इतरेजणांनी आपणाकडे ‘तुच्छताभावी’ तिरस्कारानं बघून आपला द्वेष केला, अशी तक्रार का बरं, आणि कोणत्या तोंडानं करावी?
पडघम - साहित्यिक
सुचिता खल्लाळ
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 20 January 2025
  • पडघम साहित्यिक भारत सासरणे नव-तुच्छतावाद तुच्छतावाद

परवा नांदेडमध्ये ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या ‘कागदावरची माणसं’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ कथालेखक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. भारत सासणे सरांनी एक विधान केले. ते असे – ‘अलीकडे जन्माला आलेला ‘नव-तुच्छतावाद’ भयावह आहे. त्यामुळे सत्ताकारण्यांचा लेखक, विचारवंतांकडे बघण्याचा दृष्टीकोन तिरस्कार व द्वेषाचा झाला असून, अशा ‘नव-तुच्छतावादी’ समाजाचे भविष्य धोकादायक असते.’

त्यांचा ‘नव-तुच्छतावाद’ हा शब्द मनात सारखा रुंजी घालतोय. त्यावर थोडी चर्चा करावीशी वाटते. खरं तर असा कोणता ‘नव-तुच्छतावाद’ वगैरे नसतोच, असतो तो फक्त ‘तुच्छतावाद’. आणि तो सत्ताजनांचा बुद्धिजनांविषयीच असतो असंही म्हणता येणार नाही. बुद्धिजनांचा बुद्धिजनांविषयीही तो असू शकतोच की! किंबहुना, तो आताच उत्पन्न झाला आहे, असं म्हणणंही चुकीचं ठरेल.

लिहित्या लोकांचा दुस्वास नव्यानं केला जातोय, असं नाही. असा तिरस्कार करणारे फक्त सत्ताव्यवहारातील लोक आहेत आणि त्यांच्या द्वेषामुळे समाज अंधःकारमय होईल, ही भीती केवळ भाबडी आणि अनाठायी आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भारतीय विचारधारा असो, की अगदी अलीकडचा आपला मध्ययुगीन महाराष्ट्र असो, प्रत्येक काळात सत्तासोपानातील अभिजनांनी तत्त्वज्ञ, विचारवंत, लेखक-कवी यांचा तिरस्कार केला आहेच. पण म्हणून कधी ‘अंधारराज्य’ आलं नाही. उलट वैचारिक दमनाचं स्फुल्लिंग अधिक जोमानं प्रभावी होऊन त्या त्या काळात विचार अबाधित राहिला. विचार वाचला, विचारानं काळाला तारलं. ‘तुच्छतावादी’ कोणत्याच काळात पासंगालाही पुरले नाहीत.

दुसरं असं की, लेखकवर्गीय ज्ञानसत्तेविषयीचा तुच्छताभाव केवळ राजसत्तेमार्फतच केला जातो, असं नाही. साहित्यव्यवहारात साहित्यिकांचं राजकारण जातिवंत राजकारण्यांच्या राजकारणाला लाजवेल इतकं टोकदार, सत्ताकांक्षी, अभिलाषी, प्रसंगी अविवेकी होतं, आहे.

तुच्छतावादाचा ठेका फक्त राजसत्तेनं घेतलेला नाही, तर एक लिहिता लेखक त्याच्या तोडीच्या अथवा तोडीस तोड निपजू शकेल अशा उदयोन्मुख दुसऱ्या लिहित्या लेखकाचा तेवढाच जोरकस तिरस्कार करतो… एवढा टोकाचा हुच्चपणा तर इतर कोणी वाङ्मयबाह्य घटक स्वप्नातही करू धजावणार नाहीत.

वर्तमान साहित्यव्यवहारात अनेक छुपे घटक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कारक म्हणून प्रभाव पाडणारे ठरतात. त्याआधारावरच ‘सिलेक्टिव्हनेस’चा अजेंडा दणक्यात राबवला जाताना दिसतो. अर्थात, हा ‘सिलेक्टिव्हनेस’ लेखनाची गुणवत्ता केंद्रिभूत मानून केलेला असेल, तर हरकत नाही, पण वाङ्मयबाह्य कारक प्रभावी ठरवून इतर हितसंबंधांना धार्जिणा ठरणारा ‘सिलेक्टिव्हनेस’ सर्रास अंमलात आणला जाताना दिसतो. लिहित्या लोकांनी एका हातात पेन धरून दुसऱ्या हातानं मापात पाप करण्याचं हे षडयंत्र खरं तर येत्या पिढ्यांना अंधारात लोटण्याइतपत धोकादायक ठरणारं आहे. चिंता करायचीच तर ती त्याबद्दल प्राधान्याने करावी लागेल.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

बुद्धिवादी अभिजनांबद्दल उर्वरित सामान्य बहुजनांना अथवा सत्तासोपानातील घटकांना आदरयुक्त आपुलकी त्यांना अमुकतमुक पुरस्कार मिळाले आहेत अथवा अमक्यातमक्या वाङ्मयीन पदावर त्यांची वर्णी लागली आहे म्हणून वाटत नसते. अशा तथाकथित मानापमान नाट्याचं कोडकौतुक लोकमानसाला असण्याचं कारणच नाही. तथापि, राजकारणशून्य गुणवत्तापूर्ण काम आणि लेखकाच्या लेखनातील जाणिवांचा जनभावनेतला उभा-आडवा झिरपता प्रभाव महत्त्वाचा, परिवर्तनाच्या शक्यता तिथेच तर निर्माण होतात. आणि लेखकाचं काम याहून वेगळं असतं?

पण दुर्दैवानं कर्त्या लोकांचा ‘सिलेक्टिव्हनेस’ हा अलीकडच्या काळात निर्माण झालेला मोठा धोका आहे. निवडकांचा उल्लेख, निवडकांबद्दल प्रतिक्रिया, निवडकांचा गौरव, निवडकांचा गवगवा, निवडकांनी निवडकांसाठी निवडकांमार्फत चालवावयाची निवडक अवॉर्ड-रिवार्डची सिस्टिम, याला ‘सांस्कृतिक माफियागिरी’ म्हणायचं नाही, तर दुसरं काय? ओळखीच्या वाढप्याने पंक्तीतल्या एखाद्याच्याच पात्रात हटकून पक्वान्न आग्रह करकरून वाढावीत आणि इतरांकडे ढुंकूनही पाहू नये, असला पंक्तिप्रंपच तुच्छतेस पात्र नव्हे काय?

शक्यता, संधी व योग्यता डावलून धुरिणांची ठरावीक आवडनिवड हा आपल्या साहित्यव्यवहारातला मुख्य प्रवाह आणि प्रघात बनत असेल, तर आपण तरी इतरेजणांनी आपणाकडे ‘तुच्छताभावी’ तिरस्कारानं बघून आपला द्वेष केला, अशी तक्रार का बरं, आणि कोणत्या तोंडानं करावी?

.................................................................................................................................................................

सुचिता खल्लाळ, नांदेड

suchitakhallal@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Vyankatesh Choudhari

Tue , 21 January 2025

भारीच.,. परखड आणि वास्तव... लेखक विचारवंत हे समाजाला दिशा देणारे असतात असं मानलं जातं. मात्र हे लिहिणं आणि वागणं याबाबत मात्र अत्यंत घृणास्पद वागताना पाहून अत्यंत वाईट वाटतं... असो चलता है. उषःकाल होईलच...

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......