सामाजिक कार्यकर्ते मोहन सकपाळ यांच्या स्मृतीनिमित्त १८ ऑगस्ट २०२४ रोजी ‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ या स्मृतिग्रंथाचे मोहन सकपाळ मित्र परिवार, मुंबई तर्फे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. जीवराज सांवत यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाला त्यांनीच लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
१.
मोहन सकपाळची आणि आमची म्हणजे आम्हा सर्व मित्रांची भेट झाली, तो ८०चा ‘समता आंदोलना’चा काळ. ‘राष्ट्र सेवा दला’तली नवा विचार सांगणारी मंडळी वेगळी झाली आणि मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद आदी ठिकाणी कार्यकर्ते नव्या जोमाने काम करू लागले. सामाजिक प्रश्नांबरोबर राजकीय प्रश्नावर आंदोलन उभी करणारी तत्पर कार्यकर्त्यांची फळी काम करू लागली. त्यात दत्ता इस्वलकर, विजय तांबे, सुनील तांबे, मनोहर कदम, प्रतिमा जोशी, संजीव साने, संजय मं. गो., जवाहर नागोरी, विनय र. र., सुनीती सु. र., निशा शिवूरकर, शिवाजी गायकवाड, विष्णू ढोबळे, प्रमोद वागदरीकर, पार्थ पोळके अशी वैचारिक बळ असणारी तरुणाई गजानन खातू, महमद खडस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. ‘अरे’ला ‘कारे’ करण्याची हिम्मत यांच्याकडे होती.
त्या काळात सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना भिडणारे ते आंदोलन होते. जसे आधीच्या काळात समाजवादी परिवारातील ‘युक्रांद’चा दरारा होता. पुढे रत्नाकर महाजन, हुसेन दलवाई, नीलम गोऱ्हे आदी काही ‘युक्रांद’ची बुद्धिवादी समाजवादी मंडळी निरनिराळ्या राजकीय पक्षात स्थिरावली.
सफाई कामगार मोर्चा, परित्यक्त्या आंदोलन अशा प्रकारे अनेक सामाजिक प्रश्न घेत राजकीय आंदोलन उभे करणाऱ्या समता आंदोलनाच्या अध्वर्यूंना वाटले, ही ताकद समाजवादी राजकारणाला फायदेशीर होईल. त्यांनी ‘समता आंदोलन’ बंद करून राजकीय पक्षाची स्थापना केली. पुढे जाऊन त्या राजकीय पक्षाचे काय झाले, पक्ष किती टिकला, यावर चर्चा करण्याची ही जागा नाही. समता आंदोलन टिकले असते, तर कदाचित समाजवाद्यांच्या राजकीय कामाला पूरक ठरले असते, असे माझे मत आहे.
आणीबाणीनंतर १९७७चा ‘जनता पक्षा’चा प्रयोग फसला. समाजवादी कार्यकर्त्यांची राजकीय समज चांगली होती, पण तरीही कार्यकर्त्यांची घुसमट झाली. गिरगाव ते गिरणगाव कार्यकर्त्यांची मोठी ताकद होती, पण नेतृत्वच विखुरले गेले. राजकीय अस्थिरता वाढत गेली. मोरारजी देसाई ते व्ही. पी. सिंग अशा अस्थिर राजकीय परिघात व्ही. पी. सिंग यांनी १९९०मध्ये ‘मंडल आयोग’ लागू केला. त्याला विरोध करत उजव्यांनी ‘कमंडल प्रयोग’ म्हणून ‘रामजन्मभूमी रथयात्रा’ काढली. १९९२मध्ये बाबरी मशीद पाडली. त्याच्याआधी १९७८मध्ये ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलना’त हिंसाचार दंगलसदृश वातावरण निर्माण झाले होते. त्याची धग १९९४ला नामांतराचा अध्यादेश निघेपर्यंत होती.
याच काळात नामांतर आंदोलनाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. त्याचे पडसाद पद्धतशीरपणे भारतभर उमटत होते. याच काळात सामाजिक, राजकीय घसरण सुरू झाली. चुकीच्या राजकारणाचे आपण बळी ठरलो. वेळोवेळी निर्णय चुकत गेले. कार्यकर्त्यांची फरफट झाली. कार्यकर्ते साधी माणसे होती, पण त्यांच्यात रग होती, धग होती, ताकद होती, लढाऊ मानसिकता होती. काहीतरी करण्याची उर्मी होती. हे संपायला कारण ठरणारा मुंबईतील १९८२चा गिरणी कामगारांचा संप झाला आणि सांस्कृतिक वारसा असलेला गिरणगाव विखुरला. मुंबईतच नव्हे महाराष्ट्रभर समाजवादी चळवळीला शैथिल्य आले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
राष्ट्रीय पातळीवर चंद्रशेखर, गुजराल, देवेगौडा अशी राजकीय अस्थिरता वाढत गेली. दरम्यान, १९७७ ते १९९८ या राजकीय, सामाजिक अस्थिरतेच्या काळात संविधानावर मात करत ‘राम के नाम’ धार्मिकतेचे गारुड सामान्य माणसाच्या भावनेवर स्वार झाले. डाव्यांच्या काँग्रेस विरोधाचा फायदा उजव्यांनी घेतला. मंडल आणि मंदिर वादाने राजकारणच नव्हे, तर समाजमनही बदलून गेले. समाज दुभंगायला सुरुवात झाली. डाव्या समाजवादी चळवळीच्या हे लक्षात आले नाही. या पडझडीत आता सक्षम नेतृत्वाची वानवा आहेच, पण कार्यकर्ते ही विखुरलेले आहेत. अशा परिस्थितीत लढायला मैदान आहेच कुठे अशी परिस्थिती. डावी चळवळ म्हणून काही टिकून आहे का, असा प्रश्न पडतो.
मोहन सकपाळ या सर्व कालखंडातला महत्त्वाचा सक्रिय कार्यकर्ता होता. सामाजिक आणि राजकीय परिवारात वावरताना समता आंदोलन, सोशालिस्ट फ्रंट, समाजवादी जनपरिषद, आम आदमी पक्ष, स्वराज्य अभियान या समाजवादी परिवाराच्या सरळ रेषेत बदलता झेंडा खांद्यावर घेऊन वावरणारा राजकीय कार्यकर्ता म्हणून त्याची बांधीलकी होती. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत होता.
सामाजिक कामात राजकारण असते आणि सामाजिक कार्यकर्त्याने राजकारणातही सक्रिय असायला हवे, अशी त्याची भूमिका होती. म्हणून त्याच्या अखेरच्या काळातही आजारपणाशी लढताना भांडुपमध्ये जनता दलाच्या कामात शक्य तितका सक्रिय असायचा. शिवराम सुखीबरोबर भांडुपमध्ये संविधान आणि आरोग्याच्या प्रश्नावर, स्थानिक प्रश्नावर लढताना दिसायचा. मुंबई-ठाण्याला जिथे कुठे आंदोलन, सभा, मोर्चा असतील तिथे हजेरी लावायचा.
मोहन कोकणातला असल्याने कोकणवर त्याचे भारी प्रेम. कोकणात घडणाऱ्या घडामोडींवर त्याचे लक्ष असायचे. कोकणातील गावांचा स्थानिक रोजगार आणि कोकणात येणारे प्रकल्प हे त्यांचे आस्थेचे विषय. सुरेश सावंत त्यांच्याच गावचा, गावातील स्थानिक तरुणांनी गावातच उदरनिर्वाहाची सोय करायला पाहिजे, अशा उद्देशाने त्या दोघांनी प्रयत्नही केले, पण काही जमले नाही. कोकणाचे कोकणपण हिरावून घेणाऱ्या प्रकल्पाला त्याचा कायम विरोध असायचा.
मोहन चांगला कलाकार होता, पण त्याने कधी नोकरी केली नाही. मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. तसा त्याने प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. तरीही त्याने गिरगावात स्वतंत्रपणे काम सुरू केले. लग्नपत्रिकांचे स्वतंत्र डिझाईन करणे, कंपनीच्या बॅगवर निरनिराळे लोगो करणे, डी. एम. पाकीटवालाच्या बॅगवर अनेक निरनिराळी चित्रे त्याने काढली आहेत. अनेक स्थानिक संघटनांच्या सन्मानचिन्हांचे, सन्मानपत्रांचे डिझाईन केले आहे. चळवळीच्या बॅनरचे व पॅम्पलेटचे डिझाईन तो करत असे.
चळवळीची कामे मात्र तो विनामोबदला करायचा. गिरगावात त्याने काही तरुणांना व्यवसायात स्थिरावण्यासाठी मदत केली. गिरगावात प्रिंटिंगची बऱ्याच प्रकारची कामे करत असताना तिथे काम करणारे कारागीर हे संघटित नाहीत. त्यामुळे त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. यासाठी त्यांची संघटना करण्याचा त्याने प्रयत्न केला, पण नेतेगिरी त्याला जमली नाही. कार्यकर्त्यांच्या मानसिकतेतून कामगारांची संघटना करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. असंघटित कामगारांसाठी काही तरी ठोस करायला हवे, अशी त्याला तळमळ होती. अनेकांशी तो या विषयावर चर्चा करायचा, पण आपण काही करू शकत नाही, हे शल्यही त्याला होते. ही खंत त्याला अखेरपर्यंत होती.
मोहनच्या आजारपणाने आम्ही सारे मित्र हबकलो होतो. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो. सामान्य कार्यकर्त्यांच्या आजारपणात आपण आर्थिक मदत उभी करण्यासाठी काही तरी व्यवस्था हवी, असे तो नेहमी बोलायचा. त्यासाठी त्याने मित्रांशी चर्चा करून आराखडाही तयार केला होता. त्याची योजना पूर्णत्वास जाण्याआधीच त्याने एक्झिट घेतली.
त्या वेळी मोहनच्या आजारपणात आर्थिक मदतीसाठी आम्ही मित्रांनी आवाहन केले. होते. निधीही जमवला होता. मोहनच्या अभिवादन सभेस अनेकांनी बरेचसे कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात, अशा कार्यकर्त्यांच्या गंभीर व खर्चिक आजारपणाला आर्थिक मदत करण्यासाठी निधी जमवून एक स्थायी योजना करण्याबाबत सुचवले होते. अशी कोणतीही व्यवस्था सध्या महाराष्ट्रात नाही. अल्प उत्पन्न असणारे कार्यकर्ते आजारपणात कोलमडून पडतात. त्यासाठी स्थायी निधी उभारण्याबाबत चर्चा झाली. संजीव साने, जवाहर नागोरी, सुहास कोते, प्रकाश सरस्वती गणपत, जीवराज सावंत यांच्यासोबतीने एक समिती बनवली गेली. जमलेल्या निधीपैकी काही निधी तेव्हा काही कार्यकर्त्यांच्या आजारपणात खर्च केला. या स्मृतिग्रंथाच्या निमित्ताने ‘कार्यकर्ता आरोग्य सहाय्य निधी’ जमा करून त्याचा विनियोग कार्यकर्त्याच्या गंभीर आजारपणात करावा, असा आमचा मानस आहे.
मोहन सामाजिक आणि राजकीय परिघात वावरणारा कार्यकर्ता होता. सामाजिक आणि राजकीय बदलाचे परिणाम प्रत्येक कार्यकर्त्यावर होत असतात. मोहन त्याला अपवाद नव्हता. सामाजिक कामात त्याचे काही आयडॉलही होते. मोहनचा आणि त्याच्या कामाचा, एकूणच आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा विचार करताना जाणवले, आपल्या सभोवताली असलेली तत्कालीन परिस्थिती आपल्यातला कार्यकर्ता घडवत असते. अनुभव क्षमतेनुसार स्थलकाल सापेक्ष काम करण्याची तयारी असते. सहयोगी कार्यकर्ते, त्यांचे परस्पर संबंध, विविध संस्था/संघटनांमधील संतुलन याचा परिणाम कार्यकर्त्यावर होत असतो. आपल्या परिवेशात घडणारे बदल, क्रिया-प्रतिक्रिया या सगळ्याचा संबंध कार्यकर्ता म्हणून येत असतो.
मोहन या प्रक्रियेचा भाग होता. विचार, भावना, आवेश याचे मिश्रण असलेला कार्यकर्ता मोहन होता. समतोलपणा, संयम, चिंतनशिलता, विचारसरणीचे निश्चित स्वरूप, उद्देश हे सर्व समजदार कार्यकर्त्यांचे गुण मोहनमध्ये निश्चितच होते.
मोहन चळवळीतील लढवय्या होता. मोहनच्या जीवनविषयक धारणा या सामाजिक चळवळीने घडवलेल्या होत्या. मोहनचे कार्यकर्ता म्हणून असलेले योगदान निर्विवादपणे मान्य करायला हवे. मोहन फार मोठा कार्यकर्ता नव्हता, तरीही मोठ्यांच्यात जबाबदारी घेऊन वावरणारा होता. राष्ट्र सेवा दल, समता युवा संघटन, समता आंदोलन, समता विचार प्रसारक संस्था, सोशालिस्ट फ्रंट, समाजवादी जनपरिषद, आम आदमी, एन्रॉन, नर्मदा बचाव समिती, सेझ, संविधान बचाव समिती अशा अनेक राजकीय सामाजिक संस्था, संघटना, आंदोलनाशी सक्रिय संबंधित होता. त्याच्या विचारांची पोहोच खोलवर होती. सर्वांशी आपलेपणाने वागणारा कार्यकर्ता होता.
मोहनच्या आजारपणाने आम्ही सारे मित्र हबकलो होतो. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो. सामान्य कार्यकर्त्यांच्या आजारपणात आपण आर्थिक मदत उभी करण्यासाठी काही तरी व्यवस्था हवी, असे तो नेहमी बोलायचा. त्यासाठी त्याने मित्रांशी चर्चा करून आराखडाही तयार केला होता. त्याची योजना पूर्णत्वास जाण्याआधीच त्याने एक्झिट घेतली.
२.
मोहनच्या प्रथम स्मृतिदिनी त्याच्या आठवणी संकलित करून एखादे पुस्तक करावे, असा प्रयत्न होता, पण काही जमले नाही. मोहनला राजकीय, सामाजिक प्रश्नांची चिंता असायची म्हणून त्याची स्मृती जागवताना सध्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणारे लेख जमवून या अवलियाचा स्मृतिग्रंथ करावा, असा विचार करून कामाला सुरुवात केली.
जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असल्या, तरीही त्या पलीकडे जाऊन आपल्या आसपासची सामाजिक/ राजकीय परिस्थिती नक्कीच महत्त्वाची असते. त्याचे आपल्या आसपास घडणाऱ्या बदलाशी आपले नाते असते. याला मोहन अपवाद नव्हता. म्हणूनच तो आसपासच्या उलथापालथीने अस्वस्थ व्हायचा. या उलथापालथीचा वेध घेणारे लेखन या स्मृतिग्रंथात आहे.
समता आंदोलन आणि त्यातला मोहनचा सहभाग याबद्दल उन्मेश बागवे, अॅड. विष्णू ढोबळे, शिवाजी गायकवाड यांनी लिहिले आहे. तात्कालिक सांस्कृतिक गिरणगावासंदर्भात प्रवीण घाग यांनी लिहिले आहे. तरुणाई आणि मोहन याबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांनी मांडणी केली आहे. कोकण विकास यांवर अनुक्रमे सुरेश सावंत, उल्का महाजन यांनी लिहिले आहे.
असंघटित कामगारांच्या प्रश्नावर सविस्तर मांडणी मोहनचे आणि आमचे चळवळीतले अभ्यासक मित्र सुभाष लोमटे यांनी केली आहे. आम्ही कार्यकर्ते मित्र मोर्चा, आंदोलन, सभा यानिमित्ताने जमायचो, तेव्हा किंवा हे संपल्यावर संजीव साने, जवाहर नागोरी यांच्या घरी किंवा इतर कुठे एकत्र भेटलो की, त्यानिमित्ताने आमच्या अनेक विषयांवर होणाऱ्या चर्चेत मध्यमवर्गाचा सहभाग, दलित चळवळ, अंधश्रद्धा, परित्यक्त्या स्त्रीचे आईपणाचे प्रश्न, अशा विविध विषयांवर चर्चा होत असत. अनेक कार्यकर्ते अशा प्रश्नांची चर्चा करतातच, हे लक्षात घेऊन या प्रश्नांना स्पर्श करणारे लेखन राम जगताप, सुरेश सावंत, अविनाश पाटील, निशा शिवूरकर या आमच्या मित्रांनी केले आहे. मणिपूरच्या घटनेने तर सारा देशच हादरून गेला. आपण अजूनही अस्वस्थ आहोत. मणिपूरला जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेल्या नीता साने यांनी दुभंगलेले मणिपूरवर लिहिले आहे.
कार्यकर्त्यांच्या असण्याची म्हणजे कार्यकर्त्यांचे पर्यावरण यावर सविस्तर चर्चा ज्येष्ठ कार्यकर्ते संजय मं. गो. यांनी केली आहे. कार्यकर्ता परिपक्व होत जातो, तसा तो अस्वस्थ होत जातो. अशा अस्वस्थ होणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोगत ज्येष्ठ विचारवंत विजय तांबे यांनी व्यक्त केले आहे.
संविधान सर्व धर्मीयांसाठी आहे, यावर ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर, नुरखॉ पठाण, अतुल अल्मेडा यांनी लिहिले आहे. मुस्लिमांमध्ये चळवळीची आवश्यकता आहे, यावर पैगंबर शेख यांनी सविस्तर चर्चा केली आहे.
करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कॉर्पोरेट जगात कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो किंवा टीम हवी असते अशा वेळी तज्ज्ञ माणसे शोधण्यासाठी किंवा योग्य कंपनी मिळवण्यासाठी ते शोधण्याचे काम हेड हंटर नामक नवी सोय निर्माण होतेय. यावर गिरीश टिळक यांनी लिहिले आहे.
वास्तविक वैज्ञानिक दृष्टिकोन हे आपले संविधानिक कर्तव्य आहे, याचा विसर पडला आहे. याचा वेध प्रा. श्याम पाखरे यांनी घेतला आहे. संसद ते न्यायव्यवस्था सगळीकडेच चिंतेचे वातावरण आहे. यावर अॅड. नीता कर्णिक आणि पत्रकार अमेय तिरोडकर यांनी लिहिले आहे.
भारतातील धर्म स्वातंत्र्य, धार्मिक ध्रुवीकरण यावर सुभाष वारे, प्रमोद मुजुमदार यांनी लिहिलेय.
आणीबाणीनंतर भारतीय राजकारणात एकपक्षीय सत्ता संपुष्टात आली आणि आघाड्यांचे प्रयोग झाले. बहुपक्षीय आघाडी सरकार सत्तेत आले. सत्तासमीकरणाच्या राजकारणात राजकीय पक्षांच्या आघाड्यांना महत्त्व आले. यावर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी सविस्तर चर्चा केली आहे. भारताला अनेक प्रकारच्या पदयात्रांचा परिचय आहे. पदयात्रांचा परिणाम जनमानसावर होत असतो. अलीकडच्या राहुल गांधींच्या पदयात्रेचे विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार आणि चळवळीतले कार्यकर्ते संजीव साबडे यांनी केले आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
३.
अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडींनी अस्वस्थ व्हायला होतं. ही अस्वस्थता आजच्या तरुणांमध्ये आहे. तरीही आपली परिवर्तनाची चळवळ त्यांना आकर्षित करू शकत नाही. हे वास्तव असले तरीही तरुणांच्या घोळक्यात यावर चर्चा होत असते. त्यांना ते पटत असते, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्यानिमित्त पहिल्या भाषणात म्हणाले होते, “आपल्या काळात झालेल्या जगातल्या सर्व थोर पुरुषांची विशेषतः महात्मा गांधींची आकांक्षा प्रत्येक डोळ्यातील अश्रू पुसण्याची होती. ते आपण करू शकलो नाही, तरी जोवर हे अश्रू आहेत आणि त्यासोबतच व्यथा आहेत, तोवर आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही, हा काळ मतभेदांचा नाही. कुरापतींचा नाही. एकोप्याचा व एकात्मतेचा आहे.”
नेहरूंच्या मनातला भारत आज कुठे आहे?
भारताच्या संविधान सरनाम्यात “भारताची एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक स्वातंत्र्य, वर्णाची, संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिभा व राष्ट्राची एकता आणि एकात्मिकता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रर्वतीत करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत. आपण संविधान स्वतःप्रत अर्पण करीत आहोत”, असे म्हटले आहे.
वास्तविक गेल्या दहा वर्षांत याबाबत विरोधाभासाचे राजकारण होतेय, ते प्रतिमांच्या व्यक्तिकेंद्रित आभासात जनमानसाच्या लक्षातच येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पोकळ घोषणांच्या झुल्यावर झळकणारे समाजमन भव्य दिव्य सूचित करण्याचा आभासीकेत अडकले आहे. बधीर झाले आहे. अंध धार्मिक रूढी-परंपरांचा पगडा अजूनही जनमानसावर आहे. धार्मिक उन्मादात सामाजिक ताणतणाव वाढत आहेत. धार्मिक प्रदूषणाला नैतिकतेच्या आवरणाखाली धर्मभोळेपणाचा राजकीय मुलामा देऊन वाटचाल सुरू आहे.
विविध विषयांवर लेखन जमवताना ते वाचताना पंडित नेहरूंनी पहिल्या स्वातंत्रदिनी केलेल्या भाषणाची आणि डॉ. आंबेडकर यांच्या संविधान सभेतील समारोपाच्या भाषणाची आठवण होत होती. ती दोनही भाषणे या स्मृतिग्रंथात असावीत, असे प्रकर्षाने जाणवले आणि त्यांच्या संक्षिप्त संपादित भावानुवादाचा समावेश या ग्रंथात केला आहे.
चळवळीतले तत्कालीन संदर्भ पुढच्या पिढीसाठी आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाचे असतात. प्रत्येक समंजस कार्यकर्ता हा त्याच्या भावनिक परिवेशात स्वतःची संकल्पना घडवत असतो. हा स्मृतिग्रंथ कार्यकर्त्यांना आणि वाचकांना उपयुक्त ठरावा, अशी अपेक्षा.
‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ - संपादक जीवराज सांवत
प्रकाशक - मोहन सकपाळ मित्र परिवार, मुंबई | मूल्य - ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment