अजूनकाही
ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, विचारवंत आणि प्राच्यविद्यापंडित डॉ. आ.ह. साळुंखे यांना नुकताच २०२३ सालचा महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा विशेष लेख...
.................................................................................................................................................................
आपल्या विद्वत्तापूर्ण सम्यक लेखणीने अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध संयत विद्रोह पुकारणारे प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे उर्फ तात्या हे महाराष्ट्रातील एक अतिशय महत्त्वाचे संशोधक अन् विचारवंत आहेत. प्रखर बुद्धिमत्ता आणि असाधारण प्रतिभा असलेल्या तात्यांनी जीवनमूल्यांशी कुठलीही तडजोड न करता विद्या आणि विवेक यांच्या समन्वयाचा उच्च बिंदू गाठला आहे. त्यांनी इतिहास, धर्मचिकित्सा, तत्त्वज्ञान, प्राच्यविद्या, समाजशास्त्र, भाषा अशा अनेक विषय-उपविषयांचे संशोधन करत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. इथल्या अडीच-तीन हजार वर्षांच्या विविध सांस्कृतिक प्रवाहांचा, त्यातील संघर्षांचा आणि समन्वयांचा सखोल अभ्यास केला आहे.
तात्यांनी फुले- शाहू- आंबेडकर यांच्यानंतर आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाट विकसित केली आहे. हे करण्यासाठी त्यांनी धर्मचिकित्सेचे अत्यंत गुंतागुंतीचे आणि जोखमीचे कार्य करत सांस्कृतिक गुलामगिरीची खोलवर गेलेली पाळेमुळे उघडी केली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या परिवर्तनाच्या चळवळीला बौद्धिक व नैतिक अधिष्ठान मिळाले.
‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’, ‘धर्म की धर्मापलीकडे’, ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’, ‘वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी’, ‘ऐतरेय ब्राम्हण : एक चिकित्सा’, ‘महाभारतातील स्त्रिया - भाग १ व २’, ‘परशुराम : जोडण्याचे प्रतीक की तोडण्याचे’, या पुस्तकांमधून तात्यांनी बहुजन (तात्या ‘सुजन’ असा शब्द वापरतात) समाजाला शेकडो वर्षे मनुष्यत्व नाकारणाऱ्या वैदिक धर्मग्रंथांची, धर्मसूत्रांची परखड चिकित्सा केली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘ते आणि आपण’ म्हणजे ‘शोषक विरुद्ध शोषित’ अशी सरळ विभागणी करून महात्मा फुल्यांनी दिलेला छेद तात्यांनी खोलवर खणत नेला आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांसारख्या युगप्रवर्तक राजाला शूद्र ठरवून राज्याभिषेक न करणारी वैदिक व्यवस्था तुमची कशी असू शकते, असा स्पष्ट सवाल बहुजनांना विचारत गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, हे त्यांनी बिनतोड मांडले.
त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचे शीर्षक अन् भाषा वाचली की, परिवर्तनाच्या विचारांचे बीज पेरले जाते, एवढी ती प्रभावी आणि नेमकी आहे. परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आज त्यांच्या पुस्तकांची शीर्षके प्रेरणादायी घोषवाक्यांसारखी आणि सुभाषितांसारखी वापरली जातात. शब्दांचा, संज्ञाचा अर्थ लावून परिभाषा कशी ठरवायची, याचे आम्हांला स्वातंत्र्य आहे, हे त्यांनी त्यांच्या अगदी सुरुवातीच्या पुस्तकांपासूनच ठामपणे मांडले आहे.
वैदिक धर्म न मानणाऱ्या, यज्ञादी कर्मकांड नाकारणाऱ्या, पारलौकिकावर विश्वास नसलेल्या चार्वाकाला वैदिक व्यवस्थेने नास्तिकशिरोमणी ठरवून संपवले. मात्र चार्वाकाला देहात्मवाद स्वीकारणारा, इहवाद मानणारा, कष्ट करा आणि जीवनाचा आनंद घ्या, असं वास्तवावर आधारित तत्त्वज्ञान मांडणारा आणि जीवनाला सकारात्मक विधायक स्वरूपात स्वीकारणारा म्हणून तात्यांनी ‘आस्तिकशिरोमणी’ म्हटले आहे.
तुकारामांनी आपल्या असाधारण शब्दप्रतिभेने धर्माआड लपलेल्या दांभिक व्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडला. या तुकारामांना मारून ते विमानाने वैकुंठाला गेले म्हणणाऱ्या वैदिकांची धूर्त लबाडी तात्यांनी ‘विद्रोही तुकाराम’ या पुस्तकात प्रभावी शब्दांत उघड केली आहे. त्याचबरोबर जनमानसाला संत तुकारामांपासून विद्रोही तुकारामांपर्यंत पोहचवण्याचे असाधारण कार्य केले. तात्या तुकारामांनी, बुद्धांनी ओळखलेले भाषेचे महत्त्व पदोपदी सांगतात.
...........................................................................................................................................
सगळ्या माणसांमध्ये मनुष्यत्वाचा विकास करणारे बीजरूपी बुद्धत्व असते. त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात तसा फरक नाही, ही भावना त्यामागे आहे. तसेच बुद्धत्व ही काही ईश्वरीय किंवा अलौकिक अशी संकल्पना नाही. प्रत्येक माणसामध्ये प्रयत्नांनी विकास करता येणाऱ्या प्रज्ञा, शील, करुणा या घटकांचा असीम विकास म्हणजेच बुद्धत्व, याची साधार मांडणी केली. जीवन जगण्यासाठी सर्वांत उत्तम अशी दृष्टी देणारा म्हणून ‘सर्वोत्तम’ हे विशेषण तात्यांनी ‘भूमिपुत्रा’च्या मागे लावले आहे.
...........................................................................................................................................
तात्यांनी ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ या ग्रंथातून तथागतांना इथल्या भूमीचे ‘सर्वोत्तम पुत्र’ संबोधले आहे. ‘भूमिपुत्र’ हा शब्दप्रयोग निवडून त्यांनी प्रत्येक माणसाला तथागतांशी जोडले आहे. गोतम बुद्ध हे पृथ्वीवर जन्मलेले आणि विचारांनी उन्नत पावलेले मनुष्य आहेत, तसेच ते शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, हे सत्य सांगत बुद्ध परके नाहीत, ते आपले, जवळचे आहेत, जणू काही आपल्या रक्तामांसाचे आहेत असे म्हणत सुजनांची, शेतकऱ्यांची बुद्धासोबत तुटलेली नाळ पुन्हा जोडली.
सगळ्या माणसांमध्ये मनुष्यत्वाचा विकास करणारे बीजरूपी बुद्धत्व असते. त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात तसा फरक नाही, ही भावना त्यामागे आहे. तसेच बुद्धत्व ही काही ईश्वरीय किंवा अलौकिक अशी संकल्पना नाही. प्रत्येक माणसामध्ये प्रयत्नांनी विकास करता येणाऱ्या प्रज्ञा, शील, करुणा या घटकांचा असीम विकास म्हणजेच बुद्धत्व, याची साधार मांडणी केली. जीवन जगण्यासाठी सर्वांत उत्तम अशी दृष्टी देणारा म्हणून ‘सर्वोत्तम’ हे विशेषण तात्यांनी ‘भूमिपुत्रा’च्या मागे लावले आहे.
‘बळीवंश’ या ग्रंथांची मांडणी करताना तात्यांनी इतिहास, प्राच्यविद्या, पुराणकथा, भाषा, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्वज्ञान या विषयांच्या अभ्यासातून गवसलेल्या सगळ्या बिंदूंना जोडत वैदिकांनी दडपून आणि पुसून टाकलेल्या देदीप्यमान अशा ‘अवैदिक संस्कृती’ला उजागर केले आहे. त्यांनी ‘तुळु’ या भाषेमध्ये ‘बळी’ या शब्दाचा अर्थ ‘वंश’ होतो, हे स्पष्ट करत हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, प्रल्हाद, विरोचन, कपिल, बळी, जालंधर, बाण इ. राजांचा विचारवंश मांडला आहे. या महानायकांनी वैदिक संस्कृती विरुद्ध दिलेल्या लढ्याचे विश्लेषण केले आहे.
वैदिक आर्यांनी म्हणजे देवांनी अवैदिक अनार्यांची म्हणजे असुरांची मानवतावादी संस्कृती समूळ नष्ट करत तिचे विकृतीकरण केले. असुर म्हणजे इथल्या भूमीचे मूळ रहिवासी. देवांनी अनैतिकतेने, असत्याने इथल्या असुरांवर सत्ता प्रस्थापित केली. अवैदिक नायकांना खलनायक म्हणून रुजवले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या अतुलनीय लढ्याला विकृत स्वरूप देत खोटे ग्रंथ, खोट्या कथा निर्माण केल्या. त्यांच्या पराक्रमाला, शौर्याला संपवण्यासाठी कपटनीती वापरली, लबाड्या करत चारित्र्यहनन केले. इतिहासाची पुनर्मांडणी करणाऱ्या ‘बळीवंश’ या ग्रंथाने सुजनांना त्यांच्या समृद्ध अवैदिक संस्कृतीची खरी ओळख करून दिली आहे.
...........................................................................................................................................
परिवर्तनाची भाषा ही कायम हृदयाकडून मेंदूकडे प्रवास करणारी असावी, असे सांगत विवेकी, विनम्र अन् संवादी भूमिकाच परिवर्तन साधते, हेही तात्या अधोरेखित करतात.चार्वाक, बळी, बुद्ध, महावीर, संत कबीर, चक्रधर, तुकाराम, म. फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी प्रबोधन करत शोषकांच्या कल्याणाचा मार्ग दाखवला. आपले जीवन पणाला लावून बहुजनांच्या स्वांतत्र्याकरता इथल्या शोषण व्यवस्थेशी शेकडो वर्षं चिवट लढा दिला. या महामानवांच्या विचारांचा आणि उच्च जीवनमूल्यांचा पडलेला प्रभाव तात्यांच्या लेखणीतून आणि जीवनातून उद्धृत होतो.
...........................................................................................................................................
तात्यांनी केलेल्या धर्मचिकित्सेमुळे प्रस्थापितांनी त्यांच्याविरुद्ध वादळे उठवली. तेव्हा त्यांनी वादळे निर्माण करणाऱ्या व्यवस्थेचा ‘वादळांची वादळे’, ‘विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप’, ‘डॉ. आंबेडकरांची विचारधारा आणि लेखकाची भूमिका’ असे समीक्षाग्रंथ लिहून अचूक भेद केला.
‘परिवर्तन : शास्त्रही, कलाही’ या पुस्तकातून तात्यांनी परिवर्तनाच्या चळवळीला आणि कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाचा असा विचार दिला आहे. वर्षानुवर्षं बाळगलेल्या अनिष्ट धारणांना इष्ट दिशेने बदलणे म्हणजेच परिवर्तन, अशी व्याख्या त्यांनी केली आहे. परिवर्तनाच्या चळवळींनी कार्य करताना समाजवास्तवाचे भान राखणे अत्यावश्यक आहे, असा विचार मांडला आहे. विविध चळवळींनी समान मूल्यांवर एकत्रित येत परस्पर संवादी पूल उभे करावेत, एकमेकांना जोडून घेत एकीच्या बळाचे महत्त्वे लक्षात घ्यावे, याची जाणीव करून दिली आहे.
कृतिशील परिवर्तनाचे महत्त्व सांगत दुसऱ्यांना उपदेश करायच्या आधी स्वतःमध्ये बदल करण्याचे आव्हान स्वीकारा, हे तात्या स्पष्टपणे सांगतात. ‘परिवर्तन हिंसेविना’ असे म्हणत आक्रमक, विद्वेषाला जन्म देणारी भाषा चळवळींना मारक ठरते, त्यामुळे परिवर्तनाची भाषा ही कायम हृदयाकडून मेंदूकडे प्रवास करणारी असावी, असे सांगत विवेकी, विनम्र अन् संवादी भूमिकाच परिवर्तन साधते, हेही तात्या अधोरेखित करतात.
चार्वाक, बळी, बुद्ध, महावीर, संत कबीर, चक्रधर, तुकाराम, म. फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी प्रबोधन करत शोषकांच्या कल्याणाचा मार्ग दाखवला. आपले जीवन पणाला लावून बहुजनांच्या स्वांतत्र्याकरता इथल्या शोषण व्यवस्थेशी शेकडो वर्षं चिवट लढा दिला. या महामानवांच्या विचारांचा आणि उच्च जीवनमूल्यांचा पडलेला प्रभाव तात्यांच्या लेखणीतून आणि जीवनातून उद्धृत होतो.
...........................................................................................................................................
सांस्कृतिक गुलामगिरीला झटकून सुजनांमध्ये स्वातंत्र्याच्या आणि आत्मसन्मानाच्या जाणिवा जाग्या व्हाव्यात, यासाठी आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण तात्यांनी झिजवला आहे. भारतीय जनमानसाच्या प्रश्नांचा, इथल्या सर्वसामान्यांच्या मानसिक गुलामगिरीचा, शोषणाचा मुळापासून विचार करून त्यांना सांस्कृतिक अन् वैचारिक लढाईसाठी जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना त्यांनी विवेकाचा पाया ढळू दिलेला नाही. उच्चतम मूल्यांचा अंगिकार करत ‘आधी कृती आणि मग उक्ती’ असे नैतिक भान राखलेल्या कृतिशील विचारवंतांमध्ये तात्यांचा समावेश होतो.
...........................................................................................................................................
तात्यांनी सर्वसामान्यांमध्ये जीवनाच्या उत्कट जाणिवा निर्माण व्हाव्यात, त्यांना जीवनाकडे निकोप दृष्टीने पहाता यावे, आपल्या विकासासाठी त्यांनी विधायक प्रयत्न करावेत, या विचाराने गंभीर वैचारिक लेखनाबरोबर ललितलेखनही केले आहे.
‘चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये म्हणून’, ‘त्यांना सावलीत वाढवू नका’, ‘शंभर कोटी मेंदू दोनशे कोटी हात’, ‘बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते’ या ललितगद्यातून त्यांनी उमद्या जीवनशैलीला पूरक ठरणारे संस्कार केले आहेत. त्यांच्या या सृजनात्मक लेखनाने सर्वसामान्यांच्या मनात सकस जीवनउपयोगी तत्त्वांचे रोपण केले. ललितगद्याची त्यांची भाषा अत्यंत दर्जेदार, प्रवाही अन् ओघवती आहे.
गेली पन्नास वर्षे तात्यांनी निर्मळ मनाने मानवतेचे अवकाश निर्माण करण्यासाठी अहोरात्र आपली लेखणी आणि वाणी वापरत अविश्रांत परिश्रम घेतले आहेत. त्यांनी आजवर लिहिलेल्या पन्नास-साठ पुस्तकांचे विषय जरी नीट पाहिले तरी त्यांच्या डोंगराएवढ्या कामाचे रूप लक्षात येते. खरे तर त्यांनी फक्त ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’, ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’, ‘विद्रोही तुकाराम’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ एवढेच ग्रंथ लिहिले असते, तरी त्यांचे नाव आज अजरामर झाले असते.
सांस्कृतिक गुलामगिरीला झटकून सुजनांमध्ये स्वातंत्र्याच्या आणि आत्मसन्मानाच्या जाणिवा जाग्या व्हाव्यात, यासाठी आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण तात्यांनी झिजवला आहे. भारतीय जनमानसाच्या प्रश्नांचा, इथल्या सर्वसामान्यांच्या मानसिक गुलामगिरीचा, शोषणाचा मुळापासून विचार करून त्यांना सांस्कृतिक अन् वैचारिक लढाईसाठी जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना त्यांनी विवेकाचा पाया ढळू दिलेला नाही. उच्चतम मूल्यांचा अंगिकार करत ‘आधी कृती आणि मग उक्ती’ असे नैतिक भान राखलेल्या कृतिशील विचारवंतांमध्ये तात्यांचा समावेश होतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
भारतीय समाजाला धर्माच्या नावाखाली शोषण व गुलामगिरीच्या विळख्यात अडकवण्यात इथली प्रस्थापित प्रतिगामी व्यवस्था यशस्वी होत आहे. संविधान, मानवतावाद, नैतिकता यांना दूरवर लोटून टोकाचे हिंसात्मक, अविश्वासू, धार्मिक, जातीयवादी, झुंडवादी वातावरण तयार होत आहे. संविधानावर आधारित लोकशाही असताना सुजनांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलाम बनवण्यात ही प्रस्थापित प्रतिगामी व्यवस्था यशस्वी होत आहे. सगळ्या बाजूंनी मानवतेच्या विचारांना दाबले जात असतानाच्या या काळात तात्यांच्या मानवतावादी लेखणीने निर्भयपणे उभा केलेल्या विचारविश्वाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.
आजच्या काळात परिवर्तनाच्या चळवळीचे सगळ्या पातळ्यांवर होत असलेले निर्मूलन, धर्माच्या माध्यमातून पुन्हा सांस्कृतिक वर्चस्व लादण्यात यशस्वी होत असलेले प्रस्थापित, संवेदना हरवत चाललेला, निष्क्रियता आलेला समाज असे वातावरण सभोवताली असताना तात्यांनी उभ्या केलेल्या महान कार्याचे आणि त्यांनी केलेल्या त्यागाचे महत्त्व नीट समजून घेत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचले जाईल, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. विद्वत्तेला मानुषतेची आणि तर्ककठोर चिकित्सेला सहृदयतेची जोड देणाऱ्या तात्यांचे कार्य हृदयात आणि मेंदूत जागवत राहायला हवे!
.................................................................................................................................................................
डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ जगताप
drsuvarnasandhya30@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment