सर रिचर्ड अॅटेनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ हा सिनेमा ही एक अद्वितीय कलाकृती आहे. १९८२मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा महात्मा गांधींचं जीवन आणि त्यांच्या अहिंसा व असहकार या मार्गदर्शक तत्त्वांच्या आत्मशोधाचा इतिहास सांगतो.
हा सिनेमा तयार होण्याची कथा हाही एका स्वतंत्र सिनेमाचा भाग होऊ शकेल अशी आहे. अॅटेनबरो या ब्रिटिश कलाकाराला हा सिनेमा करावयास मिळणं, हा एक काव्यात्मक न्याय म्हणावा लागेल. या सिनेमाची कल्पना मूळ धरू लागली, तेव्हा ब्रिटिशांनी भारतातून गाशा गुंडाळून उणीपुरी पंधराच वर्षं झाली होती. या नवख्या देशाबद्दल इंग्रजांना फार काही आत्मीयता वगैरे वाटण्याचा तो काळ नसावा, पण तरीसुद्धा एका ब्रिटिश कलाकाराला या विषयावर सिनेमा करावासा वाटणं, ही आजही आश्चर्य वाटावी अशी गोष्ट म्हटली पाहिजे.
१९६२पर्यंत अॅटेनबरो प्रामुख्यानं नट व निर्माते म्हणूनच ओळखले जात होते. तसा त्यांचा ब्रिटिश सिनेमासृष्टीत फार काही जम बसला होता असं नव्हे, पण त्यांचे काही सिनेमे व्यावसायिकदृष्ट्या चालले होते. त्या योगानं त्यांचं नाव होऊ लागलं होतं.
एका सकाळी अॅटेनबरो घरी लोळत पडले होते, तेव्हा त्यांचा फोन खणखणला. फोनवर मोतीलाल कोठारी नावाची एक अनोळखी व्यक्ती त्यांना तात्काळ भेटू इच्छित होती. खूप वेळ आढेवेढे घेतल्यानंतर अॅटेनबरोंनी त्यांना त्यांच्या सेक्रेटरीस फोन करून दुपारच्या जेवणाच्या वेळी भेट ठरवण्याची मंजुरी दिली.
जेवणादरम्यान कोठारींनी अॅटेनबरोंपुढे मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर एक सिनेमा करण्याची आणि जमल्यास दिग्दर्शित करण्याची गळ घालून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. खरं म्हणजे तोपर्यंत अॅटेनबरोंनी एकाही सिनेमाचं दिग्दर्शन केलं नव्हतं. आणि तसं काही करण्याची त्यांची सध्या तरी मनीषा नाही, हे ते कोठारींना ऐकवत राहिले. पण कोठारीसुद्धा पूर्ण तयारीनिशी आले असावेत. त्यांनी अॅटेनबरोंना लुई फिशर यांनी लिहिलेलं गांधींचं चरित्र वाचलंय काय, अशी पृच्छा केली. अॅटेनबरोंनी नकार देताच ते पुस्तक आपल्या बॅगमधून काढून अॅटेनबरोंच्या हातात ठेवलं.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
अॅटेनबरोंना लुई फिशरच्या पुस्तकानं पुरतं झपाटून टाकलं. त्यांना त्या आधी गांधी तसे दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहामुळे आणि भारतातील वंचितांचा आवाज म्हणून ठाऊक होते. त्यांना गांधींच्या ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याची आणि त्यांच्या सत्याग्रहाच्या प्रयोगांचीही कल्पना होती. थोडक्यात, ब्रिटिश साम्राजाला एकहाती झुकवणारी व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे अॅटेनबरोंना चांगलंच ठाऊक होतं. पण गांधींच्या जीवनात सिनेमा काढण्यासाठी लागणारं नाट्य असेल याची मात्र अॅटेनबरोंना अजिबात कल्पना नव्हती.
लुई फिशर यांचं पुस्तक वाचताना गांधींच्या विचारांची सखोलता अॅटेनबरोंना कुठे तरी भिडत गेली. त्यांना गांधीजींच्या विचारांबद्दल मात्र अजिबात परकेपणा वाटला नाही. गांधी ही व्यक्ती माहिती नसतानासुद्धा त्यांच्याबद्दल ओढ वाटण्याचं सगळं श्रेय अॅटेनबरो स्वतःच्या आई-वडिलांस देतात. लहानपणापासून अॅटेनबरोंना पीडितांची सेवा करण्याचे धडे घरीच शिकावयास मिळाले होते. स्पॅनिश नागरी युद्धातील व नंतर दुसऱ्या महायुद्धातील अनेक स्थलांतरितांचं इंग्लंडमध्ये पुनर्वसन करण्याचं काम त्यांच्या आई-वडिलांनी केलं होतं. किशोरवयात अॅटेनबरोंनी आई-वडिलांसोबत लिस्टर परगण्यातील अनेक गरीब वस्त्यांमध्ये जाऊन कामं केली होती. ‘ग्रेट डिप्रेशन’ म्हणजे १९२९-३२च्या आर्थिक मंदीच्या काळात अॅटेनबरो आपल्या भावंडांसह अनेक वस्त्यांमधून मदत करत फिरत असत. अॅटेनबरो सांगतात- ‘ ‘गांधी’ नावाची व्यक्ती ‘माहिती’ होण्यापूर्वीच त्यांना ‘गांधी नावाचा विचार’ कळला होता.’
अॅटेनबरोंनी लुई फिशर यांचं पुस्तक जवळपास एक बैठकीत वाचून काढल्यावर त्यावर सिनेमा काढायचं ठरवून टाकलं. त्यांच्या पुढच्या अथक प्रयत्नांचा लेखा-जोखा म्हणजे त्यांनी लिहिलेलं ‘In Search of Gandhi’ हे पुस्तक होय. अॅटेनबरोंना ‘गांधी’ पूर्ण करायला जवळपास दोन-अडीच दशकं लागली. त्यात त्यांना मोतीलाल कोठारींची तोलामोलाची साथ मिळाली. कोठारी हे दिल्लीतले एक माजी सरकारी अधिकारी गांधींचे चाहते होते. गांधीहत्येनंतर निराश होऊन त्यांनी भारत सोडून इंग्लंडला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पण पुढे या निर्णयाचा पश्चाताप होऊन त्यांनी गांधींकरता काहीतरी करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर सिनेमा बनवण्याचा ध्यास घेतला… आणि त्यासाठी अॅटेनबरोंना साकडं घातलं.
मोतीलाल यांची काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी ओळख होती. त्याचा उपयोग पुढे अॅटेनबरोंना भारत सरकारकडून परवानगी काढण्यास झाला. कोठारींची दुर्दम्य इच्छाशक्ती हे हा सिनेमा निर्माण करण्यामागचं खरं कारण असल्याचं अॅटेनबरोंनी आपल्या पुस्तकात सांगितलंय.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१९६२-६३च्या सुमारास सिनेमाची संकल्पना अॅटेनबरोंच्या डोक्यात मूळ धरू लागली. पण त्यांना या विषयाची व्याप्ती जशी-जशी कळू लागली, तसं त्यांच्या मनात भीतीनं घर करायला सुरुवात केली. त्या काळात भारतात अनेक व्यक्ती होत्या, ज्यांनी गांधीजींना जवळून पाहिलेलं होतं. भारतातील प्रत्येक व्यक्तीकरता गांधीजी प्रिय आणि पूजनीय महात्मा होते. अशा ‘लॉर्जर दॅन लाइफ’ व्यक्तिमत्त्वावर सिनेमा काढणं हे अत्यंत जोखमीचं काम होतं. अशा वेळी त्यांना भारतातील काही नेत्यांची अनौपचारिक का होईना परवानगी काढण्याची गरज भासू लागली. याच विचारातून त्यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना एका पत्राद्वारे पंडित नेहरूंना या सिनेमाची माहिती देण्याची विनंती केली. जेव्हा या दोन्हीही महान व्यक्तींनी एकमेकांशी पत्रव्यवहार करून ही परवानगी मिळाली, तेव्हा अॅटेनबरोंच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.
सिनेमाची कथा लिहिण्याचं काम गॅरी ह्यॅनले या लेखकानं केलं. त्यावरून जॉन ब्रिले यांनी पटकथा लिहिली. ह्यॅनले एक उत्तम लेखक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकारसुद्धा होते. त्यांना विसाव्या शतकात होणाऱ्या राजकीय बदलाची चांगली जाण होती. विशेषतः ब्रिटनच्या वसाहतवादी साम्राज्याच्या अंताकडे ते एका व्यापक दृष्टीकोनातून बघू शकत होते. त्यामुळेच ह्यॅनले गांधींना जागतिक संदर्भात चपखल बसवू शकले. सिनेमातील अनेक दृशांमध्ये याचा आपल्याला प्रत्यय येतो. उदाहरणार्थ :
गांधींवर अहमदाबादमध्ये राष्ट्रदोहाचा खटला भरण्यात येतो. जज् ब्लूमबर्ग व त्यांचं न्यायालय खचाखच भरलेलं. जज् ब्लूमबर्ग त्रस्त नजरेनं खटल्याची कागदपत्रं बघतात आणि आरोपीस घेऊन येण्यास सांगतात. आरोपीच्या नावाचा पुकारा होतो आणि कृश दिसणारे गांधी येताना दिसतात.
गांधी आरोपीच्या कटघऱ्यात येत असतानाच जज ब्लूमबर्ग वाचन थांबवून, मुख्य म्हणजे सगळे संकेत मोडून उभे राहतात. त्यांचे सहकारी आश्चर्यानं पाहत त्यांचं अनुकरण करतात. हे दृश्य किती खरं माहीत नाही, पण ह्यॅनले यांना ब्रिटिश न्यायालयास गांधींबद्दल आदर होता, हे अधोरेखित करावयाचं असावं.
पटकथेचा कच्चा खर्डा पं. नेहरूंना दाखवायला अॅटेनबरो भारतात पहिल्यांदा आले. दिल्लीत उतरल्यावर कोठारींच्या सुचनेनुसार अॅटेनबरो सरळ बापूंच्या राजघाटावर गेले. गांधींचं समाधीस्थळ बघताच ते भारावून गेले. हा शिष्टाचार अॅटेनबरोंनी पुढे मनोभावे पाळला. त्यानंतर जेव्हा जेव्हा अॅटेनबरो दिल्लीला आले, तेव्हा तेव्हा त्यांनी सर्वप्रथम राजघाटावर जाऊन गांधींच्या समाधीचं दर्शन घेतल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलंय.
या पहिल्या भेटीत पं.नेहरूंनी त्यांची एक छोटी परीक्षाच घेतली. त्यात गांधींबद्दल अॅटेनबरोंना किती व काय माहिती आहे, तसेच त्यांचे संदर्भ कुठले आहेत, हे जाणून घेतलं. त्यात पास झाल्यावर मात्र नेहरूंनी स्वतः, तसंच भारत सरकारकडून लागणारी सगळी मदत उपलब्ध करून देण्याचं वचन दिलं. पं. नेहरूंनी इंदिरा गांधींना जातीनं यात लक्ष घालण्यास सांगून मदतीकरता नेमून दिलं होतं.
अॅटेनबरोंनी पं. नेहरूंसह इतरही काही जणांना पटकथा वाचायला दिली. त्यात गांधीजींच्या अनेक सहकाऱ्यांचा समावेश होता. आचार्य कृपलानी हे त्या वेळी अत्यंत आजारी होते, तरीही त्यांनी अॅटेनबरोंची भेट घेऊन त्यांना सिनेमाकरता शुभेच्छा दिल्या.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
अॅटेनबरोंनी आपल्या पुस्तकात पं. नेहरूंसोबतच्या दुसऱ्या व शेवटच्या भेटीबद्दल सविस्तर लिहिलंय. नेहरू व इंदिरा गांधी यांच्यासोबत अॅटेनबरोंनी सिनेमाच्या कथेवर तीन मूर्ती भवनमध्ये सविस्तर चर्चा केली. मुख्य म्हणजे पंडिजींना पटकथा आवडली आणि त्यांनी त्यास मंजुरी दिली. याच चर्चेदरम्यान अॅटेनबरोंनी पं. नेहरूंना चाचरत विचारलं की, ‘गांधीची भूमिका करण्यास जर त्यांनी एखाद्या ब्रिटिश नटाला घेतलं, तर नेहरू तसेच तमाम भारतीयांची मनं दुखावली जातील काय?’ त्या काळात (१९६३) भारतीय सिनेमासृष्टी अत्यंत नवखी होती व त्यात जागतिक सिनेमात काम करण्याच्या अनुभव असलेला नट असण्याची शक्यता कमी होती, याची जाणीव पं. नेहरूंना होती. त्यामुळे योग्य ब्रिटिश नटाला या सिनेमात मुख्य भूमिकेकरता घेण्यास नेहरूंनी संमती दिली आणि अ-भारतीय नट भारतीय जनता स्वीकारेल, असा दिलासादेखील दिला.
याच भेटीअंती जेव्हा पं. नेहरू अॅटेनबरोंना घराबाहेर सोडायला आले, तेव्हा गाडीत बसण्याआधी पंडितजींनी त्यांना एक विनंती केली. ते अॅटेनबरोंना म्हणाले, “तुम्ही या कथेच्या अनुषंगानं तुम्हाला हवा तसा सिनेमा बनवा. पण या सिनेमाद्वारे गांधीजींना देवत्व मात्र देऊ नका. ते एक हाडा-मांसाचे माणूस होते, हे त्यांच्या गुणदोषांसकट दाखवा.”
अॅटेनबरो लिहितात, पं. नेहरूंचं हे एक वाक्य त्यांच्या सिनेमास नवा परिसस्पर्श देऊन गेलं. पुढे जेव्हा जेव्हा त्यांच्यावर व सिनेमावर टीका झाली, तेव्हा तेव्हा अॅटेनबरोंना पं. नेहरूंचं हे वाक्य आठवत असे.
सिनेमाकरता कलाकारांचा शोध हेसुद्धा जिकिरीचं काम होतं. सुरुवातीला गांधींच्या भूमिकेकरता साठच्या दशकातील बऱ्याच नावांचा विचार कोठारी व अॅटेनबरोंनी करून ठेवला होता. पण त्यातील बरीच नावं काळाच्या ओघात व इतर काही अडचणींमुळे मागे पडत गेली. जेव्हा हा सिनेमा बनवण्यास सुरुवात होणार, तेव्हा अँथोनी हॉपकिन्स यांना गांधींच्या भूमिकेकरता विचारण्यात आलं. पण आपण एक भारतीय व्यक्ती म्हणून पडद्यावर कसे दिसू याबद्दल ते साशंक होते. अॅटेनबरोंना गांधींची भूमिका करणारा नट नवखा किंवा आधी पडद्यावर न आलेला हवा होता. त्याच कालावधीत अॅटेनबरोंना एका नाटकाच्या निमित्तानं एका तरुण नटाचं काम बघण्याचा योग्य आला. तो म्हणजे - बेन किंग्सले!
बेन किंग्सले हे त्या वेळी रॉयल शेक्सपिअर कंपनीत काम करत होते. किंग्सले हे मूळचे गुजराती (मूळ नाव कृष्ण पंडित भानजी) वंशाचे. त्यांचे वडील गुजराती, तर आई ब्रिटिश वंशाची. पण ते कधीच गुजरात किंवा भारतात राहिले नसल्यानं त्यांना भारत व गांधींबद्दल जुजबी माहिती होती. कारण त्यांच्या अतिशय जोरात चाललेल्या नाटकांच्या प्रयोगांच्या रहाटगाडग्यातून बाहेर काढावयास मदत मिळावी म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना गांधीजींची आत्मकथा वाचायला दिली होती. म्हणूनच अॅटेनबरोंनी त्यांना स्क्रीन टेस्टसाठी बोलावलं, त्या वेळी किंग्सले यांना गांधींची जवळपास पूर्ण माहिती झालेली होती. अॅटेनबरोंनासुद्धा एका मूळच्या भारतीय वंशाच्या नटाला ‘गांधीं’ची भूमिका देण्याचं समाधान मिळालं.
पटकथेत गांधींच्या व्यक्तिरेखेएवढीच महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे कस्तुरबा. या भूमिकेकरता कोण योग्य होईल, यावर अॅटेनबरोंना बराच काथ्या-कूट करावा लागला. त्यांनी योग्य व्यक्तीच्या शोधाकरता नियुक्त केलेल्या राणी दुबे व डॉली ठाकोर यांनी त्यांच्यापुढे स्मिता पाटील, भक्ती बर्वे व रोहिणी हट्टंगडी या तीन भारतीय स्त्री कलाकारांचा प्रस्ताव ठेवला. या तिन्ही कलाकारांच्या स्क्रीन टेस्टस बघून अॅटेनबरोंच्या चमूने इतर ब्रिटिश स्त्री कलाकारांचा विचार करणं सोडून दिलं.
अॅटेनबरो स्मिता पाटील यांच्याबद्दल अतिशय आत्मीयतेनं लिहितात व सांगतात की, त्यांचा अभिनय अत्यंत हृदयस्पर्शी होता. अॅटेनबरोंच्या मते स्मिता पाटील यांची टेस्ट अत्यंत कलात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या वरच्या दर्जाची होती. तसंच स्मिता पाटील दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे त्या एका सामान्य गुजराती कुटुंबातून आलेल्या वाटतील काय, अशी शंका होती. त्यांना रोहिणी हट्टंगडी या थोड्याफार गुजराती दिसू शकतील, तसेच १८ ते ८० या वयाच्या दिसू शकतील याची खात्री वाटल्यानं त्यांची अंतिम निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. हट्टंगडी यांनीही सरस काम करून त्यांची निवड सार्थ केली.
बाकी अनेक पात्रांकरता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अनेक विद्यार्थ्यांना - जी नंतर भारतीय टीव्ही तसेच सिनेमांत अनेकदा झळकली - संधी देण्याच्या निर्णय घेण्यात आला. या सिनेमाच्या शूटिंगकरता भारतातील एक युनिट गोविंद निहलानी यांच्या दिग्दर्शनाखाली काम करेल असं ठरवण्यात आलं. आज सिनेमा बघताना निहलानींचा सीन कुठला व अॅटेनबरोंचा कुठला, हे ओळखणं कठीण होतं, इतकं या दोन्ही दिग्ददर्शकांनी एकसारखं काम केलं आहे.
हा सिनेमा खऱ्या अर्थानं बनवायला सुरुवात झाली, तोपर्यंत अॅटेनबरोंच्या गाठी तीन-चार चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव जमा झाला होता. तरीही त्यांना ‘गांधी’ बनवण्यात अनेक अडचणी आल्या. सिनेमाकरता लागणारा निधी ही त्यातली सगळ्यात मोठी अडचण होती. खरं तर या सिनेमासाठी लागणाऱ्या पुरेशा पैश्यांची व्यवस्था न झाल्यानं व निर्मिती प्रक्रियेत कुठलीही तडजोड करायची नसल्यानेच त्याला इतकी वर्षं लागली. अॅटेनबरोंनी अमेरिकेतील अनेक नामांकित निर्मात्यांना ‘गांधी’ची कथा ऐकवली होती, पण त्यांना या विषयावर सिनेमा बनवणं हे व्यावसायिकदृष्ट्या धोक्याचं वाटत होतं.
एका दिल्ली भेटीत त्यांनी ही व्यथा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांगितली. तेव्हा इंदिराबाईंनी अॅटेनबरोंना तत्कालीन प्रसारणमंत्री वसंत साठे यांना भेटण्याचा सल्ला दिला. NFDC (National Film Division Corporation) या भारतीय प्रसारण मंत्रालयाच्या अख्यत्यारीत येणाऱ्या संस्थेकरवी सिनेमाकरता निधी उभा करण्याची व्यवस्था (मंत्रीमंडळाच्या संमतीनं) करण्यात आली. पण हा पैसा फक्त भारतातील चित्रीकरणाकरताच पुरेसा ठरला. पुढे कोलंबिया पिक्चर्स, वॉर्नर ब्रदर्स यांनी काही अटी घालून सिनेमाला पैसा पुरवला, जो पुढे या अभिजात कलाकृतीनं दाम-दुपटीनं वसूल करून दिला.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
या सिनेमाचं जवळपास सगळं चित्रीकरण भारतात झालं. दिल्ली, पुणे, पोरबंदर इत्यादी ठिकाणी मोठे सेट लावून पण अतिशय व्यावसायिक पद्धतीनं, वेळेचं काटेकोर नियोजन करून हा सिनेमा तयार झाला. भारतात चित्रीकरण करायचं, तेही बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी व अभिनयाचं प्रशिक्षण न घेतलेल्या लोकांना घेऊन हे मोठं आव्हान होतं. आजच्या काळात मोठे मॉब-सीन्स हे Computer Generated imagery (CGI) किंवा Visual Effects Techniques (VFX)च्या मदतीनं करणं खूप सोपं झालेलं आहे. पण या सिनेमाकरता अॅटेनबरोंनी अनेक दृश्यात खऱ्या लोकांचा (extras) वापर केला आहे. त्यातील जालियनवाला बाग, गांधींचं चंपारण्यच्या सत्याग्रहाकरता मोतीहारी स्टेशनवर झालेलं आगमन आणि गांधींची अंत्ययात्रा हे प्रसंग थक्क करतात.
विशेषतः गांधींच्या मृत्यूनंतर निघालेल्या यात्रेचं दृश्य हे या सिनेमातील कलात्मतेचा कळस म्हणावं लागेल. त्याकरता अॅटेनबरोंनी राजपथावर एक दिवस चित्रीकरण करण्याची विशेष परवानगी घेतली होती. तो दिवस गांधीहत्येनंतर बरोबर ३० वर्षांनंतरचा होता. गांधींच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता जवळपास एक हजार कलाकारांना गांधींचं पार्थिव असलेल्या ट्रकवर व आसपास ठेवलं होतं. या व्यतिरिक्त हजारभर लोक ट्रकच्या आसपास राहतील, अशी व्यवस्था केली होती. एवढ्या सगळ्या लोकांमागे तीन हजार होमगार्ड, एक हजार ‘गांधी पीस फॉउंडेशन’चे कार्यकर्ते ठेवण्यात आले होते. हे दृश्य खरं वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे आसपासच्या गावातून आणलेल्या जवळपास अडीच लाख लोकांना राजपथाच्या दुतर्फा उभं करण्यात आलं होतं.
बेन किंग्सले यांनी हा थरारक अनुभव एका मुलाखतीत सांगितलाय. मृत गांधींच्या भूमिकेत किंग्सले ट्रकवर झोपले होते. अॅटेनबरोंनी सुरुवातीला त्यांचे क्लोजअप शॉट्स घ्यायला सांगितले. किंग्सलेकरता त्यानंतरची भूमिका तशी सोपी होती. त्यांना फक्त पडून राहायचं होतं. आणि रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या लोकांना फक्त ‘गांधीं’च्या मृतदेहावर फुलं वाहण्याचं काम करावयाचं होतं. पण किंग्सले म्हणतात की, भारतीय लोक तसे मिश्किल असतात. काही खट्याळ मंडळी मुद्दाम नेम धरून किंग्सलेंच्या चेहऱ्याला लागतील अशा तऱ्हेनं फुलं टाकत होती. हा फुलांचा मारा अधिक होऊ लागल्याने पहुडल्या-पहुडल्या, ओठ हलू न देता, किंग्सलेंनी शेजारी बसलेल्या एका कलाकारास विचारलं, ‘काय हो, किती लोक असतील आजूबाजूला?’ त्या व्यक्तीनंही विचलित न होता उत्तर दिलं, ‘असतील एक-दीड लाख.’ किंग्सले ते ऐकून आश्चर्यचकित झाले. तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं की, ‘हा आकडा फक्त राजपथाच्या उजव्या बाजूस असलेल्या लोकांचा आहे. डाव्या बाजूससुद्धा जवळपास तेवढेच लोक असतील.’
तेव्हा किंग्सले यांना त्या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आलं. त्यानंतर फुलांच्या सततच्या माऱ्यानं त्यांचा चेहरा एकदाही हलला नाही. बेन किंग्सले पुढे सांगतात, थोड्याच वेळात आसमंतात फक्त होम गार्डसच्या बुटांचा चालण्याचा आवाज घुमत होता. हळूहळू अडीच-तीन लाखांचा जमाव जणू काही खऱ्याच बापूंची अंत्ययात्रा आहे, असा शांत आणि गंभीर झाला होता.
अॅटेनबरोंनी या सिनेमाशी आणखी दोन प्रख्यात कलाकारांना जोडून घेतलं. संगीत दिग्दर्शनासाठी त्यांनी पं. रविशंकर यांना विनंती केली. पाश्चात्य संगीतात एक संगीत व्यवस्थापन करणारा संगीतकार मूळ संगीतकारासोबत काम करतो. अॅटेनबरोंनी जॉर्ज फेंटॉन या नवख्या संगीतकाराची निवड संगीत व्यवस्थापन करण्याकरता केली. पण त्यांना पं.रविशंकर या नवीन व्यवस्थापकासोबत काम करतील का, अशी शंका होती. मात्र त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता संगीत देण्याचं कबूल केलं.
त्या काळी भारतीय संगीत पाश्चात्य ‘सिम्फनी’ संगीताप्रमाणे ‘नोट्स’मध्ये लिहिलं जात नसे. या निमित्तानं या दोन्ही संगीतकारांनी आपापलं संगीत सर्वप्रथम कागदावर ‘नोट्स’च्या स्वरूपात लिहून तयार केलं. पुढे जेव्हा रेकॉर्डिंगच्या निमित्तानं जेव्हा भारतीय वादक लंडनला गेले, तेव्हा तेथील थंड वातावरणाचा वाद्यांवर तसंच त्यातून निघणाऱ्या सुरांवर परिणाम होऊ नये म्हणून रेकॉर्डिंग स्टुडिओचं तापमान एका विशिष्ट पातळीवर राखण्यात आलं.
या सिनेमाच्या निमित्तानं कदाचित प्रथमच भारतीय संगीत पाश्चात्य संगीताच्या पद्धतीनं रेकॉर्ड करण्यात आलं असावं. अर्थात ते करत असताना त्याचा भारतीय बाज जराही उतरू न देण्याची खबरदारी अॅटेनबरो आणि जॉर्ज फेंटॉन यांनी घेतली.
१९७३च्या सुमारास जेव्हा अॅटेनबरो सिनेमाची जुळवाजुळव करता होते, तेव्हाच त्यांनी एका मित्राकरवी थोर चित्रकार पाब्लो पिकासो यांना या सिनेमाचं जाहिरात पोस्टर करायची विनंती केली. पिकासोंनी आनंदानं ते करून दिलं. अर्थात हे काम सिनेमा येण्याच्या दशकभर आधीच झालं होतं. पिकासोंना सिनेमाचं कुठलंच काम प्रत्यक्ष बघता आलं नाही. नंतर भारतातील पोस्टर करण्याचं काम श्री. पी. शरथ चंद्रन यांनी केलं.
मधल्या काळात भारतात इंदिरा गांधींचं सरकार जाऊन जनता सरकार सत्तेवर आलं. पण त्यानेसुद्धा सिनेमाकरता लागणारी सरकारी मदत कायम ठेवली. अॅटेनबरोंनी सिनेमाकरता लागणारा पैसा, भारतीय सरकारच्या अनेक परवानग्या, राजकारण्यांचे अनेक अंकुश, निर्माते, कलाकार यांचे नकार अशा अनंत अडचणींना तोंड देत १९८२ साली सिनेमा पूर्ण केला.
दरम्यानच्या काळात मोतीलाल कोठारींचं निधन झालं. त्यात आपण या विषयाला न्याय देऊ शकू काय, अशीही शंका अॅटेनबरोंच्या मनात अधूनमधून येत असे. परंतु पूर्ण झालेल्या सिनेमात कुठलाही मोठा बदल तत्कालीन सरकार, गांधी फौंडेशन, आगाखान पॅलेस ट्रस्टीज यांनी सुचवला नाही, हे अॅटेनबरोंच्या मेहनतीचं यश म्हणावं लागेल. तसं बघायला गेलं, तर अॅटेनबरोंनी या प्रवासात दोन सिनेमा बनवले. मूळ इंग्रजी सिनेमासोबतच हिंदीत डब करून तो भारतीय जनतेस ‘आपला’ वाटेल अशी सोय केली.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
१९८३च्या ऑस्कर समारंभात या सिनेमाला आठ पुरस्कार मिळाले होते. या सिनेमाने त्या वर्षीच्या गोल्डन ग्लोब, बाफ्टा पुरस्कारांवरही आपली मोहोर उमटवली होती. १९८३च्या ऑस्कर समारंभात पारितोषिकाला उत्तर देताना अॅटेनबरोंनी अमेरिकेतील डॉ. मार्टिन लुथर किंग, साऊथ आफ्रिकेतील नेल्सन मंडेला, पोलंडमधील लेच वेलेसा अशा अनेक नेत्यांनी गांधींच्याच मार्गाचा उपयोग स्वतंत्रता लढ्याकरता केल्याची जगाला आठवण करून दिली. अॅटेनबरो, बेन किंग्सले, भानू अथैय्या ही सगळीच मंडळी ऑस्करसारखं मोठं पारितोषिक विनम्रपणे स्वीकारताना ते सिनेमाच्या विषयापेक्षा मोठं नव्हतं, याचं भान ठेवताना दिसतात.
सर रिचर्ड अॅटेनबरो यांचं दिग्दर्शन, सर बेन किंग्सले, रोहिणी हट्टंगडी, रोशन सेठ, सईद जाफरी, अलेक पदमसी, मार्टिन शीन, अगदी छोट्या का होईना एका प्रसंगात असलेले ओम पुरी, डॅनियल डे लुईस, सर जॉन गिलगूड आणि अशा अनेक कलाकारांच्या अभिनयानं नटलेला, तसंच एका उत्तम संहितेवर आधारलेल्या या सिनेमाचं गारुड सिनेमाप्रेमींच्या मनावर नसेल, तरच आश्चर्य!
.................................................................................................................................................................
लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.
salilsudhirjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment