ऑस्कर वाईल्डची ‘इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ ही विनोदिका ‘क्षुल्लक’ असती, तर एकशेतीस वर्षं टिकली नसती!
दिवाळी २०२४ - लेख
श्रीनिवास जोशी
  • ऑस्कर वाईल्ड आणि त्यांच्या ‘इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ या नाटकाची प्रयोगाची काही पोस्टर्स
  • Sat , 09 November 2024
  • दिवाळी २०२४लेख ऑस्कर वाइल्ड Oscar Wilde इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट The Importance of Being Earnest

ऑस्कर वाईल्ड (Oscar Wilde) यांची ‘इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ (The Importance of Being Earnest) ही विनोदिका म्हणजे कॉमेडी, १८९५ साली प्रसिद्ध झाली. या कॉमेडीने गेली १३० वर्षं जगभरातील प्रेक्षाकांना हसवलं आहे, आणि हसवता हसवता अंतर्मुखही केलं आहे. या नाटकाचं पूर्ण नाव आहे- ‘इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट : अ ट्रिव्हियल कॉमेडी फॉर सीरियस पीपल’. विचारशील लोकांसाठी लिहिली गेलेली एक क्षुल्लक कॉमेडी.

ऑस्कर वाइल्ड असो, मार्क ट्वेन असो, जॉर्ज बर्नार्ड शॉ असो वा चर्चिल; कुठल्याही पहिल्या दर्जाचा विनोदनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या लेखकाच्या आत एक तत्त्वज्ञ लपलेला असतो. अतिशय गंभीर जीवनदृष्टी असल्याशिवाय पहिल्या दर्जाची विनोदनिर्मिती शक्य होत नाही. मानवी जीवन, साहित्य आणि तत्त्वज्ञानाची अखंड परंपरा यांचं सखोल भान असल्याशिवाय अमर स्वरूपाची विनोदनिर्मिती होत नाही.

ऑस्कर वाईल्डमध्ये एक सिनिक तत्त्वज्ञ लपलेला होता. सिनिसिझमच्या पायावर त्याच्या नाट्य-लिखाणाचा आणि झळाळत्या विनोदाचा अप्रतिम इमला उभा आहे.

सिनिसिझम हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाच्या परंपरेमधला एक प्रमुख प्रवाह होता. या सिनिक तत्त्वज्ञांचं म्हणणं असं होतं की, निसर्गाने माणसाला जसं बनवलं आहे, त्याचा स्वीकार करून माणूस जगला, तर त्याचं जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण होतं. असे जगण्याच्या आड समाज, सामाजिक बंधनं आणि रूढी येतात. काही बंधनं समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असली, तरी कुठल्याही समाजात अनावश्यक आणि भंपक स्वरूपाच्या बंधनांची व रूढींची भरमार झालेली आपल्याला दिसते. या गोष्टी माणसाचा जीव घुसमटून टाकतात. ही बंधनं व रूढी माणसाला आनंदानं जगू देत नाहीत. त्यामुळे सिनिक तत्त्वज्ञ अत्यंत जाणीवपूर्वक अशा सामाजिक बंधनांना नाकारतात, त्यांची खिल्ली उडवतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माणूस कसा बनला आहे याचा विचार न करता, माणसानं कसं असायला पाहिजे, याचा विचार रूढी करताना दिसतात, असं सिनिसिझमचं म्हणणं! त्यामुळेच जगभरातील प्रत्येक समाजात सामाजिक बंधनं व रूढी दिवसेंदिवस जास्त जास्त बेगडी आणि अर्थहीन होताना दिसतात. बहुतांश लोक या बंधनांच्या आहारी जातात. सामाजिक दबावाखाली ‘आदर्शवत’ अशा अनैसर्गिक बंधनांचा आपण आदर करत जगतो आहोत, असं लोक दाखवत राहतात. त्याच वेळी त्यांच्या नैसर्गिक प्रेरणा त्यांना वेगळ्या पद्धतीनं जगायला लावत असतात.

सिनिक तत्त्वज्ञांचं म्हणणं असं की, माणूस हा मूलतः स्वार्थी असतो, परंतु सामाजिक दबाबाखाली माणसाला हे लपवावं लागते. यातून दांभिक वर्तन - हिपॉक्रॅटिक बिहेवियर - जन्म घेते. प्रत्येक माणूस एक हिपॉक्रॅट असतो, दांभिक असतो, असं सिनिक लोकांचं म्हणणं.

सिनिक तत्त्वज्ञ डायॉजनीस याची एक गोष्ट सांगितली जाते. तो भर दिवसाही आपल्या हातात पेटवलेला कंदील ठेवत असे. विचारलं असता तो सांगे - ‘मी कसलाही दंभ अंगात नसलेल्या प्रामाणिक माणसाच्या शोधात आहे, कधी काळी तो दिसला, तर माझ्या नजरेतून सुटू नये म्हणून मी कंदील बाळगतो आहे.’

ही कथा वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते. या कथेच्या एका आवृत्तीमध्ये डायॉजनीस सामाजिक प्रेरणांच्या आहारी न जाता आपल्या स्वतःच्या प्रेरणांचा आदर करून जगणारा माणूस शोधत होता, असं सांगितलं जातं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

वाइल्डने लिहिलं आहे -  “Cynicism is merely the art of seeing things as they are instead of as they ought to be.” सिनिसिझम ही गोष्टी जशा आहेत तशा बघण्याची कला आहे. गोष्टी कशा असाव्यात यावर सिनिसिझम आपलं लक्ष केंद्रित करत नाही. ‘इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ लिहीत असताना वाईल्डच्या मनात ही भूमिका होती.

सिनिसिझम खऱ्या मानवी प्रवृत्तींचं लालन-पालन करणारे आदर्श मानतो. खोटे सामाजिक आदर्श जेव्हा या आदर्शांच्या आड येऊ लागतात, तेव्हा सिनिसिझम त्यांची खिल्ली उडवू लागतो. या धारदार संघर्षामधून ऑस्कर वाईल्डचा विनोद निर्माण होतो. सामाजिक आदर्श समाजमानसात एवढे रुजलेले असतात की, त्यांची खिल्ली उडवणं बहुतांश लोकांना आयुष्यात कसलेही आदर्श न मानणाऱ्या उथळ मनोवृत्तीचं लक्षण वाटू लागतं. त्यामुळेच ऑस्कर वाईल्ड लिहितो की, माझी कॉमेडी विचारशील लोकांसाठी आहे, आणि क्षुल्लकही आहे.

वाईल्डची तरुण पात्रं आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारताना दिसतात. आपल्या स्वार्थाविषयी, आपल्याला जे मनापासून हवं आहे, त्याविषयी त्यांच्या मनात अजिबात संकोच नाही. हे लोक लबाड आहेत, दांभिक नाहीत. या कॉमेडीमधील मध्यम वयातील पात्रं दांभिक आहेत. आदर्श पाळल्यासारखे दाखवत त्यांना स्वार्थ हवा आहे. तरुण पात्रांची मोकळीढाकळी आनंदी वृत्ती आणि मध्यमवयीन पात्रांची स्वार्थ साधण्याची कसरत, यातून या कॉमेडीमधील विनोद तयार झाला आहे.

ऑस्कर वाईल्ड काहीही म्हणत असला, तरी ज्या लोकांना त्याच्या विनोदामागील सत्य जाणवतं, त्यांना ही कॉमेडी त्यांची जीवनदृष्टी बदलून टाकण्याएवढी समृद्ध वाटते. ती ‘क्षुल्लक’ असती, तर १३० वर्षं टिकलीच नसती!

ही विनोदिका वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करावे -

सत्यशील खरे की खोटे (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट) - ऑस्कर वाइल्ड

रूपांतर : श्रीनिवास जोशी

अंक पहिला (पूर्वार्ध) : सत्यशील खरे की खोटे (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

अंक पहिला (उत्तरार्ध) : सत्यशील खरे की खोटे (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

अंक दुसरा (पूर्वार्ध) : सत्यशील खरे की खोटे (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

अंक दुसरा (उत्तरार्ध) : सत्यशील खरे की खोटे (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

अंक तिसरा : सत्यशील खरे की खोटे (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)

.................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा