‘ओरिजिन’ हा केवळ एक कलात्मक अनुभव नाही, तर एक राजकीय विधान आहे. हा समाजाला आरसा दाखवणारा दस्तावेज आहे
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अंजली प्रविण
  • ‘ओरिजिन’चे एक पोस्टर
  • Sun , 29 December 2024
  • कला-संस्कृती चलत्-चित्र ओरिजिन Origin इसाबेल विल्करसेन Isabel Wilkerson

अमेरिकन पत्रकार इसाबेल विल्करसेन यांचे ‘Caste : The Origins of Our Discontents’ हे पुस्तक २०२०मध्ये अमेरिकेत प्रकाशित झाले. यात लेखिकेने अमेरिकेतील वर्णभेदामुळे होणारे कृष्णवर्णियांवरील अत्याचार,  जर्मनीतील नाझीवादातून होणारे ज्युंवरील अत्याचार आणि भारतातील जातव्यवस्थेमुळे होणारे दलितांवरील अत्याचार, अशा जगातील तीन वेगवेगळ्या देशांतील महत्त्वपूर्ण समस्यां आणि घटनांचा सखोल संशोधनपर अभ्यास केला आहे.

‘Caste : The Origins of Our Discontents’ या पुस्तकाचे प्रकाशन होण्यापूर्वीच लेखिका इसाबेल यांचे अनुभव, काही महत्त्वपूर्ण घटना, पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा, पुस्तक लिहितानाचा प्रवास, त्यांनी केलेला संशोधनपर अभ्यास आणि अडथळे हे विषय ‘ओरिजिन’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या चित्रपटाचे कुशल दिग्दर्शन आणि लेखन एवा डू-वेरने यांनी केले असून इसाबेल यांची भूमिका औन्ज्यु एलिस-टेलर यांनी साकारली आहे. मूळ इंग्रजी भाषेतील हा चित्रपट २०२३मध्ये प्रथम ८१व्या ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय  फिल्म फेस्टिव्हल’मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर जानेवारी २०२४मध्ये इतर आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर आला.

चित्रपटात इसाबेल हे लेखिकेचे पात्र अमेरिका, जर्मनी आणि भारत या तीन देशांतील जातसमस्या आणि घटनांचे  ‘मूळ’  हे एकमेकांशी कसे संबंधित आहे, याची संशोधनपर मांडणी करतानाचा शोध-प्रवास मांडला आहे. या चित्रपटाची कथा इसाबेल यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि लिखाणाभोवती फिरताना दिसते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अमेरिकेतील वर्णद्वेष-भेदामुळे होणाऱ्या अत्याचाराचा अनुभव त्यांनीही वैयक्तिक जीवनात अनुभवलेला असतो. अशाच काही महत्त्वपूर्ण घटनांचा अभ्यास करताना लक्षात आले की, ‘वर्णद्वेष’ होण्यामागेही कोणते तरी ‘मूळ’ असे कारण आहे, जे जागतिक पातळीवरही माणसामाणसांत द्वेष निर्माण करणारी समस्या बनले आहे. 

या समस्येचे ‘मूळ’ शोधण्यासाठी जर्मनीतील नाझीवादामुळे झालेले ज्यूवरील नरसंहार आणि अत्याचाराचा संशोधनपर अभ्यासमांडणी दाखवली आहे. ‘ज्यूं’च्या टोकाच्या द्वेषामागे ‘फॅसिझम’ हे एकमेव मूळ कारण नाही. जर्मनीतील ज्यू लोकांविरोधी असणारा द्वेष आणि अमेरिकेतील कृष्णवर्णिय लोकांविरोधी असणाऱ्या द्वेषात ‘जात’ हे द्वेषाचे मूळ कारण असते. याचा शोध लेखिका अभ्यासपूर्ण मांडते.

जातीभेदामुळे निर्माण झालेला टोकाचा द्वेष अधिक अभ्यासण्यासाठी भारतातील जातीय समस्यादेखील या चित्रपटात अतिशय संशोधनपर पद्धतीने मांडली आहे. भारतातील जातीभेद मांडताना विशेषकरून आधुनिक भारत यात दाखवला आहे. त्यात आजही जातीनुसार असणारी कामाची विभागणी,  दलित द्वेष,  डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचे  विचार, यांबाबत डॉ. सुरज एंगडे यांनी खूप सुंदर मांडणी केली आहे. एंगडे एक हॉर्वर्ड विद्यापीठात संशोधन करत आहेत. त्यांनी ‘कास्ट मॅटर्स’सारखे संशोधनपर पुस्तकही लिहिले आहे. त्यांनी या चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे आधुनिक भारतातील जातीव्यवस्था मांडताना जिवंतपणा आणला आहे.

हा चित्रपट केवळ लेखिका इसाबेल यांच्या जीवनावर भाष्य करण्यापुरता मर्यादित न राहता ‘जात’ ही केवळ सामाजिक संरचना नसून व्यक्तीची जीवनशैली, अस्तित्व आणि स्वप्नांवर कशी पिढ्यान्पिढ्या प्रभाव टाकत आहे, हे दाखवले आहे. तीन देश, तीन मोठ्या घटना आणि तीन समस्या यांचे ‘मूळ’ एकत्र जोडताना इसाबेल यांनी ‘जात’ या ‘मूळ’ समस्येवरही घाव घातला आहे.

एवा डू-वेरने यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन करताना अतिशय प्रभावशाली फ्रेम्सचा आणि वाक्यांचा उपयोग केवळ सौंदर्यात्मक अनुभवासाठी न करता विचारप्रवर्तक संदेश पोहोचवण्यासाठी केला आहे.

लोकशाही व्यवस्था आणि समान हक्क देणारे संविधान असतानाही, समाजातील न बदलणारी ‘जातीभेद’ मानसिकता आजही एक गंभीर समस्या आहे. उदाहरणार्थ, हाथरस-कठुआ येथील बलात्काराच्या घटना, खैरलांजी हत्याकांड, सुरजकुमार हत्याकांड अशी न संपणारी धक्कादायक मालिका दिसते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘दलित रेप केसेस’ असा गुगल सर्च जरी केला, तर गुगल न संपणाऱ्या केसेसची यादी देते, त्याही फक्त रिपोर्ट झालेल्या केसेसची. आजही दररोज वर्तमानपत्रांत अधिकतर बातम्या या जातीय दंगली, कस्टोडिअल हिंसा, ऑनर किलिंग, बलात्कार, मॉब लिंचिंग, जातीद्वेषातून खून, मूलभूत सुविधा आणि असमान वागणूक... हे सर्रास सुरूच आहे.  

‘सामाजिक मानसिकता बदलण्यास अजूनही मोठा काळ जावा लागेल’ असे म्हटले जाते. पण या काळाची मर्यादा तरी नेमकी कोणती, याचे उत्तर कुणाही देताना दिसत नाही. ‘बदल’ हा मानवी जीवनाचा महत्त्वाचा पैलू आहे, पण पिढ्यान्पिढ्यांची ‘जाता जात नाही ती जात’ ही मानसिकता बदलण्यासाठी प्रत्येकाने पुढे आलेच पाहिजे.

वर्तमान भारतात जातीच्या मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा होणे आवश्यक आहे, पण तिथे केवळ जातीच्या नावावर राजकारण होताना दिसते आणि ‘ओरिजिन’सारखे परदेशी चित्रपट मात्र जातीवर सखोल विचारमंथन घडवण्याचे काम करत आहेत. जातीय असमानता, आरक्षण आणि दलितांच्या संघर्षाच्या कथा समाजातील संवेदनशीलतेला हाक देतात.

‘ओरिजिन’ हा केवळ एक कलात्मक अनुभव नाही, तर एक राजकीय विधान आहे. हा समाजाला आरसा दाखवणारा दस्तावेज आहे. जातीचा खोटा अभिमान बाळगणाऱ्यांनी, जातीयतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि विचारवंतांनी हा चित्रपट नक्की पाहायला हवा. असे चित्रपट नक्कीच समाजात परिवर्तन घडवण्यासाठी प्रेरणा देणारा ठरू शकतात.

.................................................................................................................................................................

लेखिका अंजली प्रवीण नेशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली इथं ‘फेअर ट्रायल फेलोशिप प्रोग्रॅम’मध्ये ‘डेटा विश्लेषक’ म्हणून कार्यरत आहेत. तसंच ‘क्रिमिनल जस्टीस सिस्टीम’च्या अभ्यासक आहेत.

amkar.anju@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख