‘एक मुद्दत से तिरी याद भी आई न हमें
और हम भूल गए हों तुझें ऐसा भी नहीं’
- फ़िराक़ गोरखपुरी
माझं मूळ गाव सोलापूर. अर्थात आता आमचं तिथं काही नाही, पण लहानपणी दर सुट्टीत सोलापूरला जायचो. आमची आवडती ‘मिनार एक्स्प्रेस’ आणि त्यात आम्हाला सहा जणांना मिळालेला कुपे म्हणजे स्वर्गच वाटायचा. आम्ही बहीण-भाऊ आणि आई-बाबा मिळून सहा जण. बाबा रेल्वेच्या कार्यालयात क्लार्क म्हणून काम करायचे. ते पार खालच्या पदावरून परीक्षा देत देत वरती आले. त्यांच्या नोकरीची सुरुवात टिकेकरवाडीपासून झाली.
ते सांगायचे- त्यांची आई म्हणजे आमची आजी मालगाडीच्या गार्डबरोबर डबा पाठवायची. पोळीच्या खाली खर्चासाठी एखाद-दोन आणे असायचे. मालगाडी थांबणारी नसल्याने गार्ड चक्क डबा फलाटावर फेकायचा. हे तो घेऊन जेवायचे. सोलापुरात बाबांच्या कष्टाला पारावार नव्हता. लहानपणी शिक्षणासाठी पैसे स्वतःच मिळवावे लागायचे. बाबा दूध टाकायचे सायकलवरून. मालक वर्षाच्या सुरुवातीला दहा किलोमीटर दूर घरी बोलवायचा आणि शाळेच्या ड्रेसची जोडी द्यायचा. मावशा-मामा श्रीमंत होते, पण ती समृद्धी यांच्याकडे कधी वळली नाही. जी काही जमीन होती, ती कुळ-कायद्यात आणि नंतर बहिणीच्या लग्नासाठी फुंकून टाकली, आणि नेसत्या वस्त्रानिशी मुंबईत आले.
आमच्या मावशीच्या दीरांनी पैशाची मदत केली, म्हणून डोंबिवलीला घर घेता आले. ते सतत बोलून दाखवायचे, अपमान करायचे, पण पहाडासारखे बाबा गप्प बसलेले मला बघवायचे नाहीत. पैसा वाईट असतो. नसला की, कुणीच विचारत नाही आणि असला की, अहंकार यायला वेळ लागत नाही. बाबा नेहमी म्हणत- ‘क्या खाना, तो दम खाना’. मला सांगायचे- ‘कधीही पैसा आणि मुलगी यांच्या मागे लागू नकोस. त्यांनी तुझ्या मागं लागायला हवं असं तुझं कर्तृत्व असायला हवं.’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कामावर जाताना कर्जत लोकलने दूध घेऊन डोंबिवलीला रोज उतरणाऱ्यांबरोबर एकदा बाबांची गाडी पकडताना धक्काबुक्की झाली. बाबांनी एकाची गुच्ची पकडली. म्हणाले, ‘किटली खाली ठेव.’ त्याने घाबरून किटली खाली ठेवल्यावर यांनी त्याच्या कानाखाली एक सणसणीत चपराक दिली. इतर मित्र म्हणाले, ‘मारलं वगैरे ठीक, पण ती किटली खाली ठेवायला का सांगितली?’ तर म्हणाले, ‘किटली पडून दूध सांडले असते, तर त्याचे नुकसान झाले असते ते टाळण्यासाठी...’ हे लॉजिक बहुधा बाबा स्वतः दूध टाकायचे, त्यातून तयार झालं असावं.
त्या वेळी रेल्वेत पगार तसे कमीच होते, पण फिरण्याचा पास म्हणजे जादूची कांडी होता. बाबांच्या पासवर आम्ही खूप फिरलो. त्या काळी सतत प्रवासाची लोकांना सवय नव्हती. त्यामुळे बाबा टाईमटेबलवरून गाड्यांचे प्रवास आखून द्यायचे. बाबांना नवीन वर्षाचं टाईमटेबल घेतल्याशिवाय चैन पडायचं नाही.
नंतर मी नोकरीला लागलो. बाबा निवृत्त झाल्यावर ते होते, तोवर मी त्यांना टाईमटेबल विकत आणून द्यायचो. बाबा नोकरीला असतानाच मला नोकरी मिळाली. त्या वेळी रेल्वेत नोकरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना नकळत एक सहानुभूती असावी, असं वाटतं. बाबा माझ्या मुलाखतीच्या अगोदर त्यांच्या अनेक जुन्या साहेबांना भेटून आलेले. मला माझ्या नोकरीचं स्वरूप (प्रोफाइल) माहीत नव्हतं, पण त्यांना ते ठाऊक होतं. नंतर ते निवृत्त झाल्यावर त्यांच्याबरोबर काम केलेल्यांची कधी भेट झाली आणि आठवण निघाली की, ती मंडळी बाबांबद्दल भारावून बोलायची. आपणही आपला चांगुलपणा टिकवायला हवा, हे त्या वेळी मनाशी पक्कं होत जायचं. आजही त्यांची आठवण काढणारी माणसं भेटतात.
...तर सोलापूर आमच्या लहानपणी खूप हवंहवंसं होतं. व्ही. शांताराम यांनी काढलेला ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ हा चित्रपट आवडलेला होता. ते सोलापूरचे हे नंतर कळलं. चीनमध्ये त्यांच्यावर शालेय पाठ्यपुस्तकात एक धडादेखील आहे, पण दुर्दैवानं आपल्याला चित्रपटातूनच त्यांची ओळख करून घ्यावी लागते. असो. माझा आवडता कोलंबियन लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्केज म्हणतो- ‘what matters in life is not what happens to you, but what you remember and how you remember it...’
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
आमचा एक काका सिव्हिल लाईन्सच्या चाळीत राहायचा. एकदा रात्री गाडीत (तीच ती ‘मिनार एक्स्प्रेस’!) पाय दुमडून झोपलो, तर सकाळी पाय आखडलेल्या अवस्थेत बाबांनी मला स्टेशनपासून त्या घरापर्यंत हातात उचलून नेलं होतं. काकांच्या घरी आल्यावर गड्ड्याची जत्रा, भागवत टॉकीजच्या बाहेरचा गोटीसोडा, किल्ल्यावर संध्याकाळी फिरायला जाणं, सोबत आजीच्या हातचे धपाटे असायचे.
आजीचं घर जुन्या विठ्ठल मंदिराच्या परिसरात होतं. ती डॅशिंग होती. परिसरातील लोकांना तिचा धाक होता आणि बायकांना आधार. कुणा नवऱ्यानं बायकोला वगैरे मारलं, तर ती त्याला रस्त्यावर आडवा करून बदडायला कमी करायची नाही. एकदा डोंबिवलीत आमच्या घरी तिच्या समोरच मी लवंगी माळेतले फटाके खिशात ठेवून एक-एक सुटे उडवत होतो, तर खिशातल्या फटाक्यांवर ठिणगी उडून आग लागली, तेव्हा आजीने स्वतःची पर्वा न करता माझ्या शर्टाचा खिसा टराटरा फाडला आणि पुढचा अनर्थ टाळला. मी आपला उगाचच बोंबलत होतो आणि आजीच्या हाताला भाजलेलं असतानाही ती शांत होती!
ती वारली तेव्हा पहाटे आम्ही पोचलो. काका-बाबा टक्कल करून आले होते. मग दुसऱ्या दिवशी आम्हालाही केस कापायला पिटाळलं गेलं. आम्ही पण अगाऊपणा करत चकोट करून आलो. तर सकाळी स्वयंपाकाची बाई घरात शिरायलाच तयार होईना. तिला कळेना किती मयत झाली आहेत.
नंतर नात्या-नात्यातले, घरातल्यांचे मान-अपमान आणि भांडणं, यामुळे सोलापूर नरक वाटायला लागला. खूप संपत्ती वगैरे होती अशातलाही भाग नव्हता, पण दुरावा वाढ गेला. काकांचं घर दुरावलं, मग आत्याच्या घरी उतरायला लागलो. तिचा बंगला हिप्परगा तलावाच्या मागच्या बाजूला होता. ज्ञानदीप हाऊसिंग सोसायटीच्या आवारात फिरायला मजा यायची. आत्याने माझ्यावर खूप प्रेम केलं. ती भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीला होती. ती त्या काळातली बी.ए., मराठी होती. आमच्या घरच्या अल्बममध्ये तिचे पदवी घेतानाचे फोटो होते. आम्हाला खूप कौतुक होतं तिचं, पण तिचा आमच्या आईवर आणि बहिणीवर प्रचंड राग. बाबांनी तिचं लग्न लावून दिलं, ते तिला आवडलं नव्हतं, असं काही तरी कारण या दुस्वास करण्यामागे असावं. आता आत्याची मुलंही पुण्या-मुंबईत नोकरीनिमित्त स्थिरावली आहेत.
जवळच्या नातेवाईकांची आपसातली भांडणं वगैरे बघून, ऐकून मनात एक सोलापूरबद्दल अढीच बसली. सोलापूरच्या मुलीशी चुकूनही लग्न करायचं नाही याची काळजी घेतली. असं काही कुणी जीव पाखडत नव्हतंच, पण सोलापूरची मुलगी बायको म्हणून नको यावर ठाम होतो. सुदैवानं मला मुंबईचीच मुलगी चालून आली आणि आमचं लग्न झालं.
अक्कलकोटला बसने जाण्यात गंमत होती. कधी कधी शेअरिंग जीपने जायचो. ड्रायव्हर म्हणायचा, ‘हजारो हरणांचा कळप असा समोरून गेला वगैरे’. पण आम्हाला आजतागायत या रस्त्यावर काही कधी हरणं दिसली नाहीत.
सोलापूरची खरी ओळख माळढोकची. त्याच्या शोधात नान्नजला अनेकदा गेलोय. एकदा पहाटेच आत्याला घेऊन निघालो. जंगलातला निवांतपणा दिसताक्षणी ती उत्स्फूर्तपणे ‘मनाचे श्लोक’ म्हणायला लागली. मात्र वरती मचाणावर बसून पक्ष्यांची वाट बघणारे आमचे चिरंजीव भडकले, पण पक्षी बघायला शांतता पाळावी लागते, हा संकेत त्याला माहीत असण्याचं काही कारण नव्हतं.
रेल्वेच्या आवारातून बाहेर पडलं की, डाव्या बाजूला महात्माजींचा पुतळा आणि उजव्या बाजूला रेल्वेच्या वसाहती. त्या ओलांडून गेलं की, सलगरवाडी. दया पवारांच्या पुस्तकातले अनेक अनुभव या वाडीवरून पार होताना मनात जागे व्हायचे...
जुनं सोलापूर गिचमिडीत होतं. जुन्या विठ्ठल मंदिराजवळ आमचं पूर्वीचं घर होतं. बांबांचे जुने मित्र कधी मधी भेटायला यायचे, तेव्हा त्यांच्या गप्पांमधून बरंच काही ऐकायला मिळायचं. ते सगळे गरीब असले तरी जीवाभावाचे दोस्त होते.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
नव्याने बनलेल्या सातरस्त्याच्या वाटेवर पावसाळ्यात पुढे-मागे शिरिषाची फुललेली झाडं बघण्यासाठी जीव आसुसलेला असायचा. सोलापूरहून येणारी गाडी चालवताना मी उगाचच हवेत असायचो. प.रेल्वेत रोज ५०० किलोमीटर अंतरापर्यंत गाडी चालवताना सोलापूर पण तेवढ्याच अंतरावर आहे, हे सतत मनात जागं असायचं. पण त्यासाठी लहानपणी केवढी तयारी आणि उत्सुकता असायची. कैक दिवस अगोदर आणि नंतर चर्चा व्हायची.
सोलापूर यायच्या अगोदर कुर्डुवाडी, बाळं या स्टेशनवर पहाटे उतरून स्वच्छ श्वास भरून घ्यायला खूप आवडायचं. सोलापूर येतंय ही पहाटेच्या सुखद गारव्यात दडलेली हुळहुळवून टाकणारी भावना असायची. गिरण्यांची धुराडी दिसायला लागली की, सोलापूरच्या वेशीवर आपण पोचलोय हे समजायचं. स्टेशनवर बाहेर पडलो की, समोर जुनं मीटरगेजवर चालणाऱ्या इंजिनचं दर्शन व्हायचं. रेल्वेचा इतिहास अशा अनेक इंजिनानी घडवलेला आहे.
सकाळी सकाळी आत्याच्या घरी पोचून चहा घेतला की, मस्त फ्रेश वाटायचं. आत्या पण माझ्यासाठी स्पेशल दुधाचा चहा करायची. तिने खूप कष्टानं उभा केलेला बंगला आमच्या गजबजलेल्या गर्दीनं बाळसं धरायचा. त्या वेळी गिझर वगैरे नवीनच असल्यानं ती स्वतः सगळ्यांना गरम पाणी मिळण्यासाठी तडफडायची. सगळं स्वतः करायची. गिझर वापरताना कुणी चूक करू नये, यासाठी काळजी घ्यायची.
बाबा त्यांच्या कॉलेजच्या दिवसात जब्बार पटेल, श्रीराम पुजारी यांच्या कार्यक्रमाच्या आठवणी सांगायचे, तेव्हा मी अचंबित व्हायचो. नंतर वाचायला लागलो, तेव्हा बरंच काही उलगडायला लागलं. मग त्र्यं. वि. सरदेशमुख (डांगोरा एका नगरीचा) वगैरे वाचनानं एका वेगळ्या सोलापूरच्या प्रेमात पडू लागलो. नंतर नितीन वैद्यसारखा खजिना हाताशी लागला. त्यांच्या ‘आशय परिवारा’ने वाचन अधिक समृद्ध होऊ लागले. इतके उमदा, दिलदार लेखक सोलापूरचे कसे काय, असा प्रश्न पडायचा.
सोलापुरातील महत्त्वाच्या घटना डफरीन चौकाच्या अवतीभवती घडत असतात. या डफरीनचा शोध घेताना बरेच काही हाताशी लागले. लॉर्ड डफरीन १८८४-१८८८ या काळात भारताचा व्हाईसरॉय होता. यांच्या हस्ते वाराणसीजवळ गंगा नदीवर रेल्वेच्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन झालं होतं. या पुलाला ‘डफरीन पुला’च्या नावानंच ओळखलं जायचं. १९४७ साली या पुलाचं नाव बदलून ‘मालविया पूल’ असं ठेवलं गेलं.
सोलापूरच्या इतिहासात हुतात्मा पार्कला भारी महत्त्व. १९३०ला गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात सगळा सोलापूर मनापासून सामील झाला होता. जिथं समुद्र नाही तिथं लोकांनी दारूबंदीसाठी आंदोलन करावं, शिंदीची झाडं तोडून आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान केलं होतं. त्याप्रमाणे सोलापूरच्या कामगारांनी आंदोलनात सहभागी होताच मूठभर ब्रिटिशांच्या गोटात भीतीची लहर पसरली. सकाळी सकाळी कामगार मंगळवार पेठेत जमायला लागले. त्यात ब्रिटिशांच्या अत्याचाराला कंटाळून लोक अतिच आक्रमक झाले. या धांदलीत तिथली पोलीस चौकी जाळण्यात आली. त्यात दोन पोलीस जळून खाक झाले.
त्या वेळचा ब्रिटिश कमिशनर हेन्री नाईटने दुसऱ्या दिवशी कामगारांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ९ कामगार मेले. लोक अजूनच भडकले. सोलापूरकरांनी गोल चावडी येथील न्यायालयाची इमारत जाळून टाकली. लोकांचा क्षोभ बघून शहरातले गिनेचुने ब्रिटिश लोक रेल्वे स्टेशनच्या आसऱ्याला गेले. तिथून मोठ्या फौजफाट्यासह सैनिकांना बोलावण्यात आलं.
दरम्यान ९, १०, ११, १२ मे (१९३०) हे संपूर्ण चार दिवस सोलापूर स्वतंत्र होतं. शहरात नगरपालिकेवर तिरंगा फडकत होता. बाकी संपूर्ण देशात इंग्रजी सत्ता असली, तरी सोलापूर स्थानिक लोक सांभाळत होते. मग सोलापूर शहर चहूबाजूंनी बंद केलं गेलं आणि १२ मे १९३० ते ३० जून १९३०पर्यंत मार्शल लॉ लागू झाला. त्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. शहरात दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश निघाले. सगळीकडे दहशत पसरवली गेली. पोलीस चौकी जाळल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. त्यांना स्वतःच्या बचावाची कसलीही संधी न देता १२ जानेवारी १९३१ साली फाशी देण्यात आली.
सोलापुरातील जानेवारी महिन्यातील गड्ड्याच्या जत्रेच्या शेकडो वर्षांच्या परंपरेला या दिवशी खीळ बसली आणि नंदीध्वजाची - काठ्यांची मिरवणूक निघाली नाही. तब्बल ४१ दिवसांनी सोलापूरची मार्शल लॉमधून सुटका झाली. या काळात सोलापूरमध्ये ब्रिटिशांनी भयंकर अत्याचार केले. स्वातंत्र्यानंतर त्या चार हुतात्यांचं स्मारक उभं राहिलं, त्यांच्या नावानं ‘हुतात्मा स्मृती मंदिर’ उभारलं गेलं. पुणे-सोलापूर गाडी सुरू करताना गाडीचं नाव काय ठेवायचं, यावरून वाद सुरू झाले, तेव्हा समजूतदार ज्येष्ठ सोलापूरकरांनी ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ (१२१५७/५८) या नावाला मान्यता दिली.
सोलापूरचा ‘होटगी नाका’ (महाराष्ट्र-कर्नाटक हद्द!) जसा प्रसिद्ध आहे, तसेच अनेक चौक स्वतःचं वैशिष्ट्य घेऊन उभे आहेत. यात वैशिष्ट्यपूर्ण चौक म्हणजे ‘मेकॅनिक चौक’. यात सगळी यांत्रिकी संबंधित दुकानं, छोट्या-मोठ्या फाऊंड्रीज आहेत. याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तिथलं ‘गदग ग्रँड हॉटेल’. या ठिकाणी चविष्ट दाक्षिणात्य पदार्थ मिळायचे. नुकतेच नितीन वैद्य सांगत होते की, या गदगच्या बाजूला मोठ्ठा मॉल उभा राहिला आहे. ‘गदग ग्रँड’चं ‘गदग एक्स्प्रेस’ झालं आहे, आणि मुख्य म्हणजे ते रेल्वे डब्याच्या आकाराचं बांधलं आहे. विजापूरला जाणाऱ्या मीटरगेज गाडीचं नाव ‘गदग एक्स्प्रेस’ होतं.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
याच्याच थोडं दूर ‘जिक्रिया’ नावाचं मुसलमानांचं हॉटेल होतं. जुनी गाणी वाजवणारा भोपू यांच्याजवळ होता. लोक तिथं चहा-नाष्टा करायला यायचे, तेव्हा त्यांना जुनी गाणी ऐकायला मिळायची. माधव मोहळकर (गीतयात्री), निशिकांत ठकार, रंगनाथ तिवारी ही मंडळी या ठिकाणी नैमित्तिक हजेरी लावायची.
तसा सोलापूर जिल्हा कर्नाटकला जवळचा. माझी आई पण कानडीच, मराठीने केला कानडीशी भर्तार! सोलापूर-विजापूर (आताचं विजयपुरा) यांच्यात रोटी-बेटीचे व्यवहार सर्रास होत. त्यामुळे इथं गल्ली-बोळात वडा-इडली सहजच उपलब्ध असायची. गेल्या काही वर्षांत ‘सुधा’ या उपहारगृहाचं नाव गाजत आहे. कुठून कुठून लोक हे हॉटेल शोधत येतात.
इथलं सिद्धेश्वर मंदिर फारच प्रसिद्ध. संध्याकाळी या तलावाच्या काठावर बसून मासे बघत राहायला खूप आवडायचं. याच्या काठावरून मांजरी फिरायच्या. मनात यायचं या इथं काय शोधतात? एकदा संध्याकाळी निवांत बसलो असताना मांजर पाण्यात बघत भिरभिरत होती, इतक्यात भाविकांनी टाकलेलं खाद्य खायला मासे वर आले आणि मांजरानं झपाट्यानं एक मासा पकडला. तो मांजरीच्या झपाटा नजरेचं पारणं फेडून गेला. या ठिकाणी देवाला अधूनमधून भरलेली पानांची वाडी नेहमीच नजरेसमोर येते.
कर्नाटकातील प्रसिद्ध गुरुवर्य बसवेश्वरांना मानणारे सिद्धरामेश्वर हे बाराव्या शतकातले मोठे संत. त्यांचं कार्य सोलापूर परिसरातच. एक तरुणी त्यांच्याबरोबरच लग्न करण्याचा हट्ट करू लागली, तेव्हा सिद्धरारामेश्वर स्वामींनी तिला त्यांच्या हातातील युगदंडाशी विवाह करण्याची परवानगी दिली. ही उंच काठी नंतरच्या काळात सौभाग्याचं प्रतीक म्हणून नावारूपाला आली, म्हणून गड्ड्याच्या यात्रेत या उंच काठ्यांची मिरवणूक प्रसिद्ध आहे.
इथली महानगरपालिकेची इमारतही खूपच देखणी आहे. मल्लप्पा वरड नावाचे उद्योगपती लोकमान्यांच्या विश्वासातले, खाजगी बैठकीतले. यांनी स्वतः ही देखणी इमारत बनवून घेतली. त्यांच्या मनात होतं की, कुठल्या तरी सामाजिक दायित्व असलेल्या संस्थेच्या माध्यमातून या इमारतीचा लोकांसाठी उपयोग व्हावा. त्यातून ती महानगरपालिकेच्या अखत्यारीत सोपवली गेली. १९३० सालच्या आंदोलनात या एकमेव सरकारी इमारतीवर भारतीय तिरंगा फडकवला गेला होता.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
सोलापूरपासून तासाभराच्या अंतरावर अंकोलीला आमचं कुलदैवत भैरोबाचं स्थान आहे. तिथं जाण्यासाठी भैय्या चौकात दिवसच्या दिवस आम्ही बसची वाट बघण्यात घालवला आहे. बाबा सांगायचे- एके काळी देगांवच्या पुढे नदी बोटीतून ओलांडून वगैरे जावं लागायचं. आता धार्मिक पर्यटन वाढण्याच्या उद्देशानं सगळे रस्ते सुसाट झाले आहेत.
अंकोलीत प्रगतीशील शेतकरी अरुण देशपांडेंनी फार पूर्वीपासून शेतीचे आधुनिक प्रयोग इथं रुजवले आहेत. एवढंच नव्हे, शेततळ्याची कल्पनाही यशस्वीपणे राबवली आहे. इथला परिसर नेहमीच हिरवागार दिसायचा. कामती, कुरुलची बोरं/पेरू भरपूर प्रसिद्ध आहेत, असं लहानपणापासून ऐकतोय, पण या बाजारात ही फळं कधी मुबलक दिसली नाहीत.
आमच्या भैरोबा मंदिराच्या बाहेर एकाचं नारळाचं दुकान आहे. खूप वर्षांपासून स्वतःची गाडी घेऊन इथपर्यंत यावं अशी इच्छा होती. दोन वर्षांपूर्वी असा योग आला. मग त्या नारळाच्या दुकानाच्या मालकाला म्हणालो, ‘तुमच्या हस्ते नारळ वाढवून घेऊ.’ तोही हसत हसत तयार झाला. नारळ फोडताना हळूच म्हणाला, ‘गेल्याच महिन्यात मी ब्रेझा (कारचा ब्रँड) घेतली.’ आम्ही गप्पच झालो.
अंकोलीकडे येताना मंगळवेढा पार करून जावं लागतं. या ठिकाणी भीमा नदीचा संगम आहे. एकदा आत्या आमच्या चिरंजीवांना म्हणाली, संगम बघायला जाऊ. इथं शंकराचं जुनं हेमांडपंथी मंदिर आहे. इथल्या बाहेरच्या बाजूला असलेल्या दगडी नंदीचा दुमडलेला पाय बघूनच त्या अज्ञात कलाकारांसाठी नतमस्तक होतो.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
दिल्लीच्या एका प्रसिद्ध प्रकाशकाला तिथल्या स्थानिकांनी नेपाळ भेटीला बोलवलं. तिथं पशुपतीनाथाचं दर्शन करणं अपरिहार्यच असतं. महादेवाने वृषभ रूपात घेतलेल्या रूपाच्या काही खाणाखुणा इथं असल्यानं त्याला बारा ज्योतिर्लिंगाचा मानही आहे. तर हे प्रकाशक तिथल्या पायऱ्यांवरून खाली येताना कुठून तरी आलेल्या एका बैलानं यांना ढुशी मारली. त्यात हे पडले आणि यांचा पाय, गुडघा दुखावला गेला.
भारतात परतले, वर्षभर अनेक ठिकाणी उपाय करत राहिले, पण म्हणावा तसा काही उतार पडत नव्हता. एके दिवशी काही कामानिमित्त हे बंगलोरच्या दौऱ्यावर आले होते. सोबत स्थानिक ड्रायव्हर होता. यांना लंगडताना पाहून, सहजच दोघांमध्ये चर्चा झाली. म्हणाला, ‘तुम्ही बरेच उपाय केले असतील, पण इथल्या नंदीचं देवस्थान खूप जागृत मानलं जातं. जवळच आहे, एकदा भेट द्यायला काय हरकत काय?’ हे पण तयार झाले.
बेंगलोर वळ बसवन्नागुडीमधला नंदी विजयदेवराय काळातील पद्धतीप्रमाणे एकाच रंगाच्या म्हणजे राखाडी रंगाच्या ग्रॅनाईटमधून कोरून काढला आहे. तिथला परिसर खूपच देखणा आणि भव्य-दिव्य आहे. तर तिथं हे दोघं गेले, मनोभावे पूजा वगैरे करून परतले. ते प्रकाशक पुढे लिहितात की, त्यानंतर त्यांचं पायाचं दुखणं दूर पळून गेलं. अगदी ठणठणीत बरं झाल्याची नोंद ते करतात.
तर मंदिराचा घाट उतरून खाली पाय धुऊन आलो, पण दोन नद्या काही दिसल्या नाहीत...
नुकतीच पुन्हा भर पावसात तिथं भेट देऊन आलो. तेव्हा भीमा नदीचं पाणी सोडलं असल्यानं घाटाच्या पायथ्याशी जाणारा रस्ता कुलुपबंद होता. तिथल्या स्थानिक माणसानं सांगितलं की, भीमा नदीचे दोन प्रवाह या ठिकाणी एकत्र येतात म्हणून संगम म्हणतात. नदी एकच पण प्रवाह दोन, त्यामुळे संगम. तरीही तीर्थक्षेत्राचा मान नाही!
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
सोलापूर-विजापूर मीटरगेजचा प्रवास आवडीचा असायचा. त्या वेळी हे कधी डोक्यात आलं नाही की, आपणही कधी इंजिनचे चालक वगैरे होऊ. आता हाही मार्ग ब्रॉडगेज झालाय. प.रेल्वेकडे येणारी यशवंतपूर-बिकानेर ही गाडी आता विजापूर पार करून येते, हे कळल्यावर मी जेव्हा जेव्हा त्या गाडीवर काम करायचो, तेव्हा तेव्हा उगाचच हुरळून जायचो. आजही मला आजोळच्या या गाडीचं खूप कौतुक वाटतं. माझा जन्म विजापूरचा असल्यानेही असेल, पण कुठे तरी आतडं गुंतल्याचा आभास व्हायचा.
सोलापूर मनात खोल रुजलेलं आहे. नोकरीत लागल्यावर येणं-जाणं कमी कमी होत गेलं. मग लिहायला लागलो. सोलापुरातले हेमंत कुलकर्णीसारखे मित्र मिळाले. ते स्वतः रेल्वेतच असल्याने त्यांना आमच्या विभागातले ताणतणाव माहिती होते. एक दिवस अचानक सोलापूर लॉबीतून म्हणजे जिथे लोको पायलट/गार्ड ऑन/ ऑफ ड्यूटी करतात, तिथून एकाचा कौतुकाचा फोन आला, तर मी चमकलो. म्हटले, याने कुठे वाचले, कारण आमच्या विभागामध्ये वाचनाची तशी बोंबच. त्यात परभाषेतले अधिक. त्यामुळे रेल्वेची अधिकृत भाषा हिंदीच असते. चौकशी केली तेव्हा कळले की, माझा लेख त्यांच्या ऑफिसबाहेरच्या नोटीस बोर्डावर लागला आहे. हे जबरदस्त काम अर्थातच हेमंतने केलं होतं.
माझ्या विभागातली माणसं कामाच्या व्यापात वेळी-अवेळी घर गाठण्यात इतकी मश्गूल असतात की, त्यांच्यासाठी वाचन हा सर्वांत शेवटचा पर्याय असतो. त्यामुळे त्यातील कुणी कौतुक केलं तर बरंच वाटतं.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
मला सोलापूरचा एसटी डेपो समोरचा केटी चहा जबरदस्त आवडतो. आजकाल कारनेच येतो आणि पहाटे सोलापुरात शिरलो की, पहिला थांबा हाच असतो. सोलापूरच्या वातावरणातला हवाहवासा गारवा आणि उत्साह मी नेहमीच अनुभवलेला आहे. सोलापुरातली साधी भोळी शेतकरी माणसं, त्यांची रांगडी भाषा यांचा मला नेहमीच मोह वाटत आला आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक व्यंकटेश कुमारांचा कार्यक्रम ऐकायला /बघायला आम्ही तिघंही (सखी, मुलगा आणि मी) गेलो होतो. छान यमनची बंदीश रंगली होती. लोक सुरांवर झुलत होते. योग्य ठिकाणी पूरक दाद देणारे रसिक बघून कुठल्याही कलाकाराला आनंदच होतो. अचानक एका अनवट तानेवर लोकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या दिल्या. टाळ्यांचा भर ओसरताच पंडितजी अचानक मंचावर रडायला लागले. थोडासा भर कमी झाल्यावर पंडितजी बोलायला लागले. म्हणाले, “आमच्या धारवाडला तुमच्यासारखी रसिक माणसं येतच नाहीत, आजकाल तर शास्त्रीय संगीत शिकायला नवीन कुणीच येत नाही, पण महाराष्ट्रात जिथं जातो तिथं लोकांच्या टाळ्यांवर झुलत असतो. लोकही भरभरून दाद देतात. आमच्यासारख्या कलाकारांना नेहमीच मनापासून वाटत असतं की, आपल्या घरच्या माणसांनी आपलं कौतुक करावं, दाद द्यावी, पण या सुखाला आम्ही बऱ्याचदा तरसतो.” पुन्हा पुढची सम उचलून बुवा गाण्यात रमून गेले. आमचे डोळे मात्र पाणावले होते.
आपली धडपड आपल्या लोकांपर्यंत पोचावी, त्यांची दाद मिळावी, असं मनापासून वाटतं, पण आता ती नात्या-गोत्यातली प्रेम करणारी माणसं उरली नाहीत. कुणासाठी स्वतःचा जीव पाखडायचा? कुणाला सांगायचं की, मी आता बदललोय?
बघता-बघता शहर परकं होत गेलंय, पण आतडं मात्र अजूनही तिथंच गुंतलेलं आहे... आमचा गझलकार मित्र सानेकर म्हणून गेलाच आहे-
‘ओळखीचा एकही शहरात नाही
अन् तुझाही चेहरा लक्षात नाही
मी तुझ्या दारातला भिक्षेकरी, पण
कोणतीही याचना ओठात नाही...!’
खूप वर्षांपूर्वी दिल्लीतील अशोक चोप्रा नावाच्या रसिकानं ‘बाबुलमोरा...’ ही वाजिद अलि शाहने लिहिलेली ठुमरी कुणी कुणी गायली याचा शोध घेतला, तेव्हा पंचवीसेक गायकांची यादी तयार झाली. त्या सगळ्यांनी गायलेल्या ठुमरीची एक सीडी त्यांनी स्वतः तयार करून घेतली. मी त्यांच्याकडून ती मागवून घेतली. बोलता बोलता ते म्हणाले की, या सीडीत ही ठुमरी कॉपी करताना अनेक गायकांना भेटायला मिळालं, बोलायला मिळालं. एकदा मी हेमंत कुमारांना विचारलं होतं, सर्वांत जीवघेणं कुणी गायलं आहे, तर ते जराही वेळ न दवडता म्हणाले, ‘अरे, नैहर तो सैगल की, ही तो छुटी थी...!’ मलाही सोलापूरबद्दल असंच वाटत राहतं.
.................................................................................................................................................................
गणेश मनोहर कुलकर्णी
magnakul@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Jayant Raleraskar
Wed , 06 November 2024
सोलापूर आठवणी मस्त. नैहर छुटो जाय ही सांगड आवडली. मी सोलापूरचा. मी काही आठवणी लिहिल्याही आहेत. त्याला खूप दिवस झाले. रेल्वे आणि तुम्ही हे नातं तर परिचित आहेच. अतितात असे डोकावणे वयामुळे साहजिक झाले आहे. लेख छानच झालाय.