गेली ५० वर्षं महाराष्ट्रातील सिनेरसिकांना चित्रपट माध्यमाचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करायला उद्युक्त करणारे, समर्पित भावनेने कार्य करणारे ‘प्रभात चित्र मंडळ’ आज, ५ जुलै २०१७ रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने आज संध्याकाळी ७ वाजता प्रभात चित्र मंडळाचा वर्धापन दिन सोहळा प्रभादेवी येथील रवीन्द्र मिनी थिएटर येथे ‘आय डॅनियल ब्लॅक’ या जागतिक पातळीवर नावाजलेल्या दिग्दर्शक केन लॉच यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने शुभारंभ होत आहे.
.............................................................................................................................................
ऐकायला थोडे चमत्कारिक वाटेल, पण कळायला लागण्याच्या आधीपासून मी सिनेमे बघत होतो. नाहीतरी शब्दांचा परिचय होण्याआधी आपल्याला चित्रांचा परिचय होतो. पहिल्यावहिल्यांदा जग आपण समजून घेऊ लागतो ते चित्रलिपीतून. त्यामुळे यात नवलपरीचे काही नाही.
लहान वयात सिनेमा बघताना समोरच्या सिनेमातले फार काही कळत होते असे नाही. वडील इंग्रजी सिनेमाचे शौकीन म्हणून लहानपण इंग्रजी सिनेमे पाहण्यात गेले. सिनेमामधली पात्रे मराठी हिंदी भाषेतही बोलतात हे त्यावेळी ठाऊक नव्हते. मी पाहिलेल्या हॉलीवुडच्या सिनेमांत शब्दांपेक्षा दृश्य माध्यमावर भर असायचा. त्यामुळे भाषा परकी असूनही ते बऱ्यापैकी समजायचे; आणि दृश्यश्रीमंत असल्याने अधिक आवडायचे.
शाळेतले आमचे गुजर सर सिनेमावेडे होते, अनेकदा ते धडा शिकवायचे सोडून इंग्रजी सिनेमाच्या गोष्टी सांगायचे. चेस अ क्रुकेड श्याडो, विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन, नायगारा, लास्ट ट्रेन फ्रॉन गन हिल, व्हर्टिगो अशा जबरी सिनेमाच्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळायच्या. गोष्ट ऐकता ऐकता आमच्या डोळ्यासमोर द्दश्यं उभी राहायची. सिनेमा हे मूलतः दृश्य माध्यम आहे, हे अशा प्रकारे शाळकरी वयात पाहिलेल्या इंग्रजी सिनेमाने शिकवले. मनावर ते चांगल्यापैकी ठसले. दृश्याच्या अंगाने सिनेमाचा आस्वाद घ्यायची सवय तेव्हाच लागली. कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा फिल्म फेस्टिव्हलचे युग सुरू झाले होते. माझ्यासारख्या सिनेवेड्याला फिल्म फेस्टिव्हल म्हणजे मोठी मेजवानीच. त्याच सुमारास दादरला चित्रा सिनेमात दर रविवारी बंगाली सिनेमे दाखवले जात. सत्यजित राय या महान दिग्दर्शकाची तिथेच ओळख झाली. अपूची मालिका पाहिली तेव्हा मला बंगाली भाषेतले ओ की ठो समजत नव्हते. चित्रातून सिनेमा समजून घ्यायची लहानपणची सवय तिथे कामी आली. सत्यजितच्या सिनेमाच्या थीमपेक्षा त्यातील दृश्यसंपन्नतेने मी थक्क होऊन गेलो. बंगाली भाषा समजली तर सत्यजित रायच्या सिनेमाचा पूर्ण आस्वाद घेता येईल या विचाराने बंगाली क्लास जॉईन केला; बंगाली भाषेचे प्राथमिक धडे घेतले. मग काय, चारुलता, महानगर, नायक, का पुरुष ओ -महापुरुष असे सत्यजितचे सगळे सिनेमे दोन-तीनदा पाहायचा सपाटाच लावला. एकीकडे सत्यजित रायची चित्ररचना, दुसरीकडे बंगाली भाषेची शब्दरचना, असे दुहेरी शिक्षण झाले.
त्याच दरम्यान एक महत्त्वाची घटना घडली. या घटनेने माझ्या सिनेमा पाहण्याच्या छंदाला एक नवी शिस्त, नवा आयाम दिला. सुधीर नांदगावकर, दिनकर गांगल, सोनेजी हे दिग्गज सिनेप्रेमी ‘प्रभात चित्रपट मंडळ’ नावाची एक फिल्म सोसायटी सुरू करताहेत हे कानावर आले. आपण या उपक्रमाचा सदस्य झालो नाही, तर पाप लागेल असे मनाने घेतले आणि त्याच तीव्र भावनेतून मी तात्काळ प्रभातचे कार्यालय गाठले. माणूस, कुंकू, शेजारी, रामशास्त्री, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, या प्रभात कंपनीच्या बहारदार सिनेमाची पारायणे केली असल्याने ‘प्रभात’ या नावाची जादूही या उत्साहामागे होती.
प्रभात चित्र मंडळाचा उदय ही माझ्या आयुष्यातली सांस्कृतिक क्रांतीच ठरली. 'चिडियाखाना' या सत्यजित रायच्या सिनेमाने या फिल्म सोसायटीचा शुभारंभ झाला. या पहिल्यावहिल्या सिनेप्रदर्शनाला मी उपस्थित होतो, हे मी आजही अभिमानाने मिरवतो. तसा 'चिडियाखाना' हा सिनेमा सत्यजित राय यांच्या लौकिकाला साजेसा नव्हता. पण चित्रा सिनेमागृहाच्या मिनी थिएटरमध्ये या थोर दिग्दर्शकाने पडद्यावर मांडलेल्या प्रतिमा पाहणे हा अनुभव मात्र थ्रिलिंग होता. सिनेमा या कलेविषयी विशेष आस्था असलेली मंडळी या निमित्ताने एकत्र आली. माधव मनोहर, भाऊ पाध्ये, चंद्रकांत खोत, वसंत सोपारकर, अनंत भावे अशी सगळे प्रथितयश मंडळी तिथे भेटली.
प्रभात चित्र मंडळ या फिल्म सोसायटीने मला काय दिले हे शब्दात कसे मांडायचे हा माझ्यापुढे प्रश्नच आहे. प्रभात चित्र मंडळाच्या सिनेमांना हजेरी लावणे हा शब्दांच्या पलीकडला आनंदानुभव होता. आणि आजही आहे. प्रभात मंडळाने नुसते उत्तमोत्तम सिनेमे दाखवले नाहीत, तर सिनेमे कसे पाहायचे; कोणते पाहायचे; सिनेमात काय पाहायचे याचे अप्रत्यक्ष धडे दिले. मंडळातर्फे यासाठी अभ्यास वर्ग आस्वाद शिबिरे आयोजित केली जायची. पण खरे शिक्षण विविध प्रांतातले, विविध जातकुळीचे सिनेमे पडद्यावर प्रत्यक्ष पाहताना मिळत गेले. एका पाठोपाठ पडद्यावर उमटणाऱ्या सिनेमाच्या चौकटी खूप काही सांगायच्या. सिनेमातल्या पात्रांपेक्षा त्या प्रतिमाच अधिक बोलायच्या. विविध देशातून आलेले हे सिनेमे तिथल्या माणसांविषयी बोलायचे, त्यांच्या भावनांविषयी, मानसिकतेविषयी बोलायचे, तिथले लोकजीवन समोर मांडायचे, त्या जीवनातील पेच आम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करायचे. त्या त्या देशाचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या सिनेमातून आमच्यासमोर उलगडत गेले. दिवाणखान्यात आणि नृत्यमहालात घुटमळणाऱ्या आपल्याकडल्या सिनेमांत सहसा हे दिसत नसल्याने आम्हा प्रेक्षकांना या मिनी चित्रात दाखवल्या जाणाऱ्या या परदेशी सिनेमाचे खूप अप्रूप वाटू लागले. सर्व कामे बाजूला सारून प्रभात मंडळाच्या शोजना हजर राहणे ही सांस्कृतिक गरज बनून गेली. पाहता पाहता प्रभात चित्र मंडळाचे शोज बघणे हे आम्हा सिने प्रेमिकांचे एक धार्मिक कर्मकांड बनून गेले.
शब्दांत वर्णन करणे कठीण असा नवा अनुभव प्रत्येक सिनेमा द्यायचा.
प्रभात चित्र मंडळ आणि इतर फिल्म सोसायटी देशभर नावारूपाला येत असता, तिथे युरोपच्या चित्रदुनियेत न्यू - वेव्ह चळवळ आकाराला येत होती. सत्तरीनंतर त्या चळवळीचे लोण जगभर पसरले. भारतीय दिग्दर्शकांनी आपला बाज राखून भारतीय वळणाची न्यू वेव्ह चळवळ आपल्या देशात निर्माण केली. तरुण दिग्दर्शकांच्या प्रयत्नाने भारतीय चित्रसृष्टीत आकाराला येऊ घातलेला प्रायोगिक सिनेमा प्रभात चित्र मंडळामुळे आमच्यापर्यंत पोचला... मंडळाच्या सौजन्यानेच युरोपिअन न्यू वेव्ह चळवळीचे अफलातून प्रयोग आम्हाला पाहायला मिळाले.
प्रभात मंडळाची सुरुवातच अशी चमकदार, एकाहून एक सरस अशा जागतिक कलाकृतीने सजलेली झाली. द्दकश्राव्य माध्यमाचे एक नवे विलक्षण दालन आम्हा प्रभात चित्र मंडळाच्या निमित्ताने आम्हा सदस्यांना खुले झाले. चित्रा सिनेगृहाच्या मिनी थिएटरमध्ये बसून आम्ही फ्रान्स, जर्मन, पोलंड, रशिया, युगोस्लाव्हिया, स्पेन ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जपान, चीन, इराक, नॉर्वे, या सारख्या देशातून हिंडू लागलो. पहिल्या तीन वर्षातच मंडळाने आम्हाला विश्वदर्शन घडवले. जागतिक कीर्तीच्या उत्तम कलाकृती आमच्यासमोर सादर केल्या. मंतरलेल्या अवस्थेत आम्ही हे सिनेमे पाहत राहिलो. आणि आता तर त्याचे व्यसनच लागल्यासारखे झाले आहे. मंडळाचे युरोप आशियातले सिनेमे पाहण्याआधी प्रभात कंपनीचे चित्रपट सिनेमा आणि काही बंगाली चित्रपट हा आमच्या पुढचा आदर्श सिनेमा होता. या पलीकडे सिनेमा आहे हे प्रभात मंडळाने आमच्या निदर्शनास आणले.
इस्तवान झाबो, रोमन पोलान्स्की, फेडरिको फेलिनी, जॉ ल्यूक गोदार, व्हित्तोरिया द सिका, फ्रान्स्वा त्रूफो, अकिरा कुरोसावा, नगीसा ओशिमा, ओझु, इंगमार बर्गमन, जेरी मेंझिल, आंद्रे तारकोव्हस्की, आंद्रे वायदा, मायकेलअँजेलो अंतोनिओनी, किस्लॉव्हस्की, फासबिंदर हे त्या काळाचे जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक आमचे मित्र बनून गेले. आम्ही कॉफी पिता पिता हे सारे दिग्गज आपले जुने सवंगडी असल्याप्रमाणे त्यांच्यावर, त्यांच्या सिनेशैलीवर, बोलू लागलो. या थोरामोठ्यांनी आकाराला आणलेल्या न्यू वेव्ह चळवळीवर, निओ रिऍलिझमवर आमची मते आम्ही अधिकारवाणीने मांडायला लागलो.
तेव्हाचे आमचे संभाषण अर्थातच फार मौलिक नसायचे; पण आम्हा मंडळींचा अभिव्यक्त होण्याचा; पाहिलेल्या सिनेमाची आपल्या समीक्षा करायचा उत्साह दांडगा होता. ते सिनेमेच मुळात विचारप्रवर्तक आणि चर्चेला चालना देणारे असायचे. या सिनेवर्तुळाच्या बाहेरचा व्यावसायिक सिनेमा अभिनेतेप्रधान, तर हा सिनेमा दिग्दर्शकप्रधान होता. या प्रकारचे चार-दोन सिनेमे पाहिले तरी हा दिग्दर्शकाचा सिनेमा असल्याचे ठळकपणे जाणावे.
आपल्याकडच्या सिनेमावर या कलानिष्ठ आंतरराष्ट्रीय कलाकृतींचा प्रभाव पडल्याविना राहिला नाही. कुमार शहानी, मणी कौल, अवतार कौल, ऋत्विक घटक, मृणाल सेन, केतन मेहता, गिरीश कासरावली, सईद मिरझा, मुझफर अली, अपर्णा सेन, बुद्धदेव दासगुप्ता अशा दिग्दर्शकांची फौज त्याच सुमारास उदयाला आली. युरोप-आशियातल्या तत्कालीन नव्या प्रवाहाचे भारतीय रूप त्यांच्या सिनेमात पाहायला मिळू लागले. मात्र या तिथल्या सिनेमाच्या नकला नव्हत्या. नव्या फौजेतल्या प्रत्येक कलावंताचे, सिनेमा या कलेसंदर्भात स्वतंत्र विचार होते. सिनेकलेचा, आणि तंत्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास होता. प्रत्येकाने परदेशातल्या नव्या चळवळीचा आपल्या परीने अन्वय लावला. आणि आपल्या तंत्रात आपल्या शैलीत निर्मिती केली. त्यामुळे इथल्या प्रायोगिक सिनेमात सतत वैविध्य राहिले. भारतीयत्वाबरोबरच प्रांतिक संस्कृतीच्या खुणाही त्यात दिसत राहिल्या. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळवले.
मंडळातर्फे दाखवण्यात येणारे सिनेमे सगळेच उत्कृष्ट होते अशातला भाग नाही. पण प्रत्येक दिग्दर्शक काहीतरी आगळेवेगळे सांगू पाहतोय हे त्यातून जाणवत राही. काहींच्या थीम वरकरणी साध्या वाटल्या तरी प्रभावशाली मांडणीमुळे पडद्यावरील त्याचा आविष्कार असाधारण असे. प्रभातच्या सुरुवातीच्या काळात बरेच अॅब्सर्ड सिनेमे पाहायला मिळाले. त्यांचा दर्जा कमी-जास्त असला तरी त्यांना प्रायोगिक मूल्य होते. सिनेमातली ही अब्सर्डडीटी आम्ही सरावाने पचवायला लागलो. अशा सिनेमानंतर चाय पे चर्चा झडत, आपल्याला लागलेला अन्वय प्रत्येक जण सर्वांसमोर मांडत असे. आम्ही त्या सिनेमावरली आंतरराष्ट्रीय समीक्षकांची आणि खुद्द दिग्दर्शकांची भाष्ये मिळवून वाचू लागलो. फिल्म सोसायटीतले आणि फेस्टीव्हलमधल्या सिनेमाच्या आस्वादासाठी पाहण्याच्या कृतीला अशा प्रकारच्या वाचन व्यासंगाची जोड देणे गरजेचे असते, हे हळूहळू लक्षात येऊ लागले. प्रभात चित्र मंडळाने देखील हे हेरून 'रूपवाणी' नियतकालिक सुरू केले.
सिनेमा ही सवंग करमणुकीची चीज नाही, तर उच्च प्रतीची कला आहे; बौद्धिक आनंद देणारा हा कलाप्रकार आहे. आमच्या मनावर हे बिंबवण्याचं काम प्रभात चित्र मंडळाने केले, हे आवर्जून सांगायला पाहिजे.
प्रभात चित्र मंडळाचा पन्नास वर्षांचा प्रवास म्हणजे सिनेक्षेत्रातल्या आमच्या प्रगल्भतेच्या प्रवासाची पन्नास वर्षे आहेत असे मी मानतो. प्रभात चित्र मंडळाच्या प्रयत्नांमुळे देशविदेशीचा सिनेमा आमच्या डोळ्यासमोर मोठा होत गेलेला आम्ही पाहिला आणि आम्हीही त्या सिनेमाबरोबर मोठे होत गेलो.
उत्तम सिनेमा तुम्हाला केवळ कथा सांगत नाही; ती तर एका कागदावर लिहून तुमच्यापुढे ठेवता येईल, उत्तम सिनेमा आपल्याला कथेपलीकडे नेतो, आणि विलक्षण वेगळे काहीतरी आपल्या समोर ठेवतो. या वेगळेपणाची जात समजायला आपली इयत्ता वाढवावी लागते. आम्हा प्रेक्षकांची इयत्ता वाढवण्याचे काम प्रभात चित्र मंडळ या संस्थेने केले. काही सिनेमे पूर्णपणे नवा विचार आपल्या पुढे ठेवतात, काही आपल्याला जुन्याच विचाराकडे नव्याने पाहायला लावतात. चित्रपटासंबंधीच्या पारंपरिक भावना आणि अपेक्षा बाळगून या नव्या कलाकृतींकडे पाहता येत नाही. नवेपण जोखण्यासाठी नवी दृष्टी असावी लागते. तिसरा डोळा असावा लागतो म्हणा ना ! प्रभात चित्र मंडळाने नव्या सिनेप्रयत्नांचे स्वागत करण्यासाठी आवश्यक असा तिसरा डोळाच प्रेक्षकांना दिला. हे सर्व जाणिवेच्या पातळीवर घडले, पण त्याहीपेक्षा अधिक नेणिवेच्या पातळीवर घडले. म्हणून त्याला शब्दरूप देणे अवघड आहे.
साध्यासुध्या प्रेक्षकांना प्रभातने समीक्षक बनवले. भले त्यांच्यापैकी कुणी प्रत्यक्ष समीक्षा लिहीत नसेल. कलाकृतीकडे जो नीटपणे अभ्यासपूर्वक पाहतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देतो तो समीक्षक या अर्थाने त्याकडे पाहायचे. सिनेमा या कलाप्रकाराकडे गांभीर्याने पाहायची समज मंडळाने त्यांच्यात निर्माण केली. माझ्या स्वत:च्या अभिरुचीला या फिल्म सोसायटीच्या सिनेमाने अर्थपूर्ण वळण लावले. प्रभात चित्र मंडळाची स्थापना ही माझ्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाची घटना असल्याचे सुरुवातीला जे म्हटले आहे ते या भावनेतून. अर्थातच हे केवळ माझ्या एकट्यापुरते खरे नाही. प्रभात चित्र मंडळात दाखवलेल्या हजारो देशी-विदेशी कलाकृतींनी अभ्यासवर्गात त्यावर झालेल्या चर्चेने, कॉफी टेबलावरल्या संवादाने आम्हा सर्व सदस्यांवर गारूड केले. सिनेमा पाहण्याच्या आमच्या द्दष्टिकोनात अमूलाग्र क्रांती घडवून आणली.
आणखी एक लाभदायी गोष्ट इथे सांगायलाच पाहिजे. ती म्हणजे प्रभात मंडळाने मला अभ्यासू आणि चिकित्सक मित्र मिळवून दिले. भाऊ पाध्ये, चंद्रकांत खोत, माधव मनोहर या सारख्या साहित्यिकांचा सहवास मला लाभला. सिनेमा संदर्भातल्या त्यांच्या भूमिका आणि त्यांचे विचार समजावून घेता आले. त्यांच्याशी छान वादही घालता आले. नंतरच्या काळात अशोक राणे, रेखा देशपांडे, संतोष पाठारे, अभिजित देशपांडे, गणेश मतकरी यांच्याबरोबरच्या वादविवादांनी आणि गप्पाटप्पांनी विदेशी सिनेमा बरोबरच देशी सिनेमांची अंगीभूत वैशिष्ट्ये समजत गेली. या सर्व मित्रांनी नव्या सिनेमाचे नवेपण समजावून सांगणारी पुस्तकेही लिहिली आहेत. ही पुस्तके वाचत राहिल्याने आणि या मित्रांसमवेत केलेल्या प्रत्यक्ष चर्चांमुळे आपल्याकडला सिनेमाही मी अधिक डोळसपणे पाहू लागलो. अशोक राणेने इतिहास सापेक्ष भूमिकेतून चित्रपटाकडे पाहायला शिकवले. सर्व प्रकारचा सिनेमा अभ्यासपूर्वक त्याची जातकुळी पाहून कसा तपासावा, आणि सिनेविश्वात त्याचे स्थान कसे निश्चित करावे हे गणेश मतकरीसारखा तरुण समीक्षक भेटल्यावर आणि त्याची पुस्तके वाचल्यावर अधिक स्पष्टपणे लक्षात येत गेले. या सर्वांशी मी आज मतभेदांसह उत्तम संवाद करू शकतो, याचे कारण पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रभात चित्रमंडळाच्या थिएटरमध्ये झालेली वैचारिक जडणघडण. संवेदनशीलतेला प्रत्यक्ष चित्रानुभवाची आणि अक्षर माध्यमाची जोड देऊन प्रभात चित्र मंडळाने प्रगल्भ प्रेक्षकांची एक पिढी घडवली.
दूरदर्शनमध्ये काम करत असताना फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाच महिने प्रशिक्षणासाठी जावे लागले. सतीश बहादूर आणि समर नखातेंसारख्या दिग्गजाशी संवाद साधायची संधी तिथे मिळाली. सिनेमाचे आस्वाद शिबीर त्यावेळी तिथे चालू होते. त्यांच्या परवानगीने त्या शिबिरातल्या वर्गांनाही अधूनमधून बसता आले. प्रभात मंडळाने सिने-आस्वादक्रियेची बैठक आधीच तयार केल्याने मी त्या विद्यार्थ्यांत अगदी अधिकार वाणीने मार्गदर्शक कम सिनिअर स्टुडंट असल्यासारखा मिरवू शकलो. तिथे संध्याकाळी दाखवले जाणारे बरेच सिनेमे मी आधी मिनी चित्रात पाहिले असल्याने तिथल्या मुलांसमोर मी एक्स्पर्टचा आव आणून त्यावर बोलू लागलो.
प्रभात चित्रमंडळाशी संलग्न असल्याने असे अप्रत्यक्ष लाभ अनेक झाले. काही ठिकाणी मी स्वतः दोन-चार सिने-आस्वाद शिबिरेही घेतली. मंडळातील अभ्यासाच्या जोरावर आणि सिनेमाच्या डोळस अवलोकनातून निर्माण झालेल्या आत्मविश्वासावर सिनेपुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणूनही काम करू शकलो. मात्र खरा लाभ प्रभात चित्र मंडळाच्या शोज मधून मिळालेल्या आत्मानंदाचा आणि आत्मसमृद्धीचा. आध्यात्मिक पातळीवरच समजून घेता येतील असे हे लाभ.
सिनेमाध्यमाचा खरा आत्मा आणि खरी बलस्थाने दाखवून देणाऱ्या जागतिक सिनेमांचे पर्यावरण प्रभात चित्र मंडळाने आमच्या भोवती उभे केले. प्रभात चित्र मंडळाची ही सर्वांत मोठी कामगिरी म्हणावी लागेल. या एका महत्त्वपूर्ण कृतीने उत्तमोत्तम सिनेमाचा आस्वाद घेण्याची क्षमता, सिनेमाकडे बौद्धिक कृती म्हणून पाहायची समज आणि इतर आवश्यक सिने-संस्कार आपसूक घडत गेले. संवेदनशील प्रेक्षकाने या संस्कारांना वाचन व्यासंगाची जोड देऊन स्वतःला अधिकाधिक प्रगल्भ कसे होता येईल याकडे लक्ष पुरवले. जाणकार प्रेक्षक आणि समीक्षकांच्या एक वर्ग या प्रक्रियेतून तयार झाला. 'रूपवाणी' या प्रभातचित्र मंडळाच्या मासिकामुळे या प्रक्रियेला गती आली. सेंट झेव्हिअर महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशनचे अद्ययावत ग्रंथालय, राजकमल स्टुडिओतले संदर्भालय यांनी आणि वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवर समीक्षकांच्या सिनेविषयक लेखांनी देखील या कामी मोलाची भूमिका बजावली. संस्थापक सुधीर नांदगावकर यांचे तर मंडळाशी जैविक नाते निर्माण झाले आहे. ही संस्था त्यांनी सिनेसाक्षरतेचा ध्यास घेऊन एखादे सामाजिक व्रत घेतल्याप्रमाणे चालवली. कुठेही प्रसिद्धीचा हव्यास नाही, काडीचा आर्थिक गैरव्यवहार नाही. प्रभात चित्र मंडळाच्या अभिमानस्पद वाटचालीतले नांदगावकरांचे हे गौरवास्पद योगदान नजरेआड करून मंडळाविषयी लिहिता बोलता येणार नाही.
प्रभात चित्र मंडळाच्या सुरुवातीच्या दहा-पंधरा वर्षातील स्थितीचे हे वर्णन आहे. प्रभात चित्र मंडळाचा पुढचा प्रवास अधिक जोमाने सुरू झाला. आज जमाना बदलला आहे. दिग्दर्शकांचे जुनी फौज मागे पडून तिची जागा आता नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शकांनी घेतली आहे.
आज जो सिनेमा ते फिल्म सोसायटी आणि फिल्म फेस्टिव्हलमधून आपल्यासमोर ठेवत आहेत, तो आधीच्या दिग्दर्शकांइतकाच गुणवत्ता पूर्ण आहे यात शंका नाही. पण काही मोजके अपवाद वगळता सिनेतंत्रात आणि आशयात पूर्वी जसे धाडसी प्रयोग व्हायचे, तसे ते आज होताना दिसत नाहीत. कथेची रूढ चौकट मोडून विषयाला भिडण्याचे प्रयत्न कमी होताहेत. इराणी दिग्दर्शकांनी कथाप्रधान आणि नाट्यप्रधान सिनेमाच्या मालिका आणल्या; कथेपलीकडे जाऊन विचारप्रवर्तक असे काहीतरी पडद्यावर आणायची जिद्द त्यांच्यापाशी आढळत नाही, हे स्पष्टपणे कबूल करायला हवे.
समांतर सिनेमा असे आपण ज्या सिनेमाला म्हणत आलो आहोत तो एकेकाळी बंडखोरीबद्दल विख्यात होता; आजच्या सिनेमातून हा बंडखोरीचा घटक जवळ जवळ नाहीसा झाला आहे. समांतर सिनेमाचा प्रेक्षकवर्ग गेल्या तीन दशकात वाढला असल्याचे बोलले जाते. पण एकूण सिनेप्रेक्षकांची संख्या लक्षात घेता ही वाढ फसवी आहे. समांतर सिनेमाच्या बाहेर व्यावसायिक सिनेमाचे वर्तुळ. त्या वर्तुळातील प्रेक्षकांची संख्याही वाढली आहे. व्यावसायिक सिनेमाच्या पडद्यावर मोठ्या थिएटरमध्ये काही आगळ्या वेगळ्या विषयावर सिनेमे सादर होताहेत हे खरे आहे. पण त्यातल्या चार दोन सिनेमांना व्यावसायिक यश मिळते, इतर बरेच चित्रपट एक-दोन आठवड्यापलीकडे टिकत नाहीत असे एकूण वास्तव आहे. सुवर्णकमळ मिळालेल्या सिनेमाला मुंबईसारख्या प्रगत शहरात आज थिएटरदेखील मिळत नाही.
हे खेदजनक चित्र लक्षात घेता आज प्रभात चित्र मंडळासारख्या संस्थेसमोरचे आव्हान किती मोठे आहे हे जाणवू लागते. या वर्तमानकालीन पडझडीला तोंड देण्याचे प्रयत्न संतोष पाठारे, अभिजित देशपांडे यांच्यासारखे उत्साही सिनेप्रेमी करत आहेत; त्यासाठी ते आधुनिक सोशल माध्यमांचा चतुर वापर करताहेत ही दिलासादायक गोष्ट आहे. देशातल्या अनेक फिल्म सोसायट्यांची वाताहत झाली आहे. अशा प्रतिकूल वातावरणात प्रभात चित्र मंडळ आज तगून आहे आणि आपला पन्नासावा वर्धापन दिन दिमाखात साजरा करते आहे ही निश्चितपणे उमेद वाढवणारी घटना आहे.
आज गरज आहे या प्रयत्नामागे आपल्यासारख्या सजग प्रेक्षकांनी सर्व आर्थिक आणि बौद्धिक ताकदीनिशी ठामपणे उभे राहण्याची...
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.
awdhooot@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment