अजूनकाही
‘अफगाणिस्तान – साम्राज्यांची दफनभूमी’ हे सचिन दिवाण याचं पहिलं पुस्तक. ते मनोविकास प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलं आहे. त्यातील लेखकाचे हे प्रास्ताविक...
.................................................................................................................................................................
१५ ऑगस्ट २०२१...
भारतात स्वातंत्र्यदिन साजरा होत होता, तेव्हा अफगाणिस्तानची राजधानी ‘काबूल’ तालिबानच्या हाती पडली होती. २० वर्षांपूर्वी, याच तालिबानला सत्तेतून हटवण्याच्या हेतूने अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. सबब होती, अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन याला तालिबानी शासनाने अफगाणिस्तानात आश्रय दिला होता आणि त्याला अमेरिकेच्या स्वाधीन करण्यास तालिबान राजी होत नव्हते. तालिबान आणि ओसामाला नेस्तनाबूत करण्यासाठी, अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करून तिथे दोन दशके तळ ठोकला होता. पण २० वर्षांनी, त्याच तालिबानच्या हाती सत्ता सोपवून माघार घेण्याची नामुष्की जगातील या एकमेव महासत्तेवर ओढवली होती.
अमेरिकेने प्रशिक्षित केलेल्या अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सेनेचा डोलारा, तालिबानी लढवय्यांपुढे अवघ्या काही दिवसांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळला होता. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी देश सोडून पळून गेले होते. जगाच्या अपेक्षेपेक्षा खूपच लवकर, बहुतांश अफगाणिस्तानवर कबजा करून तालिबानी लढवय्ये राजधानी काबूलच्या वेशीत घुसले होते. काबूल विमानतळावरच काय तो उरल्यासुरल्या अमेरिकी सैनिकांचा ताबा होता.
गतवर्षी, दोहा इथे तालिबानशी झालेल्या करारानुसार, अमेरिकी सैन्य मायदेशी परतत होते. पण नियोजित तारीख उलटून गेली, तरीही ही माघार पूर्ण झाली नव्हती. ही माघार लांबली होती आणि तोवर तालिबानची संपूर्ण सरशी झाली होती. अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचे उरलेसुरले सैन्य, राजनैतिक अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांना तातडीने अफगाणिस्तानबाहेर काढण्यासाठी काबूल विमानतळाचाच काय तो आधार राहिला होता. हा दुवा तुटून जगासमोर पुरती बेअब्रू होऊ नये, म्हणून अमेरिकेची शिकस्त चालली होती.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
दोन दशकांपूर्वी, देशात सत्तेवर असताना तालिबानने केलेले अत्याचार अफगाण जनता विसरली नव्हती. त्यामुळे पुन्हा या उपटसुंभांच्या हाती सत्ता गेलेली पाहून जनतेच्या ऊरात धडकी भरणे साहजिकच होते. काहीही करून देश सोडण्यासाठी लोकांचे लोंढे काबूल विमानतळाकडे येत होते. त्यांना नियंत्रित करणे अशक्य होत होते. अखेरच्या सैनिकांनी भरलेली अमेरिकी लष्करी विमाने धावपट्टीवर उड्डाणासाठी सज्ज होती, मात्र त्याच वेळी देश सोडण्यासाठी जिवाचा आकांत करणारी जनता चहूबाजूंनी धावपट्टीवर धावून येत होती. बायकापोरे आणि हाती लागेल ते सामानसुमान घेऊन विमानात नव्हे, तर अक्षरश: विमानावर चढण्यासाठी धक्काबुक्की सुरू होती.
आपण नाहीतर किमान आपली पुढील पिढी सुरक्षित वातावरणात जगावी, यासाठी अफगाण आईबाप आपल्या तान्ह्या, छोट्या लेकरांना हतबलपणे अमेरिकी सैनिकांच्या हाती कोंबत होते. विमानाच्या बंद दारा-खिडक्यांना, शिड्यांना, पंखांना, इतकेच नव्हे तर, चाकांना कवटाळून लोक लोंबकळत होते. त्यांना बाजूला करताना अमेरिकी सैनिकांच्या नाकी नऊ येत होते. अखेर विमानाने धावपट्टीवरून पुढे सरकण्यास सुरुवात केली, तरीही लोक हटायला तयार नव्हते. कशाबशा पुढे सरकणाऱ्या विमानाबरोबर, लोकांच्या झुंडीही धावपट्टीवरून धावत होत्या. अमेरिकेची ही फटफजिती दूरचित्रवाणी संचांवरून सारे जग पाहत होते. त्याचबरोबर अफगाण जनतेची झालेली वाताहतही जगासमोर येत होती.
ही दृश्ये पाहून साधारण अर्धशतकापूर्वी, अमेरिकेच्या वाट्याला आलेल्या अशाच एका जागतिक नामुष्कीच्या आठवणी जाग्या होत होत्या. मुख्य धारेतील प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवरून त्याच्या कहाण्या प्रसारित केल्या जात होत्या. दोन्ही घटनांची तुलना केली जात होती. ती घटना होती ३० एप्रिल १९७५ची. तेव्हा ‘व्हिएतनाम युद्धा’चे भरतवाक्य लिहिले जात होते.
दिएन-बिएन-फू, इथे १९५४ साली, झालेल्या प्रसिद्ध रणसंग्रामानंतर फ्रान्सच्या ताब्यातून इंडो-चायना मुक्त झाला होता. पण त्याची उत्तर व्हिएतनाम, दक्षिण व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस अशा चार नव्या देशांमध्ये विभागणी झाली होती. स्वातंत्र्यानंतर, लगेचच साम्यवादी प्रभावाखालील उत्तर व्हिएतनाम आणि भांडवलशाही अमेरिकेचा पाठिंबा असलेले दक्षिण व्हिएतनाम यांच्यात युद्ध जुंपले होते. तेही असेच बरीच वर्षे चिघळले होते. उत्तरेच्या बाजूने तत्कालीन सोविएत युनियन आणि चीन, तर दक्षिणेच्या बाजूने अमेरिका युद्धात उतरली होती. दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान होत होते.
व्हिएतनाममध्ये, अमेरिकी सैन्य १९ वर्षे सर्व शक्तिनिशी लढत होते. पण व्हिएतनामी गनिमी योद्ध्यांनी अत्यंत चिवट प्रतिकार करून अमेरिकेला जेरीस आणले होते. अखेर १९७३ साली, अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्यमाघारीचा निर्णय घेतला. या युद्धात अमेरिकेने ५८ हजार सैनिक गमावले होते, तर व्हिएतनामचे, साधारण २ लाख ५० हजार सैनिक कामी आले होते. जखमी आणि परागंदा लोकांची तर गणतीच नव्हती.
त्यानंतर दोनच वर्षांत, उत्तर व्हिएतनामच्या सैन्याने दक्षिण व्हिएतनाम जिंकून देशाचे एकीकरण केले. उत्तरेचे सैन्य ३० एप्रिल १९७५ रोजी दक्षिण व्हिएतनामची राजधानी सायगावमध्ये घुसले. सायगावच्या ‘२२ जिया लाँग स्ट्रीट’वर अमेरिकी दूतावासाची इमारत होती. तिथे अमेरिकी नागरिक आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना देशाबाहेर काढण्यासाठी अशीच हतबलपणे लगबग सुरू होती. दूतावासाच्या इमारतीच्या छतावर हेलिकॉप्टर सज्ज होते. त्यावर चढण्यासाठी झुंबड उडाली होती. काही लोक तर हेलिकॉप्टरच्या स्टँडलाही पकडून लोंबकळत होते.
व्हिएतनाम युद्ध हे जगाच्या इतिहासात टेलिव्हिजनवर ‘कव्हर’ करण्यात आलेले पहिले युद्ध. तो तर शीतयुद्ध ऐन भरात असलेला काळ. तेव्हाही जगभरच्या प्रेक्षकांनी अमेरिकेच्या मानहानीची ही दृश्ये दूरचित्रवाणीवरून पाहिली होती. फरक फक्त एकच होता. तेव्हा सोविएत युनियनच्या रूपाने जगात दुसरी महासत्ता अस्तित्वात होती. मात्र, तिच्याही शवपेटीवर अखेरचा खिळा अफगाणिस्तानातच ठोकला जाणार होता.
साम्य असे, की व्हिएतनाम आणि अफगाणिस्तान या दोन्ही युद्धांना अमेरिकी नागरिक विटले होते. हा प्रताप दूरचित्रवाणी वाहिन्यांचा होता. दूर आशियात कोठेतरी लढले जाणारे युद्ध अमेरिकी नागरिकांच्या थेट दिवाणखान्यात दिसत होते. त्यातून त्यांची मते बनत होती. दोन्ही युद्धे जवळपास दोन दशके रेंगाळली होती. त्यातून अमेरिकेला नेमके काय साध्य करायचे होते, ते स्पष्ट नव्हते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
व्हिएतनामच्या माय-लाय गावात अमेरिकी सैनिकांनी केलेल्या निर्दोष बायका-मुलांच्या हत्याकांडाच्या आणि युद्धविरोधात, भर रस्त्यात शांतपणे आत्मदहन करणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या प्रतिमा, अमेरिकी दूरचित्रवाणी प्रेक्षकांनी पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याच सरकारबद्दल त्यांच्या मनात घृणा उत्पन्न झाली होती.
विशीतील तरण्या सैनिकांच्या शवपेट्या अमेरिकेच्या झेंड्यामध्ये लपेटून मायदेशी परतत होत्या. घरापासून हजारो मैल दूरच्या अनाकलनीय संघर्षात आपल्या कोवळ्या पोरांचा बळी का दिला जात आहे, हे अमेरिकी पालकांना उमगत नव्हते. व्हिएतनाम युद्धाच्या काळात रस्त्यावर उतरलेली अमेरिकी जनता तत्कालीन अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांना थेट प्रश्न करत होती, ‘काय हो एलबीजे, आज किती मुले ठार मारलीत?’ अखेर जनमत सरकारच्या इतके विरोधात गेले, की अमेरिकेला माघार घ्यावी लागली. अफगाणिस्तानातही त्याचीच पुनरावृत्ती झाली होती.
अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.
विसाव्या शतकात, सोविएत युनियनसारख्या महासत्तेच्या ऱ्हासाला अफगाणिस्तान कारणीभूत ठरले. आता एकविसाव्या शतकात, उरलेल्या एकमेव महासत्ता अमेरिकेनेही तिथे चांगलेच हात पोळून घेतले आहेत. ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने २० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, त्यांच्याच हाती आयती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले आहे. म्हणूनच अफगाणिस्तानला ‘साम्राज्यांची दफनभूमी’ (ग्रेव्हयार्ड ऑफ एम्पायर्स) म्हटले जाते.
·‘अफगाणिस्तान : साम्राज्यांची दफनभूमी’ - सचिन दिवाण, मनोविकास प्रकाशन, पुणे पाने - ३६८, मूल्य - ४४० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment