अंक तिसरा : सत्यशील खरे की खोटे? (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)
दिवाळी २०२४ - लेख
ऑस्कर वाइल्ड
  • ऑस्कर वाईल्ड आणि त्यांच्या ‘इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ या नाटकाची प्रयोगाची काही पोस्टर्स
  • Sat , 09 November 2024
  • दिवाळी २०२४ लेख ऑस्कर वाइल्ड Oscar Wilde इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट The Importance of Being Earnest

सत्यशील खरे की खोटे?

रूपांतर : श्रीनिवास जोशी

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

अंक तिसरा

(प्रभात रोडवरच्या बंगल्यातील हॉल. शाल्मली आणि मधुरा या दोघी खिडकीजवळ आहेत. बाहेर बागेत बघतायत.) 

शाल्मली - ते आपल्यामागं लगेच घरात आले नाहीत पळत. दुसरं कोणीही असतं, तर पळत आले असते. 

मधुरा - ह्याचा अर्थ त्या दोघांमध्ये काहीतरी लाज शिल्लक उरली आहे अजून.  

शाल्मली - मफिन्स खात बसलेत ते! 

मधुरा -  याचा अर्थ पश्चात्ताप झालाय त्यांना!

शाल्मली - (पॉज) त्यांचं लक्ष नाहीये आपल्याकडं अजिबात. तू जरा खोक ना म्हणजे लक्ष जाईल त्यांचं आपल्याकडं…

मधुरा - मला खोकला झाला नाहिये गं! 

शाल्मली - आता ते आपल्याकडं बघतायत!

मधुरा - आत येतायत ते. म्हणजे राहावत नाहीये त्यांना आपल्याशिवाय. पश्चात्ताप तरी किती वेळ करणार बिचारे?  

शाल्मली - पण आपण शांत राहू. बोलायचंच नाही त्यांच्याशी.   

मधुरा - आपण दुसरं काय करू शकतोय? (दोघे येतात.) 

शाल्मली - आपण पहिल्यांदा बोलायचं नाही काहीही झालं तरी. 

मधुरा - शक्यच नाही. केवळ अशक्य. त्यांनाच बोलू देत बोलायचं असेल तर. (पॉज). 

शाल्मली - मि. खरे, मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला. 

मधुरा - मलाही! समीर, तू मनुकाकाचा भाऊ असल्याचं खोटं का सांगितलंस? 

समीर- तुला भेटण्याची संधी मला मिळावी म्हणून. 

मधुरा - (शाल्मलीला) कुणालाही पटावं असंच एक्सप्लनेशन आहे हे.  

शाल्मली - पण तो खरं बोलतोय असं वाटतंय का तुला? 

मधुरा - अजिबात नाही. पण उत्तर किती गोड आहे त्याचं! शब्दांची अगदी निवड किती सुंदर आहे!  

शाल्मली - बरोबर आहे! शब्दांचं सौंदर्य महत्त्वाचं. त्यांच्या मागचं सत्य नाही. मि. खरे, तुम्ही काय एक्सप्लनेशन देऊ शकताय मला? तुम्हाला एक भाऊ आहे, हे खोटं का सांगितलं तुम्ही मला? तुम्हालाही असं म्हणायचं आहे का, की मला मुंबईत येऊन भेटायची संधी वारंवार तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही तुम्हाला एक भाऊ आहे, हे खोटं सांगितलंत? 

मनू - म्हणजे काय शंका आहे की, काय शाल्मली तुला? 

शाल्मली - हो. (मधुराकडे जाते) त्या दोघांचीही एक्सप्लनेशन्स अगदी योग्य वाटतायत. खरं सांगायचं तर मनूचं एक्सप्लनेशन तर अगदीच पटण्यासारखं आहे. 

मधुरा - त्यापेक्षा, समीरचं एक्सप्लनेशन जास्त जेन्युइन आहे नाही! 

शाल्मली - मग आपण माफ करायचं त्यांना? 

मधुरा - काहीच हरकत नाही. 

शाल्मली - खरंय. काहीही झालं तरी हा तत्त्वांचा मुद्दा आहे. आपल्या गर्वापोटी त्यांना शिक्षा नाही करू शकत आपण. आपण त्यांना माफ केलंय, हे आपल्यापैकी कोणी सांगायचं त्यांना?

मधुरा - आपण दोघींनी एकाच वेळी सांगायचं का त्यांना, आपण त्यांना माफ केलंय म्हणून? 

शाल्मली - ग्रेट आयडिया! मला लोक बोलत असताना मधे मधे बोलायची सवय आहे. तू एक दोन-तीन म्हण. 

मधुरा - चालेल. (अगदी हळू आवाजात- एक, दोन, तीन म्हणते)

शाल्मली आणि मधुरा - (एकदम) आम्ही तुम्हाला माफ केलंय, पण तुमचं नाव सत्यशील नाहीये, हे अजूनही आम्हाला मान्य नाहीये. सत्यशीलशिवाय दुसऱ्या कुणाशीही आम्ही लग्न करणार नाही. नाही म्हणजे नाही! 

मनू आणि समीर - (एकदम) आम्ही आज दुपारीच आमची बारशी ठरवली आहेत. आम्ही आमची नावं चेंज करणार आहोत. 

शाल्मली - (मनूला) केवळ माझ्यासाठी बारसं करून घेणार आहेस तू? 

मनू - हो. 

मधुरा - (समीरला) केवळ माझ्यासाठी बारसं करून घेणार आहेस तू लहान बाळासारखं? 

समीर - हो!

शाल्मली - स्त्रीवर अन्याय होतो असं लोक उगीचच बोलत असतात. आपल्या पार्टनरसाठी त्याग करायची वेळ आली, तर पुरुष स्त्रियांच्या दोन पावले पुढंच असतात नाही मधुरा!   

मधुरा - आणि शारिरिक धैर्य म्हणजे काय ते बायकांना माहीतसुद्धा नसतं. केवळ प्रेमासाठी ह्या वयात नाव बदलायला तयार झाले ते. एका स्त्रीला काय पाहिजे असतं अजून? 

शाल्मली - (मनूला) माय डिअर सत्यशील!

समीर - (मधुराला) माय डिअरेस्ट सत्यशील! (ते एकमेकांच्या गळ्यात पडतात)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खुशीराम - (येतो. एकंदरीत प्रकार बघून खाकरतो) संगीतामावशी आल्यात. 

मनू - अरे बापरे!

(खुशीराम जातो. चौघेही घाईघाईनं दूर होऊ लागतात. तेवढ्यात संगीतामावशी येते.)

संगीता - ह्याचा अर्थ मी काय समजायचा शाल्मली? 

शाल्मली - विशेष काही नाही, मी मनूशी लग्न करणार आहे. 

संगीता - शाल्मली ये. इकडे येऊन बस. इकडे येऊन बस अशी. रेंगाळू नकोस तिथं. रेंगाळत राहणं मानसिक ऱ्हासाचं लक्षण असतं तरुणांमध्ये आणि म्हाताऱ्यांमध्ये शारीरिक दौर्बल्याचं. (मनूकडे वळते) शाल्मली अचानक घरातून कार काढून कुठे निघून गेली, ते मी एका क्षणात ओळखलं. एनी वे, मि. सत्यशील खरे, माझ्या मुलीचा नाद तुम्ही सोडावा, असा माझा तुम्हाला सल्ला आहे. 

मनू - हे बघा संगीतामावशी, आम्ही लग्न ठरवलंय आमचं. 

संगीता - तुम्ही तसलं काहीही केलेलं नाहीये मि. खरे. 

समीर - ते खरंय संगीतामावशी. 

संगीता - तुझा तो कोण विलास की, उल्हास नावाचा रोगी मित्र आहे तो, इथंच राहतो का? 

समीर - (गडबडतो) न्, नाही... तो नाही राहात इथं. खरं तर विलास गेला. 

संगीता - गेला? कधी? अचानक गेला का तो? 

समीर - आज दुपारी गेला. 

संगीता - कशानं गेला तो? 

समीर - सगळ्या गोष्टींचा स्फोट झाला आज दुपारी. 

संगीता - म्हणजे स्फोटात गेला तो? 

समीर - एका अर्थानं तसंच म्हणावं लागेल...

संगीता - कसल्या स्फोटात? 

समीर - सत्याच्या स्फोटात. सत्याचा स्फोट झाला. विलासबद्दलचं सत्य कळलं सगळ्यांना. मग त्याला जावंच लागलं.

संगीता - काय बोलतोय आहेस तू?  

समीर - म्हणजे मला असं म्हणायचंय की, डॉक्टरांनी सांगितलं की, हा जगूच शकणार नाही आता. त्यामुळं गेला तो. 

संगीता - डॉक्टरांच्या मताला फारच मान देणारा दिसतोय तुझा हा मित्र. ठीक आहे, एकाच गोष्टीचा आनंद आहे की, त्यानं काही तरी ठरवलं नक्की; आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी सुध्दा केली. ती ही प्रॉपर मेडिकल अ‍ॅडव्हाइस घेऊन. गुड. आता ह्या गोष्टीचा निकाल लागल्यावर मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे मि. खरे... ज्या पद्धतीनं एखाद्या मुलाचा हात एखाद्या मुलीनं तिच्या हातात घेतला नाही तरी चालतं, त्या पद्धतीनं, माझ्या भाच्याचा हात हातात घेतलेली ती तरुण व्यक्ती कोण आहे? 

मनू - ही मधुरा आहे. मी गार्डियन आहे हिचा. रंगराव काळ्यांची कन्या. (संगीता तिला हॅलो म्हणते)

समीर - मी हिच्याशी लग्न ठरवलंय. 

संगीता - काय म्हणालास? 

मधुरा - समीर आणि मी लग्न करणार आहोत. 

संगीता - ह्या पुण्याच्या हवेतच काही प्रॉब्लेम आहे की काय देव जाणे? पुण्यात तरुण-तरुणी एंगेज होत सुटतात, कसलाही विचार न करता. पुण्याच्या ह्या असल्या हवेमुळंच, पुण्यात कितीही मंगल कार्यालयं निघाली तरी अजिबात पुरत नाहीत! फार मोठा प्रश्न तयार झाला आहे हा पुण्याच्या या हवेमुळं! ठीक आहे, मला, एक सांगा, ह्या मधुराचंसुद्धा एखाद्या रेल्वेस्टेशनशी काही नातं आहे का? केवळ माहीत असावं म्हणून विचारतेय मी. कारण कालपर्यंत खरंच मला माहीत नव्हतं की, ह्या जगात अशीही एक व्यक्ती आहे की, जिच्या जीवनाच्या प्रवासाची सुरुवात रेल्वेच्या टर्मिनसपासून झाली आहे.  

मनू - ही लेफ्टनंट जनरल धर्मवीर काळ्यांची नात आहे, हिच्या आईचे वडील म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्वातंत्र्यसेनानी सर रावबहादूर पटवर्धन, आणि हिचे वडील म्हणजे थोर पत्रकार रंगराव काळे. 

संगीता - म्हणजे अगदीच रेल्वे टर्मिनसवरून प्रवास सुरू नाही झालेला हिचा. पण हा बंगला हिचाच आहे कशावरून? 

मनू - हा हिचा नाही, माझा आहे. तिचे दोन बंगले शेजारी आहेत. दारावर पाट्या आहेत तशा. 

संगीता - पुण्यातल्या पाट्यांचं काही सांगता येत नाही. 

मनू - आमचे सॉलिसिटर आहेत चितळे अँड मोने अँड साठ्ये, ते सगळी शाहनिशा करून देतील तुम्हाला. शिवाय आमचे सी.ए. आहेत, चोरटे अँड लेले. त्यांच्याशीही तुम्ही बोलू शकता. 

संगीता - चोरटे अँड लेले फर्म फार मोठी आहे, मी नाव ऐकून आहे तिचं. अर्थात नावात काय आहे म्हणा? लेले अँड चोरटे म्हणलं, तरी अर्थ एकच झाला असता. 

मनू - शिवाय मयूर कॉलनीत हिच्या प्लॉटवर एक स्कीम करतायत, मांढरे अँड पांढरे बिल्डर्स, इन्सिग्निया अल्टिट्यूडस नावाची. 

संगीता - इन्सिग्निया अल्टिट्यूडस् म्हणजे काय? 

मनू - मलाही माहीत नाही. मी विचारलं होतं पाढरेंना इन्सिग्निया अल्टिट्यूडस्चा अर्थ. ते म्हणाले की, मांढऱ्यांना विचारा. 

संगीता - मग? 

मनू - मग काय मी मांढऱ्यांना विचारला अर्थ.

संगीता - मग काय अर्थ सांगितला त्यांनी? 

मनू - अर्थ इन्सिग्निफिकंट आहे असं म्हणाले ते. 

संगीता - मग, डिक्शनरीत नाही बघितलात अर्थ?

मनू - नाही बघितला. डिक्शनरीत शब्दांचे अर्थ देतात. नावांचे अर्थ थोडेच देतात? 

संगीता - बरोबर आहे तुझं... पण ही नक्की मधुराच आहे नं? 

मनू - ते ही सहज सिद्ध करता येईल. माझ्याकडं तिची सगळी सर्टिफिकटस आहेत. जन्माचं सर्टिफिकट, शाळेचा दाखला, तिच्या व्हॅक्सिनेशनची सर्टिफिकटस्, डेंगी, गोवर, कांजिण्या, कावीळ, गालफुगी, देवी, सगळं सगळं. सगळ्या गोष्टी झाल्यात तिच्या. 

संगीता - खूप काही घडलंय आयुष्यात हिच्या! शाल्मली, आपली निघायची वेळ झालेली आहे... उठते. बाय द वे, मधुराची एकूण प्रॉपर्टी किती आहे? 

मनू - फार काही नाही. तिच्या बाबांनी जी प्रॉपर्टी ठेवलीय तिच्यासाठी, तिची किंमत आजच्या बाजारभावानं एक्कावन्न कोटी शहात्तर लाख आहे. त्याशिवाय फारसं काही ठेवलं नाहीये तिच्या बाबांनी. 

संगीता - (परत बसते) एक मिनिट मि. खरे. एक्कावन्न कोटी शहात्तर लाख? ते ही प्रॉपर्टीत? हं. मधुरा खरं तर एक गोड मुलगी आहे हे माझ्या लक्षात आलंय, मी तिच्याकडे जसं जसं निरखून नीट पाहिलं तसं. पहिल्यांदा रागाच्या भरात तिचं सौंदर्य दिसलंच नव्हतं मला. रागात माणूस आंधळा होतो म्हणतात ना, ते खरं आहे. 

समीर - मधुरा अतिशय गोड आणि प्रेमळ आणि सुंदर आणि ग्रेट अशी मुलगी आहे संगीतामावशी. 

संगीता - हाय ब्रो सोसायटीत कुठही उठून दिसेल ती. 

समीर - माझं मधुरावर प्रेम आहे, आणि तेवढं मला पुरेसं आहे. हाय ब्रो सोसायटीशी मला काहीही घेणं देणं नाही. 

संगीता - हाय ब्रो सोसायटीबद्दल असं बोलू नकोस समीर. ज्यांना त्या सोसायटीत प्रवेश मिळत नाही, तेच लोक फक्त शिव्या देत असतात तिला. (मधुराकडे वळून) हे बघ मधुरा, एक गोष्ट सांगते तुला. समीरकडं कसलीही प्रॉपर्टी नाहीये. त्याचा धंदाही फारसा चालत नाही. तो कसला तरी डबल लाइफर्स नावाचा क्लब काढणार आहे, पण तोही धंदा चालेल असं वाटत नाहीये मला. थोडक्यात, सांगायचं तर कर्ज घेणं हाच त्याच्या उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. पण अशा गोष्टींचा विचार लग्नाच्या संदर्भात सेन्सिटिव्ह लोक अर्थातच करत नाहीत. माझंही लग्न हळदणकरांशी झालं तेव्हा, माझ्याकडंही प्रॉपर्टी, पैसा, दागिने, सोनं, शेअर्स यातलं काहीही नव्हतं. पण माझ्या निर्णयाच्या आड मी त्यातलं काहीही येऊ दिलं नाही. ठीक आहे, मी ह्या लग्नाला माझी संमती देत आहे. 

समीर - थँक्यू संगीतामावशी. 

संगीता - मधुरा, जरा इकडे बघ. बघू माझी सून कशी दिसतेय? वा, सुंदर!

मधुरा - थँक्यू संगीतामावशी. 

संगीता - आता तुम्ही लग्न करायचं ठरवलंच आहे, तर ते लवकर करून टाका. 

समीर - हो मावशी. 

संगीता - अगदीच स्पष्ट बोलायचं तर, एंगेजमेंट झाल्यावर लग्न लवकर करून टाकावं अशा मताची आहे मी. लाँग एंगेजमेंटसना विरोध आहे माझा. त्यात वधुवरांना एक-दुसरा कसा आहे ते कळण्याची शक्यता असते आणि अर्थातच ती चुकीची गोष्ट आहे! 

मनू - सॉरी, मला मध्ये बोलायला लागतंय... पण ही एंगेजमेंट होऊच शकत नाही. मी मधुराचा गार्डियन आहे. आणि माझ्या संमतीशिवाय तिनं लग्न केलं नाही, तर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी ठेवलेली प्रॉपर्टी तिला मिळणार नाहीये. 

संगीता - का म्हणे? समीर हा एक चांगला मुलगा आहे, त्याच्याकडं कसलीही प्रॉपर्टी नाहीये, तरीही तो श्रीमंत आहे, असं लोकांना वाटत राहतं. 

मनू - मला लोकांबद्दल वाईट बोललेलं फारसं आवडत नाही, पण मधुराच्या आयुष्याचा प्रश्न असल्यामुळं, मला बोलायलाच लागतंय. समीर हा बेसिकली खोटारडा आहे, असा मला संशय आहे. (समीर आणि मधुरा त्याच्याकडे आश्चर्याने बघतात)

संगीता - समीर, खोटारडा? शक्यच नाही. तो माझा भाचा आहे. त्यानं इन्कमटॅक्स भरला नाही, तरी रिटर्न्स नियमित भरतो तो. 

मनू - त्याबद्दल माझ्या मनात संशय नाहीये. भरतच असणार तो. इन्कमटॅक्स चुकवायचा असेल तर रिटर्न्स नियमित भरायलाच लागतात. पण आज  मी ह्या घरात नसताना हा माणूस माझा भाऊ म्हणून माझ्या घरात घुसला. त्यानंतर मी ज्या मुलीचा एकुलता एक पालक आहे, अशा मधुराच्या प्रेमाची त्यानं चोरी केली. ज्या घरात त्यानं एवढी मोठी चोरी केली, त्याच घरात दुपारच्या चहालाही थांबण्याची हिंम्मत दाखवली त्यानं! चहा पिता पिता मी जर्मन बेकरीमधून माझ्यासाठी आणलेली मफिन्ससुद्धा संपवली! आणि सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे तो माझा भाऊ म्हणून ह्या घरात आला, तेव्हा त्याला पूर्णपणे माहीत होतं की, मला कुठलाही भाऊ नाहीये, मला कुठलाही भाऊ नव्हता, आणि मी कुठलाही भाऊ होऊही देणार नाहीये. 

संगीता - बरोबर आहे तुझं मनस्विन! पण मला असं वाटतंय की, समीर थोडंसं चुकला असला तरी एकूण विचार करता दुर्लक्ष करण्याजोगं आहे त्याचं वर्तन! 

मनू - तुम्ही जे बोलत आहात ते तुमाच्या  क्षमाशील उदार आणि सहाभूतीपूर्ण अशा स्वभावाला धरूनच आहे. तुमचा क्षमाशील आणि उदार स्वभाव आमच्या सगळ्यांच्याच लक्षात गेल्या दोन दिवसात पूर्णपणे आलेलाच आहे. परंतु, एकूण विचार करता मला निर्णय द्यायला लागत आहे की, माझी संमती ह्या लग्नाला नाही. 

संगीता - (मधुराला) इकडे ये मधुरा तू. तुझं वय काय आहे बेटा? 

मधुरा - मी अठरा वर्षांची आहे. पण पार्टीत कोणी विचारलं मला की, तुझं वय काय आहे तर मी वीस सांगते. 

संगीता - काही हरकत नाही. कपड्याप्रमाणे वयसुद्धा आपल्या सोयीप्रमाणे थोडं अल्टर केलं, तर फार काही बिघडत नाही. कम्फर्ट महत्त्वाचा. खरं तर बायकांनी त्यांचं अ‍ॅक्युरेट वय सांगितलेलं मला आवडतच नाही. तू अठरा वर्षांची आहेस म्हणजे सज्ञान आहेस. आपल्याला घाबरायचं फार कारण नाहीये. मि. खऱ्यांचा तुझ्या लग्नाला असलेला विरोध, हा खूप महत्त्वाचा विषय आहे, असं मला वाटत नाहीये. 

मनू - एक्सक्यूज मी अगेन!  मधुराच्या वडिलांच्या विलप्रमाणं, मधुरा पस्तीस वर्षांची होईपर्यंत मी तिचा, आणि तिच्या प्रॉपर्टीचा गार्डियन असणार आहे. 

संगीता - ठीक आहे, तो ही काही फार मोठा मुद्दा आहे असं मला वाटत नाही. पस्तीस हे अत्यंत अ‍ॅट्रॅक्टिव्ह एज आहे, स्त्रीच्या दृष्टीनं. कित्येक स्त्रिया तर एक आवड म्हणून म्हणून पस्तिशीच्याच राहतात कित्येक वर्षं. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, त्या पस्तिशीच्याच आहेत त्यांना चाळीसावं वर्ष सुरू झालं तेव्हापासून. मधुरा, तू पस्तिशीत लग्न केलंस, तर तुझी प्रॉपर्टी तेव्हा दोनशे कोटीच्या घरात गेलेली असेल. काही घाबरण्याचं कारण नाहीये. 

मधुरा - मी पस्तिशीची होईपर्यंत तू थांबशील माझ्यासाठी समीर? 

समीर - नक्की थांबेन. 

मधुरा - मला माहीत होतं तू नक्की थांबशील माझ्यासाठी. पण मला नाही थांबता येणार तुझ्यासाठी इतकी वर्षं. मला कुठल्याही गोष्टीची वाट पाहायला अजिबात आवडत नाही. पाच मिनिटंसुद्धा नाही. वाट पाहणंच आवडत नाही, मला तर लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टीची वाट पाहणं मला कसं आवडेल? 

समीर - मग आता काय करायला पाहिजे आपण मधुरा? 

मधुरा - ते मी कसं सांगू सुकथनकर तुम्हाला?

संगीता - अगदी खरं सांगायचं तर मि. खरे, तुमची पाल्य, मधुरा काळे आताच म्हणाली की, ती पस्तिशीपर्यंत अविवाहित राहू शकत नाही. ह्यातून तिचं अगदी इम्पल्सिव्ह नेचर दिसून येते. अगदीच हुळहुळ वाफेची आहे ही मुलगी. त्यामुळं तुम्ही तुमचा निर्णय बदलावा, असं माझं मत आहे. 

मनू - संगीतामावशी, अगदी खरं सांगायचं तर आता हे मॅटर तुमच्याच हातात आहे. ज्या क्षणी तुम्ही माझ्या आणि शाल्मलीच्या लग्नाला संमती द्याल, त्या क्षणी माझी संमती समीर आणि मधुराच्या लग्नाला मिळेल. 

संगीता - (उठते) तुम्हाला पूर्णपणे माहीत आहे की, ह्या प्रपोजलला माझी संमती मिळणं अशक्य आहे. 

मनू - ठीक आहे, (इतरांकडं बघून) मित्र आणि मैत्रीणींनो, संगीता मावशींच्या ह्या भूमिकेमुळं परिस्थिती चिघळत चाललेली आहे. त्यामुळं तुम्हालाही तुमच्या मनाची तयारी करायला हवी. ब्रह्मचर्य हासुद्धा एक उत्कट असा आनंद आहे, हा विचार तुम्ही तुमच्या मनावर जेवढ्या लवकर बिंबवाल, तेवढं तुमच्या सर्वांसाठीच चांगलं राहील ते! 

संगीता - तो आनंद शाल्मलीला उपभोगू देणार नाहिये मी. समीर त्याला हवं असेल तर अर्थातच, ब्रह्मचर्याच्या आनंदसागरात मनसोक्त डुंबायला मोकळा आहे. मी आड येणार नाही त्याच्या. (उठत) शाल्मली, चल. (घड्याळात बघते) खूप उशीर झालाय. (तेवढ्यात फणसे येतात. अतिशय आनंदात)

डॉ.फणसे - चला, चला, सगळी तयारी झालीय दोन्ही बारश्यांची. 

संगीता - अहो अजून लग्नही होणार की, नाही ते नक्की नाहीये, आणि तुम्ही बारश्यांची काय तयारी केलीयत? 

डॉ.फणसे - (गडबडलेला) अहो ह्या दोघांनाही बारशी करायचीत त्यांची. त्यांनीच मला सांगितली तयारी करायला. 

मनू - आताची परिस्थिती पाहता, बारश्यांचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाहीये. 

डॉ.फणसे -तुमच्याकडून ही भाषा ऐकून खूप वाईट वाटलंय. एखादी गोष्ट इतक्या गंभीरपणे ठरवून इतक्या चिल्लर पद्धतीने रद्द करणे, बरोबर नाही वाटत. 

मनू - सॉरी, डॉक्टर. 

डॉ.फणसे - च्, बारसं रद्द म्हणजे आता का.पो.ची पार्टीही रद्द. 

मनू - का.पो.ची पार्टी? 

डॉ.फणसे - कांदापोह्यांची पार्टी... आता मला स्वयंसेवकांना नेऊन बादशाहीत मऊची पार्टी द्यायला लागणार? 

मनू - मऊ? 

डॉ.फणसे - मटार उसळीची. ठीक आहे. चला मी जातो, शारदा ताई वाट पाहात असतील माझी. 

संगीता - शारदाताई? 

डॉ.फणसे - शारदाताई पुणेकर. 

संगीता - शारदा पुणेकर? एक मिनिट, एक मिनिट. ही बाई कोण आहे, हे मला कळलंच पाहिजे. ह्या शारदा पुणेकरचा शिक्षणक्षेत्राशी काही संबंध आहे का? 

डॉ.फणसे - हो, त्या शिक्षिका आहेत. 

संगीता - मग तीच ती दुष्ट शारदा पुणेकर. त्या आता तुमच्या बरोबर राहतात का? 

डॉ.फणसे - (चिडून) मी शुद्ध चारित्र्याचा ब्रह्मचारी स्वयंसेवक आहे ताई. 

मनू - शारदा पुणेकर ह्या मधुराच्या शिक्षिका आणि कंपॅनियन आहेत, गेली तीन वर्षं. आमच्याच घरात राहतात त्या. अतिशय चांगल्या आणि शुद्ध चारित्र्याच्या शिक्षिका आहेत त्या. 

संगीता - तिचं जे काही कौतुक करायचंय तुम्हाला ते करा. पण मला ह्या स्त्रीला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. लगेच. 

डॉ.फणसे - त्या काय त्या आल्या. (शारदा मिस् घाईघाईनं येतात)

शारदा - अहो, सगळी तयारी झालीय. (संगीतामावशीकडे बघून थिजते. संगीता तिच्याकडे थंडपणे बघते आहे. शारदा पळून जाण्यासाठी कुठून वाट आहे का ते पाहते)

संगीता - शारदा! (शारदा मान खाली घालून उभी राहते) इकडे ये शारदा. (शारदा गरिबासारखी पुढे जाते) शारदा, ते बाळ कुठे आहे शारदा? बाळ कुठे आहे ते शारदा? (सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव) अठ्ठावीस वर्षांपूर्वी तू सुकथनकरांच्या मरीन ड्राइव्हवरच्या घरातून, त्यांच्या बाळाला बाबागाडीतून घेऊन बाहेर पडलीस. ते परतलीसच नाहीस. अनेक आठवड्यांनंतर ती बाबागाडी ताज हॉटेलच्या मागच्या गल्लीत सापडली. त्यात एका कादंबरीचं हस्तलिखित होतं. अतिशय तकलादू कथावस्तू असलेली आणि अत्यंत भाबडं कथानक असलेली, दुय्यम दर्जाची कादंबरी होती ती. पण बाळ नव्हतं त्या बाबागाडीत. (सगळे जण शारदाकडे बघातात) शारदा, ते बाळ कुठंय? (पॉज जातो)

शारदा - मला कबूल करायला अत्यंत लाज वाटतेय, पण मला कबूल करायलाच पाहिजे ती गोष्ट... तो भयानक दिवस माझ्या आठवणीत अगदी ताजा आहे. त्या दिवशी सकाळी त्या बाळाला घेऊन नेहमीप्रमाणे बाहेर पडले. माझ्याजवळ माझी मोठी हॅन्डबॅगही होती. त्यात मी कादंबरीचं हस्तलिखित ठेवायचे. पण त्या दिवशी विचारांच्या नादात, त्या बाबागाडीत हस्तलिखित ठेवलं मी आणि त्या हॅन्डबॅगेत बाळ ठेवलं. 

मनू - कुठं ठेवली ती हॅन्डबॅग तुम्ही?

शारदा - कृपा करून विचारू नका मला ते. मला आठवणही नको आहे त्या गोष्टीची. 

मनू - शारदा ताई, हा प्रश्न माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्या बॅगेचं काय झालं ते मला कळलंच पाहिजे. 

शारदा - ती बॅग मी व्हिक्टोरिया टर्मिनसच्या क्लोकरूममध्ये ठेवली. 

मनू - शाल्मली, तू एक सेकंद थांब, मला माझ्या रूममध्ये आत्ताच्या आत्ता गेलंच पाहिजे. 

शाल्मली - जर फार वेळ घेणार नसशील तू, तर, सगळा जन्म तुझ्यासाठी तुझी वाट पाहीन, अशी शपथ घ्यायला तयार आहे मी. (मनू प्रचंड एक्साइट होऊन आत जातो)

डॉ.फणसे - ह्या सगळ्याचा अर्थ काय? मला तर काहीच समजत नाहीये. 

संगीता - जे घडलंय असं वाटतंय, ते घडलेलं नसावं असं वाटतंय मला! (आतून धाडधाड असे बॅगा उलथल्याचे आवाज येतात. सगळे जण टवकारून ऐकू लागतात)

मधुरा - मनूकाका खूप एक्साइट झालाय. 

डॉ.फणसे - खऱ्यांचा स्वभाव अत्यंत भावनाशील आहे. 

संगीता - केवढा आवाज येतोय. समाजवाद्यांची चर्चा चालू आहे असं वाटतंय. मला चर्चा आवडत नाहीत अजिबात. आपली श्रद्धा नसलेल्या गोष्टीही खऱ्या वाटायला लागतात चर्चांमुळं!  

डॉ.फणसे - थांबले वाटतं आवाज. (अजून मोठ्यानं आवाज येऊ लागतात.)

संगीता - किती वेळ झाला, चर्चा संपतच नाहीये. आता काहीतरी निर्णय घ्यायला लागणार मनूला, समाजवाद्यांसारखं करून कसं चालेल? 

शाल्मली - काय सांगणार मनू आता इथं येऊन? किती थ्रिलिंग आहे हे सगळं! मला तर वाटतंय की लवकर सुटूच नये हा सस्पेन्स. (तेवढ्यात मनू येतो. त्याच्या हातात काळ्या लेदरची एक मोठी हॅन्डबॅग आहे. शारदाला दाखवतो.)

मनू - हीच का ती हॅन्डबॅग? नीट बघा. तुमच्या उत्तरावर चार लोकांच्या आयुष्यातलं सुख अवलंबून आहे. 

शारदा - (शांतपणे) हो, ही माझीच बॅग दिसतेय. हे काय, ही ह्या इथं फाटली होती. बाबुलनाथाजवळ एक रिक्षावाला मला धडक देऊन गेला होता तेव्हा. मी शिवून आणली होती चांभाराकडनं. हा आतल्या बाजूला कुंकवाचा करंडा सांडला होता त्याचा डाग. आणि इथं कुलुपावर माझी इनिशियल्स. ही बॅग माझीच आहे. काही शंकाच नाही. बरं झालं बाई इतक्या वर्षांनी मिळाली. किती चुकल्याचुकल्यासारखं होत होतं मला गेली अठ्ठावीस वर्षं, ह्या बॅगशिवाय. 

मनू - अहो, शारदा बाई तुम्हाला तुमची बॅगच सापडलीय, पण मला मीच सापडलोय. त्या बॅगेत ठेवलेलं बाळ म्हणजे मी होतो. 

शारदा - तुम्ही? 

मनू - (तिला मिठी मारत) हो... आई!

शारदा - (सात्त्विक संतापाने) मि. खरे. माझं लग्न झालेलं नाहीये. 

मनू - तुझं लग्न झालेलं नाहीये आई? काही हरकत नाही. घाबरू नकोस मला मुलगा म्हणायला. शेवटी तू ही खूप दुःख भोगलंयस. तुला आता कोण दोष देणार आहे? कुंतीला समजून घेतोच ना आपण? दुःख पापाचं परिमार्जन करतं म्हणतात ते असं. आणि समज, तू पुरुष असतीस, तर तू मला असं ढकललं असतंस का? पुरुषांना एक न्याय आणि स्त्रियांना दुसरा असं का असावं आई? 

शारदा - (थोडी चिडलेली) मि. खरे, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. (संगीताकडं बोट दाखवून) ह्या सगळं सांगतील तुम्हाला, तुम्ही कोण आहात ते. 

मनू - (हताशपणे) संगीतामावशी, मला भोचकपणा आवडत नाही, पण तुम्ही सांगाल का मला, मी कोण आहे ते? 

संगीता - मन घट्ट कर मनू. तुला धक्का बसणार आहे, मी जे काही सांगेन त्यामुळं! माझी धाकटी बहीण, माधवी सुकथनकर, हिच्या थोरल्या दिराचा मुलगा आहेस तू. सॉरी मनू, तुला कडू असलं तरी सत्य स्वीकारायलाच पाहिजे. तू समीरचा चुलत भाऊ आहेस.

मनू - समीर चुलत भाऊ! 

संगीता - मोठा चुलत भाऊ. 

मनू - म्हणजे मला भाऊ आहे तर! मला नेहमी वाटायचं बरं का संगीतामावशी की, मला भाऊ आहेच म्हणून. मधुरा, तुला मघाशी वाटलंच कसं  की, मला भाऊच नाहीये म्हणून. मी तुझ्याशी खोटं बोलतोय असं तुला वाटलंच कसं? (समीरला मिठी मारतो) डॉ.फणसे, हा समीर, माझा दुर्दैवी भाऊ. ओह, माय गॉड, शारदाताई, समीर माझा दुर्दैवी भाऊ आहे. शाल्मली, तुझा मावसभाऊ माझा चुलतभाऊ निघाला. इतकी वर्ष त्याचा जिवाभावाचा मित्र त्याचा चुलतभाऊ आहे, हेच माहिती नव्हतं त्याला. बिचारा समीर. ओह, माय गॉड! समीर किती भोगायला लागलंय तुला? ...एक जाब मात्र तुला विचारायलाच हवा. मी तुझा चुलतभाऊ असून, तू माझ्याशी कधी चुलतभावासारखा वागलासच नाही कधी. 

समीर - प्रॅक्टिस नव्हती मला. तुझ्याशी मित्रासारखं वागण्याचीच सवय झाली होती!  

शाल्मली - (मनूला) मनू, एक विचारू? 

मनू - काय? 

शाल्मली - तुझं नाव काय आहे मनू? तू आता दुसराच कोणीतरी झालायस म्हणून विचारतेय. 

मनू - बापरे! ते विसरूनच गेलो मी. तुझा सत्यशीलबद्दलचा निर्णय ठाम आहे? 

शाल्मली - मी एकवेळ प्रियकर बदलीन, पण माझा निश्चय बदलणार नाही. लग्न करीन तर सत्यशीलशीच! 

मधुरा - किती करारी आहेस तू शाल्मली!

मनू - माझ्या नावाचा हा प्रश्न एका मिनिटात सोडवता येईल. संगीतामावशी, जेव्हा शारदाबाई मला घेऊन मरीन ड्राइव्हवरच्या बंगल्यातनं बाहेर पडल्या, तेव्हा माझं बारसं झालेलं होतं? 

संगीता - प्रश्नच नाही. बॅरिस्टर सुकथनकर तुझे आजोबा होते. ते बारसं केल्याशिवाय कसे राहतील? बाळाचं नाव ठेवलं नाही, तर केवढे लीगल प्रॉब्लेम्स होतात माहीत होतं त्यांना. नावात काय आणि किती असतं, हे माहीत होतं त्यांना.   

मनू - म्हणजे माझं बारसं तर झालंय. तो एक प्रश्न सुटला. आता माझं नाव काय ठेवलं गेलं होतं? 

संगीता - बॅरिस्टर सुकथनकर थोडे सनातनी होते. आणि तू त्यांचा सर्वांत थोरला नातू असल्यानं, त्यांनी तुझं नाव, त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या नावावरूनच ठेवलं होतं. 

मनू - (इरिटेट झालेला) मग माझ्या पणजोबांचं नाव काय होतं? 

संगीता - (विचार पडलीय) ते तेवढं आठवत नाहीये मला. पण ते मोठे आयसीएस ऑफिसर होते. पण एक मी नक्की सांगते की, त्यांना निश्चित असं नाव होतं. तेवढं नक्की आठवतंय मला. आणि अरे, सांगायची गोष्ट म्हणजे, ते खूप एक्सेन्ट्रिक होते. त्यांच्या नातवाला, म्हणजे तुझ्या वडिलांना कडेवर घेऊन मरीन ड्राइव्हवर पळायला जायचे. शिवाय शेवटी शेवटी त्यांची स्मृती गेली होती आणि अगदी शेवटी शेवटी ते काकाकुवासारखे ओरडायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा खूप ताण आला होता त्यांना. ‘कसं होणार भारताचं’, ‘कसं होणार भारताचं’, असं ओरडायचे ते शेवटी शेवटी, काकाकुवाच्या आवाजात. 

मनू - समीर, तुला तुझ्या काकांच्या आजोबांचं नाव माहिती आहे? 

समीर - अरे, माझ्या काकांचे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे आजोबाच नाहीत का? 

मनू - तुला आजोबांच्या वडिलांच, सॉरी तुझ्या पणजोबांचं नाव माहिती आहे? 

समीर - नाही. मला खरं तर माझ्या आजोबांचं, म्हणजे आपल्या आजोबांचंसुद्धा नाव माहिती नाहीये. 

मनू - तुला तुझ्या आजोबांचं नाव माहिती नाहीये? 

समीर - तुला माहिती आहे का, तुझेही आजोबा होते ना ते? 

समीर - नाही. माझा आणि माझ्या वडिलांचा संबंधच राहिला नव्हता. आम्ही एकमेकांशी काही बोलावं असे संबंध नव्हते आमचे. मी एक वर्षांचा असतानाच बाबा गेले. आणि तू एक वर्षांचा व्हायच्या आत आजोबा गेले. 

मनू - आजोबा गेले तेव्हा तू किती वर्षांचा होतास?

समीर - माझ्या मायनस एकाव्या वाढदिवशीच आजोबा गेले. कुणी केकसुद्धा कापला नाही त्यानंतर दोन वर्षं माझ्या वाढदिवसाला. डायरेक्ट मी एक वर्षांचा झाल्यावरच कापला. 

मनू - आपले पणजोबा, आयसीएस होते. म्हणजे ‘सारस्वत हूज हू’मध्ये नक्की असणार ते. 

संगीता - हो, आयसीएस. सुकथनकर हे अतिशय प्रसिद्ध होते. काकाकुवाचा आवाज छान काढायचे ते. 

मनू - नेटवर सापडेल ‘सारस्वत हूज हू’. (घाईघाईनं फोनवर नेट उघडून) सावरखेडकर, संगीतकर, सुकथनकर... आयसीएस सुकथनकर, जन्म १९०१, संपूर्ण नाव, सत्यशील म्हाळसाकांत सुकथनकर. (अतिशय आनंदाने.) मी सांगितलं होतं तुला शाल्मली माझं नाव सत्यशील आहे म्हणून. नव्हतं सांगितलं? किती रागावलीस तू माझ्यावर विनाकारण! शाल्मली, मी सत्यशील खरे नाही, खरा सत्यशील आहे. 

संगीता - येस! आता आठवलं मला. त्यांचं नाव सत्यशीलच होतं. खरं सांगायचं तर नावं विसरत नाही मी सहसा. पण मला अगदीच आवडायचं नाही ते नाव, म्हणून विसरायला झालं. 

मनू - नावात सत्य आहे ना? कसं आवडणार तुला? 

संगीता - प्रतिष्ठा आली की, सत्याचा कंटाळा येतो सत्यशील.  

शाल्मली - सत्यशील, माझा सत्यशील. मला वाटतंच होतं पहिल्यापासून, तुझं दुसरं कुठलं नाव असूच शकत नाही म्हणून. 

मनू - शाल्मली, मी, न कळत का होईना, तुझ्याशी नेहमी खरं बोलत आलोय, हे जाणवल्यावर अतिशय लाज वाटतेय मला. पण तू मला मिळावीस म्हणून मी खरं बोललो. परत असं खरं बोलणार नाही मी तुझ्याशी. खरंच!...जमलं तर मला माफ कर.  

शाल्मली - मी माफ केलंय तुला सत्यशील. अरे, लग्न झाल्यावर सुधारतात पुरुष. 

मनू - शाल्मली! (तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढतो)

डॉ.फणसे - (शारदाला जवळ ओढतात) सरस्वती… आपलं शारदा…

शारदा - (उत्साहानं) हे काय डॉ.फणसे? 

डॉ.फणसे - (लाडानं) आता डॉ.फणसे नाही, नावानं हाक मारायची मला. 

शारदा - वामन! किती गोड नाव आहे रे तुझं? 

डॉ.फणसे - अगदी फणसाचा गरा खाल्यासारखं वाटतं की नाही?   

शारदा - वामन, तुझ्या स्वयंसेवक मित्रांना आवडेल तू लग्न केलेलं. 

डॉ.फणसे - त्याचा विचार नाही करायचा आता. त्यांना एक शेवटची कांदेपोह्यांची पार्टी देऊ. आणि शेवटी त्या पार्टीत एक गाणं लावू. 

शारदा - कुठलं गाणं? 

डॉ.फणसे - ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’. (सगळे हसतात. हसणं ओसरल्यावर-)

शारदा - सुटलो बाई आम्ही दोघी एकदाच्या! हुश्श!

डॉ.फणसे - तू सुटलीस ते कळलं शारू डार्लिंग, पण दुसरी कोण सुटली?  

शारदा - ती भारतमाता. 

समीर - मधुरा! (तिला जवळ घेतो) अ‍ॅट लास्ट. माझी मधुरा!

मनू - शाल्मली! (तिला जवळ घेतो) अ‍ॅट लास्ट!

संगीता - तू आता माझाही भाचा आहेस म्हणून सांगते आहे तुला. तुझं प्रेम अतिशय थिल्लर आणि उथळ प्रकारे व्यक्त करतो आहेस तू सत्यशील! 

मनू - नाही संगीतामावशी, उलट आयुष्यात पहिल्यांदाच मला सत्यशील असण्याचं महत्त्व कळतंय. सत्याचं तर महत्त्व कळतंच आहे, पण शीलाचंही महत्त्व कळतंय. 

(पडदा)

.................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा