(गंभीरपणे काम करणार्याड पत्रकारांनो, माफ करा स्पष्ट लिहिल्याबद्दल, पण हे तुम्हाला उद्देशून नाहीये.)
थापा किंवा फोका मारण्याला किंवा पुड्या सोडण्याला वऱ्हाडी भाषेत ‘फोकनाड’ असा शब्द आहे. अशा फोका मारणाऱ्यांना ‘फोकनाड्या’ असं विदर्भात संबोधलं जातं. ‘शरद पवार यूपीएचे चेअरमन होणार’ आणि ‘राज्यातल्या काही मंत्र्यांकडे मुंबईच्या महापालिकेच्या पाण्याची मोठी थकबाकी’ या दोन पूर्णपणे फसलेल्या बातम्यांमुळे किमान महाराष्ट्रातली माध्यमे ‘फोकनाडी’ पत्रकारिता तर करत नाहीयेत ना, असा प्रश्न जर कुणाला पडला तर त्यात काही गैर नाही. विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्या आणि बऱ्याच प्रमाणात मुद्रित, या दोन्हींची विश्वासार्हता दिवसेंदिवस संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली असताना, त्यांच्या विश्वासार्हतेची लक्तरं वेशीवर टांगली जात असताना आणि अर्थकारण संकटात सापडून माध्यम जगतातील अनेकांचे अस्तित्वच धोक्यात आलेले असताना गेल्या आठवड्यातल्या पूर्णपणे फसलेल्या या दोन बातम्यांनी अशी ‘फोकनाड पत्रकारिता’ चौथा स्तंभ (?) भरभक्कम करणार की आणखी पोखरणार आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
दिल्लीमध्ये ठाण मांडून न बसता राजकीय किंवा सरकारचं नेतृत्व एखाद्या व्यक्तीकडे येणं पूर्णपणे अशक्य आहे. दिल्लीच्या दरबारी राजकारणात मांड ठोकायची तर ‘डोक्यावर बर्फ, जिभेवर खडीसाखर आणि चेहऱ्यावरची सुरकुती न हलू देता’ राजकारण करण्याची शैली असावी लागते. ती शरद पवार यांच्याकडे निश्चित आहे. तडजोडीचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव कोणत्याही क्षणी कोणत्याही पदासाठी पुढं येऊही शकतं किंवा अनेक प्रश्नांच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर त्यांचं मत आजमावलं जातं हेही खरं असलं तरी, त्यांची राजकीय ताकद मात्र पाहिजे, असायला हवी तेवढी नाही, हे प्रमाणिकपणे मान्य करायला महाराष्ट्रातील माध्यमं आणि माणसांनी आता ती शिकलं पाहिजे.
पवार हे नि:संशय मोठे नेते आहेत. त्यांनी देशाचं आणि युपीएचं नेतृत्व करावं, असं मराठी माणसाला वाटणं स्वाभाविकही आहे. ती कदाचित पवारांची इच्छा असेल किंवा नसेलही, परंतु एक मराठी माणूस म्हणून पवारांविषयीच्या निखळ प्रेमापोटी ज्या आशा-अपेक्षा महाराष्ट्रीयन जनता बाळगते, त्यामुळे हे घडणं स्वाभाविक आहे. शिवाय पवारांकडे ती क्षमताही आहे, असं म्हणण्यास वाव आहे. राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्याइतका समंजस आणि अनुभवी नेता आता अपवादानेच एखाद-दुसरा असू शकेल. ६०पेक्षा जास्त वर्षांचा त्यांचा राजकारणातला वावर आहे. राजकारणाच्या पलीकडचे पवार हे कर्तृत्ववान बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहेत. कला, क्रीडा आणि साहित्य अशा क्षेत्रात त्यांनी त्यांचा ठसाही उमटवलेला आहे. शेतीविषयक क्षेत्राची त्यांची जाण थक्क करणारी आहे. त्यांचा लोकसंग्रह अफाट आणि महत्त्वाचा म्हणजे तो ‘across the party’ आहे. त्यांची काम करण्याची याही वयातली क्षमता स्तिमित करणारी आहे. इतकं सगळं ठासून ज्या व्यक्तिमत्त्वामध्ये भरलेलं आहे, ते व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रीय जनतेचं आवडतं असणं अतिशय स्वाभाविक आहे, त्यात गैर काहीच नाही.
.................................................................................................................................................................
सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.
सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
पण मुख्य मुद्दा हा आहे की, हा एवढा मोठा नेता देशाचं नेतृत्व करण्याइतका राजकारणाच्या किंवा सरकारच्या पातळीवर देशाचं नेतृत्व करण्याइतका राजकीयदृष्ट्या सक्षम आहे का, या प्रश्नाचं उत्तर ठामपणे ‘हो’ असं मिळत नाही, याची जाणीव माध्यमांना होणार किंवा नाही, हा खरा मुद्दा आहे. देशाचं नेतृत्व करायचं तर दिल्ली ठाण मांडून बसावं लागतं. ज्या दिवशी ‘शरद पवार यूपीएचे चेअरमन होणार’ अशा ‘पुड्या’ रेशमाच्या वस्त्रात बांधून माध्यमातून सोडल्या गेल्या किंवा पवारांच्या हितशत्रूंनी त्या सोडल्या किंवा राष्ट्रवादीच्या गोटातूनच सोडल्या गेल्या किंवा एखाद्या पवारभक्त पत्रकारला पाडलेलं ते दिवास्वप्न होतं (ही शक्यता जास्त आहे!), अशा चारही शक्यता गृहीत धरल्या तरी, त्याच्या आधी किती दिवस सलग पवार दिल्लीत होते आणि ही पुडी सोडली गेली त्यानंतर किती दिवस ते दिल्लीत होते, या प्रश्नाचा नीट शोध पवारांविषयी अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्यांनी घ्यायला हवा.
दिल्लीमध्ये ठाण मांडून न बसता राजकीय किंवा सरकारचं नेतृत्व एखाद्या व्यक्तीकडे येणं पूर्णपणे अशक्य आहे. ज्या दिवशी संयुक्त पुरोगामी आघाडीचं म्हणजे यूपीएचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात भेटलं आणि लगेच पवार मुंबईत परतले. दिल्लीच्या दरबारी राजकारणात मांड ठोकायची तर ‘डोक्यावर बर्फ, जिभेवर खडीसाखर आणि चेहऱ्यावरची सुरकुती न हलू देता’ राजकारण करण्याची शैली असावी लागते, ती पवारांकडे निश्चित आहे. तडजोडीचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव कोणत्याही क्षणी पुढं येऊही शकतं किंवा अनेक प्रश्नांच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर पवारांचं मत आजमावलं जातं हेही खरं असलं तरी त्यांची राजकीय ताकद मात्र असायला पाहिजे तेवढी नाही, हे प्रामाणिकपणे मान्य करायला मराठी माध्यमे आणि माणसांनी आता तरी शिकलं पाहिजे.
शिवाय यूपीएत मोठा पक्ष काँग्रेस आहे आणि या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या सुमारे सहा-साडेसहा वर्षांत देशभर फिरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि भाजपशी थेट पंगा घेतला, पण या काळात पवार मात्र नरेंद्र मोदी यांच्याशी ‘नुरा कुस्ती’ खेळत होते. असा पंगा घेणारे राहुल गांधी एकमेव नेते आहेत. तेच या पदाचे प्रबळ आणि समर्थ दावेदार असल्याचे वास्तव कसं विसरता येईल?
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
पंतप्रधान होण्याची मनीषा सर्वांत प्रथम पवारांनी जाहीर केली ती पी. व्ही. नरसिंहराव यांच्या विरोधात शड्डू ठोकून. (तेव्हा नागपुरात ही बातमी आम्ही घनघोर चर्चा करत सेलिब्रेट केली होती; होतो असा भाबडेपणा कधी कधी!) तेव्हापासून त्यांचं पंतप्रधानपद महाराष्ट्रासाठी एक ‘विलोभनीय आणि भावनात्मक मिथक’ ठरलेलं आहे. याआधी एकदा लिहिलेला/भाषणात अनेकदा सांगितलेला एक अनुभवच पुन्हा सांगतो, म्हणजे दिल्लीत काय वातावरण आहे, हे स्पष्ट होईल. मनमोहनसिंग यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या काळातला हा प्रसंग आहे.
एकदा दिल्लीत असताना दोन पत्रकार मित्रांसोबत काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका बड्या नेत्यांकडे (पुढे ते देशाचे घटनात्मक प्रमुख झाल्यानं थेट नाव टाळलं आहे!) रात्रभोजनाला जाण्याची संधी मिळाली. हे सगळे एकमेकांच्या फारच निकटचे आहेत, हे त्या वेळी सहज लक्षात येत होतं. गप्पात एकानं विचारलं, ‘दादा, तुमच्यात पंतप्रधानपदाचं सर्व मटेरिअल आहे, पण एकदा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर तुम्ही शांत झाला का आहात?’ त्यावर ते चाणक्य नेते जे म्हणाले होते त्याचं सार असं- ‘एक म्हणजे, माझ्या स्वत:च्या राज्यातूनच एकहाती संख्याबळ माझ्या पाठीशी नाही आणि दुसरं म्हणजे तर मला गांधी कुटुंबाचा पाठिंबा नाही. तो असेपर्यंत मीच काय कुणीही काँग्रेसकडून पंतप्रधान होऊ शकत नाही!’
तिथून बाहेर पडल्यावर मी त्या पत्रकार मित्रांना म्हणालो, ‘तुम्ही दिल्लीचे पत्रकार आमच्या पवारसाहेबांना ‘मराठा पॉवर’ म्हणता, ‘ग्रेट मराठा’ म्हणता, मुत्सद्दी आणि व्यासंगी राजकारणी म्हणता तरीही त्यांचं नाव पंतप्रधान म्हणून तुम्ही गृहीत का धरत नाही?’ त्यावर पत्रकार मित्र म्हणाला, ‘ते अजून पूर्ण दिल्लीकर झालेले नाहीत आणि त्या पदासाठी अजून त्यांची तयारी नाही.’ (आजही पक्कं स्मरणात आहे, त्यानं ‘he is a spring chicken’ असा शब्दप्रयोग केलेला होता आणि तो मला तेव्हा मुळीच रुचला नव्हता). त्यावर देवेगौडा यांना काय एका रात्रीत सर्वज्ञान प्राप्त झालाय का, असा वाद मी घातला. त्यावर महाराष्ट्राचे लोक पवारांबाबत ‘अंध आणि नाहक इमोशनल आहेत’, असा शेरा त्यानं मारला होता. सुमारे वर्षांपूर्वीची ही हकीकत असून अजूनही त्या स्थितीत मुळीच फरक पडलेला नाही!
१९८० साली शरद पवार यांचे विधानसभेवर ५५ उमेदवार निवडून आले आणि २०१९ साली हा आकडा ५६ वर पोहोचलेला आहे. म्हणजे ४० वर्षांत शरद पवार यांच्या राजकीय ताकदीची ‘नौका’ ५० ते ६०च्या आसपासच हेलकावत राहिली ही वस्तुस्थिती आहे. आणि कटू असली तरी ती स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
याच चार दशकांच्या काळात ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल कसा पादाक्रांत केला, हे आपण पाहिलं आणि तोही स्वबळावर. उत्तर प्रदेशात मुलायमसिंग आणि नंतर त्यांचा पुत्र अखिलेशने स्वबळावर सत्ता स्थापन केली. मायावती स्वबळावर सत्तेत आल्या. आंध्रात जगमोहन रेड्डी त्यांच्या ताकदीवर सत्तेत आले. तामिळनाडूत अम्मा जयललिता सलग तीन वेळा सत्तेवर आल्या. महाराष्ट्रात मात्र पवारांचा आधी समाजवादी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर तर सोडाच, परंतु सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष म्हणूनसुद्धा स्थान मिळवू शकला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
ज्या पक्षाचा नेता आणि पक्ष एखादा राज्यामध्ये स्वबळावर उभा राहू शकत नाही, त्या पक्षाचा नेता देशाचं नेतृत्व कसं काय करू शकतो? ती एक निष्फळ (Abortive) चर्चा आहे, असा प्रश्न अशा बातम्या देताना माध्यमांना पडत कसा नाही? पवारांचं नेतृत्व असं देशव्यापी किंवा एक सक्षम राजकीय मोठी शक्ती असलेलं नाही, हे लक्षात न घेताच माध्यमं बातम्या चालवतात आणि त्यातून आपलीच विश्वासार्हता वेशीवर टांगून घेतात, हे काही चांगलं नाही.
गेल्या आठवड्यात दोन दिवस महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यांवर असलेल्या ‘पाण्याची थकबाकी’ ही बातमी ‘गाजवली’ गेली. पत्रकारांचे स्त्रोत किती कच्चे असतात, याचे अप्रतिम उदाहरण म्हणून या बातमीकडे बघायला हवं. कारण कोणताही गाजावाजा न करता, कोणताही आव न आणता, कोणतीही खवचट कमेंट न करता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पाण्याची थकबाकी’ या बातमीत काहीही तथ्य कसं नाही, हे विधिमंडळाच्या सभागृहातच सांगून टाकलं. ज्या पक्षाची महापालिकेत सत्ता आहे आणि त्याच पक्षाचे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचीही पाण्याची थकबाकी आहे, असं बातम्यांमध्ये म्हटलेलं होतं. त्याचा खुलासा महापालिकेने तातडीने केला की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे अशी कोणतीही थकबाकी नाही. तरीही या बातम्या चालत राहिल्या.
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
..................................................................................................................................................................
आपली बातमी चुकली किंवा आपल्या बातमीच्या संदर्भामध्ये काही अतिरिक्त आणि आपल्या बातमीच्या तपशीलाविषयी प्रतिवाद करणारी माहिती समोर आली, तर चूक मान्य करण्याचा किंवा त्या संदर्भात खुलासा करण्याची किंवा त्यांची बाजू तपशीलवार मांडण्याचा उमेदपणासुद्धा माध्यमात राहिलेला नाहीये, हे अतिशय वाईट आहे.
ही दोन उदाहरणं केवळ प्रातिनिधिक म्हणून घ्यायला हवीत. माध्यमांचे सध्या बातम्या देणारे स्त्रोत किती कच्चे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत आणि त्यामुळे किती बातम्या खोट्या ठरल्या आणि त्या बातम्या देणारे पत्रकार सपशेल तोंडघशी कसे आपटले, याची असंख्य उदाहरणे (मंत्री मंडळाचा विस्तार, राहुल गांधी नांदेडहून लढणार, अक्षयकुमार निवडणूक लढवणार) देता येतील.
प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की, आपण यातून काही शिकणार आहोत की नाही? आपल्या बातम्या अचूक का ठरत नाहीत? हा प्रश्न सर्वच माध्यमातील ज्येष्ठांना पडत नाही का? अचूक बातमी कशी मिळवावी, या संदर्भात ते फिल्डवरच्या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यामध्ये कमी तर पडत नाहीत ना, असे प्रश्न माध्यमातील ज्येष्ठांना पडायलाच हवेत.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
खरं म्हणजे आपल्याला प्रश्न मुळात पडायला हवेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची प्रक्रिया आपल्यात सुरू असायला पाहिजे. प्रश्न कधीच संपत नसतात. एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की, त्या उत्तरातून दुसरा प्रश्न निर्माण होतो. प्रश्न निर्माण होण्याची आणि उत्तरं शोधण्याची ती एक न संपणारी मालिका असते आणि त्या मालिकेभोवती आपलंही आयुष्य फिरत असतं. माध्यमांमध्ये सध्या उलटंच घडताना दिसतंय. माध्यमं इतरांना प्रश्न विचारतात, परंतु स्वत:च्या अचूकतेविषयी स्वत:ला प्रश्न विचारत नाहीत, स्वत:च्या अचूक भाषेविषयी स्वत:ला प्रश्न विचारत नाहीत, पत्रकारितेची जी काही मूल्ये आहेत, त्या आधारे बातमी दिली जाते की नाही, हाही प्रश्न ते स्वत:ला विचारत नाहीत आणि आपण कुणाचे तरी प्रवक्ते झालो, हे समजून घेण्याचं त्यांचं भानही हरपलं आहे…
हे सर्व चिंताजनक आहे. ही मालिका अशीच जर सुरू राहिली तर विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्यांची मोठ्या आणि काही प्रमाणात मुद्रित माध्यमांची पत्रकारिताच ‘फोकनाड’ ठरेल. त्यापुढे जाऊन उद्या माध्यमांची अवस्था रेल्वेत गाणं म्हणून त्या आधारे भीक मागून उदरभरण करणाऱ्या वर्गापेक्षा वेगळी राहणार नाही, हा इशारा माध्यमांनी वेळीच समजून घ्यायला हवा.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment