रूपांतर : श्रीनिवास जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
अंक पहिला (पूर्वार्ध)
(सकाळ. समीरचा जुहूतील फ्लॅट. रूम अत्यंत चांगली आणि कलात्मक रीतीने सजवलेली आहे. शेजारच्या खोलीतून पेटीचा आवाज येतोय. राम चहा आणून टेबलावर ठेवतो. पेटीवादन संपल्यावर समीर येतो.)
समीर - मी पेटी वाजवत होतो. तू ऐकत होतास का, राम?
राम - मी नोकर आहे सर, चोरून काहीही ऐकणं प्रशस्त नाही वाटत मला.
समीर - काय हे राम? खरंच वाईट वाटलं मला तुझे हे असले विचार ऐकून... बरं का राम, सुरात पेटी वाजवत नाही मी. आय प्ले पेटी विथ वंडरफुल एक्सप्रेशन. सुरात काय कुणालाही वाजवता येते पेटी. एक्सप्रेशन महत्त्वाचं राम!
राम - हो, सर.
समीर - आणि संगीताचं म्हणशील तर, संगीतात भावनांनाच महत्त्व देतो मी. शास्त्रीय दृष्टीकोन मी आयुष्यासाठी राखून ठेवलेला आहे.
राम - हो सर.
समीर - आणि आयुष्यातल्या शास्त्रीय दृष्टीकोनाविषयी बोलायचं तर, तू काकडीची सॅन्डविचेस तयार ठेवली आहेस का संगीतामावशीसाठी?
राम - हो, सर. (प्लेट पुढं करतो)
समीर - (त्यातली दोन सॅन्डविचेस् घेतो. बाजूला सोफ्यावर बसतो, खाताखाता-) हं... बाय द वे राम, मी सगळी वही पाहिली हिशोबाची. अमित साळवी आणि मोहन पटेल आले होते जेवायला, तेव्हा व्हिस्कीच्या तीन बाटल्या संपल्या अशी एन्ट्री आहे.
राम - साडेतीन बाटल्या संपल्या सर.
समीर - बॅचलर्सची पार्टी असेल तर घरातले नोकर लोकही भरपूर व्हिस्की का पितात राम?... मी केवळ माहीत असावं म्हणून विचारतोय.
राम - बॅचलर्स चांगली व्हिस्की पितात सर. हेच लोक त्यांची लग्नं झाल्यावर ‘रॉयल स्टॅग’सारख्या ब्रँडवर पार्टी मारून नेतात.
समीर - लग्नामुळं इतकं नैतिक अधःपतन होतं माणसाचं राम?
राम - गृहस्थाश्रम ही एक अत्यंत आनंदाची अशी स्टेज आहे माणसाच्या आयुष्यातली, असं मी ऐकलंय... पण मला फारसा अनुभव नाहीये अजून त्याचा... माझं फक्त एकच लग्न झालंय.
समीर- एकच झालंय फक्त?
राम - हो सर. मी आणि एका तरुण व्यक्तीमध्ये काही गैरसमज झाले. त्याचा परिणाम म्हणून लग्न झालं माझं!
समीर - (उसासा सोडत) सगळीच लग्नं कसल्या ना कसल्या गैरसमजातून होतात राम.
राम - होय सर, नाही तर लग्न करण्यामागं एकही सॉलिड असं कारण दिसून आलं नाही मला कधी.
समीर - मला माहीत नव्हतं तुझं लग्न झालंय म्हणून. अर्थात मला तुझ्या फॅमिली लाइफमध्ये फार रस नाहीये.
राम - हो सर, बरोबरच आहे तुमचं. मलाही माझ्या फॅमिली लाइमफध्ये फारसा रस नाहीये. खरं तर कुठल्याच पुरुषाला नसतो. कोणी फार इंटरेस्ट घ्यावा असा तो विषयच नाहीये... फक्त पुण्यातलेच पुरुष फॅमिली लाइमफध्ये रस घेताना दिसतात सर. पण ते दुसऱ्यांच्या फॅमिली लाइमफध्ये रस घेत असल्यामुळं फारशी तक्रार करता येत नाही आपल्याला.
समीर - करेक्ट राम. ठीक आहे, ये तू.
राम - मी किचनमध्ये आहे सर. (तो जातो)
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
समीर - (निश्वास सोडून) रामचे लग्नाबद्दलचे आणि फॅमिली लाइफविषयीचे विचार फारच खटकण्यासारखे आहेत. ह्या खालच्या वर्गातल्या लोकांनी नवश्रीमंतांच्या समोर आदर्श ठेवले नाहीत, तर ह्या वर्गांचा उपयोगच काय आहे समाजाला? ह्या खालच्या वर्गातील लोकांच्या नैतिक जाणीवा अजून तरल व्हायला हव्यात थोड्या. (बेल वाजते)
राम - सत्यशील खरे आलेत सर. (मनू येतो. राम जातो)
समीर - अरे सत्यशील? अचानक आलास मुंबईत? काही खास कारण?
सुनील - मुंबईत लोक ‘जिवाची मुंबई’ करण्यासाठीच तर येतात समीर. खाण्यापिण्याची चंगळ करावी म्हटलं.
समीर - त्याकरता आजकाल पुण्याला गेलं तरी चालतं सत्यशील. पुण्यात हॉटेलं इतकी झालीत की बास. पुण्यातल्या बायका आजकाल स्वयंपाक करतच नाहीत असं मी ऐकलंय. तुळशीबागेतले भांड्यांचे व्यापारी दुकानं बंद करून हॉटेल काढायच्या विचारात आहेत, असंही ऐकलंय मी. पण तू होतास कुठं गुरुवारपासून?
मनू - पुण्यात.
समीर - करत काय होतास तिथं?
मनू - (टाय ढिला करत) मुंबईत माणूस स्वतःच्या आनंदासाठी जगतो, पुण्यात माणसाला आपल्या शेजाऱ्यांच्या आनंदासाठी जगावं लागतं. दुसऱ्याचं आयुष्य ही आपल्या करमणुकीसाठीच आहे, अशी धारणा पुण्यातल्या शेजाऱ्यांची आहे. त्यामुळं माझ्या शेजाऱ्यांची करमणूक करत होतो.
समीर - कसे आहेत तुझे शेजारी?
मनू - भयंकर लोक आहेत. मी एकाशीही बोलत नाही.
समीर - न बोलल्यामुळं त्यांचं तुझ्याबद्दलचं कुतूहल वाढत असणार सत्यशील.
मनू - कुतूहल करमणुकीला पूरक अशी गोष्ट आहे समीर.
समीर - बाय द वे कुठं राहतोस तू पुण्यात? कोथरूडला का?
मनू - मी कोथरूडला राहात असेन असं का वाटलं तुला?
समीर - आजकाल सगळं पुणं कोथरूडलाच राहतं असं म्हणतात!
मनू - (विषय बदलत) अरे वा सँडविचेस? ग्रेट. इतकी लुशलुशीत सँडविचेस बॅचलरच्या घरात! कोणी येणार आहे का?
समीर - संगीतामावशी आणि शाल्मली.
मनू - शाल्मली? वा!
समीर - हो, पण संगीतामावशीला तू इथं थांबलेला आवडणार नाही.
मनू - का?
समीर - फार पुढं पुढं करतोस तू शाल्मलीच्या! बोलत राहातोस सारखा तिच्याशी.
मनू - मग?
समीर - आयांच्या भाषेत अशा वागण्याला ‘फ्लर्टिंग’ म्हणतात.
मनू - किती सुंदर आहे शाल्मली! बोलावंसं वाटणार नाही का कुणाला तिच्याशी?
समीर - पण तू जरा जास्तच करतोस.
मनू - अरे पण -
समीर - संगीतामावशीला त्रास व्हावा असाच चाललेला असतो प्रकार सगळा.
मनू - मी नुसतं बोललो, ह्याचा त्रास तिला व्हायचं काय कारण आहे?
समीर - तू फ्लर्ट करतोस तिच्याबरोबर, त्याचा त्रास होतो तिला.
मनू - हं!
समीर - तिला अजून एक न आवडणारी गोष्ट म्हणजे ती शाल्मलीसुद्धा फ्लर्ट करत असते तुझ्याबरोबर! (पॉज) तुला काही स्त्रीदाक्षिण्य आहे की नाही?
मनू - अरे, शाल्मली स्वतःहून बोलते माझ्याशी, ह्यात स्त्रीदाक्षिण्याचा प्रश्नच येतोच कुठं?
समीर - तिची आईसुद्धा एक स्त्रीच आहे ना? एखाद्या मुलीवर प्रेम करणे, हा एक प्रकारे विनयभंगच असतो... तिच्या आईचा.
मनू - आय अॅम इन लव्ह विथ शाल्मली! मुंबईला त्याचसाठी आलोय मी. मी आज प्रपोज करणार आहे शाल्मलीला.
समीर - म्हणजे मघाशी तू खोटं बोललास! मघाशी तू म्हणाला होतास की, तू ‘जिवाची मुंबई’ करण्यासाठी आलेला आहेस, आणि आता तुझ्याच तोंडानं सांगतोयस की, तू कामासाठी आलायस. तू खोटं बोलतोस नं ते असं.
मनू - किती अन-रोमँटिक आहेस तू? एखाद्या मुलीला प्रपोज करणं हे काम वाटतं तुला?
समीर - प्रपोज करण्यात काय रोमँटिक आहे? प्रेमात पडणं रोमँटिक आहे. नो डाऊट अबाउट इट! पण आवडणाऱ्या मुलीला प्रपोज करण्यात काय रोमान्स आहे? ती ‘हो’ म्हणणार किंवा ‘नाही’ म्हणणार... दॅटस् ऑल. आणि मुली जनरली ‘हो’च म्हणतात. रोमान्स म्हणजे अनसर्टन्टी पाहिजे. ‘हो’ किंवा ‘नाही’मध्ये कसली आलीय अन्सर्टनटी?
मनू - ज्यांच्या डोक्यात असले विचार येतात ना, त्यांच्यासाठीच डिव्होर्स कोर्टस् तयार केली गेली आहेत या जगात!
समीर - नाही नाही सत्यशील, घटस्फोटस् आर मेड इन हेवन. (मनू सँडविचेस घ्यायला जातो. समीर त्याला अडवतो) हात लावू नकोस सँडविचेसना. संगीतामावशीसाठी बनवली आहेत ती रामनं. (स्वतः एक सॅन्डविच घेऊन खाऊ लागतो.)
मनू - पण तू खातोयस ती सॅन्डविचेस् मघापासनं.
समीर - तो वेगळा विषय आहे. ती माझी मावशी आहे. (दुसरी झाकून ठेवलेली प्लेट उघडतो) हे ब्रेड आणि बटर तू घे. शाल्मलीसाठी आणलंय ते. शाल्मलीला फार आवडतं ब्रेड आणि बटर.
मनू - ब्रेड आणि पांढरं शुभ्र लोणी! (लावून खाऊ लागतो)
समीर - सगळं संपवलं नाहीस तरी चालेल. तिच्याशी लग्न झाल्यासारखं खाऊ नकोस तो ब्रेड आणि बटर. तुझं तिच्याशी लग्न झालेलं नाहीये अजून.... आणि ते होणारही नाहीये म्हणा.
मनू - म्हणजे?
समीर - मुली ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्याशी लग्न अजिबात करत नाहीत असा अनुभव आहे. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करणं इनडिसेन्ट वाटतं मुलींना.
मनू - हे खोटं आहे.
समीर - ते खोटं असतं तर प्रत्येक हिंदी सिनेमात सत्य म्हणून नसतं का दाखवलं? आणि एक गोष्ट लक्षात घे. तुझं शाल्मलीशी लग्न होणार नाहीये, ह्याचं अजून एक सॉलिड कारण आहे.
मनू - काय कारण आहे?
समीर - ह्या लग्नाला माझी संमती नसणार आहे.
मनू - तुझी संमती?
समीर - हो, माझी संमती. शाल्मली माझी सख्खी मावस बहीण आहे. ह्या लग्नाला माझी संमती हवी असेल, तर तुला ही मधुरा कोण आहे, ते सांगायलाच लागणार आहे.
मनू - कोण मधुरा? मला माहीत नाहीये कोणी मधुराबिधुरा.
समीर - (रामला हाक मारतो. राम येतो) राम, मनूसाहेबांची सिगरेट केस गेल्या वेळेला राहिली होती, ती आण बघू जरा.
राम - आणतो सर.
मनू - माझी सिगरेट केस तुझ्याकडं होती? मला का नाही सांगितलंस? मी पोलिसांत कंप्लेंट देणार होतो. बक्षीससुद्धा जाहीर करणार होतो.
समीर - कर ना मग. नाहीतरी मला पैशांची गरज आहे थोडी.
मनू - बॅचलरकडं कितीही पैसा असला तरी त्याला कमीच पडतो तो.
समीर - एवढं सगळं माहीत असूनही तू जाहीर करत नाहीयेस बक्षीस!
मनू - आता काय गरज आहे बक्षीस जाहीर करायची? केस तर सापडली आहे!
(सिगरेट केस घेऊन राम आत येतो. समीर ती केस पटकन् हातात घेतो, केस उघडतो. आत बघतो. वर बघत-) अरे! सॉरी हं, ही सिगरेट केस तुझी नाहीच आहे. तुला जाहीरच करावं लागणार आहे बक्षीस.
मनू - माझीच आहे ती. (त्याच्याजवळ जात) तू माझ्याकडे पाहिली आहेस ती शंभर वेळा.
समीर - ही तुझी केस नाहीये सत्यशील. अरे, तसं लिहलंय ह्या केसमध्ये.
मनू - (उपहासानं) ‘ही केस सत्यशील खरे ह्यांची नाहीये’, असं लिहिलंय काय त्यात?
समीर - (आतलं वाक्यं उजेडात धरून वाचतोय)
मनू - ती माझीच आहे समीर. आणि माझ्या सिगरेट केसमध्ये काय लिहिलंय ते वाचण्याचा कसलाही अधिकार नाहीये तुला.
समीर - कोणी काय वाचावं ह्याचे काही हार्ड आणि फास्ट रूल्स नाहीयेत ह्या जगात. पण, कोणी काय वाचू नये, याच्यावर मात्र ‘महाराष्ट्राची संस्कृती’ मात्र उभी आहे आजकाल.
मनू - मला माहिती आहे ते सगळं. मला ‘महाराष्ट्राच्या संस्कृती’वर चर्चा करायची नाहीये. समाजाची संस्कृती ही प्रत्येक व्यक्तीची अत्यंत खाजगी अशी बाब असते, हे माहीत आहे मला. ती केस दे परत माझी.
समीर - पण, ही केस तुझी नाहीये... ही सिगरेट केस कुण्या मधुरानं भेट दिलेली आहे, आणि मधुरा नावाची कुणी मुलगी तुझ्या ओळखीची नाहीच आहे, असं तूच म्हणालास ना आत्ता?
मनू - अगदीच तुझा आग्रह असेल तर सांगतो. मधुरा ही आत्या आहे माझी.
समीर - आत्या?
मनू - हो, आत्या! अतिशय प्रेमळ आहेत ती. डहाणूकर कॉलनीत राहते. आता ती केस दे मला परत.
समीर - (सोफ्याच्या मागं सरकतो) ही मधुरा जर तुझी आत्या आहे, तर तिनं, ‘तुझी इवलीशी मधुरा’ असं का लिहिलं आहे, ह्या केसमध्ये?
मनू - (हात पुढे करत समीरला) अरे, त्यात काय आहे एवढं विचारण्यासारखं? काही आत्या छोट्या असतात, काही मोठ्या असतात. त्यात काय एवढं चर्चा करण्यासारखं? तिला म्हणायचं स्वतःला ‘इवलीशी’, तर म्हणू देत नं... हे बघ, तिला स्वतःला काय म्हणायचंय ते तिलाच ठरवू देत. ओके? (समीर त्याच्याकडं मिष्किलपणे बघतोय) सगळ्या आत्याबाईंनी तुझ्या आत्येबाईसारखंच असलं पाहिजे, हा कसला आग्रह आहे तुझा? ती सिगरेट केस मला परत दे प्लीज.
समीर - बरोबर आहे तुझं. असते कुणाची आत्या इवलीशी. आपण काही करू शकत नाही त्याला. आणि तिला स्वतःला इवलीशी म्हणवून घ्यायचं असेल, तर त्यालाही आपण काहीच करू शकत नाही. पण मला एक सांग, ही तुझी इवलीशी आत्या, तुला काका का म्हणते? ‘इवल्याश्या मधुराकडून, तिच्या प्रिय मनूकाकाला’. कुणाच्या आत्येचा साईझ काहीही असला, तरी त्या आत्येने आपल्या स्वतःच्या पुतण्याला काका का म्हणावं? मला तर कळतंच नाहीये हे. शिवाय, तुझं नावही मनू नाहीये. ते आहे सत्यशील.
मनू - माझं नाव सत्यशील नाहीये. माझं नाव मनस्विन आहे.
समीर - तू तुझं नाव सत्यशील म्हणूनच सांगत आलायस मला. मी तुझी ओळख अनेकांना सत्यशील म्हणूनच करून दिलेली आहे. सत्यशील म्हणून तुला कुणी हाक मारली, तर तू उत्तरसुद्धा देतोस! तू सत्यशील असल्यासारखाच दिसतोस. शिवाय तुझं आडनावही खरे आहे. आणि आता एका सिगरेट केससाठी, तू तुझं नाव सत्यशील नाहीये असं सांगणं, हे अत्यंत अॅब्सर्ड आहे. तुझ्या व्हिजिटिंग कार्डावरसुद्धा तुझं नाव, ‘सत्यशील खरे’, असंच छापलंय. हे बघ. हे एक कार्ड आहे तुझं माझ्याकडं. (टेबलावरच्या व्हिजिटिंग कार्ड होल्डरमधून त्याचं कार्ड काढतो) सत्यशील खरे. मी हे कार्ड प्रूफ म्हणून ठेवणार आहे. म्हणजे तू आता कधीही, मी सत्यशील खरे नाही, असं मला सांगू शकणार नाहीयेस. आणि मुख्य म्हणजे शाल्मलीलाही तुला तसं सांगता येणार नाहिये. किंवा तसं बघायला गेलं, तर इतर कोणालाही तू तसं सांगू शकणार नाहियेस फॉर दॅट मॅटर!
मनू - हे बघ, अगदी खरं सांगायचं तर, मी पुण्यात मनस्विन काळे म्हणून राहतो, आणि मुंबईतलं माझं नाव सत्यशील खरे आहे.
समीर - ठीक आहे, पण अजूनही ह्या इवल्याशा मधुराचा प्रश्न सुटलेला नाही. तिनं ती तुझी आत्या असूनही तुला काका का म्हणावं?
मनू - समीर तू पोलिसासारखं काय बोलतो आहेस? पोलीस नसताना पोलिसासारखं बोलणं किती विचित्र वाटतं! त्यामुळं किती चुकीचं इम्प्रेशन तयार होतं.
समीर - पोलीस समाजात नेहमी चुकीचंच इम्प्रेशन तयार करत असतात, पण तो विषय वेगळाय. आता सगळं सांगून टाक खरं खरं मला. तुझा कबुलीजबाब घेण्याआधी मला तुला एक गोष्ट स्पष्टपणे सांगून टाकायचीय. तू डबल आयुष्य जगतो आहेस, असा संशय होताच मला! अतिशय ग्रेट गोष्ट आहे ही! मला काही ऑब्जेक्शन नाहिये त्याबद्दल! या समाजात सुखानं जगयाचं असेल, तर डबल आयुष्य जगावंच लागतं माणसाला! ठीक आहे, आता पुढे जाण्यापूर्वी तू मला सांग की, तू मुंबईत सत्यशील म्हणून आणि पुण्यात मनस्विन म्हणून का वावरतोस?
मनू - माझी सिगरेट केस परत दे आधी!
समीर - ही घे. (देतो). आता सांग ही मधुरा कोण आहे, आणि ती तुझी आत्या असून तुला काका का म्हणते? आणि एक लक्षात ठेव, एक्सप्लनेशन जेवढं इम्प्रॉबेबल असतं, तेवढं इन्टरेस्टिंग असतं. सो मेक युवर एक्सप्लनेशन अॅज इम्प्रॉबेबल अॅज पॉसिबल्.
मनू - हे बघ, ह्यात अशक्य आणि इम्प्रॉबेबल असं काहीच नाहीये. अगदी साधं आहे ते. श्री रंगराव काळे, म्हणून एक भला माणूस होता. त्यांनी मला मी लहान असतानाच दत्तक घेतलं. ह्या रंगराव काळ्यांनी, त्यांच्या विलमध्ये त्यांची नात मधुरा काळे, हिचा गार्डियन म्हणून नेमलेलं आहे मला. तर ही मधुरा काळे, आदरापोटी म्हण किंवा प्रेमापोटी म्हण, मला काका म्हणते. अर्थात ही प्रेमाची किंवा आदराची भावना तुला कळेल असं मला वाटत नाहीये. खरं तर तुला कुठलीच भावना कळेल यावर विश्वास नाहीये माझा! सगळा वेळ सिनिकली बोलण्यात जात असतो तुझा! असो… तर सांगायचं म्हणजे ही मधुरा काळे, माझ्या प्रभात रोडवरच्या बंगल्यात राहते. तिची सगळी देखभाल करायला एक बाई आहेत, कु. शारदा पुणेकर. आजकाल पुणेकर ह्या नावाने महाराष्ट्राला तमाशाची आठवण होते. पण ह्या कु. शारदा पुणेकर अगदीच पुणेकर आहेत.
समीर - नक्की कुठं आहे तुझा बंगला प्रभात रोडवर?
मनू - ते मी तुला सांगणार नाहीये, आणि माझ्याकडं यायचं आमंत्रण तर तुला कधीच मिळणार नाहीये...
समीर - मी सगळ्या प्रभात रोडवर फिरलो आहे, पण मला काळे अशा नावाची पाटी दिसली नाही कुठल्या बंगल्याच्या गेटवर.
मनू - त्याच्याशी मला काही कर्तव्य नाहीये. तर, मी पुण्यात मनस्विन काळे आणि मुंबईत सत्यशील खरे असं डबल आयुष्य का जगतो आहे याला काही कारणं आहेत. पण ती कारणं आणि त्या प्रेरणा तुला कळतील असं मला वाटत नाहीये. कारण तू एक अत्यंत नॉन-सिरियस असा माणूस आहेस. त्याचं असं आहे की, आपण जेव्हा एखाद्या तरुण व्यक्तीचे गार्डियन असतो, तेव्हा आपल्याला नेहमीच आदर्शवादी असं वागावं आणि बोलावं लागतं. प्रत्येक गार्डियनचं कर्त्यव्यच असतं ते. पण त्याच वेळी हे ही खरं आहे की, आदर्शवादी बोलणं आणि विशेषतः तसं वर्तन ठेवणं, हे माणसाच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आणि आनंदाच्या दृष्टीनंही अत्यंत घातक असंच असतं. त्यामुळं नॉर्मल बॅचलरसारखं जगता यावं, म्हणून मी मुंबईत येतो. आणि मला मुंबईत येता यावं म्हणून मला सत्यशील नावाचा धाकटा भाऊ आहे, असं मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. हा जो सत्यशील आहे, तो काही ना काही उद्योग करून ठेवत असतो, तो कर्ज करून ठेवतो, तो उधळ्या आहे, असंही मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. एखाद्या वेळी एखादा पेग पिऊन ड्रायव्हिंग करताना पोलिसांना मी सापडलो आणि पोलिसांनी घरी फोन केला, तर कुणाला आश्चर्य वाटायला नको म्हणून मी असं केलेलं आहे. मी सांगतो ते अगदी सत्य आहे. प्युअर आणि सिंपल सत्य!
समीर - सत्य केवळ अपवादानेच प्युअर असतं सत्यशील आणि सिंपल तर कधीच नसतं. सत्य जर प्युअर किंवा सिंपल असतं नं, तर हे सगळं जग तुमच्या पुण्यात करतात तसल्या गूळ घालून केलेल्या आमटीसारखं बेचव झालं असतं, आणि आजकालचं साहित्य तर अशक्यच झालं असतं.
मनू - त्यानं फार काही बिघडलं असतं नसतं म्हणा. उलट बरंच झालं असतं.
समीर - साहित्याची समीक्षा हा तुझा विषय नाहीये मनू. तो आपण वर्तमानपत्रांच्या रिपोर्टर्सवर सोडून देऊ. पेपरांमधले नाटकांवरचे आणि पुस्तकांवरचे रिपोर्ट वाचून मराठी समीक्षेविषयी तुझ्या मनात आदर निर्माण झालेला नाही का?...
मनू - बरोबर आहे तुझं! रिपोर्टर लोक इतकी चांगली समीक्षा करत असतील, तर खऱ्या समीक्षकांनी काही बोलायचं काहीच कारण नाहीये.
समीर - मला एक कळून चुकलंय तुझ्याबाबतीत, तू डबल लाईफर्स संघटनेचा एक अत्यंत महत्त्वाचा सभासद आहेस.
मनू - तुला काय म्हणायचंय नक्की?
समीर - सत्यशील नावाचा एक अत्यंत उपयोगी असा धाकटा भाऊ तू शोधून काढला आहेस, ‘जिवाची मुंबई’ करता यावी म्हणून. तुला गंमत सांगायची तर मीसुद्धा एक विलास नावाचा भाऊ तयार केलेला आहे. सतत आजारी असलेला. तू तुला मुंबईत येता यावं म्हणून भाऊ तयार केला आहेस आणि मी मला पुण्याला येता यावं म्हणून खोटा भाऊ तयार केला आहे. हा विलास माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे तुला सांगतो. तो इतका अजारी असतो, म्हणून माझी तब्येत ठीक राहिलीय. उदाहरणच द्यायचं झालं तर, हा विलास नसता, तर आज मी तुझ्याबरोबर मेनलॅन्ड चायनात जेवायलाच येऊ शकलो नसतो. कारण संगीतामावशीला घेऊन मी मराठी नाटकाला जायचं असं आज ठरलं होतं.
मनू - पण मेनलॅन्ड चायनात जायचं वगैरे काही ठरलेलं नाहीये आपलं!
समीर - तू मित्रांना निमंत्रणं देण्याच्या बाबतीत अत्यंत केअरलेस आहेस सत्यशील! पार्टीला कोणी बोलावलं नाही, तर लोक किती हताश होतात हे माहीत नाहीये तुला.
मनू - माझ्या मते तू संगीतामावशीला नाटकालाच घेऊन जाणंच योग्य ठरेल.
समीर - इम्पॉसिबल्! तिच्याबरोबर गेल्या शनिवारीच मराठी नाटक पाहिलंय मी. ‘सहा महिन्यांतून एक’ ही मराठी नाटक पाहण्याची सेफ लिमिट आहे. त्यानंतर इट बिकम्ज् इन्ज्युरियस टू हेल्थ. शिवाय नाटक झाल्यावर संगीतामावशी मला तिच्या वैजयंती गुप्ते ह्या मैत्रिणीकडे घेऊन जाणार आहे. ह्या गुप्तेबाईंचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ती मला तिच्या स्वतःच्या मुलासारखं वागवते. तिच्याकडे डान्स शिकायला इतक्या मुली येतात, पण ती मला त्या हॉलकडे फिरकूही देत नाही. दुसरं म्हणजे, तिच्याकडे आज तिची प्रिय शिष्या, अनामिका इनामदार येणार आहे. ही अनामिका, तिच्या नवऱ्याला घेऊन डान्स-क्लासला येते. आणि त्याच्याशी चक्क प्रेमानं वागते, तेही सगळ्यांच्या समोर! आपल्याच नवऱ्यावर प्रेम करण्याचे प्रकार फार वाढत चाललेत समाजात. आपले कपडे इतके स्वच्छ असतील, तर त्या स्वच्छ कपड्यांची धुणी समाजाच्या समोर धुण्याची काय गरज आहे सत्यशील? ...एनी वे, तू कन्फर्म्ड डबल लाईफर आहेस, म्हणून मी तुला ‘डबल लाईफर संघटने’चे नियम सांगतो.
मनू - या डबल लाईफमध्ये मला काही इन्टरेस्ट नाहिये. शाल्मलीबरोबर माझं लग्न ठरलं की, सत्यशीलला मारून टाकणार आहे मी. अदरवाईजसुद्धा मी त्याला मारून टाकणारच होतो. ह्या सत्यशीलच्या गोष्टी ऐकून मधुरा त्याच्या प्रेमात पडलीय. या सत्यशीलला आता मारून टाकायला लागणार आहे मला. आणि तूही तुझा तो विलास की कोण आहे, त्यालासुद्धा लवकरात लवकर मारून टाक.
समीर - काहीही झालं तरी मी विलासला ठार मारणार नाहीये. तुझं लग्न झाल्यावर तुला सत्यशीलची खरी किंमत कळेल. सत्यशीलला मारून लग्न करणं, ही फार मोठी चूक ठरेल मनू. विलास किंवा सत्यशीलसारखं कोणी नसेल तर लग्नानंतर फार बोअर होतं लाईफ माणसाचं.
मनू - नॉनसेन्स! माझं जर शाल्मलीशी लग्न झालं, तर सत्यशीलचं थोबाडही बघणार नाही मी.
समीर - तू जर असा चिकटून बसलास ना बायकोला, तर तुझी बायको सभासद होईल डबल लाईफर्स संघटनेची. तुला कळत नाहीये मनू, लग्न ही एक अत्यंत विचित्र गोष्ट आहे. लग्नात तिसरं कोणी चालत नाही आणि दोघांचं कधीच पटत नाही.
मनू - ही असली बडबड करत राहाणं हा आजकालच्या नवसाहित्याचा चावटपणा आहे. काय वाट्टेल त्या डेफिनिशन्स देत असतात आयुष्याच्या!
समीर - पण तुला हे लक्षात घ्यायला हवं आहे की, पुण्या-मुंबईच्या जोडप्यांनी त्या सगळ्या डेफिनिशन्स खऱ्या ठरवल्या आहेत.
मनू - आपण कसे सिनिक आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस समीर. सिनिक बनायला काहीही अक्कल लागत नाही. सिनिक बनणं सोपं आहे खूप.
समीर - आजकाल काहीच बनणं सोपं नाहीये सत्यशील! कॉम्पिटिशन किती वाढलीय जिकडं तिकडं. (इतक्यात बेल वाजते). संगीतामावशी आली वाटतं. फक्त नातेवाईक आणि देणेकरीच अशी बेल वाजवतात. मी संगीतामावशीला जर तिकडच्या रूममध्ये घेऊन गेलो दहा मिनिटं, तर तुला शाल्मलीला प्रपोज करता येईल… आपण आज मेनलॅन्ड चायनाला जाणार आहोत ना?
मनू - (गालातल्या गालात हसत) मलाही वाटायला लागलंय की, आज जायला पाहिजे आपण मेनलॅन्ड चायनाला. आपल्या मित्राबरोबर डिनरला जायचा आनंद काही वेगळाच असतो!
समीर - तू हॉटेलिंग जरा सिरीयसली घेत जा. खाणंपिणं सिरियसली न घेणारे लोक मला आवडत नाहीत. फार उथळ असतात असे लोक.
राम - (येतो) संगीतामावशी आणि शाल्मलीताई आल्यात.
समीर - मावशी, आम्ही इकडं आहोत. इकडंच ये गं.
संगीता - समीर, कसा आहेस बाळा तू. ठीकठाक वागतो आहेस ना?
समीर - मजेत आहे मी.
संगीता - चांगलं वागणं आणि मजेत असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत समीर. चांगलं वागायचं ठरवलं माणसानं, तर मजेत कसं राहता येईल?
समीर - (शाल्मलीकडं बघून) आज एकदम स्मार्ट दिसतेयस तू शाल्मली.
शाल्मली - मी नेहमीच स्मार्ट राहते. नाही का रे सत्यशील?
मनू - तू एकदम परफेक्ट आहेस शाल्मली.
शाल्मली - ए मी परफेक्ट वगैरे काही नाहीये हं! आपण परफेक्ट झालो, तर आपली प्रगती कशी होईल? मला प्रगती करायला आवडतं खूप. त्यासाठी परफेक्ट होऊन चालणार नाही मला कुठल्याही परिस्थितीत. मला अगदी सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करायची आहे.
समीर - प्रगती करता यावी म्हणून इम्परफेक्ट राहायचं! भारतासारखंच धोरण आहे तुझं ह्या बाबतीत. (शाल्मली आणि मनू बोलताबोलता एका कोपऱ्यात सोफ्यावर बसतात)
संगीता - (समीरला) अरे, यायला जरा उशीरच झाला. पण काय झालं ना? मला येताना, त्या मिसेस नातूकडं जावं लागलं. तिचे मिस्टर गेले ना गेल्या महिन्यात. जाईन जाईन म्हणता म्हणता राहून गेलं होतं इतके दिवस. एखाद्या बाईत किती फरक पडतो नाही नवरा गेल्यावर? तिच्याकडं बघून माझा विश्वासच बसेना, ही मिसेस् नातू आहे म्हणून. वीस वर्षांनी तरुण दिसायला लागलीय ती गेल्या महिन्याभरात... आपण जरा चहा घेऊयात का? सॅन्डविचेस केलीयत ना रामनं?
समीर - हो, घे नं. (टेबलजवळ जातो.)
संगीता - (मनूकडं बघत. जरा इकडं येऊन बस तू शाल्मली.)
शाल्मली - नको ममा, इथंच बरी आहे मी.
समीर - (रिकामी प्लेट उचलून) राम!...राम काकडीची सॅन्डविचेस का केली नाहीत आज? तुला सांगितलं ना की, संगीतामावशीला खूप आवडतात म्हणून!
राम - (येतो. रिकामी प्लेट बघून. गंभीर होत.) आज मार्केटमध्ये काकड्याच नव्हत्या. मी दोनदा जाऊन आलो.
समीर - आणि तरीही मिळाल्या नाहीत काकड्या?
राम - नाही सर, रोख पैसे मोजूनही नाही.
समीर - अशा गोष्टी घडायला लागल्या जगात, तर आपल्या मावशीसाठी काहीही करणं अशक्य होऊन जाईल माणसाला राम!
राम - (किंचित हसत) मी आहे सर किचनमध्ये.
समीर - मार्केटमध्ये जर काकड्या मिळत नसल्या, तर काय करावं तेच कळत नाही मला. इतकं चुकल्या चुकल्यासारखं होतं नं. रोख पैसे मोजूनही काकडी नाही? कसं जगायचं माणसानं?
संगीता - अरे, राहू देत समीर. मी नातूबाईंकडे पातवड्या खाऊन आले आहे. इतक्या छान केल्या होत्या नं? नातूबाईंच्या हाताची चव परत आलीय.
समीर - नातूबाईंचे केस परत काळे कुळकुळीत झालेत असं ऐकलं मी! (संगीतामावशी रोखून पाहते, त्यामुळे सूर बदलत) अर्थातच दुःखामुळं!
संगीता - तिचे केस काळे झालेत ते खरं आहे, पण त्याचं कारण माहीत नाहीये मला. (समीर पुढ होऊन तिला चहा देतो)
समीर - संगीतामावशी, तुझ्याबरोबर नाटकाला यायची संधी हुकणार बहुतेक आज माझी.
संगीता - नाही नाही आज गेलंच पाहिजे नाटकाला. यांची सगळी व्यवस्था लावून आलेय मी! आमच्या उषाबाई नर्सना सगळं सांगून आलेय मी. ह्यांना काय काय वाढायचं. औषधं काय द्यायची. सगळं सांगितलंय मी. आता एकदम घरी गेले, मी तर केलेली सगळी अरेंजमेंट बिघडून जाईल.
समीर - मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी फोन आला होता की, विलासची तब्येत परत बिघडलीय म्हणून. (मनूकडं कटाक्ष टाकतो) डॉक्टरांनी सांगितलंय की, जवळचं कोणी असलं तर बोलावून घ्या.
संगीता - हा जो कोणी विलास आहे, तो फारच आजारी पडतोय रे.
समीर - त्याचे आजारच तसे आहेत. काय करणार?
संगीता - हे मात्र फारच झालं आता. त्या विलासला एक काहीतरी ठरवायलाच लागणार आहे आता.
समीर - काय ठरवायला लागणार आहे?
संगीता - जगावं की मरावं! त्याला सांग, असे महत्त्वाचे प्रश्न लोंबकाळत ठेवू नयेत फार दिवस.
समीर - अगं, असं कसं सांगायचं त्याला?
संगीता - आजकाल रोगी लोकांचे फार लाड केले जातात आपल्याकडं. मला अजिबात मान्य नाहीये ते. निरोगी राहणं ही प्रत्येक मनुष्याची पहिली जबाबदारी आहे. ज्यांना निरोगी राहण्याची साधी जबाबदारी पार पाडता येत नाही, त्यांचे कसले लाड करायचे? मी तुझ्या काकांनाही नेहमी हेच सांगत असते. पण कसली जबाबदारी उचलायचा स्वभावच नाहीये त्यांचा. तुझ्या त्या विलासला सांग की, येत्या शनिवारी कोणत्याही परिस्थितीत कसलीही इमर्जन्सी तयार करू नकोस. माझ्या घरी पार्टी अरेंज केलीय मी. पार्टीसाठी म्युझिक अरेंज करायची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे समीर. विसरू नकोस. आणि कुठली गाणी लावायची वगैरे सगळं तूच ठरव. आजकालचं एकही गाणं लक्षात राहात नाही माझ्या... बाय द वे, सगळे जण पटकन् विसरून जातील अशी गाणी कशी तयार करतात रे आजकालचे संगीतकार? पूर्वीच्या संगीतकारांमध्ये नव्हता हा टॅलेंट ...
समीर - बरोबर आहे मावशी तुझं. मी बोलतो विलासशी शनिवारबद्दल.
संगीता - नक्की बोल.
समीर - तू काळजी करू नकोस म्यूझिकची. पार्टी म्हणजे संगीत पाहिजेच. पण पार्टीतलं म्युझिक ही एक स्पेशल गोची आहे. पार्टीत संगीत नसलं तर, चुकल्याचुकल्यासारखं वाटतं सगळ्यांना, आणि असलं तर लोक संगीताकडं दुर्लक्ष करतात. जुनी गाणी लावली, तर लोक ऐकत नाहीत, आणि नवी लावली तर गप्पा मारत नाहीत. मी एक लिस्ट केलीय पार्टीतल्या गाण्यांची. जरा इकडे ये नं, ह्या रूममध्ये, तुला दाखवतो मी ती लिस्ट.
संगीता - किती करतोस रे आपल्या मावशीसाठी. कधीकधी इतका चांगला वागतोस नं. (उठते आणि समीरमागे जाऊ लागते. जाता जाता -) पार्टी म्हटलं की, आय गेट क्वाइट एक्सायटेड समीर. एक-दोन गेस्टचे अपमान झाल्यावर किती रंग भरतो नाही पार्टीला! आणि हे बघ, जुनी गाणी लावायची नाहीत हं, डीसेन्ट असतात ती. लोक फार बोअर होतात. आणि नवीसुद्धा लावू नकोस, फार आचरट असतात ती. (मनूकडे पाहत, म्हणते) शाल्मली तू माझ्याबरोबर त्या खोलीत ये.
शाल्मली - येते ममा.
(संगीतामावशी आणि समीर दुसऱ्या रूममध्ये जातात. शाल्मली तिथेच बसून राहते.)
.................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment