काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या ‘भारत जोडो यात्रे’चं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न पुष्पराज देशपांडे आणि रुचिरा चतुर्वेदी संपादित ‘Bharat Jodo Yatra : Reclaiming India's Soul’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
‘भारत जोडो यात्रे’मुळे सामान्य लोकांत जो उत्साह, जे चैतन्य निर्माण झालं, ते अतुलनीय होतं. सरकार पोसत असलेल्या मुख्य धारेतील माध्यमांनी जनतेचे प्रश्न मांडण्याचं प्राथमिक कर्तव्य पार पाडणं कधीच सोडून दिलं आहे. त्यामुळे सरकारविरोधातील लोकांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी एका सशक्त माध्यमाची आवश्यकता होती. ‘भारत जोडो यात्रे’ने ही पोकळी भरून काढण्याचं महत्त्वाचं ऐतिहासिक कार्य तडीस नेलं.
या पुस्तकात राहुल गांधी यांनी छोटेखानी टिपण लिहिलं आहे. त्यात त्यांनी पदयात्रा करण्यामागची भूमिका थोडक्यात विशद केली आहे. या यात्रेत चालत राहण्याचं बळ कुठून निर्माण झालं, त्यामागची प्रेरणा कोणती होती, हे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या यात्रेतून आपल्याला भारतीयत्व गवसलं, असं विधान त्यांनी केलं आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रस्तावनेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पदयात्रांचा माग काढत ‘भारत जोडो यात्रे’चा आढावा घेतला आहे. ही यात्रा कोणत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली होती, त्याचं विवेचन खरगे यांनी केलं आहे. या यात्रेमुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत, नेत्यांत, देशभरातील सामान्य जनतेत कसा उत्साह निर्माण झाला, हे सांगताना ते लिहितात की, राहुल गांधी हे केवळ १२ राज्यांत ४०००पेक्षा अधिक किलोमीटर चालले नाहीत, तर ते थेट देशातील जनतेच्या हृदयात प्रवेश करते झाले.
पुष्पराज देशपांडे यांनी त्यांच्या मनोगतात पुस्तकाच्या रचनेमागील भूमिका विस्ताराने विशद केली आहे.
हे पुस्तक तीन भागांत विभागलेलं आहे. पहिल्या भागातील लेखांतून ही यात्रा कशा पद्धतीने आयोजित केली गेली आणि तिचं काँग्रेस पक्षासाठी असलेलं महत्त्व उजागर करण्यात आलं आहे. दुसऱ्या भागात भारत जोडो यात्रेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी असलेल्या आणि काही ठरावीक भागांपुरतं सहभागी असलेल्या मंडळींचे अनुभव वाचायला मिळतात. तिसऱ्या भागात लेखांतून या यात्रेचं देशातील सर्वसामान्य जनतेसाठी असलेलं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे.
देशपांडे यांनी या पुस्तकातील लेखांतून कोणत्या गोष्टींवर प्रकाश पडू शकलेला नाही, हेही प्रांजळपणे कबूल केलं आहे. त्यांनी यात्रेत चालण्याचा अनुभव घेतलेला होता. यात्रा ज्या मार्गावरून जात असे, त्या मार्गावरील हॉटेल मालक, छोटेमोठे व्यवसाय करणारे लोक यांच्याशी या यात्रेच्या विषयावर संवाद साधला असता लोकांमध्ये या यात्रेविषयी खूप सकारात्मकता आहे, हे त्यांना आढळून आलं. या यात्रेत चालत असताना अनेकांचा आत्मविश्वास वाढत असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला आहे. ही यात्रा म्हणजे देशातील सामान्य जनता आणि राजकीय समूह यांच्यातील प्रामाणिक संवादाची सुरुवात आहे, या विधानातून त्यांनी या यात्रेचं सारच सांगितलं आहे.
यात्रेचं व्यवस्थापन आणि समकालीन राजकारणातील महत्त्व
काँग्रेस पक्षातर्फे ‘भारत जोडो यात्रे’ची रोजनिशी लिहिण्याचं काम करणाऱ्या मनीष खंडुरी यांनी पदयात्रेचा दिवस कसा सुरू व्हायचा, सकाळी कोणते कार्यक्रम आखलेले असायचे, यात्रा कशा पद्धतीने पुढे सरकत जायची, या यात्रेत दिग्विजय सिंह, जयराम रमेश या मोठ्या नेत्यांच्या कोणत्या भूमिका असायच्या, कोणत्या मुक्कामावर पत्रकार परिषदा घेतल्या जायच्या याची रूपरेषा त्यांच्या लेखात मांडली आहे.
ही यात्रा म्हणजे यात्रेकरू किती मानसिक-शारीरिक आव्हानं स्वीकारू शकतात याची परीक्षा होती, असं त्यांनी लिहिलं आहे. यात्रेचं नियोजन हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय आहे. त्याबाबत ते लिहितात की, वीज, पाणी, जेवण, गाड्यांची व्यवस्था, रात्रीची राहण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे गट स्थापन केले गेले होते. प्रत्येक गटासाठी अँब्युलन्स, डॉक्टर्स यांची व्यवस्था केलेली असायची. या संपूर्ण यात्रेचं नियोजन हे ‘हार्वर्ड बिजनेस स्कूल’साठी ‘केस स्टडी’ म्हणून अभ्यासण्यासारखं आहे, असं खंडुरी यांनी लिहिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या महिमा सिंह यांनी केरळमधील कोची येथे राहुल गांधी यांचं भाषण एकदा ऐकलं आणि त्यातील साधी, सरळ, सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातील उदाहरणं देत योजलेली थेट काळजाला भिडणारी भाषा यांमुळे त्यांचं हृदयपरिवर्तन झालं. त्यांनी तत्काळ यात्रेत सामील व्हायचा निर्णय घेतला.
महिमा सिंह यांचे आजोबा काँग्रेस पक्षात होते आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते काँग्रेस पक्षातच राहिले. ते ममता यांना स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील प्रभात फेऱ्या, पदयात्रा यांच्या असंख्य गोष्टी सांगत असत. त्यामुळे त्यांनाही या यात्रेच्या निमित्ताने ते अनुभवसंचित साठवता येणार होतं. त्यांना या यात्रेत माध्यम समन्वयक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी त्यांच्या लेखात मुख्य धारेतील माध्यमांचा यात्रेकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती पूर्वग्रहांनी भरलेला आणि काही वेळा द्वेषपूर्ण होता ते अधोरेखित केलं आहे. त्यांना राष्ट्रीय माध्यमांपेक्षा स्थानिक माध्यमांचा दृष्टिकोन अधिक संतुलित वाटला असं त्यांनी नमूद केलं आहे.
महिमा यांना सातत्याने माध्यमांतील प्रतिनिधींशी संवाद राखणं, यात्रेबाबतची इंग्रजीतील माहिती त्या त्या राज्यांतील भाषांत अनुवादित करून घेणं, ही कामं करावी लागत असत. त्यांनी या कामात आलेले विविधांगी अनुभव कथन केले आहेत. त्यांतून पुरोगामी वर्तुळातील, काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्या, काही नेत्यांच्या वागणुकीचे वेगळे पैलू उलगडत जातात.
सुप्रिया श्रीनेत यांनी काँग्रेस पक्षाच्या ‘समाजमाध्यम प्रमुख’ म्हणून काम करताना यात्रेसंबंधी सरकारने पोसलेली मुख्य धारेतील माध्यमं आणि खोटी माहिती प्रचारित करण्यात हातखंडा असलेला भाजपचा आयटी सेल यांच्याकडून केला जाणारा अपप्रचार, खोटी माहिती यांचा प्रतिकार कशा तऱ्हेने केला गेला, यासंबंधी लिहिलं आहे.
अंशुल त्रिवेदी यांनी त्यांच्या लेखात प्रत्येक राज्यातील खाण्यापिण्याच्या सवयींकडे जरी सकारात्मक पद्धतीने पाहिलं, तरी बहुविध परंपरांनी नटलेल्या भारतीयत्वाची समज निर्माण व्हायला मदत होईल, हा मुद्दा जोरकसपणे मांडला आहे. यात्रेत सर्वजण गंभीरपणे सामाजिक-राजकीय विषयांवर चर्चा करत होते, असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे, हे त्रिवेदी यांचा लेख वाचल्यानंतर लक्षात येतं. काही यात्रेकरू, कार्यकर्ते अतिशय क्षुल्लक गोष्टींवर अतिशय खालच्या पातळीवर उतरत गप्पाटप्पा करत असत, पण यांची संख्या कमी असायची आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते यात्रेकरूंशी मोकळेपणाने संवाद साधून यात्रेतील चर्चांचा दर्जा राखला जाईल, असं पाहायचे.
चंडी ओमेन यांनी यात्रेत चालून त्यांना जो देश अनुभवास आला, त्याला जेवताना जी थाळी दिली जाते, तिची उपमा दिली आहे. थाळीत जसे विविध पदार्थ एकत्रितपणे दिले जातात आणि त्यामुळे जेवणाची लज्जत वाढते, तशीच विविध जात, धर्म, भाषा, परंपरा यांमुळे एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढते किंवा वाढायला हवी, असं चंडी यांना वाटतं.
कन्हैया कुमार यांनी त्यांच्या लेखात कोणत्या परिस्थितीत यात्रा सुरू झाली, याचं थोडक्यात विवेचन करून यात्रेला सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद कसा होता, यात्रेत सामील झालेल्या लोकांत कसं परिवर्तन होत होतं, हे सांगण्यावर भर दिला आहे.
जोतिमनी सेन्नीमलाई यांनी त्यांच्या लेखात यात्रेच्या काळात लोकांचा प्रचंड प्रवाह यात्रेत सातत्याने सामील होत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न कशा पद्धतीने हाताळला जात होता आणि राहुल गांधी गर्दीची, चेंगराचेंगरी होण्याची अजिबात पर्वा न करता जितकं शक्य होईल, तितकं लोकांसोबत स्वतःला कशा तऱ्हेने जोडून घेत होते, हे काही घटना कथन करून मांडलं आहे.
मुकुलिका बॅनर्जी यांनी त्यांच्या लेखात यात्रेत चालताना आलेले अनुभव सांगितले आहेत. यात्रेत उत्साही आणि सळसळत्या रक्ताच्या तरुणांकडून कशा पद्धतीने अभिनव, कल्पक घोषणा दिल्या जात होत्या, त्याचा उल्लेख त्या आवर्जून करतात. नव्वदीच्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली ‘रथयात्रा’ ही समाजात दुही निर्माण करणारी होती, तर ‘भारत जोडो यात्रा’ ही समाजात प्रेम आणि बंधुभाव निर्माण करणारी आहे, भारतीय जनतेने आता हे ठरवण्याची वेळ आली आहे की त्यांना कुठला मार्ग हवा आहे, त्यांना कोणता भारत हवा आहे, असा प्रश्न उपस्थित करत बॅनर्जी या यात्रेच्या योगदानाचा आढावा घेतला आहे.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या लेखात ही यात्रा कोणत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली, याचा थोडक्यात आढावा घेऊन भाजप हा पक्ष देशातील छोट्या पक्षांना संपवण्याचं आणि त्या माध्यमातून प्रादेशिक आवाज मारून टाकण्याचं ध्येय घेऊन काम करत आहे, याकडेही लक्ष वेधलं आहे. या यात्रेने जनतेत सामूहिक आशा निर्माण करण्याचं कार्य केलं, असं त्यांनी म्हटलं आहे.
प्रा. अजय गुदावर्ती यांनी काँग्रेस पक्ष ही एक विचारसरणी असेल, तर तिच्या प्रसारासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवा, असा मुद्दा त्यांच्या लेखात मांडलेला आहे. काँग्रेस पक्षाने गेली काही वर्षं केवळ निवडणुका जिंकण्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलं, ही त्या पक्षाची फार मोठी चूक होती, पक्षाने सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राचा जवळजवळ त्याग केला आणि ती जागा मग भाजप-रास्वसंघ यांनी बळकावली, असा त्यांच्या विवेचनाचा रोख आहे.
गुदावर्ती यांनी २०२४च्या निवडणुकांआधी संघाच्या एका प्रचारकाशी संवाद साधला होता, त्याचा संदर्भ ते देतात. त्यांनी त्या प्रचारकाला विचारलं की, भाजप २०२४च्या निवडणुकीत पराभूत झाला तर तुमची भूमिका कोणती असणार आहे? तर त्या प्रचारकाने म्हटलं की, त्याच्या कामात कोणताही बदल होणार नाही. त्याचं काम तो करत राहणार. गुदावर्ती म्हणतात की, भाजपसाठी राजकारण, निवडणूक या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काम करणारी शक्ती जशी संघाच्या रूपाने उपलब्ध असते, तशी ती काँग्रेसकडे नसल्यामुळे काँग्रेसला फार मोठी किंमत समाजकारण-राजकारण या दोन्ही पातळ्यांवर मोजावी लागते.
आपल्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ ते महात्मा गांधींच्या सामाजिक-राजकीय कार्यांच्या समांतर प्रवासाचं उदाहरण देतात. गांधींना जो समतोल साधता आला, तसा तोल आताच्या काँग्रेस नेतृत्वाला साधावा लागेल आणि भारत जोडो यात्रेच्या समयी दिसलेला निर्धार रोजच्या संघटनात्मक कामातही दिसायला हवा, अशी अपेक्षा गुदावर्ती व्यक्त करतात.
विविध राज्यांतील अनुभव
उत्कर्षा रुपवते यांनी त्यांच्या लेखात या यात्रेची महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाकडून कशी तयारी होत होती आणि यात्रेच्या नियोजनात त्यांची कोणती भूमिका होती, याचं विवेचन केलं आहे. काँग्रेसच्या बाहेर असलेल्या अनेक पुरोगामी संस्था, संघटना, गट यांना या यात्रेसोबत जोडून घेण्यासाठी काँग्रेसकडून कसे प्रयत्न केले गेले, याचं विस्तृत वर्णन केलं आहे. पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेतून अनेक जिल्ह्यांतील वेगवेगळे प्रश्न, त्यांना असणारे विविध कंगोरे काँग्रेस कार्यकर्त्यांना आकळले, असं त्यांनी लिहिलं आहे.
‘दक्षिणायन’ चळवळीशी संबंधित असलेल्या संदेश भंडारे यांनी या यात्रेच्या निमित्ताने त्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा जो काही अनुभव आला, त्याबाबत परखडपणे मांडणी केली आहे. त्यांची यात्रेसंबंधीची निरीक्षणं महाराष्ट्रापुरती मर्यादित आहेत, पण त्यातूनही या यात्रेचं भारतभरातील स्वरूप कसं असेल, याचा काहीएक अंदाज आपण करू शकतो.
या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणाऱ्या जवळजवळ २०० संघटना एकत्र आल्या. यांतल्या काहींच्या प्रतिनिधींशी राहुल गांधी यांनी बंद दाराआड, तसेच यात्रेत चालतानाही संवाद साधला. भंडारे यांना राहुल गांधी यांची प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेण्याची वृत्ती भावली. काही वेळा ते त्या प्रश्नावर अशी काही टिप्पणी करत की, ऐकणारा विचारात पडत असे, असं त्यांनी लिहिलं आहे.
राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालताना ते त्यांना तुकारामाचे अभंग इंग्रजी अनुवादातून सांगत होते, असा एक प्रसंग त्यांनी दिला आहे. हा प्रसंग फारच हृद्य आहे. राहुल गांधी यांनी सावरकर आणि बिरसा मुंडा यांची तुलना करत जे वक्तव्य केलं होतं, ते करण्यासाठी खूप मोठ्या धैर्याची आवश्यकता आहे, असं भंडारे यांनी लिहिलं आहे.
या यात्रेच्या निमित्ताने भंडारे यांना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांच्याविषयी जी काही भ्रामक कल्पना माध्यमांतून उभी केली गेली होती, तिला तडा गेला, याची जाणीव झाली. इतकी वर्षं माध्यमांनी राहुल गांधी यांना नाही, तर आपल्यालाच (जनतेला) ‘पप्पू’ बनवलं, हे त्यांचं विधान खूप काही सांगून जातं.
दर्शन मोंडकर यांनीदेखील त्यांच्या लेखात राहुल गांधी यांच्याशी यात्रेत चालता चालता त्यांनी जो काही संवाद साधला, त्यातला काही भाग जशाचा तसा दिला आहे. त्यातून गांधी यांचं अभ्यासू, देशापुढील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक असलेली प्रामाणिक आच, या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.
ससिकांत सेंथिल यांनी त्यांच्या लेखात राहुल गांधी हे या यात्रेच्या निमित्ताने कशा पद्धतीने सर्वसाधारण कामगारांशी जोडून घेत होते, याचं विवेचन केलं आहे. त्यासाठी त्यांनी काही प्रसंगांचा उल्लेख केला आहे. कर्नाटक राज्यात यात्रा पुढे सरकत असताना असंघटित क्षेत्रातील काही महिला राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आल्या, तेव्हा त्यांनी त्या महिलांना विचारलं की, तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे? यावर सावित्री या महिलेने उत्तर दिलं की, ‘दारू’.
राहुल गांधी यांनी कारण विचारलं असता, ती म्हणाली की, ‘आमचे नवरे दारू पिऊन आम्हाला मारहाण करतात. शिव्या घालतात.’ यावर राहुल गांधी त्या महिलेला म्हणाले की, ‘तुम्ही त्यांना मारायला का देता? तुम्ही त्यांचा प्रतिकार करण्याचा कधी प्रयत्न केला की नाही? तुम्ही त्यांना मारहाण करायला दिली, तर ते मारहाण करतच राहतील.’ यावर त्या संवादाच्या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये हशा पिकला. पण त्या महिलेला हे उत्तर फार भावलं.
अगदी छोट्याशा संवादातून अन्याय सहन करू नये, हा धडा राहुल गांधी यांनी त्या महिलांना दिला. याच पद्धतीने ते बेल्लारी येथील शिवणकाम करणाऱ्या कामगारांनादेखील भेटले. त्यांचे प्रश्न समजावून घेतले. ज्या कारखान्यांत ते काम करतात तिथे गेले. यामुळे राहुल यांच्यासोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तळागाळातील लोकांच्या जगण्याचं भान निर्माण झालं.
मीनाक्षी नटराजन यांनी त्यांच्या लेखात यात्रेच्या मध्य प्रदेशमधील प्रवासाचा आलेख सादर केला आहे. मध्य प्रदेशमधील कलावंत, लेखक, विचारवंत यांना या यात्रेत जोडून घेण्यासाठी कोणते प्रयत्न केले गेले, हे त्या नमूद करतात. या राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांशी, यंत्रमाग कामगारांशी राहुल गांधी यांनी चर्चा केली आणि सरकारच्या योजनांच्या चमकदार चित्राच्या पलीकडील वास्तव त्यांना कळून आलं. या राज्यातील आदिवासी, दलित समूहातील लोकांशी झालेल्या चर्चेतून या वर्गाची वास्तव परिस्थिती त्यांना लक्षात आली आणि जनगणना होण्याची आवश्यकता का आहे हेही पुन्हा एकदा प्रकर्षाने त्यांना जाणवलं.
श्रीधर राधाकृष्णन यांनी केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या यात्रेत सहभाग न घेऊन एक फार मोठी संधी गमावली, असं लिहिलं आहे. राहुल गांधी पदयात्रेत सगळ्यांची किती ममत्वाने काळजी घ्यायचे, याची आठवण त्यांनी नोंदवली आहे. ‘देशातील संवाद गेल्या काही वर्षांत संपवला गेला आहे. तो पुनर्स्थापित करण्यासाठी आपण ही पदयात्रा करत आहोत’, असं राहुल गांधी यात्रेत चालताना श्रीधर यांच्याशी झालेल्या संवादात म्हणाले होते.
कधी काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्य केलेल्या भंवर मेघवंशी यांनी त्यांच्या लेखात राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीचा अनुभव कथन केला आहे. मेघवंशी यांनी सुरुवातीला तब्येतीच्या कारणास्तव केवळ राजस्थानमध्ये ‘समन्वयक’ म्हणून काम केलं आणि तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर पदयात्रेत सहभागी झाले. त्यांनी राहुल गांधी यांना त्यांच्या संघाच्या जीवनातील सुरुवातीचे भारलेले दिवस आणि नंतर जातिभेदाच्या अनुभवानंतर झालेला भ्रमनिरास याबद्दल थोडक्यात चालता चालता सांगितलं. मेघवंशी यांना राहुल गांधी यांच्याशी झालेल्या संवादातून ते दलित, मागासलेले, उपेक्षित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील, प्रामाणिक भूमिका असलेले नेते वाटले.
ए. एस. दुलत यांनी काश्मीरमधील यात्रेच्या आठवणी जागवल्या आहेत आणि त्या प्रदेशात न्याय, शांतता आणि बंधुभाव यांचा संदेश समाविष्ट असणाऱ्या यात्रेची आवश्यकता का होती याचं विवेचन केलं आहे. त्या भागात यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा लोकांच्या मनात सरकारी धोरणाविरोधात किती तीव्र स्वरूपात असंतोष धगधगत होता याचा निदर्शक आहे, कोणीतरी त्या भागातील जनतेच्या भळभळत्या जखमांवर फुंकर घालण्याची गरज होती, हे त्यांनी नमूद केलं आहे.
मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या मुलीने मिळून लिहिलेला लेख हा काश्मीरमधील जनतेच्या मनात खदखदणाऱ्या वेदनेला मोकळी वाट करून देणारा आहे. भाजपने वारेमाप पैसा खर्च करून राहुल गांधी यांची जी प्रतिमा तयार केली होती, ती किती खोटी आणि दिशाभूल करणारी होती, असं त्यांना यात्रेत प्रत्यक्ष सहभाग घेतल्यानंतर गांधी यांचा जो सहवास लाभला त्यावरून वाटलं.
नागरी संघटनांचा प्रतिसाद
निखिल डे यांनी त्यांच्या लेखात यात्रेच्या ज्या आठवणी नमूद केल्या आहेत, त्या वाचल्यानंतर लक्षात येतं की, राहुल गांधी हे नागरी संघटनांनी सुचवलेल्या काही समस्यांवरील उपाययोजना, धोरणं केवळ ऐकूनच घेत होते असं नाही, तर जिथे काँग्रेसचं सरकार आहे, त्या राज्यांत त्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, या दृष्टीने संबंधित मंत्री, मुख्यमंत्री यांच्याशीदेखील संवाद साधत होते.
राजस्थानमधील दौसा आणि अलवार इथल्या काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी दर महिन्याला पदयात्रा काढण्याचा सल्ला दिला होता. पण कोणीही तो सल्ला मनापासून मानला नाही. त्यामुळे या राज्यात निवडणुकीच्या काळातही पक्षाला फटका बसला, अशी निखिल डे यांनी मांडणी केली आहे.
आज भारतात अघोषित आणीबाणी असल्यासारखी परिस्थिती आहे. माहितीचा अधिकार कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, रोजगार हक्क कायदा आदी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आजघडीला एका समर्थ नेतृत्वाची आवश्यकता असल्याचं त्या प्रतिपादन करतात. राहुल गांधी हे असे नेते आहेत, त्यांच्यात या तऱ्हेचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं मेधा पाटकर यांना वाटतं.
पाटकर यांनीदेखील राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठका, विविध प्रश्नांवरील चर्चा यांच्या आठवणी जागवल्या आहेत. जेव्हा काही प्रश्न चर्चेच्या दरम्यान अग्रभागी आणले जात होते, तेव्हा काही काँग्रेसचे नेते त्यांना अडवू पाहत होते. पण राहुल गांधी यांनी मात्र नागरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ते मुद्दे मांडू दिले. इतकंच नाही, तर त्यासंबंधीची निवेदनं स्वतःजवळ ठेवून घेतली आणि मेधा पाटकर यांच्याशी झालेल्या चर्चेत नागरी संघटना आणि काँग्रेस यांच्या दरम्यान कायमस्वरूपी संवादाचा पूल तयार करण्यासाठी काही तरी करायला हवं, अशी इच्छाही व्यक्त केली.
हृषीकेश सिंह यांनीदेखील यात्रेत सामील झालेल्या नागरी संघटनांच्या प्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा जो काही बरा-वाईट अनुभव आला, त्याविषयी सविस्तर लिहिलं आहे.
गणेश देवी हे त्यांच्या लेखात १९४२च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाच्या आंदोलनापासून सुरुवात करत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्श घेऊन ‘जोडो भारत’ यात्रेचा आढावा घेतात. या यात्रेत सामील होऊ पाहणाऱ्या नागरी संघटनांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या कठीण प्रश्नांना राहुल गांधी, दिग्विजय सिंह यांनी प्रामाणिक उत्तरं दिली आणि त्यामुळे समाधान झालेल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी या यात्रेत सहभाग घेतला, या घटनेचा उल्लेख ते आवर्जून करतात. त्यातून नागरी संघटना आणि काँग्रेस यांच्यात या यात्रेच्या निमित्ताने कशा पद्धतीने संवाद प्रस्थापित झाला हे लक्षात येतं.
या यात्रेचं भारतीय राजकीय अवकाशातील स्थान ऐतिहासिक स्वरूपाचं आहे, अशी देवी यांची धारणा आहे आणि ती तशी का आहे, याचं भारतीय इतिहासातील घटनांची उजळणी करून त्याला समांतर राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या निमित्ताने होणाऱ्या प्रयत्नांना उभं करून ते विशद करतात.
मृदुला आणि आदित्य मुखर्जी यांनीदेखील त्यांच्या लेखात या यात्रेची तुलना गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्यक्रमांशी केली आहे. त्यांच्या मते, गांधींनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, भारत छोडो चळवळी केल्या, पण त्यानंतर लगेच स्वातंत्र्य पदरात पडलं नाही, पण त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल गतिमान होत राहिली आणि अंतिमतः स्वातंत्र्य प्राप्त झालं. त्या काळात अजिंक्य समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश सत्तेला धक्का देता येऊ शकतो, हे गांधींनी दाखवून दिलं. गांधींनी भयमुक्त होण्याचा संदेश जनतेला दिला होता. या सगळ्या गोष्टी राहुल गांधी यांच्या या यात्रेच्या निमित्ताने बदलत्या संदर्भात समकक्ष ठरतात, हे मुखर्जी दाखवून देतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
समारोप
भारत जोडो यात्रेने काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना नवी उभारी दिली तशी ती थेट काँग्रेसशी संबंधित नसलेल्या, पण धर्मनिरपेक्षता, मानवता, समानता या मूल्यांप्रती आस्था असणाऱ्या नागरिकांनादेखील आत्मविश्वास प्रदान केला. संविधानाने दिलेले हक्क, अधिकार यांची राजरोस पायमल्ली होत असताना आणि केंद्रीय सत्ता कोणतीही धोरणं राबवताना बेमुर्वतखोरपणा दाखवत जनतेत भय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना गेल्या सात-आठ वर्षांत सर्वदूर निराशेचं वातावरण पसरलेलं होतं.
या यात्रेने जनतेच्या जगण्या-मरण्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ अशी घोषणा देऊन मुख्य धारेतील माध्यमांना हाताशी धरून मोदी सरकारने चालवलेल्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाला छेद देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. या पदयात्रेच्या काळात महिला, शेतकरी, लहान मुलं ज्या सहजतेने आणि विश्वासाने त्यांची भेट घेत होते, त्यांच्यासोबत छायाचित्र घेण्यासाठी धडपडत होते, त्यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येत होती.
भारत जोडो यात्रेमुळे मोदी पंतप्रधान झाल्यापासून जो काही विद्वेष, तिरस्कार समाजात फैलावला होता, त्याला थोड्याफार प्रमाणात का होईना अटकाव केल्यासारखी स्थिती निर्माण झाली. राहुल गांधी यांची संघ-भाजपने करोडो रुपये खर्च करून तयार केलेली प्रतिमा पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. त्यांचं लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा असलेलं, सर्वसामान्य लोकांत मिसळून त्यांची सुख-दुःखं जाणून घेणारं, विरोधी विचार बाळगणाऱ्यांशी वैरभाव न ठेवता संवादासाठी उत्सुक असलेलं वेगळं रूप, या यात्रेच्या निमित्ताने जनतेला पाहायला मिळालं.
जेव्हा केव्हा मोदीकालीन भारताचा राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ‘भारत जोडो यात्रे’चा सविस्तर आढावा घेणं अपरिहार्य ठरणार आहे. त्या दृष्टीने या पुस्तकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
‘Bharat Jodo Yatra : Reclaiming India's Soul’ – Edi. Pushparaj Deshpande, Ruchira Chaturvedi
Harper Collins India | Pages - 348 | MRP - ₹499
..................................................................................................................................................................
लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.
vikas_palve@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment