अजूनकाही
‘भूमी आणि आकाश यांना जोडणारे मानवी धागे’ या टॅगलाईनखाली नाटककार दत्ता पाटील यांच्या चार नाटकांचा ‘नाट्य चौफुला’ हा एकसलग नाट्यप्रयोग पुणे आणि ठाणे या ठिकाणी ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाला.
रंगकर्मी अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या हा प्रयोगाविषयी आपले मत व्यक्त करताना ते म्हणतात, ‘नाटक करणं आर्थिकदृष्ट्या नाटक करणाऱ्यांना आणि प्रेक्षकांनाही परवडणारे नाही. त्यामुळे असे प्रयोग होणे अपेक्षित आहे.’ आजच्या काळाचा विचार केला, तर व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा ठळकपणे अधोरेखित करता येणाऱ्या दोन्ही नाट्यधारांपुढे आपला प्रेक्षक टिकवण्याचे आव्हान आहे. नाटक या कलाप्रकाराकडे प्रेक्षक यावा, असणारा टिकावा, यासाठी आरंभापासूनच असे प्रयोग केले गेले आहेत.
नाटक ही प्रयोगरूप कला आहे. प्रयोगाशिवाय तिचा विचार पूर्ण होत नाही. त्यामुळे संहिता ते प्रयोग हा टप्पा पूर्णतेकडे जात असताना अनेक शक्यता संभवतात. शिवाय एकाच नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा पहिल्यासारखा दुसरा अथवा दुसऱ्यासारखा पहिला असत नाही. स्थळ, दिग्दर्शक आणि वर्तमानकालीन संदर्भ यानुसार नाटकाचे प्रयोग बदलत जातात. अनेकदा त्यामध्ये उत्स्फूर्तताही असते. कधी कधी ते आजच्या काळाशी जोडून घ्यायचे असतात. या सर्व शक्यता विचारात घेऊन नाटकात प्रयोग होत राहणे स्वाभाविक असते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आजवरच्या एकूण मराठी नाटकाचा विचार केला, तर चरित्रात्मक, निखळ मनोरंजनात्मक, व्यावसायिक, गंभीर सामाजिक प्रश्नाची मांडणी करणारी, प्रयोगशील आणि पुनर्जीवित (‘फुलराणी’, ‘वऱ्हाड चाललंय लंडनला’, ‘हसवाफसवी’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘शांतेचं कार्टं चालू आहे’), विशिष्ट ‘टूम कॅश’ करण्याचा प्रयत्नांतून लिहिली गेलेली नाटके (‘एक चावट संध्याकाळ’, ‘अग्रेसिव्ह’), फार्सिकल (बबन प्रभू, शाम फडके), निखळ विनोदी (गंगाधर गाडगीळ - वेड्याचा चौकोन), भाषांतरीत – रूपांतरीत (माधव वाटवे, पु.ल. देशपांडे, गो. के. भट, विजय तेंडुलकर, शं.ना. नवरे), अशा काही प्रवृत्ती अधोरेखित करता येतात.
नाटकाकडे गंभीरपणे पाहण्याची दृष्टी व्यावसायिक नाटकांपेक्षा प्रायोगिक नाटककारांचीच अधिक राहिलेली आहे. काळ आजचा असो वा गेल्या २० वर्षांतला, नाटकासमोर त्या त्या काळात आव्हाने होती आणि त्या त्या काळातील नाटककार-दिग्दर्शक यांनी त्यावर काही उपाययोजनाही केल्याच्या नोंदी आढळतात.
१९९० पूर्वी ज्या प्रकारचा प्रेक्षक अस्तित्वात होता, तो नंतर कमी कमी होत गेलेला दिसतो. मनोरंजन साधनांची सहजगत्या उपलब्धी आणि स्वताई, यामुळे नाटक पाहणं आणि करणं, सामान्यांच्या हातातून सुटून जाऊन शहरी-निमशहरी लोकांचा कलाप्रकार झाला. यात भर म्हणून मोबाईल आणि ओटीटी माध्यमातून उपलब्ध होणारा कंटेट, त्यातील वैविध्य, सहज उपलब्धी, यामुळे प्रेक्षक त्याच्या आकृष्ट न झाला तरच नवल!
या परिणाम असा झाला की, चित्रपटगृहाकडे आणि नाट्यगृहाकडे जाणीवपूर्वक वळणारा प्रेक्षक आटत गेला. काळाच्या त्या त्या टप्प्यावर जो प्रेक्षक उरला, त्याला वाचवणं आणि दूर घेलेल्या प्रेक्षकाला पुन्हा नाटकाकडे आणण्यासाठी जे प्रयोग केले गेले, ते सारे ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ होते.
एकीकडे नाटकाच्या आशय मांडणीसाठी नाटककाराने जाणीवपूर्वक काही प्रयोग करणे आणि दुसरीकडे नाटक या कलेसाठी काही प्रयोग करत राहणे, अशा दोन पातळ्यांवर हे ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ समजून घ्यावे लागतात.
याची सुरुवात विष्णूदास भावे यांच्यापासून करावी लागते. त्यांनी मनोविनोदनासाठी निर्माण झालेल्या नाटकाला पौराणिक आख्यानाची जोड दिली. हा एका ‘प्रयोग’च होता. त्यांच्यानंतर नाटकाला ओहोटी लागलेल्या काळात युद्धोत्तर समाजाची बदलेली घडी, नवे प्रश्न नजरेसमोर ठेवून मामा वरेरकर यांनी नाट्यलेखन केले.
पुढे रंगभूमीच्या विकासासाठी पार्श्वनाथ आळतेकर यांनी स्थापन केलेली ‘नॅशनल थिएटर अॅकॅडमी’, एकप्रवेशी अंकाची योजना करून सुटसुटीत, चटकदार, खटकेबाज संवादाच्या मदतीने मो. ग. रांगणेकरांनी केलेले नाटकाचे लेखन, परळच्या रंगभूमीवरील खेड्यातील विषय घेऊन केलेले नाट्यलेखन. त्यासाठी संवादरचनेत त्यांनी दाखवलेला पटाईतपणा, ‘रंगायन’, ‘आविष्कार’ या नाट्यसंस्था, विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीवर ब्रेख्तियन शैलीचा घडवलेला आविष्कार व प्रेक्षकांची अभिरुची घडवण्यासाठी राबवलेले अनेक उपक्रम, विद्यापीठातून सुरू झालेले नाट्यशास्त्राचे अध्यापन करणारे विभाग, स्वतंत्र संस्था, राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने विखुरलेली हौशी नाटककार मंडळी, भाषांतरीत रूपांतरीत स्वरूपात आलेली विपुल नाटके (उदा., १९६८ साली माधव वाटवे यांनी रूपांतरीत स्वरूपात आणलेले ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ हे लुई पिरांदेलो यांचे नाटक), नव्या रंगद्रव्याचा शोध घेणारे चिं. त्र्यं. खानोलकरांचे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक, विजय तेंडुलकर यांचे ‘घाशीराम कोतवाल’, महेश एलकुंचवार यांचे ‘महानिर्वाण’, माधव वझे, गो.पु. देशपांडे , रत्नाकर मतकरी, शाहीर साबळे, पु. ल. देशपांडे, वसंत सबनीस, वृदांवन दंडवते यांनी नाट्यलेखनातून विविध प्रकारचे प्रयोग केले. नाटकाच्या नवनव्या शक्यतांचा शोध घेतला.
विशिष्ट शहरांपुरतीच सीमित असलेली नाट्यचळवळ महाराष्ट्रातल्या गावागावांपर्यंत पोहचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे अलीकडच्या काळातले एक नाट्यकर्मी म्हणजे अतुल पेठे. त्यांनी ‘वेटिंग फॉर गोदो’सारखे जबरदस्त नाटक रंगमंच्यावर आणण्यासाठी घेतलेले कष्ट, जालना परिसरातील कलावंत गोळा करून त्यांनी बसवलेले ‘दलपतसिंग येती गावा’, पुणे महानगरपालिकेच्या कामगारांच्या मदतीने साकारलेले ‘सत्यशोधक’, हे नाटक, असे त्यांचे उपक्रम मोलाचे आहे.
वामन केंद्रे, तुषार भद्रे, हिमांशु स्मार्त, प्रवीण भोळे हे नाटककार-दिग्दर्शक आपल्या परीने नाटकाच्या वेगळ्या शक्यता तपासत आहेत. काळ आणि अवकाशाच्या अनेक शक्यता त्यांच्या लेखनातून, प्रयोगातून प्रत्ययाला येतात.
या वैयक्तिक प्रयत्नांबरोबरच कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, कणकवली, मालवण, पुणे, नाशिक, सोलापूर आणि महाराष्ट्रातील इतरही लहान-मोठ्या शहरांतील लोक नाटकासाठी काही तरी करू इच्छिताहेत. त्यामध्ये प्रदीप शिवगण, परसू गावडे यांच्यासारख्या रंगकर्मींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हे रंगकर्मी नाटक लोकांपर्यत पोहचावं म्हणून धडपडताहेत.
विदर्भातल्या धरणगावकर देशपांडेंच्या घराची गोष्ट ‘त्रिनाट्यधारे’तून अनुभवायला मिळाली होती. हा एक अभिनव प्रयोग होता. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ या महेश एलकुंचवार यांच्या या तीन नाटकांचा दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सलगपणे दिलेला प्रयोगानुभव आपल्या गाठीशी आहे.
त्यानंतर सुनील बर्वे यांनी आपल्या ‘सुबक’ या संस्थेच्या माध्यमातून २०१० साली राबवलेला ‘हर्बेरियम’चा प्रयोग. यात वसंत कानेटकरांचे ‘सूर्याची पिल्ले’, बाळ कोल्हटकरांचे ‘लहानपण देगा देवा’, अनिल बर्वेंचे ‘हमीदाबाईची कोठी’, शाहीर साबळेंचे ‘आंधळं दळतंय’ आणि बबन प्रभूंचे ‘झोपी गेलेला जागा झाला’, ही जुन्या काळातील पाच नाटके पुन्हा रंगभूमीवर आणली गेली.
त्रिनाट्यधारा आणि हर्बेरियमनंतरचा ‘नाट्य चौफुला’ हा महत्त्वाचा टप्पा आहे. यातल्या चारही नाटकांचे विषय ग्रामीण जीवनाशी निगडीत आहेत. पाणी, गावचा इतिहास, कालोघात नष्ट झालेल्या गावच्या परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याचा ध्यास घेतलेली आणि नोकरीअभावी लग्नाचे वय ओलांडून गेलेली तरुणाई, असे आजच्या महाराष्ट्राच्या कुठल्याही खेड्याचे वाटावेत असे प्रश्न या नाटकांत हाताळले आहे.
स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षं झाली, पण आजही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष ग्रामीण लोकांच्या वाटयाला आहे. मग नाशिक जिल्ह्यातील नांदगाव असो वा पालघरमधील जव्हार मोखाडा तालुक्यांतील आदिवासी पाडे. पाण्यासाठी लोकांचा संघर्ष अजून संपलेला नाही. ज्या गावात मरणाऱ्या व्यक्तीची अखेरची अंघोळ केवळ एका तांब्याभर पाण्यात उरकली जाते, जिथला वयोवृद्ध निदान मरताना तरी पाण्याचा टॅकर डोळे भरून पाहता येईल म्हणून मरण लांबणी टाकतो आणि आपल्या बापाला निदान मरणापूर्वी डोळे भरून पाणी पाहता येईल, व्यवस्थेला वठणीवर आणता येईल म्हणून थेट तहसीलदाराचे अपहरण करून आणणारा तरुण ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकात नाटककार दत्ता पाटील यांनी उभा केला आहे.
आपल्याला इतिहास नाही म्हणजे आपले जीवन कंडम आहे, असा मानणारा नाना आपल्या गावचा इतिहास शोधण्याच्या नादी लागला आहे. इतिहास सापडला, तर आपले गाव प्रसिद्धीस येईल आणि गावाबरोबर आपणही प्रसिद्ध पावू, यासाठी धडपडणारा हा तरुण शेवटी आपल्या हाती अपेक्षित इतिहास लागत नाही म्हणून गाव सोडून नाशिककडे प्रयाण करतो. इतिहासाचा शोध जरी या नाटकाचा विषय असला तरी वर्तमान शिक्षण व्यवस्था, बदलता गावगाडा यांवरही हे नाटक भाष्य करते. या नाटकातील मध्यवर्ती पात्र नाना एके ठिकाणी म्हणतो, ‘इथं दहावी पास झालेल्याला जितकी किंमत आहे, तितकी किंमत बीए झालेल्याला नाही.’ दुसऱ्या, ‘दगड आणि माती’ या नाटकाचे हे कथानक आहे.
लोकांनी आपल्या सोयीनुसार इतिहासाचा अर्थ लावायला घेतला आहे. त्यामुळे आपल्या सभोवताली वेगळाच इतिहास अस्तित्वात आला आहे. आपल्याला इतिहास असणं, हे आजच्या काळासाठी कमालीचं आवश्यक ठरलं आहे. जसा इतिहास तसं आपलं कुळ आणि कुलाचारही महत्त्वाचा आहे. हा कुलाचार मांडणारे नाटक म्हणजे ‘कलगीतुरा’. सखाराम आणि सीताराम या कलगीतुऱ्यारी शाहिरी सांगणाऱ्या मित्रांची ही कथा. या नाटकात कलगीतुऱ्याचा अभ्यास करायला आलेले एक पात्र घेऊन नाटककाराने प्लॅशबॅक पद्धतीने कलगीतुऱ्याचा सारा इतिहास उलगडला आहे.
जातीपातींत विभागलेला समाज, धर्माच्या टोकदार अस्मिता आणि या अस्मितांचा मतांसाठी होणारा वापर, या आडून खेळल्या जाणाऱ्या राजकारणाला नाटककाराने कलगीतुऱ्याच्या संवादातून उत्तर दिले आहे. सखाराम आणि सीताराम सोबत येणारा मुस्लीम समाज हा त्या काळच्या उत्तम जातीय सलोख्याचे उदाहरण म्हणता येईल.
शेती आणि लग्न यांचं गणित अजून तरी जुळलेलं आढळत नाही. शेती करतो म्हणून कोणी मुलगी देत नाही. लग्नाचं वय वाढत जातं. वयाची पस्तीशी आली तरी लग्न जमत नाही. यातून भावनिक पातळीवर होणारा कोंडमारा आणि त्यावर उपाययोजना म्हणून कवितालेखन करणारा, आपल्या विश्वाव मश्गुल असणाऱ्या तरुणाची कथा म्हणजे ‘तो राजहंस एक’ हे नाटक.
दत्ता पाटील हे आजच्या काळाचे, १९९० नंतरच्या बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण करणारे महत्त्वाचे नाटककार आहेत. आज तरुणाने खेड्यात राहावे असे खेडे राहिले नाही. आजच्या तरुणाच्या हाती ना पिकावू जमीन, ना नोकरी. शेती करतोय म्हणून लग्न होण्याची शक्यता धूसर. नोकरीअभावी लग्नाचं वय वाढणं, यातून खेडयातील तरुणाचा भावनिक पातळीवर कोंडमारा होतोय. तो आपल्याला आजवर किती मुलींनी नकार दिला, हे मुली पाहण्याच्या कार्यक्रमात बेधडक सांगतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
त्याचा हा निरागसपणा त्याला माणूसपणाच्या उंचीवर घेऊन जातोय. इथला तरुण लग्न जमत नाही म्हणून अस्वस्थ होण्यापेक्षा गावाला इतिहास नाही म्हणून, गावाला हंडाभर पाणी मिळावे म्हणून, आपल्या हरवलेल्या परंपरा जीवंत व्हाव्यात म्हणून अधिक अस्वस्थ आहे.
दत्ता पाटील यांची ही चारही नाटके दोन पिढ्यांतील संघर्ष उभा करतात. ती ओळख नसलेल्या माणसांची आणि गावाची ही नाटके कथा सांगतात. शिवाय बदललेल्या राजकीय संदर्भावरही भाष्य करतात. अशी ही ‘हंडाभर चांदण्या’, ‘दगड आणि माती’, ‘कलगीतुरा’ आणि ‘तो राजहंस एक’ या नाटकाची कथानके.
दत्ता पाटील यांची नाटके अवकाशाची अनेक प्रकारे मोडतोड करतात. रंगभूमीच्या आजवरच्या अनेक प्रचलित बाबींना त्यांची नाटके तडा देतात. घरापासून स्मशानभूमीपर्यंतचा अवकाश लेखकाने उभा केला आहे. त्यांची चारही नाटके ग्रामीण परिसरात घडत असल्यामुळे खेड्यात चर्चेची म्हणून जी जी काही महत्त्वाची ठिकाणे आहेत, ही सारी या नाटकांत आली आहेत. केवळ ती आली नसून जिवंतरूपात येतात. विशेषत: ‘दगड आणि माती’ व ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकांत अवकाशाच्या अनेक शक्यता अनुभवायला येतात.
‘नाट्य चौफुला’च्या रूपाने एकाच वेळी संपूर्ण नाटककार पाहायला, अनुभवाला मिळणं, हे विशेष महत्त्वाचं आहे.
.................................................................................................................................................................
लेखक बळवंत मारुती मगदूम श्री. आर. आर. पाटील महाविद्यालय, सावळज ता. तासगाव येथे शिक्षक आहेत.
balvantmagdum2020@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment