अजूनकाही
नुकतंच ‘इप्टा’, नाशिक निर्मित आणि ‘कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय’ यांच्या विशेष सहकार्यानं साकारलेलं ‘प्रथम पुरुष’ हे दोन अंकी नाटक पाहिलं. हे नाटक एका संवेदनशील विषयावर महत्त्वाचं भाष्य तर करतंच, शिवाय त्याअनुषंगाने समाज म्हणून आपण किती निरोगी आहोत, हे तपासून पाहायला भाग पाडतं.
पडदा उघडताच आपल्याला एक चौकोनी कुटुंब दिसतं. त्यातला नवरा बायकोसोबत वाद घालत असतो. बायको निमूटपणे सगळं ऐकून घेते. बहीण वाद थांबवण्याचा प्रयत्न करते, भाऊ मात्र नामानिराळा राहतो. यातली बहीण म्हणजे सुमी. भाऊ म्हणजे प्रतीक. सुमीला अशोक आवडतो, प्रतीकला शिल्पा. आपले वडील आपल्याला अशोकसोबत लग्न करू देणार नाहीत, याची कल्पना असलेली सुमी अशोकला आपण पळून जाऊ, असं सुचवते.
दरम्यान, प्रतीक वडिलांना सुमीच्या अफेअरबद्दल सांगतो आणि हे ऐकून चिडलेले वडील सुमीची जबरदस्तीने दुसरीकडेच लग्न जुळवतात. त्यापूर्वीही सुमी अशोकला समजावते, पण अशोक पळून जायला नकार देतो.
प्रतीक शिल्पासोबत प्रणयक्रीडा करू पाहत आहे, मात्र शिल्पा त्यासाठी तयार नाही. दिप्या, मन्या आणि किरण्या हे त्याचे तीन मित्र रस्त्यावरून येणार्या-जाणार्या मुलींची छेड काढणे, त्यांच्यासोबत मजा करणे यात गुंग आहेत. त्यांना प्रतीकच्या शिल्पासोबतच्या अफेअरबद्दल कळतं आणि तिच्याशी आणखी जवळीक साधायला प्रतीकला भाग पाडण्यावरून या मित्रांमध्ये पैज लागते. वेश्येकडे जाऊनही गोंधळलेला प्रतीक इरेला पेटतो आणि शिल्पाला एका निर्जन बांधकामाच्या ठिकाणी घेऊन जातो. तिथे तो शिल्पाच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करतो, पण ती नकार देते. मग तो चिडून तिच्यावर बलात्कार करतो. इथे पहिला अंक संपतो.
दुसरा अंक म्हणजे कोर्टरूम ड्रामा आहे. एका बाजूला प्रतीक आणि त्याचं कुटुंब, दुसरीकडे शिल्पा आणि तिचं कुटुंब. दुसाने शिल्पाच्या बाजूने केस लढताहेत, तर रिकामे प्रतीकच्या बाजूने. या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादातून काय निष्पन्न होतं, प्रतीक खरंच गुन्हेगार आहे का, शिल्पाच्या पूर्वायुष्याचा या सगळ्याशी काय संबंध, प्रतीकला शिक्षा होते की, तो निर्दोष सुटतो, या प्रकरणाचा निकाल काय लागतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या अंकात मिळतात.
हे नाटक ‘इंटेन्स’, अंगावर येणारं आहे. बलात्काराचा प्रसंग ज्या पद्धतीने रंगमंचावर साकारतो, ते पाहून भीती वाटते. पूर्वार्धातली शिल्पा आणि या प्रसंगानंतरची शिल्पा यांतला फरक ठळक जाणवतो. नाटकात फार लहानसहान गोष्टी अतिशय नेटक्या प्रसंगांतून विचारपूर्वक मांडलेल्या आहेत.
प्रतीक आणि सुमीचा बाप, जो आईला मारहाण करतो, तो दुसरीकडे अगतिकही वाटतो. सुमीचं लग्न जुळवतानाच्या प्रसंगातली तिच्या डोक्यावरची शिंगं बरंच काही रूपकात्मक पद्धतीने सांगून जातात. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना काय काय भोगावं लागतं, हे दाखवतानाच पुरुषांना खलनायक म्हणून पेश केलेलं नाही, हे विशेष. एका प्रसंगात रंगमंचावर सगळ्या बायका दिसतात, तेव्हा ‘चारचौघी’ या नाटकाची हटकून आठवण होते.
लेखक आणि दिग्दर्शक संकेत सीमा विश्वास यांनी नाटक फार सुंदर लिहिलं आहे आणि तितकंच उत्तम बांधलं आहे. मुक्ता यांचं मोजकंच नेपथ्य वाखाणण्याजोगं. गरज नसलेलं काहीही रंगमंचावर दिसत नाही, त्यामुळे पात्रांशी समरस व्हायला मदत होते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
पंकज देशमुख यांनी साकारलेला प्रतीक, मानसी कावळे यांची सुमी, गायत्री नेरपगारे यांची शिल्पा, अर्चना नाटकर यांची आई, अझर सैय्यद यांनी साकारलेला अशोक आणि पोलीस या सर्वच भूमिका उत्तम जमल्या आहेत. मात्र, प्रसाद कुलकर्णी यांनी साकारलेला बाप, डॉ. सोनाली ठवकर यांनी साकारलेली दुसाने वकिलांची भूमिका आणि चेतन सुशिर यांनी साकारलेले रिकामे, या तीन भूमिका विशेष लक्षात राहतात.
प्रणव काथवटे, कैवल्य चंद्रात्रे, ओम हिरे, मनोहर पगारे, अनैषा, समर, चैतन्य कुलकर्णी या सर्व कलाकारांनी केलेल्या इतर भूमिकाही दाद देण्यासारख्या आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यातील बरेचसे जण हे इतर व्यवसायांत आहेत. नोकरी सांभाळून ते हा महत्त्वाचा विषय लोकांपर्यंत पोहोचावा, या तळमळीने प्रस्तुत नाटकात काम करत आहेत.
‘प्रथम पुरुष’च्या निमित्ताने पुन्हा एकदा आजची तरुणाई, कौटुंबिक हिंसा, किळसवाणे स्पर्श, स्त्री-पुरुष नातेसंबंध, बलात्कार, स्पर्श, पौरुषाच्या खोट्या कल्पना, अशा अनेक विषयांवर डोक्यात मोहोळ उठलं. विचार करायला लावणारं हे नाटक आजवर ‘लोकाश्रया’वर तरलं आहे. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवं.
तेजस बिल्दीकर यांनी नाटकाचं संगीत संयोजन केलं आहे. निर्मिती व्यवस्थापन तल्हा यांचं आहे. समीर तभाने यांची प्रकाशयोजना नाटकाच्या ‘इंटेन्स’ विषयाला आणखी उठावदार बनवते. वैभवी चव्हाण यांनी सर्व पात्रांची केलेली वेशभूषा साधेपणातही नेमकी वाटते.
..................................................................................................................................................................
लेखक संदेश कुडतरकर मुंबईस्थित कलासमीक्षक आहेत.
msgsandesa@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment