पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारणीभूत झाली, ती ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक यांची हत्या

प्रिन्सीप हा त्या सात लोकांत सगळ्यात खराब नेमबाज होता. इतका की, १५-२० दिवसाच्या सरावानंतरही त्याचा नेम ५-१० फुटावरच्या लक्ष्याला लागत नसे. पण पिस्तुलाचा चाप ओढताना अभावितपणे तो डोळे मिटत असे. तो फार काही या कटात करू शकेल अशी अपेक्षाच नव्हती. ज्याचा खून/ हत्या प्रिन्सीपच्या हातून झाला तो फ्रांझ कसलेला नेमबाज शिकारी… केवढा दैवदुर्विलास! त्यामुळे केवळ योगायोग आणि नियतीनेच ही घटना घडवून आणली की, काय असे वाटू लागते...

रशिया, फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्राच्या आकांक्षांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. जमेल तेवढे त्याला दाबण्याचे, एकटे पाडण्याचे राजकारण केले!

१९०५ आणि १९११मध्ये खरे तर युद्ध पेटायचे, पण जर्मनीने माघार घेतल्यामुळे ते दोन्ही वेळेस टळले. हा समजूतदारपणा नव्हता, तर आपण एकटे पडलो आहोत, हे ओळखून आणि पूर्ण तयारी केल्याशिवाय असे वेडे धाडस करायचे नाही, हे तो शिकला. युरोपात रशिया, फ्रान्स आणि इंग्लंड हे आता आपले शत्रू असून ते आपल्याविरुद्ध एकत्र येऊन कट-कारस्थान करताहेत, ही त्याची धारणा झाली. इजा झाला, बिजा झाला, इथून पुढे माघार नाही, ही खूणगाठ जर्मनीने मनाशी बांधली...

बिस्मार्कची भविष्यवाणी खरी ठरली! जुलै १८९८मध्ये बिस्मार्क वारला आणि नोव्हेंबर १९१८मध्ये पहिले महायुद्ध संपले. त्यात जर्मनीचा नामुष्कीकारक पराभव झाला.

१८९७ मध्ये मृत्युपंथाला लागलेल्या बिस्मार्कची भेट घ्यायला विल्हेल्म गेला. तेव्हा बिस्मार्क त्याला म्हणाला, “महाराज जोपर्यंत जर्मन सैन्य आणि सैन्याधिकारी तुमच्याशी एकनिष्ठ आहेत, तोपर्यंत तुम्ही हवे ते करू शकाल. तुम्हाला भ्यायची गरज नाही. पण ज्या दिवशी सैन्याची निष्ठा ढळेल, तेव्हा मात्र तुमची धडगत नाही. माझ्या मृत्युच्या २० वर्षांतच हा सगळा डोलारा कोसळेल आणि तुमची (आणि पर्यायाने एकीकृत जर्मनीची) वाताहत होईल.”...