नव्या वाटा, नवे विषय आणि नवनवीन कल्पकता वापरणारा श्याम बेनेगल हा प्रतिभावंत दिग्दर्शक विसरला जाणार नाही, जाऊ नये…
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
जयंत राळेरासकर
  • श्याम बेनेगल
  • Sun , 29 December 2024
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा Hindi Cinema श्याम बेनेगल Shyam Benegal

नुकताच १४ डिसेंबर २०२४ रोजी बेनेगल यांचा वाढदिवस झाला. त्यांचे एक छायाचित्र कुठल्या तरी सोशल साईटवर पाहिले. शरीर थकलेले दिसत होते. वार्धक्य होतेच, पण त्यांच्या इतक्या आसपास मृत्यू दबा धरून बसला आहे, असे वाटत नव्हते.

काही व्यक्ती अमीट ठसा उमटवत जगतात. त्यांच्या जाण्यानंतरसुद्धा तो पुसला जात नाही… उलट त्यांच्या पाऊलखुणा दिसताच राहतात. समांतर सिनेमाचे ते दशक बेनेगल यांच्या कलाकृतींनी परिपूर्ण होते. सत्यजित राय यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेणारे एक प्रतिभावंत दिग्दर्शक ही त्यांची ओळख कधी विसरली जाणार नाही. वास्तविक सिनेमासाठी ते दिलासा होते. त्यांनी एक नवा प्रेक्षक निर्माण केला होता.

मनोरंजनाचा नेमका अर्थ त्या काळी भाऊगर्दीत हरवला असताना बेनेगल यांनी एक अर्थपूर्ण आयाम सिनेमासाठी निर्माण केला. दृश्यमाध्यमाची, पर्यायाने कॅमेऱ्याची ताकद आणि कलावंतांची अचूक निवड हे बेनेगल यांच्या चित्रपटाचे वेगळेपण म्हणायला हवे. संवादाशिवाय व्यक्त होणारे क्षण अभिनेत्याकडून कसे घडवले जात असतील, याचा विचार स्वतंत्र व्हायला हवा. ‘अंकुर’ या त्यांच्या चित्रपटातील अनंत नाग आठवून पहा. आपल्या मस्तवाल प्रवृत्तीने वेठबिगार कामगाराला कसेही वापरणारा जमीनदार त्यांनी साकारला आहे. बेफिकिरी आणि माज यांसह त्याच्या मनातली भीतीसुद्धा एकत्र आणणारे प्रसंग कमालीच्या ताकदीचे आहेत. अभिनेता म्हणून अनंत नाग इतकेच दिग्दर्शक बेनेगलसुद्धा त्यात दिसतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘मम्मो’ सिनेमात एका भारतीय मुस्लीम स्त्री आपण पाहतो. फाळणीमुळे विस्कळीत झालेले आयुष्य बिनधास्त, अवखळपणे जगणारी ही मम्मो ही केवळ अप्रतिम व्यक्तिरेखा आहे. अनंत नाग आणि फरीदा जलाल या दोघांनी त्या व्यक्तिरेखा सुरेख सादर केल्या आहेत. आर्थिक आणि लैंगिक शोषणामुळे उदध्वस्त ग्रामीण आयुष्य हा ‘अंकुर’चा विषय होता. सनातन रूढी, समजुती यांच्या छटा असलेल्या आणि विपन्न अवस्थेमुळे पिचलेल्या समाजाच्या दु:खावर बेनेगल यांचे ते भाष्य होते.

समांतर सिनेमा असे आपण म्हणतो, त्या वेळी बेनेगल हे नाव आठवतेच. त्यांनी ही वाट निर्माण केली, हे खरे असले, तरी ती टिकली नाही. मात्र काळ लहान असला, तरी त्याची परिणामकारकता आजही भुलवणारी आहे.

‘निशांत’मध्येसुद्धा ग्रामीण दडपशाही आणि अत्याचार बेनेगल दाखवतात. ‘मंथन’ची घडण क्वचित वेगळी असली तरी, त्यातसुद्धा ग्रामीण भागातील राजकारणाचे दर्शन आहे. तेलंगणात जन्मलेल्या बेनेगल यांनी हे खूप जवळून पाहिले होते. म्हणून त्यावर भाष्य करणे, हा त्यांच्या आकलनाचा एक आवश्यक भाग झाला असावा. ‘मंथन’साठी डेअरी उद्योगातल्या लाखो कामगारांनी सहाय्य केले होते, ही घटनादेखील महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने पाहिले तर हे लाखो कामगार या चित्रपटाचे निर्माते होते.

‘अंकुर’, ‘निशांत’ आणि ‘मंथन’ या ट्रायोलॉजीनंतर ‘भूमिका’ हा बेनेगल यांचा चित्रपट आठवतो. बेनेगल यांचा हा चरित्रपट मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या आयुष्यावर बेतलेला होता. पुरुषप्रधान वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर आपले स्वच्छ व्यक्तिमत्त्व जपणारी अभिनेत्री स्मिता पाटीलने जिवंत केली होती.

बेनेगल यांनी निर्माण केलेली पात्रे व कथा अस्सल आणि वास्तविक असत. याच परंपरेत त्यांनी ‘महाभारत’ या अभिजात साहित्यकृतीचा आधार घेऊन ‘कलयुग’सारखा चित्रपट दिला. आणि १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धातील कथा घेऊन ‘जुनून’ काढला. या सगळ्या कथांमध्ये परंपरा आणि इतिहास दिसला, तो त्यांनी वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यात पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांची स्वत:ची अशी एक दृष्टी होती. ‘भारत एक खोज’ या दूरदर्शन मालिकेतून तर त्यांनी प्रदीर्घ काळ समोर आणला.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘मंडी’साठी (१९८३) बेनेगल यांनी कथेत किंचित उपहास आणला होता. मात्र ती एक राजकारण आणि वेश्या व्यवसायावर आधारित कथा होती. ‘मंडी’ची कथा पोर्तुगीज माहोलमध्ये आकार घेते. त्यामुळे एक  ‘पिरिअड फिल्म’चे स्वरूप होते. कथेची पार्श्वभूमी निवडताना बेनेगल काय विचार करत असत, हे अभ्यासणे महत्त्वाचे ठरावे. ‘जुनून’, ‘कलयुग’, ‘मंडी’ हे सर्व चित्रपट असेच इतिहासाच्या घटना ठळक आठवून देणारे आहेत. ‘त्रिकाल’ हा असाच एक चित्रपट होता. त्याची पार्श्वाभूमीसुद्धा पोर्तुगीज आहे. पोर्तुगीज गोवा मुक्त झाल्यानंतरची एक कथा त्यात दिसते.

विशेष महत्त्वाचे म्हणजे लीला नायडू या अभिनेत्रीची निवड. बेनेगल यांच्या अनेक चित्रपटांच्या कथा या त्यांच्या स्वत:च्या आहेत, आणि त्या सांगताना बेनेगल यांनी चित्रीकरणाचे अनोखा प्रयोग केलेले दिसतात. कदाचित यालाच आपण ‘समांतर सिनेमा’ म्हणत असू.

‘फिचर फिल्म’व्यतिरिक्त बेनेगल यांनी छोट्या पडद्यावरसुद्धा हजेरी लावलेली आहे. ‘भारत एक खोज’ ही मालिका त्याचे श्रेष्ठ उदाहरण आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारलेल्या या मालिकेत नेहरूंच्या दृष्टीकोनातून भारत दिसतो.

असेच दुसरे उदाहरण म्हणजे ‘संविधान’ हा माहितीपट. संविधानाच्या निर्मितीशी निगडीत घटनांवर बेतलेली ही मालिका राज्यसभा टीव्हीवर दाखवली गेली होती. सत्यजित राय यांच्यावर केलेला वार्तापट राय आणि त्यांचे चित्रपट आणि आयुष्यावर आहे. वनराज भाटिया हे त्यांच्या चित्रपटाचे प्रमुख संगीतकार असले तरी, ए.आर. रहेमानसारख्या नव्या मनूचा संगीतकारसुद्धा त्यांनी ‘झुबेदा’साठी घेतला होता.

जातीय आणि वर्गीय असमतोल, उच्चभ्रू सरंजामशाहीची अनियंत्रित शक्ती, आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीचा तपशील, ही सगळी बेनेगलांच्या चित्रपटाची वैशिष्ट्ये ठरावीत. नव्या वाटा, नवे विषय आणि नवनवीन कल्पकता वापरणारा श्याम बेनेगल हा प्रतिभावंत दिग्दर्शक विसरला जाणार नाही, जाऊ नये.

..................................................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख