१९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकही महिला विराजमान झाली नाही. महाराष्ट्रात राज्य विधानमंडळातील महिलांची एकूण संख्या आणि लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या कधीही राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त नसावी. येत्या २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमधील महिला उमेदवारांची टक्केवारी जेमतेम १० टक्के आहे. परंतु राज्याच्या राजकारणातील महिलांच्या सहभागाचे हे संपूर्ण चित्र नाही.
महाराष्ट्राचे राजकीय पटल महत्त्वाकांक्षी महिला नेत्यांच्या वाढत्या संख्येने गजबजते आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक राजकीय पक्षात महिला नेतृत्व उभारी घेत आहे. आजच्या राज्यातील महिला नेत्या त्यांच्या कुटुंबातील पुरुष व्यक्तींच्या प्रतिनिधी स्वरूपात राजकारणात नाहीत, तर त्या स्वयंभूत आहेत. अनेक महिला प्रत्यक्ष राजकारणात उतरल्या नसल्या, तरी कुटुंबातील पुरुष सदस्यांची राजकारणातील स्थिती भक्कम करण्यासाठी त्या राजकीय कार्यात सक्रियपणे रस घेत असतात. मग ते सार्वजनिक जीवनातून समाजातील विविध गटांशी संबंध राखणे असो, मतदारसंघ पातळीवरील काम असो की, संघटना बांधणीत सहकार्य असो. या महिला कोणतेही पद न स्वीकारता कुटुंबातील पुरुषांच्या तोडीस तोड राजकीय कार्य करत असतात.
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या त्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक असल्याचे आणि पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील एक प्रमुख सल्लागार असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यांचा मुलगा अभिमानाने आपले पूर्ण नाव ‘आदित्य रश्मी उद्धव ठाकरे’ असे सांगतो. आपल्या पूर्ण नावात आईचे नाव नमूद करणारा हा राजकारणातील अपवाद नाही, तर नवा ट्रेंड आहे. राज्य सरकारमधील मंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या कन्या यादेखील स्वत:चा उल्लेख ‘आदिती वरदा सुनील तटकरे’ असा करतात. खरे तर महाराष्ट्र सरकारने किती तरी काळापूर्वीच प्रत्येक विद्यार्थ्याच्या शाळेच्या नोंदणीमध्ये आईचे नाव नमूद करणे बंधनकारक केले आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सचिवालयातील त्यांच्या नावाच्या पाट्या बदलत त्यात स्वत:च्या आईचे नाव ठळकपणे समाविष्ट केले. आज या प्रतीकात्मकतेच्या पलीकडे जात राज्यातील महिलांचा राजकीय मोहिमा आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभाग लक्षणीयरित्या वाढला आहे.
आज सर्व राजकीय पक्षांमध्ये महिला नेतृत्वाचे तीन स्तर तयार झाल्याचे निदर्शनास येते. महिलांच्या राजकीय सहभागाच्या पिरॅमिडच्या शीर्षस्थानी संसदेत पोहोचलेल्या नेत्या आहेत, तसेच अशा नेत्या आहेत ज्यांची त्यांच्या पक्षात प्रचारासाठी खूप मागणी आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने ७ महिला खासदार निवडून दिले आहेत, तर १० महिला उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. या महिला नेत्या त्यांच्या कुटुंबातील पुरुषांच्या राजकारणातील प्रतिनिधी नाहीत, तर स्वत:च्या बळावर त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
उदाहरणार्थ, चंद्रपूरच्या ३८ वर्षीय खासदार प्रतिभा धानोरकर या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने बाळू धानोरकर यांच्या रूपात एकमेव अशी चंद्रपूरची जागा जिंकली होती. बाळू धानोरकर यांच्या दुःखद निधनानंतर, प्रतिभा धानोरकर यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांशी दोन हात करत स्वत:करता २०२४च्या लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळवले, प्रचाराची योजना आखली आणि विद्यमान राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याचा पराभव केला.
सुप्रिया सुळे, रक्षा खडसे, प्रणिती शिंदे यांसारख्या इतर काही महिला नेत्यांनी लोकसभेची जागा जिंकून राष्ट्रीय राजकारणात स्थान कमावले आहे. राज्यसभेतही महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. भाजपच्या मेधा कुलकर्णी असोत, राष्ट्रवादी (शपा)च्या फौजिया खान असोत किंवा शिवसेना (उबाठा)च्या प्रियांका चतुर्वेदी असोत, या राज्यसभेतील खासदार खमक्या आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या राजकारणाची राज्यात व राष्ट्रीय स्तरावर मजबुतीने मांडणी करणाऱ्या आहेत.
भाजपच्या पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या असल्या, तरी आज त्या राज्यातील भाजपच्या प्रमुख प्रचारकांमधील एक आहेत आणि राज्यातील सर्वोच्च राजकीय पदाच्या इच्छुक आहेत. शिवसेना (उबाठा)च्या सुषमा अंधारे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नसली, तरी गेल्या अडीच वर्षांत त्या राज्यभर धडाडीने प्रचार करत आहेत. कट्टर आंबेडकरवादी असलेल्या सुषमा अंधारे या उद्धव टीममध्ये पक्षाच्या एक प्रमुख वक्त्या म्हणून उदयास आल्या आहेत.
मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुक प्रचाराच्या हंगामात सुप्रिया सुळे यांच्या आत्मविश्वासाची आणि जनतेशी संवाद कौशल्याची बरोबरी कोणी करू शकणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात दिवस रात्र घाम गाळत मिळवलेल्या निवडणूक विजयामुळे सुप्रिया सुळे प्रथमच वडिलांच्या सावलीतून बाहेर पडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्या प्रचाराकरता स्वत:च्या मतदारसंघात पुरत्या अडकल्या होत्या. पण आज त्या आपल्या पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व संपूर्ण राज्यभर दमदारपणे करत आहेत. त्यांना नव्याने गवसलेल्या वक्तृत्वशैलीतून त्या आपल्या पक्षाची राजकीय भूमिका स्पष्टपणे मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
स्वत:च्या पूर्वीच्या उणीवा, कधी अति-आत्मविश्वासाचे दिवस तर कधी आत्मविश्वासाच्या कमतरतेचा काळ या सर्वांची प्रांजळ कबुली देत सुप्रिया सुळे छातीठोकपणे दावा करतात की, त्यांचा प्रामाणिकपणा ही त्यांची सर्वांत मोठी ताकद आहे. प्रचारसभांमध्ये त्या कधी सरकारद्वारे स्वत:च्या कामांच्या जाहिराती करण्याच्या खर्चिक पद्धतीवर कायद्याने बंदी आणण्याची गरज बोलून दाखवतात, तर कधी राजकारणाच्या पलीकडे जात ‘अधिक मासा’त जावयाचे पाय धुण्याची प्रथा सोडून देण्याचे आवाहन स्त्रियांना करतात. वडिलांप्रमाणेच सुप्रिया सुळे पारंपरिक मांडणीत आधुनिकतेची सांगड घालतात आणि शिक्षणामुळे अग्रेसर होत असलेल्या मुलींमुळे समाजात घडणाऱ्या बदलांची ग्वाही देतात.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे, पंकजा मुंडे या महिला नेत्या आगामी काळात राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणार आहेत.
महिलांच्या राजकीय सहभागाच्या पिरॅमिडच्या मधल्या स्तरात अशा महिला राजकारण्यांचा समावेश आहे, ज्यांची क्षमता व महत्त्वाकांक्षा अफाट आहे आणि त्या नव्या संधींच्या प्रतीक्षेत आहेत. उदाहरणार्थ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, काँग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर, दीर्घकाळ भाजपच्या प्रवक्त्या असलेल्या आणि आता शिंदे यांच्या शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार शायना एन.सी., विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे अशा महिला नेत्यांनी त्यांचे नेतृत्वगुण सिद्ध केले असले, तरी त्या योग्य संधीच्या प्रतीक्षेत आहेत.
अशा महिला नेत्यांचे राज्यव्यापी अनुयायी नसतील किंवा समाजातील एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याचा त्यांचा दावा नाही. मात्र त्यांनी वर्षानुवर्षांच्या चिकाटीनंतर राज्याच्या राजकारणात आपली जागा निर्माण केली आहे. त्यांच्या जोडीला अशा महिला नेत्या आहेत, ज्या स्थानिक वर्चस्वाच्या लढाईत सतत गुंतलेल्या आहेत. त्या त्यांच्या मतदारसंघातील अनेक नेत्यांपैकी एक आहेत, त्यांनी वर्षानुवर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम केले आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत आणि काही विधानसभेत निवडूनदेखील गेल्या आहेत.
बुलढाणा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा)च्या उमेदवार जयश्री शेळके या पुणे विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर आणि एलएलबी झालेल्या आहेत. २०१०पासून त्या काँग्रेस पक्षात सक्रिय होत्या आणि २०१७मध्ये त्या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. त्या उत्कृष्ट वक्ता असून त्यांनी २०००हून अधिक सार्वजनिक व्याख्याने दिली आहेत. जयश्री शेळके मशाल चिन्हावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात रिंगणात आहेत. भाजपच्या दोन टर्म आमदार विद्या ठाकूर या गोरेगाव मतदारसंघातून हॅट्रिकसाठी निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणूक जिंकण्यापूर्वी त्या अनेक वर्षे नगरसेविका होत्या.
वडाळा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना (उबाठा)च्या श्रद्धा जाधव या सहा वेळा नगरसेविका होत्या आणि काही वर्षे मुंबईच्या महापौरही होत्या. सरपंचपद भूषवलेल्या प्रभावती घोगरे यांना काँग्रेसने शिर्डी मतदारसंघात बलाढ्य साखरसम्राट राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे. श्रीगोंदा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शपा)च्या उमेदवार अनुराधा नागवडे या दोन दशकांपासून सामाजिकदृष्ट्या सक्रिय असून त्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा होत्या. निवडणूक लढवण्यासाठी दीड दशकांच्या प्रतीक्षेनंतर, यंदा त्यांनी काँग्रेसमधून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. तर्कसंगत आणि संतुलित वक्ता असलेल्या अनुराधा नागवडे यांच्या संभाषणात नम्रता, स्पष्टता आणि व्यावहारिकता पदोपदी जाणवते.
सर्व प्रमुख पक्षांनी ज्या महिला उमेदवार उभ्या केल्या आहेत, त्यांच्यापैकी बहुसंख्य या स्थानिक राजकारणात मुरलेल्या आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात घट्ट पाय रोवून आहेत.
हे खरे की, अनेक महिला उमेदवार प्रस्थापित राजकीय घराण्यातील आहेत. काँग्रेसच्या लोकसभा सदस्या वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योतीने लग्नानंतरचे नाव बदलत पुन्हा मूळ नाव कायदेशीररित्या धारण केले आहे. आता त्या धारावीतून ज्योती एकनाथ गायकवाड या नावाने निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे लोकप्रिय नेते एकनाथ गायकवाड यांची मुलगी असल्याचे मतदारांना अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हे केले असावे, हे स्पष्ट आहे. पारनेर आणि आर्वी मतदारसंघात अनुक्रमे राणी लंके आणि मयुरा काळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. राणीचे पती, नीलेश लंके आणि मयुरा यांचे पती अमर काळे यांनी २०२४ची लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोगेश्वरी पूर्वमधून लोकसभा सदस्य रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या पतीने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. या उमेदवारांना पक्षातील नेत्याची पत्नी म्हणून पक्षाची तिकिटे मिळाली, परंतु त्यांना त्यांच्या पतींनी भरीस पाडले आहे, असे म्हणता येणार नाही. त्या देखील राजकारणात सक्रिय होण्याकरिता उत्सुक होत्या आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याची त्यांची जिद्द आहे.
चंदगडमधील राष्ट्रवादी (शपा)च्या उमेदवार नंदा कुपेकर या वैद्यकीय डॉक्टर (एमडी) आहेत आणि त्या फेलोशिपवर लंडनमध्ये होत्या. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या त्या कन्या आहेत. आपल्या कुटुंबाचा राजकीय बालेकिल्ला साबूत राखण्याच्या इर्ष्येने त्या मैदानात उतरल्या आहेत.
सना मलिक या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. त्यांचे वडील नवाब मलिक यांचा बालेकिल्ला असलेल्या अणुशक्ती नगर येथून त्या निवडणूक लढवत आहेत. जेव्हा नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती आणि ते दीड वर्ष तुरुंगात होते, तेव्हा सनाने कुटुंब आणि मतदारसंघ धैर्याने हाताळले. यापूर्वी सना यांनी २०१७मध्ये महापालिका निवडणूक लढवली होती. जर त्या जिंकल्याचा तर बहुदा महाराष्ट्राच्या विधान मंडळाच्या कनिष्ठ सभागृहात निवडून आलेल्या पहिल्या मुस्लीम महिला आमदार असतील. त्यांच्या विरोधकांचा मुख्य प्रचार चेहरादेखील एक महिला आहे.
स्वरा भास्कर या अभिनेत्रीचा पती फहाद हा राष्ट्रवादी (शपा)च्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि स्वराने त्याच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
प्रस्थापित राजकीय कुटुंबातील असल्यामुळे सर्व महिला नेत्यांसाठी राजकारणात स्थान निर्माण करणे सोपे होत नाही. २०१७मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या भाग्यश्री आत्राम या अहेरी मतदारसंघात तिचे वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शपा)ची उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. आमदार म्हणून चौथ्या कार्यकाळात धर्मरावबाबांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या तंबूत सहभागी होत एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे.
रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी वडील एकनाथ खडसे यांच्यासोबत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला नाही. शरद पवार यांच्या पक्षाच्या महिला विभागाच्या प्रमुख म्हणून त्या कायम होत्या. आता त्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शपा)च्या उमेदवार आहेत. त्यांचे वडील राष्ट्रवादी (शपा)मध्ये परतले असले, तरी त्यांची वहिनी आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे त्यांच्या विरोधात भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करत आहेत.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
राजकीय आकांक्षा व कौटुंबिक कलह यांची सरमिसळ झालेली भाग्यश्री व रोहिणी यांची उदाहरणे अपवाद नाहीत. कन्नड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्याची कन्या संजना जाधव आपल्या विभक्त पतीविरुद्ध मैदानात उतरली आहे, तर शिवसेना (उबाठा)च्या वैशाली सूर्यवंशी या पाचोरा मतदारसंघात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेचा दोन टर्म आमदार असलेल्या त्यांच्या चुलत भावाविरुद्ध लढत आहे.
माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर या काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांनी भाजप महायुतीच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूकदेखील लढवली होती, पण शिवसेना (उबाठा) पुढे त्यांचा टिकाव लागला नव्हता. आता त्यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे लोकप्रिय नेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्या चिरंजीवाच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
महिला नेतृत्वाचा तिसरा स्तर, म्हणजे जो पिरॅमिडचा तळ आहे, तिथे महाराष्ट्राच्या राजकारणातील रणरागिणींची कहाणी घडते आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची कन्या पूर्वा ही आंबेगाव मतदारसंघात त्यांच्या प्रचाराचे नेतृत्व करत आहेत. अमेरिकेत शिक्षण घेऊन परतलेली पूर्वा ही उदारमतवादी मूल्यांची कट्टर समर्थक आहे, मात्र सध्या तिचे प्राधान्य वडिलांचा विजय सुनिश्चित करणे आहे.
दिलीप वळसे-पाटील हे शरद पवारांचे राजकीय मानसपुत्रच होते. त्यांनी अजित पवारांची तळी उचलण्यावर शरद पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मतदारसंघातील शरद पवार समर्थकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न पूर्वा कसोशीने करते आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात राज्यात पक्षाच्या कामात व्यस्त असल्याने त्यांची कन्या जयश्री थोरात ही वडिलांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. अगदी अलीकडेपर्यंत ती मुंबईत वैद्यकीय प्रॅक्टिस करत होती, पण आता ती स्थानिक राजकारणात उतरली आहे. साहजिकच, आजोबा व वडिलांच्या कार्याचा वारसा आपल्या खांद्यावर घेण्याचा तिचा मानस आहे.
अवघ्या २२ वर्षांची आर्या बासरे ही कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात प्रचंड मेहनत घेत आहे. तिचे तातडीचे ध्येय तिचे वडील सचिन बासरे यांना विजय मिळवून देणे हे आहे. सचिन बासरे या मतदारसंघातील शिवसेना (उबाठा)चे उमेदवार आहेत. पूर्वा आणि जयश्री प्रमाणे, भविष्यात निवडून आलेली नेता बनण्याची आर्याची आकांक्षा आहे. पदवीचे शिक्षण घेत असतांना महाविद्यालयात ती स्टुडंट्स युनियनमध्ये सक्रिय होती, तर पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्याने पुण्यातील राजकीय नेतृत्वाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम जाणूनबुजून निवडला. आर्याप्रमाणेच राजकारणात विचारपूर्वक गुंतवणूक करणाऱ्या तरुणींची संख्या राज्यात वाढते आहे.
२६ वर्षीय सिद्धी कदमच्या वाटेला आलेली राष्ट्रवादी (शपा)ची मोहोळ मतदारसंघातील उमेदवारी त्या पक्षातील नेत्यांच्या विरोधाने बदलली असली, तरी सिद्धी ‘लंबी रेस की घोडी’ असल्याचे २०१९च्या विधानसभा निवडणूक प्रचारातच स्पष्ट झाले होते. राजेंद्र शिंगणे ऐनवेळी शरद पवारांच्या तंबूत परतल्याने त्यांची पुतणी गायत्री शिंगणे हिने दीड वर्ष स्वत:च्या उमेदवारीसाठी मतदारसंघात घेतलेले कष्ट झाकोळले गेले असले, तरी भविष्यात गायत्रीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरत आपण नुसत्या सतरंज्या उचलण्यासाठी राजकारणात नाही, हे दाखवून दिले आहे.
राज्यातील सर्वच पक्षांमध्ये नेतृत्वस्थान मिळविण्याकरता गायत्री, सिद्धी, आर्या, जयश्री व पूर्वासारख्या तरुणी दीर्घकाळाच्या राजकारणाची तयारी करत आहेत. अशा तरुण महिला नेतृत्वाचा महाराष्ट्राच्या राजकारणातील अवकाश विस्तारत जाणार आहे. या महिला नेत्या सुशिक्षित आहेत, आत्मविश्वासू आहेत, मेहनती आहेत. कुशल वक्त्या आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे मुळातच महत्त्वाकांक्षी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात महिला नेतृत्व आपला ठसा उमटवत आहे, पण ‘संख्येच्या भाषे’त जगाला हे वास्तव कळण्यास अद्याप थोडा अवधी आहे.
.................................................................................................................................................................
लेखक परिमल माया सुधाकर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.
parimalmayasudhakar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment