पांडुरंग सदाशिव खानखोजे नावाचा माझा ‘माथेफिरू’ बाप!
दिवाळी २०२४ - लेख
सावित्री साव्हनी
  • पांडुरंग सदाशिव खानखोजे (जन्म : ७ नोव्हेंबर १८८६, मृत्यु : २२ जानेवारी १९६७)
  • Sun , 10 November 2024
  • दिवाळी २०२४ लेख पांडुरंग सदाशिव खानखोजे Pandurang Sadashiv Khankhoje

पांडुरंग सदाशिव खानखोजे (जन्म : ७ नोव्हेंबर १८८६, मृत्यु : २२ जानेवारी १९६७) हे एक भारतीय क्रांतिकारी, विद्वान, कृषीवैज्ञानिक आणि राजकीय नेते होते. ‘गदर आंदोलन’ ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेली पहिली सशस्त्र क्रांतिकारी चळवळ मानली जाते. खानखोजे या आंदोलनाच्या संस्थापकांपैकी एक. सावित्री साव्हनी ही खानखोजे यांची मुलगी. २००८ साली त्यांनी ‘I Shall Never Ask for Pardon’ हे वडिलांच्या आठवणीविषयी लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाले. २००९ साली त्यांनी ‘My Father the Fanatic’ हा लेख लिहिला. त्याचा हा मराठी अनुवाद केला आहे, लेखक-कलासमीक्षक रमेशचंद्र पाटकर यांनी….

.................................................................................................................................................................

एका माणसाने भारताला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, जागतिक भूमिगत चळवळीत भाग घेतला, पण तो अयशस्वी ठरला.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अनेकांगी आहे. काही जणांच्या मते ती अहिंसक आहे. ही चळवळ महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतभर पसरली… तर काहींच्या मते ही चळवळ १८५७पासून सुरू झाली. त्यानंतर सुरू झालेली महत्त्वाची चळवळ म्हणजे ‘गदर आंदोलन’. ही पहिली सशस्त्र चळवळ पहिल्या महायुद्धाच्या वेळी परदेशात सुरू झाली. त्यात शीख, माजी सैनिक आणि विद्यार्थ्यांच्या पुढाऱ्यांचा समावेश होता. माझे वडील पांडुरंग सदाशिव खानखोजे हे त्यापैकी एक होते.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी देशात बरीच खळबळ माजली होती. बुद्धिजीवी वर्ग अशांत होता. लोकमान्य टिळक हे या कालखंडाचे मुख्य व महत्त्वाचे पुढारी होते. त्यांनी ‘स्वराज्य’ व ‘स्वदेशा’साठी दिलेल्या हाकेला बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एक म्हणजे माझे वडील.

वडिलांना १८५७च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धापासून प्रेरणा मिळाली. तात्याजी उर्फ व्यंकटेश खानखोजे हे त्यांचे आजोबा. ते तात्या टोपे यांच्यासह १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात सामील झाले होते. लहानपणापासूनच वडील दृढनिश्चयी व बंडखोर वृत्तीचे होते. भारताला स्वतंत्र करण्याची त्यांनी शपथ घेतली होती. शाळेत असताना त्याची एक गुप्त मंडळ स्थापन करून आपल्या शहरात स्वातंत्र्याचा संदेश पोहोचवला. बंगालमधील ‘अनुशीलन’ या गुप्त मंडळाशी त्यांनी संधान साधले होते.

वडिलांचा जन्म १८८६ साली वर्ध्यामध्ये झाला. १९०६ सालच्या सुमारास तथाकथित ‘देशद्रोही’ म्हणून स्थानिक पोलिसांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. वडील लोकमान्य टिळकांना भेटण्यासाठी पुण्याला गेले आणि त्यांच्याबरोबर काम करू लागले. टिळकांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना रशियाच्या नौसेनेवर जपानी नौसेनेने विजय मिळाल्याची बातमी त्यांना कळली. मग ते लष्करी विद्येचे ज्ञान मिळवण्यासाठी जपानला गेले. तिथे त्यांनी लष्करी शिक्षण घेतले आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र लढ्याचा मार्ग निवडला.

जपानमध्ये वडिलांची भेट डॉ. सन यत सेन (Dr. Sun Yat Sen) या जपानी क्रांतिकारकाशी  आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी झाली. त्यांच्याकडून वडिलांनी शस्त्रे कशी हाताळावीत आणि युद्धाचे डावपेच कसे आखायचे, याचे शिक्षण घेतले. जपानचे पंतप्रधान मार्क्वेझ ओकुया शिगेनोबू (Ōkuma Okuma Shigenobu) यांची भेट घेतल्यावर वडिलांनी आपल्या साथीदारांसह ‘भारतीय स्वातंत्र्य लीग’ची स्थापना केली. नंतर रासबिहारी बोस यांनी या लीगमध्ये नवा जोश निर्माण केला, पण वडिलांना नाईलाजाने जपान सोडून अमेरिकेस जावे लागले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अमेरिकेत वडिलांनी काही काळ हमालीचं काम केलं. तिथं त्यांची तारकानाथ दास, खगेन दास आणि सुरेन बोस यांच्यासारख्या समविचारी मंडळींची गाठ पडली. अमेरिकेत त्यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य लीग’ची शाखा सुरू केली. वडील कॅलिफोर्नियात सॅन रॅफॅएलमधील माउंट टॅमॅलपैस लष्करी अकादमीत जाऊ लागले. या संस्थेत त्यांनी लष्करी पदविका संपादन केली. दरम्यानच्या काळात सोहन सिंग बाखना, पंडित काशीराम आणि इतर शीख स्वातंत्र्य लढवय्यांनी एक चळवळ सुरू केली होती. त्यांनी तिचे नाव ‘आझाद-ए-हिंद’ ठेवले. ही चळवळ जोरात होती. लाला हरदास या चळवळीचे सूत्रधार झाले. पुढे ही चळवळ ‘गदर चळवळ’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

ऐतिहासिकदृष्टा फारशी माहीत नसलेली बाब म्हणजे माझ्या वडिलांनी ‘गदर चळवळी’च्या गुप्त लष्करी शाखेचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. चळवळीत कमालीची गुप्तता राखणे, हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. १९१०च्या दरम्यान ‘मेक्सिकन क्रांती’ सुरू झाली. या क्रांतीने वडिलांना सशस्त्र क्रांतीकडे पाहण्याची दृष्टी दिली. आपल्या चळवळीत सामील होणाऱ्या प्रत्येकाला योग्य प्रकारे लष्करी शिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या माजी शीख सभासदांची मदत घेतली. शस्त्रे व दारूगोळे यांचा बंडखोरांना वेळोवेळी पुरवठा करण्यासाठी लाला हरदयाळ यांनी जर्मन वकिलातीतील एका अधिकाऱ्याला आपल्या हाताशी धरले होते. जर्मनीकडून होणारी मदत ही गोष्ट ब्रिटनचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी होती, कारण ब्रिटनला कमकुवत करणे, हे मुख्य ध्येय होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी या डावपेचांचा प्रत्यय आला.

कालांतराने हरदयाळ यांना अटक झाली, पण जामीन मिळताच ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना न सांगता स्वित्झर्लंडला गेले. दरम्यान महायुद्धाला तोंड फुटले, तेव्हा बरेच शीख क्रांतिकारक स्वातंत्र्यलढ्याला मदत करण्यासाठी भारतात परतले. पंडित काशीराम, सोहन सिंग बाखना, खानखोजे, विष्णू गणेश पिंगळे आणि पक्षाच्या इतर पुढाऱ्यांनी एक योजना आखली. वडिलांच्या शब्दांत सांगायचे तर ‘…यादवी युद्ध सुरू करणे. कर न भरणे इ. गोष्टींना चालना द्यायची. ब्रिटनला आर्थिकदृष्ट्या दुबळे बनवणे. संप पुकारणे, पूल उदध्वस्त करणे, लष्करी ठाणी नष्ट करणे इ. कारवाया त्यांसाठी करायच्या’.

भारताच्या दिशेने प्रवास करत असताना वडिलांना त्यांचे मित्र व देशभक्त आगाशे यांच्याकडून समजले की, युरोपमध्ये भारतीय आणि जर्मन यांची भेट होणार आहे. त्यांनी आपला पूर्वीचा ठरवलेला बेत बदलला आणि ते आगाशे व बिशन दास कोचर यांच्याबरोबर कॉन्स्टॅटिनोपॉलला नियोजित बैठक जाण्याचे ठरवले. तिथे ते विल्हेन वॅसमस (Wilhelm Wassnus) यांच्या मोहिमेत सामील झाले. वॅसमस हे रगेल आणि रंगेल वृत्तीचे होते. त्यांना बऱ्याच वेळा ‘जर्मन लॉरेन्स ऑफ अरेबिया’ म्हटले जायचे. ही सर्व मंडळी शिराझ नगराकडे रवाना झाली. तिथे क्रांतिकारक सूफी अम्बा प्रसाद यांच्या क्रांतिकार्यात सामील झाली.

अशा प्रकारे वडिलांची अफगाणिस्तान आणि इराण मोहीम सुरू झाली. बलुचिस्तानमधून भारतात आपले क्रांतिकारी लष्कर नेण्याचे वडिलांचे स्वप्न होते. या मोहिमेत आगाशे व प्रमथनाथ दत्त हे त्यांचे साथीदार होते. त्यांच्या या छोट्या लष्करात भारतीय युद्धकैदी (हरदयाळ यांनी ही भरती केली होती), भारतीय शिपाई, गदर क्रांतिकारक आणि रानटी टोळ्या यांचा समावेश होता. ब्रिगेडियर जनरल सर पर्सी स्कायज यांच्या सैन्याविरुद्ध वडिलांना लढावे लागले. दादाभाई केरसॅस्प हे नंतर वडिलांना येऊन मिळाले, पण ब्रिटिश तोफदलाने त्यांना ठार मारले. वडील जखमी झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, पण नंतर ते शिताफीने पळाले.

जर्मन कॉन्सल Zugmayer यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खानखोजे हे खरे देशभक्त आहेत आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणही देतील. वडिलांनी ब्रिटिशांविरुद्ध लहानसहान लढाया दिल्या. पण त्यांना भारतात प्रवेश करणे शक्य नव्हते, कारण त्यांचे लष्कर विस्कळीत झाले होते. ब्रिटिश जनरल सायकेस (Sykes) यांनी आपल्या दैनंदिनीत लिहिले आहे की, आमचे सैन्य भारताच्या दिशेने चालले होते आणि आमचा पराजय होणार होता. ब्रिटिशांची अब्रू धुळीला मिळणार होती. म्हणून जनरलने युद्ध संपेपर्यंत कॅशभाई टोळ्यांच्या आश्रय घेतला.

गदर चळवळ अयशस्वी झाली, त्यामागे अनेक कारणे होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी दळणवळण आणि व्यवस्था यातील अडथळे ही दोन महत्त्वाची कारणे होती. निरनिराळ्या ठिकाणी शस्त्रे घेऊन जाणारी जहाजे होती. उदा. मेक्सिकोतील सोक्कोरो बेटे, बॅटॅव्हिया. एम.एन. रॉय हे इंडोनेशियात शस्त्रास्त्रे घेऊन येणाऱ्या जहाजाची वाट पाहत होते. पण बराच वेळ त्याची वाट पाहिल्यावर रॉय यांनी इंडोनेशियाचा निरोप घेतला. पाण्यात नांगर टाकून असणाऱ्या जहाजांची तपासणी ब्रिटिश गुप्त विभाग करत असे.

ब्रिटिशांच्या गुप्त विभागाने बऱ्याच क्रांतिकारकांना पकडले आणि फाशी दिले. जर्मनी सुसूत्रता आणण्याच्या कार्यात मदत करील अशी अपेक्षा बाळगली होती. युद्धाच्या वेळी अमेरिकेत बऱ्याच गदर क्रांतिकारकांना अटक केली होती.

स्वतंत्र भारताचे पहिले सरकार (तात्पुरते) राजा महेन्द्र प्रताप, बरकतुल्ला, सी. पिल्लई आणि इतर गदर कार्यकर्त्यांनी अफगाणिस्तानात स्थापन केले होते. देशात परतणारे शीख क्रांतिकारक आणि इतर क्रांतिकारक पर्शियात ब्रिटिश सैन्याशी लढत असल्याच्या बातम्यांनी ब्रिटिश शासक सैरभैर झाले. पहिले महायुद्ध संपल्यावर वडील बर्लिनमध्ये असलेल्या विरेन्द्रनाथ चटोपाध्याय यांना भेटले. भूपेन्द्रनाथ दत्त, लुहानी, विरेन्द्रनाथ चटोपाध्याय आणि वडील रशियाच्या व्हॉल्दिमीर लेनिन यांना भेटले, आणि त्यांना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला मान्यता देण्याची विनंती केली.

प्रत्येक वेळी अपयशाचा आलेला अनुभव बरोबर घेऊन रिकाम्या हातांनी वडील जर्मनीला परतले. हव्या असलेल्या क्रांतिकारकांची यादी ब्रिटिशांकडे होती. त्यात वडिलांचे नाव होते. अशा क्रांतिकारकांना अंदमानला पाठवले जाई. आपला पाठलाग करणारा ब्रिटिशांचा गुप्त विभाग आपल्यावर केव्हाही झडप घालेल, म्हणून वडिलांनी मेक्सिकोमध्ये आश्रय घेतला.

भारतात न परतता वडील मेक्सिकोत राहून गरीब शेतकऱ्यांना मदत करू लागले. तिथे त्यांना ‘शेतकीतज्ज्ञ’ असा लौकिक मिळाला. त्यांनी केलेल्या अपूर्व कार्याची आठवण मेक्सिकोच्या शेतकऱ्यांच्या मनात आजही आहे. गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वडिलांनी शाळा सुरू केल्या. भारत व मेक्सिको या दोन देशांत वकिली संबंध निर्माण केले.

स्वातंत्र्यानंतर १९५१ साली वडील भारतात परतले, नागपूरला स्थायिक झाले. मध्य प्रदेशच्या सरकारने त्यांना आमंत्रण देऊन ‘शेतकी धोरण’ आखण्याची विनंती केली. १९६७ साली त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याबद्दल वडिलांनी कोणत्याही पारितोषिकाची अपेक्षा बाळगली नव्हती. ‘स्वतंत्र भारत’ हेच त्यांना मिळालेले पारितोषिक होते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Vivek Date

Wed , 13 November 2024

Dr Pandurang Khankhoje: The IronicRevolutionary The Indian freedom struggle was fought not only on home ground but also on theinternational stage. It was a canvas that allowed Indian revolutionaries to fight the goodfight overseas in their mission to mount an armed struggle against the British in India. This is the story of an Indian revolutionary who in the early 20th century, travelled acrossEurope, America, the erstwhile Soviet Union, Japan and China to become part of an AUTHOR Yash Mishra PUBLISHED 05 February 2020


Vivek Date

Wed , 13 November 2024

South Asian Migration in Global History by Nielesh Bose is available online and it greatfully mentions your inputs for this book.


Vivek Date

Wed , 13 November 2024

Angel Island near San Francisco was an entry point for Sikhs in Gadar Movement and many settled in california, I have visited it and seen a plaque that recognizes the role of the sikhs https://www.aiisf.org/aiisf-history


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख