गीतासाठी गाणारी गीता, सोबत देव आनंद : एक भन्नाट कॉकटेल!
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • गीता बाली, देव आनंद आणि गीता दत्त
  • Sat , 08 July 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi गीता दत्त Geeta Dutt गीता बाली Geeta Bali देव आनंद Dev Aanand

‘शोखियों में घोला जाये फुलों का शबाब, उसमें फिर मिलायी जायें थोडीसी शराब, होगा युं नशा जो तय्यार, वो प्यार है’ असं नीरज यांचं गाणं सचिन देव बर्मन यांनी ‘प्रेम पुजारी’ (१९७०) मध्ये दिलं होतं. पण त्याच्या २० वर्षं आधीच प्रेमाच्या नशेसारखीच नशा संगीताच्या बाबतीत त्यांनी घडवली होती. एक खट्याळ गीता (बाली) घ्यायची, दुसऱ्या अवखळ गीता (दत्त) चा कोवळा मस्तीवाला आवाज घ्यायचा, एक देखणा देव आनंद घ्यायचा, एकदम ताज्या तरुण रक्ताचा गुरुदत्त नावाचा दिग्दर्शक घ्यायचा, एकदम नवीन कोरं करकरीत पार्श्वसंगीत वापरायचं आणि आपल्याच लिखाणाच्या मस्तीत बुडालेल्या साहिरचे शब्द घ्यायचे…

तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले

अपने पे भरोसा हैं तो इक दांव लगा ले

‘बाजी’ (१९५१) मधील या गाण्याला आता ६५ वर्षं उलटून गेली आहेत. अजूनही त्याची नशा उतरत नाही. गीता (बाली) साठी गीता (दत्त) नं गायलेली गाणी आणि तेही देखणा देव आनंद नायक असताना, हे एक अफलातूनच प्रकरण आहे. वरच्या गाण्याची तर खूप चर्चा झाली. याशिवाय याच चित्रपटातील दुसरं एक गाणं ‘देख के अकेली मुझे बरखा सताये’ याबाबत याच सदरात आधीच्या लेखात उल्लेख आलाही आहे (१० जून, २०१७). पण अजून एक मस्त गाणं यात आहे-

सुनो गजर क्या गाये, समय गुजरता जाये

ओ रे जीनेवाले, ओ रे भोलेभाले

सोना ना, खोना ना

साहिर स्वातंत्र्यानंतरच्या काळात तरुण पिढीला फाळणीच्या पारतंत्र्याच्या सगळ्या जखमा विसरून पुढे पुढे जायला सुचवतो आहे. त्या पिढीचंच तो प्रतिनिधित्व करतो आहे. ‘बिछडा जमाना कभी हात ना आयेगा, दोष न देना मुझे फिर पछतायेगा’ असं म्हणत एक नवीन दिशा दाखवतो आहे. या चित्रपटात सगळेच नवीन व तरुण होते. अगदी सचिनदेव बर्मन वयानं मोठे असूनही त्यांनी एकदम नवीन संगीत दिलं होतं. तोपर्यंतचा गीताचा भक्ती संगीतातला, विरही आवाज इथं वेगळाच उमटला. काहीतरी नवीन, कोऱ्या कपड्यासारखं आल्हाददायक, प्रसन्न रसिकांच्या कानावर आलं. समीक्षकांनी तेव्हा नाकं मुरडली, पण सामान्य रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. गाणी हिट झाली. सिनेमा बॉक्स ऑफिसवरही धूम चालला. किशोरकुमारची जी शैली पुढे लोकप्रिय झाली, त्याच शैलीतलं पहिलं गाणंही याच चित्रपटात होतं- तेरे तिरों में छुपे प्यार के खजाने है. 

गीतासाठी गाणारी गीता आणि सोबत देव आनंद हे नशिलं समीकरण लगेच दुसऱ्याच वर्षी ‘जाल’ (१९५२) मध्येही रसिकांना अनुभवायला मिळालं. अर्थात संगीत सचिनदांचंच होतं. यात लताच्या आवाजातलं मस्तीखोर गाणं ‘चोरी चोरी मेरी गली आना है बुरा’, निसर्गाचं अप्रतिम वर्णन असलेलं ‘पिघला हैं सोना दूर गगन में’, लता-हेमंत कुमार यांच्या आवाजातील सदाबहार ‘ये रात ये चांदनी फिर कहां, सुन जा दिल की दास्तां’ अशी गाणी आहेत. पण लता-किशोरच्या गाण्याची नशा काही औरच. ते गाणं आहे-

दे भी चुके हम दिल नजराना दिल का

छोडो भी ये राग पुराना दिल का   

यात ‘पुराना’ म्हणताना जो झटका गीता दत्त गाताना आणि गीता बाली पडद्यावर देतात, तो निव्वळ जीवघेणा आहे. त्याची संगीतशास्त्रात व्याख्या करणं मुश्किल. जसं की किशोरच्या गाण्यात असतं. तो मनानंच गाण्याला असं काही वळण देतो, असे काही शब्द उच्चारतो, असे काही सूर लावतो की, सचिनदासारखे संगीतकार सोडले तर इतरांची पंचाईतच व्हावी!  

गुरुदत्तनं पुढं ओ.पी.नय्यरला घेऊन ‘बाज’ (१९५३) प्रदर्शित केला. त्यात स्वत:च नायकाची भूमिका केली. त्यातही गीतासाठी गीताची दोन गाणी आहेत, पण आधीची मजा त्यात नाही. शिवाय देव आनंदही त्यात नाही.

सचिनदांच्या संगीतात परत हे सगळं जमून आलं नाही, पण अनिल विश्वासनी ‘फरार’ (१९५५) मध्ये नायकाच्या भूमिकेत देव आनंद असताना गीतासाठी गीताचा आवाज जूळवून आणला. यातली गीताची गीतासाठीची तीन गाणी मस्त आहेत. 

जी भर के प्यार कर लो, अखिया दो चार कर लो

सुनो ये रात नही है एक तीन चार की

सुनो ये रात है बस दो दिलों के प्यार की

आता या गाण्यात काव्य म्हणून काहीच नाहीच. प्रेम धवनलाही गीतकार म्हणून मर्यादा आहेत. गीताच्या नृत्यालाही प्रचंड मर्यादा आहेत. यात गीताचं नाचणं शाळकरी मुलीसारखं वाटतं, पण गाण्यात मस्ती आहे. दुसरं गाणं अप्रतिम आहे- 

हर इक नजर इधर उधर, है बेकरार तेरे लिये

मेहफिल का दिल धडक रहा, है बार बार मेरे लिये

आणि मग गीताचा आवाज जो सुटतो, 

हूँ मैं इक नया तराना, एक नया फसाना, 

एक नयी कहानी हूँ मैं, 

एक रंग रंगीली, इक छैल छबिली 

मद मस्त जवानी हूँ मैं 

आणि त्यावर गीताच्या खरंचच मदमस्त अदा. क्लबमधल्या प्रत्येक टेबलापाशी जाऊन गीता आपल्या विभ्रमांनी तरुणांना घायाळ करते आहे, पण देव आनंद आपल्यातच मग्न एका टेबलावर एकटाच बसून आहे. 

तिसरं गाणं ‘दिल चुरा लू चुरा लू, दिल में छुपी बात, बडे बडे दिलवाले भी रह जाये मलते हात’ छान आहे, पण त्याच्या संगीतावर सी. रामचंद्रच्या ‘अलबेला’च्या संगीताची छाप जाणवत राहते. अजून एक गाणं गीताच्याच आवाजात आहे- ‘इक रात की यह प्रीत’, पण ते विशेष नाही. 

गीता दत्तचा भाऊ मुकुल रॉय याच्या संगीतानं नटलेल्या ‘सैलाब’ (१९५६) मध्ये गीतानं गायलेली तब्बल आठ गाणी आहेत. ओ.पी.नय्यरच्या ‘मिस कोका कोला’ (१९५५) मध्येही गीता गीतासाठी गायली आहे, पण या दोन्ही चित्रपटात देव आनंद नाही.

गीताबालीचा देव आनंद सोबतचा गीताच्या आवाजातला चौथा चित्रपट म्हणजे ‘मिलाप’ (१९५५). एन.दत्ताने यात गीताच्या आवाजात तीन मस्त गाणी दिली आहेत. 

जाते हो तो जाओ पर जाओगे कहाँ

बाबूजी तुम ऐसा दिल पाओगे कहाँ

साहिरसारखा प्रतिभावंत कवी असेल तर गाण्याच्या शब्दांना आपोआपच एक वजन येतं, मग ते शब्द अगदी साधे असले तरी. साहिरच्या गीतात बऱ्याचदा आढळणारा अवघड उर्दू शब्दांचा वापर इथं नाही. परिणामी गाणं गीताच्या अवखळ आवाजात चपखल बसलं आहे. गीताबालीच्या नृत्याला मर्यादा असल्याने तिच्याकडून किमान अदांमधून परिणाम साधायला हवा, हे ओळखून तसं नृत्य या गाण्यावर बसवलं गेलं आहे. 

बचना जरा ये जमाना हैं बुरा

कभी मेरी गली मे न आना

हे दुसरं गाणं गीतानं रफीसोबत गायलं आहे. पण हा रफीचा आवाज देव आनंदसाठी नसून जॉनी वॉकरसाठी आहे. डोळ्यावर पट्टी बांधलेला देव आनंद आणि त्याच्या सोबत आंधळी कोशिंबीर खेळणारी गीता बाली असा प्रसंग आहे. सोबत जॉनी वॉकर आणि मित्र-मैत्रिणींचा घोळका. जॉनी वॉकरसाठी रफीनं गायलेली गाणी, हे एक स्वतंत्रच प्रकरण आहे.

तिसऱ्या गाण्यात स्पॅनिश ‘ला जोटा’ नावाच्या लोकसंगीतात वापरल्या जाणाऱ्या वाद्यांचा वापर फार सुरेख केला आहे. त्या काळातील काही गाण्यांमध्ये ओ.पी.नय्यर, मदन मोहन यांसारख्यांनी याचा अतिशय कल्पक वापर करून घेतला आहे. हे गोड गाणं आहे- ‘हमसे भी कर लो कभी कभी तो मिठी मिठी दो बातें’.

काळी टोपी, कोट घातलेला गरीब चेहरा करून बसलेला देव आनंद आणि त्याच्या भोवती नाचणारी गीताबाली.  या गाण्यात एन. दत्तानं गोव्याच्या लोकसंगीताचे रंग भरले आहेत. या चित्रपटातील गाण्यांवर गोव्याची छाप आहे. साहिरच्या शब्दांतही एक वेगळेपण आहे.

मैं बहार का शौक फुल हूँ, अक्ल मर मिटे ऐसी भूल हूँ

धूली धूली हैं, घुली घुली हैं रातें

या शब्दांसाठी गीताचाच खट्याळ मादक स्वर हवा. काही गाण्यांमध्ये गीताच्या आवाजात जो परिणाम साधला जातो, तसा दुसऱ्या कुणाच्या आवाजात शक्य नाही. साहिर-मजरूह यांच्यासारख्यांना फार चांगल्या पद्धतीनं गीतासाठी शब्द रचता आले आहेत. ओ.पी.नय्यर आणि सचिनदेव बर्मन यांना गीताच्या आवाजाचा वेगळा पैलू फार चांगल्या प्रकारे पकडता आला आहे.   

पंकज मलिकच्या संगीतात ‘जलजला’ (१९५२) मध्येही गीतासाठी गीता गायली आहे. यातही देव आनंद आहे, पण यातली गाणी विशेष भावत नाहीत. गीताचा तो खट्याळ सूर पंकज मलिकला पकडता आला नाही म्हणूनही असं झालं असावं.

दोन्ही गीता १९३० ला जन्मल्या. येत्या २० तारखेला गीता दत्तचा स्मृतीदिन आहे. १९६५ला गीता बाली गेली आणि १९७२ ला गीता दत्त. दोघींनाही अतिशय कमी आयुष्य लाभलं, पण ‘बाजी’पासून गीतानं गीतासाठी गायलेल्या खट्याळ गाण्यांचा खळाळता झरा रसिकांसाठी मात्र आत्तापर्यंत वाहत राहिला आहे...

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख