कवेत न मावलेले मनोहर सप्रे...
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • मनोहर सप्रे
  • Sun , 15 December 2024
  • संकीर्ण श्रद्धांजली मनोहर सप्रे Manohar Sapre

मनोहर सप्रे यांची ओळख आधी त्यांच्या व्यंगचित्रातून झाली. तेव्हा त्यांची व्यंगचित्रं ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर प्रकाशित होत असत. एक जबरदस्त पंच त्यांच्या व्यंगचित्रात असे. चित्रातली माणसं जणू आपल्या आजूबाजूलाच वावरतात असे वाटत असे. त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख व्हायला मात्र बराच काळ जावा लागला आणि त्यासाठी मला नागपूरला पडाव टाकावा लागला.

नागपूरचा विदर्भ साहित्य संघ तेव्हा सर्वार्थानं दिग्गज लोकांचा होता. ‘युगवाणी’चं संपादकपद कवीश्रेष्ठ ग्रेसकडे होतं. वि.भि. कोलते, वामनराव चोरघडे, ना.रा. शेंडे, मधुकर आष्टीकर, मधुकर केचे, उद्धव शेळके, मनोहर तल्हार यांच्यासोबतच सुरेश भट, महेश एलकुंचवार, यशवंत मनोहर, भास्कर लक्ष्मण भोळे, सुरेश द्वादशीवर अशा अनेक वैदर्भियांची नावं मराठी साहित्य प्रांतात अप्रूप आणि आदरानं घेतली जात होती.

कवी ग्रेस आणि सुरेश भट तर जिवंतपणीच दंतकथा बनलेले होते आणि महेश एलकुंचवार यांचा दबदबा अख्ख्या महाराष्ट्राच्या मराठी सांस्कृतिक वर्तुळात पसरलेला होता. वास्तव्य अरण्य प्रदेशातील चंद्रपूर या आडगावी होतं, तरी या मंदियाळीत एक नाव मनोहर सप्रे यांचं होतं.

१९७०-८०चा तो काळ लक्षात घ्या, दळणवळणाची साधनं अपुरी, संदेशवहनाच्या सोयी तर जगाच्या तुलनेत अतिशय बाल्यावस्थेत होत्या. इंटरनेट वगैरे स्वप्न  होतं आणि फॅक्स वगैरे तर सोडाच, टेलिफोनची सुविधाही शहरी भागातही नाममात्र होती. अशा काळात राजकारण, समाजकारण, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर मुंबईच्या ‘लोकसत्ता’ (मराठी वृत्तपत्रांत ‘लोकसत्ता’नंबर एक असल्याचा तो काळ होता.) या दैनिकात चंद्रपूरहून मनोहर सप्रे व्यंगचित्रातून भाष्य करत होते. ते चुरचुरीत, कधी बोचरं तर कधी वाचकांच्या चेहऱ्यावर आपसूक उत्स्फूर्त दाद देणारं हसू फुलवणारं असायचं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

विदर्भ साहित्य संघाच्या कट्ट्यावर वावरताना सप्रे यांची ओळख झाली आणि सुरुवातीच्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं दडपणच आलं. ही भेट मनोहर म्हैसाळकर यांनी करून दिली. लख्ख गोरा वर्ण, सहा फुटाच्या जवळ पोहोचणारी शरीरयष्टी, मस्तपैकी ‘कलावंतीय’ अस्ताव्यस्त डोईवरचे केस, चष्म्याआडचे डोळे उत्सुकतेनं भरलेले, समोरच्याशी बोलताना प्रतिक्रिया म्हणून चेहऱ्यावरचे सतत बदलणारे भाव, ‘मेलोडियस’ म्हणता येईल, अशी वाणी, स्वभाव गप्पिष्ट आणि अत्यंत टीपटाप कपडे. कपड्यांची निवड चोखंदळ...

सप्रे यांना मी कधीच चुरगाळल्या-मुरगाळल्या कपड्यांत बघितलंच नाही. ते चंद्रपुरात प्राध्यापकी(ही) करत. त्यांनी राज्यशास्त्रासोबतच तत्त्वज्ञान याही विषयात एम.ए. केलेलं होतं. मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं.  त्यांचं मराठी, इंग्रजी, हिंदी वाचन चौफेर होतं. ‘अफाट’ या एका शब्दांतच त्यांच्या वाचनाचं वर्णन करता येईल, शिवाय हे वाचन अभिजात कुळातलं होतं.

बाय द वे, कुमार केतकर आणि मी एकदा सप्रे यांना भेटायला त्यांच्या चंद्रपुरातल्या घरी गेलो. (एक स्वतंत्र लेख करता येईल इतकं सप्रे यांचं घर कलात्मक आहे.) पुस्तकांचा विषय निघाला. त्यांच्या गप्पातून कानी पडणाऱ्या बहुतेक इंग्रजी पुस्तकांची नावं माझ्यासाठी अनोळखी होती, जी ओळखीची होती, त्यातली बहुसंख्य वाचलेली नव्हती.

बोलता बोलता सप्रे यांनी ५० इंग्रजी अभिजात पुस्तकांची यादी केतकर आणि माझ्या हाती ठेवली. आई शपथ सांगतो, त्यातलं एक वगळता कोणतंही पुस्तक मी वाचलेलं नव्हतं; एकमेव जे वाचलं ते कॅथरिन फ्रँकलिखित भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं चरित्र होतं. मग पुढचा सव्वा-दीड तास केतकर आणि सप्रे त्या पुस्तकांवर बोलत होते आणि मी ढिम्म बसून होतो. अशा माणसाचं सुरुवातीच्या काळात दडपण न येतं तरच नवल!

कोणताच माणूस दोन-चार भेटीत समजत नाही. तो तुटक-तुटक समजत जातो आणि मग त्याची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते, तसंच सप्रे यांच्या बाबतीत घडत गेलं. आमच्यातल्या भेटी वाढल्या, घसट वाढत गेली, सूर जुळत गेले आणि सप्रे नावाचा माणूस बुद्धिवंत तर आहेच आहे, शिवाय कलंदरही आहे, हे उमगत गेलं.

...........................................................................................................................................

कोणताच माणूस दोन-चार भेटीत समजत नाही. तो तुटक-तुटक समजत जातो आणि मग त्याची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते, तसंच सप्रे यांच्या बाबतीत घडत गेलं. आमच्यातल्या भेटी वाढल्या, घसट वाढत गेली, सूर जुळत गेले आणि सप्रे नावाचा माणूस बुद्धिवंत तर आहेच आहे, शिवाय कलंदरही आहे, हे उमगत गेलं. खानदेशात जन्मलेल्या, विदर्भाच्या अरण्य प्रदेशात राहणाऱ्या आणि संपूर्ण मराठी मुलुखावर कर्तृत्वाचे झेंडे फडकावणाऱ्या या माणसाचा आवाका कुणा एकाच्या कवेत येणारा नाही, हेही हळूहळू जाणवत गेलं.

...........................................................................................................................................

खानदेशात जन्मलेल्या, विदर्भाच्या अरण्य प्रदेशात राहणाऱ्या आणि संपूर्ण मराठी मुलुखावर कर्तृत्वाचे झेंडे फडकावणाऱ्या या माणसाचा आवाका कुणा एकाच्या कवेत येणारा नाही, हेही हळूहळू जाणवत गेलं.

चित्रकलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या सप्रे नावाच्या या माणसाची बोटं  म्हणजेच कुंचला होता, व्यंगचित्रकार म्हणून व्यक्ती रेखाटण्याची त्यांची रेषेवरची हुकमत  स्तिमित करणारी होती; एकाच वेळी ‘लोकसत्ता’, ‘केसरी’, ‘तरुण भारत’ या मराठी आणि ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकांसाठी सप्रे यांनी दररोज व्यंगचित्रे करताना विषयाची पुनरावृत्ती कधीच होऊ दिली नाही. त्यापेक्षा आश्चर्यस्तंभित व्हावं, अशी त्यांची शब्दावरची हुकमत होती. त्यांची निरीक्षण, वाचनक्षमता किती अफाट असेल, ते त्या व्यंगचित्राखालच्या ओळीतून  जाणवत असे.

शास्त्रीय गायनासोबतच जुन्या हिंदी चित्रपट गाण्याची त्यांची जाणकारी डोहखोल होती. त्यांच्या लेखनाला दरबारी गायनाची लयबद्धता होती. काष्ठशिल्प करणं त्यांनी तसं उशिरा सुरू केलं आणि त्यात अविश्वसनीय प्राविण्य संपादन केलं.

अफाट लोकसंग्रह हे त्यांचं भांडवल होतं; समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांशी त्यांचा हृद्य संपर्क होता. अगदी इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते एकेकाळी सनदी अधिकारी असलेले प्रभाकर करंदीकर असा त्यांचा लोकसंग्रहांचा व्यापक पट होता.

निसर्ग, त्यातीलपशू-पक्षी आणि सामाजिक चळवळींविषयी त्यांना आस्था होती. त्या सामाजिक चळवळींची मूलभूत, सूक्ष्म चिकित्सा करण्यात त्यांना रुची होती. हा माणूस खरंच हाडामासाचा आहे का, अशी शंका म्हणूनच मला तरी अनेकदा येत असे.  

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पत्रकारितेतील माझे व्याप वाढत गेले आणि मग सप्रे यांच्याशी असलेल्या भेटी कमी होत गेल्या. जो काही संपर्क उरला तो सेलफोनवरचा. सप्रे यांचा फोन आला की, किमान अर्धा ते पाऊण तरी तास काढून ठेवावा लागे, कारण त्यांना खूप बोलायचं असे. माझं नागपूर सुटलं (त्याला  आता बारा वर्षं होतील). नंतर दिल्ली आणि औरंगाबाद असे मुक्काम होत गेले. माझी बेगम अंथरुणाला खिळेपर्यंत आमच्यातला संपर्क नियमित होता, मग ते सेलफोनवरचं बोलणही हळूहळू खंडीत झालं.

गेल्या वर्षी साहित्य महामंडळाच्या एका कार्यक्रमासाठी भोपाळला गेलो, तेव्हा तिथे पुरुषोत्तम सप्रे नावाचे एक अगत्यशील आणि गप्पिष्ट गृहस्थ भेटले. माणूस एकदम मस्त, उमदा. डॉ. दादा गोरे, डॉ. हृषीकेश कांबळे, जीवन कुळकर्णी यांच्यासोबत रंगलेल्या मैफिलीतल्या गप्पात समजलं पुरुषोत्तम सप्रे, हे मनोहर सप्रे यांचे धाकटे बंधू. कॉमन दुवा सापडला. म्हणून आमच्यातल्या गप्पांतील सलगी वाढली. पुरुषोत्तम यांच्याकडून समजलं, मनोहर सप्रे यांनी आता वयाची नव्वदी पार केली आहे. त्यांची तब्येत ठीक नाही. जाणीव-नेणीवेच्या पलीकडे ते गेले आहेत. मनातल्या मनात मी म्हणालो, याचा अर्थ मनोहर सप्रे नावाच्या झाडावरचं पान आता पूर्ण पिकलं आहे.

माझं मन भूतकाळात गेलं. एकदा गप्पा मारताना मनोहर सप्रे म्हणाले होते, ‘माझं पहिलं व्यंगचित्र १९५७ साली प्रकाशित झालं.’ ‘तेव्हा मी दोन वर्षांचा होतो’, मी लगेच सांगितलं.

मनोहर सप्रे यांनी त्यांच्या सवयीप्रमाणं दाद देण्याच्या टाळीसाठी हात पुढे केला, मी टाळी दिली. म्हणजे हा माणूस त्याच्या आवडीच्या छंदात किती वर्षं आहे, असा प्रश्न मला तेव्हा पडला होता .  

अखेर या १३ डिसेंबरला दुपारी उत्तर मिळालं. पिकलं पान गळून पडलं... निधन समयी त्यांचं वय ९२ होतं. 

नशीब, नियती, प्रारब्ध, पाप-पुण्य यावर माझा विश्वास नाही. तरी कधी कधी वाटतं, गेल्या जन्मी काही तरी पुण्य नक्कीच केलं असावं, म्हणून मनोहर सप्रे यांच्यासारखी कवेत न येणारी प्रतिभावंत माणसं पत्रकारिता करताना मला भेटली असावीत!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......