं मात्र याच परीक्षेत पहिल्या दहामध्ये स्थान पटकावलं. जीपीटी-५ कुठे जाईल हे वर्तवणं फार अवघड नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सर्वच क्षेत्रांमध्ये आॉटोमेशन, डेटाचं विश्लेषण आणि इनसाईटस पुरवणं, प्रिडिक्टिव्ह ॲनॅलिटिक्स, वैयक्तिक सेवा पुरवता येणं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, प्रतिमा आणि व्हिडिओचं विश्लेषण, फ्रॉड ओळखणं, संसाधनांचं व्यवस्थापन, निर्णय घेण्यात मदत, प्रक्रियांची कार्यक्षमता वाढवणं, ग्राहकांना अचूक सेवा पुरवता येणं, वस्तू आणि सेवा यांच्या गुणवत्तेचं नियंत्रण करणं, संशोधन, मार्केटिंग अशा सर्व गोष्टींमध्ये आज एआयचा वापर होतो.
आता एआयवर आधारित यंत्रं चित्रं काढतात, संगीतरचना करतात, रोगांचं निदान करतात, कायदेशीर बाबींमध्ये संशोधन करून आपली मतं मांडू शकतात; तांत्रिक मॅन्युअल्स, बातम्या, निबंध, कथा आणि काहीवेळा कादंबऱ्याही लिहितात; सॉफ्टवेअरचं कोडदेखील लिहितात. एआयवर आधारित यंत्रं आता परीक्षा देऊन विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळवू शकतील इतकी हुशार झाली आहेत. समुपदेशन करणं, वृद्धांची काळजी घेणं, माणसाला अनेक कामांमध्ये व्यक्तिगत पातळीवर सहाय्य करणं आणि जोडीदार या नात्यानं मदत करणं, आता यंत्रांना थोड्या प्रमाणात जमायला लागलं आहे.
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल आणि आयबीएमचं तंत्रज्ञान वापरलं जातं. आजाराचं अचूक निदान करण्यासाठी तसेच डेटा मायनिंगसाठी एआयचा खूप वापर होतो. औषधं शोधण्यातलं संशोधन, रोबोटिक सर्जरी आज उपयोगाला येते आहे.
रिटेल आणि इकॉमर्स क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करता येईल, अशा सर्व गोष्टींमध्ये एआयचा वापर केला जातो. ग्राहकांच्या गरजांनुसार, अपेक्षेनुसार त्यांना वस्तू आणि सेवा पुरवणं यासाठी ॲमेझॉनपासून सर्व लहानमोठ्या कंपन्या चॅटबॉटससारखे एआय ॲप्स वापरतात.
खाद्यपदार्थांच्या दुनियेत चक्क चहा बनवण्यापासून अन्नघटकांचं वर्गीकरण करण्यापर्यंत अनेक बाबतीत एआयप्रणित रोबो वापरले जातात. खाद्यपदार्थांचं रंग, आकार, आकारमान पाहून वर्गीकरण करणं, त्यातल्या घटकांचं पोषणमूल्यांच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करणं, अशा कामांमध्ये एआय उपयोगी पडतं. कृषिक्षेत्रात प्रकाश, मातीचा दर्जा, पाणी, खतं यांचा पिकांवर होणारा परिणाम जाणून घेण्यासारखी कामं एआयच्या सहाय्यानं केली जातात.
बँकिंग आणि अर्थविषयक सेवा पुरवण्यात एआय अग्रेसर आहे. कर्ज संमतीची प्रक्रिया, डेटावर प्रक्रिया करून विश्लेषण करणारे बॉटस या क्षेत्रात सर्रास वापरले जातात. ग्राहकांना गुंतवणुकीसाठी सल्लेही हे बॉटस देऊ शकतात. विम्याच्या योजना तयार करून ग्राहकांपर्यंत त्या पोचवण्याच्या कामातही चॅटबॉटसचा उपयोग होतो. मास्टरकार्डसारख्या कंपन्या फसवणूक ओळखण्यासाठी एआयप्रणित तंत्रज्ञान वापरतात.
सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये एआयमुळे सोपेपणा आला आहे. अनेक वेअरहाऊसेसमध्ये वस्तूंचं वर्गीकरण आणि पॅकेजिंग करण्यासाठी रोबो वापरले जातात. कोणत्या मार्गानं वस्तूंचा पुरवठा जलद होऊ शकेल याचे अंदाज बांधण्याच्या कामात एआयचा चांगला उपयोग होतो.
स्वयंचलित वाहनं हा वाहतुकीबाबत एआयचा मोठा पल्ला मानवानं गाठलेला आहे. टेस्ला, उबेर, व्हाल्व्हो आणि फोक्सवॅगनसारख्या कंपन्या या संशोधनात पुढे आहेत.
पर्यटन क्षेत्रात ग्राहकांना सेवा पुरवताना चॅटबॉटस वापरले जातात. ग्राहकांच्या शंकांना त्वरित आणि अचूक उत्तरं देण्यात चॅटबॉटसची प्रगती झाली आहे. अनेक पर्यटन कंपन्या आता स्वत:ची मोबाईल ॲप्स आणि चॅटबॉटस तयार करतात. ग्राहकांच्या वर्तणुकीचा अभ्यास करून त्यांना योग्य ती माहिती पुरवून जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे वळवण्यात या कंपन्या एआयच्या मदतीनं यशस्वी होताना दिसतात.
रिअल इस्टेटच्या क्षेत्रात एजंटस, ब्रोकर्स आणि ग्राहक यांच्यासाठी एआयचे बॉटस घरांची खरेदी विक्री, घरं भाड्यानं देणं याबाबतीत मदत करतात. बाजारपेठेची माहिती जाणून घेणं, गुंतवणुकीच्या संधी माहिती करून घेणं, खरेदी विक्रीचे करार यांच्यावर प्रक्रिया करणं, स्मार्ट होम सिस्टीम्समध्ये मदत करणं, अशी कामं बॉटसच्या मदतीनं होऊ शकतात.
...........................................................................................................................................
आज ७५ ते ८० हजार शब्दांचं पुस्तक यंत्राला काही सेकंदात भरवून त्यातून त्या पुस्तकाचा सारांश तुम्ही क्षणार्धात जाणून घेऊ शकता. काही काळातच तुम्ही यंत्राला दोन-तीन लाख शब्द देऊन त्याचं हव्या त्या भाषेत भाषांतर लगोलग मागू शकाल. मानववंशशास्त्रातल्या एखाद्या विषयावर लेख लिहून देणं, तो लेख विशिष्ट शैलीत लिहून देण्याची आज्ञा दिल्यावर तशा पद्धतीत लिहिणं आणि तो लेख काही क्षणांत तुमच्या हातात असणं, हे एआए तंत्रज्ञानामुळे आत्ता शक्य होऊ शकतं. पु. ल. देशपांडे यांच्या खुसखुशीत शैलीतलं किंवा रणजित देसाईंच्या भारदस्त ऐतिहासिक शैलीतलं गद्य लेखन आणि कुसुमाग्रज शैलीतल्या कविता यंत्र काही काळानंतर सहज लिहून देऊ शकतील. आज सहा तासांचं ध्वनीमुद्रण देऊन त्याचं टेक्स्टमध्ये रूपांतर होणं वगैरे प्रकार यंत्रं काही प्रमाणात करत आहेत.
...........................................................................................................................................
मनोरंजनाच्या दुनियेत ओटीटीवरून ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना चित्रपट/मालिका सुचवण्याचं काम एआयची मदत घेऊन केलं जातं. ॲपल आणि स्पॉटिफायसारख्या कंपन्या ग्राहकांची आवड जाणून त्यांना संगीताचे प्रकार सुचवतात. चित्रपटांच्या दुनियेत पोस्ट प्रॉडक्शन प्रोसेसमध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगसारख्या टूल्सचा उपयोग केला जातो.
मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कामाच्या योजना आखणं, उत्पादनांचं डिझाईन तयार करणं, कार्यक्षमता वाढणं, वस्तूंचा दर्जा वाढणं, क्वालिटी कंट्रोल आणि सुरक्षाव्यवस्था, यंत्रांच्या मेंटेनन्सची धोरणं या सर्व गोष्टींमध्ये एआयचा वापर होतो. इंडस्ट्रीमध्ये रोबोटस वापरले जातात. कोबॉटस म्हणजे रोबो आणि माणूस यांनी एकत्रितपणे काम करणं हा प्रकारही सुरू झाला आहे.
माध्यमांच्या जगात कंटेंट तयार करणं, कंटेंट दुरुस्त करणं, सर्चमध्ये जास्तीत जास्त अचूकता आणणं, व्हिडिओ आणि प्रतिमा यांचं विश्लेषण करताना चेहऱ्यावरच्या भावना ओळखणं, फेक युजर अकाऊंटस ओळखणं, ग्राहक इंटरनेटवर जो शोध घेतात त्यावरून त्याच्या आवडीनिवडी ओळखणं, त्याच्या वर्तणुकीचा अंदाज घेणं, अशी असंख्य कामं बॉटस करतात.
शिक्षणक्षेत्रात व्यक्तिगत पातळीवर मुलांना आकलनात मदत करणं, मार्गदर्शन करणं, फीडबॅक देणं, गुण देणं, मुलांच्या आकलनक्षमतेचं विश्लेषण करणं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्हर्च्युअली उत्तरं देणं आणि शिक्षकांना व्यवस्थापनात मदत करणं, अशी कामं एआयप्रणित ॲप्स करू शकतात.
भांडवलदारांना गुंतवणुकीसाठी नवनवीन संधी मिळवून देण्यात एआय प्रचंड मदत करतं. गुंतवणुकीच्या संधी शोधणं, ड्यू डिलिजन्स करणं, जोखीम ओळखणं ही कामं करतानाच भांडवलदारांचा पोर्टफोलिओ बाजारपेठेच्या गरजेनुसार बदलत राहणं ही कामं एआयच्या मदतीनं सोपी होतात.
कायदेशीर गोष्टींमध्ये अचूकता आणणं, कार्यक्षमता वाढवणं यात एआय मदत करतं. या क्षेत्रात केस स्टडीज, नियमांचे अचूक संदर्भ देणं, संशोधन आणि जोखीम ओळखणं, ही कामं एआय करू शकतं. केसेसमधलं डॉक्युमेंटेशन एआयच्या मदतीनं जलद होतं. त्यातल्या चुका कमी होतात आणि वेळ वाचतो.
आयटी क्षेत्रात बिग डेटाचं विश्लेषण करून त्यातल्या चुका, विसंगती, तफावत शोधून काढून संभाव्य चुका टाळण्यात एआयचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सिस्टीम्सची कार्यक्षमता वाढते आणि डाऊनटाईम कमी होतो. अल्गॉरिदम्स कोणत्याही क्षेत्रातले फ्रॉडस शोधायला मदत करतात. त्यापासून सुरक्षित रहाण्याच्या व्यवस्था उभ्या करतात. सायबरसिक्युरिटीमध्ये एआयचा मोलाचा वाटा आहे.
बायोमेडिकलसारख्या क्षेत्रात आता प्रोटीनचं स्ट्रक्चर ठरवू शकणाऱ्या प्रोटीन फोल्डिंगसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अवघड समस्या सोडवायला हे तंत्र मदत करू शकते.
आज ७५ ते ८० हजार शब्दांचं पुस्तक यंत्राला काही सेकंदात भरवून त्यातून त्या पुस्तकाचा सारांश तुम्ही क्षणार्धात जाणून घेऊ शकता. काही काळातच तुम्ही यंत्राला दोन-तीन लाख शब्द देऊन त्याचं हव्या त्या भाषेत भाषांतर लगोलग मागू शकाल. मानववंशशास्त्रातल्या एखाद्या विषयावर लेख लिहून देणं, तो लेख विशिष्ट शैलीत लिहून देण्याची आज्ञा दिल्यावर तशा पद्धतीत लिहिणं आणि तो लेख काही क्षणांत तुमच्या हातात असणं, हे एआए तंत्रज्ञानामुळे आत्ता शक्य होऊ शकतं.
पु. ल. देशपांडे यांच्या खुसखुशीत शैलीतलं किंवा रणजित देसाईंच्या भारदस्त ऐतिहासिक शैलीतलं गद्य लेखन आणि कुसुमाग्रज शैलीतल्या कविता यंत्र काही काळानंतर सहज लिहून देऊ शकतील. आज सहा तासांचं ध्वनीमुद्रण देऊन त्याचं टेक्स्टमध्ये रूपांतर होणं वगैरे प्रकार यंत्रं काही प्रमाणात करत आहेत.
‘दिल्लीतल्या प्रदूषणाच्या समस्येवरचे उपाय शोधणं’ अशा प्रकारचे प्रकल्प आर्टिफिशिअल इंटेलिजन्स काही काळात पूर्णपणे तयार करून देऊ शकेल. हा प्रकल्प पार पाडायचा असेल तर त्याची धोरणं आखून सहकारी यंत्रांना तशा सूचना देणं वगैरेही एआय करेल. प्रकल्पाची अंमलबजावणी होत असताना अडथळे आले, तर त्यातले पर्याय आणि त्यानुसार धोरण बदलण्याचे सल्लेही एआय देईल.
...........................................................................................................................................
एआय हे एक तंत्रज्ञान आहे. ‘तंत्रज्ञान शाप का वरदान?’ यासारख्या चर्चा त्यालाही लागू आहेतच. प्रत्येक तंत्रज्ञान चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे वापरता येतं. एआय त्याला अपवाद नाही. वेगानं विकसित होणाऱ्या एआयचे तोटेही कमी नाहीत. एआयवर आधारित स्वयंचलित शस्त्रांचा वापर बेलगामपणे करणं किती योग्य आहे? युद्धांमध्ये एआयनं मार्गदर्शकाची भूमिका बजावताना नैतिकतेचं काय? असे प्रश्न सतत समोर येत आहेत. आज एकमेकांवर पाळत ठेवणं, हे एआयमुळे कधी नव्हे इतकं सोपं झालं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळे देश एकमेकांवर नजर ठेवून आहेत. त्यातून निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करण्यासारखे अनुचित प्रकार सर्रास घडतात.
...........................................................................................................................................
आज एआय प्रत्येक महिन्याला, दर आठवड्याला सुधारत चाललं आहे. एकूणच एआयवर आधारित यंत्रांचा वेग आणि क्षमता ‘दिन दुनी रात चौगुनी’ पद्धतीत नजीकच्या भविष्यकाळात वाढत जाईल, यात शंका नाही.
अर्थात एआय हे एक तंत्रज्ञान आहे. ‘तंत्रज्ञान शाप का वरदान?’ यासारख्या चर्चा त्यालाही लागू आहेतच. प्रत्येक तंत्रज्ञान चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे वापरता येतं. एआय त्याला अपवाद नाही. वेगानं विकसित होणाऱ्या एआयचे तोटेही कमी नाहीत.
एआयवर आधारित स्वयंचलित शस्त्रांचा वापर बेलगामपणे करणं किती योग्य आहे? युद्धांमध्ये एआयनं मार्गदर्शकाची भूमिका बजावताना नैतिकतेचं काय? असे प्रश्न सतत समोर येत आहेत. आज एकमेकांवर पाळत ठेवणं, हे एआयमुळे कधी नव्हे इतकं सोपं झालं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळे देश एकमेकांवर नजर ठेवून आहेत. त्यातून निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करण्यासारखे अनुचित प्रकार सर्रास घडतात.
सोशल मीडियावर बनावट आवाजांचं रेकॉर्डिंग, डीपफेक वापरून एखाद्याला सतावणं वगैरे प्रकार एआय वापरून सर्रास केले जातात. आर्थिक फसवणुकीपासून पोर्नसाठी फोटो वापरणं अशा शारीरिक, मानसिक छळापर्यंत अनेक धक्कादायक प्रकार एआयच्या सहाय्यानं केलेले दिसतात. सोशल मीडियामधल्या अनेक कंपन्या त्यातले धोके माहिती असून नवनवीन फीचर्स समोर आणतात. त्यातून कॅन्सरवर इलाज शोधणारं ‘चांगलं’ एआय एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येला, खुनाला कारणही ठरू शकतं.
कामगारांच्या ठिकाणी एआयप्रणित यंत्रांची वर्णी लागणं किंवा जे काम यंत्रं करू शकणार नाहीत, तेवढ्याच कामापुरतं कामगारांचं एका दिशेनं कौशल्य वाढत राहणं, बेरोजगारी आणि पिंक स्लीप्सचं प्रमाण वाढणं हे एआयचे तोटे समोर आहेतच. एआयमुळे कामगारांचं होणारं शोषण हे पुढच्या थराला गेलं आहे.
मुळात उद्योगक्षेत्रात कामगारांचं शोषण हा विषय जुनाच आहे. पण मशिन लर्निंगसारख्या प्रक्रियांमध्ये कामगारांना प्रतितास यंत्रासारखा पगार देणं, त्यांचं काम मोजण्यासाठी त्यांच्यावर दिवसभर सीसीटीव्हीनं पाळत ठेवणं आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याच कारणांवरून ॲमेझॉन, गुगल, फेसबुक अशा सर्व कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे संप, आंदोलनं सुरू असतात. दुसरीकडे आपली नोकरी एआय घेईल या भीतीनं पडेल ते काम निमूटपणे करावं लागतंच. यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या पगारवाढीचे, वेतनाचे हक्क या मागण्या करण्यावरही निर्बंध येत आहेत.
कलाक्षेत्रात एआय इमेल्स, कथा, कादंबऱ्या, कविता लिहू शकतं; चित्रपटाच्या कथेपासून छायाचित्रणापर्यंत सर्व बाजू सांभाळून चित्रपट तयार करू शकतं; संगीत तयार करू शकतं; नाटकात काम करू शकतं; चित्रं काढू शकतं. मात्र याचे परिणाम काय होणार? सर्जनशीलता ही कृत्रिम असू शकते का? तसंच एआयनं तयार केलेले कलाकार वास्तव मानवी कलाकारांना बाजूला सारणार का? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हॉलिवूडमधल्या पटकथाकारांचा आणि नंतर त्यात सामील झालेल्या अभिनेत्यांचा २०२२मधला संप याच कारणासाठी होता.
मुलांची काळजी घेणं, वृद्धांना सहाय्य करणं, मानसिक समुपदेशन, रोजच्या कामांचं प्लॅनिंग, शिक्षक म्हणून शिकवणं, एकाकी माणसांशी संभाषण - हे सगळं एआय करू शकेल हे वरवर चांगलंच वाटतं. पण हे सगळं करू शकणाऱ्या मानवाच्या त्या त्या क्षेत्रात तयार झालेल्या कौशल्यांचं काय? उत्क्रांतीवादानुसार न वापरल्यानं माणसाची शेपूट गळून पडली, तसं माणसाची ही कौशल्यं संपणार का? खरं तर माणसांना यंत्रासारखं वागायला लावण्याचं, त्यांच्यात ते परावर्तन घडवून आणण्याचं काम आपण गेल्या पंचवीस वर्षांमध्ये केलंच आहे. यानंतर आता एआय माणसासारखं होत जाईल का माणूस जास्त यांत्रिक होत जाईल? या प्रश्नांवर विचारच झालेला दिसत नाही. एआयमुळे आपल्याला कम्प्युटरच्या जगात स्वत:ला वसवायचं नवीन आव्हान समोर ठाकलं आहे. त्यामुळे मानवाच्या कोणत्या भावना नष्ट होतील आणि कोणत्या प्रकारची अस्वस्थता निर्माण होईल ते सांगणं आज शक्य नाही.
यंत्रं माणसाच्या बुद्धिमत्तेच्या वरचढ ठरतील; ती आपली आपण शिकतील, नवनवीन शोध लावतील तो म्हणजे ‘टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी'चा काळ फार दूर नाही, असं भाष्य एआयवर संशोधन करणारे अनेक संशोधक करतात. यानंतर होणारे कृत्रिम आणि मानवी बुद्धिमत्तेतले बदल आत्तातरी अनियंत्रित आणि अनाकलनीय आहेत.
...........................................................................................................................................
खरं तर एआयसमोर आणेल ते प्रचंड सर्जनशील किंवा विध्वंसक असं असू शकेल, पण त्याचा विचारच झालेला नाही. आपण जो मार्ग निवडला आहे तो मार्ग जर चुकीचा असेल तर त्या प्रगती होणं ही सर्वात महान चूक ठरेल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत याचा विचार करणंच कोणाला नको आहे. त्यामुळे आज राष्ट्रं आणि निरनिराळ्या कंपन्या मानवी संस्कृतीवरच एआयच्या सहाय्यानं ताबा मिळवू पहात आहेत. यावर कोणतेही कायदे नाहीत. निर्बंध नाहीत. या सगळ्याला नियंत्रित करणाऱ्या संस्था आणि धोरणं आत्ता तुरळक प्रमाण सोडता अस्तित्वातच नाही. माणसाच्या अस्तित्वालाच त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
...........................................................................................................................................
मुळातच एआय हा फक्त एक तंत्रज्ञानाशी निगडित प्रकार आहे हा भ्रम आहे. तो समाज, संस्कृती, राजकारण, देश आणि संस्था या सगळ्या मूलभूत गोष्टींच्या पायावर उभा आहे. एआयकडे पहाण्याचे सगळ्यांचे दृष्टिकोन गढूळलेले आहेत. एआयवर आधारित सिस्टीम्स स्वयंचलित, तर्कनिष्ठ आणि विवेकाचा विचार करू न शकणाऱ्या आहेत. बुद्धिमत्तेचं राजकारण करणं, डेटाचं बेसुमार फोफावलेलं पीक, तंत्रज्ञान या एकाच क्षेत्रात आौद्योगिकता एकवटणं आणि जगभरातल्या लष्करामागचं तंत्रज्ञानाचं वाढतं प्रमाण, पर्यावरणाचा नाश आणि जगभरातला वाढता भेदाभेद ही एआयची फळं आहेत.
एआयच्या मागे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक सत्ता उभ्या आहेत. आजचं एआय हे प्रचंड प्रमाणात वापरलेली नैसर्गिक संसाधनं, इंधन, मानवी श्रम, इन्फ्रास्ट्रक्चर्स, वाहतूकव्यवस्था या सगळ्याचा वापर करून तयार झालेलं आहे. या बाबतीत एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था समजून घेऊन जगभरातलं राजकारण समजून घेतलं तर एआयमागचं राजकारणही समजून घेता येईल.
एआयसाठी लागणारं प्रचंड भांडवल हाही कळीचा मुद्दा आहे. यामुळेच एआयच्या बाबतीत स्पर्धा करणाऱ्या कंपन्या एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतलेल्या आहेत. प्रचंड प्रमाणात भांडवल यात गुंतलेलं आहे. मात्र ते कसं वापरलं जातं यात भांडवलशाहीमधले आर्थिक प्रश्न आणि त्यामागचे हितसंबंध गुंतलेले असतात हे लक्षात घ्यायला हवं. उदाहरणार्थ, सॅम अल्टमनचं नोव्हेंबर २०२३मधलं राजीनामानाट्य या घटनेमागे कृत्रिम बुद्धिमत्तेतले धोके लक्षात न घेता वेगात चॅटजीपीटीचा विकास करायचा का नाही, यावर दोन पक्षांमधले मतभेद हेच कारण होतं.
भांडवलशाहीच्या आर्थिक तत्वावर आधारित असणाऱ्या या जगात त्यामुळेच आजकाल एआय ही संज्ञा त्यातल्या संशोधकांपेक्षा मार्केटिंगमधले लोक जास्त प्रमाणात फॅशन म्हणून वापरतात. एखाद्या ॲपसाठी भांडवल गुंतवताना, मोठमोठे व्हेंचर कॅपिटलिस्टस चेक लिहिण्याचं कारण म्हणून एआय प्रौढीनं वापरतात. एआय हा राजकीय हुकमाचा एक्का बनला आहे.
खरं तर एआयसमोर आणेल ते प्रचंड सर्जनशील किंवा विध्वंसक असं असू शकेल, पण त्याचा विचारच झालेला नाही. आपण जो मार्ग निवडला आहे तो मार्ग जर चुकीचा असेल तर त्या प्रगती होणं ही सर्वात महान चूक ठरेल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत याचा विचार करणंच कोणाला नको आहे. त्यामुळे आज राष्ट्रं आणि निरनिराळ्या कंपन्या मानवी संस्कृतीवरच एआयच्या सहाय्यानं ताबा मिळवू पहात आहेत. यावर कोणतेही कायदे नाहीत. निर्बंध नाहीत. या सगळ्याला नियंत्रित करणाऱ्या संस्था आणि धोरणं आत्ता तुरळक प्रमाण सोडता अस्तित्वातच नाही. माणसाच्या अस्तित्वालाच त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
तंत्रज्ञान आणि एआय कंपन्यांकडून मांडला जाणारा अजून एक मुद्दा म्हणजे लोकांनी स्मार्टपणे एआय समजून घेतलं तर जनरेटिव्ह एआय पर्यावरणाच्या समस्या, माणसांची गरीबी आणि माणसाचे श्रम कमी करेल. उदाहरणार्थ, गुगलचा एकेकाळचा सीईओ एरिक श्मिडट म्हणतो, “जगातल्या सर्वांत मोठ्या समस्या मग त्या पर्यावरणाच्या असोत, मानवतावादी दृष्टीकोन वाळगण्याबाबत असोत त्या सोडवायला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर व्हायला हवा. लोकांनी स्मार्टर व्हायला हवं.”
पण मुळात पर्यावरण, जागतिक तापमानवाढ या समस्या माणसं ‘स्मार्ट’ नसल्यामुळे सुटल्या नाहीत असं अजिबात नाही. डॉक्टरेट झालेले आणि नोबेल विजेते तज्ञ कित्येक दशकं अनेक सरकारांना प्रदूषण कमी करा, कार्बन हवेत सोडणं कमी करा, श्रीमंतांचं बेसुमार प्रमाणात संसाधनं ओरबाडणं थांबवा आणि गरीबांच्या हातात काहीच न देणं - हे सगळं थांबवा असं कंठशोष करून सांगत आहेत. ते ऐकणारे लोक बहिरे झाले आहेत. यामुळे त्या समस्या सुटलेल्या नाहीत.
थोडक्यात, हे तज्ज्ञ सांगत असताना आपण माणसांनी जो विचार करायचा टाळला तो आता कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे यंत्रांनी करावा असं श्मिडट म्हणतो आहे. पण पर्यावरणाची समस्या सोडवायची असेल, तर जीवाश्म इंधनाच्या धंद्यातले करोडो रूपये, चंगळवादाला खतपाणी घालणारी कन्झ्युमर केंद्रित अर्थव्यवस्था यावर पाणी सोडावं लागेल. म्हणजेच, पर्यावरणाची समस्या सोडवता न येण्यामागे स्मार्ट यंत्रांची नसलेली उपलब्धता हे कारण कधीच नव्हतं. तंत्रज्ञान सगळ्या समस्या सोडवू शकत नाही, हे त्यामागचं खरं कारण आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या दृष्टीकोनातून विचार करून एआय आणि त्याचे धोके याबाबत सामाजिक जाणीव जागृत करायला हवी असं काही समीक्षकांचं मत आहे. यातून एआय फॉर सोशल गुड, ट्रस्टवर्दी एआय, फ्रेंडली एआय अशा चळवळी सुरू झाल्या आहेत.
या सगळ्यात मूलभूत गोष्ट म्हणजे मानवानं ‘स्व’चा नव्यानं शोध घेण्याची वेळ एआयमुळे आली आहे. भविष्यात एआयनं तयार केलेलं अन्न आपण खाऊ, एआयनं तयार केलेले चित्रपट पाहू. एआयनं तयार केलेलं साहित्य वाचू. एआयनं तयार केलेली चित्रं पाहू. एआयनं तयार केलेलं संगीत ऐकू. आपली आर्थिक गुंतवणूक आणि नियोजन एआय करेल. एआय कामं करेल. आपण मर्यादित कामं करू. मात्र असं एकसाची जग आपल्याला हवं आहे का? कामं करण्यातला आनंद गमावून बसून आपण माणूस म्हणून काय करणार आहोत?
जिथे तिथे यंत्रांचं प्राबल्य निर्माण झालं तर माणसांमधला संवाद कमी होत जाईल. संवादच माणसाला जगवतो. तोच कमी झाला तर एकाकीपणा वाढेल. आज एकाकीपणामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांचं प्रमाण भरमसाठ वाढलेलं आहेच. मग या यांत्रिक जगात माणसाचा मानसिक पातळीवर निभाव कसा लागेल?
स्वत:च्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची मानवाची आदिम प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीमुळे माणूस हा माणूस आहे, त्या मार्गात एआयचं एक साधन म्हणून वापर होऊ शकतो. मात्र एआय अस्तित्वभानाची उत्तरं देऊ शकणार नाही. माणसाचे निर्णय जर एआय घ्यायला लागलं तर माणसाच्या माणूसपणाचं लक्षण असलेलं विचारस्वातंत्र्य संपेल. यासाठी एकीकडे एआयचा विकास होत असताना, ते दैनंदिन जीवनात वापरत असताना, माणूस म्हणून आपण कोण आहोत याचा विचार करून आपला विकास करून घ्यायला हवा. एआय ही प्रगती असली, तरी माणसाची उन्नती त्याच्या विचारांमध्ये दडलेली आहे.
‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स : स्वीकार, नकार का सहकार?’ - नीलांबरी जोशी
मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने – ३२८ | मूल्य – ३५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment