अजूनकाही
समाजात पेरलेलं जातीचं विष, पिढ्यानपिढ्या चालत आलेली भाऊबंदकी आणि स्त्री म्हणून समाजात पावलोपावली मिळणारी अवहेलना, यातून जिद्दीच्या जोरावर पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या छातीवर पाय रोवून उभ्या राहिलेल्या एका खंबीर स्त्रीची, मनाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजे ‘एक भाकर, तीन चुली’ ही कादंबरी. देवा झिंजाड यांची ही साहित्यकृती मनाला चटका लावते, अंगावर शहारे उभे करते.
ही देवा झिंजाड, विशेषतः त्यांच्या आईच्या परवडीचं भयाण वास्तव मांडणारी आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. तिचा काळ साधारण १९५० ते १९९३ असा वाटतो. पण वाचताना प्रकर्षानं जाणवतं की, आजही स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीत फारसा बदल झालेला नाही. तेच विचार, तेच संस्कार, सगळं तेच. फक्त काळ, वेळ, दिवस आणि वर्ष सोडलं, तर काहीच बदललेलं नाही.
मुलगी जन्माला आली म्हणून आजोबांनी दिलेला त्रास, बालविवाह, सासरी अतोनात छळ आणि महिन्याभरातच आलेलं विधवापण... अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागूनही, कधीही कोणापुढे हात न पसरता एकट्याने लढणारी या कादंबरीची नायिका, पारू या कादंबरीतून भेटते.
ज्यांनी तिला हिणवलं, तिची निंदा-नालस्ती केली, त्या सगळ्यांना ती उलथवून लावते. पारू पोटासाठी, पोटच्या गोळ्यासाठी लढते. परिस्थिती कशीही असली, कितीही बिकट असली तरी रडायचं नाही, लढायचं, हे पारू आपल्याला सांगत राहते. पोट भरायला माणूस काय काय करू शकतो, त्यातही एकट्या बाईला काय काय भोगावं लागतं, याचं ज्वलंत उदाहरण पारूच्या रूपाने या कादंबरीमधून आपल्याला दिसतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आपल्या समाजाने कधीच बाईची किंमत केली नाही. किंमत असते, ती फक्त पैशाला आणि बाईच्या शरीराला. आजसुद्धा हेच वास्तव आहे. एवढं वाईट जगणं बाईच्या वाट्याला का येतं, असं आपल्याला वाटत असताना पारू डोंगर होऊन अभेद्य कसं उभं राहायचं, हे दाखवून देते.
ही नायिका अफाट ताकदीची आहे. एखाद्या सिनेमाला लाजवेल असा तिचा संघर्ष आपल्या डोळ्यांसमोर तंतोतंत उभा राहतो. आयुष्याची वाताहत होऊनही राखेतून फिनिक्स होऊन संकटांवर तुटून पडणारी पारू आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी आदर्श आहे. तिच्या जिद्दीला, लढ्याला कुठल्या युद्धाची उपमा द्यावी कळत नाही. तिच्या नजरेतून आपल्या समाजाचं भयाण वास्तव पाहायला मिळतं.
भावकी हा एक शाप आहे. पारूची भावकीदेखील त्याला अपवाद नाही. पारूचा जन्म स्वातंत्र्याच्या थोड्या आधीचा. जन्मापासूनच तिच्या जीवाची हेळसांड सुरू झाली. तिच्या जन्माचा वेळोवेळी तिरस्कार केला गेला.
कथा ज्या काळातली आहे, तेव्हा बालविवाह प्रथा अस्तित्वात होती. पारूचाही बालविवाह लावला गेला. आयुष्याची काही समज यायच्या आत म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झालं, संसार सुरू झाला. सतत संशय घेणारा म्हातारा दगडू नवरा पारूच्या पदरात पडला! मात्र ‘ज्याच्या दावणीला बांधलं तिथंच खाली मान घालून जगावं लागतंच, असं बाई माणसाचं जगणं’, अशी मनाची समजूत करून घेत पारू गुपचूप जगत राहिली. आयुष्यात वाट्याला आलेले एकामागून एक भोग - संकटं, अनन्वित छळ सहन करत राहते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
पुढे म्हातारा दगडू मरतो आणि पारू विधवा होते. त्याचंही खापर तिच्याच डोक्यावर फोडलं जातं.
मुलीच्या जन्माची ही चित्तरकथा मन बधिर करून टाकते. एखाद्याला छळण्याच्या किती तऱ्हा असाव्यात? एखाद्याला मुळापासून उखडून टाकण्याच्या किती युक्त्या-प्रयुक्त्या आजमावल्या जाव्यात? सारंच सुन्न करणारं...
बालपण करपून टाकणाऱ्या अनेक घटना, लहान वयात आलेलं वैधव्य... समाजाचा विरोध झुगारून आई-वडील पारूचं दुसरं लग्न लावून देतात. आधीच्या तीन बायका मेलेल्या शहाजीशी तिचा विवाह लावला जातो. या लग्नात मुलाच्या जन्माने सुखाची वाट घरापर्यंत चालत आली, असं मनोमन वाटत असतानाच शहाजीचा मृत्यू होतो. पारूची पुन्हा परवड सुरू होते, पण तरीही डगमगून न जाता पारू उभी राहते. समाजाच्या वखवखलेल्या नजरा, एकटी बाई बघून चारित्र्यावर ओढले जाणारे ताशेरे निधड्या छातीने झेलत प्रत्येक संकटावर मात करते.
पारूचं तिसरं लग्न होतं. तिसरं सासर, तिसरी चूल, तिसरा नवरा, तिसरं गाव. पारूची भटकंती थांबत नाही. आयुष्यभर मन मारूनच जगायला लागतं. अशातच बाळाचा म्हणजे लेखकाचा जन्म होतो. जीवनातला अंधार दूर झाल्यासारखं होतो. आयुष्यात आता उजेड होईल, असं वाटायला लागतं. पण पोटासाठीची वणवण मात्र थांबत नाही. पारूचा परिस्थितीशी असलेला झगडा थांबायचं नाव घेत नाही.
.................................................................................................................................................................
नाळ तोडायच्या आधीपासून चितेपर्यंत, बाळहंबरापासून हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन् संघर्षमय झाला, अशा जगातल्या सगळ्याच जातिधर्मांच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन् माझ्या प्रिय आईला ही कादंबरी समर्पित - देवा झिंजाड
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/7082
.................................................................................................................................................................
एका ठिकाणी लेखक लिहितात, ‘मी जरी प्राथमिक शाळेत शिकत असलो, तरी माझी आई जगण्यावर पीएचडी करत होती!’ पारू मुलाला म्हणते, ‘वाच बाबा! तुहा बाप बी लई वाचित बसायचा, तू बी वाच, वाचण्यानं मानूस शहाना व्हतो आसं तूहा बाप सारखा म्हनत राहायचा!’ एक अक्षरही न शिकलेल्या पारूच हे जीवनाचं तत्त्वज्ञान! इवलं इवलं जगणं कुरवाळत बसणाऱ्यांना या आभाळ फाटलेल्या जगण्याची कल्पनाही करता येणार नाही. म्हणूनच हे सर्वसामान्यांच्या सीमेपलीकडचं जग मनाला खोलवर भिडतं. अंतरात्म्याला ते झिंजोडतं, संवेदनशील मनाला पिळवटून टाकतं.
एखाद्याच्या आयुष्यात, त्यातही एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात आलेले भोग किती तऱ्हेतऱ्हेचे असू शकतात, याचे साद्यंत वर्णन करणारी, जगण्याची हकीकत सांगणारी ही कादंबरी आहे. आयुष्याची लढाई वारंवार हरण्याचेच प्रसंग समोर येत असतानाही, त्यातून जिद्दीने मार्ग काढणाऱ्या, परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देणाऱ्या पारूची असामान्य प्रतिमा या कादंबरीतून उभी राहते.
प्रभावी मांडणीमुळे आणि बोलीभाषेतील मुक्त संवादामुळे लेखनात अधिक परिणामकारकता साधली गेली आहे. कोणतंही साहित्य मनाला भावणं महत्त्वाचं. माणसातील माणूसपणाला लिखाणाने जागं केलं पाहिजे. अशा बाबींचा विचार केल्यास देवा झिंजाड यांची ‘एक भाकर तीन चुली’ ही कादंबरी विलक्षण आहे, यात शंका नाही.
‘एक भाकर तीन चुली’ - देवा झिंजाड
न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे | पाने – ४२४ | मूल्य – ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखिका राखी राजेंद्र राजपूत पत्रकार आहेत.
rajputrakhi358@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment