आनंद दिघे यांच्या आयुष्यावर ‘धर्मवीर’सारखा सिनेमा दोन भागांत निघावा, अशी त्यांची काय कामगिरी आहे?
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
बंधुराज लोणे
  • ‘धर्मवीर’ या सिनेमाच्या दोन्ही भागांची पोस्टर्स
  • Sun , 29 September 2024
  • कला-संस्कृती मराठी सिनेमा धर्मवीर Dharmaveer आनंद दिघे ‎‎Anand Dighe शिवसेना Shivsena बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray

एक शतकाहून अधिकचा इतिहास असलेला सिनेमा विशिष्ट वर्गाचे हितसंबंध जोपासत आला आहे. मराठी चित्रपट तर आजही फारसा उच्चवर्णीय जातींच्या बाहेर गेलेला नाही. तिकडे दक्षिणेत या माध्यमात अनेक प्रयोग होत असताना मराठी सिनेमा मात्र अधिकाधिक प्रतिगामी होत आहे. शिवाय ‘सिनेमॅटिक    स्वातंत्र्या’च्या नावाखाली असत्य घटना, खोटा इतिहास सांगून प्रेक्षकाच्या भावनांशी खेळ खेळण्यात येतो. गेल्या काही वर्षांत छत्रपती शिवाजीमहाराजांवर आलेल्या सिनेमांत तर अतिशय कट्टरता दाखवण्यात आली, मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या काळात न घडलेल्या घटना दाखवण्यात आल्या. महाराजाचा खोटा इतिहास मांडण्यात आला. अशा बनवाबनवीचे अलीकडचे उदाहरण म्हणजे ‘धर्मवीर’ हा सिनेमा. 

या सिनेमाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मंगेश देसाई या मराठवाड्यातील कलाकाराचे नाव निर्माता म्हणून असले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आर्थिक पुरवठादार आहेत, हे नाकारण्यात अर्थ नाही. एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे संबध कसे होते, शिंदे दिघेंचे राजकीय वारसदार होऊ शकतात का, दिघे असताना शिंदे यांचे शिवसेनेत नेमके काय स्थान होते? या दोघांत किती प्रेम, जिव्हाळा होता, हे थोडे बाजूला ठेवले, तर शिंदे यांचा दिघेंवरील हा  सिनेमा राजकीय व्यापार\व्यवहार आहे, हे अगदी स्पष्ट आहे. म्हणजे शिवसेना सोडून भाजपसोबत हातमिळवणी करण्याआधी आपली प्रतिमा उजळ करण्यासाठी शिंदे यांनी दिघेंवरील चित्रपटाचा घाट घातला. 

पहिल्या भागात अनेक घटना, प्रसंग काल्पनिक घुसडण्यात आल्या, याची काबुली एकदा खुद्द शिंदे यांनीच दिली. दिघेंचे पार्थिव खांद्यावर घेऊन शिंदे जात आहेत, असा एक कधीही न घडलेला प्रसंग सिनेमात आहे. राज ठाकरे दिघेंना भेटून निघाले आणि थोड्या वेळात दिघेंचा मृत्यू झाला, राज ठाकरे परत फिरले, असाही एक प्रसंग आहे. ही घटना खरी आहे, पण ते राज ठाकरे नव्हते, तर नारायण राणे होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आता शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा दिघेंना मैदानात उतरवले आहे. या सिनेमात दिघेंच्या कार्याचा आढावा घेण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडण्याचे लंगडे समर्थन करण्यात आले आहे. म्हणजे सत्तेत असूनही पालघर साधू हत्याकांड किंवा सावरकर यांच्यावर होणारी टीका, यांमुळे शिंदे आणि त्यांचे झेलकरी कसे अस्वस्थ होते, त्यांच्या कसा कोंडमारा होत होता वगैरे दाखवले आहे. 

दिघे काही फार थोर नेते नव्हते. त्यांचे शिवसेनेत फार मोठे स्थान होते असेही नाही. ते एका जिल्ह्याचे नेते होते. पण ते स्वतःला ‘ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख’ असे म्हणवून घेत. दिघेंच्या आयुष्यावर असा दोन भागांत सिनेमा निघावा, अशी त्यांची काय कामगिरी आहे? दिघेंना जवळून ओळखणारे, त्यांच्यासोबत काम केलेले अनेक नेते, पत्रकार आजही कार्यरत आहेत. ते दिघेंच्या एकूण कार्याची आणि कार्यपद्धतीची साक्ष देतील. 

आज शिवसेनेवर मालकी सांगणार्‍या एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अनेकांचा दिघेंशी फारसा संबध आलेला नाही. एवढेच नव्हे तर त्यांना दिघेंना भेटण्याची संधीही मिळालेली नाही. पण या सिनेमात ते स्वतःला दिघेंचे वारसदार असल्याचा दावा करत आहेत. यापैकी अनेक जण तर त्या काळात शिवसेनेतही  नव्हते. आज जे एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत आहेत आणि ‘हिंदुत्वाशी बेईमानी’ वगैरे शब्द वापरत आहेत. पण त्यांची शिवसैनिक म्हणून कारकीर्द दिघेंच्या नंतर सुरू झालेली आहे. सिनेमासारख्या माध्यमाचा असा राजकीय वापर पूर्वी कधी झाला नसेल.

पहिल्या भागात दादा भूषेला दिघे सांगतात की, तू मंत्री होशील, कृषीमंत्री होशील. हा किती बावळटपणा आहे! २५-३० वर्षांपूर्वी दिघे असे का सांगतील आणि हे दादा दिघेला कधी भेटले तरी होते का? दिघे गेले, तेव्हा हा दादा कुठे होते? आणि शिवसेनेत असे मंत्री करायचे अधिकार कोणाला होते?

या सिनेमात दिघे बाळासाहेब ठाकरे यांचे पाय धूत आहेत, असा एक प्रसंग आहे. बाळासाहेब शिवसेनेचे सर्वोच्च नेते होते, त्यांच्या शब्दासाठी शिवसैनिक जीव द्यायला तयार होते, पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात असे पाय धुणे वगैरे प्रकार बाळासाहेबांनी कधी केले नाहीत. मुळात असे कर्मकांड त्यांना मान्यच नव्हते. पण बाळासाहेबांचे पाय धुवून प्यावेत असे उपकार असलेले अनेक नेते आज महाराष्ट्रात आहेत.

दिघेंच्या मृत्यूनंतर बाळासाहेब म्हणाले होते की, ‘त्याला (दिघे) सिगारेट सोड म्हणून मी अनेकदा बजावले, पण त्याने मनावर घेतले नाही. कधी तरी यायचा तो मातोश्रीवर, आता सर्व संपले.’

दिघे भले एका जिल्ह्याचे नेते होते, पण ते कडवे शिवसैनिक होते. बाळासाहेबांवर त्यांची निस्सीम भक्ती होती. ते तसे फार वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ वगैरे नसतील, पण अतिशय ताकदीचे संघटक होते. ते फारशी भाषणे करायचे नाहीत. ते सत्तेसाठी शिवसेनेत नव्हते, कारण त्यांनी कधी कोणतीच निवडणूक लढवली नाही, कारण त्यांना बाळासाहेबांसारखे प्रमुखपद महत्त्वाचे वाटत होते. हेच त्यांचे इतर नेत्यांपेक्षा वेगळे असे वैशिष्ट्य आहे.

अविवाहित असणे, दिवसरात्र लोकांना भेटणे, कार्यालयात येणाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, हे दिघेंचे गुण त्यांना मोठा नेता करण्यास कारणीभूत होते. कार्यपद्धतीच्या बाबतीत दिघे बाळासाहेबांची नक्कल करत होते किंवा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करत होते, असे म्हणता येईल.

दिघेंची जी काही ताकद, दरारा, प्रतिमा होती, ती कोणाच्या जीवावर होती? बाळासाहेबांच्याच जोरावर! एका जिल्ह्याच्या बाहेर दिघेंना कोणी ओळखत नव्हते. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली, तेव्हा दिघे भुजबळांला धडा शिकवण्यासाठी नागपूरला रवाना झाले, अशी बातमी दैनिक ‘महानगर’ने दिली होती. एका महापौर निवडणुकीत गद्दारी करणार्‍या खोपकर या नगरसेवकाची हत्या करण्यात आल्यावर दिघेंचा दरारा, दहशत वाढली. पण ही हिंमत त्यांनी कोणाच्या भरवश्यावर केली होती, तर बाळासाहेब ठाकरे.  बाळासाहेब आपल्याला वाचतील, हा विश्वास दिघेंना होता.

एकदा एक पालिका आयुक्त दिघेंना नडला, तेव्हा दिघेंना आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी बाळासाहेबांची मदत घ्यावी लागली होती. बाळासाहेबांनी त्या आयुक्ताला फोन करून दिघेंना सहकार्य करा, असे बजावले होते. तेव्हा बाळासाहेब किंवा शिवसेना वगळून दिघे काय होते? शून्य! अर्थात, अशीच आपल्याकडील एकंदर राजकीय नेते आणि पक्षांची बांधणी आहे.

दिघेंच्या काळात शिंदे किंवा इतर कोणी शिवसेना सोडण्याचा, कोणत्याही कारणासाठी प्रयत्न केला असता का? त्याचे काय परिणाम झाले असते?

एकदा दसरा मेळावा पार पाडून परत जात असताना दिघे किंवा त्यांच्या अंगरक्षकाने सिद्धार्थ कॉलनीत गोळीबार केला होता. त्यात एका महिलेचा बळी गेला. त्या अर्थाने एका निरपराध महिलेच्या हत्येचा आरोप दिघेंवर होता. त्यांना ‘टाडा’ कायद्याखाली अटक झाली होती. नाशिक तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते, पण त्यांना अटक काही राजकीय आंदोलन वगैरेसाठी झाली नव्हती. मंगलगड प्रकरणी दिघेंचे आंदोलन दरवर्षी त्या परिसरात तणाव निर्माण करायचे. अशा काही घटना सोडल्या तर दिघेंच्या नावावर मोठे म्हणावे असे कोणतेही आंदोलन नाही.

‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी टॅगलाईन या सिनेमाची आहे. पण शेवटी दिघेंचे ‘हिंदुत्व’ काय होते?  पटकथालेखक आणि दिग्दर्शक असलेला प्रविण तरडे यांना ‘हिंदुत्व’ नीट समजले आहे का? एक तर तरडे काही फार मोठे लेखक, दिग्दर्शक नाहीत. एक-दोन मसाला सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. या सिनेमामुळे तर ते सत्तेपुढे लाचार असल्याचेही सिद्ध झाले. त्यांची कधी दिघेंसोबत भेट झाली का? दिघेंसोबत कार्यरत असलेल्या किती नेते, शिवसैनिकांना, पत्रकारांना तरडे भेटले आहेत? त्यांनी काय संशोधन केलेय? मालकाने सांगितलेले किस्से घेतले की, झाली साहेबांच्या ‘हिंदुत्वा’ची गोष्ट!

सिनेमॅटिक स्वातंत्र्य असावे, पण किती? खोट्या गोष्टी मांडण्याचे स्वातंत्र्य? ‘धर्मवीर’च्या दोन्ही भागांतले अनेक घटना प्रसंग हे अर्धसत्य आहेत. तरडे यांनी हे फक्त चांगली रक्कम मिळावी म्हणून केलेय का?

मला वाटते असे नाही. तरडे संघाच्या विचारधारेचे आहेत. संघ-भाजपच्या राजकारणाला बळकटी देण्यासाठी एका सेवकाचे हे प्रयत्न आहेत. केवळ मुस्लीम किंवा इतर समाजाला धडा शिकवणे, द्वेष निर्माण करणे म्हणजे ‘हिंदुत्व’ का? ‘मातंग समाजाच्या वज्रमूठीत ‘हिंदुत्व’ आहे’, असा एक संवाद या सिनेमात आहे. तरडेंना माझा एक साधा प्रश्न आहे- ‘मग करताय का मातंग समाजासोबत रोटीबेटी व्यवहार’? मुळात दिघेंकडे अशी काही बौद्धिक समजदारी कधीही नव्हती.

अनिल थत्ते या पत्रकाराने दिघेंना ‘धर्मवीर’ ही पदवी दिली. स्वतःच्या धंद्यासाठी त्यांनी हा उद्योग केला होता. दिघे आणि गणेश नाईक यांच्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यावरूल संघर्ष सुरू होता. त्या काळात हे ‘गगनभेदी’ पत्रकार दिघेंकडे चिटकले आणि त्याने ‘धर्मवीर’ नावाची छोटी पुस्तिका लिहिली… आणि झाले दिघे ‘धर्मवीर’. हा इतिहास ठाण्यातील पत्रकारांना तोंडपाठ आहे. 

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

गणेश नाईक शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. दिघे यांनी  बाळासाहेबांना एका साध्या शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची विनंती केली. मतमोजणीच्या वेळी मतमोजणी केंद्राची वीज गेली, घालवण्यात आली आणि गणेश नाईकचा पराभव झाला. अशा काही घटनांमुळे दिघेंचे वर्चस्व वाढत गेले.

जे देवेंद्र फडणवीस तिसर्‍या भागाची पटकथा लिहायला निघाले आहेत, त्यांनाही कधी दिघेंना भेटण्याची संधी मिळालेली नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे याच दिघेंनी ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व मोडून काढले होते. राम कापसेंसारख्या भाजपच्या मोठ्या नेत्याचे लोकसभेचे तिकीट दिघेंच्या आग्रहाखातर बाळासाहेबांनी शिवसेनेकडे घेतले होते. सर्व स्तरावरील भाजपच्या सत्तेला दिघेंनी सुरुंग लावला होता. तेव्हा दिघेच भाजपचे ठाणे जिल्ह्यातील कडवे विरोधक होते. आज सोयीसाठी भाजपनेते त्यांच्या प्रेमाचे गुणगान करत आहेत. ही मजबुरी म्हणायची की, नियतीने उगवलेला सूड?

खरं तर ‘साहेबाच्या हिंदुत्वाची गोष्ट’ वगैरे टॅगलाईन हे तरडे किंवा शिंदेचे काम नाही, हे भाजपचे काम आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पर्याय देण्याचा हा एक प्रयत्न आहे. आधी त्यांनी बाळासाहेब उद्धव ठाकरेंकडून हिंसकावून घेण्याचा प्रयत्न केला, आता ‘पर्यायी हिंदुत्ववादी जननायक’ निर्माण करण्याचा आटापिटा चालू आहे.

थोडक्यात, दिघेंना अवास्तव मोठे करून, अर्धसत्य गोष्टी सांगून, प्रविण तरडेच्या खांद्यावर ओझे ठेवून एकनाथ शिंदे आणि भाजपने हिंदुत्वाची ‘तिरडी’ काढली आहे, एवढाच या सिनेमाचा अर्थ आहे.

..................................................................................................................................................................

लेखक बंधुराज लोणे पत्रकार आहेत.

bandhulone@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......