अजूनकाही
लेखक, पत्रकार, प्राध्यापक, समीक्षक, संपादक, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता-अभ्यासक, संगीतसमीक्षक आणि ट्रेकर श्री. विनय हर्डीकर यांनी २४ जून २०२४ रोजी अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने पुण्यात २३ जून रोजी ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तर २४ जून रोजी हर्डीकरांच्या ‘एक्सप्रेस पुराण : माझी शोध पत्रकारिता’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे व ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी हर्डीकरांची मुलाखत घेतली आहे. या निमित्ताने हर्डीकरांविषयीचा हा एक लेख...
.................................................................................................................................................................
विनयने २४ जून २०२४ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्तानं त्याच्या मित्रपरिवारानं पुण्यात त्याच्या कारकिर्दीला व कर्तृत्वाला साजेसा हृद्य सोहळा आयोजित केला. त्यामध्ये त्याची प्रकट मुलाखत घेतली. त्याचा मला मनापासून आनंद झाला.
विनयचा चतुरस्त्र मित्रपरिवार चौफेर आहे, हे काही वेगळं सांगायला नको. साधारणपणे १९७०-७२नंतर विनयने मुलुंड, मुंबई येथील मुक्काम सोडला आणि तो पुण्याचा रहिवासी झाला. त्यानंतर कार्यक्षेत्र विशेषकरून पुण्यातच असल्यामुळे पुण्यात त्याचा मित्रपरिवार आपसूकच अधिक आहे. अर्थात इतरत्र सर्व दूर आहेच, हे वेगळं सांगायला नको.
विनयच्या या मित्रपरिवारात मला ओळखणारे फारच कमी असतील, पण मुलुंडमध्ये असताना १९६४-७२च्या दरम्यान विनय आणि मी खूपच जवळचे मित्र म्हणून एकमेकांच्या सतत सानिध्यात होतो. नंतर वारंवार भेटणं कमी होत गेलं, मात्र संपर्क चालू राहिला. विनय आजही माझा खूप जवळचा आणि जिवलग मित्र आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
विनय, खरंच एक अजब रसायन आहे. काय म्हणू, वल्ली, अवलिया, बंडखोर, परखड, उनाड, नाही सुचत. एक मात्र नक्की, वयाच्या सुमारे चौदाव्या वर्षी भेटला तेव्हापासून आजतागायत होता तसाच आहे- स्पष्ट, परखड, बेफिकीर, स्वच्छंदी इ.
त्याच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने माझ्यासारखेच, मात्र अधिक प्रगल्भ, त्याचे दोन परममित्र, ‘राजहंस’चे शिरीष सहस्त्रबुद्धे आणि हेरंब कुलकर्णी यांनी त्याच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत वाचनात आले. हेरंब कुलकर्णी फारच धाडसी वाटले. त्यांनी विनयसारख्या माणसाला उघडपणे, भले प्रेमानं का होईना, ‘उद्धट’ म्हणण्याचं धाडस केलं, ‘विनय’ हे नाव कसं साजेसं नाही, हे उघडपणे मांडलेलं. बापरे!, मला हे कधीही शक्य होणार नाही, कारण त्यावर विनयची प्रतिक्रिया काय असू शकते, याचा मला अंदाज आहे. उगाच हात दाखवून अवलक्षण नको!
गमतीचा भाग सोडून देवूया, मात्र हेरंब कुलकर्णी यांनी त्यांच्या मनोगतामध्ये विनयविषयी असलेला आदरभाव, विनयला गुरुस्थानी मानून व्यक्त केलेलं मत मला फारच भावलं. शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी विनयविषयी केलेलं अतिशय तौलनिक आणि अचूक विश्लेषणसुद्धा खूप आवडलं.
विनय अंदाजे १४ वर्षांचा आणि मी अंदाजे १६ वर्षांचा असताना १९६४मध्ये मुलुंडमध्ये नवीनच सुरू झालेल्या न.ग. पुरंदरे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी म्हणून आमची पहिली ओळख व गाठभेट झाली. खूपच कमी दिवसांमध्ये आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि मैत्री जमली. ती पुढे दृढ होत गेली. साधारणपणे १९६४ ते १९७२ या कालावधीमध्ये विनय मुलुंडमध्ये असताना आमची बऱ्याचदा त्याच्या राहत्या घरी रोज गाठभेट असायची. साहजिकच त्यानिमित्तानं त्याच्या आईचा सहवास लाभायचा आणि बऱ्याचदा त्यांच्या हातच्या सुग्रास जेवणाचा लाभ व्हायचा. त्या अतिशय स्पष्टवक्त्या, निर्भीड व परखड होत्या. अजिबात भिडस्तपणा नाही, मात्र त्यातून कोणालाही दुखावणं किंवा कमी लेखणं कधीच नसायचं. विनयमध्ये नेमके हेच गुण रुजले आहेत. माझ्या मते विनयचा स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा, परखडपणा ही त्याच्या आईची देण आहे.
विनयला असलेली वाङ्मयाची आणि मराठी-इंग्रजी साहित्य वाचनाची गोडी आणि त्याच्या नादानं मलाही असलेली तशीच गोडी, हा आमच्या मैत्रीतील दुवा होता. त्या वयामध्ये विनयने इंग्रजीमधील प्रथितयश साहित्यिक, लेखक, नाटककार शेक्सपीअर, अॅगाथा ख्रिस्ती, मारिओ पुत्झो आणि, तसेच मराठी साहित्यिक, लेखक, नाटककार, कादंबरीकार ह. ना. आपटे, वि.स. खांडेकर, बा. भ. बोरकर, ना. सी. फडके, कुसुमाग्रज, शिवाजी पाटील, प्र. के. अत्रे, पु.ल. देशपांडे आणि त्याही पुढे जाऊन मधु मंगेश कर्णीक आणि विशेषकरून बा. सी. मर्ढेकर... किती नावे घेऊ, यांच्या साहित्याचे केवळ वाचन नव्हे, तर चौकस बुद्धीने रसग्रहण आणि मार्मिक अवलोकन केले. त्याबाबत शाळेमध्ये तसेच पुढे महाविद्यालयांत होणाऱ्या वाद-परिसंवादामध्ये भाग घेऊन अर्थपूर्वक, परखड विवेचन केलं. हे सर्व अजब होतं.
विनय शालेय शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमाच्या निमित्तानं जे निबंध, लघुलेखन, दीर्घलेखन, कविता रसग्रहण इ. करायचा, ते शंभर नंबरी असायचे. त्यामुळे त्याला दहापैकी दहा गुण मिळायचे. विनयच्या इंग्रजी व मराठी अक्षराची एक वेगळीच शैली होती. शिक्षक, शिक्षिका वर्गामध्ये त्याचं सामूहिक वाचन करायचे. एवढंच नव्हे, तर शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विनयने एकापेक्षा एक दमदार कविता, वात्रटीका, कथा, लेख इ. लेखन केले. आम्ही त्याचं बऱ्याचदा सामूहिक वाचन करत असू. विद्यार्थिदशेमध्ये त्याच्या प्रेरणेनं मीसुद्धा माझ्या कुवतीप्रमाणे काही अंशी वाचन व अवलोकन करत होतो, कधीतरी थोडंफार लिहायचा प्रयत्नसुद्धा करत होतो.
या वाटचालीमध्ये बऱ्याचदा विनयबरोबर वाद-संवादसुद्धा केला. या आठवणी आज नमूद करताना थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं, कारण विनय आज या क्षेत्रामध्ये एक प्रसिद्ध व सिद्धहस्त लेखक, पत्रकार, विवेचक आहे. त्याने खूप मोठी भरारी घेतली आहे, प्रसिद्धी मिळवली आहे. मी मात्र वेगळ्या क्षेत्राकडे वळलो. त्यामुळे लेखन मागे पडलं. मात्र तरीही या आठवणी सुखद व समाधान देणाऱ्या आहेत.
त्या वेळी माध्यमिक शिक्षण अकरावीपर्यंत होते आणि अकरावीची परीक्षा महाराष्ट्रातील क्षेत्रीय बोर्डाची असायची. न.ग. पुरंदरे माध्यमिक विद्यालयाची पहिली अकरावीची बॅच १९६३ला पासआऊट झाली. तिथपासून पुढील बॅचेस पासआऊट होत गेल्या. प्रत्येक पासआऊट होणारी बॅच प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याच्या नावानं ओळखली जायची. त्याप्रमाणे १९६३ची पहिली बॅच अरविंद तेरेदेसाईच्या नावानं, १९६४ची बॅच प्रकाश मुळेच्या नावानं, १९६५ची बॅच विनयच्या नावानं, १९६६ची बॅच सुधीर मुळे, मी स्वत:, भालचंद्र थोरात यांच्या नावानं ओळखली जायची.
अर्थातच विनय शाळेमध्ये फक्त प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होता असं नव्हे, तर त्या वेळेपासून तो एक फर्डा वक्ता, लेखक, वाङ्मयामध्ये रुची असलेला विद्यार्थी होता. त्या वेळी लायन्स क्लब, रोटरी क्लब यांसारख्या सामाजिक संस्था वेगवेगळया क्षेत्रांमध्ये खूपच सक्रिय होत्या. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा असे उपक्रम समाविष्ट असायचे. अशा वक्तृत्व स्पर्धांमध्ये आमच्या शाळेतर्फे विनयचा सहभाग असायचा आणि शाळेला ट्रॉफी मिळायची!
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
खरं म्हणाल तर विनयशी स्पर्धा करू शकतील अथवा त्याच्याशी तुलना होऊ शकेल, असे आमच्या शाळेमध्ये किंवा मुलुंडमधील इतर शाळांमध्ये कोणीही विद्यार्थी नव्हते. मला वाटतं की, विनयच्या वक्तृत्व कलेवर काही अंशी प्र. के. अत्रे आणि मोठ्या प्रमाणात पु. ल. देशपांडे यांचा प्रभाव झाला असावा, कारण त्याची वक्तृत्व शैली या दोन्ही मात्तबर व्यक्तींच्या शैलांचं संमिश्रण आहे.
त्यामधूनच आजचा विनय एक प्रभावी वक्ता, लेखक, साहित्यकार, पत्रकार तयार झाला आहे. ज्ञानप्रबोधिनी, बालभारती, लोकसत्ता व इंडियन एक्सप्रेस, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठ या संस्थांमधील विनयचा वावर आणि त्याने केलेलं काम याविषयी मी काही लिहायला पाहिजे असं नाही, ते सर्वश्रुत आहे.
विनयच्या या जडणघडणीमध्ये त्याच्या आईबरोबर आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. ह. पु. पायगावकर सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती बर्डेबाई, श्री. काकतकर सर, श्री. देशमुख सर, श्रीमती मीना देशपांडेबाई, श्रीमती इंदुमती महाजनबाई, श्रीमती एकलहरेबाई, श्री. देशपांडे सर इ. यांचा फार मोलाचा वाटा आहे. ही शाळा म्हणजे आमचं दुसरं घरच होतं आणि शिक्षक, शिक्षिका म्हणजे आमचे माता-पिता होते. त्यांच्या घरीदारी जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांचा मुक्त वावर असायचा.
विनय, मी आणि आमचे आणखी काही मित्र शाळा सुटल्यावर संध्याकाळी आठवड्यातून जवळजवळ दोन-तीन दिवस आणि सुट्टीच्या दिवशी हमखास आमचे शिक्षक आणि शिक्षिका यांच्या घरी मार्गदर्शन तसंच वादविवाद, चर्चा करण्याकरता निर्धास्तपणे जात असू. विनयच्या बाबतीत विशेषकरून साहित्य, वाङमय, वक्तृत्व इ. वरील चर्चा, वादविवाद समाविष्ट असायचे. त्यामुळे तो आमचे शिक्षक, शिक्षिका यांचा विशेष लाडका होता.
शाळेच्या मधल्या सुट्टीत विनयची हजेरी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ह. पु. पायगावकर सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती बर्डे बाई यांच्या केबिनमध्ये असायची. त्यामध्ये विशेषकरून अभ्यासक्रम सोडून अवांतर गोष्टींबाबत ऊहापोह व चर्चा यांचा समावेश असायचा. विनयकडे त्याकरता वाचन, साहित्य, वाङ्मय, पत्रकारिता, समाजव्यवस्था इ. अनेक विषय असायचे.
विनय, मी आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजीमधील प्रावीण्य याचं श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री. ह. पु. पायगावकर सर यांना जातं. कारण त्यांनी त्याच वेळी आमच्याकडून तर्खडकर आणि रेन अँड मार्टीन या व्याकरणाच्या पुस्तकांचे पारायणं करून घेतली होती, तसंच मराठीमधील प्रावीण्याचे श्रेय शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती बर्डे बाई यांना आहे. आणि संस्कृत भाषेतील प्रावीण्य ही श्रीमती मीना देशपांडे बाई यांची देण आहे.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
शालेय शिक्षण चालू असताना विनय जसा साहित्य, वाङमय, वक्तृत्व इ. क्षेत्रामध्ये चमकत होता, तसाच तो विज्ञान, गणित या विषयांमध्येसुद्धा पारंगत होता. त्याबाबतीत तो श्री. देशमुख सर यांचा फारच लाडका व प्रिय विद्यार्थी होता.
अनिल भालेराव, दिलीप कवडीकर, लक्ष्मण पाष्टे, देवकांत म्हात्रे, पद्माकर महाले असे विनयचे माझ्यासारखेच अतिशय जवळचे शालेय मित्र होते. आम्ही विनयच्या वरील सर्व गोष्टींमधील प्रावीण्याचे साक्षीदार आहोत.
अनिल भालेराव चित्र रेखाटन करणारा, तर इतर मित्र क्रीडा क्षेत्रामध्ये पारंगत होते. म्हणूनच विनय व मी त्यांचे जवळचे मित्र होतो. दिलीप कवडीकर हा प्रथम क्रमांकाचा सायकलपटू होता, तर लक्ष्मण पाष्टे आमचा क्रिकेटमधील नामांकित अष्टपैलू कपील देव किंवा सुनील गावसकर होता, देवकांत उत्तम कबड्डीपटू, पद्माकर महाले उत्तम धावपटू होता.
न.ग. पुरंदरे माध्यमिक विद्यालयाशी शैक्षणिक व इतर क्षेत्रामध्ये स्पर्धा करणाऱ्या मुलुंड माध्यमिक विद्यालय, मोतीपछान गुजराती विद्यालय, रतनबाई शाळा इ. शाळा होत्या आणि लायन्स क्लब, रोटरी क्लब यांसारख्या सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये आमचे क्रीडा क्षेत्रातील वरील मित्र नेहमीच विजयी होऊन शाळेचं नाव उज्ज्वल करत असायचे. त्याचं विनयला फार अप्रूप होतं.
विनय स्वत:सुद्धा क्रिकेटमध्ये एक उत्तम खेळाडू होता. तो पहिल्यापासून खोडकर, खट्याळ, खिल्लीबहाद्दर होता. त्याचे तो आम्ही मित्र, शिक्षक, शिक्षिका, सर्वांवर प्रयोग करत असायचा आणि पुढेही तो तसाच घडत गेला. विनयच्या लेखन व पत्रकारितेतील प्रावीण्याचा प्रभाव पुढे आमचे मित्र मिलिंद कोकजे, माधव शिरवळकर यांच्यावर नक्कीच पडला. त्यांनी त्या क्षेत्रामध्ये विनयच्या प्रेरणेनं आजपर्यंत भरघोस यश मिळवलं आहे.
यातून स्पष्ट होईल की, विनय केवळ पुस्तकी कीडा नव्हता व केवळ शैक्षणिक परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकाचे मार्क मिळवणारे विद्यार्थी हेच त्याचे जवळचे मित्र होते असं नाही, तर इतर क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवणारेसुद्धा त्याचे तितकेच जवळचे मित्र होते. शालेय शिक्षण घेत असताना विनयचा वरीलप्रमाणे चौफेर वावर नंतरच्या मित्रांना कदाचित माहीत नसेल म्हणून त्याचा आवर्जून उल्लेख करत आहे. अर्थात त्याचीही ओळख पुढे सर्व मित्रपरिवाराला झालेलीच आहे.
विनय पुण्यामध्ये स्थलांतरीत झाल्यानंतरसुद्धा ‘जनांचा प्रवाह चालीला’चे प्रकाशन होईपर्यंत आम्ही नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात होतो. या पुस्तकाविषयी मी काही लिहिणं अनुचित होईल, कारण आज या पुस्तकामुळे विनयची एक लेखक म्हणून कीर्ती, ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.
विनय एका परिघामध्ये, चौकटीमध्ये वावरणारा कधीच नव्हता व आजही नाही. जसं शिरीष सहस्त्रबुद्धे म्हणतात त्याप्रमाणे विनय कधीही एकाच क्षेत्रामध्ये फार काळ रमला नाही. स्थित्यंतर हा त्याचा स्थायीभाव कायमच राहिला, आणि तो तसाच राहिल याची मला खात्री आहे.
मला माहीत आहे की, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून विनयने शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, लेखक यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये फार मोलाची कामगिरी केलेली आहे आणि स्वतःचं स्थान व अस्तित्व निर्माण केलं आहे. याची यादी फार मोठी आहे आणि विनयच्या मित्रपरिवाराला ते सर्व माहीत आहे. हे सर्व चालू असताना विनयने भटकंती, गिर्यारोहण, प्रवास, शास्त्रीय संगीताचे रसग्रहण असे छंद मनापासून जोपासले.
विनय एक उत्तम गिर्यारोहक आहे आणि महाराष्ट्रातील एकही गड असा नाही की, विनय तिथं पोहचला नाही. हे विनयच्या बहुतांशी मित्रांना माहीतच असेल.
माझी पत्नी सौ. मनीषा म्हणजे त्या वेळेची छाया ही माझी वर्गमैत्रीण असल्यामुळे तीसुद्धा विनयची आजपर्यंतची जडणघडण आणि त्याची कारकीर्द याबाबतीत सुपरिचित आहे. तिलासुद्धा विनयचा अभिमान आहे.
विनयच्या मित्रपरिवारामध्ये समावेश असणं, हे मी माझं भाग्य समजतो.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
विनय हर्डीकर - मराठीतले जॉर्ज ऑर्वेल!
विनय हर्डीकर हा माणूस विलक्षण ‘मनस्वी’ आहे, पण ‘दुटप्पी’ आणि ‘दांभिक’ नाही!
विनय हर्डीकर या उद्धट माणसानं मला घराबाहेर काढलं होतं...
विनय हर्डीकर या एक शिक्षकी ‘मुक्त-विद्यापीठा’त मी ‘लिबरल एज्युकेशन’चा एक दीर्घ कोर्स करत आहे… ‘साकल्य प्रदेशा’ची मुशाफिरी अशी त्याची पद्धत आहे…
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment