‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • ‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ. रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 06 March 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar रॉ RAW रवि आमले Ravi Amale

१४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यानच्या युद्धज्वर आणि कृतक देशभक्तीच्या पिसाट वाऱ्यात एक पुस्तक वाचनात आलं. देश, शेजारी देश, खंड, उपखंड, आंतरराष्ट्रीय राजकारण, परराष्ट्र व संरक्षण धोरण, विदेशनीती या सर्वांचा कणा असलेली जी एक हेरगिरी असते, त्यासंदर्भातलं हे पुस्तक. त्यातूनही विशेष म्हणजे भारतीय हेरगिरीवरचं हे पुस्तक मराठीत आहे. पुन्हा ते अनुवादित नाही, तर परिश्रमपूर्वक माहिती, संदर्भ गोळा करून आवश्यक तिथं भाष्य करत हे पुस्तक सिद्ध झालंय.

‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ (रवि आमले, मनोविकास प्रकाशन, पाने – २९३, मूल्य – २९९ रुपये) हे ते पुस्तक. हे पुस्तक प्रकाशित झालंय डिसेंबर २०१८ला आणि ५ जानेवारी २०१९ला त्याची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झालीय. या पुस्तकावरचं एक परीक्षण वाचून हे पुस्तक घेतलं. मनोविकासचं प्रकाशन आणि रवि आमले यांचं लेखन. आमलेंच्या लेखनाचा परिचय दै. ‘लोकसत्ता’मधील त्यांच्या लेखनापासूनच होता. प्रपोगंडावरची त्यांची मालिका वर्तमान भारतीय राजकारणावरच्या अभ्यासासाठी एक चांगलं साधन होती. त्यामुळे ‘रॉ’विषयी ते काय लिहितात याची उत्सूकता होती. त्यापेक्षा आपल्या माहिती व ज्ञानात भर पडणार याची खात्री होती. या दोन्ही अपेक्षा पूर्ण झाल्या.

आजवर इंग्रजीसह परदेशी भाषांत, देशविदेशच्या गुप्तचर संस्थांबद्दलची माहिती प्रत्यक्ष संदर्भांसहित अनेक पुस्तकांतून, हॉलिवुड सिनेमांतून आली आहे. त्यातही सीआयए आणि केजीबीवर तर विपुल. अलीकडे त्यात इस्त्रायलच्या मोसादची भर पडलीय.

गेल्या चार वर्षांत कृतक देशभक्तीनं भरलेले युद्धपट, हेरगिरीपट हिंदी चित्रपटसृष्टीतही तयार झाले. पण त्यात चित्रपट कमी, प्रचार जास्त. अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’पासून तपशील, संदर्भांसह अशा पद्धतीच्या चित्रपटांची निर्मिती गंभीरपणे व थेट राजकीय (गंभीर) भाष्य करणारी होऊ लागली. सोबतीनं अॅक्शन चित्रपटातूनही आयबी, नार्कोटिक्स, डिपार्टमेंट वगैरे दिसू लागली. तरीही भारतीय सेन्सॉर, समांतर सेन्सॉर आणि गुप्तता या कारणानं आपल्याकडे आजही हॉलिवुडसारखा थेट चित्रपट करता येत नाही.

हॉलिवुड आणि युरोपात बनलेल्या अशा चित्रपटांचा कथानकांचा मुख्य स्त्रोत, आधार हा त्या त्या विषयांवर, घटनांवर प्रसिद्ध झालेले ग्रंथ आहेत. हे ग्रंथ बव्हंशी पत्रकार, शोधपत्रकार अथवा निवृत्त अधिकारी (राजनैतिक, सैनिकी, प्रशासकीय इ.) यांनी अधिकृत कागदपत्रांचा अभ्यास करून, संबंधित लोकांशी बोलून, जगभरात त्यावर प्रसिद्ध झालेल्या विविध माहितींच्या संकलनातून त्याची संगतवार मांडणी केलेली आहे.

लेखक रवि आमले त्यांच्या मनोगतात म्हणतात- ‘ ‘रॉ’सारख्या संस्थांचा इतिहास समोर येणे आवश्यक होते. त्याबाबत इंग्रजीत अलीकडच्या काही वर्षांत पाच-सहा पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘रॉ’शी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनीच ती लिहिलेली असल्याने त्याचे मूल्य मोठेच आहे. परंतु एकतर ती संख्या फारच कमी आहे. आणि दुसरी बाब म्हणजे काही अपवाद वगळता ‘रॉ’च्या कारवायांची एकत्रित माहिती त्यातून अभावानेच मिळते. मराठीतून तर तसे लेखनच झालेले नाही. ती कमतरता या पुस्तकातून भरून निघेल असे वाटते.’

रवि आमले यांनी ‘कमरता’च नव्हे तर ‘पोकळी’ भरून काढलीय हे पुस्तक लिहून!

या पुस्तकाच्या जन्मकहाणीत कुलभूषण जाधव प्रकरण आणि त्यानिमित्तानं दै. ‘लोकसत्ता’त ‘काळोखातल्या झुंझारकथा’ या लेखाचं लेखन, त्यातून ‘रॉ’विषयी वाचकांची वाढलेली उत्सूकता आणि ‘रॉ’विषयी विस्तारानं काही प्रसिद्ध होण्याची गरज आमलेंनी मनोगतात नोंदवताना मनोविकासच्या पाटकरांचा त्यासाठीचा आग्रहही नम्रपणे लिहिलाय.

अलीकडे आजवर दुर्लक्षित विषयांवर माहितीच्या महाजालातून पानेच्या पाने उतरवून ती संकलित, संपादित करून वाचकाच्या हाती देण्याची एक ‘हायब्रीड’ व्यवस्थाही तयार झालीय. त्या पुस्तकांचं एकूण स्वरूप बघता ती मोठी, विस्तारित ‘कॉफी टेबल बुक’ म्हणता येतील. काही गंभीर वाचकांसाठी ती ‘काँग्रेसी गवताची पैदास’ वाटते, पण नवसाक्षर असा जो सर्वदूर पसलेला नवभूकेला वाचक आहे, त्याला विषयांची अशी ‘तोंडओळख’ ही ज्ञानच वाटते. असो. हे सांगण्याचा उद्देश हा होता की, ‘पुस्तक लिहा’ म्हटल्यावर दिलं लिहून असं न होता डेडलाईन वर्षभर लांबली. ती का लांबली असेल याचं उत्तर या पुस्तकात शेवटी जी दहा पानी संदर्भ यादी आहे, ती वाचल्यावर मिळतं. आणि त्यामुळेच मराठीतल्या या प्रथम पुस्तकानं यापुढच्या लेखकांसाठी अशा पद्धतीच्या पुस्तकाच्या लेखनाचा आदर्श वस्तुपाठ ठेवलाय.

‘रॉ’च्या निर्मितीपासून ती कशी, कधी, कोणी केली वगैरे सर्व तपशील देत या २४ प्रकरणं असलेल्या पुस्तकाची सुरुवात होते. शेवटचं चोविसावं प्रकरण ‘रॉ’च्या वर्तमानावर भाष्य करतानाच ‘रॉ’सारख्या गुप्तचर संस्थेचं गूढ कायम ठेवतं!

सध्या भारतीय (त्यातही मराठी) वृत्तवाहिन्यांवर युद्ध, युद्धनीती, आंतरराष्ट्रीय खेळी, देशांगर्तत राजकारण याबाबत जो उन्मादी पोरखेळ चालू आहे, त्याला कारण पत्रकार म्हणवून घेणारी जमात चटावरचं श्राद्ध उरकल्यासारखे विषय उरकतात. आणि ज्ञान, प्रबोधन, माहिती यापेक्षा भांडवली हित व प्रचार यासाठी वेठबिगारी करणाऱ्यांना गांभीर्यापेक्षा जल्लोषात टीआरपी वाढवण्यात रस असतो हे आहे.

आपल्याकडच्या पत्रकारितेच्या इतिहासात मुंबईसह महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्रांतून ६० ते ९० या तीन दशकात ‘उपसंपादक’ म्हणून रुजू झालेल्या अनेकांनी नंतर आवडत्या अथवा कामाचा भाग म्हणून संसदीय राजकारण, समाजकारण, अर्थकारण, नाटक, चित्रपट, विज्ञान, शेती अशा विविध विषयांत बातमी बाहेर जाऊन, ज्ञानोत्सूक होऊन अभ्यास केलाय, माहिती गोळा केलीय, गोष्टी उजेडात आणल्यात. परंतु नव्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकारांना माहितीचा खजिना एका क्लिकवर उपलब्ध असताना, निव्वळ समाजमाध्यमांवर शेरेबाजी, वितंडवाद नि फोटो शेअर करण्यातच पत्रकारिता वाटते! त्यातले किती जण विशिष्ट विषयाचा अभ्यास करतात कुणास ठाऊक. याउलट प्रसिद्ध माणसालाही ‘मला तुमच्याबद्दल फारसे माहीत नाही, तर तुम्हीच पाच मिनिटे तुमच्याबद्दल सांगा’ असं म्हणण्याचा निलाजरपेणा या नवमाध्यमात आहे. या पार्श्वभूमीवर रवि आमले यांचं हे पुस्तक सुजाण नागरिक व वाचकांसाठी एक मोठीच भेट आहे.

सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय! देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा!

या पुस्तकातून पाकिस्तान फाळणीचं उत्तर मिळतं, म्हणजेच पूर्व-पाकिस्तान तोडून बांगला देशची निर्मिती. त्यानिमित्तानं इंदिरा गांधींच्या नेतृत्वाची जी उंची आपल्याला दिसते; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आकलन, महत्त्वाचं म्हणजे रॉ, आयबी, सीबीआय, विविध मंत्रालयं याबाबतची गंभीरता; त्यातील अधिकाऱ्यांचा सन्मान, स्वातंत्र्य आणि वेळप्रसंगी यशापयशाची जबाबदारी घेणं… ते सगळं वाचताना तो काळ, तो इतिहास तर उभा राहतोच. पण नेतृत्वाकडे बढाईखोर आणि भाषणबाजीपेक्षा संयम व मौन कसं लागतं, आणि संयम व मौन म्हणजे भेकडपणा नाही, तर ‘राजकारण’ अशी एक प्रगल्भ समज वाचकाला यातून येऊ शकते.

यात बांगला देश मुक्तीयुद्धाप्रमाणेच खलिस्तान आणि तामिळींची चळवळ, त्यांचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे, त्या सर्व पेच\डावपेचांना सामोरं जाताना गमवावे लागलेले दोन पंतप्रधान, सध्या गांधी घराण्याला ‘गतिमंद’ म्हणून हिणवण्यापर्यंत राजकीय विकृती पसरलीय. या पुस्तकानं या घराण्यातील दोन व्यक्तींनी देश चालवताना तो किती प्रकारे तोलून धरत हा देश ‘लोकशाहीवादी’ राहिल याची कशी दक्षता घेतली ते सोदाहरण दाखवलंय. या हौताम्याची योग्य ती दखल घेतानाच, त्यांच्या राजकीय चाली, चुकीचे निर्णय, त्याचे परिणाम यावरही बोट ठेवलंय.

या पुस्तकात अनेक तपशील वेगळ्या अर्थानं रंजक, आश्चर्यकारक तर आहेतच, पण त्या त्या व्यक्तींच्या पारंपरिक प्रतिमांना छेद देणारेही आहेत.

बांगला देश निर्मिती दरम्यान मूजिबूर रेहमान यांना पाकिस्तानने फाशी देऊ नये यासाठी भुत्तोंचं मन वळवण्यासाठी ‘रॉ’नं त्यांच्या एका जुन्या मैत्रिणीचा केलेला उपयोग वाचताना आपल्याला हिंदी सिनेमाची आठवण येते. पुढील तपशील येतो – ‘४ मार्च रोजी ऐज्वालवर हवाई दलाच्या जेट विमानातून बॉम्बगोळे टाकण्यात आले. मशिनगनने मारा करण्यात आला. हवाईदलाच्या या बॉम्बफेकी विमानांच्या चालकांमध्ये दोन वैमानिकांचा समावेश होता. त्यातील एकाचे नाव होते राजेश पायलट आणि दुसऱ्याचे सुरेश कलमाडी!’

याप्रमाणेच मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, फारुख अब्दुल्ला, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस असे अनेक नेते विविध रूपांत या पुस्तकात ऐतिहासिक दस्तावेज म्हणून उभे राहतात.

एक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं.

मनोविकास प्रकाशनाला विनंती आहे, या पुस्तकाच्या प्रती सर्व मराठी वृत्तवाहिन्यांना मोफत प्रौढ व बालसाक्षर योजनेखाली पाठवून द्याव्यात. यातील विनोदाचा भाग सोडून उर्वरित नागरिक वाचकांनी हे पुस्तक विकत घेऊन पुस्तक वाचावं, संग्रही ठेवावं आणि साक्षर व्हावं, एवढंच आवाहन. रवि आमले व मनोविकासचं खास अभिनंदन.

.............................................................................................................................................

‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 06 March 2019

संजय पवार, वाचायलाच हवं असं पुस्तक आहे. पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद. फक्त ते उन्मादी राष्ट्रवाद वगैरे टाळता आलं तर जरा बघा. कारण की त्याचा हेरगिरीशी काही संबंध नाही. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......