एकेक मिसळ म्हणजे एकेक प्रेम-प्रकरण… आणि मिसळींचा ‘ब्लास्ट’ हा तारुण्यातील अनावर आकर्षणांचे प्रतीक आहे…
दिवाळी २०२४ - लेख
श्रीनिवास जोशी
  • डावीकडे बेडेकर मिसळ रस्सा, उजवीकडे श्रीकृष्ण मिसळचा तर्रीवाला रस्सा आणि साधा रस्सा!
  • Sat , 02 November 2024
  • दिवाळी २०२४ लेख मिसळ Misal प्रेम Love तारुण्य Youth

स्मृतींमधील अनेक हळवे कप्पे आपल्यापासून लपून राहिलेले असतात. वय वाढत जाते, तसे ते जास्त जास्त लपून राहू लागतात. काय करणार! पण अचानक एखादी गोष्ट समोर येते आणि स्मृतींची एक बहारदार मालिका उलगडत जाते. एकावरून दुसऱ्या विषयाकडे मन उधळत जाते. इतके हैराण होते की, कुठल्या तरी तत्त्वज्ञानाचा आसरा घ्यावासा वाटतो. पुण्यातल्या कुमठेकर रोडवरील ‘चंद्रविलास उपाहारगृह’ म्हणजे एक भन्नाट प्रकरण आहे. गेली काही वर्षे मी तिथे गेलो नव्हतो. माझ्या तारुण्यात काही काळ हा माझा मिसळ आणि भजी अड्डा होता. परवा माझा जावई सुखदने ‘इन्स्टाग्राम’वर ‘चंद्रविलास उपाहार गृहा’वरचे एक रील दाखवले आणि एक हळूवार कप्पा उघडला गेला... मी आणि सुखद तिथे गेलो आणि मिसळविषयक आठवणींची लड उलगडत गेली.

१.

मारवा, मालकंस, बागेश्री, भूप वगैरे राग प्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर पुण्यात ‘बेडेकर मिसळ’, ‘श्रीकृष्ण मिसळ’, ‘श्री मिसळ’ अशी मिसळींची हॉटेले प्रसिद्ध आहेत. पण अनेक अनवट राग आपल्याला विलक्षण आनंद देऊन जातात. ललिता-गौरी, रामदासी मल्हार, जैताश्री, जयंत कानडा आणि सूहा कानडा असे फार कुणाला फारसे माहीत नसलेले राग खऱ्या रसिकाला अनुपम आनंद देऊन जातात. त्याच धर्तीवर पुण्यात काही अनवट मिसळींची ठिकाणे आहेत.

नेहमीच्या रागांमध्ये अनेक सौंदर्यस्थळे असतात. ती ओळखीची झालेली असतात. या रागांची स्थिती भरजरी लाल, निळा, मोरपंखी अशा रंगांच्या भरजरी शालू किंवा पैठणीसारखी असते. अनेक सौंदर्यवतींवर हे रंग स्वतः खुलत जातात आणि त्यांचे सौंदर्य खुलवत नेतात. यांच्यावरची सोनेरी जरतारी त्या ललनांच्या भरजरी सौंदर्यावर सुवर्णाचे विलक्षण सुंदर पाणी चढवत राहते.

बेडेकर, श्रीकृष्ण, श्री वगैरे मिसळींचे रस्से या आक्रमक रंगातील आक्रमक शालू आणि पैठणींसारखे आहेत. कितीही अरसिक पुरुष असला, तरी तो शालू-पैठण्यांच्या आक्रमकतेमुळे आकर्षित होतो, त्याचप्रमाणे हे आक्रमक रस्से अगदी नवख्या आणि नवशिक्या खाद्यप्रेमींनादेखील आकर्षित करतात.

बेडेकर मिसळीच्या रश्श्यामध्ये तरंगणारी काळी इलायची, तमालपत्र, लवंग आणि दालचिनी, अशा आक्रमक मसाल्यांची जरतारी सगळ्यांनाच भुलवते. या मसाल्यांवर तेलात तावून-सुलाखून चरचरीत झालेल्या तिखटाचा साज चढवलेला असतो. मसाला आणि तिखटाच्या या जुगलबंदीला गुळाच्या खमंग चवीचा कॉन्ट्रास्ट असतो. त्याचबरोबर कांदा, कोथिंबीर आणि लिंबू भरजरी पैठणीवर शोभून दिसणाऱ्या खऱ्या दागिन्यांची मजा आणतात.

श्रीकृष्ण मिसळीच्या रस्सा खऱ्या अर्थाने नेत्रदीपक असतो. त्याचा एखाद्या शालूसारखा एकसंध चिंतामणी रंग आपल्याला प्रसन्न करतो. तो रस्सा नेत्रदीपक चिंतामणी रंगाचा तवंग लेवून मिसळीवर फेसाळू लागला की, मौजेची अतीव सुंदर कारंजी उसळू लागतात. त्या तवंगावर कोथिंबिरीच्या पानांची वेलबुट्टी असते. थोड्या खालच्या बाजूला पिवळ्याशार रंगाच्या पोह्यांची खडी खुलून दिसत असते. हिरवी कोथिंबीर, पिवळे पोहे, चिंतामणी तवंग आणि त्यावरचा केशरी रंगाचा फेस… एवढा सुंदर शालू अखिल महाराष्ट्रातल्या कुठल्याच मिसळीला नेसायला मिळालेला नाही, असे माझे म्हणणे आहे. असो.

शालू आणि अलंकार यांच्या साजाखालून एखाद्या सौंदर्यवतीचे सौंदर्य जसे आपल्याला खुणावत असते, त्याच धर्तीवर चिंतामणी शालूच्या रश्श्याच्या आडून लसणीच्या स्वादाची सौंदर्यशालीन रसवंती आपल्याला खुणावत असते. यू हॅव टू ईट इट टू बिलीव्ह इट!

...........................................................................................................................................

मिसळ आणि तारुण्य यांचे काहीतरी गूढ नाते आहे. पु. ल. देशपांडे आणि वसंतराव देशपांडे व्यायाम म्हणून फिरायला बाहेर पडत आणि एके ठिकाणची मिसळ खाऊन परत येत. ज्या दिवशी आपल्याला मिसळ खावीशी वाटणार नाही, त्या दिवशी आपण म्हातारे झालो आहोत, असं समाजायचं, असं त्या दोघांनीही ठरवलं होतं, असं पुलंनीच लिहून ठेवलं आहे. काही वाचक म्हणतील, मिसळी आणि आवडलेल्या सुंदर मुली एकत्र? दोन्हींची तुलना होऊ शकेल? मला वाटते काय हरकत आहे? दोन्ही ठिकाणी क्रेझी आकर्षण महत्त्वाचे! दोन्ही ठिकाणीच काय, आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात क्रेझी आकर्षणच महत्त्वाचे असते. रंगून जाणे महत्त्वाचे. येथे आवडलेल्या मुली आणि प्रेम वाटलेली मुलगी यातील फरक लक्षात घ्यायला हवा! आपल्या क्रेझचे विषय कुठलेही असले, तरी शेवटी त्यातून हाती लागलेला आनंद हासुद्धा ‘क्रेझी’ नसतो का? तारुण्य, त्यातला बेफाट आनंद आणि त्यातली बेफाट मस्ती!

...........................................................................................................................................

आजकाल कित्येक लग्नांमध्ये पैठण्याच शालू म्हणून नेसण्यात येतात. शालू बनारसचा, पैठणी येवल्याची! दोन्ही भरजरी असले, तरी त्यांच्या टेक्स्चरमध्ये काय फरक आहे, हे जाणून घ्यायचे असेल, तर जिज्ञासूंनी बेडेकर मिसळ आणि श्रीकृष्ण मिसळ यांच्या रश्श्यांच्या टेक्स्चरमधील फरक लक्षात घ्यावा. पैठणीमध्ये ‘महाराष्ट्रीय’ ठसका असतो. शालूमध्ये लाघवी ‘शालीनता’ असते. दोन्ही एकसारख्या लावण्याने मोहवतात.

श्री मिसळ ही कांजीवरम साडी नेसलेल्या फ्रेश युवतीसारखी असते. लाल रंगाचा मादक चवीचा रस्सा! त्याला लसणीच्या रसवंतीचा पदर, आणि त्यावर मौजेने विहरणारा कोथिंबीर आणि खोवलेल्या खोबऱ्याचा फ्रेशनेस! पहिल्यांदा समोर ठेवल्या गेलेल्या कोरड्या मिसळीच्या डोंगरावर रसरशीत लिंबू पिळले की, ‘लिरिल’च्या जाहिरातीमध्ये धबधब्यात उत्स्फूर्तपणे स्नान-नृत्य करणाऱ्या युवतीचा फ्रेशनेस मनात पसरतो. एवढे झाल्यावर बाकीची मिसळ खाणे हा केवळ उपचार ठरतो!

या मिसळीने कांजीवरम साडी नेसली आहे, असे मी का म्हणतो, हे जाणून घ्यायचे असेल, तर जिज्ञासू रसिकांनी या मिसळीची चव घ्यावी आणि लक्ष्मी रोडवरील कुठल्याही खानदानी दुकानात जाऊन कांजीवरम सिल्क साडीला स्पर्श करून दोन्हींची तुलना करावी.

इथे एक डिसक्लेमर टाकायची गरज आहे. बेडेकर आणि श्रीकृष्ण या मिसळी कुमार गंधर्व आणि मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या हमखास रंगणाऱ्या गाण्यासारख्या आहेत. श्री मिसळ ही किशोरी अमोणकर यांच्या गाण्यासारखी लहरी आहे. कधी रंगते, कधी रंगत नाही. परत परत जावे लागते. पण ज्या दिवशी श्री मिसळ रंग पकडते, तेव्हा ती किशोरी अमोणकर यांच्या तापलेल्या आवाजात रंगलेल्या गाण्यासारखीच विलक्षण आणि स्वर्गीय असते!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२.

सुरुवात चंद्रविलास वरून करून त्याबद्दल काही न बोलता मी बेडेकर, श्रीकृष्ण आणि श्रीबद्दलच लिहिले, पण खरे तर तसे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. सदाशिव पेठ नक्की कुठे आहे, हे नेमकेपणाने सांगायचे असेल तर शुक्रवार पेठ, नारायण पेठ, डेक्कन आणि नवी पेठ या आजुबाजूच्या इलाक्यांचे संदर्भ द्यावेच लागतात!

या झाल्या पुणेरी-ब्राह्मणी थाटाच्या मिसळी. या व्यतिरिक्त ‘काटा किर्र्’ या मिसळीचा उल्लेख झाला पाहिजे. ही मिसळ कमी तिखट, मध्यम तिखट आणि तिखट अशा तीन प्रकारांत मिळते. यातली तिखट मिसळ हाच प्रकार आमच्यासारखे खानदानी खवय्ये ग्राह्य मानतात.

मिसळ हा प्रकार प्रेमासारखाच आहे. प्रेमामध्ये नरम प्रेम, मध्यम प्रेम आणि तीव्र प्रेम असे प्रकार संभवत नाहीत. असे प्रेम करणारे पुरुष स्वयंवरात समोर आले, तर कुठलीही मनस्वी स्त्री कुठलाही विचार न करता तीव्र प्रेम करणाऱ्या पुरुषाच्या गळ्यात वरमाला टाकेल, त्याप्रमाणे कुठलाही खानदानी खवय्या एखाद्या मिसळीच्या तीव्र अशा मूळ रूपातच तिचे ‘पाणिग्रहण’ करतो.

‘काटा किर्र्’ची खरी मजा तिच्या रश्श्यात तरंगणाऱ्या कोल्हापुरी ‘जवारी मिर्ची’च्या तालेवार चवीत आहे, हे कुठल्याही खानदानी खवय्याच्या पटकन लक्षात येते. मग तो त्यात कुठलेही कॉम्प्रमाईज करू शकत नाही.

कोल्हापुरी साजाचा ठसठशीतपणा हा कोल्हापूरच्या सावळ्या, आखीव नयनयांच्या, रेखीव नासिकेच्या आणि सुंदर कुरळा केशसांभर लेवलेल्या सौंदर्यवतीलाच शोभून दिसतो, त्याचप्रमाणे कोल्हापुरी लवंगी मिरचीच्या तिखटाचा ब्लास्ट ‘काटा किर्र्’च्या कांदा-लसूण चटणीने अलंकृत झालेल्या रश्श्यामध्येच व्हावा लागतो. कोल्हापुरी लवंगी मिरचीला खानदानी कोल्हापूरकर ‘जवारी मिरची’ म्हणतात!

खरं तर, गायकीमध्ये अनेक घराणी असतात, तशी मिसळीमध्ये अनेक घराणी आहेत. पुणे-ब्राह्मणी घराणे, नाशिकवाले काळा रस्सा घराणे, मालवण-कोकण घराणे, कोल्हापुरवाले कांदा-लसूण चटणी घराणे. या सगळ्या घराण्यांची लक्षणे सांगण्याचे हे ठिकाण नव्हे. या विषयावर एक ‘डॉक्टरल थिसिस’ माझ्या मनात आकार घेतो आहे. 

चंद्रविलास मिसळ! मिसळीमधील अनवट राग!

पुण्यात आणि आजुबाजूच्या प्रदेशांतसुद्धा ‘कांदा-लसूण चटणी’चे एक उप-घराणे आहे. यात पौड गावातली पढेर मिसळ, भिगवणमधील ज्योती मिसळ, खुद्द पुण्यामधली घसेटी पुलाजवळची वटेश्वर मिसळ आणि खुद्द पुण्यातील दस्तूरखुद्द सदाशिव पेठेतील रामनाथ मिसळ यांचा समावेश होतो.

पढेर मिसळीला बेडेकर मिसळीसारखाच तालेवार गरम मसाल्याचा भरजरी पदर लाभलेला आहे. ज्योती मिसळ खवय्याच्या जिभेवर आपल्या अंगभूत तिखटाने शेकोटी पेटवते. वटेश्वर मिसळीच्या रश्श्यात पांढऱ्या वाटाण्यांची विलक्षण चव बेदरकारपणे तरंगत असते. रामनाथ मिसळीमध्येही नरम, मध्यम आणि तिखट असे प्रकार आहेत. त्यातल्या तिखट मिसळीच्या घासागणिक जिभेवरून तिखटाचा ज्वालाग्रही पदर सळसळत जातो.

या सगळ्यामध्ये जेजुरीजवळच्या निरेची ‘गुजराती भुवन’ची मिसळ, ही आपले एक वेगळेच स्थान राखून आहे. यात तिखट किंवा कांदा-लसूण मसाला अजिबात नसतो. या मिसळीच्या मालकांची आणि माझी चांगली त्यांचे ‘ट्रेड सीक्रेट’ विचारण्याएवढी दोस्ती झाली होती. ते म्हणाले, ‘काही नाही साहेब, रस्सा करून झाल्यावर प्रवीण गरम मसाल्याच्या पन्नास ग्रॅम पाकिटाचा तडका करा.’ मी घरी येऊन प्रयोग करू लागलो, तर सौ म्हणाल्या, ‘तुला वेड लागलं आहे का? पन्नास ग्रॅम मसाल्याचे आख्खे पाकीट कुणी दोन लिटर पाण्याच्या रश्श्यावर तडका म्हणून टाकले होते का?’

मी मालकांवर विश्वास ठेवून गरम तेलात पोहणाऱ्या गरम मसाल्याचा किरमिजी रंगाचा शालू घरगुती मिसळीला नेसवला होता. खरंच, ग्रेट शोध होता तो! सौ अचंबित झाल्या होत्या!

यावरून चाणाक्ष वाचकांच्या एक लक्षात आले असेल की, मिसळ हे एक उत्स्फूर्त ‘इम्प्रव्हायझेशन’ आहे. इथे बनवणाऱ्याच्या प्रतिभेला मुक्त अवसर आहे. मटकी, बटाटा, पोहे, पांढरे वाटाणे यातले काहीही बेस म्हणून चालते. रस्सा म्हणाल, तर कितीतरी वेगळे प्रकार! साड्यांमध्ये रंगांची, डिझाईन्सची आणि टेक्सचर्सची असतात एवढी कॉम्बिनेशन्स! मिसळीत फक्त मटार चालत नाही. कारण मटार स्वतःचा गोडवा मिसळीच्या माथ्यावर थोपतो आणि मिसळीला उसळीची कळा येते.

मिसळ म्हटले की, फरसाण आलेच! पण त्यातसुद्धा किती व्हरायटी! काही मिसळींमध्ये अस्सल खुशखुशीत गाठीचे पिवळे फरसाण असते, काहींमध्ये कडक तळून लालसर झालेले, काहींमध्ये ‘फरसाण’ म्हणून नुसती शेव आणि चिवडा, किंवा कुरकुरीत शेव-चिवडा व कुरकुरीत खारी बुंदी यांचे कॉम्बिनेशन असते! एकेक घराणे आणि एकेक बाज! नुसते एन्जॉय करत राहावे, अशी विविधता! मानवी प्रज्ञेचा आविष्कार!

बेसन आणि तेल हे एक स्वतंत्र प्रेमप्रकरण आहे, हे सगळेच मान्य करतील! फरसाण, ढोकळा, भजी, झुणका, पिठले असे अनेक आविष्कार या दोघांच्या प्रेमातून जन्मलेले आहेत. पण मिसळीच्या रश्श्यामध्ये नाहून निघालेले फरसाण ही बेसन आणि तेल या प्रेमप्रकरणाने साधलेली और अशी सिद्धी आहे. या विलक्षण स्विमिंग पूलमध्ये जेव्हा कांद्याची गोल भजी पोहू लागतात, तेव्हा ती दिव्य मौज पाहायला अनेक यक्ष आणि गंधर्व आकाशात जमा होतात, असे एक खवय्या ‘बेडेकर मिसळ’मध्ये मला मनोभावे सांगत होता… ते खरेच असणार!

मिसळ मेकिंग हे पुरुषांचे क्षेत्र आहे. मन लावून आणि आपली दिव्य प्रज्ञा वापरून पाकक्रिया सिद्ध करणारे पुरुष बघितले की, मला नल किंवा भीमाची आठवण येते, असे दुर्गा भागवतांनी लिहून ठेवले आहे. महाराष्ट्र देशी असे अनेक नल किंवा भीम आज दिसून येतात.

आजकाल मिसळींच्या हॉटेलांमध्ये बटाटेवडे मिळू लागले आहेत, पण मिसळीला खरी साथ भजांची असते. मिसळीला बटाटावड्यांची साथ म्हणजे हिंदुस्थानी क्लासिकल रागदारीला ‘कोंगो-बोंगो’ची साथ दिल्यासारखे आहे, हे अनेक लोकांना कळत नाही. कांद्याची गोल भजी हीच मिसळीची खरी रुबाबदार साथ! ही भजी फोडायची आणि मिसळीच्या रश्श्यामध्ये पोहायला सोडायची. मिसळीबरोबर गोल भजी खाण्याचा अजून एक प्रकार आहे. एक वाटी तर्री मागवावी. तर्री म्हणजे मिसळीच्या रश्श्यावर लालसर तपकिरी रंगाचा तेलाचा तवंग. याचे महत्त्व असे की, यात सगळे मसाले पोहायला वर आलेले असतात. रश्श्याच्या खालच्या भागात भाज्या, उसळी यांचे स्वाद लपलेले असतात. खालचा रस्सा फिकट रंगाचा असतो, वरचा दर्जेदार लालसर तपकिरी रंगाचा. एक छोटी वाटी भरून तर्री घ्यावी. त्यात एक एक भजे बुडवून खावे. भजी खाण्याची ही एक खानदानी पद्धत आहे...

३.

मिसळ खाऊन झाल्यावर तिचा निरोप घ्यायचीसुद्धा एक पद्धत आहे. अस्सल पान खाणारे पानवाल्याकडून चुन्याच्या दांडीवरचा चुना आपल्या बोटावर घेतात आणि तो चुना जिभेवर उभ्या गंधासारखा लावतात, असे पुलंनी लिहून ठेवलेले आहे. त्याप्रमाणे खानदानी मिसळप्रेमी तिचा निरोप घेताना एका स्वच्छ चमच्यामध्ये दोन थेंब तर्री घेतात आणि ते थेंब जिभेवर अलगद सोडून देतात. आणि मग, त्यातून जी रसना जिभेवर प्रक्षेपित होते, ते रसबहार प्रक्षेपण एन्जॉय करत मिसळीचे हॉटेल सोडतात.

मिसळ खाऊन झाल्यावर काही लोक ताक पितात. मला व्यक्तिशः हे मान्य नाही. तेव्हा खरं तर गोड खावे. गोड म्हणजे काहीही नाही काही. मिसळीच्या दुकानात काउंटरवर काचेच्या बरण्या ठेवलेल्या असतात. त्यात हळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू, काजूकंद, ओल्या खोबऱ्याची बर्फी असे पदार्थ असतात. तेच स्वीट डिश म्हणून खायचे. आजकाल मिसळींच्या हॉटेलांत खरवस मिळू लागला आहे. मला व्यक्तिशः हा बदल मान्य आहे. संकृतीला चिकटून बसताना मानवी प्रतिभेच्या नव्या नव्या उन्मेषांमधून आलेल्या नव्या गोष्टींचे स्वागत करण्याचा उमदेपणा माणसामध्ये पाहिजे.

माझे थोर मित्र विनायक गोखले यांनी गंभीर चर्चा करून मिसळ खाऊन झाल्यावर ‘जोशी स्वीट्स’मधले धारवाडी पेढे खाताना विलक्षण मौज येते, हे माझ्या निदर्शनास आणून दिले आहे. शिवाय निशिगंध जोशी यांनी तेवढीच गंभीर चर्चा करून साजुक तुपातील कडक जिलबी मिळाली, तर मिसळीएवढीच मजा येते, हेही माझ्या लक्षात आणून दिले आहे. हे दोघेही मिसळ या क्षेत्रात मला फारच ‘सिनिअर’ आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचना नक्की मनावर घ्याव्यात...

ग्रामीण भागातील मिसळ खाऊन झाल्यावर तिथे लाकडी कपाटात मांडलेल्या ताटांमध्ये रचून ठेवलेले पेढे किंवा बर्फी खाणे मस्ट असते. जेवढा खवा तेवढीच साखर, या तत्त्वावर हे पेढे-बर्फी बनवलेले असतात. त्यामुळे त्यांना गोड झटका देणारी चव प्राप्त झालेली असते आणि म्हणून त्यांना एक गोड ‘हाय’ द्यायची क्षमता प्राप्त झालेली असते. खाद्यक्षेत्रातले माझे सिनियर मित्र रूचिर कुलकर्णी हे माझे ‘ग्रामीण मिसळ’ क्षेत्रातले मित्र आहेत.

रसनेची तपश्चर्या केलेले अत्यंत सिनियर आणि गुरुतुल्य मित्र चाळीस-चाळीस वर्षे खाद्यभक्तीमध्ये साथ द्यायला असतील, तर मिसळीला किती चव येत असेल, याची कल्पना प्रज्ञावंत वाचक सहज करू शकतील.

...........................................................................................................................................

खरं तर, गायकीमध्ये अनेक घराणी असतात, तशी मिसळीमध्ये अनेक घराणी आहेत. पुणे-ब्राह्मणी घराणे, नाशिकवाले काळा रस्सा घराणे, मालवण-कोकण घराणे, कोल्हापुरवाले कांदा-लसूण चटणी घराणे. या सगळ्या घराण्यांची लक्षणे सांगण्याचे हे ठिकाण नव्हे. या विषयावर एक ‘डॉक्टरल थिसिस’ माझ्या मनात आकार घेतो आहे. पुण्यात आणि आजुबाजूच्या प्रदेशांतसुद्धा ‘कांदा-लसूण चटणी’चे एक उप-घराणे आहे. यात पौड गावातली पढेर मिसळ, भिगवणमधील ज्योती मिसळ, खुद्द पुण्यामधली घसेटी पुलाजवळची वटेश्वर मिसळ आणि खुद्द पुण्यातील दस्तूरखुद्द सदाशिव पेठेतील रामनाथ मिसळ यांचा समावेश होतो. पढेर मिसळीला बेडेकर मिसळीसारखाच तालेवार गरम मसाल्याचा भरजरी पदर लाभलेला आहे. ज्योती मिसळ खवय्याच्या जिभेवर आपल्या अंगभूत तिखटाने शेकोटी पेटवते. वटेश्वर मिसळीच्या रश्श्यात पांढऱ्या वाटाण्यांची विलक्षण चव बेदरकारपणे तरंगत असते. रामनाथ मिसळीमध्येही नरम, मध्यम आणि तिखट असे प्रकार आहेत. त्यातल्या तिखट मिसळीच्या घासागणिक जिभेवरून तिखटाचा ज्वालाग्रही पदर सळसळत जातो.

...........................................................................................................................................

बेडेकर मिसळवाले भजी प्लेटमध्ये लाल कोरडी चटणी देतात. तिचा अबीर लागलेले लालसर-काळसर भजे ही एक वेगळी मौज आहे. पण भजी सर्व्ह करण्याची सगळ्यात बेफाम पद्धत ‘रामनाथ मिसळी’मध्ये होती. फार फार वर्षांपूर्वी ही पद्धत बंद करण्यात आली. रामनाथच्या दारात एक टेबल असे, त्यावर एक अ‍ॅल्युमिनियमचा थाळा असे. त्यात लाल तिखटाची गादी पसरलेली असे. गरम गरम तळलेली भजी झाऱ्यामधून या गादीवर फेकली जात. नंतर लाल तिखटाची मखमल लेवलेली भजी पांढऱ्या बशीतून गिऱ्हाइकासमोर बेदरकारपणे आपटली जात. त्यात ‘हिम्मत असेल तरच खाऊन दाखव’, असे आव्हान असे. ही पद्धत पुढे विलय पावली. सभ्यतेच्या धुवट कल्पना खाद्यसंस्कृतीची हानी कशी करतात, हे या उदाहरणावरून सिद्ध व्हावे!

‘श्रीकृष्ण मिसळ’मध्ये मिळणारी भजी हा कांद्याच्या गोल भज्यामधील एक विलक्षण आविष्कार आहे. ‘बेडेकर मिसळ’मध्ये मिळणारी भजी ही पहिलावानासारखी रगेल असतात. ‘श्रीकृष्ण’ची भजी पहिलावानकी करणाऱ्या जमीनदारासारखी आदबशीर असतात. ‘चंद्रविलास’मध्ये आणि भिगवणच्या ‘ज्योती मिसळ’मध्ये मिळणारी गोल भजी हासुद्धा डीसर्टेशनचा प्रकार आहे. परंतु घाणा तळला जाण्याच्या वेळी तुम्ही तिथे हजर असला पाहिजे.

मिसळ खाणाऱ्या खूप साऱ्या लोकांना मिसळ कशी खातात, हे माहीत नसते. गाणे न कळणारे लोक सवाई गंधर्व महोत्सवाला जातात, तसेच बहुतांश लोक एक क्रेझ म्हणून मिसळ खायला जातात. मिसळ खाताना तर्रीची वेगळी वाटी शेजारी दिसली नाही की, ओळखावे, हा प्रोफेशनल मिसळ खाणारा नाही. खूप सारी तर्री मिसळीत ओतून खाणारा पाहिला की, हा चव न कळणारा आचरट माणूस आहे हे समजावे. ‘तर्री अजिबात नको’ म्हणणाऱ्या माणसाला मिसळ गृहात अजिबात प्रतिष्ठा मिळत नाही. खरा खवय्या थोडी तर्री असलेला रस्सा मिसळीत ओततो. रश्शाची मूळ चव एन्जॉय करतो. मग चमच्याने पाहिजे तेवढी तर्री मिसळीवर पेरतो. जिभेवर अत्याचार न करता तर्रीचा ‘चवदार ब्लास्ट’ एन्जॉय करणे, ही खूप प्रगल्भ कला आहे.

४.

हा झाला आक्रमक रस्से असलेल्या मिसळींचा लेखाजोखा. पुण्यातील काही मिसळी अगदी अनवट राग आळवताना दिसतात. चंद्रविलास, संजीवनी आणि प्रभा, यातील कुठलीच मिसळ आक्रमक प्रकारात मोडत नाही. चवीने जिभेवर कसलीही आदळआपट केली नाही पाहिजे, असे या मिसळींचे मत आहे.

प्रभा विश्रांतीगृहात मिळणाऱ्या मिसळीचे अनेक चाहते आहेत. कांदा-बटाटा हा बेस असलेला रस्सा. या रश्शाची तर्री केशरी रंगाकडे झुकलेली असते, कारण त्यात तिखट बेताचे असते. अत्यंत मंद चव! प्रभाच्या मिसळीत फरसाण नसते. सुंदर कांदेपोहे, सुंदर दगडी पोह्यांचा चिवडा आणि कुरकुरीत बारीक शेव, आणि त्यावर कांदा-कोथिंबीर असा प्रसन्न मामला. प्रभाची नुसती कोरडी मिसळ खाणे हासुद्धा एक वेगळाच आनंद आहे.

रस्सा लसणीचा छुपा वरदहस्त असलेली संजीवनीची कोरडी मिसळ हासुद्धा अत्यंत प्रसन्न प्रकार आहे. खरं सांगायचं तर मला ही मिसळच जास्त आवडायची! आता खूप महिन्यात तिथे जाणे झालेले नाही.

मंद चवींच्या मिसळींमध्ये मला चंद्रविलासची मिसळ सगळ्यात आवडते. प्रभा आणि संजीवनी हे पुणेरी-ब्राह्मणी मिसळ प्रकारातील अनवट राग आहेत, तर चंद्रविलास हा कांदा-लसूण प्रकारातील अनवट राग आहे. या मिसळीच्या मंद चवीच्या रश्शात बटाटा आणि इतर भज्यांचे फ्लेवर्स उतरलेले असतात. ही मिसळ खाताना मला जयवंत दळवींची आठवण येते. त्यांनी दादरच्या कुठल्याश्या गल्लीमधल्या एका छोट्या टपरीवजा हॉटेलचा शोध लावला होता. ते हॉटेल चालवणारा माणूस मंद आचेवर सतत उकळणाऱ्या रश्श्यामध्ये मधून मधून कोथिंबीरीची एक एक काडी टाकत असे. अधूनमधून एखाद्या भाजीची पातसुद्धा टाकत असे. त्यांचे फ्लेवर्स हळूहळू रश्शात उतरत. चंद्रविलासच्या रश्शात ती सगळी मौज उतरलेली असते.

झटकेदार मिसळी आवडणाऱ्या मंडळींना या मंद मिसळी आवडत नाहीत. हे असे लोक मिसळीला एकच एक स्टँडर्ड चव असावी अशा पारंपरिक मताचे असतात. मिसळ हे एक इम्प्रव्हायझेशन असते, हे परत एकदा अधोरेखित करतो. 

मिसळींची हॉटेले अगदी रुक्ष असतात. टेबले-खुर्च्या मांडलेल्या आहेत. त्यावर गर्दीमधून वाट काढत जा, इकडे-तिकडे न बघता बसून एकाग्रतेने मिसळीचा आस्वाद घ्या, असा प्रकार असतो. मिसळींच्या हॉटेलमध्ये गाणी वगैरे ऐकू येत नाहीत. चमच्यांचा आणि प्लेटांचा ठणठणाट असतो. खवय्यांचे लक्ष मिसळीच्या स्वादावरून कुठेही भरकटू नये, म्हणून बहुधा वातावरण रुक्ष ठेवण्याची काळजी घेतली जात असावी...

चंद्रविलास हे एक हॉटेल असे आहे की, ज्याला खानदानी माहौल आहे. जुन्या जमान्यातील इराणी हॉटेलासारखी सजावट. खिडक्या आणि भिंतींवर लाकडी महिरपी. भिंतींवरील लाकडी महिरपींमध्ये आरसे आणि काचेवर काढलेली रंगीत चित्रे लावलेली. काऊंटरवर एका मोबाईलवर हिंदी गाणी लावलेली…

प्रभा मिसळ - मंद चवीची व्हरायटी!

काही दिवसांपूर्वी चंद्रविलासमध्ये मिसळ खाताना मला एक शोध लागला. बॅकग्राऊंडवर मोहम्मद रफीची भावविव्हल गाणी लागली असतील, तर मिसळीला भावनिक रंग चढतो, असा तो शोध होता. मिसळ आणि रफीच्या गाण्यांच्या कॉम्बिनेशनमुळे माझे मन अचानक तारुण्याच्या काळात गेले. मित्रांबरोबर झडलेल्या मिसळ मैफली आठवू लागल्या. नंतर एक चहा मागवून, तिथेच एक सिगरेट शिलगवण्याचे वैभवशाली दिवस होते ते!

हिंदी सिनेमातले हीरो बॅकग्राऊंडवर रफीचे गाणे वाजू लागले की, टेबलावरच्या दारूच्या चषकाकडे बघत आपापल्या प्रेयसींच्या आठवणींमध्ये रमून जातात. चंद्रविलासमध्ये रफीचे गाणे लागल्यावर टेबलावरच्या भज्यांच्या प्लेटकडे बघत बघत मी तारुण्याच्या त्या वैभवशाली दिवसांमध्ये स्वतःला विसरून गेलो. आता तारुण्य मागे पडलेय, सिगरेट सुटलीय, आयुष्यातील भावविभोरता धुक्यासारखी विरून गेलीय. चंद्रविलासमध्ये त्या आठवणी जाग्या झाल्या. या हॉटेलचे ‘चंद्रविलास’ हे नाव, हा एक विलक्षण योगायोग होता का?

आपल्याला आवडणाऱ्या मुलींपेक्षा आपल्या स्वतःच्या तारुण्याच्या आठवणींमध्ये माणूस जास्त रमतो का? माणसाला कोण जास्त प्रिय असते? आपल्याला आवडलेल्या मुली की, आपल्या तारुण्यातील माहौल? मला अचानक ‘हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार’ ही ओळ आठवली-

“रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्

भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः।

इति विचारयति कोषगते द्विरेफे

हा हंत हंत नलिनीं गज उज्जहार॥”

(रात्री कमलपुष्पामध्ये अडकलेला भुंगा विचार करत असतो - आता रात्र संपेल, सकाळ होईल, कमळ उमलेल आणि आपण या पाशातून मुक्त होऊ. इतक्यात एक हत्ती येतो आणि ती कमलिनी उखडून टाकतो.)

...........................................................................................................................................

‘श्रीकृष्ण मिसळ’मध्ये मिळणारी भजी हा कांद्याच्या गोल भज्यामधील एक विलक्षण आविष्कार आहे. ‘बेडेकर मिसळ’मध्ये मिळणारी भजी ही पहिलावानासारखी रगेल असतात. ‘श्रीकृष्ण’ची भजी पहिलावानकी करणाऱ्या जमीनदारासारखी आदबशीर असतात. ‘चंद्रविलास’मध्ये आणि भिगवणच्या ‘ज्योती मिसळ’मध्ये मिळणारी गोल भजी हासुद्धा डीसर्टेशनचा प्रकार आहे. परंतु घाणा तळला जाण्याच्या वेळी तुम्ही तिथे हजर असला पाहिजे. मिसळ खाणाऱ्या खूप साऱ्या लोकांना मिसळ कशी खातात, हे माहीत नसते. गाणे न कळणारे लोक सवाई गंधर्व महोत्सवाला जातात, तसेच बहुतांश लोक एक क्रेझ म्हणून मिसळ खायला जातात. मिसळ खाताना तर्रीची वेगळी वाटी शेजारी दिसली नाही की, ओळखावे, हा प्रोफेशनल मिसळ खाणारा नाही. खूप सारी तर्री मिसळीत ओतून खाणारा पाहिला की, हा चव न कळणारा आचरट माणूस आहे हे समजावे. ‘तर्री अजिबात नको’ म्हणणाऱ्या माणसाला मिसळ गृहात अजिबात प्रतिष्ठा मिळत नाही. खरा खवय्या थोडी तर्री असलेला रस्सा मिसळीत ओततो. रश्शाची मूळ चव एन्जॉय करतो. मग चमच्याने पाहिजे तेवढी तर्री मिसळीवर पेरतो. जिभेवर अत्याचार न करता तर्रीचा ‘चवदार ब्लास्ट’ एन्जॉय करणे, ही खूप प्रगल्भ कला आहे.

...........................................................................................................................................

५.

माझा जावई सुखदच्या मोटरसायकलवर मागे बसून जाताना मला जाणवले की, एकेक मिसळ म्हणजे एकेक प्रेम-प्रकरण आहे. हा उल्लू विचार करताना मला माझ्या आयुष्यातील एक खरेखुरे ‘प्रकरण’ कारमधून जाताना दिसले. आपल्याला आवडलेल्या सगळ्या मुलींवरसुद्धा एक लेख लिहायला पाहिजे, असे वाटून गेले. मी तारुण्याच्या ज्या कमळामध्ये अडकून पडलो होतो, त्याच्या या सगळ्या मुली म्हणजे खऱ्याखुऱ्या पाकळ्या! आपण या विषयावर एक सुंदर लेख लिहू शकलो, तर काय धमाल येईल, असे वाटून गेले. खराखुरा ‘चंद्रविलास’!

खूप वर्षांनी मिसळ खाता खाता तारुण्याचा माहौल आठवला, तर आवडणाऱ्या मुलींची आठवण येणे नॅचरल नाही का? आणि लेखात एखादी गोष्ट खटकली, तरी वाचकांनी लेखकाला समजून घेण्यातही एक वेगळीच मजा असते, नाही का?

मी उगीच भावनेचे कढ काढतो आहे असे नाही. मिसळ आणि तारुण्य यांचे काहीतरी गूढ नाते आहे. पु. ल. देशपांडे आणि वसंतराव देशपांडे व्यायाम म्हणून फिरायला बाहेर पडत आणि एके ठिकाणची मिसळ खाऊन परत येत. ज्या दिवशी आपल्याला मिसळ खावीशी वाटणार नाही, त्या दिवशी आपण म्हातारे झालो आहोत, असं समाजायचं, असं त्या दोघांनीही ठरवलं होतं, असं पुलंनीच लिहून ठेवलं आहे.

काही वाचक म्हणतील, मिसळी आणि आवडलेल्या सुंदर मुली एकत्र? दोन्हींची तुलना होऊ शकेल? मला वाटते काय हरकत आहे? दोन्ही ठिकाणी क्रेझी आकर्षण महत्त्वाचे! दोन्ही ठिकाणीच काय, आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात क्रेझी आकर्षणच महत्त्वाचे असते. रंगून जाणे महत्त्वाचे. येथे आवडलेल्या मुली आणि प्रेम वाटलेली मुलगी यातील फरक लक्षात घ्यायला हवा!

आपल्या क्रेझचे विषय कुठलेही असले, तरी शेवटी त्यातून हाती लागलेला आनंद हासुद्धा ‘क्रेझी’ नसतो का? तारुण्य, त्यातला बेफाट आनंद आणि त्यातली बेफाट मस्ती!

आकर्षणाच्या आयुष्यातील महत्त्वाचा विचार मनात आला आणि त्या पाठोपाठ सगळी आकर्षणे कशी विरत चालली आहेत, हेसुद्धा जाणवून गेले. मग वाटले, मिसळ खाण्यापेक्षा तिचे रसग्रहण महत्त्वाचे. प्रेयसीबरोबर संसार करण्यापेक्षा तिचे सुंदर पोर्ट्रेट काढणे महत्त्वाचे! प्रेयसीबरोबर संसार करताना तिची महत्ता संपून जाते. पोर्ट्रेटमध्ये तिचे सौंदर्य आणि आपल्या तिच्याविषयीच्या भावना अमर करणे, जास्त महत्त्वाचे नाही का?

...........................................................................................................................................

मिसळ खाऊन झाल्यावर तिचा निरोप घ्यायचीसुद्धा एक पद्धत आहे. अस्सल पान खाणारे पानवाल्याकडून चुन्याच्या दांडीवरचा चुना आपल्या बोटावर घेतात आणि तो चुना जिभेवर उभ्या गंधासारखा लावतात, असे पुलंनी लिहून ठेवलेले आहे. त्याप्रमाणे खानदानी मिसळप्रेमी तिचा निरोप घेताना एका स्वच्छ चमच्यामध्ये दोन थेंब तर्री घेतात आणि ते थेंब जिभेवर अलगद सोडून देतात. आणि मग, त्यातून जी रसना जिभेवर प्रक्षेपित होते, ते रसबहार प्रक्षेपण एन्जॉय करत मिसळीचे हॉटेल सोडतात. मिसळ खाऊन झाल्यावर काही लोक ताक पितात. मला व्यक्तिशः हे मान्य नाही. तेव्हा खरं तर गोड खावे. गोड म्हणजे काहीही नाही काही. मिसळीच्या दुकानात काउंटरवर काचेच्या बरण्या ठेवलेल्या असतात. त्यात हळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू, काजूकंद, ओल्या खोबऱ्याची बर्फी असे पदार्थ असतात. तेच स्वीट डिश म्हणून खायचे. आजकाल मिसळींच्या हॉटेलांत खरवस मिळू लागला आहे. मला व्यक्तिशः हा बदल मान्य आहे. संकृतीला चिकटून बसताना मानवी प्रतिभेच्या नव्या नव्या उन्मेषांमधून आलेल्या नव्या गोष्टींचे स्वागत करण्याचा उमदेपणा माणसामध्ये पाहिजे.

...........................................................................................................................................

माझे थोर मित्र आणि प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांचे मत असे आहे की, मिसळ हा अतिशय ‘ओव्हररेटेड’ प्रकार आहे. त्यांना ‘ऑलिव्ह ऑइल’मध्ये फ्रेंच पद्धतीने तयार केलेले विविध आणि अजब पदार्थ आवडतात. हे पदार्थ कुणाला कसे आवडू शकतात, हे मला खरंच कळत नाही. आणि आवडले तरी हे पदार्थ मला मिसळीपेक्षा जास्त आवडतात, हे कुणी प्रतिभावंत सांगू कसा शकतो, हे मला त्याहून कळत नाही. पण मी अवचटांना आजकाल तसे काही सांगत नाही. मी त्यांना एवढेच सांगतो की, “मला ते फ्रेंच वगैरे पदार्थ अजिबात आवडत नाहीत, पण तरीही तुम्ही त्या पदार्थांची शब्दचित्र काढा. ती शब्दचित्रे मला आवडतील.”

कॉलेजमध्ये मला जी मुलगी अतिशय आवडायची, तिचे नाक थोडे ‘ऑड’ आहे, असे सांगून माझ्या एका मित्राने माझे डोके फिरवले होते. ती मुलगी म्हणजे माझ्या तारुण्यातील एक सुंदर प्रकरण होते. पण आज मी तिचे पोट्रेट शब्दांमध्ये उतरवले, तर ती मुलगी अजिबात न आवडणारा तो माझा मित्र तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या रसग्रहणाच्या प्रेमात निश्चितपणे पडेल. साहित्याच्या महिरपीमध्ये जीवन आहे त्यापेक्षा जास्त उठावदार दिसते!

आपल्या ‘क्रेझी’ तारुण्याचा लेखाजोखा लिहायला हवा, असे मला वाटू लागले आहे. जे काही लिहायचे ते खरी नावे घेऊन लिहायचे आहे. त्यात जी ऑथेंटिसिटी असते, ती फिक्शनमध्ये नसते. बघू कधी जमते ते!

मी सुभाष अवचटांना ही आयडिया फोन करून सांगितली. ते म्हणाले, ‘जरूर लिही. आता त्या सगळ्या मुली म्हाताऱ्या झाल्या असतील. त्यांचे नवरेसुद्धा तुझे रसग्रहण एन्जॉय करतील.’

अवचटांनी त्या मुलींच्या नवऱ्यांचा विषय काढल्यावर माझ्या मनात सौं चा विचार आला. त्यासुद्धा या शब्दचित्रांवर संशय घेणार नाहीत, असे वाटले. पूर्वी त्या वैतागल्या असत्या, पण आता या ‘कागदी वाघा’विषयी त्यांची खात्री पटलेली आहे.

श्री मिसळ! कांजीवरम साडी रस्सा!

६.

…तर हा सगळा विषय असा आहे. क्रेझी आकर्षण महत्त्वाचे, विषय महत्त्वाचा नाही. मधाच्या मोहाने कुठल्या तरी कमलिनीमध्ये अडकत जाणे आणि अडकून पडणे महत्त्वाचे. एकदा अडकून पडल्याचा अनुभव आल्यावर, त्याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. इतिहासात घडलेल्या घटना महत्त्वाच्या नसतात, इतिहासकार महत्त्वाचा नसतो, सांगितला गेलेला आणि त्यातही गायला गेलेला इतिहासच महत्त्वाचा असतो. मानवी आयुष्याचा खरा जिवंतपणा त्या कथनातून आणि गायनातून प्रतीत होणाऱ्या एनर्जीमध्ये लपलेला असतो.

थोडक्यात, हा लेख मिसळींवरचा नाहिये, तर लेखकाने एन्जॉय केलेल्या स्वतःच्या तारुण्यावरचा आहे, आणि मिसळींचा ‘ब्लास्ट’ हा तारुण्यातील अनावर आकर्षणांचे प्रतीक आहे.

आपण आपल्या प्रेमाचे विषय सेलिब्रेट करून ‘अमर’ करण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपण एन्जॉय केलेल्या तारुण्यावर अन्याय केल्यासारखे होणार नाही का?

.................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख